‘दिठी’

Submitted by सांज on 7 June, 2021 - 06:56
dithi

(हे चित्रपटाचं परिक्षण अथवा समीक्षा नाही. प्रेक्षक म्हणून घेतलेला रसास्वाद आहे)

मुसळधार पावसात, नदीच्या भोवऱ्यात सापडून वाहून जाणाऱ्या तरण्याताठ्या मुलाची ऐकू न येऊ शकलेली आर्त हाक, त्याच्या अंगावरच्या कपड्यांव्यतिरिक्त हाताशी काहीही न लागल्याचं जीव कालवणारं दु:ख, ‘रामजी धाव रे.. तुझं पोरगं व्हावून गेलं रे..’ असे ह्रदयाचं पाणी करणारे शब्द ऐकून बधीर झालेला रामजी लोहार..

‘दिठी’ इथे सुरू होतो. दि.बा. मोकाशींच्या १९५९ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘आता आमोद सुनांसि जाले’ या कसदार, कालातीत कथेवर बेतलेला सर्जनशील विदुषी सुमित्रा भावेंनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट, ‘दिठी’ नुकताच OTT प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित झाला.

सतत चार-पाच दिवस धो धो कोसळणारा पाऊस. रोरावत वाहणारी हिंस्र वाटावी अशी नदी. जीव गोठवणार्‍या गारठ्यात सारं गाव निपचीत पडलेलं. त्यातच शिवा नेमाणेची दिवस भरलेली गाय.. अडलेली. आर्त हंबरडे फोडणारी.

आणि सुन्न रामजी लोहार.. पक्का माळकरी. तीस वर्षांच्या वारीचं पुण्य वाहणारा.. आपल्या काळजाचा तुकडा घेऊन जाणार्‍या विठोबावर तो रागावला नाहीये पण, ‘का?’ हा प्रश्न मात्र विचारतोय.. काय खरं-काय खोटं काही कळेनासं झालेला तो शून्यात पाहत राहतो. आज बुधवार. पोथीचा दिवस. तो आणि त्याचे चार सोबती पोथी वाचायला जमलेले. ज्ञानेश्वरीची जन्मभर पारायणे केलेले चार माळकरी.

किशोर कदम, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, उत्तरा बावकर अशी दमदार कास्ट. तोडीस तोड अभिनय! किशोर कदम तर जणू रामजी लोहार म्हणूनच जन्माला आले होते की काय असं वाटावं इतका तो जीवंत अभिनय..!

पोथी सुरू होते. अमृतानुभव मधलं ज्ञान-अज्ञान भेद प्रकरण.. अद्वैताचा सार! अर्थ कळत होता का कोणाला? माहीत नाही. रामजी आकंठ आकांतात बुडालेला. बाकीच्यांना त्याचं दु:ख दिसत होतं पण ते लागत होतं का?

‘ज्याचं सुख त्याला.. ज्याचं दु:ख त्याला..’

प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक चित्रित केलेली, आशयघन तरीही रोजचे वाटावे इतके साधे संवाद, गाभ्याला स्पर्श करणार्‍या सुमित्रा भावेंच्या प्रतिभेचा प्रत्यय क्षणोक्षणी येत राहतो. ‘सिनेमा’ ची भाषा कळलेली ही चित्रकर्ती. त्यांचा प्रत्येक सिनेमा असाच आत-आत पोचत जातो. नितळ असो, देवराई मधला शेष असो (गवताचं पातं वार्‍यावर डूलतं, डुलताना म्हणतं खेळायला चला.. हा फ्लॅशबॅक सुरू झाला की जीव कातर झाल्याशिवाय राहत नाही, डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहत नाहीत), प्रत्येक सिनेमातून सुमित्रा भावे खूप खोल परिणाम करून जातात मनावर.

‘दिठी’ हा मला वाटतं त्यांच्या शिरपेचातला मानाचा तूरा आहे!

पोथीतले शब्द फुके वाटत असतानाच रामजीच्या डोळ्यांसमोर भूतकाळातले अमूर्त तुकडे उभे राहत असतात. ‘तू तो माझे, मी तो तुझे..’ ही ज्ञानेश्वरांची रचना गातानाचा आपला पोरगा त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. पुन्हा वेदनेने ऊर भरून येतो..

तो ओरडतो, ‘विठ्ठला... माझ्या पोराला गती तरी मिळाली असेल काय रे??’ आणि मग जरावेळ थांबून,

‘गती म्हणजे तरी काय रे?’ असा प्रश्न तो विठ्ठलासमोर टाकतो.

तितक्यात, अडलेल्या गाईकडे पाहवत नाही म्हणून तिला सोडवू शकणार्‍या गावातल्या एकमेव रामजी लोहाराकडे शिवा नेमाणेची बायको धावत येते.. मावळलेला दिवस. मुसळधार पाऊस. आणि तिची आर्त हाक..

‘रामजीदा.. धाव रे.. माझी गाय अडली रे.. धाव रे..’

रामजी भानावर येतो. आता त्याला ‘रामजी धाव रे.. तुझं पोरगं व्हावून गेलं रे..’ आणि ‘रामजीदा.. धाव रे.. माझी गाय अडली रे.. धाव रे..’ या दोन्ही हाका एकच वाटायला लागतात. आपला पोरगाच आपल्याला हाक मारतोय असं वाटून तो नेमाणेच्या घराकडे धावतो. ती अडलेली गाय पाहून त्याच्यात काहीतरी संचारतं. त्यानंतर तिला मोकळं करतानाचा तिच्याशी त्याने साधलेला संवाद पहायला-ऐकायला हवा असा आहे. गाईच्या उदरात हात घालून वासराची खुरं शोधणारी त्याची बोटं जणू त्याचे डोळे होतात. गाईच्या वेणा त्याच्या वेणा. तिची सुटका त्याची सुटका. जन्म-मृत्यू, हर्ष-वेदना सारं-सारं एक होत जातं.. वासराला फिरवून हळू-हळू तो बाहेर ओढू लागतो. आणि एका क्षणी गाय विते.. वासरू सुटतं. गाय मोकळी होते. आणि रामजी? रामजीला त्याची दु:खाने अस्पष्ट झालेली दिठी पुन्हा गवसायला लागते.. तो कशाशीतरी तादात्म्य पावतो.. आतून हलका होत जातो..

एकीकडे मृत्यू.. एकीकडे जन्म.. दोन्हीच्या मध्ये रामजी.

हा प्रसंग ज्या कुशलतेने आणि संवेदनशीलतेने चित्रित झालेला आहे त्याला सलाम. प्रत्यक्ष प्रसंग केवळ गाईच्या पोटाशी जाऊन बोलणार्‍या रामजीच्या एक्स्प्रेशन्स मधून उभा केलेला आहे. गाईच्या वेणा स्वत:च्या चेहर्‍यावर जीवंत करणार्‍या त्या अफाट अभिनयाला वाकून सलाम ठोकावा इतका तो हृदयस्पर्शी आहे.

आभाळ फाकतं. सृष्टी नवा श्वास घेते. रामजी अर्धी राहिलेली पोथी पूर्ण करण्यासाठी धावतो. संतु वाणी पुढची ओवी म्हणतो,

आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठिले । लोचनेंसी ।।
आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे ।
कीं माथेंचि चांफेपणें । बहकताती ।।

आमोद म्हणजे सुगंध आणि सुनांस म्हणजे नाक.. सुगंधच नाक झाले, शब्द कर्ण आणि आरसे नेत्र झाले.. भोग्यच भोक्ता झाले..

ओवी कानात झिरपू लागली तसा रामजी विरघळू लागला. ‘बाबा..’ म्हणून त्याच्या पोराचा कानांत घुमणारा आवाज आणि गाईचं आर्त हंबरणं दोन्ही सूर आता एकात एक मिसळले.. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रु वाहू लागले..

ओवी पुढे जात होती..

जिव्हा लोधली रासे । कमळ सूर्यपणे विकासे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा जालें ।।

चकोरचि जैसे चंद्रमा जाले.. या ओळीवर त्याच्या चीर दु:खात शिवा नेमाणेच्या घरातला आनंद मिसळतो. रडत रडत तो अस्फुट आनंदाने उजळू लागतो.. दिठी स्पष्ट होत जाते..

कौलातून फाकणार्‍या सकाळच्या कोवळ्या किरणांत गाणारे-नाचणारे ते सकळ जन पाहणे हा आता सोहळा होतो..

फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची जाली नर ।
जाले आपुलें शेजार । निद्राळुची ।।
चूतांकुर जाले कोकीळ । आंगचि जाले मलयनिळ ।
रस जाले सकळ । रसनावंत ।।
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हे सारले अद्वैता । अफुटामाजी ।।

आता माझेही हात आपोआप ताल धरतात. ‘ आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ।‘ नकळत मीही गाऊ लागते.. अर्थ किती कळतो माहीत नाही पण नेणीव पातळीवर काहीतरी खूप खोल आत स्पर्शून जातं..

चित्रपट संपतो. हे सगळं इतकं प्रभावीपणे आपल्या पर्यंत पोचवणार्‍या सुमित्रा भावेंचं नाव स्क्रीनवर झळकतं.. आणि मन पुन्हा एकदा त्यांचे आभार मानत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतं..

हा अमृताअनुभव घ्यायलाच हवा असा आहे!

सध्याच्या या मळभ दाटलेल्या परिस्थितीत ही ‘दिठी’ आपल्याला खूप काही देऊन जाते हे मात्र नक्की..

सांज
www.chaafa.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट एकदम बोगस वाटला. किशोर कदमचा अभिनय चांगला आहे मात्र त्याचा सुजलेला चेहरा पाहून दारूचं प्रमाण अधिक वाढलं असावं असं उगीच सतत वाटत राहतं. सुभाष मायलेकिंनी (मायचा या चित्रपटाशी संबंध नाही तरी) आता तरी अभिनय सोडावा असे मनोमन वाटतं Wink

या सिनेमाची कथा कुठेतरी वाचलेय आधी, की शाळेत असा काही धडा होता आठवत नाही. पण वाचलेय खूप वर्षांपूर्वी.

लेख आवडला. या गोष्टीचे रुपांतर दूरदर्शनवर अनेक वर्षांपूर्वी बघितले होते. ती एक मराठी मालिका होती, गाजलेल्या कथा प्रत्येक भागात दाखवायचे. नाव, कलाकार काहीच आठवत नाही आता पण ते रुपांतर जबरदस्त झाले होते. त्यामुळे मी शोधून ही कथा वाचली.
कदाचित असे वाटते की कथाभाग एका रात्रीत घडतो त्यामुळे पूर्ण चित्रपट बनवण्यापेक्षा कमी वेळात जास्त प्रभाव पाडून जाईल. नामांकित स्टारकास्ट बघितली की आपल्या मनात काही पूर्वकल्पना असतात त्यामुळे नवीन, अनोळखी चेहरे (अर्थात अभिनयात सशक्त) कदाचित जास्त न्याय देऊन जातात.

@वावे.. त्याबाबतीत मीही संभ्रमात आहे.
@लावण्या.. धन्यवाद
@चिन्मयी.. दूरदर्शन वर मालिका होती असं ऐकलंय
@चिकू.. धन्यवाद.

बाकीच्यांनी थोडे पूर्वग्रह बाजूला सारून सिनेमा पहावा. सुंदर आहे!

छान रसग्रहण! >>>>> +१. चर पाच दिवसांपूर्वीच हा लेख वाचला होता.प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता.
सुनांस म्हणजे नाक..>>>> याबाबत तुम्हाला धन्यवाद! ही कथा वाचल्यापासून सुनांसि म्हणजे काय हा प्रश्न होता.आता वाटते की जरी त्याचा अर्थ माहीत असता तरी कथेचे शीर्षक असे का म्हणून प्रश्न पडला असता.कारण ओवीचा अर्थचत्यावेळी कळला नव्हता.

गाय 'व्याते' की 'विते'?>>>> विते.गाय व्यायली.

आज बघितला. बरंच नाव ऐकल्यामुळे बघायची उत्सुकता होती. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर गंडलेला आहे. डायरेक्शनही धड नाही. इतकी सगळी नावाजलेली लोकं घेऊन वाया घालवली आहेत. पाचपैकी फारतर दोन स्टार्स.

आणखीन दोन गोष्टी लक्षात आल्या. रामजीचा मुलगा अगदीच नुकताच गेलेला दाखवला आहे आणि तो गेल्यावर त्याची बायको बाळंत होते हे ही दाखवलं आहे. पण तिची मुलगी नवजात अर्भक न दिसता चांगली ४,५ महिन्याची गुटगुटीत दाखवली आहे.
दुसरं म्हणजे ती गाय व्यायल्यानंतर रामजी निघतो आणि अमृता सुभाषचा नवरा त्याच्यामागे कंदिल घेऊन धावतो पण दाराबाहेर लख्ख उजेड आहे.

मला तरी हा चित्रपट ओके वाटला. भावेंचे चित्रपट स्लो असतात, कदाचित हि त्यांची स्टाइल (अटेंशन टु डिटेल्स?) असेल. असो.

### स्पॉयलर अलर्ट ###
माझ्या मते हा चित्रपट, इज ऑल अबाउट सर्कल ऑफ लाईफ. मुल्गा अपघातात(?) गेल्याने कोसळलेला दु:खाचा डोंगर, डिनायल आणि त्यात वंशाचा दिवा खुंटला यामुळे आलेलं नैराश्य. या लढाईला सामोरं जात असतानाच त्याच्या हातुन एका कालवडिला (फिमेल काफ?) जन्म दिला जातो. हा चित्रपटाचा टर्निंग पॉइंट आहे. त्या कालवडिची काळजी घ्या हे सांगत असताना त्याला आपल्याच नातीला आपण दूर लोटतोय, याची जाणीव होते, आणि तो ती चूक सुधारतो. पुढे माउलींच्या ओवीत सगळा भावार्थ आहेच...

राज, हे सगळं लक्षात येऊनही पिक्चरमध्ये जीव नाही, डायरेक्शनम्ध्ये जीव नाही आणि वाया घालवलेले कलाकार हेच वाटलं.
पुस्तकांवर बेतलेला चित्रपटही पुस्तकाइतकाच छान असेल असं अजिबातच नाही.

पिक्चर मला आवडेल न आवडेल, बघेल न बघेल कल्पना नाही. लेख छान आहे. कोणालातरी असे लिहावेसे वाटणे हेच चित्रपटाचे यश Happy

कालच पाहिला हा सिनेमा. एकूणात आवडला.
पाऊस, रोरावणारी नदी, पागोळ्या, चिखल... ही दृश्यं खूप वेढून टाकणारी आहेत.

सगळ्यांची कामं छान. पण किशोर कदमचा अभिनय आता मला जरा टाइपकास्ट वाटायला लागलाय.

गायीच्या बाळंतपणाच्या दृश्याला सेन्सॉरने घेतलेला आक्षेप - याबद्दल मला काही माहिती नाही. तो संपूर्ण सीन मला आवडला. पण त्यात मध्येच ते वासराचं ग्राफिक्स दाखवलंय, त्याने रसभंग होतो.
तसंच, अमृता सुभाषच्या कल्पनेत शंकर-पार्वती समोर उभे ठाकतात, तिला मणी देतात, तिच्यासमोर भरलेलं ताट, अंगावर दागिने .... या सीनचं प्रयोजनही समजलं नाही. उगाच लिंक तुटते तिथे.

ललिता-प्रीती,
धन्यवाद Happy

गायीच्या बाळांतपणाला सेन्सॉरने आक्षेप घेतला नव्हता. लेखातील उल्लेख आत्ता वाचला. त्याबद्दल आणि खटकलेल्या प्रसंगाबद्दल नंतर सविस्तर लिहितो.

चिनूक्स,

फेसबुकवर एका कमेन्टमध्ये सुनील सुकथनकरांनी animal welfare बोर्डाने आक्षेप घेतल्याचं वाचलं होतं त्यामुळे लेखात तसा उल्लेख आलाय.

कायदा जे सांगतो ते आम्ही पाळलं. कोणीही गायीच्या बाबतीत आक्षेप घेतलेला नाही.
आम्ही वेगळ्या परवानग्या मागितल्या नव्हत्या.
सुनील सुकथनकर यांचं ते विधान योग्य नाही.

असो, फार खोलात नको शिरुया. तसं नसेल तर ते वाक्य मी मागे घेते.
बाकी इतका सुरेख चित्रपट दिल्याबद्दल आभार Happy

सुंदर रसग्रहण!

एक नितांत सुंदर चित्रपट !

शब्द कानावर पडले तरी त्यांचा अर्थ समजतोच असे नाही. अर्थ समजायला खूप काही घडायला लागतं. ३० वर्ष वारी करणारा रामजी, पोथीतले शब्द मनात उतरलेला रामजी, आणि त्या शब्दांच्या जोरावर इतरांचे दु:ख कमी करू पाहणारा रामजी - जेंव्हा त्याचा स्वतःचा मुलगा गमावतो तेंव्हा स्वतःचे दु:ख मात्र आवरू शकत नाही. कसा आवरणार? नुसताच मुलगा गेला तरी बाप कोलमडतो, रामजीचा मुलगा तर बापाच्या ऋणाची उतराई करणारा असतो. बापाच्या ऋणाची उतराई करणारा असतो हे अगदी मोजक्याच २-३ प्रसंगातून दाखवलंय.

काही काही फ्रेम्स तर अप्रतिमच आहेत. आता अमृतानुभव सुरू करुया असे जेंव्हा संतुबुवा म्हणतात त्याच्या पुढच्याच क्षणाला ढगांनी भरलेलं आभाळ दाखवलंय - अमृतानुभव यायच्या आधीचं मन.

तो शंकर पार्वतीचा प्रसंग आधी थोडा खटकला. पण अती झालं अन हसू आलं हे अनुभवलंय. त्यामुळे तो पण नंतर पटलाच.

पण खास सुमित्रा भावे टच जाणवतो तो रामजीच्या चष्म्यात! अनेक वर्ष वारी करताना रामजीचा चष्मा कधी मोडलेला असतो तर कधी त्याच्या भिंगाला तडे गेले असतात. पण दिठी येताना मात्र चष्मा सुस्थीतीत असतो. आणि मग दिठीचा अर्थ नीट कळतो.

Pages