अध्यात्म आणि विनोद

Submitted by सामो on 27 September, 2019 - 09:52

डिस्क्लेमर - धार्मिक + विनोदाचे वावडे असलेल्या लोकांनी हा धागा वाचू नये. अन्य धाग्यावर आताच जावे. भावना दुखावल्यास, लेखक जबाबदार नाही.
.
अध्यात्मिक स्तोत्रे, मंत्र, पोथी, पुराणे वाचत असतेवेळीच लक्षात आले होते की स्तोत्रांतही बरेच प्रकार आहेत, स्तुती, कवच, भुजंगस्तोत्रे, अष्टके,नामावली, अभंग आणि अन्य काही. स्तुती, अष्टके आणि भुजंगस्तोत्रे. या प्रकारांत देवांचे स्तुतिपर वर्णन असते, अनेक सुंदर उपमा, रुपकांच्या लडी उलगडतात ज्या की मंत्रमुग्ध करुन सोडणाऱ्या असतात, उत्कृष्ट असे काव्याचे नमुने असतात. याउलट कवचांमध्ये काहितरी मागितलेले असते. उदाहरणार्थ त्या देवतेची विविध नावे गुंफुन माझे पूर्वेकडुन शंकर, पश्चिमेकडुन वामदेव, दक्षिणेकडुन त्र्यंबक, प्रवासात स्थाणु .... वगैरे रक्षण करो. म्हणजे यात देवांना कामाला लावलेले असते.उदा.-
गौरी पति: पातु निशावसाने मृत्युंजयो रक्षतु सर्वकालम् ॥
अन्त:स्थितं रक्षतु शंकरो मां स्थाणु: सदापातु बहि: स्थित माम् ।

अर्थात रात्रीच्या समयी गौरीपती माझे रक्षण करो, स्रदा सर्व काळ मृत्युंजय माझे रक्षण करो...... वगैरे जंत्री.
.
वेंकटेश स्तोत्राबद्दल तर इतकी स्तुती ऐकून होते, ते किती प्रभावी स्तोत्र आहे आणि भक्तांना, नित्यनियमाने ते स्तोत्र म्हणणाऱ्या भाविकांना कशा अनुभूती येतात. पण प्रत्यक्षात वाचल्यानंतर लक्षात आले की आपल्याला सर्वात कमी आवडणारे स्तोत्र आहे का तर यात देवाला चक्क इमोशनल ब्लॅकमेल केलेले आहे. उदा. -
लक्ष्मी तुझे पायांतळी । आम्ही भिक्षेसी घालोनि झोळी ।
येणे तुझी ब्रीदावळी । कैसी राहील गोविंदा ॥
कुबेर तुझा भांडारी । आम्हां फिरविसी दारोदारीं ।
यांत पुरुषार्थ मुरारी । काय तुजला पैं आला ॥

साक्षात् कुबेर तुझा कॅशिअर आहे, खजिनदार आहे आणि आम्ही मात्र भिक्षान्न मागत दारोदारी फिरायचे. अरारारारा काय हे मुकुंदा, तुला तरी शोभा देतं का? म्हणजे देव खजील हमखास, झालाच पाहीजे.
.
तसच ते बजरंग बाण स्तोत्र
उठु उठु चलु तोहि राम दुहाई। पांय परों कर ज़ोरि मनाई।।
ॐ चं चं चं चं चपत चलंता। ऊँ हनु हनु हनु हनु हनुमन्ता।।
ऊँ हँ हँ हांक देत कपि चंचल। ऊँ सं सं सहमि पराने खल दल।।
अपने जन को तुरत उबारो। सुमिरत होय आनन्द हमारो।।

यातही हनुमानला रामाची शपथ वगैरे घालुन एकदम आपल्या मदतीला धाउन येण्यास भागच पाडण्याचा नॉट सो क्षीण प्रयत्न केला गेलेला आहे.
.
पोथी वाचताना एक तर ती संपविण्याचा धीर (पेशन्स) रहात नाही किंवा आज २ अध्याय वाचून चार दिवसांनी परत सुरु केली की आधीच्या अध्यायांचे किंचित विस्मरण होते. पण तरी 'रामविजय' ही (जुने) श्रीधरस्वामी लिखित पोथी अतिशय रसाळ आहे. विशेषत: त्यातील हनुमंतजन्म कथन प्रचंड 'ॲक्शन ओरिअंटेड' आहे, अक्षरक्ष: थरारक, रोमांचक अत्यंत चित्रमय आहे. गंमत म्हणजे अध्यात्माला विनोदाचे वावडे नाही हा साक्षात्कार मला रामविजय पोथी वाचतेवेळी झाला. क्वचित जर किंचित विनोदबुद्धीची चुणूक मी पाहीली असेन तर ती रामविजय ग्रंथातच. दोनचार विनोदी उल्लेख सांगायचे झाले तर -

शृंगी नावाचा एक ऋषीपुत्र आहे. ज्याला त्याच्या वडिलांनी अर्थात एका ऋषिंनी स्त्रियांपासुन/समाजापासुन दुर ठेवलेले आहे जेणेयोगे पुत्राच्या तपात काही विघ्न येऊ नये. एकदा ऋषी अन्यत्र गेलेले असताना, काही अप्सरा त्याला रसाळ फळे देतात, कामभावे मोहीत करु पहातात. आत्ता श्रुंगीने पहिल्यांदाच स्त्रिया पाहिलेल्या असल्याने, तो त्यांच्या वक्षस्थळांकडे पाहुन विचारतो की तुम्ही कोण ऋषीमुनी आहात आणि तुम्हाला ही गलंडे कशामुळे आली? तो प्रसंग पुढिलप्रमाणे-
तो अकस्मात त्या समयासी रंभाऊर्वशी पातल्या|
उत्तम स्वरुपे मंजुळ गायन| सुंदर मुख आकर्ण नयन
शृंगिलागी खुणावुन|कामभाव दाविती||
नानापक्वान्ने अमृतफळे| श्रूगिसी देती बहुत रसाळे|
मग तो उतरोनि खाले|जवळ येउनी बैसला|
तयांसी पुसे आवडिकरुन| सांगा तुमची नामखूण|
ही गलंडे (गोळे,उंचवटे) काय म्हणुन|वक्षस्थळी तुमच्या पै||
येरी गदगदा हसिती|तुझिया माथा शृंग निश्चिती|
म्हणुनी तुजला शृंग म्हणविती| तुजलागी ऋषिपुत्रा||
आमचे नाव गलंडऋषी|बहुसुख असे आम्हापाशी ...

आणि मग शृंगऋषी रोज आवडीने त्यांची वाट पाहू लागले व अप्सरा त्यांना कामासने शिकवु लागल्या ..... त्यातच एकदा त्याचे वडिल परत आले आणि पहातात तो काय .... असो!!
.
रामविजय पोथीतील,अजुन् एक असेच नर्मविनोदी वर्णन म्हणजे - हनुमंत जन्मकथनाचे. हनुमान जन्मताक्षणी क्षुधित होता, त्याने सुर्याला पाहीले व मोसंब्यासारखे फळ निश्चित समजुन तो खावयास धावला तो दिवस होता ग्रहणाचा आणि नेमका राहू सुर्यास गिळावयास आलेला होता. हनुमानास वाटले हा कोण माझ्या व फळाच्या मध्ये विघ्नरुपाने प्रकटला, व हनुमानाने राहूचे साग्रसंगीत ताडन केले. मग राहूस वाचवायला केतु लगबगा आला तो हनुमानापुढे केतुचेही काही चालेना. केतुलाही, हनुमानाने यथेच्छ बडवुन काढले. याचे वर्णन करताना श्रीधरस्वामी अर्थात (टंग इन चीक) म्हणतात - हनुमानाने तिथेच आकाशमंडळात यथासांग ग्रहपूजा मांडली.
ऐसे बोलत वायुनंदन| राहूवर लोटला येऊन|
इंद्रादेखत ताडण| राहूसी केले बहुसाल||
जैसा पर्वत पडे अकस्मात| तैसा राहूसी दे मुष्टिघात|
ग्रहपूजा यथासांग तेथ| वायुसुते मांडली||

.
अजुन एक असाच विनोदी उल्लेख म्हणजे नकट्या नाकाचा. आधीच कैकयीला स्वत:च्या सौंदर्याचा अभिमान त्यात तिला डोहाळे लागले त्यात स्वत: दशरथ राजा तिचे कुशल विचारण्याकरता अंत:पुरात आला, काय विचारता. नकट्याला सौंदर्याचा अभिमान व्हावा, अल्पविद्या येणाऱ्याला गर्वाचा फुगारा चढावा तसे कैकयिचे झाले.
सुंदरपणाचा अभिमान्|त्यावरीही कैकयी गर्भिण्|
जैसी अल्पविद्या गर्व पूर्ण|तैसे येथे जाहले||
जैसी गारुडियांची विद्या किंचित्|परंतु ब्रीद (प्रतिके) बांधती बहुत
की निर्नासिक (नकटा) वहात|रुपाभिमान विशेष पै||
बिंदूमात्र वीष वृश्चिका|परी पुच्छाग्रे वरुते देखा
किंचित द्न्यान होता महमूर्ख|मग तो न गणे बृहस्पतीते||
खडाणे धेनुस दुग्ध किंचित|परी लत्ताप्रहार दे बहुत|
अल्पोदके घट उचंबळत|अंग भिजे वाहकाचे||

तर सांगायचा मुद्दा हा की अध्यात्मिक वाचन अगदीच रटाळ नसते. भरपूर रसाळ, विनोदीही असते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गलंडांचा विनोद सोडला तर बाकी एवढे तीक्ष्ण वाटले नाहीत. गलंडांचा विनोद भारी आहे. पण श्रृंगीने त्याच्या आईला पाहिले असेलच की हा विचार मनात आला. नकट्या मुली/ बायका नकटे नाक सौंदर्य लक्षण मानतात हे मात्र खरं आहे.

स्तोत्रे, आख्यायिका, पुराणं लिहिणाऱ्यांना विनोदाची आठवण झाली ते बरेच झाले.
एकनाथांनी भारुडं लिहिली. इंगळी म्हणजे मोठा विंचू.

कुणाला विनोद वाटतो, कुणाला कृतार्थ वाटतं, पण शतकानु शतके तीच तीच स्तुती ऐकून देवाला किती कंटाळा येत असेल कल्पनाही करवत नाही.

Srd - होय होय एकनाथांची भारुडं म्हणजे मनोरंजनातून समाज प्रबोधन असत. अगदी बरोबर.
_____________
@स्वप्नील - चांगलं दिसतं नकटं नाक. मला तरतरीत व किंचीत बाक म्हणजे पोपटनाक आवडतं. सैफ अली खानच्या नाकाने कागद कापता येइलसे वाटते. Lol
________
@मानव - देवाला किती कंटाळा येत असेल कल्पनाही करवत नाही. - Happy याचा विचारच नव्हता केला. देव बिचारा मूक आहे ते बरच आहे.

आज कार्तिकस्वामींची स्तोत्रे आदि वाचताना, शिवलीलामृताच्या १४ व्या अध्यायातील हा गणपती-स्कंद यांच्या लुटुपुटीच्या भांडणाचा प्रसंग सापडला. जाम विनोदी आहे.-
.
गणपती आणि कार्तिकस्वामी लहान होते. प्रत्येक आई आपल्या बालकास जसी खेळवते, लाड करते तशी पार्वती त्या दोघांना खेळवत होती. पहील्यांदा ती गणीशास स्तनपान करत असतेवेळी,बाल गणपती दूध ओढून पीत असताना आईच्या पाठीवरुन चाळा म्हणुन सोंड फिरवत होता. आणि कधी आपल्या सोंडेने आपला चिमुकला पाय धरुन तो असा खेळत खेळत दूध पीत असतेवेळी त्याने स्कंदास सहज पृच्छा केली - का रे भाऊ, जे ब्रह्मादिकांना अप्राप्य ते अमृततुल्य दूध तू का पीत नाहीस? कार्तिकस्वामी क्रोधिष्ट हे सर्वांना माहीतच असेल, तो रागाने गणपतीस म्हणाला - "जा रे मला नको तुझं उष्टं." आणि मग कार्तिक आईकडे तक्रार करत म्हणाला - "बघ ना गं आई हा लांबनाक्या मला त्याचे उष्टे दूध देऊ पहातो आहे. आता आई तू मला सांग याची सोंड ओढून याला जर का मी खाली पाडले तर यात माझी चूक ती काय? आई तू याला असा कसा गं लांबनाक्या बनवलास? तू तर सूर्य-चंद्र अन्य चराचर सुंदर निर्मिलेस मग हे रत्नच असे विनोदी कसे बनविलेस? एक तर नाक लांबच लांब त्यात एक दातच काय तोंडाच्या बाहेर आलेला. अशा वेड्याविद्र्या बाळाला कसा गं जन्म दिलास?" हे लहानग्याचे बोल ऐकून शंकर-पार्वती यांना हसूच आवरेना. मग स्कंद म्हणतो - आई आता पुरे झाले हां याचे लाड आता मला दूध पाज. यावर पार्वतीने गणेशाचे स्तनापान झाल्यानंतर लगोलग गणेशाला उतरविले. बाल-षण्मुखास मांडीवर घेतले व ती दूध पाजू लागली. एक मुख दूध पीऊ लागले परंतु अन्य पाच मुखांनी भोकाड पसरले. ठ्ठो!!! हे पाहून आता षडाननाचा मोठा भाऊ गणपती पोट धरधरुन हसू लागला व मग मगासच्या अपमानाचे उट्टे काढण्याची संधी न दवडता तो म्हणाला - आई एका मुखात एक स्तन दिलास , आता अन्य ५ मुखांत घालावयास ५ स्तन कोठून आणशील? व षडाननाची फजिती पाहून तो खो खो हसू लागला. आता या खेळात शंकरांनाही रस येऊ लागला होता. ते पार्वतीला मिष्किलपणे म्हणाले "गणेश काय म्हणतोय त्याला उत्तर दे ना, अशा (६ मस्तकांच्या) विचित्र मुलाला का जन्म दिलास? पार्वतीही काही कमी नव्हती तिने तत्काळ प्रत्युत्तर दिले "तुमची ५ तोंडे कमी होती घरात म्हणुन पूर्ण करण्यासाठी म्हणुन अजुन एक तोंड असलेला पुत्रास मी प्रसविले. झाले समाधान?" हे ऐकून शंकरांना अत्यंत संतोष झाला.अशा रीतीने गणेश आणि षडानन लुटुपुटुची भांडणे करत असत. पण दोघेही, मनात एकमेकांबद्दल अत्यंत प्रीती राखून होते. परंतु अतिशय व्रात्य अशा या २ बालकांमुळे आदिमायेच्या डोक्यास शांती अशी कशी ती नसेच. एकदा गणपती व षडानन दोघेही मारामारी करत असताना, रडत रडत आईकडे आले. पार्वती वक्रतुंडाला हृदयाशी धरुन, म्हणाली "का रे बाळा काय झालं तुला? कोणी काही बोललं का?" यावर वक्रतुंड बोलला "बघ ना गं आई, हा षडानन येऊन मुद्दाम माझा कान पकडून विचारतो का रे तुझा कान इतका लहान कसा ब्वॉ? यावर पार्वती मनात हसून पण वरवर लटक्या रागाने म्हणाली, "का रे अग्नीसंभूता (हे स्कंदाचेच नाव) अशी लागेल शी चेष्टा का करतोस गणेशाची?" यावरती स्कंद उलट गणपतीकडे बोट दाखवुन म्हणाला काय की "आई यानेच माझे १२ डोळे मोजायला सुरुवात केली. यानेच पहीली खोडी काढली." यावर हैमवती (पार्वती) आता एकदंताकडे वळून पृच्छा करती झाली, "का रे एकदंता, कुमाराचे डोळे का मोजत होतास? हे असं वागणं तुला तरी बरोबर वाटतय का? तूच आपल्या मनाला विचारुन सांग" यावर नागाननाने (गणपती) त्याच्यावरील अन्यायाचे सुरस वर्णन करण्यास सुरुवात केली "हा माझ्या सोंडेची लांबी किती वीत आहे ते चवंगे घालून, मोजत होता. हा माझ्यावर फार दादागिरी करतो. तू याला शिक्षा कर." यावर कार्तिकस्वामी म्हणाला "नाही गं आई सुरुवात लंबोदरानेच केली, माझे हात मोजू लागला." आता करिमुख (गणपती?)ची पाळी होती तो अंबेस म्हणाला "ऐक आई आता मी जे सांगेन ते ऐकून तू नक्की कुमारास शिक्षा करशील" आता नगात्मजा (पार्वती) व त्रिलोचन (शंकर) दक्ष होऊन गणपती काय बोलतो ते ऐकू लागले. इभमुख (गणपती?) म्हणे - "आई, हा मला म्हणाला की रे ढोल्या, तुझे पोट एवढे मोठ्ठे का कारण तू मोदक अति खातोस." मग मात्र मृडानीने दोघांना हृदयाशी धरीले व त्यांच्या त्यांच्या आवडीची वस्तू त्यांना देऊन त्यांची समजूत काढली.

परिसा गजास्यषडास्यांची कथा ॥ दोघेही धाकुटे असत ॥ जगदंबा खेळवी प्रीतीने ॥६॥ गजतुंडा ओसंगा घेऊन ॥ विश्वजननी देत स्तनपान ॥ शुंडादंडेकरून ॥ दुग्ध ओढीत गजास्य ॥७॥अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती ॥ शुंडा फिरवीत गणपती ॥
सोंडेत पाय साठवूनि षण्मुखाप्रती ॥ बोलतसे तेधवा ॥८॥ म्हणे हे घेई का अमृत ॥ ब्रह्मादिका जे अप्राप्त ॥ स्कंद बोले क्रोधयुक्त ॥ उच्छिष्ट तुझे न घे मी ॥९॥ षडानन म्हणे चराचरजननी ॥ लंबनासिक मजलागूनी ॥ उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी ॥ सांग मृडानी काही याते ॥१०॥शुंडेसी धरूनिया खाले ॥ पाडू काय ये वेळे ॥ माते याचे नासिक विशाळ आगळे ॥ का हो ऐसे केले तुवा ॥११॥इंद्र चंद्र मित्र निर्जर व मूर्ति प्रसवलीस मनोहर ॥ परी हा लंबनासिक कर्ण थोर ॥ दंत एक बाहेर दिसतसे ॥१२॥ऐसा का प्रसवलीस बाळ ॥ ऐकता हासे पयःफेनधवल ॥ धराधरेंद्रनंदिनी वेल्हाळ ॥ तिसीही हास्य नाटोपे ॥१३॥ स्कंद म्हणे जननी पाही ॥ यासी उतरी मज स्तनपान देई ॥ मग जगदंबेने लवलाही ॥ विघ्नेशा खाली बैसविले ॥१४॥ षण्मुख आडवा घेवोनी ॥ स्तन जी घाली त्याच्या वदनी ॥ पाचही मुखे आक्रंदोनी ॥ रडो लागली तेधवा ॥१५॥ ते देखोनि गणनाथ ॥ पोट धरोनि गदगदा हासत ॥ म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत ॥ हाक फोडीत आक्रोशे ॥१६॥
एक स्तन घातला याचे वदनी ॥ आणीक पाच आणसी कोठूनी ॥ ऐसे ऐकत पिनाकपाणी ॥ काय हासोनि बोलत ॥१७॥ काय म्हणतो गजवदन ॥ ऐसा का प्रसवलीस नंदन ॥ यावरी अपर्णा सुहास्यवदन ॥ प्रतिउत्तर देतसे ॥१८॥ म्हणे हा तुम्हांसारिखा झाला नंदन ॥ तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ॥ ऐकता हासला त्रिनयन ॥ पुत्र पाहोन सुखावे ॥१९॥ यावरी षण्मुख आणि गणपती ॥ लीलकौतुके दोघे क्रीडती ॥ विनोदे कलह करिती ॥ अंतरी प्रीती अखंड ॥२०॥ दोघेही रडता ऐकोनी ॥ धावोनी आली जगत्त्रयजननी ॥ वक्रतुंडासी ह्रदयी धरोनी ॥ म्हणे बाळका काय झाले ॥२१॥ तव तो म्हणे स्कंदे येवोन ॥ अंबे धरिले माझे कर्ण ॥ बोलिला एक कठीण वचन ॥ तुझे नयन सान का रे ॥२२॥ जगदंबा मग हासोन ॥ अग्निसंभूताप्रति बोले वचन ॥ गजवदनासी कठीण भाषण ॥ ऐसे कैसे बोललासी ॥२३॥ स्कंद म्हणे तर्जनी उचलोन ॥ येणे मोजिले माझे द्वादश नयन ॥ यावरी हैमवती हासोन ॥ एकदंताप्रति बोलत ॥२४॥म्हणे हे तुव अनुचित केले ॥ कुमाराचे नयन का मोजिले ॥ यावरी नागानन बोले ॥ ऐक माते अन्याय याचा ॥२५॥माझी शुंडा लंबायमान ॥ येणे मोजिली चवंगे घालून ॥ अन्याय हा थोर त्रिभुवनाहून ॥ करी ताडण अंबे यासी ॥२६॥ यावरी स्वामी कार्तिक बोलत ॥ अंबे येणे माझे मोजिले हस्त ॥ यावरी करिमुख बोलत ॥ मैनाकभगिनी ऐक पा ॥२७॥ याचा अन्याय एक सांगेन ॥ ऐकता तू यासी करिसील ताडण ॥ नगात्मजा आणि त्रिलोचन ॥ सावधान होऊन ऐकती ॥२८॥ इभमुख म्हणे भेडसावून ॥ मज बोलिला हा न साहवे वचन ॥ तुझे पोट का थोर पूर्ण ॥ मोदक बहू भक्षिले ॥२९॥ऐसे ऐकता मृडानी ॥ दोघांसी ह्रदयी धरी प्रीतीकरूनी ॥ दोघांसी प्रियवस्तु देऊनी ॥ समजाविले तेधवा ॥

आवडलं.
तुमचं आध्यात्मिक वाचन बरंच आहे, सामो.

दन्ती, दन्तावल, हस्ती, द्विरद, अनेकप, द्विप, मतङ्गज, गज, नाग , कुंजर, वारण, करि, इभ, स्तंबेरम, पद्मी - म्हणजे हत्ती. त्यामुळे करिमुख म्हणजे गणपती.

@सामो
हो का.. स्तुत्य आहे.
मी खूप वेळा ठरवते वाचायचं पण राहून जातं.

धमाल संकलन Happy

आता कुणी असे लिहिले तर दंगली होतील !

धाग्याच्या विषय आणि पोस्ट्स आवडल्या - हे सांगायचं राहून गेलं होतं.

मी आधी कुठे ह्याचा उल्लेख केला आहे का आठवत नाही. एकनाथांच्या एका ओवीसमूहात(?) रामाच्या उजव्या आणि डाव्या हाताचे भांडण वर्णन केले आहे. डावा म्हणतो की अरे तू सगळीकडे एरवी पुढेपुढे करतोस, खायला पुढे, वस्तू घेताना पुढे वगैरे, पण युद्धाचा प्रसंग आला की पळपुट्यासारखा मागे जातोस. उलट मी अशा प्रसंगी धनुष्य घेऊन रामाच्याही पुढे जाऊन थांबतो. मग उजवा म्हणतो की तुझा हा स्वभावच आहे, काम करायचं काही नाही आणि नुसत्या बढाया. अरे तू जेव्हा धनुष्य घेऊन पुढे उभा असतोस, तेव्हा रामाच्या मनात नक्की काय चालू आहे याची तुला कल्पनाही नसते. उलट मी मागे प्रत्यंचा ताणून रामाच्या कानापर्यंत येतो आणि समोरच्या शत्रूला मारण्यासाठी कुठला बाण सोडावा, तो कसा सोडावा, याचं गूज मी रामाच्या कानात सांगत असतो. भांडणाच्या शेवटी राम हस्तक्षेप (?) करतो असं वाचल्याचं आठवतं आहे. मजेशीर संवाद आहे.

अक्काचे अजब इच्छासत्र (भा. रा. भागवत) मध्ये दोन मामा असतात, एक जण रामदास स्वामींचा शिष्य असतो आणि दुसरा तुकारामांचा. त्यांची आपापसात अध्यात्मिक भांडणे मजेशीर आहेत.