कोणती कविता दाखवू जगाला?

Submitted by सांज on 10 March, 2021 - 07:52

कोणती कविता दाखवू जगाला,
रंगही कोणते उधळू सांग?
कित्येक भाव असे की जयांना,
नसे शब्द-बाधा ना रंग-जाण!

दाखवलेला की झाकलेला,
कोणता तो चेहरा खरा सांग
गुंतलेली की फिरवलेली..
नजरही ती खरी कोणती, सांगून टाक!

किती झरे वाहतात आत,
किती ‘तू’ आहेत तुझ्यात
सांग आज किती रेशमी,
पदर दडवलेस तू मनात?

कसले हे अवास्तव पसारे,
कसली ही जिवंत अडगळ
वाहतोस सदैव तू...
मनामनात, जनाजनांत..?

रे मना, कसे तुझे चित्र रेखू
अन् कसा सांग गाठू थांग
तुझ्यापाठी ही सावली माझी
अन् तुझ्यातच भिरभिर माझे प्राण..!!

सांज
chaafa.blogspot.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>किती झरे वाहतात आत,
किती ‘तू’ आहेत तुझ्यात
सांग आज किती रेशमी,
पदर दडवलेस तू मनात?

फार फार सुंदर!