एक सुखद अपघात... !

Submitted by Swati Karve on 26 February, 2021 - 09:24

एक सुखद अपघात... !

काही दिवसांपूर्वी अगदी सहजचं, श्री दत्तात्रेयांच्या मठात जाण्याचा योग आला. त्या वास्तूत पाऊल ठेवल्याक्षणी मन, बुद्धि आणि शरीराला एक प्रकारची शांतता जाणवू लागली. एखाद्या अतिशय जवळच्या माणसाच्या आश्वासक स्पर्शातून जे जाणवतं तसं काहीसं वाटलं. त्या मठात श्री दत्त, श्री नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अतिशय सुंदर आणि सजीव वाटाव्यात अश्या मुर्त्या आहेत. दर्शन घेतल्यावर मनातली शांतता अजूनच वृद्धिंगत होतं गेली आणि मन स्थिर झालं.
संध्याकाळची सातची वेळ होती. काही वेळताचं तिथे आरती सुरू झाली. आरतीला मोजकीच माणसं होती. दोन बाजूला मंद तेवणाऱ्या दोन मोठ्या समया होत्या. श्री दत्त, श्री नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांना सुंदर सोवळं नेसवलं होतं. मठाच्या गाभाऱ्यात, श्री दत्ताचे ते अतिशय सुंदर रूप , देवाला ओवाळणारे धूप आणि निरंजन असलेले आरतीचे तबक, कानावर पडणारे आरतीचे शब्द आणि झाजांचा आवाज, या साऱ्यानी मन अगदी भारावून गेलं. वास्तवीक ती संपूर्ण आरती मला तोंडपाठ होती. परंतु मी मात्र शांत उभं राहून, आरती सुरू असताना पूर्ण वेळ त्या मूर्तीकडे नुसती पाहतं होते. आरती म्हणायला सुरवात केली असती तर ज्या एकाग्रतेने मी समोर दिसणारे ते दत्ताचे रूप पाहतं होते, ती एकाग्रता भंग पावली असती. एवढी एकाग्रता, एवढी शांतता, आणि मानसिक स्थैर्य यापूर्वी मी कधीही अनुभवलेलं नव्हतं. असं वाटतं होतं की ती आरती कधी संपूच नये. समोर असलेल्या दत्ताच्या रूपातून प्रकट होणारं तेज, ते पावित्र्य, ती प्रसन्नता, ती शांत, आश्वासक स्पंदनं शक्य तेवढी माझ्या आत साठवून ठेवण्याचा मी कसोशीने प्रयत्न करत होते.
त्या मठात जाण्यापूर्वी, देवाशी असलेला माझा संवाद म्हणजे, "मला हे हवंय , ते नकोय, माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण कर, मला याची भीती वाटतेय, ते तसं घडवून आण, हे असं घडायला नको" असा असायचा. परंतु त्या दिवशी दत्ताची आरती सुरू असताना माझं मन एक वेगळीच अनुभूती घेत होतं. मी कोण आहे, मला काय हवंय, काय नकोय, आजूबाजूला काय चाललंय, साऱ्याचा विसर पडला होता.
एका वेगळ्याच ऊर्जेची स्पंदनं मला जाणवत होती. जिच्यात पावित्र्य होतं, सात्विकता होती, एक वेगळीच शांतता होती, तेज होतं ... पण ते तेज प्रखर नसून, त्या तेजातून एक वेगळाच गारवा मनाला मिळत होता. खरंतर किती ही विशेषणं वापरली, शब्दं वापरले तरीही पूर्णपणे व्यक्त करता येणार नाही एवढी सुंदर अनुभूती होती ती. आयुष्यात पहिल्यांदा मला काहीही नकोय असं वाटलं. माझं जे काही व्हायचं ते होऊदे, माझ्या मनाची तृप्ती आणि समाधान, दत्ताच्या या सात्विक, पवित्र आणि सुंदर रूपाच्या दर्शनातचं आहे, हा एकचं विचार मनात भरून राहिला होता. त्या दिव्य ऊर्जेची अनुभूती घेत असताना मनाला लाभलेलं स्थैर्य, एकाग्रता आणि शांतता कोणत्याही परिस्थितीत भंग पावू नये ही भावना मनात दाटून आली. इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा, काळजी, जखमा, स्वप्न, क्लेश, माया, राग, लोभ, वासना या साऱ्या गोष्टी मागे टाकून एका वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतं होतं.
यापूर्वी मला अनेकदा प्रश्न पडतं असे की हे साधू, संत, योगी कसे आपलं घरदार सोडून जगतात?, आज त्या प्रश्नाचं काही अंशी उत्तर मिळल्यासारखं वाटलं. देवत्वाच्या त्या दिव्य ऊर्जेची एक पुसटशी झलक मिळाल्याने माझ्या मनाला एवढं समाधान आणि शांतता मिळाली होती, मग ज्या सत्पुरुषांना त्या परमेश्वराशी एकरूप होणं साध्य झालं असेल त्यांच्या मनाची काय अवस्था असेल हे वेगळं सांगायला नको.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिल्यावर, अर्जुनाची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना ही करू शकणार नाही.
आरती संपली, सर्व लोक उठून जाऊ लागले, पण माझा पाय तिथून निघता निघेना. इथून बाहेर पडल्यावर पुन्हा भावना, इच्छा आणि मायेच्या बेड्यांमध्ये स्वतःला जखडून घेणं अगदी जीवावर आलं होतं. पण माझ्यासारख्या अतिसामान्य आणि संसारी जीवाला त्या बेड्यांमध्ये पुन्हा अडकण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. देवा तुझे असेच दर्शन मला वारंवार घडो अशी अगदी मनापासून प्रार्थना करून मी तिथून निघाले.
एक गोष्ट नक्की, "मी आणि माझं" या संकुचित जगा पलिकडे, चराचारातून त्या निर्मात्याचं अस्तित्व प्रकट करणारं अतिशय पवित्र, मंगलमयी आणि सात्विक असं एक जग आहे. ते भव्य दिव्य जग हेच खरंतर वास्तव आहे आणि "मी आणि माझं" म्हणून आपण ज्या जगात जगत असतो ते वास्तव नसून एक मृगजळ आहे. त्या दिव्य, पवित्र, प्रसन्न जगातली नखभर ऊर्जा घेऊन जरी आपण आपलं आयुष्य जगू शकलो, तरी खूप सात्विकता, तृप्तता आणि समाधान आपल्याला आपल्या जगण्यात आणता येईल.

- स्वाती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं. गरुडेश्वर येथे असाच काहीसा अनुभव आला होता.
शब्दांत व्यक्त करणं अवघड असूनही तुम्ही छान लिहिलंय.

__/\__

खूप छान आतून लिहिलंय. आवडलं. हॉर्नडू मध्ये अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. तिथे दर्शन घेताना मला असाच खूप भारावून गेल्याचा अनुभव आला होता. नेहमी आपण डोळे मिटून ,मान झुकवून, स्तोत्र पुटपुटत नमस्कार करतो पण मी एकदाही मूर्तीवरून नजर हटवली नाही. एकटक बघत बसले होते. शांत ,प्रसन्न चित्ताने.

वाह सुंदर अनुभव आणि विवेचन . कुठल्या मंदिरात हा अनुभव आला म्हणजे ठिकाण?
मला नेहेमी असा अनुभव गजानन महाराजांच्या दर्शनाने येतो जेव्हाही मी शेगाव ला जातो तेंव्हा