
झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही..
) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते
. त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात
. शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. 
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून
) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं
) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. 
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे 
सिरियल कधीच बघण बंद केल.अशक्य
सिरियल कधीच बघण बंद केल.अशक्य जोडी इहे.
पण जे बघत आहेत त्यांना आता दुसरा पर्याय आहे तो म्हणजे सोनी मराठीवर मुक्ता आणि उमेश कामतची सुरु होणारी सिरियल,अजुन बरसात आहे.
लिमिटेड एपिसोड्सची असावी अस वाटत आहे.
शाल्व किंजवडेकर DDLJ मधल्या
शाल्व किंजवडेकर DDLJ मधल्या शाहरुखचं बेअरिंग का घेतलंय?? अगदीच किळसवाणा दिसतो आणि वागतो.
15 दिवसांत 25k कमावता येत असतील शून्यातून तर स्वीटू अँड फॅमिली स्वतः का नाही कमवत एवढे?
15 दिवसांत 25k कमावता येत
15 दिवसांत 25k कमावता येत असतील शून्यातून तर स्वीटू अँड फॅमिली स्वतः का नाही कमवत एवढे?>> दळभद्रीपणाचं दुसरं नाव साळवी कुटुंबिय..! त्यांच्या वंशपरंपरागत दळभद्रीपणामुळे त्यांना असं काही करवत नाही. सुना शोधताना देखील तोलामोलाच्या दळभद्री शोधून आणतात. मग त्यानंतर आहेच - शुद्ध दळभद्री बिजांपोटी संतती माठ गोमटी..!!! एक भला जावई मिळतोय तर तेही नको यांना. माठ चिन्यासाठी कसली महादळभद्री मुलगी शोधतील या विचारानेच गरगरायला लागलं... थांबतो आता.
माठ चिन्यासाठी कसली
माठ चिन्यासाठी कसली महादळभद्री मुलगी शोधतील या विचारानेच गरगरायला लागलं... थांबतो आता. >>>>छे हो त्या चिन्याच कसलं लग्न करताहेत , तो काय जानू चा भाऊ आहे तो आहे आपल्या शिटू चा भाऊ. हां जर कलाकार चेंज केला तर करतील त्याचे लग्न एखाद्या तेलकट मुलीशी.
नलीला बदललं तर बरं... डोक्यात
नलीला बदललं तर बरं... डोक्यात जाते ही बाई. ष्वीटूला बारीक झालेली दाखवून बदललं अन ओम्याला जरा प्रोटीन शेक्स पाज पाजून अन टेस्टोस्टेरॉनची इंजेक्षनं मार-मारून थोडं थोराड केलं तर शिरेल जरा चालेल असं वाटतंय.
15 दिवसांत 25k कमावता येत
15 दिवसांत 25k कमावता येत असतील शून्यातून तर स्वीटू अँड फॅमिली स्वतः का नाही कमवत एवढे?>> >>>>त्या महादळीद्री नलूला काहीच रुचत नाही पांचट बाई। दारासमोर उद्या लक्ष्मी जरी उभी राहिली तर हि तिला तुझी लक्ष्मीगिरी सोड आणि २५ हजार कमवून दाखव बोलेल .
(No subject)
दारासमोर उद्या लक्ष्मी जरी उभी राहिली तर हि तिला तुझी लक्ष्मीगिरी सोड आणि २५ हजार कमवून दाखव बोलेल .>>

साळवींचा दळभद्रीपणा आता
साळवींचा दळभद्रीपणा आता सवयीचा झालाय....
पण .....शकु यु टु ?
मैत्रिणीला ठणकावुन सांगायचं ना..की जा उडत....इतकी इस्टेट असुनही मी आणि माझा मुलगा तुझ्या मागे लागलोय तर इतकी भाव मारतेस....
इतका शिकला सवरला मुलगा काहितरी बेसिक काम करेलच ना...काय पण ती परीक्षा न काय...
नक्की काय प्रॉब्लेम आहे ओम शी लग्न लावुन द्यायला...
का तर म्हणे मालविका त्रास देइल म्हणुन....ती मोहित ची आई काय आरत्या ओवाळणार होती का ? त्रास च देत होती ना ? तीचा त्रास चालत होता तर इतका चांगला मुलगा आणि सासु असताना नणंदेचा त्रास सहन करायला काय प्रोब्लेम आहे ? ....केहेना क्या चाहते हो ?
नणंदेला सोडुन दुसरा घरोबा करयचा ना...हा का ना का ...
इतकं साधं शिम्पल बेशिक कळत नाही या लोकांना....
आता नक्कीच मोहित कपट करुन खानविलकरांची इस्टेट घेणार आणि सगळे रस्त्यावर येणार असा पुढे काहितरी टर्न असणारच आहे...
त्यासाठीच ओम्या ला इतकं चांगलं दुसरं घर सेट करुन दिलय...स्वयंपाक शिकवत आहेत ..वगैरे वगैरे.....
मग परत नलु ची आरती ओवाळायला सगळे मोकळे की बाइ तुझ्यामुळे ओमला इथे रहायची सवय झाली आणि त्यामुळेच या कठीण परीस्थितीत आम्ही तग धरु शकलो....
(No subject)
(No subject)
कोणी पाहताय का सध्या ?
कोणी पाहताय का सध्या ?
अतिशय बेकार चालु आहे कथानक.... ओम्या ने अखेर २५ हजार रुपये मिळवले पण तिकडे चिन्या ला मारायचा घाट घातला आहे या लोकांनी.
इतर वेळी काहितरी फुटकळ उचापती करणार्या मोहित ने चक्क खून करायचा उद्योग केलेला दाखवला आहे.
ही सिरीअल बंद होणार आहे असे कुठेतरी वाचले ..खरे खोटे देव जाणे...आता संपवा एकदाचं....
मी तर गेला पूर्ण महिनाभर
मी तर गेला पूर्ण महिनाभर टिव्ही च बघितला नाही. आकाशवाणी. सद्ध्या रात्री साडेनवाला रोज नभोनाट्यं लागत आहेत. गेल्या आठवड्यात आपल्या नवर्याच्या बायको सुभेदार वैनीने एकटीने नभोनाट्य सादर केले. हुषार आहेत दाते बै. अगदी लाजवाब म्हणता येईल असं एकटीने सादर केलं ते नभोनाट्य.
मी बघते कधीतरी.. काल दाखवलं
मी बघते कधीतरी.. काल दाखवलं चिन्याला ट्रेनमधून पडताना.. पटले नाही, काहीतरीच दाखवतात.. बॉस ने सांगितले म्हणून कोणी काय असं कोणालाही मारून टाकतात काय ? देवमाणूस कमी होता म्हणून कि काय आता इथे पण खून वैगैरे दाखवायला लागले..
आताशा मी स्टार प्रवाह बघते..
आताशा मी स्टार प्रवाह बघते..
काल दाखवलं चिन्याला ट्रेनमधून
काल दाखवलं चिन्याला ट्रेनमधून पडताना.>> अरे वा.... म्हणजे एकेक साळवी मारून शिरेल संपणार अशी चिन्हे दिसत आहेत तर..! माठ चिन्या असा सहजा सहजी जाणार नाही. ट्रेन मधुन जिथे पडला तिथं नेमकी साळव्यांची चाळ असणार आणि ते चिन्याचं अजस्त्र धूड नेमकं सावंतीण बाईंच्या दारात पडून तिथं विहिरी एवढा खड्डा पडणार. मग सावंतीण बाई साळव्यांशी भांडायला येणार. दादा साळवी "तो विहिरी एवढा खड्डा तर आहे" असा अभिनय करत जसं काही झालंच नाही अशा अविर्भावात सावंतीण बाईंची समजूत काढायला बघणार. ते ऐकून जेवायला बसलेली महामाठ काकी "इश्श" म्हणत लोणच्यात बोट बुडवलेल्या उजव्या हाताने साडीचा पदरात तोंड झाकायला बघणार. माठ काका सावंतीण बाईला तिच्या घरात सुखरूप ये-जा करता यावी म्हणुन विहिरी एवढ्या खड्ड्यावर पूल बांधायचा उपक्रम हाती घेणार. ते बघून ष्वीटू-ओम्याच्या प्रेमात टांग घालण्यात आधीच व्यस्त असणार्या नलीचा लळत असलेला ओठ हे माठ चिन्याने वाढवून ठेवलेलं खार्चिक प्रकरण बघून अजूनच लळत हनुवटीपर्यंत जाणार. शिवाय तिचं आधीचं लालगुलाबी नाक पुसुपुसून काळं-निळं होणार. सावंतीण बाईसाठी विहिरी एवढ्या खड्यावर पूल बांधण्यासाठी दळभद्री साळवी पुन्हा खानविलकरांकडे नोकर्या, धुणी-भांडी, फरशा, चौकीदारी करायला उंबरे झीजवणार. दादा साळवी तर तायडाकडून पुलासाठी कर्ज घेऊन पुन्हा फेर्यात अडकणार................
DJ , भारी एकदम !!!! हे झी ५
DJ , भारी एकदम !!!! हे झी ५ च्या FB पेजवर टाका। मज्जा येईल
जाउद्या... कशाला गरिबांच्या
जाउद्या... कशाला गरिबांच्या पोटावर पाय.
चिन्याला ट्रेन मधून ढकलला ?
चिन्याला ट्रेन मधून ढकलला ? लोकल ट्रेन सुरु झाल्या का मुंबईत त्याच्यासाठी खास?
ह्यातल्या हिरो हिरॉईनची रोमँटिक जोडी म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी झीचा प्रचंड प्रयत्न चालू आहे पण त्यांचा रोमान्स अतिशय बालिश वाटतो. अशक्य आहे पाहणे.
अगबाई बरोबर ही सिरिअल पण
अगबाई बरोबर ही सिरिअल पण सम्पवत आहेत का
आज 2 नवीन सिरिअल चे प्रोमो पाहिले
एकात तर 'श्रेयस तळपदे' आहे
१०.३० ची देवमाणुस पण संपतेय.
१०.३० ची देवमाणुस पण संपतेय. त्या स्लॉट मधली एक असेल.
१०.३० ला "ती परत आलीय"..
१०.३० ला "ती परत आलीय"..
हो.. ते कदम नावाचे ज्येष्ठ
हो.. ते कदम नावाचे ज्येष्ठ अभिनेते आहेत त्या शिरेलित. आता नक्की कोण परत येतेय ते बघायला हवं. "रात्रिस खेळ चाले" परत येईल असं वाटत होतं... पण
मालविका ने काल १० लाख रुपये
मालविका ने काल १० लाख रुपये आणुन दिले दादा ना....त्या बदल्यात दादा त्यांचे घर गहाण टाकणार तिच्याकडे.
अजुन इतक्यात नाही संपत ही मालिका...इतकं कुठलं आपलं भाग्य
मालविका ने काल १० लाख रुपये
मालविका ने काल १० लाख रुपये आणुन दिले दादा ना....त्या बदल्यात दादा त्यांचे घर गहाण टाकणार तिच्याकडे.>> दॅट्स द स्पिरिट.... तरी मी कालच शंका बोलून दाखवली होती. आता तायडा काय दळभद्री साळव्यांना २ वर्षं पिळल्याशिवाय रहात नाही.
सगळे दळभद्री साळवी आता कर्ज फेडण्यासाठी खानविलकरांकडे धुणी-भांडी-फरशी, रांधणे, चौकीदारी करणे, पीठं दळून देणे, कुत्रं खेळविणे असली कामं करत बसतील तरी कर्ज फिटायचं नाही.
आता तायडा काय दळभद्री
आता तायडा काय दळभद्री साळव्यांना २ वर्षं पिळल्याशिवाय रहात नाही. >>
साळव्यांना पिळणार आणी प्रेक्षकांना सुद्धा....
चिन्या च्या डोक्याला पट्टी बांधलेली दाखवली आहे. या निमित्त्ताने तरी त्याच्या डोक्यावरच्या झिंज्या काढुन जरा मेकओव्हर केलेला दाखवायचे ना.
बघवत नाहियेत चिन्याचे केस आता.
रच्याकने, चिन्या चे नाव चिन्मय आहे हे काल कळले.
चिन्याच्या केसाच्या जैविक
चिन्या च्या डोक्याला पट्टी बांधलेली दाखवली आहे>> एवढ्या उपचाराचा खर्च १० लाख रुपये..??
तायडाने हॉस्पिटल पण काढलं का एखादं ज्यात माठ चिन्याला अॅडमिट केला..?? (असेल.. असेल.. मलमपट्टी+सायको उपचारांचा खर्च येत असेल तेवढा...!)
या निमित्त्ताने तरी त्याच्या डोक्यावरच्या झिंज्या काढुन जरा मेकओव्हर केलेला दाखवायचे ना.>> माठ चिन्याच्या झिंज्यांच्या जैविक भांडी-घासण्या बनवण्याचा गृहउद्योग सुरु केला तर दळभद्री साळव्यांना महिन्याकाठी चांगले चार-पाचशे रुपये तरी मिळतील. शिवाय चिन्याच्या झिंज्या पण फुकटात कापल्या जातील त्यात २५० रुपये वाचतील..
बादवे, त्याचा चष्म्याची फुटलेली काच बदलली नव्हती ना हो..? नसेल बदलली तर बरं.. नाही म्हणजे आता तो ट्रेन मधुन पडलाच आहे म्हणजे चष्मा पारच फुटला असावा.. उगाच साळव्यांना डबल भुर्दंड कशाला ना.. आधी काच बदलायचा खर्च केला असेल तर तो पाण्यात जायचा त्यापेक्षा नसेल बदलली काच तर डायरेक्ट नवा चष्माच घेतलेला बरा.. न पेक्षा अपघातात त्याची दृष्टी गेली असेल तर नवा चष्मा बनवण्याचा खर्च पण वाचेल. तेवढंच तायडाचं कर्ज फेडायला उपयोग होईल. (साळव्यांना एक एक रुपया कमाऊन तायडाची कर्जं फेडण्यासाठी कोणत्या स्तरावरील दळभद्रीपणा करावा लागतो याची कल्पना असलेल्या प्रेक्षकांना यात काहीही वावगं वाटणार नाही याची मला खात्री आहे..!)
अहो DJ कितीवेळा बदल करणार ..
अहो DJ कितीवेळा बदल करणार .. बदल बोल्ड फॉन्ट तरी करायचा.. शोधावा लागतोय..
आता नाही करत...
आता नाही करत...
अहो DJ कितीवेळा बदल करणार ..
अहो DJ कितीवेळा बदल करणार .. बदल बोल्ड फॉन्ट तरी करायचा.. शोधावा लागतोय.. >>> हा हा हा....किती लिहु ( शिव्या) आणि किती नको असे झाले आहे त्यांना....
एक भा प्र आहे माझा..... नुसते घराचे पेपर्स घेउन आणि एखाद्या फुटकळ स्टँप पेपर वर सही करुन एखाद्याचे घर आपल्या नावावर करता येते का ?
रजिस्ट्रेशन ऑफिस मधे सही साठी जाणे, सोबत २ साक्षिदार वकिलाचा माणुस ई , फोटो, पॅन कार्ड, आधार यांचे व्हेरीफिकिशन, इतके सगळे जुळवले तरी तिकडे नेहेमी त्यांचा सरकारी सर्व्हर डाउन असणे असल्या भानगडी कराव्या लागत नसतात का यांना ?
नुसते पेपर दिले की झाले घर नावावर ?
नुसते घराचे पेपर्स घेउन आणि
नुसते घराचे पेपर्स घेउन आणि एखाद्या फुटकळ स्टँप पेपर वर सही करुन एखाद्याचे घर आपल्या नावावर करता येते का ?>> स्मिता, अहो या पद्धतीने स्वतःचे घर तायडाच्या नावे करुन देणारे दादा साळवी आहेत.. द ळ भ द्री > सा ळ वी...!! त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार...?

तायडा म्हणजे मांजर अन हे समस्त साळवीज् म्हणजे उंदरं (नली-घूस).... नुसता पकडापकडीचा खेळ सुरु आहे सिरियल सुरु झाल्यापासून. तायडा या दळभद्र्यांना खेळवून खेळवून मारणार...
Pages