वारसा

Submitted by सांज on 8 March, 2021 - 09:51

तो अवघड घाट उतरताना नेहाच्या मनात थोडीशी धाकधूक होती. पण ती ज्या निग्रहाने आणि कराराने निघाली होती तो त्याहून कैक पटींनी अधिक होता. सराईतासारखी बाईक चालवत ती अंतर काटत होती. रस्त्यावरचे इतर प्रवासी एकतर तिच्याकडे कुतुहलाने पाहत होते किंवा मग 'आजकालच्या पोरी, तुम्हाला सांगतो..' या मथळ्याखाली येणारा नैतिक निबंध वाचत पुढे जात होते. तिचं मात्र या कशाकडेच लक्ष नव्हतं. वार्‍यावर उडत असल्यासारखी ती गाडी चालवत होती. मध्येच एखादं मनोरम दृश्य पाहण्यासाठी म्हणून क्षणभर थांबुन त्या खोल दर्‍यांमधून घोंघावणारा रानवारा श्वासात भरून घेत त्याच्यासारखीच बेभान वाहत होती. सूर्य पश्चिमेकडे कलला होता. शरद ऋतूची चाहूल लागल्यासारखा हवेत गारवा चढायला लागला होता. करंजवाडी अजून 25-30 किलोमीटर वर होतं. घाट उतरल्यावर डावीकडचा पहिला रस्ता नेहाने धरला. तो बराचसा कच्चा होता. गाडीचा वेग मंदावला. तिथल्या गार शांततेत तिला एकदम हलकं वाटायला लागलं. गाव जवळ यायला लागलं होतं. ओळखीच्या काही जुन्या खुणा दिसतायत का म्हणून तिची नजर भिरभिर फिरू लागली. पण लहानपणीच्या धूसर आठवणींमधलं तिचं गाव आता खूप बदललं होतं. ओढा ओलांडून ती वेशीतून आत आली. थोडेफार कच्चे-पक्के रस्ते, गाई-गुरं, बरीचशी नव्या धाटणीची घरं, मधूनच एखादा जुना दगडी अवशेष मिरवणारा वाडा, चौकातल्या विठ्ठल मंदिराला सीमेंट आणि रंगांचं नवीन लेपण मिळाल्यासारखं दिसत होतं. सारं काही न्याहाळत ती पुढे पुढे जात होती. गावातले लोक मात्र एखादं अद्भूत पाहावं तसं तिच्याकडे कुतुहलाने पाहत होते. डोक्यावर हेल्मेट, अंगात ढगळ टी-शर्ट वर जॅकेट, खाली कार्गो, पायात शूज आणि तिचं ते सराईतासारखं बाईक चालावणं हे सगळे त्यांच्यासाठी कुतुहलाचेच विषय होते. तिच्यावर मात्र त्या कुठल्याच नजरांचा काही परिणाम होत नव्हता. बरचंसं बदललेलं असल्यामुळे एक बोळ चुकून आणि लांबचा फेरफटका मारून शेवटी ती देशमुखांच्या वाड्यासामोर येऊन थांबली तेव्हा दिवेलागण झाली होती. गतवैभवाच्या मोडकळीस आलेल्या खूणा अंगावर घेऊन तो वाडा केविलवाणा दिसत होता. त्याचं मोठं दार तेवढं नेहाला ओळखीचं वाटलं.

ती मनाने तडक वीस वर्ष मागे गेली. आईचं बोट धरून वाडा कायमचा सोडून जाताना वळून मागे पाहिल्यावर हे दार तिला तेव्हा फारच मोठं वाटलं होतं. सुदाम अण्णा त्यादिवशी सकाळी टांगा घेऊन आले तेव्हापासून नेहा खट्टूच होती जराशी. तिला नव्हतं जायचं वाडा सोडून. गंप्या, चिमू, पिंकू तिचे सारे मित्र-मैत्रिणी तिथेच तर होते. शिवाय परसातलं चिंचेचं झाड आणि त्याचा भलाथोरला पार पण तिचा फार लाडका होता. तिथे तिचे भातुकली पासून सारे खेळ रंगायचे. पण आता हे सारं सोडून जावं लागणार होतं. ‘का आईने असं ठरवलंय काय माहिती!’ तिला आईचा रागच येत होता जरासा. पण आई जे करते ते बरोबर असतं हेही तिला माहित होतं त्यामुळे वाईट वाटत असलं तरी तिने तिचं सामान गोळा करून पिशवीत भरलं होतं. आणि मग निमूटपणे आईचं बोट धरून घराबाहेर पडली होती. बोट धरताना तिला आईच्या मनगटावरचे आणि पदराने झाकलेल्या दंडावरचेही ते मोठाले काळे-निळे डाग पुन्हा दिसले. आणि काल दुपारी ओसरीवर बाबा मोठमोठ्याने ओरडत आईला मारत होते तो प्रसंग आठवला. नेम धरून पाडलेल्या चिंचा फ्रॉक मध्ये भरून त्या आईला दाखवायला म्हणून नेहा धावत येत होती तो हे मोठे आवाज ऐकून पडवीतच थांबली आणि भिंतीच्या आडून तिने ते सगळं पाहिलं. बापू, माई तिथेच बसून होते पण ते बाबांना काही बोलत नव्हते हेही तिच्या मनाने नोंदवलं होतं. अशावेळी तिला प्रचंड तिरस्कार वाटायचा बाबांचा, बापूंचा, माईचा आणि त्या वाड्याचाही!

आज इतक्या वर्षांनी पुन्हा त्या वाड्यासमोर उभं राहताना टोचणार्‍या भूतकाळाचा सारा पट तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा उलगडत होता. पाठीवर sack अडकवून एका हातात हेल्मेट घेऊन चेहरा कोरा करत ती वाड्याच्या दिशेने निघाली. चौकट ओलांडून आत आली. पूर्वी माणसांनी फुलणार्‍या दोन्ही बाजूच्या दगडी बैठकी तिला आता खूप लहान आणि ओकया-बोकया वाटल्या. त्या ओलांडून ती अजून आत आली. भिंतीवरचे पापुद्रे निघलेले होते. एकूण वाडा पुरता उतरणीला लागला होता. पण नेहाला त्याविषयी काहीही वाटलं नाही. तिला केवळ जुन्या कटू आठवणीच तेवढ्या आठवत होत्या. समोर कोणी दिसत नाही म्हणून तिने हाक मारायचं ठरवलं. पण क्षणभर तिला प्रश्न पडला, हाक मारावी कोणाला? आता नक्की इथे कोण राहतं हेच तिला माहीत नव्हतं. तेवढ्यात तिला ज्याचा सारखा फोन येत होता, त्या इसमाने त्याचं नाव प्रकाश सांगितल्याचं आठवलं. तुझा भाऊ बोलतोय असही तो म्हणाला होता. मग तिने ‘प्रकाश..’ अशी हाक मारली. कोणीही बाहेर आलं नाही. ती मग sack बाजूला ठेवत ओसरीवर टेकली. आणि अजून एकदा हाक मारली. तेव्हा मग ‘कोण आहे?’ म्हणत आतून एक तरुण वाटणारी बाई बाहेर आली. तिने नेहा कडे पाहिलं आणि जराशी गोंधळली. नेहा उठली. आणि

“नमस्कार, मी नेहा. मला प्रकाश देशमुखांचा फोन आला होता..”

तिला मधेच तोडत ती मुलगी वजा बाई म्हणाली,

“अच्छा, पुण्याच्या नेहा ताई का तुम्ही? अहो या की, हे बाहेर गेलेयत, येतीलच येवढ्यात. मी पूजा, त्यांची मिसेस.” तिने हसत-हसत नेहाचं स्वागत केलं.

नेहाने तिला ‘हाय’ केलं आणि आत जाऊन बसली.

नेहाला वाडा खूपच रिकामा-रिकामा वाटत होता. ठिकठिकाणी डागडुजी केल्यासारखीही दिसत होती. पण घरात माणसं म्हणावी अशी कोणी दिसत नव्हती. तिच्या मनात तसे बरेच प्रश्न होते. पण काय बोलावं, कसं बोलावं अशी ती परिस्थिती होती. वातावरणातला अवघडलेपणा कमी करत पूजा म्हणाली,

“तुम्ही परसात जाऊन हात-पाय धुवून घ्या. लांबचा प्रवास करून आला असाल. मी तोवर चहा टाकते.”

तिला होकार भरत नेहा फ्रेश व्हायला गेली. आणि परसातलं चिंचेचं झाड पाहून नाही म्हंटलं तरी तिच्या काळजात काहीतरी हललं. याच पारावर बसून आईने तिला अ आ इ ई काढायला शिकवलं होतं. आणि त्याच अ आ इ ई च्या जोरावर आज ती इंडियन आर्मी इंटेलिजेंस विंग मध्ये मानाचं पद भूषवत होती. आर्मी मधल्या अगदी बोटांवर मोजल्या जाणार्‍या महिला ऑफिसर्स पैकी ती एक होती. आणि तेही इतक्या कमी वयात! नेहाने मिळवलेलं यश वादातीत होतं. पण त्या यशामागे सिंहाचा वाटा होता तो रागिणी ताईंचा म्हणजे नेहाच्या आईचा. रक्तात सरंजामी भरलेल्या देशमुखांच्या तावडीतून स्वत:ला आणि लेकीला सोडवून, तेही रीतसर घटस्फोट देऊन, एकटीच्या जीवावर मुलीला सांभाळून स्वावलंबी बनवणं ही पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच्या काळात तरी नक्कीच सोपी गोष्ट नव्हती. पण ते धाडस आणि हिम्मत रागिणी ताईंनी दाखवली, स्वत: अगदी खडतर आयुष्य जगून!

पिढीजात वतनदारी गेली तरी रक्तातली खुमखुमी न गेलेल्या देशमुखांच्या वाड्यात बायकांना केरसुणी इतकीहि किम्मत दिली जायची नाही. जन्मभर डोक्यावरचा पदर सांभाळत नवर्‍याची झिंग आणि प्रसंगी त्याने दिलेला मार सोसत तिथल्या बायकांच्या पिढ्या न पिढ्या सरणावर चढल्या. विशीतली कोवळी रागिणी हिम्मत रावाशी लग्न होऊन वाड्यात आली तेव्हा मॅट्रिक पास होती. लग्न झाल्यावर तिची ती शिक्षणाची आवड तिला स्वयंपाकघरात पुरून टाकावी लागली. घरातल्या पुरुषांचं पिढीजात जमिनीच्या आणि संपत्तीच्या जिवावर काहीही न करता बसून राहणं तिला आवडायचं नाही. हिम्मत रावाच्या व्यसनांविरुद्ध ती बोलू लागली. कधीतरीच शुद्धीत असणारा हिम्मत राव मात्र तिचं काहीही न ऐकता त्याची सारी रग तिला बेदम मारून जिरवायचा. ‘बायकोला धाकात ठेवायचं असतं’ असं तर बाळकडूच मिळत असतं अशा पुरूषांना. घरातल्या मोठ्यांना सडेतोड बोलणारी रागिणी नकोशीच होती. शेवटी कंटाळून सहा-सात वर्षांच्या नेहाला घेऊन रागिणीने तो वाडा आणि देशमुखांचं नाव कायमचं त्यागलं. नंतर रीतसर घटस्फोटही दिला. ना तिने पोटगी मागितली ना संपत्तीतला वाटा. स्वाभिमानाने लेकीला वाढवलं, शिकवलं, स्वावलंबी आणि कणखर बनवलं. आईचा त्याग आणि कष्टप्रद आयुष्य पाहत नेहा मोठी झाली होती. तिची समज वाढत गेली तस-तसा तिच्या मनातला वडिलांविषयीचा राग आणि आईविषयि वाटणारा अभिमान दोन्ही वाढत गेला. कधी कोणासमोर मान तुकवायची नाही आणि अरे ला कारे करून जगायचं हे तर ती खूप लवकरच शिकली. पहिल्याच फटक्यात सेंट्रल आर्म्ड फोर्सेस ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढे जाणीवपूर्वक सशस्त्र सीमा बल निवडून आर्मीत दाखलही झाली. पेपर मध्ये, टीव्ही वर सगळीकडे तिचं भरपूर कौतुक झालं. रागिणी ताईंच्या कष्टांचं खर्‍या अर्थाने चीज झालं होतं.

रागिणी ताई निघून आल्यावर इकडे हिम्मत रावाने दुसरं लग्न केल्याची बातमी उडत उडत त्यांच्या कानांवर आली होती. पण, रागिणी ताईंनी ना त्याच्याकडे कधी लक्ष दिलं ना देशमुखांशी पुन्हा कसला संबंध ठेवला. पण मागच्या वर्षभरापासून नेहाला बँकेच्या लोकांचे वसुलीसाठी फोन येऊ लागले होते. दोघी माय-लेकीना त्यांचा काही उलगडाच पडेना. सुरूवातीला नेहाने दुर्लक्षच केलं. पण नंतर प्रकाश म्हणजे नेहाचा सावत्र भाऊही तिला फोन करून बोलाऊ लागला होता. शेवटी काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून इच्छा नसतानाही नेहा गावात येऊन दाखल झाली होती.

चहाला उकळी आली तसा तो पूजाने दोन-तीन बरे कप पाहून त्यात ओतला. आणि बाहेर आली. तोवर प्रकाशही घरी आलेला होता. नेहा बाहेर येऊन ओसरीवर बसली. पूजा ने दिलेला चहा घेत तिने प्रकाशकडे पाहिलं. त्याच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहत होता. पुढे होत तो म्हणाला,

“नमस्कार नेहा ताई! मी प्रकाश. तुमचा सावत्र भाऊ. तुमी ओळखत नाई मला. पन इथं करंजवाडीत सगळे ओळखतात बगा तुमाला. गावाचं नाव लई मोठं केलं तुमी.”

यावर जुजबी हसत नेहाने चहाचा कप बाजूला ठेवला आणि सरळ विषयाला हात घातला,

“ते सगळं ठीक आहे. मला इथे का बोलावलं आहेस तू? आणि बँकेचे फोन का येताहेत सारखे मला? काय संबंध आता आपला एकमेकांशी?”

यावर ओशाळून गेल्यासारखा खाली बसत तो म्हणाला,

“आता काय सांगू ताई तुम्हाला, लई अवगड झालय बगा सगळंच. मागच्या वर्षी माझा बाप गेला..”

यावर गडबडून नेहाकडे पाहत “..म्हणजे आपला..”

ही माहिती नेहासाठी नवीन होती. पण तसं काही न दाखवता त्याला तोडत नेहा म्हणाली, “हम्म.. पुढे.”

“तो गेल्याच्या दु:खातून अजून आमी सावरतोय तोवर देणेकर्‍यांच्या लायनी च्या लायनी लागल्या घरासमोर. बापाचा जन्म पिण्यात आणि जमिनी गहाण ठेऊन उसणी काढण्यात गेला. माझी आई तशी लवकरच गेली. बापाची झिंग पाहतच मोठा झालो मी. शिक्षण असं तसंच. विकून विकून उरलेली जमीन कसतोय आता कशीतरी. त्यात आमचं भागल ओ कसंतरी. पण या देण्याचं काय करू कळंना झालय बगा काई. तरी जमल तसं पन्नास-साठ टक्के फेडय मी. पण बँकेचं फेडायचं असल तर आता जमीन विकल्याशिवाय काई उपाय नाही.”

नेहा स्तब्ध होवून सारं ऐकत होती. पण कसलीही सलगी दाखवायची नाही आणि अंगावर काही घ्यायचं नाही हे मनाशी ठरवूनच ती आली होती. त्यामुळे रुक्षपणे ती म्हणाली,

“हे सगळं ठीक आहे. माझे तीर्थरूप कसे होते याची कल्पना मला आहे त्यामुळे तू म्हणतोयस ते खरंही असू शकतं. पण, या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध ते मला अजूनही समजलेलं नाही. तुझ्या वडलांचे मोठे भाऊ म्हणजे बापू असतील की किंवा ते नसले तरी त्यांची मुलं तरी असतीलच की! बँक माझ्यापर्यंत का पोचली?”

त्यावर अजून ओशाळून प्रकाश म्हणाला,

“नेहा ताई तेच तर खरं दुखणं आहे. आपला बाप एकतर हलक्या कानाचा आणि वर पिदाडा. याचा पुरेपूर फायदा घेतला त्या बापू काकाने. एकतर माइकडुन आधीच सार्‍या वाटण्या करून घेतल्या. आणि नंतर शेतासाठी, बैलांसाठी, दोन्ही लेकींच्या लग्नासाठी वगैरे म्हणत आपल्या बाबांच्या नावे कर्ज काढली. पिऊन झिंगल्यावर आपण कशावर सह्या करतोय हेही बाबाला कळायच नाही. पुढे माई गेली. कर्ज न फेडता बापुकाकाही गेला. त्याचा मुलगा तालुक्याला कारकून आहे. तो सरळ हात वर करतो. आणि का करणार नाही, त्याचा सातबारा कोरा आहे. सगळा बोजा काय तो आपल्यावर!”

नेहाला धक्के बसत होते पण तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं. अशा लोकांसोबत असच होतं वगैरे तिचं मन म्हणत होतं. पण प्रकाशच्या शेवटच्या वाक्यावर मात्र ती खजील झाली,

“‘आपल्यावर’ म्हणजे? प्रकाश, माझा या वाड्याशी, तुझ्या वडलांशी आणि जमिनीशीही आता कसलाच संबंध नाही. मनानेही नाही आणि कायद्यानेही नाही. तो जोडण्याचा प्रयत्न तू करू नकोस”

त्यावर शांतपणे प्रकाश म्हणाला,

“संबंध मी नाही नेहा ताई, आपल्या बापानेच जोडून ठेवलाय. त्यामुळे मला नाईलाजाने तुम्हाला बोलवून घ्यावं लागलं.”

“म्हणजे?” नेहाने विचारलं.

प्रकाश बोलू लागला.

“पाच-सहा वर्षांपूर्वी तुमचं नाव, आईसोबतचा फोटो बाबाने पेपर मध्ये टीव्ही वर पाहिला. तेव्हापासून त्याचं पिणही जरा कमी झालं. शांत शांत होत गेला. कुठं बाहेरही जाईनासा झाला. एक दिवस मला बोलावून घेतलं आणि कातरून ठेवलेला पेपरचा तो तुकडा दाखवत म्हणाला,

‘पक्या, ही तुझी थोरली बहीण बरं. लई मोठी झालीये आता. एवढीशी होती तवा सोडून गेली मला. आमच्या अंगातली खुमखुमी जल्मभर सरली न्हाई. कधी साधी विचारपूसबी केली नाई मी तिची. आता काय सारं संपत आलय माझं. फकस्त एक इच्छा आहे. माझी वारस म्हणून तिचं बी नाव लवायचय मला. मी तिला कधी कै दिलं नाही तिनं मागितलं बी न्हाई. पन जायच्या आदि एव्हड करायचय बाबा. दे करून.’

खूप काकुळतीला येऊन बोलत होता त्यादिवशी. मी त्याला तसा कधीच पाह्यला नव्हता. म्हातारपणी माणसाला चुका उमगत्यात म्हणतात, तसं कायतर झालं असावं. त्याच्याकडं बघून करून दिली मी बी सारी लिखापढी. मागल्या वर्षी तो गेला. मग आपोआप सातबार्‍यावर माझ्यासोबत तुमचं पन नाव लागलं. जमीन विकून कर्ज फेडावं म्हटलं तर तुमचं नाव असल्यामुळं मला एकट्याला व्यवहार करता येईना. म्हणून बोलावलं बगा तुम्हाला.”

नेहा अवाक होऊन सारं ऐकत होती. काय बोलावं तिला काही सुचेना. ती उठली आणि ‘उद्या बोलू’ म्हणत आत निघून गेली.

त्यादिवशी रात्री पलंगावर पडल्या पडल्या छतावरचे लाकडी सर पाहत तिच्या मनात विचारांचं काहूर उठलं. आपल्याला खांद्यावर बसवून शेतात बोरं पाडून देणारा तिचा बाप तिला आठवला. प्यायचा नाही तेव्हा किती छान खेळायचा आपल्याशी. पण मग दुसर्‍याच क्षणी हातात येईल त्या साधनाने आईला मारणारा बाप पण आठवला. काळजात पुन्हा चर्र झालं. प्रकाशचा विचार तिच्या मनात आला. जेमतेम तिशीतला. एक-दोन वर्षांपूर्वी लग्न झालेला प्रकाश. डोक्यावर भलं-थोरलं कर्ज घेऊन जगणारा प्रकाश. बायकोला कम्प्युटर क्लासला पाठवणारा प्रकाश. त्याचं नेहाकडून शेत विकण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र हवं होतं फक्त. पूर्वेतिहास जाणून त्याने तिच्याकडून इतर कसलीच अपेक्षा ठेवली नव्हती.

दुसर्‍या दिवशी जराशी लवकरच उठून ती शेताकडे गेली. लहानपणी पाहिलेलं शेत आता थोड्या वेगळ्याच नजरेने तिने पाहिलं. तिच्या बापाने तिच्यासाठी ठेवलेला तो एकमेव वारसा होता. बांधावरून फिरून, जरावेळ विहीरीपाशी रेंगाळून ती गावात परत आली. ग्रामपंचायतीत जाऊन सारे कागद तपासले. परत येताना गंप्याच्या घरात डोकावली. दोन लेकरांचा बाप झालेल्या गंप्याने आधी तिला ओळखलच नाही आणि मग ओळख पटल्यावर त्याला काय करू अन काय नको झालं. बायको-लेकरांची ओळख करून दिल्यावर, ती वाडा सोडून गेल्यावरचा सविस्तर वृत्तान्त त्याने तिला ऐकवला. देशमुखांची देशमुखी कशी त्यांच्याच कर्माने पाण्यात गेली ते बापूंनी हिम्मत रावाला कसा हातोहात फसवला आणि आता मागे राहिलेला प्रकाश कसा बापजादयांची पापं फेडतोय इथपर्यंत सारं त्याने तिला सांगितलं. थोड्यावेळाने त्याच्या लेकरांच्या हातात खाऊसाठी पैसे ठेऊन नेहा वाड्यात परत आली.

पूजाने छान नाश्ता बनवला होता. तो खाऊन प्रकाश शेताकडे जाण्याच्या तयारीत होता. नेहा आल्यावर तो थांबला. त्याला आणि पुजाला समोर बसवत नेहा म्हणाली,

“प्रकाश, इथे येण्या आधी खरंतर मी तुझ्याविषयी वेगळाच विचार केला होता. देशमुखांचे पुरुष कसे असतात याचं एक चित्र माझ्या मनावर कोरलं गेलं होतं. तूही तसाच असशील असं मी ठरवून टाकलं होतं. पण तू तसा नाहीयेस जाणवतंय आता मला. आपल्या मागच्या पिढ्यांचे आपण उत्तरदायी असलो तरी त्यांचा कोणता वारसा पुढे न्यायचा हे मात्र आपणच ठरवायला हवं. कितीही वाटलं तरी मी माझे वडील आणि त्यांच्यासोबतचं नातं बदलू शकत नाही. मी पंचायतीत जाऊन आलेय. फॉर्म्स मागवलेत. पूर्ण जमीन तुझ्या नावावर करून द्यायचं ठरवलय. कागदपत्र तयार झाले की ये मला भेटायला. मी सह्या करून देईन. आणि बँकेच्या कर्जाचे डिटेल्सही पाठवून दे. मला जमेल तितकी मदत मी नक्की करेन.”

नेहाचं बोलणं ऐकून प्रकाश-पुजा दोघांचे डोळे भरून आले. सगळीकडून संकटं कोसळत असता कोणीतरी मायेचा आणि धीराचा हात पाठीवर ठेवावा तसं त्यांना वाटलं.

नेहा परत आली. तिने जमीन प्रकाशच्या नावाने केलीच शिवाय महिन्याभराने प्रकाशच्या नावे एक चेक आणि पुजा च्या नावे एक कम्प्युटर सेट करंजवाडीला पोस्टाने पाठवून दिला.

कूस बदलू पाहणार्‍या देशमुखांच्या नव्या पिढीला जुने व्रण बाजूला सारत तिने मनोमन शुभेच्छा दिल्या.

सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कथा..
नेहा च्या करिअर चे डिटेल्स थोडे चुकलेत ..

सेंट्रल आर्म्ड फोर्सेस ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढे जाणीवपूर्वक सशस्त्र सीमा बल निवडून आर्मीत दाखलही झाली >> सशस्त्र सीमा बल आणि आर्मी या दोन वेगळ्या संस्था आहेत. भारत - नेपाळ सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सशस्त्र सीमा बल करते. आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. यातून आर्मी त जाता येत नाही.

चिन्मय,
तुमचं बरोबर आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. खूप पूर्वी यासंदर्भात एका माननीय व्यक्तीकडून मी बरंचसं ऐकलं होतं. फॅक्ट्स समजून घेण्यात माझ्याकडून गल्लत झाली असावी. लिहण्याच्या ओघात मी योग्य माहिती न घेता लिहून टाकलं. जे करायला नको होतं.
प्रतिसादासाठी आभार!

छान कथा...आवडली. आधी वाचली त्यावेळी प्रतिक्रिया दिली नव्हती. आज मुद्दाम प्रतिक्रिया देण्यासाठी परत वाचली.

सावत्र भावा -बहिणीच्या नात्याचा एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. मस्त आहे कथा आवडली.

कथा function at() { [native code] }इशय मस्त रंगवली आहे. परंतु शेवट मला तरी फारसा सकारात्मक वाटला नाही, माझ्या मते नेहाने खमकेपणाने, अंग काढुन घ्यायला हवे होते.