आजोळ

Submitted by Abhishek Sawant on 2 April, 2021 - 04:21

आजोळ किवा मामाचे गाव
प्रत्येकाच्या लहानपणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मामाचे गाव. उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली की आपल्याला ओढ लागायची ती मामाच्या गावाला जायची.
मी कोल्हापूर जिल्ह्यातील Ichalkaranji या शहरातच वाढलो. हे शहर पुणे मुंबई सारखे मेट्रो city वैगेरे नसले तरी शहरी जीवनशैलीतच मी लहानाचा मोठा झालो. म्हणून मला गाव मग शेतात असणारी घरं वाड्या वस्त्या जनावरे यांच्याबद्दल जाम आकर्षण वाटते. तर माझे आजोळ म्हणजे सांगली जिल्ह्यातले कर्नाटक सीमेवर असणारे एक छोटेसे गाव "आरग".
गाव तसे छोटे होते पण सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या हे गाव वाड्या वस्तीत पसरलेले होते. म्हणजे गावत प्रवेश करणार्‍या रस्त्यावर दोन तीन शाळा कॉलेज, मोठे गणपतीचे मंदिर. आणि गावत प्रवेश केल्यावर पहिल्यांदा दिसायच ते बस स्टँड. आणि चार पाच पानपट्टी आणि त्यामध्ये मावा चोळत बसलेले पानपट्टी वाले तसेच वस्तीवरील काही मंडळी जी काही कामासाठी गावात आलेली असायची. त्याच्या आजूबाजूला ऊसाच्या रसाची दुकाने त्यावर लावलेला घुंगरांचा आवाज ऐकुन आम्ही आई बाबांचा हात धरून दुकान असलेल्या बाजूला ओढ खायचो. मग थंड पोट भरून ऊसाचा रस पिऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या वाडीच्या म्हणजेच माळवाडी च्या दिशेने निघायचो.
मी तर खूपच खुश असायचो एक तर परीक्षेची कटकट संपलेली असायची आणि आता एक महिना आपल्या आवडत्या ठिकाणी रहायला मिळणार म्हणजे मस्तच.
तर त्या बस स्टँड पासून माळवाडी अंतर जवळपास 5 ते 6 किलोमीटर असेल तेवढे अंतर आम्ही पायी चालत जायचो. कधी कधी चुलत मामा वैगेरे गाडीवरून आणायला यायचे. मग रणरणत्या उन्हात आम्ही घरी पोहोचायचे. तिकडे फ्रीज वैगेरे नव्हता पण पितळेच्या घागरीला भिजवलेले कपडे गुंडाळून ठेवलेले असायचे ते पाणी पण खूप थंड आणि चविष्ट लागायचे.
माझ्या मामांचे घर कौलारू त्याच्या पुढे बसण्यासाठी कट्टा बांधलेला अंगणात मोगऱ्याचा वेल भिंतीवर चढवलेल्या त्या वेलाला खूप फुले लागायची. घराच्या डाव्या बाजूला शेत होते आणि उजव्या बाजूला आंब्याची झाडे आणि केळीची बाग होती. घरापुढे गोठा होता त्यात दोन तीन म्हैस आणि रेडा किवा गाय वैगेरे असायची आणि एक कुत्रं. आणि मी लहानपणापासून बघतोय प्रत्येक कुत्र्याचे नाव टायगर असायचे.
मी लहान असताना तिथल्या देशी गायीला दोन पाड्या झाल्या. अतिशय गोंडस पांढर्‍या शुभ्र मस्त दिसायच्या मग मी त्यांच्या जवळ जाऊन पोते अंथरून बसायचो त्यांना गोंजारत माझ्या मावशीने त्यांचे नाव धोंडी आणि गोंडी ठेवलेले होते. तर मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो की त्या पण माझ्या मांडीवर तोंड ठेवायच्या आणि मस्त रवंथ करत बसायच्या.
मी सुट्टी संपवून परत घरी गेलो आणि माझ्या मावशीने मला सांगितले की कोणी पण माझ्या सारखाच छोटा मुलगा दिसला की त्या पाड्या ओरडायला लागतात हाका मारतात. मला खूप कौतुक वाटायच ते ऐकून.
शेतातल्या विहिरी वर पोहणे गुरे घेऊन चारायला जाणे त्यांना चारा पाणी करायला मदत करणे आणि इकडून तिकडे बागडणे हे आमचे उद्योग.
मला आजही तिकडे जाऊन निवांत चार पाच दिवस रहावेसे वाटते पण सुट्टीच मिळत नाही आणि मिळाली तरी आपल्या घरी जाण्यातच ती संपते.
तुमच्याही काही आठवणी किवा फोटो असतिल तुमच्या आजोळचे तुम्ही पण जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान विषय आहे. लोकांच्या लहानपणीच्या भावनांशी निगडीत. दुर्दैवाने मला ही गंमत कधीच अनुभवता आली नाही.
दुसऱ्यांच्या आठवणी ऐकून-वाचून त्यात समाधान मानायचे.

मस्त लिहिलं आहे.

प्रभुदेसाई, सेम पिंच.
गाव नसल्यामुळे खुप काही मिस केलं असं वाटतं. प्रत्येक शाळेच्या सुट्टीत एक, असे 10-12 आशियाई देश पाहिले, पण महाराष्ट्रातील खेड्यात, शेतात रहायची मज्जा राहुन गेल्याची हुरहूर वाटतेच. जेलसी पण.