मातीविना वाढलेल्या भोपळ्यांचे मनोगत

Submitted by अजित केतकर on 21 March, 2021 - 11:26

निसर्गमित्र-मैत्रिणींनो नमस्कार..

आज आम्हा तिघा भोपळे भावांची आईशी जोडलेली नाळ सुटली आणि आम्ही आई पासून विलग झालो याचा खूप आनंद होत आहे. मालकाच्या कृपेने आणि आमच्या पालकांच्या प्रयत्नाने यशस्वी झालेल्या आमच्या जन्माची ही गोष्ट!!

तुमच्या सर्वांसारखीच माझ्या पालकांनाही निसर्गाची आवड.
यांच्या गच्चीवर शेजारच्या इमारतीतील बदामाच्या झाडाची पानगळ खूप मोठ्या प्रमाणावर होते. आधी बाकीचे लोक पाने गोळा करून जाळून टाकायचे, पण माझ्या पालकांच्या मनात या वाळक्या पानांचे काळे सोने करायचा विचार आला आणि तो कामाला लागला. पाने गोळा करून त्यावर नियमित पाणी मारीत राहिला आणि लवकरच त्याचे उत्तम खतात रूपांतर झाले. या काळ्या सोन्यातच याने गच्चीवर छोटी झाडे लावायचे ठरवले.
मग त्याने 22 नोव्हेंबरला आमच्या आजी भोपळ्याच्या काही बिया टीप कागदात गुंडाळून त्यावर पाणी मारून एका बंद डबीत ठेवल्या. आमच्या आईच्या जन्माची ही नांदीच होती. दोन तीन दिवसातच बियांना कोंब फुटले आणि आईचा जन्म झाला. गच्चीवर आमचे मोठे घर पालकाने सज्ज केलेलेच होते. २८ नोव्हेंबरला आईची रवानगी गच्चीवरच्या काळ्या सोन्याने बनलेल्या मातीविरहित मोठ्ठ्या घरात झाली. इथे भरपूर सूर्यप्रकाश होता. ही माणसे आमच्या घरात त्यांच्या घरातील ओला कचराही टाकत असल्याने आईचे पोषण उत्तम चालू झाले. आमची आई जोमाने वाढू लागली - पाना फुलांनी बहरू लागली. पहिली फूल धारणा 7 फेब्रुवारीला झाली. निसर्गनियमा नुसार पहिली 10-15 फुले ही नर फुलेच आली, पण त्यामुळे आमचा पालक चिंतेत पडला. माझ्या आईची फुलपाखरांसाठी चालू असलेली ही जाहिरातबाजी आहे हे त्याला कळतच नव्हते. एकीकडे फुले आणि एकीकडे मोबाईलवर काहीसे पहात बसायचा वेडा. पण इकडे आसपासच्या परिसरातील माश्यांमध्ये हळूहळू आईच्या फुलण्याची बातमी पसरली आणि फुलांवर तुरळक का होईना पण माश्या, फुलपाखरे येऊ लागली. आता परागीभवनासाठी वातावरण पोषक आहे हे पाहून आईने पाहिले मादी फुल धारण केले. पण खूपच कमी माश्या असल्याने ते काही फळले नाही. मादी फुले गळून पडतायत हे आमच्या पालकाच्या लक्षात आले. मादी फुल सकाळी दोन तीन तासच उमललेले असते हे कळल्यावर सकाळी आठवणीने तो यायचा आणि अलगदपणे परागीभवन करून जायचा. अशाच एका मादी फुलावर त्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि माझा जीव 7 फेब्रुवारीला रुजला!! पाठोपाठ माझ्या या दोन भावांचीही जीवधारणा झाली. मालकाच्या कृपेने आईच्या अंगावर वाढणाऱ्या आम्हा तिघा भावांना पाहून आमचा पालक खुश झाला!! गच्चीवरच्या त्या मोकळ्या हवेत नियमित पाणी, भरपूर सूर्यप्रकाश मिळत राहिल्याने आमची वाढ छान पूर्ण झाली आणि 20 मार्च ला आम्ही आईपासून विलग झालो. आम्हाला सांभाळणाऱ्या दोघा पालकांच्या प्रयत्नांना मालकाच्या कृपेने यश आले. आम्ही आता लवकरच आमच्या पालक कुटुंबाची क्षुधाशांत करून आमचा जन्म सत्कारणी लावणार आहोत.. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलं आहे
मला आधी रुपककथा वगैरे वाटली पहिला परिच्छेद वाचण्या पूर्वी.

आवडले लिखाण
खूप छान प्रकारे लिहिलंय.

बदामाच्या झाडाची पाने विघटन होण्यास खूप वेळ लागतो असं ऐकलं आहे. तुमचा अनुभव काय सांगतो.

बदामाच्या झाडाची पाने विघटन होण्यास खूप वेळ लागतो असं ऐकलं आहे. तुमचा अनुभव काय सांगतो.>> हो, फक्त वाळलेल्या पानांचे पूर्ण माती सारखे विघटन व्हायला ४-६ महिने लागतात. पण बारीक करून त्यामध्ये माती/आधीचे झालेले खत हे जेवढे जास्त टाकाल तेवढे लवकर होईल.