प्रिय काॅफी,
तुझा फेसाळ कैफ
घशाखाली उतरवून
त्या कडवट-गोड चवीच्या मार्गाने मागे-मागे जात
मी पाहत राहते डोळे बंद करून
तुझी-माझी गाठ पडली
त्या आपल्या पहिल्या धक्क्याकडे.
आयुष्यातलं ‘दूध’ सरुन त्याची जागा
‘अमृततुल्य’ घेऊ पाहत होतं
त्या कुठल्या तरी नवतरुण वळणावर
तुझं ॲबस्ट्रॅक्ट, बेफिकीर रूप आयुष्यात आलं.
आणि मी भारावले.
तुझा कैफ हवाहवासा वाटू लागला.
एका हातात तुला आणि एका हातात ‘करिक्युलर’ व्यतिरिक्त कुठलंसं पुस्तक धरुन बसण्याची
धुंदी चढायला लागली.
काय काय आणि किती किती वाचलं मी तुझ्या सोबतीने!
हो पण, तू आलीस म्हणून अमृततुल्य मागे पडलं असं नाही.
त्याची जागा वेगळी!
तो प्यावा टपरीवर.
ऊन्हाच्या हलक्या तिरिपी अंगावर घेत
टाळ्या देत
चर्चा झाडत
उनाडक्या करत.
आणि तू?
तू आर्ट गॅलरी सारखी.
बाहेर एखादा बहावा नाहीतर गुलमोहर
नाहीतर जॅकारन्डा त्यांची भुरभुर रंगविभोर फुलं
विस्तीर्ण, शांत रस्त्यावर सांडत असताना
काचेच्या भिंती आडून,
तुझा ऊबदार मग हातात धरून
एखादं सुंदर पुस्तक एकटीनेच वाचत बसण्याचा जो काही कैफ आहे ना
तो तुझ्या चवीपेक्षाही कैक पटींनी मादक आहे!
पुढे तू सखी होत गेलीस
माझा माझ्याशीच संवाद घडवणारी
पायरीवर बसून पाखरांची किलबील ऐकत
अंगणातला ऊन्ह-सावलीचा खेळ पाहत
तुला चाखणं,
हा सोहळा होत गेला!
क्वचित गवसणारा.
आणि आज तुला असं स्वत:त
मुरताना पाहून लक्षात येतंय,
मीही कदाचित तुझ्यासारखीचं होत चाललेय
ॲबस्ट्रॅक्ट!
मेटॅफिजीकल!
.
कडू-गोड!
सांज
सुंदर कविता.. कॉफी पीत वाचावी
सुंदर कविता.. कॉफी पीत पीत वाचावी अशी !
जिओ!!
जिओ!!
>>>>आणि आज तुला असं स्वत:त
मुरताना पाहून लक्षात येतंय,
मीही कदाचित तुझ्यासारखीचं होत चाललेय
ॲबस्ट्रॅक्ट!
मेटॅफिजीकल!
कडू-गोड!
सुपर्ब!! हे कडवं तर कळस आहे.
मृणाली, सामो.. धन्यवाद
मृणाली, सामो.. धन्यवाद
झक्कास! एकदम coffee घेतल्याचा
झक्कास! एकदम coffee घेतल्याचा feel आला. मी पण अतिशय काॅफी वेडी आहे... ( so same pinch).
फारच छान! मी कॉफी प्रेमी
फारच छान! मी कॉफी प्रेमी नाही, पण तरीही कॉफी ची चव जाणवली!
खरच.... कॉफी ला निवांतपणा हवा.!
"आयुष्यातलं ‘दूध’ सरुन त्याची
"आयुष्यातलं ‘दूध’ सरुन त्याची जागा
‘अमृततुल्य’ घेऊ पाहत होतं" - किती चपखल लिहिलं आहे हे! खूप शुभेच्छा!
मनात रेंगाळणारी अप्रतिम 'कॉफी' "आणि बरच काही"...
गौरी, आंबटगोड, अपूर्व जी..
गौरी, आंबटगोड, अपूर्व जी.. मनापासून धन्यवाद
मस्त लिहिले आहे. मी पण
मस्त लिहिले आहे. मी पण कॉफीप्रेमी आहे
छानच आहे कॉफी कविता. पण मी
छानच आहे कॉफी कविता. पण मी अमृततुल्य प्रेमी