एका आईचा सूडाग्नी

Submitted by कुमार१ on 11 June, 2021 - 11:10

युरोपमध्ये लघुकथांची परंपरा खूप जुनी आहे. एकोणिसाव्या शतकात तर ती अगदी बहरली होती. तेव्हाच्या कथालाटेत अनेक कथाकारांनी ताकदीचे लेखन केले. बिगर इंग्लिश लेखकांतले दोन नामवंत कथाकार म्हणजे फ्रान्सचे गी द मोपासां ( Maupassant) आणि रशियाचे चेकॉव्ह ( Chekhov). त्यांच्या एकाहून एक सरस कथांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यांच्या असामान्य लेखनामुळे त्यांच्यानंतर कथाविश्वात मोपासां आणि चेकॉव्ह अशी दोन ‘घराणी’ निर्माण झाल्याचे मानले जाते.

मोपासां यांच्या लेखनाने फ्रेंच कथा एकदम वयात आली असे म्हणतात. त्यांचे काही विचार मननीय आहेत. त्यांचे एक वाक्य मला खूप विचारात पाडून गेले; अगदी मनाला भिडले. ते असे:

“जगात फक्त वेश्या आणि शेतकरी हेच खऱ्या चेहऱ्याने जगत असतात. बाकी सगळे लोक निरनिराळे मुखवटे धारण करून जगतात”.

हे वाचल्यावर या लेखकाबद्दलचे कुतूहल चाळवले गेले.
त्यांचे नाव काही मराठी कथाकारांकडून बऱ्यापैकी ऐकले होते. ते एकोणिसाव्या शतकातील एक महान फ्रेंच कथाकार असून त्यांनी ३०० कथा लिहिलेल्या आहेत. त्यापैकी बऱ्याचशा १८७०च्या फ्रान्स-प्रशियाच्या युद्धकाळात लिहिलेल्या आहेत. त्यातून त्यांनी युद्धाची एकंदरीत निरर्थकता दाखवून दिलेली आहे. युद्धकाळात सामान्य जनता विनाकारण भरडून निघते आणि त्यांच्यावर या हिंसेचा खोलवर मानसिक परिणाम होत असतो, हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी बर्‍याच कथा लिहिल्या. त्यापैकी गाजलेली एक म्हणजे Mother Sauvage. तिचा परिचय करून देण्यासाठी हा लेख.

( ही कथा खूप जुनी असल्याने स्वतःवर निवेदनाचा कुठलाही निर्बंध न ठेवता तिच्यावर लिहीत आहे).

कथेची पार्श्वभूमी
फ्रान्स-प्रशियाच्या युद्धानंतर पंधरा वर्षांनी कथेचा निवेदक फ्रान्सच्या एका लहान गावात आलाय. त्याच्या स्थानिक मित्राचा तिथला मोठा वाडा युद्धकाळात प्रशियन सैनिकांनी उध्वस्त केला होता. तो त्याने आता पुन्हा बांधला आहे. आता दोघेही त्या गावात मस्तपैकी फिरत आहेत. अचानक निवेदकाला एका उध्वस्त झालेल्या झोपडीचे अवशेष दिसतात. निवेदक १५ वर्षांपूर्वी या झोपडीत आलेला असतो. म्हणून आता ते विदीर्ण दृश्य पाहून त्याला धक्का बसतो. तो मित्राला विचारतो, की ही झोपडी व त्यातल्या माणसांचे काय झाले ? मग मित्र त्याला ती जुनी दुःखद घटना सांगतो, जी कथारूपाने वाचकांसमोर येते.

कथेचा सारांश
वर उल्लेख केलेल्या झोपडीत एक म्हातारी व तिचा मुलगा राहत असत. म्हातारीचा नवरा पोलिसांच्या गोळीबारात पूर्वी मरण पावलेला होता. पुढे मुलगा ३३ वर्षाचा झाल्यावर फ्रान्सच्या लष्करात भरती झाला. आता म्हातारी झोपडीत एकटीच उरली. ती खूप धीराची होती. ती आठवड्यातून एकदा गावात सामान आणायला जाई तेव्हा ती चक्क खांद्यावर बंदुक लटकवून जाई ! अशात त्या गावात एकदा प्रशियन सैनिकांची पलटण मुक्कामास आली. तिथल्या पद्धतीनुसार या सैनिकांची विभागणी करून त्यांना गावकऱ्यांच्या घरी मुक्कामाला सक्तीने पाठवले जाई. अशा चार सैनिकांना म्हातारीच्या घरी ठेवण्यात आलेले होते.

ते चौघेही तिच्या घरी शिस्तीत राहू लागले. ते आपला खर्च स्वतः करत होते. तसेच कष्टाची कामेही आपणहून करीत जेणेकरून म्हातारीला भार पडू नये. अल्पावधीत त्यांचे म्हातारीशी तिच्या मुलांप्रमाणे नाते झाले. म्हातारी मात्र तिच्या मुलाच्या आठवणीने काळजीत असे. तिला फक्त त्याच्या पलटणीचा क्रमांक माहीत होता. ती त्या चौघांना सारखे विचारी, “23 नंबरची पलटण सध्या कुठे असेल हो?” अर्थात ते चौघे परक्या देशाचे असल्याने त्यांना ते काही माहीत नव्हते. म्हातारीने हे चौघे शत्रूराष्ट्राचे आहेत हे माहीत असूनही त्यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले.

एके दिवशी म्हातारी एकटी असताना सकाळीच तिथे पोस्टमन आला व त्याने तिला एक चिठ्ठी दिली. तिने ती वाचली. त्यात अतिशय दुःखद बातमी होती. तिचा मुलगा बॉम्बस्फोटात ठार झाल्याचे त्याच्या सहकाऱ्याने कळवले होते. तिला हा जबरदस्त धक्का होता पण ती अजिबात रडली नाही. मात्र मनातून ती खूप व्याकूळ झाली. त्याच्या आठवणींचे कढ येऊ लागले. तेवढ्यात तिला ते चौघे सैनिक परत येत असल्याची चाहूल लागली. तिने घाईने ते पत्र लपवले. ते चौघे हसत-खिदळत येत होते व त्यांनी बरोबर एका सशाला खाण्यासाठी आणले होते.

मग म्हातारीने त्यांच्यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरू केली. एका सैनिकाने तिला तो ससा मारून दिला. मात्र ते दृश्य पाहून आज तिला अगदी भडभडून आले. स्वयंपाक झाल्यावर त्या चौघांनी खाण्यावर यथेच्छ ताव मारला. म्हातारीला मात्र आज जेवण अजिबात गेले नाही. एकीकडे तिच्या डोक्यात काहीतरी वेगळेच शिजू लागले होते. एकदम ती त्यांना म्हणाली, “तुम्ही इथे माझ्याकडे तब्बल महिनाभर आहात आणि मला अजून तुमची नावेदेखील माहीत नाहीत !” त्यावर त्यांनी आपापली नावे सांगितली. पण तिचे नुसत्या सांगण्यावर समाधान झाले नाही. तिने एक कागद घेतला व त्यावर सर्वांची नावे व पूर्ण पत्ते व्यवस्थित लिहून घेतले.

सैनिक म्हातारीच्या घराच्या माळ्यावर झोपत असत. त्या दिवशी खूप थंडी होती. सर्वांची जेवणे झाल्यावर म्हातारीने त्या माळ्यावर वाळलेल्या गवताचे भारे आणून ठेवले. तिथे भरपूर गवत ठेवून झाल्यावर त्यांची झोपायची जागा मस्तपैकी उबदार झाली. यथावकाश ते चौघे शिडीने चढून माळ्यावर झोपायला गेले. म्हातारी जागीच होती. जेव्हा त्यांना गाढ झोप लागली तेव्हा तिने हळूच ती शिडी काढून घेतली. मग ती दबक्या पावलांनी बाहेर पडली आणि तिने अजून गवताचे भारे आणून घरभर रचून ठेवले. आता तिची ‘तयारी’ पूर्ण झाली होती !

सर्वत्र शांतता होती. त्यात फक्त त्या चौघांचे घोरण्याचे सूर ऐकू येत होते. म्हातारीने निश्चय केला आणि तिने घरातल्या गवताला आग लावून दिली व ती झरकन बाहेर पडली. क्षणार्धात संपूर्ण झोपडीने पेट घेतला. ज्वाळांचे लोट आसमंतात विखुरले. थोड्याच वेळात माळ्यावरून त्या चौघांच्या आर्त भेदक किंकाळ्या ऐकू आल्या आणि मग काही वेळात सारे कसे शांत शांत झाले. एव्हाना झोपडी जळून खाक झाली व तिचा सांगाडा फक्त उरला होता.

आता म्हातारी त्या खाक झालेल्या झोपडीसमोर हातात बंदूक घेऊन उभी राहिली. तिला पुसटशी शंका होती की चौघांपैकी कोणी जिवंत आहे की काय. मात्र तसे काही नाही याची खात्री पटल्यावर तिने ती बंदूक भिरकावून दिली. एव्हाना त्या आगीची बातमी गावभर पसरली आणि लोकांचा लोंढा व काही प्रशियन सैनिक तेथे येऊन पोहोचले. त्यातला एक जर्मन अधिकारी होता. त्याने पाहिले की म्हातारी शांतपणे एका झाडाच्या खोडावर बसून राहिलेली आहे. त्याने तिला दरडावून विचारले, “तुमच्याकडचे सैनिक कुठे गेले ?” तिने शांतपणे जळालेल्या झोपडीकडे बोट दाखवले.

पुढे असा संवाद झाला :
तो : कशी लागली आग ही ?
ती : मीच ती आग लावली आहे !

आता त्याचा एकदम यावर विश्वासच बसेना. त्याला वाटलं म्हातारी काहीपण बरळतीय. पण तिने ठामपणे धिटाईने संपूर्ण घटना त्याला सांगितली. मग तिने तिच्याकडील दोन कागद काढून त्याला दाखवले. त्यातील एकावर तिच्या मुलाच्या मृत्यूची बातमी होती, तर दुसर्‍यावर त्या चौघांची नावे व पत्ते लिहिलेले होते.
पुढे ती म्हणाली, “तुम्ही या चौघांच्या आयांना ही बातमी जरूर कळवा आणि मी हे कृत्य केल्याचे सांगाच, विसरू नका बरं का !”

आता मात्र तो भडकला. त्याने त्याच्या बारा सैनिकांना जवळ बोलावले व म्हातारीला ठार मारायचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी तिला त्या जळक्या तप्त घराला लागून उभे केले आणि मग तिच्यावर बंदुकीच्या गोळ्यांची सरबत्ती झाली. गतप्राण होताना म्हातारीच्या हातात तिच्या मुलाबद्दलचे पत्र घट्ट धरलेले होते. सैनिकांचे एवढ्यावर समाधान झाले नाही. त्यांनी संपूर्ण गावावरच सूड घ्यायचे ठरवले. मग त्यांनी तिथे हैदोस घातला आणि अनेक घरे उद्ध्वस्त केली.

Mother Sauvage.jpg
….
अशी ही एका शूर आईची कहाणी. तिची बदलती रूपे लेखकाने छान चितारली आहेत. सुरुवातीस जेव्हां ते चौघे मुक्कामासाठी तिच्यावर लादलेले असतात तेव्हा ती त्यांच्याकडे पुत्रवत बघते. जरी ते शत्रूराष्ट्राचे असले तरी त्यांना अतिथीसमान वागवते. तिचा मुलगाही सैनिक आहे. तेव्हा त्यालाही असेच कुठेतरी राहावे लागत असेल या भावनेपोटी ते असावे.

पुत्रवियोगानंतर मात्र तिच्या मनातील मायेची जागा वैराने घेतली जाते. आता तिला ‘आपल्या’ व ‘त्यांच्या’ देशातील युद्धाची जाणीव झाली असावी. मग ‘युद्धात सर्व क्षम्य असते’, हाच मंत्र तिने जपलेला दिसतो. पुढे त्यांना जाळल्यावर भ्याडपणे पळून न जाता स्वतःच्या मृत्यूला सामोरे जाऊन ती एक शूरमाता ठरते. त्या चौघांच्या घरी ही दुःखद घटना कळली पाहिजे, हा तिचा आग्रह आपल्याला चकित करून जातो. कुठल्याही आईला आपल्या ठार झालेल्या मुलाचा मृतदेह सुद्धा बघायला न मिळणे यातले दुःख ती जाणून आहे. निदान त्यांच्या आयांना आपली मुले बेपत्ता वाटण्यापेक्षा मृत झाल्याचे कळणे तिला महत्वाचे वाटलेले दिसते. कथेतील म्हातारीचे कृत्य बघून ते योग्य की अयोग्य हे द्वंद्व वाचकाच्या मनात उभे राहू शकते. परंतु ज्या शौर्याने तिने ते केले व त्याचे प्रायश्चित्तही घेतले ते बघता अखेरीस ती वीरमाताच म्हणावीशी वाटते.

मोपासां यांच्या या गाजलेल्या कथेचा मराठी अनुवाद ‘रानमाय’ या नावाने झालेला असून तो एस. डी. इनामदार यांच्या ‘दिगंतराचे पक्षी’ या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे.
………………………

• मूळ कथा इंग्लीशमध्ये इथे वाचता येईल : https://www.gutenberg.org/files/3090/3090-h/3090-h.htm#2H_4_0018
• प्रचि 'विकी'तून साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युद्धावरच्या कथा वाचून / चित्रपट पाहून जसं नेहमी वाटतं तसंच वाटलं!
मला ही कथा आधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटत आहे. अंतर्नादमध्ये आली होती का? कारण बहुतेक अंतर्नादमध्येच मोपासां यांची दुसरी एक कथा वाचली होती. युद्धाचीच पार्श्वभूमी. एक वेश्या आणि इतर काही प्रतिष्ठित माणसं जीव वाचवून गावाबाहेर पळून जात असतात तेव्हाची घटना आहे. तीही कथा अशीच अंगावर शहारे आणणारी!

वावे,
अंतर्नादमध्ये आली होती का? >>

तसे काही आठवत नाही.
मी तिचा मराठी अनुवाद एस डी इनामदार यांच्या या लेखात उल्लेख केलेल्या पुस्तकात वाचला आहे.

मोपासांच्या कथा अतिशय आवडतात. ही कथा वाचनात आलेली नव्हती तिचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद!

युद्धाचीच पार्श्वभूमी. एक वेश्या आणि इतर काही प्रतिष्ठित माणसं जीव वाचवून गावाबाहेर पळून जात असतात तेव्हाची घटना आहे. तीही कथा अशीच अंगावर शहारे आणणारी!>>
ही बहुतेक Boule de suif कथा आहे.

धागा नी प्रतिसाद खूपच रोचक व माहितीप्रचूर. कथेनंतर जे विश्लेषण केले आहे ("तिची बदलती रूपे लेखकाने छान चितारली आहेत" या पुढील भाग) ते फार आवडले. कुमार सर खूप खूप धन्यवाद!

छान परिचय कथेचा. पण आपल्याला दु:ख झाले म्हणून सूड म्हणून जीव घेणे मला तरी पटत नाही. स्वतंत्र पणे बघता तो ही गुन्हाच आहे. कोणत्याच मोठ्या युद्धात स्त्रिया लीडरशीप रोल घेतलेल्या दिसत नाही त असे परी णा म भोगतानाच दिसून येतात. तिची अगतिकता व नैराश्य मी समजू शकते. पुत्र वियोगाने अति दु:खातून तिने ती स्टेप घेतली पण दु:खाची साखळी ब्रेक करता येते.

धाग्या चे शीर्षक वाचून हे करोना संबंधात काय असावे अशी शंका आली.

वरील सर्वांचे आभार !
अमा,
असा विचार मनात येऊ शकतो हे बरोबर. म्हणूनच मी लेखात हे वाक्य दिले आहे :

म्हातारीचे कृत्य बघून ते योग्य की अयोग्य हे द्वंद्व वाचकाच्या मनात उभे राहू शकते

* शीर्षक वाचून हे करोना संबंधात काय असावे अशी शंका आली. >>> यात करोना वाटावे असे काय आहे ? आरोग्य विभागात नाही हे !

>>>धागा नी प्रतिसाद खूपच रोचक व माहितीप्रचूर. कथेनंतर जे विश्लेषण केले आहे ("तिची बदलती रूपे लेखकाने छान चितारली आहेत" या पुढील भाग) ते फार आवडले. >>>
+९९९

कुमारजी
मानवी स्वभाव कसा वळणं घेईल , सांगता येत नाही. .
छान परिचय करून दिला आहे आपण

कुमार सर ,
सुंदर कथा परिचय.

“जगात फक्त वेश्या आणि शेतकरी हेच खऱ्या चेहऱ्याने जगत असतात. बाकी सगळे लोक निरनिराळे मुखवटे धारण करून जगतात”. = >
आजही लागू , मुखवटे बदलन्याची "कला" ही खूपच महत्वाची होत आहे असे दिसते, आजूबऊला .

डेंजर आहे कथा. अश्या कथांना आवडली असं पण म्हणवत नाही.

कथा परिचय छान केलाय. कथेची पार्श्वभूमी आणि नंतरच विश्लेषण दोन्ही आवडले.