ऑक्सिजन

Submitted by अमितव on 13 May, 2021 - 15:28

*******************
मी एकही स्पॉयलर न देता लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. हा लेख नक्की वाचा, Wink पण आणखी रिव्हू चित्रपट बघण्याआधी वाचू नका असं सुचवेन. रोलर कोस्टर प्रवास पडद्यावर बघताना जास्त मजा येईल.
*******************

एक बाई शवपेटिकेसारख्या बंदिस्त ठिकाणी गोंधळलेल्या मनस्थितीत अचानक जागी होते. आपण कुठे आहेत, किती वेळ असे बंदिस्त आहोत, हे असं आपल्याला कोणी कोंडून ठेवलं आहे आणि कशासाठी, आणि हो आपलं नाव काय आहे??

ही अनामिक स्त्री... जिचं जाव एलिझाबेथ हँन्सन आहे हे आपल्याला जरा वेळाने समजतं... तिची भूमिका मेलनी लॉरेंट या फ्रेंच अभिनेत्रीने केली आहे. सगळा अभिनय आणि हालचाली एका बारक्या पेटी सारख्या बंदिस्त जागी असल्याप्रमाणे करणे हे नक्कीच सोपं काम नाही. काहीही स्मृती नाही, कोणाची मदत घ्यायची तर कशी .. यावर मात करायची तरी कशी?

फार जास्त सांगत नाही, आणि हे चित्रपटाच्या पहिल्या काही मिनिटातच समजते म्हणून सांगतो. ही पेटी ही नुसती पेटी नसून एक क्रायोजेनिक चेंबर आहे, ज्यात अनेक वैद्यकीय सेंसर जोडलेले आहेत. वर टच स्क्रीन आहे. आणि हो... कृत्रिम बुद्धिमत्तेचा सहाय्यक M.I.L.O (मायलो) ही आहे. क्रायोजेनिक चेंबर म्हणजे खूप कमी तापमानाला माणसाचा चयापचय मंदावुन माणसाला ठेवणे. आणि .... हो एक गोष्ट सांगायची राहिली, या पेटीतला ऑक्सिजन लिझला जाग आल्याने आता झपाट्याने कमी होऊ लागलेला आहे. सध्या ३५% वर आहे आणि लिझला तो संपायच्या आत काही तरी करणे भाग आहे. चित्रपट संपायला अजुन सुमारे ९० मिनिटे आहेत. त्यावेळातच!

ए.आय. मायलो हुषार आहे, पण त्याला योग्य प्रश्न विचारले तरच तो माहिती देऊ शकतो. (थांबा! एकदम असहाय्य वाटून घेऊ नका. सिरी इतका माठ नाहिये तो). त्याच्याकडे माहितीचा भरपूर साठा आहे, पण तो इन्ट्युटिव्ह अजिबातच नाही. तो बाहेरच्या जगाशी संवादही पोहचवु शकेल कदाचित, पण तसे प्रश्न मात्र विचारले पाहिजेत.

एकुणच स्क्रिनप्ले फार म्हणजे फारच उच्च दर्जाचा आहे. आपल्याला ज्या वेळी जेवढी हवी तितकीच माहिती देत, उत्कंठा ताणत चित्रपट पुढे सरकत रहातो. काही माहिती बोलण्यातुन, काही स्मृतीतुन, काही भूतकाळातील काही दृष्यांतुन मिळत जाते. पण यावर नक्की विश्वास ठेवायचा का? काही संदर्भजुळत नाहीत. मग? आपल्या ऐकण्यात काही चुक झाली तर नाही ना?

मला कधी लिझ हॉस्पिटल मध्ये बंद आहे वाटलं, कधी हे सगळे मनाचे खेळ वाटले, कधी तिला कोणीतरी बंद करुन सूड घेतय वाटलं, कधी हे सगळं स्वप्न तर नाही वाटुन गेलं. कधी ती मृत्यू पश्चात दुसर्‍या जगात गेलेली वाटू लागली... कधी आणखी काही. आता या वाटण्यातलं सगळंच खोटं असेल असं नाही, आणि काही खरं असलंच पाहिजे असं ही नाही. शेवटी तुम्हाला खरं काय हे समजेलच.
oxygen-pic-2.jpg

मूळ फ्रेंच चित्रपट आहे, पण इंग्रजीत नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
दिग्दर्शकः Alexandre Aja
लेखक/ स्क्रीनप्ले: Christie LeBlanc
काही लूज एंड आहेत. थोडी सारवासारव आणि कल्पनेची भरारी आणि काही सोयिस्कर गृहितकं मनात आणली तरी.... असो. पण एक चित्रपट म्हणून मजा आली बघायला. काही वेळाने मलाच क्लॅस्ट्रोफोबिक वाटू लागलं, पण पटकथा इतकी सशक्त आहे की विचार करायला फार वेळच मिळत नाही.

आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या चित्रपटात मुख्य पात्र पुरुष असायची रीतही या चित्रपटात मोडलेली आहे.

शेवट कदाचित थोडा लेट डाऊन करणारा आहे, पण तोपर्यंतचा प्रवास श्वास रोखायला लावतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

काही वेळाने मलाच क्लॅस्ट्रोफोबिक वाटू लागलं, >>>> अगदी. मला फक्त हे एवढे वाचून आणि फोटो पाहून सुद्धा तसंच वाटलं.

नेटफ्लिक्स ओरिजिनल आहे का ? याच थीमवर दुसरा चित्रपट किंवा मालिका आली होती का ? हे सगळं पाहिल्यासारखं, ओळखीचं वाटतंय. कि पुस्तक आहे एखादं ?

सही इण्ट्रो. अरे कालच लावणार होतो. पण भरकटलो.

बाय द वे, एक जुना याच नावाचा थ्रिलर सुद्धा भन्नाट आहे. एड्रियन ब्रॉडी वाला. त्यातही कोणीतरी शवपेटीत असते.

आणखी एक लिहायचं राहिलं.
आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या चित्रपटात मुख्य पात्र पुरुष असायची रीतही या चित्रपटात मोडलेली आहे.

शेवट कदाचित थोडा लेट डाऊन करणारा आहे, पण तोपर्यंतचा प्रवास श्वास रोखायला लावतो.

मला 'बोन्स' सीरिजमधली ग्रेव्हडिगर आठवली. Happy त्यातल्या
पहिल्या एपिसोडमधे ब्रेनन आणि हॉजिन्सला ग्रेव्हडिगरने ब्रेननच्याच कारमध्ये जमिनीखाली गाडलेलं असतं.
हा सिनेमा बघायला हवा.

विसरायला नको म्हणुन ताबडतोब लिस्टमध्ये टाकुन ठेवला आहे. मी वाचतानाच मला क्लस्रोफोबिक वाटायला लागलं. 'द रूम' बघताना पण मी त्या लहानशा रूम मुळे अस्वस्थ झाले होते, इथे तर बॉक्स आहे. आज रात्री पाहीन.

चित्रपट माहित नाही पण ही ओळख खूपच आवडली.

चित्रपट संपायला अजुन सुमारे ९० मिनिटे आहेत. त्यावेळातच! >>> हे भारी आवडलं

सगळ्यांना धन्यवाद!
हा चित्रपट बघितल्यापासून इंट्युटिव्हीटी किती महत्त्वाची आहे आणि चांगल्या ए.आय. मध्ये इंट्युटिव्हिटी असलीच पाहिजे हे मनात कोरलं गेलंय. तसंच काहीही ठोकताळे (अझम्शन्स) न बांधता मनाची पाटी कोरी ठेवून प्रश्न विचारता आले पाहिजेत. हे आणखी अधोरेखित झालं.

तसंच काहीही ठोकताळे (अझम्शन्स) न बांधता मनाची पाटी कोरी ठेवून प्रश्न विचारता आले पाहिजेत. हे आणखी अधोरेखित झालं>> सगळ्या युएक्स डिझायनर्सने बघावा असा मुव्ही आहे.. चांगल्या एआय साठी चांगले यु एक्स डिसायनर्स हवेत आणि ते जर सायकॅालॅाजी बॅग्राऊंडवाले असतील तर अजूनच बरं

चित्रपट पाहिला. लय भारी आहे, खूप आवडला.

शेवट कदाचित थोडा लेट डाऊन करणारा आहे >>> हे वाचून मला वाटलेले की तिची सर्व धडपड व्यर्थ जाऊन ती मरते असं वाटलं होतं. पण बघितल्यावर तुला काय म्हणायचं होतं ते समजलं.

निव्वळ एका माणसाच्या अभिनयावर (तो अभिनय पण बहुतांशी चेहर्‍याचाच) इतक्या वेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणे - याकरता हॅट्स ऑफ!

इंटरेस्टिंग! वॉच-लिस्टला टाकलाय.

याच टाइपची स्टोरी आणखी कुठेतरी पाहिल्यासारखी का वाटतेय मला.... (पॅसेंजर्स मूव्ही नव्हे, त्यात फक्त क्रायोजेनिक चेंबर ही गोष्ट कॉमन आहे.)

आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या चित्रपटात मुख्य पात्र पुरुष असायची रीतही या चित्रपटात मोडलेली आहे.>>>Gravity?
परिक्षण अगदी मोजक्या शब्दात. कसही करून बघायलाच पाहिजे.