वासांसि

Submitted by ज्येष्ठागौरी on 9 May, 2021 - 13:41

वासांसि

शाळेत जाताना तिच्या साडीचा हातात पकडलेला बोळा,शाळा जसजशी जवळ येईल तशी त्यावरची घट्ट होणारी पकड,मोठं झाल्यावर पदराला पुसलेले ओले हात,काही कारणांनी भरून आल्यावर तिनं पदरानं पुसलेले डोळे,रात्री भीति वाटल्यावर झोपेत आपसूक हातात धरलेला साडीचा काठ, तिच्या साड्यांची आपल्या मुलांसाठी केलेली अंगडी, बाळोती.तिनं चष्मा लावून कापत्या हातानं टाके घालून केलेली चौघडी,कपाटात तिच्या साड्यांच्या घड्या बघितल्या की हे सगळं आठवतं पण ह्यापलीकडे मला तिच्या साड्यांबद्दल किती कमी आठवतंय..हे मात्र नक्की की आईला साड्यांचा अजिबात लोभ नव्हता. तिच्याकडे नेहमीच्या वापराच्या सोडून अगदी ठेवणीतल्या फार तर सात आठ साड्या होत्या.नंतर थोड्या जास्तही असतील पण तरीही फार नाहीच.परिस्थिती चांगली असूनही नव्हत्या आणि ज्यांच्याकडे खूप साड्या असायच्या,वेगवेगळ्या पद्धतीच्या,वेगवेगळ्या पोतांच्या त्यांच्याबद्दल तिच्या मनात क्रोध लोभ, मोह आणि मत्सर हे रिपू फिरकायचेही नाहीत आणि किंवा इतर काही लोकांपेक्षा जास्त साड्या असल्यामुळे मद तर अजिबात नव्हता,किंबहुना तिची ती वृत्ती नव्हती.मुळात आत्ता आठवायला गेले तर तिच्या सगळ्या घरातल्याच साड्या डोळ्यासमोर येताहेत.आई अगदी उंच आणि तब्बेतीनी काहीशी स्थूल पण अगदी सणसणीत होती. साधारण स्त्रियांपेक्षा जास्त उंची आणि देहयष्टी!तिला सगळ्या साड्या भरपूर लांब रुंद लागायच्या. बऱ्याच साड्यांना वरुन फॉल लावायला लागायचा तिच्या उंचीला पुरण्यासाठी . तिच्या सगळ्या साड्या कॉटनच्या असायच्या आणि चौकडे आणि काठपदर,किंवा सौम्य रंगावर बारीक फुलं बस,बाकी काही नाही. कुठलाही रंग तिला शोभून दिसायचा. घरच्या साड्यांवर ती काळा किंवा पांढरा ब्लाउज घालायची आणि त्याला युनिव्हर्सल मॅचिंग म्हणायची.
पण मला तिच्या बाकी साड्या का बरं आठवत नाहीयेत.तिला नव्हती पण माझ्यात ही आवड कुठून आली!मी जशी अगदी सहज साड्या घेते तशी ती कधीच घ्यायची नाही.आठवत तर नाहीये अजिबात.मुद्दाम दुकानात जाऊन साड्या घेणं किंवा साडी बुक करणं किंवा साडी 'काढून'घेणं आणि मुख्य म्हणजे ही आयुष्यातली पहिली किंवा शेवटची साडी नाही असं तिचं म्हणणं असल्यानं आणलेली साडी बदलून आणणं हे प्रकार तिला ठाऊक नव्हते की काय कोण जाणे वाढदिवसाला नाही,लग्नाच्या वाढदिवसालाही नाही.दिवाळीलाही अगदी अनिवार्य म्हणूनही नाही.
दुसऱ्यांसाठी मात्र घ्यायची आणि कधी लग्नकार्याची आणि आलेल्या साड्या मात्र आवडो न आवडो अगदी मनापासून नेसायची.कोणी दिली की अगदी आवर्जून नेसून त्या व्यक्तीला दाखवायची. मुद्दाम दुकानात जाऊन साडी घेताना तिला कधी पाह्यल्याचं फार कमी आठवतंय मला...तिचा चॉईस खूप चांगला आहे वगैरे गोष्टी ऐकू यायची भानगड नाही.त्यात तिचा जीव कधी रमला नाही, घरातल्या कोणी तिला साडी पसंत करायला नाही नेलं तरी तिला वाईट वाटायचं नाही, उघडपणे तिच्यापेक्षा अमुक साड्या छान निवडते असं तिच्यासमोर म्हणलं गेलंय तर ती सरळ हो म्हणायची मनापासून आणि ज्यांची निवड सुरेख आहे त्यांचं कौतुकही अंतःकरणातून करायची.मला तेंव्हाही आश्चर्य वाटायचं आणि आताही वाटतं की असं सांगणाऱ्या बायका होत्या, नात्यात होत्या आणि त्याच प्रतलात माझी आई होती जी ह्या सगळ्यांच्या परे होती.
नवरा मात्र सांगतो की त्याच्या आजीला,खूप आवड होती साड्यांची. परिस्थिती अतिशय अनुकूल आणि आवड ह्यामुळे त्यांच्याकडे साड्यांचा मोठा संग्रह होता.कुठं हुबळीला जाऊन साडीवर कशिदा करुन घे, कुठं विशेष ठिकाणी जाऊन तिथल्या साड्या खरेदी कर असं त्या करायच्या.त्यांची निवड उत्तम होती.त्यांचं कपाट सुंदर लावलेलं असायचं म्हणे आणि कटकट करणाऱ्या नातवंडांना त्या कपाट लावलं तर काहीतरी बक्षीस द्यायच्या..त्यांची ही आवड त्यांच्या मुलींमध्ये उतरली होती. माझ्या सासूबाईंकडेही सुंदर साड्या होत्या..प्रिंटेड प्युअ र सिल्कस नेसायच्या त्या.. मावशीपण, अगदी अनवट साड्या असायच्या त्यांच्याकडे!
आईला मात्र अशी आवड नव्हती.ह्याचं आता इतक्या वर्षांनी आश्चर्य वाटतंय मला.
तिला साडीशिवाय कुठल्याही पोशाखात मी कधी बघितलं नाही,अगदी ती इंग्लंडला गेली होती तेंव्हाही नाही.फक्त
तिचा संधिवात तिला जेंव्हा जखडून टाकायला लागला तेंव्हा मात्र नाईलाजाने तिला गाऊन घालायला लागला.तेही तिनं अगदी सहजपणे स्वीकारलं.पण तरीही काही विशेष असलं की जरुर साडी नेसायची, मदतीनं. तिची एखादी खूप आठवणीत रहावी अशी उंची साडी होती का नाही माहिती नाही.पण ज्या साड्या होत्या त्या यच्चयावत साड्यांना खूप 'माया' होती हे मात्र जाणवतंय.
मला माझ्या काही मैत्रिणींच्या आईच्या,काकू, आत्या यांच्या झुळझुळीत साड्या आवडायच्या आणि आईच्या अशा नसतात हे जाणवायचं. पण ती कायमच या सगळ्याच्या पलीकडे होती.तिच्या आवडी निवडी वेगळ्या होत्या.ती सगळी कामधाम आटोपली की एखादं लठ्ठ इंग्रजी पुस्तक घेऊन वाचत असायची.अफाट वाचन होतं तिचं. मराठी पुस्तकांच्या दोन वाचनालयात जायची आणि इंग्रजी पुस्तकं बापूंच्या ऑफिसातल्या वाचनालयातून यायची.ती विशिष्ट वेळात वाचून द्यायला लागायची.त्यामुळे तिचं वाचन जोरदार असायचं.हे तिचं वेगळेपण मला आत्ता जाणवतंय आणि ती जे वाचायची ते आचरणात आणायची.
तिच्याकडे एक पैठणी होती,माझ्या आजीची,तिच्या लग्नातली,नऊवार, खरी जर असलेली,सुंदर पदर,चांगली उंच अशी! आई ती नेहमी लक्ष्मीपूजनाला नेसायची. तिचं ते रुप माझ्या कायम लक्षात राहिलं आहे. आमच्याकडे एक होम झाला होता तेंव्हाही तिनं तीच साडी नेसली होती आणि तेंव्हापासून,त्या पैठणीला एक पवित्र धुरकट वास यायचा.तो मला फार आवडायचा. मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवलेली पैठणी ही तिची विरासत होती.पुढं ती पैठणी जुनी जुनी व्हायला लागली आणि तिचा पदर फिसकायला लागला मग ती आईनं नऊवाराची सहावारी केली.त्या पदराच्या जरीतून एक चांदीची वाटी झाली पण आईला मात्र त्या पदराचं राहून राहून वाईट वाटत राहिलं.त्या वाटीवरुन ती तसाच हात फिरवायची जसा पदरावर फिरायचा. तिच्या पुढच्या वयात, तिला मुळात फारशी नसलेली साड्यांची आवड अजून मंदावली आणि साडी घ्यायची म्हणलं, की हलकी आणि मऊ घ्या गं बघून!साडी दिली की हात फिरवून बघायची आणि पसंतीची मान डोलवायची. एवढाच निकष ती लावायची. तिच्या साड्यांची कपाटं कायम खुली असायची आणि कोणीही कुठलीही साडी खुशाल वापरावी अशी तिची इच्छा असायची.
सदैव घरात आणि कामात रमलेल्या तिला ही आवड नव्हतीच की काय...तिच्या वडिलांची परिस्थिती खूप सधन नव्हती म्हणून तिची आवड अशी बनली म्हणावं तर नंतरच्या आयुष्यात तिनं का नाही घेतल्या साड्या.तिच्या आजूबाजूला साड्यांवर जीव टाकणाऱ्या बायका असतानाही ही इतकी अलिप्त कशी राहू शकली. दुसऱ्यांना देताना पोत, रंग नक्षी बघणारी आई स्वतःच्या साड्या इतक्या निर्लेपपणे कशा काय निवडायची हे कोडं आहे. मी माझ्या लेकाच्या मुंजीसाठी तिला नवी पैठणी घ्यायचं ठरवलं होतं,ती चक्क हो म्हणाली होती !अगदी खुशीत मान डोलावली होती तिनं!पण तो मनसुबा पूर्ण झाला नाही.त्याआधीच तिनं प्रवास संपवला.मग मनाला खूप रुखरुख लागली,आपण निमित्त शोधत बसतो एखादी गोष्ट करायचं आणि हातातून काहीतरी अनमोल निसटून जातं नकळत! ती गेल्यानंतर माझ्या वहिनीने तिच्या काही साड्या मला तिची आठवण म्हणून दिल्या.आता तिला जाऊनही खूप वर्षं झाली ,मी त्या साड्या तरीही नेसते, क्वचित त्या जुन्याही दिसतात पण त्यातली तिची आठवण अगदी ताजी असते म्हणून नेसते आणि त्या तिच्या अंगावर खुलून दिसायच्या तशा मला दिसत नाहीत.ह्याचं कारण तिचं व्यक्तित्व.सौम्य, सोज्वळ, आंतरिक शांततेतून उजळलेलं.. अजूनही तिच्या साड्यांच्या गोधड्या करायला जीव धजावत नाही.वापरुन खराब होतील त्या साड्या असं वाटत राहतं आणि तिच्या आठवणींना धक्का लागेल असं वाटत राहतं.तिच्या पदराला आपण पुसलेले ओले हात आणि तिचं मंद हसणं आठवत राहतं.
आई अभ्यासात खूप हुशार होती,लग्नानंतर पदवी घेतली माँटेसरीचा अभ्यासक्रम केला.माझ्या डॉक्टर आजोबांनी तिला खूप शिकवलं होतं, त्यांना मदतही करायची ती घरी पेशंट यायचे त्यावेळी.कुणाच्याही मदतीला कायम तयार असायची,सुगरण तर ती होतीच,स्वयंपाकाचा कधीच कंटाळा नव्हता,क्रोशाची लेस विणायची. मशीनवर कपडे शिवायची.गाणी गुणगुणत असायची.त्यावेळच्या सगळ्या बायका जे करायच्या ते सगळं करायची.स्वतः अर्थार्जन केलं नाही, तो काळ आणि एकत्र कुटुंबात तिला कदाचित शक्य नव्हतं,तशी आवश्यकता नव्हती पण मुलीसुनांना कायम स्वतःच्या पायावर उभं रहा सांगायची.आमच्याच काय पण तिचा शांत, समाधानी आणि सहनशील स्वभाव,शब्दांपेक्षा वागण्यातून केलेले संस्कार, कोणासाठीही जीव तोडून करायची वृत्ती,मनातली एक खंबीर बैठक, सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती ह्यामुळे तिच्या साड्या आठवत नसल्या तरी ती मात्र सदैव मनात तेवत आहे.ती सर्वसामान्य आहे असं मला काही काळ वाटलं पण आता तिच्यातलं असामान्य वेगळेपण तिच्या जाण्यानंतर लक्षात येतंय.पण आईला उमजून घेताना आपण तेंव्हा कमी पडलो ही भावना कधीमधी छळते.आपण त्या टप्प्यावर तिच्याकडे खूप छान साड्या नाहीत किंवा तिला आवड नाही हे मनात आणत गेलो आणि ती मात्र तिच्या आयुष्याचं वस्त्र शांतपणे उत्तम विणत गेली,तिचं सगळं विश्व आमच्याभोवती विणलेले होतं,
तिच्या साडीचा हातात धरलेला काठ, पुसलेले ओले हात,माझ्या भावानी ओलं डोकं पुसून भिजकट केलेला पदर,मुसमुसून रडलेले डोळे पुसून आर्द्र झालेला तिच्या पदराचा भाग, तिच्या मऊ साड्यांची दुपटी, बाळ लेणी,चौघड्या आणि ती गेल्यानंतरही, तिनं आधी शिवून ठेवलेल्या चौघाडी उंचीला पुरत नसतानाही त्यातच पाय मुडपून झोपणारा माझा लेक,कॉलेजात साडी डे ला तिचीच साडी नेसायचा हट्ट करणारी माझी कन्या. हेच सगळं माझ्या लक्षात राहतंय आणि हेच तिच्या आयुष्याचं सार्थक आहे.तिच्या साड्यांचे रंग, रुप,नक्षीकाम लक्षात राहण्यापेक्षा तिच्या साड्यांचं असं अस्तित्व लक्षात राहतंय हेच खरंय! अगदी ती होती तसंच आहे हे..
तिच्या आयुष्यातल्या सगळ्या आपल्या माणसांच्या आयुष्यात तिच्या आयुष्याचे धागे तिनं सहजी बेमालूम विणून टाकले..
सगळी नाती त्या धाग्यांमध्ये पक्की करुन टाकली.वासांसि म्हणजे वसन, वस्त्र..साडी हा खरंतर एक लांब कापडाचा धडपा म्हणता येईल पण त्याला रंग,रुप, नक्षी आणि पोत ह्याबरोबर किती भावना बिलगत असतात,अगदी सहज!देणारा, घेणारा ह्या सगळ्यांच्या भावनांचे दरवळ त्याला असतात.पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे ती परिधान करणाऱ्यांचं व्यक्तिमत्व!साधंसुधं आयुष्य जगणारी आई किती मोठी होती.किती श्रीमंत होती माणसांच्या बाबतीतही. तिच्या साड्या आठवताहेत त्याही अशा साध्या सुध्या पण आयुष्य संपन्न आणि समृद्ध करणाऱ्या भावना आणि आठवणींमधून..
आई आज मातृदिन म्हणून तुला सांगते, तुझ्या साड्या वारसा म्हणून सोपवणार आहे बरं माझ्या लेकीसुनेला!तुझ्या आठवणींसकट.
वासांसि जीर्णानी म्हणून तू अगदी सहज हे आयुष्य सोडलंस पण जे प्रेमाचं, चांगुलपणाचं, आपलेपणाचं, विमल,नितळ मनाचं वस्त्र जे आमच्यात विणलंस ,त्यातले धागे जे तू गुंफले आहेस ते नवीन वस्त्रात मिसळून जाताहेत आणि पुढे पुढे जाताहेत..खूप खूप प्रेमपूर्वक...
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिलं आहे. अगदी आवडलं. तुम्ही लिहिता तर उत्तमच पण लेखाची शीर्षकेही अगदी चपखल असतात. सगळ्या लिखाणाचा सारांश त्या एका शब्दात आला आहे.

छान लिहिले आहे. माझ्या आई ची पण अशी एक फेवरिट साडी होती ती ती हळ दी कुंकवाला नेसत असे. व त्याला त्या अत्तराचा वास येत असे.

रचू,rr38,चिंगी,अनया, ऋचा,harpen, साधा माणूस,सुनिती, buki, जिज्ञासा, देवकी,सियोना, ragimudde,,हिरा,गंधकुटी,लावण्या,मेधावी राणी आणि अमा,मनापासून धन्यवाद! माझा हुरुप वाढला!

छान लिहीलय.
वाचुन कोणालाही आपल्याच आईबद्दल लिहीलय याची प्रकर्षाने जाणीव होईल/होतेय.

खूप भावस्पर्शी लिहिलंय
लेख वाचून शांता शेळकेच्या आजीची पैठणी ह्या कवितेची आठवण झाली.>>>>१११