घर

Submitted by सामो on 25 April, 2021 - 06:00

मध्यंतरी एका सिनेमात सॅन अँटॉनिओचा उल्लेख आला आणि नवरा म्हणाला - सॅन अँटॉनिओ! तुझं घर. मी त्याला उत्तर दिलं - तुम्ही दोघं जिथे आहात ते माझं घर. बाकी ठिकाणचं नाईलाजाचं वास्तव्य. आपणच आपल्याला चकित करतो असे काही क्षण असतात. हा क्षण त्यातलाच एक. मला घराचा तो मुद्दा माहीतच नव्हता ... निदान मूर्त मनाने तसा कधी विचार बोलून दाखवला नव्हता. अमूर्त मनातूनही काही उद्गार उमटतात का? फ्रॉईडने म्हटलेले आहे - स्लिप ऑफ टंग असे काही नसते. पटकन निघणारे चूकीचे उद्गारही - अमूर्त मनाच्या पातळीवरील काही वैशिष्ट्ये बरोबर घेउन येतात.
पुढे विचार केल्यानंतर वाटले - म्हणजे इतकी वर्षे आपण होमलेस होतो? होय तसाच अर्थ निघतो. उद्या देव न करो नवरा जर आयुष्यातून काही कारणाने नाहीसा झाला, मुलगी तिच्या वाटेने निघून गेली, फिझिकली दुरावली किंवा इमोशनलीही, तर मग आपलं घर हरपेल का? आपण बेघर होउ का? घराशिवाय मन:स्वास्थ्य ही कल्पनाही मला करता येत नाही. आजारी पडण्याआधी जो टर्ब्युलन्स होता त्या काळात मला प्रचंड भीती वाटे की त्या दोघांना सोडून मी कुठेतरी लांब निघून जाणार आहे. आणि तेव्हा तर असा काही विचार नव्हता की शक्यता नव्हती पण एक अनसेटलिंग भीती असे. भीती आणि त्यातून येणारी काळजी, अस्वस्थता, हतबलता, भीतीला होणारे सरेंडर. कदाचित देश बदलामुळे त्या भीतीने मूळ धरले असेल, कदाचित मेंदूतीर रसायने कमीअधिक उत्सर्जित झाल्यामुळे असेल, काही का असेना, ....

तर प्रश्न आहे - घर म्हणजे काय? एखादी वास्तू घर असते की आपल्यांची संगत घर असते, की पैशाची ऊब म्हणजे घर की मनाची स्थिती अर्थात स्टेट ऑफ माईंड म्हणजे घर? आणि जर मानसिक स्थिती, सुरक्षेची भावना जर घर असेल तर ते घर शाश्वत रीत्या कधी कसे प्राप्त करुन घेता येइल? अध्यात्मात म्हणातात की आपण सारे प्रवासी आहोत, आपले 'घर' वेगळे आहे. बॅक टु होम - प्रवास मृत्युपश्चात सुरु होतो. नंतरचे कोणी पाहीले, आता तो मोक्ष, ती शांती, सुरक्षा का नाही मिळवता येत? म्हणजे मलाच नाही इन जनरल कोणालाही. कदाचित आईच्या पोटात गर्भाला जी सुरक्षा वाटते ती नाळ सिव्हीअर केल्यानंतर होय सिव्हीअर हाच शब्द चपखल आहे ..... अचानक बाळाला असुरक्षिततेत फेकत असेल आणि मग आईने कितीही का छातीला लावले,प्रेम आणि ऊब दिली तरी ते सेफ हॅव्हन बाळाला कधीच पुरे पडत नसेल? अजुनही माझी मुलगी बाळ बनूनच माझ्या स्वप्नात येते.स्ट्रेंज & येट् नॉट सो स्ट्रेंज. अनेक वर्षे, तिचे बाळपण जे मी पाहू शकले नाही, तिला हृदयाशी लावू शकले नाही ते स्वप्नातून मिळवत असेन मी कदाचित. 'कतरा कतरा मिलती है| कतरा कतरा जीने दो| जिंदगी है....'
माझ्या मन:शांतीवर माझे नियंत्रण हवे. नुसते हवे म्हणुन मिळेल का? तर नाही. पन्नाशी नंतर जी की अजुन तरी अराउंड द कॉर्नर आहे, - यापुढील प्रवास कोणावरही मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरीक दृष्ट्या अवलंबुन न रहाण्याचा असावा - हे ध्येय उचित ठरावे, वर्थ परस्युइंग! मग त्याकरता काय केले पाहीजे उदा - व्यायाम, बचत, मनाचा निग्रह, डिटॅचमेन्ट, नामस्मरण-मेडिटेशन वगैरे ते सर्व केले पाहीजे. शरीराला तसेच मनाला, शिस्त आणि चांगल्या सवयी लावल्या पाहीजेत. अब नही तो कब?

Group content visibility: 
Use group defaults

मन:शांतीवर माझे नियंत्रण हवे. नुसते हवे म्हणुन मिळेल का? तर नाही. पन्नाशी नंतर जी की अजुन तरी अराउंड द कॉर्नर आहे, - यापुढील प्रवास कोणावरही मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरीक दृष्ट्या अवलंबुन न रहाण्याचा असावा - हे ध्येय उचित ठरावे, वर्थ परस्युइंग! मग त्याकरता काय केले पाहीजे उदा - व्यायाम, बचत, मनाचा निग्रह, डिटॅचमेन्ट, नामस्मरण-मेडिटेशन वगैरे ते सर्व केले पाहीजे. शरीराला तसेच मनाला, शिस्त आणि चांगल्या सवयी लावल्या पाहीजेत. अब नही तो कब?>>>> अगदी! प्रयत्न चालू आहेत

छान लिहिलंय, शेवटचा परिच्छेद भिडला. असच ध्येय हवे आणि ते पूर्ण होण्यासाठी ची नियमितता अंगी बाणवायला हवी.

शेवटच्या दोन-तीन ओळी अगदीच पटल्या.
ओव्हर द इयर्स माझ्यापुरती घराची व्याख्या मी बदलली आहे. जिथे छान, निर्धास्त वाटेल ते आपले घर. बाहेरगावी गेल्यावर कधी एकदा परत येऊ घरी असे वाटायला लावणारे. आपल्या आवडीने, मेहनतीने, इच्छेने आणि आनंदाने घेतलेले. मग ते भाड्याचे असो किंवा मालकीचे.
वर्णिता +१

वर्णिता, वर्षा, मानव - धन्यवाद.
वर्षा तुझी घराची व्याख्याही आवडली. प्रत्येकाची स्वतःपुरता वेगळी वेगळी, युनिक असणारच.

सामो,

नेहमीसारखंच सुंदर लेखन..वैचारीक, प्रगल्भ लेख..!

पैशेवाल्यांचे हुच्च मनोगत
Submitted by बन्या >>>>>>>
पूर्ण सहमत .
पन्नास लाखाची गोष्ट . मग हप्ते फेड. त्यातून जगलो वाचलो तर मनःशांती !

छान लिहिले आहे. लिहावे हलके व्हावे.

पण जिथे आपली फॅमिली ते आपले घर हे पटत नाही.
म्हणजे मी मध्यंतरी भाड्याच्य घरात राहत होतो, फॅमिलीसोबतच राहत होतो त्यामुळे खुश होतो. पण कितीही म्हटले तरी ते आपले घर वाटत नव्हते. ते मालकाचेच होते. तिथे माझ्या मनाप्रमाने काही पर्मनंट चेंज करता येत नव्हता.
त्यामुळे जी जागा आपल्या मालकीची, जिथून आपल्याला कोणी काढू शकत नाही, जिथे आपण हवे ते आपल्या मर्जीने करू शकतो ते आपले घर असे मला वाटते.
जर उद्या मी सासुरवाडीला माझ्या फॅमिलीसोबत राहिलो तर तिथेही कोणाच्या तरी आसर्‍याला राहिल्यासारखेच वाटेल.
हेच सून म्हणून माझ्या आईवडिलांच्या घरात आलेल्या माझ्या बायकोलाही वाटू शकते.
याच कारणास्तव प्रत्येक मुलीला लग्नानंतर स्वतःचे वेगळे घर, वेगळा संसार हवा असतो. आणि तो तिला द्यायला पाहिजे.

थोडासा वेगळा ट्रॅक लागला असेल तर क्षमस्व. नुकतेच लोन काढून स्वतःचे घर घेतल्याने हल्ली घर म्हटले की काहीबाही लिहावेसे वाटते Happy

नाही क्षमस्व कशाला ऋन्मेष? सुंदर लिहीले आहेत. आम्हीही भाड्याच्याच घरात रहातो. पण मला मालकीच्या घराची तितकीशी निकड भासत नाही. म्हातारे होऊ तेव्हा बघू. अजुन तरी मालकीचे घर घेतलेले नाही.

व्यायाम, बचत, मनाचा निग्रह, डिटॅचमेन्ट, नामस्मरण-मेडिटेशन वगैरे ते सर्व केले पाहीजे. शरीराला तसेच मनाला, शिस्त आणि चांगल्या सवयी लावल्या पाहीजेत. अब नही तो कब?
>> हे तरुण वयातच चालु करावे माझी आई सांगते, पुढे सवय करणे कठीण होते.
तुम्ही जीवन विद्या मिशनचा विकली कॉल जॉइन का नाही करत?
कॉन्टॅक्ट geeta@jeevanvidya.us

म्हणजे मी मध्यंतरी भाड्याच्य घरात राहत होतो, पण कितीही म्हटले तरी ते आपले घर वाटत नव्हते.
>> सर्व जण भाड्याच्याच घरात राहतात काहीजण १०० (+-) वर्षे भाड्याने राह्तात तर काहीजण थोडी वर्षे / महिने.
आजकाल परमार्थाचे खुप वाचन होते म्हणुन थोडासा वेगळा ट्रॅक लागला असेल तर क्षमस्व. Happy

नीलीमा शेवटची ४ वाक्ये फार आवडली वेगळाच आयाम दिलात या लेखाला.
_________
आत्ताच जीवनविद्या फ्रेझ सर्च केली. https://jeevanvidya.org/audiocall/ - ही लेक्चर्स सापडली. उत्तम आहेत. प्रॅक्टिकल.

........ आताच एका लेक्चरच्या नोटस काढल्या .....
- कुटुंबात प्रत्येक जण 'मी मोठा-मी मोठा' म्हणायला लागला तर कुटुंब कसे टिकेल?
- एकटे राहणे हे फार अवघड आहे नंतर पस्तावण्यापेक्षा जोडी दार निवडा व तडजोड करून, एकमेकांना सांभाळून सुखी व्हा.
- लॉन्ग टर्म आपल्याकरता काय श्रेयस आहे ते पाहून निर्णय घ्या.
- संवाद , सहवास, स्पर्श, स्वातंत्र्य - वैवाहिक जीवनात यांकडे फार लक्ष द्या.
- सहकार्य करा, साहाय्य करा.
- निसर्गनियमाचे भान ठेऊनच काम करा.
- संतती ही तुमची संपत्ती आहे.
- माणूस हा आनंदाची उधळण,आनंदाची रंगपंचमी साजरी करण्याकरताच जन्मास येतो.
- सहजता हा आयुष्याचा स्थायी भाव करा. सहज व्हायला हवे. टेन्शन घेऊन काय होणार? शांत व्हा, प्रार्थना म्हणा. सबकॉन्शस माइंड ला सर्व माहीत असते. ते टॅप करा.
- मनाच्या एका टोकाला परमेश्वर आहे तर दुसर्‍या टोकाला जग आहे. मन बहिर्मुख झालं की जगाकडे जातं आणि तेच जर अंतर्मुख झालं तर ईश्वराकडे जातं.
- मनाला परमेश्वरापर्यंत पोचविण्याचा , उन्मन करण्याचा मार्ग म्हणजे कृतज्ञता.

--------------------------------------
सुंदर विचार आहेत आणि प्रॅक्टिकल आहेत. मी कॉल जॉइन करेन. धन्यवाद.

छान लिहलंय.
@ ऋन्मेष +1. भाड्याचे घर कितीही चांगले असले तरी स्वतःची साधी झोपडीच बरी वाटते.

मस्त आहे लेख.. माझं म्हणाल तर ज्या घरात सोफ्यावर बिनधास्तपणे लोळू शकते, डायनिंग टेबलावर तंगड्या पसरू शकते आणि ह्या सारखं बरच काही घरातील इतर मंडळींच्या उपस्थितीत बिनधास्त करू शकते, तेच घर मला माझं वाटतं.. गेल्या १२ वर्षात १८ घरं बदलली आहेत.. अर्थात, ह्यातली १६ घरं भाड्याचीच होती आणि उरलेल्या दोन घरांमधे सासू सासऱयांसोबत राहिले ..पण सगळीच घरं मला माझीच वाटतात.

तुम्ही दोघं जिथे आहात ते माझं घर.>> हे वाचून ओम जय जगदिश ची आठवण झाली.. जहा मेरे तीनो बेटे खडे हो जाए,वही मेरा घर है Happy
मलाही पूर्वी असं फार वाटायचं की स्वत:च्याच घरात रहावं.. पण जॅाबमुळे इतकी वर्षे बाहेर राहिल्या नंतर भाड्याच्या घरांबद्दलही तितकीच आपुलकी वाटते.. किसी का बॅकयार्ड अच्छा, तो किसी कि बॅल्कनी.. किसी का बाथरूम अच्छा तो किसी का किचन अच्छा..त्यामुळे आता वेगवेगळ्या घरांमधे रहायचा अनुभव घ्यायलाच जास्त मजा येते

सुंदर विचार आहेत आणि प्रॅक्टिकल आहेत. मी कॉल जॉइन करेन. धन्यवाद.
>>
धन्यवाद! नामस्मरणासाठी संगतीचा खुप फायदा होतो. आणि बरेच लाइकमाइन्डेड लोक भेटतात.
प्रश्णोत्तरे या कॉल्स मध्ये बरीच रंगतात आणि सर्व छान अभ्यास करुन येतात.

मी पण गेल्या 16वर्षात 10घरे बदलली. 8भाड्याची होती. एक सासू सासर्याचे होते तिथे जास्त राहणे झाले नाही नवर्याच्या सतत बदलिमुळे. आताचे घर स्वतचे आहे आणि त्यात रहाताना खूप शांत वाटते मनाला. बाकी भाड्याच्या घरात मुलांनी भिंती खराब करु नये म्हणून ,खूप गोंधळ करु नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागत होती. शेवटी स्वतचे घर हे त्यात रहिल्यशिवाय कळत नाही.

म्हाळसा, निलीमा, सियोना प्रतिक्रिया खूप आवडल्या. असा प्रतिक्रियांमधुन धागा खुलत गेला की अजुन मजा येते.

सामो, जरा चालणार असेल तर 'होमलेसनेस' उर्फ बेघर असणे बद्द्ल लिहू का? कोव्हीड काळात या गटाला फार त्रास सोसावा लागला. पण धाग्याला ते किती अवांतर नि किती अनुसरून असेल माहिती नाही.

प्लीज लिहा सी. खूपच छान. मला हेच जमत नाही. वैयक्तिक पातळीवरुन वैश्विक होणं. प्लीज लिहा Happy

बाकी भाड्याच्या घरात मुलांनी भिंती खराब करु नये म्हणून ,खूप गोंधळ करु नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागत होती.
>>>>>>>

आमच्याकडे एकदा यायला हवे होते. चार वर्षे राहिलो त्या भाड्याच्या घरात. पहिल्या दोन वर्षातच मुलीने घराच्या भिंतींचा एक कोपरा शिल्लक ठेवला नाही जो रंगवला नसेल. खडू, क्रेयॉन, स्केचपेन, मार्कर,वॉटर कलर, अगदी हाताचे रंगीत शिक्केही मारून झाले. एबीसीडी तर एबीसीडी, गणिताचा अभ्यासही भिंतींवरच करायचो Happy

बाकी ईथे अशी पद्धत आहे की असा तीन चार वर्षे राहिलेला भाडेकरू बदलताना घरमालक नवीन भाडेकरूला रंग वगैरे काढून देतो. म्हणजे तसेही त्याचे रंग काढणे होणारच होते आणि आधीचाही साधासाच कलर होता. तर आम्ही त्या रंगकामातला अर्धा खर्च उचलला.
घरमालकालाही एका दृष्टीने ते परवडले. तसेच आम्हालाही चार वर्षे घराचे पोरं काय करतात याचे टेंशन नव्हते. आणि पोरांची तर मज्जाच झाली Happy

कोव्हीड काळात या गटाला फार त्रास सोसावा लागला.
>>>>>
कधी सोसावा लागत नाही.
मुंबईच्या नवीन घरात राहायला गेलेलो ते दहाव्या मजल्यावर होते. समुद्रापासून फार लांब नसल्याने वाराही सुसाट असायचा. त्यामुळे पाऊस पडायला लागला की मला खिडकीत जाऊन ते तुषार झेलत बसायला आवडायचे. स्पेशली रात्रीचे. तिथून दूरवर दोनचार लाईनीत असलेली हॉटेल दिसायची. फार स्पष्ट नाही. पण त्याच्या बाहेरच्या आवारात रात्री बरेच जण अंथरूण टाकून झोपायचे. वर छप्पर नाही. मग पाऊस आला की पटपट सर्वांना उठावे लागायचे. पाऊस थांबेपर्यंत दाटीवाटीने आडोश्याला उभे राहायचे. पाऊस थांबला की मग पाणी झाडून ओल्या फरशीवर प्लास्टीक अंथरून त्यावर पुन्हा बिछाना घालून झोपा.. रात्रभर पाऊस पडत राहिला तर रात्रभर जागरण..
सारेच परप्रांतीय म्हणतात ते, गावाला त्यांची स्वतःची घरेही असतील. पण पोटापाण्यासाठी मुंबईच्या आसर्‍याला..

खरं आहे. हवामान जिथे अनुकूल नाही (तीव्र थंडी/उष्मा) तिथे बेघर लोकांचे हाल होतात. अनेक देशात अशा वेळी होमलेस शेल्टर म्हणजे तात्पुरते वसतिगृह असते. मात्र कोव्हीड काळात तिथेही लागण झाली व रूग्णांना विलगीकरण करणे शक्य नव्हते. सरकारने मोटेल्स, हॉटेल्स अशी कुठे कुठे सोय केली. अन्नपुरवठा करणे हे ही अडचणीचेच होते. 'सूप किचन्स' उर्फ अन्नछत्रे बंद झाली होती. तो काळ सरला तर आता लशीची चिंता. एकच इंजेक्शन असलेली लस बेघर गटासाठी सोयीची पडणार आहे. पण त्यावर बंदी येते/जाते आहे. बेघर लोकांचे सध्याचे हाल पाहिले की मनात प्रश्न येतो - घर कशाला म्हणायचं?. वर अनेकांनी लिहील्याप्रमाणे जिव्हाळा, आपुलकी, सत्ता, स्वातंत्र्य अशी अनेक पातळ्यांवर घराची व्याख्या करता येते. मग किमान पातळी कोणती? मला वाटते - जिथे देह सुरक्षित राहू शकतो ते घर कारण देह सक्षम असेल तर भावनिक, मानसिक, अध्यात्मिक इ अन्य पातळ्यांवरचे "घर" शोधता येते.

Pages