बुशरा अन्सारी- पाकिस्तानी कलाकार

Submitted by बाख on 8 May, 2021 - 05:17

आधी हिंदू-मुस्लिम एकतेचे मोठे समर्थक
असलेले बॅ. मोहंमद अली जिना यांनी २० मार्च १९४० रोजी लाहोरमध्ये झालेल्या मुस्लिम लीगच्या राष्ट्रीय अधिवेशनात जे अध्यक्षीय भाषण केले, त्यात त्यांनी हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत, आणि ते एकत्र, एकाच छताखाली कधीच नांदू शकणार नाहीत असे सांगितले. २३ मार्च १९४० रोजी स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला. पुढे भारतीय उपखंडाचे दोन तुकडे झाले. कोट्यवधी लोकांना प्रचंड हिंसाचारात मायभूमी सोडावी लागली. दोन्ही देशांच्या आरपार घुसलेला फाळणीचा भाला अजूनही कायम आहे. अगदी मागच्या महिन्यात इमरान खान यांनी भारताने देऊ केलेली साखर नाकारून भारत द्वेषाचा नमुना दाखवून दिला.

या फाळणीने कधीच भरून निघणार नाही एवढे नुकसान कलेच्या प्रांतात झाले. पाकिस्तानातील अत्यंत प्रतिभावान कलावंत,सिनेमा,नाटक,टीव्ही वर व्यस्त असणाऱ्या गायिका-लेखिका असलेल्या बुशरा अन्सारी १५ मे रोजी ६६ व्या वर्षात पदार्पण करताहेत. चाळीसपेक्षा अधिक सिनेमे, सहा टीव्ही मालिका, दहा नाटकांमधून त्यांनी
स्वतःचा स्वतंत्र रसिकवर्ग निर्माण केलाय. पण त्या
केवळ कलावंतच नाहीत तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत
जागृत आहेत. पाकिस्तानातील कट्टरपंथीयांना खडे
बोल सुनावण्यास कचरत नाहीत. इतिहासात जे घडले
ते घडले. कुटुंबे वेगळी झाली म्हणून मुलांमध्ये कटुता
कशासाठी? असा त्यांचा सवाल आहे. दोन वर्षांपूर्वी भारत
पाकिस्तानात तणाव वाढला. मीडिया वाल्यांनी तर असे वातावरण तयार केले की अणुयुद्ध होणार की काय असे वाटू लागले. तेव्हा बुशरा यांनी 'हमसाये माँ जायी' या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली. मीडियावाले, राजकारण्यांना बाजूला सारत आता भारत पाकिस्तानातील गृहिणींनाच दोन्ही देशांची काळजी घ्यावी लागणार आहे, युद्धाचे वातावरण थांबवून मुलांमध्ये प्रेमभावनेची पेरणी करावी लागेल, असा संदेश देणारे हे गीत बुशरा यांची बहीण नीलम अहमद बाशेर यांनी लिहिले. त्यात बुशरांनी हिंदू तर त्यांची दुसरी बहीण अस्मा अब्बास यांनी पाकिस्तानी मुस्लिम गृहिणीची भूमिका केली. अगदी शंभर चौरस फुटाच्या सेटवर चित्रित झालेल्या या गाण्याने लाखो पाकिस्तानी रसिकांनाही अंतर्मुख केले. त्यामुळे बुशरांचे बळ वाढले. पण केवळ व्हिडिओ करून त्या
थांबल्या नाहीत तर प्रत्येक मंचावर हा विचारही ठणकावून
मांडला.

'बुशरा' नावाचा अर्थ अचूकता. हा अर्थ त्यांनी सा्थ
केलाय.अर्थात, कलावंत होण्याचे, व्यक्तिस्वातंत्र्याच्या कट्टर समर्थक असण्याचेबीज त्यांच्यात वडिलांकडून
पेरले गेले. त्यांचे वडील अहमद बाशी प्रख्यात व्यावसायिक लेखक होते. बुशरांना खरी ओळख मिळाली १९७८ मध्ये पीटीव्हीवरच्या'फिफ्टी-फिफ्टी' विनोदी मालिकेतून. १९८३
मध्ये त्यांच्या 'आंगन टेढ़ा ' मालिकेने खळबळ उडवून दिली. कारण त्यात त्यांनी पाकिस्तानची कायम मुस्कटदाबी करणाऱ्या लष्करी राजवटीवर टीका केली होती. त्यामुळे त्या काही काळ अडचणीत आल्या. पण त्यांनी माघार घेतली नाही. अन्वर मकसूद यांची 'लूज टॉक' मालिका प्रचंड
लोकप्रिय होती. त्यात ते आणि मोईन अख्तर समाजातील
दांभिक लोकांच्या चिंधड्या उडवत. या मालिकेतील काही
भागांमध्ये बुशराही होत्या. त्यात भूमिका साकारताना बुशरा
यांनी जी वेगवेगळी रूपे धारण केली आहेत ती त्यांच्यातील
समर्थ, बहुगुणी अभिनेत्रीची साक्ष देतात. त्यांची बहीण अस्मा अब्बास ह्याही उच्च दर्जाचा अभिनय करतात. 'कोई चांद रख' आणि 'दिल लगी' या टीव्ही मालिकेतील त्यांचा अभिनय उत्कृष्ट आहे.

इमरान यांनी भारत द्वेष दाखवून दिला तरीही पाकिस्तानातील कलावंत, टीव्ही मालिकेत काम करणारे कलाकार यांचे मात्र भारतीय कलावंत, टीव्ही कलाकार, हिंदी सिनेमा याच्यावर प्रेम आहे हे नक्की. पाकिस्तानातील कुठलीही टीव्ही मालिका पहिली तर त्याच्यात हिंदी सिनेमाचा आणि कलाकारांचा उल्लेख असतोच. हुमायून सईद या टीव्ही कलाकाराची स्वतः निर्मिलेली कुठलीही टीव्ही सिरियल पाहिली तर हिंदी सिनेमातील गाण्यांचा सढळ वापर केलेला दिसतो. बुशारा यांच्या वर उल्लेख केलेल्या ' हमसाये माँ जायी' या व्हिडिओ मध्ये पण विश्वजित यांच्या किस्मत चित्रपटातील "कजरा मोहब्बतवाला" या गाण्यातल्या ओळी वापरल्या आहेत.

बुशरा यांचा विचार केला तर त्यांच्यातील
प्रतिभेला तेवढा वाव मिळाला नाही. त्यांचा चाहता वर्ग,
भूमिकांमधील वैविध्य पाकपुरतेच मर्यादित राहिले.
फाळणीच झाली नसती तर त्यांच्यातील अभिनयाचा
आणखी कस लागला असता. भारतात आणखी एका
रूपवान, परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या अभिनेत्रीची भर
पडली असती.

......

Group content visibility: 
Use group defaults

बुशरा अन्सारी फारच उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. किस की आए गी बारात मधल्या सायमा चौधरी पासून एका अत्यंत सिरीअस रोल मधे (मालिकेचं नाव आठवत नाहीये - अमेरिकेत स्थलांतर केलेल्या दुकान चालवणाऱ्या एका संयुक्त कुटुंबातल्या बाईचा रोल केला होता बुशरा अन्सारी यांनी) त्यांनी सातत्याने उत्तम काम केले आहे. अजून लिहीन नंतर!

बूशरा अंसारी या ४ कि ५ बहिणी. अस्मा अब्बास या त्यांच्या पेरेंट्स ना सांभाळतात. बूशरा खूप गुणी अभिनेत्री. बरात सिरिझ ची जान.सायमा चौधरी ऑल टाईम फेवरेट. कोविड मूळे नुकतेच एका बहिणीचे निधन झाले.( बरात सिरिझ च्या ताके ची आई).

परिचय आवडला >>>+100

हमसाये माँ जायी' या म्युझिक व्हिडिओची link मिळेल का?

ओह ताकेच्या आईचं काम करणाऱ्या गेल्या का? वाईट वाटलं वाचून. तरीच त्या दोघी एकदम बहिणी बहिणी वाटायच्या मालिकेत.

बरात सिझनची जान >> अगदी अगदी! काय अफलातून कॉमिक टायमिंग आणि ती इतकी गोड पंजाबी भाषा! मी पहिल्यांदा डॉली की आए गी बारात पाहीली. मला अजहरचा पहिला भाग आहे हे माहीत नव्हतं. मग चारही सिझन शोधून पाहीले! अमेरिकेत प्राईमवर आहेत. हलकीफुलकी मालिका आहे.
या शिवाय बुसरा अन्सारी यांची घुंगट ही टेलिफिल्म आणि उदारी ही मालिका दोन्ही उत्तम आहेत.

बुश्रा अन्सारी आणि आस्मा अब्बास दोघी बहिणी मला आवडतात. आस्मा अब्बास काकणभर जास्त आवडते मात्र. त्या कॅन्सर सर्व्हायवर आहेत.
तो दोघींंचा व्हिडीओ कालच पाह्यला आणि आज हे दिसले. थोडा प्रचारकी आहे पण फार मस्त आहे. गवांडने गवांडने.. मस्त ठेक्यात डोक्यात अडकलंय.
सध्या रमजान स्पेशल चुपके चुपके सिरीयलमधे आस्मा अब्बास धमाल दादीच्या रोलमधे आहेत.
त्यांच्या अजून एका बहिणीचे निधन झाले कोविडने हे हल्लीच बघितले होते. तिन्ही की चारी बहिणींची एक मस्त मुलाखत आहे युट्यूबवर.

(मालिकेचं नाव आठवत नाहीये - अमेरिकेत स्थलांतर केलेल्या दुकान चालवणाऱ्या एका संयुक्त कुटुंबातल्या बाईचा रोल केला होता बुशरा अन्सारी यांनी) <<
बिल्किस बानो. बुश्रा अन्सारी माहेरची सरदारनी आहे त्यात.

बरात सिरीज कशी काय राह्यली बघायची. बघते आता.

बुशरा अन्सारी यांची मालिका नाही पहिली पण अस्मा अब्बास याची पहाते आहे खरं तर पाकिस्तानी मालिका खूप उजव्या आहेत आपल्यापेक्षा पण आपले लोक शहाणे होणार नाहीत हे नक्की

अरे वा, खुपचं छान माहिती. माझी पाकिस्तानी सिरीयल ची धाव फक्त धुप किनारी पर्यंत च.

नवीन Submitted by धनुडी on 3 July, 2021 - 04:20
हमसफर आणि जिंदगी गुलजार है, नाही पाहिलीत का ???

बुशरा अन्सारी यांची मालिका नाही पहिली पण अस्मा अब्बास याची पहाते आहे खरं तर पाकिस्तानी मालिका खूप उजव्या आहेत आपल्यापेक्षा पण आपले लोक शहाणे होणार नाहीत हे नक्की >>>
हो सहमत झी जिंदगी वर लागणाऱ्या साऱ्या पाहिल्यात
जिंदगी गुलजार है झी हिंदी वर शनिवारी ५ वाजता लागणार आहे अशी जाहिरात पाहिली होती

हमसफर आणि जिंदगी गुलजार है, नाही पाहिलीत का ???>>> नाही, शोधून बघायला पाहिजे. मला एक जुनं टायटल सॉंग माहिती आहे, " मेरे हमसफर ,मेरे साथ तुम , कभी मौसमौं में रहा करो, " हे कुठल्या सिरीज आहे?