नेहमीसारखी गर्दी आणि तरीही निवांतपणा अंगावर घेऊन असलेला मॉडर्न कॅफे संपीला दुरूनच दिसला. तिची पावलं आता झपाझप पडत होती. प्रचंड उत्सुकता आणि थोडीशी धडधड मनात घेऊन ती कॅफेत शिरली. ‘अजिबात वेंधळेपणा करायचा नाही’ असं पुन्हा एकदा स्वत:लाच बजावत तिने पूर्ण कॅफे वरुन नजर फिरवली. एकदम मागे काचेच्या बाजूला असलेल्या मोठ्या टेबल वर सगळे बसल्याचं तिला दिसलं. ती सोडून सगळेच एव्हाना आलेले होते. उशिरा येण्याचा शिरस्ता संपीने इथेही चालूच ठेवला होता. काऊंटर कडे तोंड असलेल्या निखिलला ती सर्वात आधी दिसली.
‘अरे संपदा आली..’ म्हणत त्याने सर्वांचं लक्ष टेबलकडे येणार्या संपीकडे वेधलं.
संपी सगळ्यांकडे पाहत हसत-हसत येऊ लागली. श्वेता, मृणाल तिला तिथूनच हाय करत होत्या. संपीने पण त्यांना हाय केलं. आणि या सगळ्या प्रकारात एका बाहेर आलेल्या आलेल्या खुर्चीच्या पायात संपी अडखळली आणि पडता पडता अगदी थोडक्यात वाचली. मग स्वत:च्या वेंधळेपणावर इतर कोणी हसायच्या आत स्वत:च हसली. कोपर्यात खिडकीशी बसलेला मंदार तिला दुरूनच न्याहाळत होता. पण स्वत:च्या वेंधळेपणाच्या घाईत तो काही लगेच तिला दिसला नाही. ती पुढे आली आणि श्वेताने तिच्यासाठी रिकाम्या केलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. नेहमीसारखं उत्सुकतेने भरलेलं लोभस खळाळतं स्मित होतंच तिच्या चेहर्यावर.
लहानपणापासून एकमेकांना ओळखणारे पण कधी फारसं समोरा-समोर न बोललेले हे दहा-पंधरा चेहरे. सुरूवातीला नाही म्हटलं तरी थोडा awkwardness येतोच. चेहरे टाळून बोलायचं किंवा मग नुसतीच चूळबुळ करायची असं बर्याच जणांचं चालू होतं. मग हळूहळू ‘अरे तो अमुक अमुक कोणत्या कॉलेजला लागला रे?’ वगैरे वळणानी जात वातावरण थोडंसं हलकं व्हायला लागलं. त्यातच श्रीनिवास सारखे हलके-फुलके मेंबर्स असतातच सगळीकडे वातावरण खेळकर ठेवायला. तो त्याचे टुकार विनोद झाडायची संधी अशावेळी सोडणार थोडीच होता. त्यात आजतर चार-पाच मुलीही होत्या समोर. त्याचा स्वभाव आता बर्यापैकी कळलेला असल्यामुळे संपी त्याच्या विनोदांवर भरपूर हसत होती. ती अशीच कशावर तरी हसत असताना तसं मोजकंच पण नेमकं बोलणारा मंदार तिच्याकडे पाहून म्हणाला,
‘संपदा, ब्रांच कुठली गं तुझी?’
संपीला क्षणभर काही कळलंच नाही. इतकावेळ तिने डोळ्यांच्या कोनातून एक-दोनदा त्याच्याकडे पाहून घेतलं होतं खरं पण प्रत्यक्ष बोलली मात्र काहीच नव्हती. पण आता हा असा अनपेक्षित प्रश्न ऐकून बावरली. दोघं रोज बोलायचे, तिची ब्रांचच काय पण अख्खा टिचिंग स्टाफही एव्हाना त्याला पाठ झालेला होता. पण मग सगळ्यांपुढे हा असा प्रश्न का विचारावा त्याने? ती बुचकळ्यात पडली. आणि मग ततपप करत म्हणाली,
‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम’
मंदार अतिशय शांत चेहर्याने तिची मजा घेत होता,
‘अच्छा.. आणि कॉलेज?’
प्रथमच बोलत असल्याचा आव आणत हा बोलण्यासाठी निमित्त शोधतोय हे संपीच्या आता लक्षात आलं. पण चेहर्यावरचे भाव लपवण्यात ती त्याच्याइतकी निपुण नव्हती. येणारं हसू दाबत उगाच खोकलल्याचा आव आणत मग तिने लक्ष श्वेताकडे वळवलं. आम्ही रोज बोलतो किंवा आमची चांगली ओळख आहे वगैरे इतर कोणाला आत्ताच कळू नये असा काहीसा मंदारचा त्यामागे विचार असावा असा अंदाज तिने बांधला.
निखिल संपीसमोर मेनूकार्ड सरकावत म्हणाला,
‘आमच्या सगळ्यांचं ऑर्डर करून झालंय. तू मागव तुला काय हवंय ते..’
संपीने ते मेनूकार्ड अथपासून इतिपर्यन्त परीक्षेचा पेपर वाचावा इतक्या गांभीर्याने वाचून काढलं आणि मग काहीवेळाने त्यात खुपसलेलं डोकं बाहेर काढून म्हणाली,
‘एक इडली-सांबर!’
निखिलने तिच्याकडे एक मिश्किल लुक देऊन वेटरला हाक मारली.
कुठेही, कुठल्याही हॉटेल मध्ये जा, संपी आधी सगळ्या पदार्थांची नावं वाचायची आणि शेवटी इडली-सांबार मागवायची. त्यामागे तो एक आवडीचा आणि मुख्य म्हणजे ओळखीचा पदार्थ आहे हे महत्वाचं कारण असायचंच पण लहानशा शहरातून आल्यामुळे फूड कल्चर, फूड जोईंट्स, नावंही वाचता येऊ नयेत असे नव-नवे पदार्थ पाहून का कोणास ठाऊक ती उगाच बावरायची आणि मग आपला इडली-सांबार बरा म्हणत तेच मागवून मोकळी व्हायची. आजही तिने तेच केलं. तिचा awkwardness ओळखून मंदार तिला म्हणाला,
‘आपल्या गावातला पावशांकडचा इडली-सांबार खाल्ला आहेस तू कधी? सही असतो.’
आपल्या एकदम आवडीचं ठिकाण आणि आवडीच्या पदार्थाविषयी त्याला बोलताना पाहून संपी भयानक खुश झाली आणि मग उत्साहाने तीही बोलायला लागली. मुळात ‘खाणे’ हा विषयच तिच्या फार जवळचा असल्याने ती त्यावर कितीही वेळ बोलू शकायची.
बर्याच वेळापासून श्वेता संपीकडे पाहून काहीतरी असंबद्ध बोलत होती. संपीला आधी कळलं नाही पण नंतर तिची ट्यूब पेटली. ती बोलत होती त्यातलं अर्धं-निम्म समोर बसलेल्या मयूरला उद्देशून होतं. ती बिचारी त्याचं एटेन्शन मिळावं म्हणून काय काय करत होती. पण मयूर मात्र तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत संपीशीच अधून-मधून थोडं-फार बोलत होता. या सगळ्यात संपी मात्र पुरती अवघडून जात होती. मग काही न सुचून ती सरळ श्रीनिवास सोबत खिदळत बसली.
यथावकाश सगळ्यांनी मागवलेले पदार्थ आले. एरवी समोर आलेल्या पदार्थावर लगेच ताव मारणारे सगळे आज मात्र उगाच नसलेला सभ्यपणा दाखवत बसले होते. शांतपणे शिष्टाचार पाळत आपआपल्या पदार्थाकडे टकामका पाहत, हळूच दुसर्यांनी काय मागवलंय याचा धांडोळा घेत, ‘अरेच्चा, ते काय आहे. छानच दिसतंय, तेच मागवायला हवं होतं काय’ असे विचार मनात घोळवत, एकेक चमचा हळूच तोंडात सरकवत, समोरच्या बोलणार्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे असं भासवत (ते अजिबातच नसताना) होते.
आपल्या संपीचं मात्र या कशाकडेही अजिबात लक्ष नव्हतं. तिचं इडली-सांबार टेबलवर अवतरल्यापासून तिने प्रामाणिकपणे आपलं लक्ष त्याच्यावरच केन्द्रित करून ताव मारायला सुरुवात देखील केली होती. आजूबाजूचे fanci दिसणारे पदार्थ पाहून ती अजिबातच विचलित वगैरे होत नव्हती.
मृणालने मागवलेला wooden प्लेट मधला खालून वाफाळणारा आणि वर icecream असलेला ब्राउनी सदृश पदार्थ पाहून श्रीनिवास मिश्किलपणे म्हणाला,
‘हे खायचं पण असतं का? बघूनच पोट भरल्यासारखं वाटायला लागलंय मला’
यावर मृणालने त्याच्याकडे एक जबराट, तुच्छतामिश्रित कटाक्ष टाकला आणि आपली ही लाइन आता बंद झाली हे श्रीनिवासला कळून चुकलं. संपीकडे पाहून मग त्याने हळूच खीखी केलं.
त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत मृणाल निखिलला उद्देशून म्हणाली,
‘अरे, तू त्या अमुक-अमुक joint वरच्या waffles खाल्ल्यास का? बियॉन्ड yummy या..’
आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं असा आव आणणारा निखिल लगेच, ‘ओह यस यस.. delicious they are!’ म्हणून मोकळाही झाला.
Waffles हे नावच संपीसाठी नवं असल्याने तिने त्या संभाषणाकडे जरासा कानाडोळाच केला. संपत आलेल्या इडलीवरुन तिचं लक्ष मग मंदार कडे गेलं. कुठल्यातरी जगावेगळ्या नावाचं सॅंडविच खात तो मयूर सोबत mechanics वर चर्चा करत होता. ‘हा नेहमीच किती इंटेलेक्चुवल असतो..’ नकळत तिच्या मनात येऊन गेलं. बोलता बोलता त्याचं लक्ष त्याच्याचकडे पाहणार्या संपीकडे गेलं. संपीने नजर इकडे-तिकडे वळवली. तो हलकेच गालात हसला.
त्यानंतर मग एकमेकांची खेचत, चिडवा-चिडवी करत त्यांचं गेट-टुगेदर छान पार पडलं. एकमेकांना भेटल्याचा आनंद सगळ्यांच्याच चेहर्यावरून ओसंडून वाहत होता. पुन्हा भेटायचं आश्वासन देत सगळे पांगायला लागले. निघण्याच्या तयारीत असलेल्या संपीकडे पाहून मंदार म्हणाला,
‘तुझं कॉलेज आणि हॉस्टेल त्या अमुक-अमुक भागात आहे ना..?’
‘हो’
‘माझी बहीण तिकडेच राहते.. मी आज तिच्याचकडे जातोय. चल सोडतो तुला’ तो जागचा उठत म्हणाला.
हे वाक्य ऐकून संपीच्या पोटात का कोण जाणे फुलपाखरं उडायला लागली. थोड्याशा नर्वसपणे आणि बर्याचशा आनंदात ती त्याला,
‘हो चालेल..’ म्हणाली.
आणि मग दोघेही जायला निघाले.
क्रमश:
(कथा आणि कथेतील सर्व पात्रे काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी संबंध नाही. पात्रांची नावं आणि ठिकाणं कोणाशी मिळती-जुळती असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.)
हा भाग पण मस्तच.. स्वतःचे
हा भाग पण मस्तच.. स्वतःचे कॉलेज चे दिवस आठवले.. ते दिवसच वेगळे होते..एकदम फुलपाखरी..
छानच हाही भाग.
छानच हाही भाग.
हे मस्तच ….माझ्याच पोटात
हे मस्तच ….माझ्याच पोटात फुलपाखरं उडायला लागली शेवटचं वाचून….काय काय आठवयाला लावतीयस तू…क्युट एकदम.
श्रवु, वावे, मोहिनी..
श्रवु, वावे, मोहिनी.. प्रतिसादांसाठी खूप आभार
संपी परत आयली गो ............
संपी परत आयली गो ..............................भारीच !
खूप खूप भारी
खूप खूप भारी
छान भाग
छान भाग
हा सुद्धा भाग छान.. जाऊ दे
हा सुद्धा भाग छान.. जाऊ दे कथा आरामात पुढे
मस्त भाग हा ही...पुलेशु!
मस्त भाग हा ही...पुलेशु!
जेम्स बॉन्ड, च्यवनप्राश,
जेम्स बॉन्ड, च्यवनप्राश, मृणाली, ऋन्मेष, रानी..
थॅंक यू
छानच भाग, मस्त चालू आहे.
छानच भाग, मस्त चालू आहे.
पुढचा भाग पोस्ट करण्याचा
पुढचा भाग पोस्ट करण्याचा कालपासून प्रयत्न करतेय पण एरर येतोय. काय कारण असू शकेल?
अरे देवा, आम्ही आतुरतेने वाट
अरे देवा, आम्ही आतुरतेने वाट पहातोय.
Admin ना विचारून पाहिलंत का?
Admin ना विचारून पाहिलंत का?
नाही विचारलं
नाही विचारलं
छान
छान
मी किनई, blog वर जाऊन २१ भाग
मी किनई, blog वर जाऊन २१ भाग वाचून काढले

<३
भारीच लिहिताय
किल्ली, थॅंक यू
किल्ली, थॅंक यू
इथे पोस्ट करण्याचा खूप प्रयत्न केला. पण होतच नाहीये.
मी पण न राहवून शेवटी ब्लॉग वर
मी पण न राहवून शेवटी ब्लॉग वर जाऊन वाचले सगळे उरलेले भाग. संपी खूप म्हणजे खूपच गोड आहे
छान चालली आहे मालिका. पु ले शु.
मी पण ब्लॉग वर जाऊन पुढील भाग
मी पण ब्लॉग वर जाऊन पुढील भाग वाचून काढले पण तिथे सुद्धा आता पुढचा भाग कधी येईल याची वाट पाहतेय पुढचा भाग लवकर टाका ना.. संपी ची सवय झाली आता
सांज, तुम्ही नेमका काय एरर
सांज, तुम्ही नेमका काय एरर येतोय त्याचा स्क्रीनशॉट काढून admin ना पाठवा.
मेघना, अमृताक्षर.. थॅंक यू..:
मेघना, अमृताक्षर.. थॅंक यू..:)
वावे, हो केलाय admin ना मेसेज.. रीप्लायची वाट पाहतेय.
माझे अर्धे तारुण्य खर्च झालेय
माझे अर्धे तारुण्य खर्च झालेय मायबोलीवर धागे काढण्यात, हा कुठला एरर येतोय जरा ईथेही टाका की स्क्रीनशॉट, आम्हालाही बघू द्या
मागचा पूर्ण आठवडा हाच मेसेज
मागचा पूर्ण आठवडा हाच मेसेज येतोय. हा जस्ट आत्ताचा स्क्रीनशाॅट आहे
ओह असा कधी आला नाही मला अनुभव
ओह असा कधी आला नाही मला अनुभव
वेमाच सांगतील
मोबईल लॅपटॉप ॲप ब्राऊसर सगळीकडून येतोय का एरर?
सांज तुमच्या लिखाणा मध्ये
सांज तुमच्या लिखाणा मध्ये कोणती स्माइली आहे का? कधी कधी वेगळी कडून कॉपी केलेली स्माइली असेल तर असे होते. माझे कमेंट पोस्ट करताना असे होत होते. तुम्ही ती स्माइली काढून पोस्ट होते का पहा.
ऋन्मेष, हो सगळीकडून येतोय.
ऋन्मेष, हो सगळीकडून येतोय. लॅपटाॅप वर ब्राऊजर पण बदलून पाहिलं.
अमुपरी, चेक करते.
@अमुपरी.. थॅंक यू. स्मायली
@अमुपरी.. थॅंक यू. स्मायली रिप्लेस केल्यावर नाही आला एरर. खरंतर याआधीही मी स्मायलीज use केलेले पण असं कधी नव्हतं झालं..
मस्त. परतलेली संपी आता
मस्त. परतलेली संपी आता वाचायला सुरुवात केली दोन्ही भाग मस्त.