एका माणूसघाण्याची गोष्ट

Submitted by विद्या भुतकर on 29 June, 2021 - 23:56

एक होता माणूसघाण्या. आता तुम्ही म्हणाल 'शी किती घाण वाटतं माणूसघाण्या म्हणायला.' हो पण मराठीने जरा प्रेमळ शब्द दिले तर मराठी कसली. प्रेमळ हा एकच शब्द प्रेमळ असावा मराठीत. असो. तर मी जरा शॉर्टकट मारून त्याला 'माघा' म्हणते. नाहीतर, सारखं माणूसघाण्या म्हणायलाही लै टाईप करायला लागतं. मी काय सांगत होते? हां, माघाची गोष्ट. तर माघा जन्मला तेव्हा काही माघा नव्हता, किंवा त्याला माहित नव्हतं आपण माघा आहोत ते. त्यामुळे त्याचं शाळा, शिक्षण, कॉलेज वगैरे सर्वांसारखंच झालं. उलट शाळेत 'किती बोलतोस रे तू' म्हणून शिक्षकांच्या तक्रारीही यायच्या. हां कधीकधी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी पाजारी सोडून पुस्तकांत रमायचा, पण ते काय आपणही करतोच की? पुढे तोही आपल्यासारखाच इंजिनियर झाला आणि आपल्यासारखीच नोकरीही त्याने घेतली. तिथून पुढे मात्र त्याची माघागिरी सुरु झाली.

रूममेट्स, तेच तेच. सुरुवातीला वाटायचं एखादा ठीके म्हणून, लवकरच त्यांच्याही कंटाळा यायचा. रोज काय त्याच माणसाशी बोलायचं? तोंड बघायचं? माणसाचा कंटाळा किती लवकर येऊ शकतो नाही? सुरुवातीची नवीन ओळखीचे क्षण संपले की मग त्याच गप्पा, तेच स्वभाव, तीच भांडणं सुरु होतं. बरं एखादा घेतो जुळवूनही. पण माघाचं मनच उडून जायचं. समोरच्या माणसाकडे तो पारदर्शक दृष्टीने बघत राहायचा. परत नव्याने नव्याचा शोध. बरं मित्रं म्हणून जी काही चार टाळकी होती त्यांच्या गर्दीतही दोनेक तासांत अस्वस्थ व्हायला लागायचं. कधी एकदा घरी येऊन आपल्या कोशात जातो असं व्हायचं. चुकून एखादा बेगडी वागणारा दिसला तर मळमळून उलटी होईल की काय वाटायचं. समोरचा आवरण घेऊन बसला असेल तर यानेही सोडून द्यावं ना? नाही, त्याला त्या आवरणाच्या आत काय आहे ते शोधून बघायची इच्छा व्हायची आणि ते मिळाल्यावर अजून किळस यायची.

पुढे कधीतरी मग तो ऑनसाईट आला चौघांसारखाच. इथे सुरुवातीला त्याला बरं वाटलं गर्दी कमी बघून. पण पुन्हा तीच गटबाजी, तेच चार लोकांचं छोटं वर्तुळ. त्याने प्रयत्न केला थोडा त्या वर्तुळातून बाहेर पडून नवीन काही करण्याचा, नवीन माणसांची संगत करण्याचा, पण शेवटी माघाच तो. माणसं शोधायची काय गरज आहे म्हणून त्याने तो नाद सोडून दिला. हे सर्व होत असताना त्याला एक त्याच्यासारखीच माघा मैत्रीण मिळाली. मग ते दोघे मिळून माणूसवेड्या लोकांवर हसत. हे माणूसवेडे लोक, आपल्याच बायको-नवऱ्याला सरप्राईज देण्यासाठी लोकांना कसं जमवतात आणि कसं सरप्राईज दिलं यावर गोष्टी रंगवून सांगतात. लोक पिकनिक वगैरे करतात, गेम्सही खेळतात. अंताक्षरीमध्ये त्यांना किती आनंद मिळतो यावर बोलण्यात त्यांच्या अनेक संध्याकाळी जायच्या. माघाला आपला जोडीदार मिळाला असंच वाटलं. त्याने तिचा वाढदिवसही एकट्यानेच तिच्यासोबत अजिबात सरप्राईज न देता साजरा केला. पुढे काय झालं माहित नाही पण त्याची ती मैत्रीण सोडून गेली. शेवटी ती त्याच्यापेक्षाही माघा निघाली असं वाटलं त्याला.

मैत्रिणीच्या दुःखात माघा वेडा झाला. त्याला तिच्या जाण्याचं दुःखं होतं की आपण एका माणसाच्या नसण्याबद्दल इतकी खंत करतोय याचं हे त्याला कळेना. त्या दुःखात तो चक्क मित्रांसोबत(?) न्यू ईयर पार्ट्या, वगैरेंनाही गेला. आपल्याला माणसांची गरज कशी भासू लागली म्हणून तो चक्रावला. त्याने काहीतरी केलेच पाहिजे म्हणून एका थेरपिस्टची मदत घेतली. पण शेवटी माणूसच ती. तिच्या असण्याचाही त्याला वैताग येऊ लागला. किती वेळ बोलत बसणार तिच्यासोबत? मग नाईलाजाने त्याने घरी फोन लावला. त्याचे वैतागलेले आई वडील म्हणाले,'चल तुझं लग्न लावून टाकू, तुला बरं वाटेल.' तो 'हो' म्हणाला. ही आपल्या आयुष्यातली किती मोठी चूक आहे हे त्याला साखरपुड्यादिवशीच कळले. आजूबाजूच्या दुप्पट झालेल्या नातेवाईकांना पाहून त्याचं मन अजून छोटं झालं आणि दुःखं मोठं. आता कुणी म्हणेल याला काय दुःखं आहे, डोंबल? असतात एकेकाची.

बायको बरी होती त्याची. माणूसवेडी होती पण निदान एक भिंत तिने उभी केली त्याच्याभोवती. सगळे सामाजिक सोपस्कार पार पाडण्याची जबाबदारी घेतली बिचारीने. नाही करून करते काय? माघा तिच्यासोबत पॉटलक, मुलांचे वाढदिवस, शाळांचे कार्यक्रम वगैरेंना जाऊ लागला. सर्वाना खूषठेवायचं, गॉड बोलायचं त्याचं काम बायकोने थोडं कमी केलेलं. बायकोसोबत मदत झाली ती सोशल मीडियाची. आता त्याला लोकांसमोर प्रत्यक्ष न उभे राहता लोकांमध्ये असल्याचा भास निर्माण करता येऊ लागला. शिवाय फोन, इंटरनेट वगैरे मुळे अगदी बस, ट्रेन, प्लेनमधेही त्याला बोलायचे सोपस्कार पार पाडायची गरज राहिली नाही. उभ्या उभ्या तो समोरच्या जगातून गायब होऊ शकत होता. अजून काय हवं होतं?

सोन्याहूनही पिवळं म्हणजे लवकरच मग तो आयटी मॅनेजर झाला. त्यामुळे तर त्याची लॉटरीच लागली म्हणा ना? आता प्रोजेक्ट बदलले तसे लोक बदलता येऊ लागले. कितीही बोललं तरी त्याला अर्थ असण्याची गरज नव्हती. उलट तो नाही बोलला तर प्रोजेक्टमधले लोक अजूनच आनंदी राहू लागले. त्याला मीटिंगमध्ये हजर असूनही नसल्यासारखे करता येऊ लागले. टीमसोबत जेवण-बिवण सारख्या औपचारिकता करायची गरज उरली नाही, कारण लोक स्वतःच त्याला टाळू लागले. घरीही कामाचं निमित्त सांगून लॅपटॉप समोर बसता येऊ लागलं. पोरांनाही बापाला काम असतं हे कळून गेलं. कुठल्याही कार्यक्रमांत, वीकेंडात त्याच्या हजेरीची, इतकंच काय दिवस रात्रीचं भान ठेवायचीही गरज नाहीशी झाली. गेले पाच वर्षं झाले तो मॅनेजर होऊन. आयुष्यभराचा सगळा संघर्ष या पायरीपाशी येऊन थांबला असं त्याला वाटलं आणि तो सुखाने नांदू लागला.

अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा! छान आहे गोष्ट.
मी पण जरा माघा झालोय हल्ली असे वाटू लागलेय.
पण ते सतत लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम मुळेही असेल.1

कही ये वोह तो नहीं ।

गम्मत बाजूला पण पाहिल्या आहेत अशाही व्यक्ती.
वाचताना त्यांची आठवण झाली.
छान आहे हेही

मस्त लिहिली आहे...
ते सरप्राईज बडे वाचून ते दिवस आठवले... एका फेज मध्ये बहुतेक प्रत्येक जण ते करतोच
..

अगदी छान लिहिले आहे. माघा लोक स्वतः कोणात मिसळत नाहीत आणि घरातील लोकांनी तसेच वागावे अशी इच्छा असते.

छान लिहिलंय! काही वर्षांपूर्वी माझी मैत्रिण आणि मी मराठी मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाला गेलो होतो. नंतर बुफे जेवण होतं तेव्हा एका जोडप्याबरोबर एकाच टेबलावर बसलो. तुम्ही कोण आम्ही कोण चौकशी झाली, थोड्या गप्पा झाल्या. त्या अर्ध्या पाऊण तासात त्या नवऱ्याने एकदा हॅलो म्हणणण्यापलीकडे एक शब्दही उच्चारला नाही! त्याच्या नोकरीबद्दल, कंपनीबद्दल देखील त्याची बायकोच बोलत होती. हा लेख वाचताना मला तो प्रसंग आठवला! She did all the talking on his behalf!
आजूबाजूला माणसं हवीतच ते असली तर छान पण नसली तरी हरकत नाही असा मानसिक प्रवास केलाय. मात्र कोरोना काळात आजिबातच माणसं भेटेनाशी झाली तेव्हा माणसं हवीत बाबा असं वाटायला लागलं!
माघा शब्दाला एक नकारात्मक छटा आहे तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर it's okay to be someone who enjoys his/her own company असं वाटतं.

कोणीतरी हे माझ्यावरच लिहिलेय असे वाटतेय.
मला ईथे प्रतिसाद काय द्यावा हे सुचत नाहीये.
आपले सगळेच लेख छान असतात. प्रत्येक लेखाला काही उद्देश हेतू असावे असे गरजेचे नाही. पण हे आपल्याला का लिहावेसे वाटले असावे असा विचार करतोय.
मला पुन्हा हेच सारे यात माझे नाव माझे संदर्भ माझा तपशील टाकून लिहावेसे वाटतेय...

एकदम विचार करण्यातला लेख आहे.
यातलं बरंच स्वतःला रिलेट होत असल्याने नव्याने दचकायला पण झालं.
पण परिस्थिती लक्षात येणे हे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यातलं पहिलं पाऊल. Happy

यातलं बरंच स्वतःला रिलेट होत असल्याने नव्याने दचकायला पण झालं.
पण परिस्थिती लक्षात येणे हे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यातलं पहिलं पाऊल
+१११

का लिहीली ही गोष्ट त्याचं कारण सांगणं अवघड आहे. Happy
खूप विचार केला नक्की काय लिहायचंय आणि ते सर्व कुठल्या फॅारमॅटमधे मांडता येईल याचा.
शेवटी हा साचा जरा जमला. तरीही हवा तसा नाहीच.
पण मायबोलीवर प्रयोग करता येतात. कंटेंट चमचाने भरवावा लागत नाही. हे आवडतं म्हणून इथे लिहीते.

कमेंट्स बद्दल धन्यवाद. Happy

-विद्या

रिलेट झालं.....
आमच्याकडे मी माघा आणि नवरा मावे ( माणूसवेडा). खरंतर सासरंचे सगळेच मावे. त्यामुळे सुरुवातीला रुळायला अवघडच गेलं मला. आता झालीय आम्हाला एकमेकांची सवय.
पण सध्या करोनाकाळात माझी मुलगी माघा व्हायला लागलीय. त्यामुळे टेन्शन येतंय. आधीच एकुलती एक, त्यात माघा..... Sad

माघा शब्दाला एक नकारात्मक छटा आहे तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर it's okay to be someone who enjoys his/her own company असं वाटतं. >>> माघा नको असेल तर एप्रि म्हणू शकतो - एकांतप्रेमी

छान लेख.
हलकीशी मानसिक डिसऑर्डर असते कधी कधी.

एकांतप्रेमी = अंतर्मुख = introvert. इतरांच्या कमी सहवासात, ते आपल्या आयुष्यात मजेत असतात.
इच्छुकांनी Quiet: The Power of Introverts in a World That Can't Stop Talking हे पुस्तक वाचावे, अशी शिफारस.

आमच्याकडे मी माघा व बायको मावे. सिलेक्टिवली सोशल असलेले लोक पण माव्यांच्या दृष्टीने माघाच. बायकोच्या मावेपणाचा फायदा मला आपसूकच होतो.

सोन्याहूनही पिवळं म्हणजे लवकरच मग तो आयटी मॅनेजर झाला.>>>
कुठल्या कंपनीत माघांना मॅॅनेजर बनवतात?