दिगंत : भाग ११

Submitted by सांज on 12 April, 2021 - 12:14

“मग, उद्याचा काय विचार आहे?”

बेडवर आडवं होत रियाने संहिताला विचारलं.

“’उद्या’?.. उद्याचा विचार करत बसलो तर ‘आज’ हातातून निसटून जातो..”

खुर्चीवर मागे रेलत छताकडे पाहत संहिता म्हणाली.

रियाने मान वाकडी करून तिच्याकडे पाहिलं. आणि जिवणी मुडपत म्हणाली,

“कोणत्या थोर व्यक्तिचं वाक्य आहे हे?”

सरळ होत संहिता म्हणाली,

“संत अनुराग..!!”

यावर दोघी खळखळून हसल्या.

“उद्याचा विचार वगैरे काही नाहीये फारसा.. पण, अनुराग म्हणत होता coracle ride खास असते इथली.” संहिता बेडवर बसत म्हणाली.

“हा अनुराग आपला पिच्छा सोडणारच नाहीये का?” रियाने डोक्याला हात लावला.

“हाहा.. चांगलाय गं तसा तो बिचारा..”

“अरे हो.. पण मला awkward होतं. मनावर ओझं असल्यासारखं वाटायला लागतं. नाही म्हणण्याचं गिल्ट येत राहतं तो दिसला की.”

“ओके ईफ यू आर नॉट comfortable देन..”

“नाही अगदी तसंही नाही..” हळू आवाजात रिया पुटपुटली आणि झोपण्यासाठी म्हणून विरुद्ध कुशीवर वळली. आणि शेवटी थोडीफार चुळबुळ करून म्हणाली,

“ओके फाइन, पण त्याला सांग coracle राइड झाल्यावर आपल्याला अनेगुडीला जायचंय. जवळच आहे. उद्याचा मुक्काम तिथेच.” आणि तिने lights ऑफ केले.

संहिता हलकेच गालात हसली.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि सूर्योदय गाठायचा असल्याने तिघेही पहाटेच ठरलेल्या ठिकाणी भेटले आणि सूर्योदयाच्या आत त्यांनी सनापूर तलाव गाठला. पहाटची मोहक हवा त्यांची मनं प्रसन्न करून गेली. रस्ताही सुरेख होता. तलाव जसजसा जवळ येत गेला तसतसे वाटेतल्या दगडांचे आकार भव्य होत गेले. प्रत्यक्ष तलाव पाहिल्यावर तर दोघींचे डोळे दीपले. डोळ्यांत मावणार नाहीत इतक्या अजस्त्र दगडांनी वेढलेला तो तलाव पहाटच्या अंधुक प्रकाशात दैवी वाटत होता. अनुरागच्या आधीच्या ओळखी असल्याने त्याने इतक्या सकाळी एक coracle पण अरेंज केली. एका मोठ्या पाषाणआला टेकून उभी असलेली ती डोंगी उर्फ गोल बोट पाहून दोघी excite झाल्या. थोडीशी भीतीही त्यांना वाटली. आधीचा अनुभव नसल्याने ती वजन पेलू शकेल का किंवा बुडणार तर नाही ना असे प्रश्नही त्यांच्या मनाला स्पर्शून गेले. पण मग अनुराग आणि तो डोंगीवाला दादा त्यांच्या चेहर्‍यांकडे पाहून हसायला लागल्यावर भीत-बिचकत एकमेकांचे हात धरत त्यांनी त्या coracle मध्ये पाय ठेवले. पण, त्यांची कुठलीच भीती खरी न ठरता काही क्षणातच दोघी त्या सुरेख बोटीत स्थिरावल्या. नावाड्याने वल्हवत बोटीला तलावात पुढे पुढे न्यायला सुरुवात केली.

Coracle मध्ये बसण्याचं ते फीलिंग, हाताच्या अंतरावर असलेलं गार निळसर-हिरवं पाणी आणि बाजूला उभ्या पाषाण टेकड्या.. एकावर एक रचलेले भव्य पण गुळगुळीत दगड. फोटो काढावेत, की ते दृश्य डोळ्यात साठवावं की मनात कोरावं संहिताला काही कळेना. ती विस्मईत होऊन चहूकडे पहात होती फक्त. बर्‍याचवेळा इथे येऊन गेल्यामुळे हा अनुभव अनुराग साठी आता नवीन नव्हता. पण तरी त्या दोघींसोबत त्याचं मनही आनंद आणि औत्सुक्याने भरून गेलं होतं.

“शतकानुशतके इथले लोक या बोटी नदी पार करण्यासाठी वापरतात. इथे यांना डोंगी म्हणतात” अनुराग म्हणाला.

थोडसं वाकून हात बाहेर काढून ओंजळीत पाणी घेत रिया म्हणाली,

“500 वर्षांपूर्वी, Domingos Paesa नावच्या एका पोर्तुगीज प्रवाशाने हम्पीला भेट दिली होती. त्याने लिहिलय, इथले लोक तुंगभद्रा नदी पार करण्यासाठी गोल, बास्केट सारख्या दिसणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण बोटींचा वापर करायचे. ज्या की आतून वेताच्या बनलेल्या असतात आणि बाहेरून लेदरच्या. त्या इतक्या मजबूत असतात की त्यातून बर्‍याचवेळा घोडे किंवा बैलही वाहिले जायचे.”

अनुराग रियाकडे पहात राहिला. त्याच्याकडे पहात आणि रियाकडे इशारा करत संहिता म्हणाली,

“हिस्टरी ऑप्शनल..”

दोघे ओळखीचं हसले. त्यांच्या कडे पहात रिया म्हणाली, “.. आणि पुस्तकी किडा सुद्धा..”

यावर तिघे हसू लागले.

इतक्यात अनुरागने रियाचं लक्ष टेकडीच्या पलीकडे वेधलं.. सुवर्णाची आभा घेऊन केशरात न्हालेला आदित्य दगडांच्या मागून वर येत होता. ते टोकावरचे गुळगुळीत दगडही क्षणभरसाठी केशरी होऊन गेले. संपूर्ण तलावाला त्या सोनेरी किरणांचा अभिषेक घडला. निळसर हिरवं पाणी केशरी भासायला लागलं. प्रत्येक किरणातून शेकडो भासमान सूर्य पाण्यावर चमकू लागले. तो विलक्षण अरुणोदय तिघांच्या मनांवर कायमचा कोरला गेला. पुढे पुढे सरकणार्‍या बोटीतून मनाला एका वेगळ्याच बेटावर नेणारी ती सैर तिघेही चाखू लागले. बरचंसं पुढे आल्यावर समोर दगडातून पाझरणारे धबधबे पाहून तर त्यांची मने लहान मुलांप्रमाणे बागडू लागली. नावाड्याने नाव त्यातल्या एका धबधब्याखाली नेल्यावर तर ते शुभ्र तुषार अंगावर घेताना त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

नाव पुढे जात राहिली. ती मोहक सकाळ, तो शांत, अद्भूत निसर्ग.. तिघेही त्या शांततेत हरवून गेले. संहिताच्या ओठी तिच्याही नकळत wordsworth च्या ओळी उमटल्या..

marvel how Nature could ever find space

For so many strange contrasts in one human face:

There's thought and no thought,

and there's paleness and bloom

And bustle and sluggishness, pleasure and gloom.

तिची आवडीची, पाठ असलेली ती कविता आज त्या वातावरणात नकळत तिच्यातून बाहेर पडत होती. अर्थ लागत होता का? माहीत नाही. कदाचित हो कदाचित नाही. पण काहीतरी अॅबस्ट्रॅक्ट पण तितकंच स्पष्ट असं काहीतरी त्यातून तिघांनाही प्रतीत होत होतं हे मात्र नक्की.

There's indifference, alike when he fails or succeeds,

And attention full ten times as much as there needs;

Pride where there's no envy, there's so much of joy;

And mildness, and spirit both forward and coy.

This picture from nature may seem to depart,

Yet the Man would at once run away with your heart;

And I for five centuries right gladly would be

Such an odd such a kind happy creature as he…

क्रमश:

सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आसा, मृणाली जी.. धन्यवाद Happy

@बन्या.. ज्याच्या त्याच्या दृष्टीकोणाचा भाग आहे. प्रतिसादा बद्दल आभार.

@किंग ऑफ नेट

Lol चुकून झालेलं दिसतंय. सुधारते.