झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक ही सीरियल 'दळभद्री अन् महादळभद्री कुटुंबातील सोयरिक' या विषयावर आधारित असावी अशी शंका येऊ लागली आहे. Biggrin

आपण उगीच जाडी मुलगी अन् शेलटा मुलगा यांची प्रेम कहाणी समजत आहोत.

DJ +++
स्मितांनी सांगितलेलं सगळं खरं होताना दिसतंय!

बहुतेक ही सीरियल 'दळभद्री अन् महादळभद्री कुटुंबातील सोयरिक' या विषयावर आधारित असावी अशी शंका येऊ लागली आहे. Biggrin
आपण उगीच जाडी मुलगी अन् शेलटा मुलगा यांची प्रेम कहाणी समजत आहोत. > > हा हा हा.... +१११

मी तर हल्ली बघतही नाही ही सिरियल... प्रचंड कंटाळा येतो.
तायडी, मोमो अन रॉकी हेच काय ते बघणेबल उरले आहेत...

अशा रितीनी अखेर ओमकार ने तोंड उघडले...मी नाही करु शकत सापु असे शांतपणे सांगुन टाकले.
ओम्या ने पकडलेले बेअरींग आवडले मला काल...एकदम मृदु बोलणारा गुड्बॉय मुलगा अशी त्याची इमेज त्याने बरोबर कॅरी केली आहे. उगीच रागारागात चिडाचिडी न करता शांतपणे मोमो आणि त्या सो कॉल्ड बाबाना सॉरी पण म्हणाला पोरगा.
सध्या बहुतेक पुढचे एपिसोड तयार नसल्यामुळे रोजचा एपि १५ मिनिटांचा केला आहे..त्यात पण आधीच्या भागातले सीन घुसवतात.
म्हणजे नवीन एपि १० मिनिटेच असतो....
अजुन काही दिसवांनी बंद होइल हे पण...मग परत जुने भाग दाखवतील..

ओम्या खरंच असा वागला यावर विश्वास बसत नाही. असो, देर आये दुरुस्त आये. पण आता लॉकडाऊनमुळे शुटिंग बंद पडण्याच्या वेळेला हे शहाणपण येऊन काय फायदा..? खेकडा बसला नटून अन पाणी गेलं आटून तशातली गत झाली यांची... Biggrin

चला हवा येऊ द्या chya २० डिसेंबर २०२० च्या एपिसोड मध्ये स्वप्नील जोशी नी घातलेला कोट सेम ओमच्या कोटसारखा आहे..का तोच आहे कुणास ठाऊक?

मालविका च्या पात्राला मानसोपचाराची गरज आहे.
खरंतर सगळ्यांनाच मानसोपचाराची गरज आहे.
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, 5 मावश्या मामा आत्या ना कपडे सोन्याचे दागिने इतकं सगळं कशाच्या जोरावर काबुल करून बसलेत साळवी तेच कळत नाहीये . त्यापेक्षा ओम शी लग्न करण्यात भलं होतं असं अजूनही नलु ला वाटत नाहीये..
आता एपिसोड पण संपलेले दिसतात. उद्या पासून काय दाखवणार कोण जाणे

अत्यंत सुमार दर्जाचा so called airport proposal सीन. इतका फालतू. शाळेतल्या नाटकात यापेक्षा बरं करतात लहान मुलं. मालविका व्हिलन साकारतेय की सायकोपॅथ तेच कळत नाही.

फेसबुकवर एअरपोर्ट सीनचा तुकडा पाहायला मिळाला! किती ते कल्पनादारिद्र्य आणि त्याहुनहीं Execution दारिद्रय!!!
किती काळ एअरपोर्टवर नायक/नायिका धावत येऊन जाण्याऱ्याला अडवते हे क्लिशे प्रसंग वापरणार ! प्लस जो एअरपोर्ट म्हणून जे काही दाखवलं होते ते अत्यन्त दयनीय होते. नाही जमत execution तर दुसरी कल्पना लढावी की . सगळंच उजेड आहे इथे तर ...

एकदाचा तो स्विटूचा एअर पोर्टावर हनुमान उडी मारत ओम्याला "माझं तुझ्यावर खूप..खूप..खूप.. जास्त प्रेम आहे.." असं सांगत ओम्याच्या अभिनयाचा 'द एंड' दाखवणारा एपिसोड संपला अन आता तरी ती असा मराठी व्याकरणाचा फज्जा उडवणारी सततची जाहिरात बंद झाली या विचारानेच सुटकेचा नि:श्वास टाकला..

अहो, शुटिंग दादरा-नगर-हवेलीला करत आहेत ते... त्यांनी त्यांच्या रहात्या रेसॉर्टलाच एका बाजुने खानवीलकर व्हिला, दुसर्‍या बाजुने साळवी चाळ, तिसर्‍या बाजुला ऑफिस केलं असणार... कालचं एअर पोर्ट निट निरखुन बघितलं तर तो खानविलकरांच्या हॉललाच बदलून बनवलेलं आहे हे कळेल. खुर्च्या, टेबलं बदलली पण सीलिंग आणि दरवाजे बदलणे जमले नाही त्यांना Biggrin

असो, खुप्प दिवसांनी धाग्यावर आलो.. मीही वेळ मिळेल तसं बघत होतो.. साळव्यांचा दळभद्रीपणा अव्ह्याहतपणे सुरुच असल्यामुळे कितिही भाग चुकले तरी लिंक बरोब्बर लागायची.. रोज वाटायचं काहीतरी लिहावं ह्या नलीच्या दळभद्रीपणाबद्दल पण म्हटलं आता मेलेल्याला किती मारायचं ते. आता स्वीटूच स्वतःहून ओम्याच्या गळ्यात पडली म्हणजे सिरियल खरेतर संपवायला हवी होती. नलीचा यापेक्षा दळभद्रीपणा काय दाखवतील आता..? तरी बरं महामाठ टकल्या शरद काका दादरा नगर हवेलीत गेला नाही.. त्याचं काय झालं ते कळलं का..? नाही म्हणाजे अत्यंत महामाठ सुमन काकुच्या कपाळावर अजुनही कुंकू दिसतंय म्हणुन विचारलं..! Uhoh ( साळाव्यांचा दळाभद्रीपणा बघता ते शरद काकाला हंबरणाथलाच विसरून आले असतील हे वास्तवात खरं असलं तरी सिरियल मधे नक्की काय दाखवलं..? त्याला नोकरी-बिकरी लागली की माठ चिन्याच्या उपद्व्यापामुळे कुणा गँगस्टरने उचलून नेला..??)

मला तर आता असं वाटतंय की ओम्या लंडनला जाताना त्याला स्विटुने अडवून प्रेमात लटकवल्यामुळे भयंकर चिडलेली तायडा आता मोहितला नोकरीवरून काढून टाकेल. तिकडे नली देखील साळव्यांच्या खानदानाला जागणारा एवढा प्रचंड दळभद्रीपणा करुनदेखिल ओम्या अन स्विटू वेगळे होऊ न शकल्यामुळे खुप खुप पिसाळेल. मग रागाने ठार वेडी झालेली तायडा अन दळभद्रीपणाचा कळसाध्याय करून पिसाळलेली नली एक होतील. शेवटी शत्रुची शत्रुईण ती आपली मैत्रीण या न्यायने तायडा नलीचं कर्ज माफ करून तिला गलेलठ्ठ पगारावर मोहितच्या जागी नोकरीवर ठेवेल. मग त्या दोघी एकत्रितपणे एकाच वेळॅस ओम्या, स्विटू अन शकी ला महाप्रचंड त्रास देऊन अक्षरशः सळो की पळो करून सोडतील. काय म्हणालात..? खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स कंपनीचं काय होणार..? अहो आपण आहोत ना... रोजचं गिर्‍हाईक.. त्यामुळे तो बिझनेस ऑटोमेट झाल्यामुळॅ अव्याहतपणे सुरुच रहाणार..!! Proud Proud Proud

कालच्या भागात ष्विटूचा पाठलाग करणारे पोलिसद्वय नंतर ती सापडल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी तिचं इलू बघायला थांबले होते.

एअरपोर्टचा फील देण्याकरता अनेक अन्यागन्यापक्यांना पाठीस बॅगा लावून इकडून तिकडे फिरवत होते.

अत्यंत सुमार दर्जाचा so called airport proposal सीन. इतका फालतू. शाळेतल्या नाटकात यापेक्षा बरं करतात लहान मुलं. मालविका व्हिलन साकारतेय की सायकोपॅथ तेच कळत नाही. >> अगदी
ओम बोर्डिंगसाठी फिरत असताना मला एक बोर्ड दिसला swimming pool असा

ष्विटूचा पाठलाग करणारे पोलिसद्वय नंतर ती सापडल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी तिचं इलू बघायला थांबले होते. >> त्या पोलिसांनी दाढी सुद्धा केली नव्हती.. एकदम भुरटे पोलिस वाटत होते.

ओम बोर्डिंगसाठी फिरत असताना मला एक बोर्ड दिसला swimming pool असा>> त्यांचं रहातं रिसॉर्ट.. Wink

( साळाव्यांचा दळाभद्रीपणा बघता ते शरद काकाला हंबरणाथलाच विसरून आले असतील हे वास्तवात खरं असलं तरी सिरियल मधे नक्की काय दाखवलं..? त्याला नोकरी-बिकरी लागली की माठ चिन्याच्या उपद्व्यापामुळे कुणा गँगस्टरने उचलून नेला..??) >>>>> DJ , मस्तच मज्जा आली।

तायडा आणि खळी कुमार (मोहित) काल वाईन पीत पुढचे मनोरे उभे करत होते काही कळले नाही, कारण नवऱ्याला सिरीयल आवडत नाही म्हणून तो आल्याने मला चॅनेल चेंज करावा लागला.

I was so much missing these comments .....
डीजे..मेधावी.....मस्त लिहिलय....
लोकहो....गेल्या काळात पिसं काढायचे खुप प्रसंग येउन गेले.... त्या मोहित्या ने हॉटेल मधे नेउन इतका घोर अपमान केला, गाडी बिडी मागितली, अंगठी किती हलकी आहे वगैरे सांगून काव आणला...तरी साळव्यांना तोच जावई कसा काय हवा होता ते नकळे...या आणि अशा सगळ्या प्रसंगात कुठे होतात तुम्ही सगळे..... ...
कालचा माझं तुझ्यावर प्रेम वाला प्रसंग तर सगळ्यावर कडी.....स्वीटु ची उडी बघुन बघुन रात्री झोपेत दचकायला होत होतं ....
आता पुढे कोण किती कसं आक्रस्ताळेपणा करणार आहे ते बघयचे आहे....
प्लीज इथे लिहित रहा...कारण नाविलाजाणे हे रोज बघावेच लागते आहे घरात....
इथलं वाचलं की दुख हलकं होतं Happy

स्मिता : Bw . खरंय.. बराच गॅप पडला पण असं म्हमई सोडून दादरा-नगर हवेलितल्या रिसॉर्ट मधे शुटिंगला गेलेली सिरियल हातात सापडतच नव्हती... कालच्या हनुमान उडीमुळे हाती चांगलंच कोलित मिळालं.

तायडा आणि खळी कुमार (मोहित) काल वाईन पीत पुढचे मनोरे उभे करत होते काही कळले नाही>> हेच की ते ओम्या कायमचा लंडनला गेला अन स्वीटू नजरेसमोरून कायमची गायब झाली म्हणुन आनंदोत्सव साजरा करत होते ते... पण त्यांचा हा आनंद २ मिनिटंही टिकला नाही.

वरचे सगळेच प्रतिसाद:))
DJ आणि बाकी सगळे pls पिस काढायला येत चला या धाग्यावर..अशक्य मनोरंजन होतंय हा हाहा

कालच्या भागात विमानतळाबाहेर ओम्या-स्विटूची उगिचची लाडी-गुलाबी सुरु असलेली बघून आपणाला उबग आलेला असतो तेवढ्यात एडिटर आपली सुटका करतो अन आपणाला थेट खानविलकर व्हिल्यात पोचवतो. तिथे भडकलेली तायडा मोहितला नजरेसमोरुन जायला सांगते अन स्विटू सोबत असलेला ओम्या हंबरणाथला पोचता कामा नये अशी जबाबदारी सोपवून त्याला घरातून हाकलून लावते.

मग स्विटू-ओम्याच्या जीपचा अन मोहितच्या अल्टोचा चोर-पोलिस खेळ सुरु होतो अन ते एअरपोर्ट ते हंबरणाथचा रस्त्याने न जाता रिसॉर्टच्या अंतर्गत रस्त्यावर इतके गोल-गोल फिरत रहतात कि ते बघुन आपणालाच चक्कर येते. मग आता हे गोल-गोल प्रकरण कसे संपवायचे बरे असा प्रश्न पडलेला असतानाच स्विटूला गचकल्यासारख्या उचक्या येऊ लागतात. मग तिच्या उचक्यांची उबळ थांबवण्यासाठी ओम्या जीप रस्त्यात थांबवतो अन पाणी आणायला जातो. मागे मोहीत मागावर असतोच. स्विटु जीपेतुन उतरून पुढे जाऊन थांबते जेणे करून मोहितला जिपच्या मागून येऊन डिझेल पाईप तोडायला सोपे जाईल. मग सर्व काही ठरल्याबर हुकुम होत डिझेलचा पाईप तुटतो अन ओम्या पाण्याची बाटली घेऊन येतो. तो जी पाण्याची बॉटल घेऊन येतो ती कुठल्याही विकाऊ पाण्याची बॉटल नसते तर ती तुळशीबागेतून खरेदी केलेली वोटर बॉटल वाटते. त्या बाटलीतलं अर्धा घोट पाणे पिल्यावर स्विटूच्या हुचक्या थांबतात.

मग ओम्या गाडी सुरु करू लागतो तर गाडी सुरुच होत नाही. मग दोघेही अगदी मेकॅनिक असल्यासारखे आळीपाळीने गाडी ठिक करायला बघतात पण त्यांचा पॉ होतो. मग चिडलेला ओम्या जवळाच्या ढाब्यात जाउन बसतो. मागोमाग स्विटूपण जाते. तिथं गेल्यावर ती ओम्याच्या नकळत ढाबा मालक सरदारला भेटते अन लगेच स्वतःला सरदारजीच्या गेटप मधे घालून उल्ल्लुला ओम्या बनवू लागते. ओम्याच्या नकळत लगेहाथ इतर सरदारांकरवी मागावर आलेल्या मोहितला पण चांगला हाग्या मार देते.

कालच्या भागात एकही साळवी दिसला नाही ही जमेची गोष्ट. परवा सकाळी सावंतीण बाईशी बोलता बोलता माठ चिन्यासोबत गाडी धुवायला गेलेली स्विटू गायब झाली म्हणुन पिंजारलेल्या केसाची दळभद्री नली देवाच्या समोर बसली होती. स्विटू परत आल्याशिवाय देवापुढून उठणार नाही म्हणत होती. परवाचा पूर्ण दिवस गेला.. मध्यरात्र होत आली तरी स्विटू आली नाही म्हटल्यावर नलीचं काय झालं असेल कुणास ठाऊक.

आता आजच्या भागात काय होते ते बघुया. (काय होणार म्हणा... कर्मदरिद्री साळव्यांच्या घरातील रडारडीने सुरुवात होणार, मग स्विटू अन ओम्या घरी आले की राग वैताग.. मग आम्ही कसे गरीब अन तरिही स्वाभिमानी म्हणुन डोळ्यातले पाणी निग्रहाने पुसणं वगैरे.. मग ओम्या कसा श्रीमंताघरचा आणि नतद्रष्ट म्हणुन पुन्हा रागराग... असं वाटतं ह्या नलीला कोणीतरी चांगलं कानसाळावं.... दादा साळव्याच्या ढेरीवर बुक्क्या माराव्यात... माठ चिन्याचं पेकाट मोडावं... महामाठ काकीची बोटं पिरगाळावीत... !!! {राखेचा च्या तीनही सीझन मधे असं कोणी डोक्यात जाऊन वैताग देणं सुरू केलं की माईच्या हातची सणसणीत कानफाट मिळायची म्हणजे मिळायचीच तशी इथे एवढी भयंकर गरज असतानाही दादा साळव्याची आई का बरं येत नाही असं नेहमी वाटत रहातं..!} )

Pages