रेमडिसीविर चा तुटवडा आणि डॉ कलंत्री यांचे संशोधन

Submitted by नारी मारीतो on 19 April, 2021 - 22:03

कोविडवर मात करण्याचा खात्रीशीर उपाय सध्या तरी लसीकरण हाच आहे. पण लशींचा तुटवडा निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत साथ आटोक्यात येण्याचा कालावधी लांबणीवर जाऊ शकतो. ही माहिती घाबरवण्यासाठी नाही.
https://www.loksatta.com/mumbai-news/vaccine-shortage-for-the-second-day...
तर परिस्थितीची जाणीव असावी यासाठी आहे. या धाग्यावर राजकारण येऊ नये.

मी वैद्यकीय क्षेत्राबाबत अगदीच अनभिज्ञ आहे. या विषयावर मार्गदर्शन करणा-या काही तज्ञांच्या लिखाणात याबद्दल काही येत नाही. मूक वाचक राहून अशा धाग्यांवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. नेचर, जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून वेळोवेळी प्रसारीत होत असलेली माहिती याचा मागोवा घेतलेला आहे. त्यामुळे आता काही प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

लसीकरण पूर्ण होत नसल्याने रूग्णांना बेड मिळणे आवश्यक आहे. रूग्णांची संख्या रोज दोन लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा अपु-या पडत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय चालू आहेत.

पण सर्वात कळीचा मुद्दा जो आहे तो म्हणजे रेमडिसीवीर हे इंजेक्शन.
१०० मधल्या ४ रूग्णांना ते लागू पडते. ते ही सुरूवातीच्या स्टेजमधे. यातही माईल्ड लक्षणे असताना ते देण्याची गरज नाही. पेशंट गंभीर झाल्यानंतरही ते देता येत नाही.
डॉ. कलंत्री यांचे संशोधन नुकतेच लँसेट या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. यापूर्वी त्यांनी हायड्रोक्लोरोक्विन हे औषध कोविडसाठी उपयुक्त ठरत नाही असे संशोधन केले होते. ते ही लँसेट मधे प्रकाशित झाले होते. त्यानंतर या औषधाचा वापर कमी झाला.
https://www.lokmat.com/vardha/remedicivir-drug-not-effective-treatment-c...

डॉ कलंत्री म्हणतात रेमडिसीवीर हे इंजेक्शन नाही मिळाले तर आपल्या रूग्णाचा मृत्यू होईल अशी भीती आज सर्वसामान्यांमधे पसरली आहे. याला सोशल मीडीया , मीडीया काही अंशी जबाबदार आहे. ज्या प्रमाणात या इंजेक्शन बद्दल अंधश्रद्ध पसरलेली आहे तितके ते उपयुक्त नाही. ज्यांचा जीव वाचला त्यांनी आपण ४% मधे असल्याचे आभार मानायला हवेत. हायड्रोक्लोक्वीन किंवा रेमिडिसीवीर हे प्रत्येकाच्या शरीराला अचूक उपाययोजना म्हणून काम करत नाही.

रेमिड्सिवीर ऐवजी अन्य काही औषधेही तेच काम करतात. डॉक्टरांना ती माहीत आहेत असे कलंत्री सांगतात.
या धाग्याचा उद्देश हा आहे की जर ही माहिती सत्य असेल तर रेमिडिसीवीर बाबत जागूती व्हायला हवी. तुटवडा झालेल्या काळात हे औषध का लिहून दिले जातेय ?
भारतात गरज नसताना लोक हे औषध साठवून ठेवत आहेत. त्यांना ते कुठून मिळतेय ?
त्यातच मतं मिळण्यासाठी आमदार, खासदार ते अगदी नगरसेवक त्यांच्या जागेत कोविड सेंटर्स सुरू करत आहेत. त्यामुळे ऑक्सीजन आणि रेमिडिसीवीर पहिल्यांदा कुणाला मिळेल असे आपल्याला वाटते ? त्यांच्या प्रयत्नाबद्दल शंका नाहीत. पण ही सेंटर्स ऑक्सीजन आणि रेमिडिसीवीरचा अनावश्यक साठा करणार नाहीत का ?

एका प्रसिद्ध रूग्णालयाच्या डॉक्टरने सांगितले की माझ्या कुटुंबाला आमच्याच रूग्णालयात बेड मिळेल याची खात्री नाही. कारण अमूक तमूक साखर कारखानदार बोलतो, आमदार बोलतो असे फोन येतात. पेशंट पाठवला आहे बेड शिल्लक ठेवा असे फोन येतात. काहींनी तर बेडचे रिजर्वेशन केले आहे. त्यामुळे पुढा-यांकडे गेले की बेड मिळतो असे चित्र निर्माण होत आहे. सरकार बेड मिळवून देण्यात अपयशी ठरते पण पुढारी वैयक्तिक पातळीवर मिळवून देताहेत. ज्यांना वाली नाही त्यांचे काय ?

अशी परिस्थिती असताना आता रेमिडिसीवीर हेच औषध लिहून देण्याचा अट्टाहास का ? त्याचा लिलाव चालू आहे. जर त्याला पर्याय असतील तर हे टाळता नाही येणार का ? नाहीतर घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे अशी स्थिती होईल या इंजेक्शनच्या बाबत.

तज्ञांनी यावर प्रकाश टाकावा ही नम्र विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेमिडिसीवीरचा खुपच काळा बाजार सुरू आहे. प्रायव्हेटवाले पन्नास हजार कोणी लाख अशी मनात येईल ती किंमत लावताहेत. इथे एका माहितीतल्या व्यक्तीने त्यांच्या बाबांना प्रायव्हेटला ऍडमिट केले होते. जे इंजेक्शन ५००० ला आहे त्याची किंमत १ लाख लावली. आणि हे इंजेक्शन सुरु केलं कि पहिल्या दिवशी दोन आणि पुढचे चार दिवस चार असे एकूण सहा इंजेक्शन घ्यायला लागतात. त्या व्यक्तीने एकूण सहा लाख देऊन ते इंजेक्शन बाबांना दिले.

हे सर्व डॉ लोकांना माहित नाही का? ज्या इंजेक्शन चा 'कदाचित थोडा उपयोग होऊ शकेल, होईलच असं नाही' अश्या इंजेक्शन चे ६ डोस लिहून का द्यावे इतक्या लोकांना? (नंतर नातेवाईकांना बाजारात वणवण फिरावं लागणार आहे, काळ्या बाजारातून ते घ्यायला बिना पावती २० पट पेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.एकदा लिहून दिलं की ते संजीवनी सारखं कुठूनही शोधून आणण्याचं ऑब्लिगेशन आलं)

समोरचा खर्च करायला तयार असेल तर डॉ लोक्स नेहमीच्या प्रोसेस बाहेर जाऊन रिस्क नाही घेत. शेवटी काय कमी जास्त झालं तर डॉ लोकांनाच विचारतात कि रेमिडिसीवीर का नाही दिलं. आज बायकोच्या डिपार्टमेंट मधून दोन रेमिडिसीवीर चोरीला गेले.

पूर्णपणे सहमत.
नुकताच अनुभव आला. माझा एक सहकारी मित्र कोविडमुळे अ‍ॅडमिट होता. त्या वेळी अनेकांच्या घरच्या फ्रीजमधे हे इंजेक्शन असल्याचे समजले. ते द्यायला तयार होते त्याबद्दल या मंडळींची आभारी आहे. पण घरात कुणीही पेशंट नसताना जर उद्या लागले तर या प्रेशरखाली लोक घेऊन ठेवत आहेत. तुटवडा निर्माण व्हायला हे पण कारण असेल. मागणी वाढली की मग साठेबाज नफा कमावणार.