हळद आणि हडळ

Submitted by सुर्या--- on 17 July, 2021 - 06:53

लग्नाच्या आधीच्या रात्री आपल्याकडे हमखास एक मनोरंजनाचा, नाच गाण्याचा कार्यक्रम असतो, "हळदी समारंभ". त्यालाच हळद सुद्धा म्हणतात.

आज अमृताची हळद होती. गावाच्या बाहेर दुरूनच कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. गाव नजीक येताच हळदीच्या गाण्यांच्या आवाजात, कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज मात्र दडपला जात होता.

गावातील रस्त्यांवर चांगलीच रैलपैल वाढली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चौकामध्ये " सुस्वागतम " GATE वर रंगीबिरंगी विद्युत रोषणाई केली होती. त्याच GATE पासून मांडवापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लाईट्स च्या माळांनी परिसर सुशोभित केला होता. मांडव दारी पाहुण्यांची आणि घरातल्यांची ये जा चालू होती. महिलांनी नव्या साड्या, अलंकार आणि केसांत गजरे माळले होते. पुरुषसुद्धा नवीन वेष परिधान करून ओळखीच्या लोकांना भेटून हस्तांदोलन करण्यात व्यस्त होते.

अमृताच्या घरामध्ये, घरातील मोठी मंडळी देवकार्याची पूर्तता करण्यात व्यस्त होते. घराच्या एका बाजूला जेवण बनवणाऱ्यांची गडबड चालू होती. आजूबाजूंच्या शेतामध्ये, टिपूर चांदण्यात मित्र मंडळी आणि आप्तेष्ट यांचे वेगवेगळे गट पार्टी करण्यात मग्न झाले होते.

अमृताच्या आजीने हळदीने माखलेला रंगीत धाग्यांचा नाडा अमृताच्या मनगटाला बांधला. कपाळाला हळद लावली आणि अमृताच्या कानात पुटपुटली "अंगावरची हळद उतरेपर्यंत नाडा सोडू नकोस , मांडवा बाहेर जाऊ नकोस"

अमृता त्या गोंधळामध्येही फक्त हो ला हो मिळवत होती. जुन्या चालीरीती आहेत, ऐकायच्या आणि जमतील तेवढ्या पाळायच्या. तसाही तिला कुठं बाहेर जायचं होत. देवाची पूजा अर्चा झाली. आरती झाली. सर्व जण जेवायला, वाढायला, नाचायला निघून गेले.

अमृता मेहेंदी काढण्यात व्यस्त झाली. बाहेर नाच गाणे रंगात आले होते. एव्हाना शेतामध्ये पार्टी करत बसलेले सर्वच गट मांडवात आले. वेगवेगळ्या फर्माइश ने बेन्जोवाले तल्लीन होऊन वाजवत होते. बेंजो, ढोल ताश्यांच्या तालावर, आधीच टल्ली झालेली मंडळीही तल्लीन होऊन नाचत होते. त्यांचीच गम्मत बघण्यात बाया बापड्या सुद्धा आल्या होत्या. वातावरण आनंदी होते. बेधुंद होते. साधारण ११.३० ची वेळ असेल., अमृता काही कारणास्तव घराच्या मागील पडवीकडे गेली. आणि अचानकच लाइट गेली. सर्वत्र अंधार.

गाण्यांचा आवाज थांबला तसा नाचणार्यांचा कल्ला होऊ लागला. पडवी मध्येही घणा काळोख पसरला. मोबाइल घरातच विसरली होती. मनात भीती निर्माण झाली. पडवीच दारं उघडून ती घाईघाईने पळतच सुटली. कुत्र्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तो रडण्याचा आवाज अंगावर शहारे आणत होता. मनात धडकी भरली. तोच पायाला ठेच लागून अमृता खाली पडली. "आई ग्ग्ग " तोंडातुन किंचाळी निघाली. पण आजूबाजूला तिचा आवाज घेणारा कोणीच नव्हता. पायाच्या अंगठ्याला मार लागला. रक्त ओघळू लागले. दोन्ही हातांनी कशी बशी सावरत ती मान वळवून पाहू लागली. डोक्यात सनक भरावी आणि अंगावर काटा यावा असा तो प्रसंग. पडवीच्या भिंतीमागे कुणीतरी उभं होत. अमृता घाबरली, श्वास फुलू लागले. कपाळावर घाम फुटला. तोंडातून शब्द फुटत नव्हते. जिवाच्या आकांताने ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती पण आवाज कंठातून बाहेर पडत नव्हता. ती सैरभैर पळत सुटली. अगदी काही मिनिटांमध्येच ती घराच्या बाजूला असलेल्या पडक्या बंगल्याजवळ येऊन थांबली. थांबली कशी, थबकलीच. आता मात्र तिला काहीच समजत नव्हते. आधीच भुताटकीच्या घटनांनी कुप्रसिद्ध तो तारासाहेबांचा बंगला. आणि तिच्याही नकळतपणे ती इथे कशी पोहोचली तिलाही कळत नव्हते. आजीचे शब्द आठवले, "अंगावरची हळद उतरेपर्यंत नाडा सोडू नकोस, मांडवा बाहेर जाऊ नकोस"
अमृताचे हात पाय थरथरू लागले. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तोंडातून शब्द फुटत नव्हते. मनगटावरचा धागा कुठे गायब झाला होता काही कळत नव्हते. 

ती त्या जागेवरच थांबली. मागे पाहण्याची हिम्मत होत नव्हतो. पुढे पाऊल टाकण्याची ताकद नव्हती. भयाण शांतता आणि रातकिड्यांचा कर्णकर्कश्श आवाज. मागून हळूच पालापाचोळ्याचा आवाज करत कुणीतरी येत होत. डोळे बंद करून अमृता देवाचा धावा​​​​​​​ करू लागली. छातीत धडधड होत होती. डोकं सुन्न होऊ लागलेलं. तोच तिच्या खांद्यावर मागून एक हात आला. ती किंचाळली. अंगावर शहारे आले. आणि ग्लानी येऊन ती खाली कोसळली. 

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आहे

ओ पुढचा भाग टाका की लवकर. ती हडळ होती की आणखीन कोणी याची लय उत्सुकता लागली आहे. पहिला भाग छोटा पण छान आहे.