"शासकीय तंत्रनिकेतनातलं काॅपी प्रकरण आणि अजून बरेच काही....": पर्व २ रे

Submitted by चंद्रमा on 23 May, 2021 - 06:39

..... 'अविनाश', 'मनोहर', आणि 'राजाराम' हे तिघे कॉलेजच्या वस्तीगृहात राहत होते तर 'पांडे' आणि 'गोट्या' आपल्या घरी! पण त्यांना आज रात्री होस्टेलला थांबायचे होते कारण ते पिऊन टुल्ल झाले होते. होस्टेलचे गेट रात्री १०:४५ ला बंद होत असे अशा वेळेस काय करायचे तर ते सर्वत: सिक्युरिटी गार्ड वर अवलंबून असायचे.'सेक्युरिटी गार्ड' ओळखीचा असला की त्याला दहा- वीस रुपये किंवा गुटखा पुडी देऊन आपल्या मित्रांना आत मध्ये सोडत असे. पण नेमकं त्या दिवशी नाईट ड्युटी वर 'सदाशिव मामा' होते 'सदाशिव मामा' इमानेइतबारे काम करायचे. होस्टेलचे सुरक्षारक्षक म्हणून ते बारा वर्षापासून कार्यरत होते.
ते होस्टेलच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखायचे आणि कोणी बाहेरचा विद्यार्थी दिसला आणि तो सुद्धा पिऊन तर तक्रार डायरेक्ट वार्डन कडे! मग काय होस्टेलच्या मागच्या बाजूला दगडी भिंत होती आठ ते दहा फुटांची! ती पार करायची. आता पार करायची म्हणजे कमालीची कसरत!त्यादिवशी सर्व पिऊन टुल्ल होते. साडेअकरा झाले होते कॉलेजचे गेट बंद! मग भिंत चढून जाण्याचा प्लॅन ठरला. 'गोट्या' सर्वात बुटका होता मग पांडेच्या पाठीवर चढून त्याला आधी आत मध्ये ढकलले अशे एकमेकांच्या पाठीवर चढून भिंत पार केली 'मनोहर' सर्वात उंच तर तो दगडांची रास ठेवून त्यावर चढून त्याने आत मध्ये उडी मारली.तरी अजून पुढचा मार्ग अवघड होता कारण कॉलेजचे गेट तर पार झाले होते पण होस्टेलचे पार कसे करायचे कारण 'सदाशिव मामा' डोळ्यात तेल घालून दारावरच उभा! अशा विलक्षण परिस्थितीला तोंड देण्यासाठी राजारामने आपल्या खोलीच्या खिडकीचे दोन लोखंडी गज कापून ठेवले होते त्यामुळे त्या खिडकीतून एक व्यक्ती डोके आत मध्ये टाकून आरामात शिरू शकत होता. लपत-छपत सर्व राजारामच्या रूमच्या खिडकीजवळ आले. खिडकीची टिचकणी तो खुलीच ठेवायचा. मग हळूच त्याने खिडकी उघडली आणि एक एक करून सर्व आत मध्ये आले आणि 'हुश्श्' म्हणून सर्वांनी सुस्कारा सोडला आणि हे मद्यप्रेमी निद्रेच्या कुशीमध्ये डुलक्या घेऊ लागले.

...........मनोहरचा कोणत्याही मुली सोबत मेळ जमत नव्हता. प्राजक्ताने तर त्याला 'दादा' म्हटले होते त्यामुळे त्याचा पत्ता कट! आता तो कॉलेजच्या सायकल स्टँडवर उभा राहून मुलींना न्याहाळायचा.अशातच त्याला एक 'कम्प्युटर सायन्स' फर्स्ट इयर ची 'पूजा माळी' आवडली.तिला बघून तो वेडाच झाला.त्याने लगेच तिची माहिती काढली. ती बसने अपडाऊन करीत असे. मग हे महाभाग रोज 'बस स्टँड' वर चकरा मारायचे पण बोलायची हिम्मत काही होईना! मग त्याने एक शक्कल लढविली पांडवांना बोलावले आणि प्लान ठरला. ते सगळे हॉस्पिटलमध्ये गेले आणि कंपाउंडर ला भेटले त्याला म्हणाले," हे बघा राजे आमच्या मित्राचा हात फ्रॅक्चर झाला आहे त्याचे प्लास्टर करायचे आहे." कंपाउंडर म्हणाला, "असं डायरेक्ट प्लास्टर नाही करता येणार आधी 'डॉक्टर' इन्स्पेक्शन करतील नंतर एक्स-रे काढला जाईल. फ्रॅक्चर असेल तेव्हाच आम्ही प्लास्टर करतो. आता सगळ्यांनाच घाम फुटला. तर गोट्या कंपाउंडर ला म्हणाला, "भाऊ जरा एक मिनिट इकडे येता का?" करा ना राव लगे तर तुम्हाला शंभर रुपये देतो एक्स्ट्रा." कंपाउंडर जाम भडकला. "नाही नाही असं काही आम्ही करीत नाही. चालते व्हा इथून."

......"आता हे प्लास्टर आपणच करू. 'पांडे' म्हणाला. माझा हात मागच्या वर्षी फ्रॅक्चर झाला होता मला माहित आहे कसे करायचे ते." मग मेडिकलमध्ये जाऊन पीओपी आणि बँडेज घेतले. होस्टेलला आले प्रत्येक जण आपापल्या सूचना देत होता. महत्प्रयासाने ते कसेतरी ओबड-धोबड प्लास्टर केले आणि मनोहर च्या गळ्यामध्ये लटकवले.लगेच सर्वानी त्यावर आपल्या स्वाक्षऱ्यासुद्धा केल्या आणि लिहिले "GET WELL SOON BUDDY"
प्लास्टर करण्यामागील मुख्य उद्देश होता मनोहर 'अजंता थिएटर' मध्ये 'शाहिद कपूरचा' कोणतातरी पिक्चर बघून आला होता आणि त्या पिक्चर मध्ये तो हीरोइन ची सहानुभूती मिळवण्यासाठी आपल्या हातावर खोटे प्लास्टर चढवतो आणि मुलगी काळजीपोटी त्याच्या प्रेमात पडते. हाच तो फार्मूला ४०४!
दुसऱ्या दिवशी आपला हात गळ्यात लटकवून हे साहेब 'बस स्टॅन्ड' वर पूजाच्या प्रतीक्षेत! सोबत 'गोट्या' पण होता 'पूजा' बसमधून उतरली तिने एक कटाक्ष 'मनोहर' वर टाकला आणि काहीही न बोलता पुढे निघून गेली. 'मनोहर' निराश झाला.मग गोट्याने त्याची समजूत काढली आणि म्हणाला
"हर किसी को नहीं मिलता यहां प्यार जिंदगी में!"
'मनोहर' ने रागाने गोट्याकडे बघितले. मनोहर बोलला, "साला एक महिना झाला हिला फॉलो करतो आहे माझ्याकडे बघते पण बोलत का नाही?" त्याचे मन अस्वस्थ झाले आणि त्याने ठरवले आज याचा सोक्षमोक्ष लावायचाच. कॉलेज सुटल्यानंतर सर्व 'पांडव' एकत्र आले आणि आज 'पूजा' ला प्रपोज करायचाच! प्लान ठरला! कोण कोण कुठे राहणार सर्व निश्चित झाले. 'पांडे' पूजाच्या क्लासच्या बाहेरच उभा होता. जसे कॉलेज सुटले तसा 'पांडे' चा मेसेज आला "पाखरू निघालं आहे." आता 'कॉलेज' पासून 'बस स्टॅन्ड' पर्यंत यायला वीस पंचवीस मिनिटे लागत असे. सर्व तयारीनिशी सज्ज होते आणि अखेर ती मैत्रिणीसोबत आली. मनोहरने तिला बघितल्यावर तिच्याकडे स्माईल करायचा प्रयत्न केला पण ती काही बघेना. मग तिची बस आली आणि ती बस मध्ये चढली. आता काय! 'मनोहर' कावराबावरा झाला. आज प्रपोज करायचाच म्हणून पेटून उठला. त्याच्या पायामध्ये शक्ती संचारली आणि वाऱ्याच्या गतीने त्याने बस कडे धाव घेतली. धावत धावत त्याने बस पकडली. पांडवाज हा थरार बघतच राहिले. ती मागच्या सीटवर बसली होती एकटीच! मनोहर लगबगीने तिच्या जवळ गेला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला आणि एका दमात म्हणाला "पूजा तू मला आवडते."
तर काय ती लगेच उठली आणि पुढच्या सीटवर जाऊन बसली. आता मनोहरला कळून चुकले होते की ही काही आपल्याला भाव देत नाही. पुढे टोल नाक्यावर बस थांबली आणि मनोहर बसमधून उतरला आणि त्याने परतीचा मार्ग पकडला एका पराभूत सैनिकासारखा!.हात लटकत लटकत तो चक्क दोन किलोमीटर पायी चालत आला. त्याची वाट पांडव बघतच बसले होते. गोट्याने दुरूनच ओळखले की, 'प्रेमी घायल है.' 'मनोहर' जवळ येताच त्यांने आपल्या भात्यातील 'अग्निबाण' सोडला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,
"प्यार करो क्योंकि प्यार की कोई हद नहीं होती,
दो दिलों के बीच कोई सरहद नहीं होती!
दिलरुबा को तो सभी चाहते हैं दोस्त;
मगर बेवफा को चाहने की किस्मत सभी की नहीं होती!"
मग सर्व त्याला सांत्वन देऊ लागले. "सोड ना यार, अशी कोणती अप्सरा होती ती, आपण दुसरी बघू तुझ्यासाठी." आता मनोहरचे 'हृदय' तीळतीळ तुटत होते मग राजारामने लगेच प्लान केला. "आज इस टुटे हुये दील को संभालने के लिये जाम की जरूरत है." 'राजाराम' हे तर असे व्यक्तिमत्त्व होते त्याला फक्त कारण हवे होते 'दारू' प्यायला मग ते कोणतेही असो मित्राचा वाढदिवस, एटीकेटी चा विषय निघाला तर दारू, मुलगी पटली तर दारू नाही पटली तरीही दारूच!
पिणाऱ्याला काय प्रत्येक वेळी नवीन पर्व असते आणि अॅकेडेमिक्स पेक्षा पिण्याच्या कॅपॅसिटी वरच गर्व असते. मग सर्व 'पांडव' मदिरालयात आलेत आणि सर्वांनी रम मागवले "गम को करे कम रम" लगेच 'राजाराम' उद्गारला पहिला 'पेग' होटाला लावताच पांडे बोलला, "हुजूर आज कुछ मोहब्बत के बारे मे बताइये."
राजाराम बोलला,
"किस्मत से अपनी सबको शिकायत क्यों होती है,
जो नहीं मिलता उसी से मोहब्बत क्यों होती है!
कितने खड़े मिलेंगे इस मोहब्बत की राहों में;
फिर भी दिल को उसे की चाहत क्यों होती है!!"

खरंच प्रेमवीरांना काय भन्नाट कल्पना सुचतील काही कल्पना न केलेलीच बरी. माझ्या तरी मते दारू पिणाऱ्यामध्ये 'प्रेम' हा चर्चेचा पहिला विषय आहे. देवदासचे खरे प्रेम 'पारो' की 'दारु' यामध्ये मला अजुन संशय आहे प्रत्येक 'पेग' मागे तीची आठवण दडलेली असते. हा बाटलीत बुडालेला असतो आणि ती चांगल्या घरी पडलेली असते. मग 'ती' च्या आठवणीमध्ये थर्टीची लेवल सिक्स्टीला भिडते आणि प्रत्येक पार्टीच्या शेवटी 'एक क्वार्टर कमीच पडते. तर असा हा
मनोहरच्या 'प्रेमाचा किस्सा!'

..... वसतीगृहातील खानावळी बद्दल न बोललेलच बरं कधी काकडी ची भाजी तर कधी गाजराची! दुधी भोपळा तर कधी दोडकी, वांगी अशा काहीही रस नसलेल्या भाज्या खाऊन खाऊन पांडव पार बेजार झाले होते. मग पांडवाज प्लॅन करायचे. गोट्याला सायकल घेऊन ते टेहाळणी करण्यासाठी पाठवायचे. कुठे काही लग्न समारंभ, वाढदिवस, रिसेप्शन आहे का हे बघण्यासाठी! जास्त करून संडेला हे समारंभ असायचे मग ठरल्या दिवशी जिथे समारंभ आहे तिथे पोहोचायचे कडक इस्त्री केलेले कपडे, परफ्यूम-वरफ्यूम लावून, पॉलिश केलेले चकचकीत बूट उगाच कोणाला संशय यायला नको की,
"ये बिनबुलाये मेहमान है" असा कित्येकदा पांडवांनी मेजवानीचा आनंद लुटला होता मनमुराद! खरंच त्यांची दुनियाच निराळी होती. बिनधास्त होऊन जगायचं. ज्यांना कसलेही बंधन नाही. प्रत्येक क्षणात जीवन जगायचे. म्हणतात ना "सुख जरी कणभर असलं तरी ते मनभर जगता आलं पाहिजे."

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सरजी!
आपल्या प्रतिसादामुळेच मला आपल्या कल्पणाशक्तीचे आकलन करण्याची संधी मिळते!