झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रीएटीव्ह टीम 'नवर्‍याच्या बायको' चीच आहे; त्यामुळे तीच क्रीएटीव्हीटी आहे ! फूड इंडस्ट्री, प्रेझेंटेशन, प्रॉडक्ट ची चव, आणि त्यात नायिकेचा पडलेला उजेड !!

काल रेशीमगाठीची जाहिरात करत होते का. सकारात्मक की नकारात्मक. स्वीटू दिसायला ईतकी वाईट आहे का की तिला कमी शिकलेले आणि वयाने बरेच मोठे पसंत करतील. त्या माणसाने सांगितले की त्याचे लग्न झालेले नाही तर स्वीटूला इतका राग का आला. ओम सारखाच मुलगा हवाय का तिला. मालिकेत इकडचं टोक नाहीतर तिकडचं. तो माणूस त्या फायली बघून स्वतःचं लग्न का नाही जमवत.

ओम, तायडी प्रेझेंटेशनला नुसतेच बसलेले असतात स्वीटूच सगळं करते आणि हमेशा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिते.
ते लोक पण स्वीटू नावाने ओळखतात तिला आणि तिने त्या लोकांबरोबर काम करावं हा अट्टाहास करतात. सगळंच अनाकलनीय आहे.

आता आपण तरी किती अपेक्षा करू शकतो... साळव्यांना २ वेळचं पोटभर खायला मिळतंय.. नलूच्या ३०० चपात्यांचा रोज पुन्हा सुरू झाला.. बाबा साळव्यांना पण नोकरी लागली.. माठ काकाने अजुन एखादी चांगली पँट कापून तिच्या २ हाप पँट करण्यासारखा दुसरा एखादा निर्बुद्ध प्रयत्न पुन्हा केला नाही.. माठ काकीचा दमा गेले महिनाभर तरी चांगलाच निवलाय.. महामाठ चिन्याने पैशांची नवीन लफडी पुन्हा तरी वाढवली नाहीत.. कसं का होईना पण स्विटू पुन्हा ऑफिसला जायला लागली.. ओम्याचं प्रकरण शकूपर्यंत पोचलं अन रॉकीही मदतीला तयार झाला.. तायडीने पण सगळी भडास हंबरणाथमधे येऊन ओकली... एकंदरीत बरंच बरं चाललंय म्हणायचं...! Bw

ते मिस्टर साळवी झालेले "जय मल्हार" मधले बानूचे बाबा आहेत का? >>>> बाबा साळवी म्हणजे शरद पोंक्शे ना?
चहयेद्या बघायचा प्रयत्न केला . वैताग आला . काहि निवडक जोक्स वगळता आनंदच होता .
कुशल , सागर आणि श्रेया मस्त वाटले .
शाल्व मस्तच दिसतो .

कुशल , सागर आणि श्रेया मस्त वाटले . >>>>>>> अगदी अगदी. श्रेयाला कुठलाही रोल द्या, परफेक्ट करते. ऑफ स्क्रीन मात्र ती ( मुलाखत असो किव्व अ‍ॅवॉर्ड शो) विद्या बालनच्या चालण्या बोलण्याची नक्कल करते. बर्याचवेळा ऑबझर्व केलय हे. त्या सपट परिवार का कुठल्याश्या चहाच्या एडमध्ये हे आणखीनच स्पष्टपणे जाणवल. निखिल साबळेने सुद्दा छान काम केल.

श्रेया मुलाखत किंवा अवॉर्ड शोला नेहेमी साडी नेसते. छान वाटतं बघायला. मराठीतली विद्या बालन Happy
झी पाच वर बघायचे आहे च ह ये द्या पण जाहिराती खूप असतात. जाहिराती टाळण्यासाठी काही उपाय आहे का.

झी मराठी चं सबस्क्रिप्शन नाहीये. सहज म्हणून हा धागा एकदा उघडला. डीजे आणि काही आयडी मस्त पिसं काढतात ते वाचायला इथे येते.
स्वजो त्या फालतु जोक्स वर खोट खोट हसतो>> अगदी अगदी, हे मी तुनळीवर दिसेल तेवढे बघितले. ते कलाकार पण इतके खो खो कसे हसतात कुणास ठाऊक.

ते कलाकार पण इतके खो खो कसे हसतात कुणास ठाऊक.

>>>>>>
एकच व्हिडिओ पुन्हा पुन्हा दाखवतात.

आणि बुधवारच्या प्रहसना वेळी समोर कोणच बसलेले नसते.

तायडी ओम्याच्या नकळत त्याचे ठिगळं लावलेला ड्रेस घातलेल्या मोमो सोबत फोटोशुट करवून घेते(निर्मात्यांना मानलं पाहिजे... एकही वाढीव कॅरेक्टर न घेता फोटोशूट उरकल) अन प्रिंट मिडियात छपवून पण आणते. नेमका तो पेपर माठ साळवी काकांच्या हाती पडतो अन ते नेहमीच्या बावळटपणाचा कहर करत आक्ख्या चाळीला सांगत घरात दाखवायला घेऊन येतात. तो फोटो पाहून स्विटूच्या डोळ्यात पाणी येतं(हे पाहून आपण सुटकेचा नि:श्वास टाकतो म्हणा..!) अन ती ओम्याला फोन लावते.

तिकडे व्हिलातल्या किंगसाईज बेडवर ओम्या अनाकोंडा सारखा पसरलेला असतो.. तेव्हाच स्विटूचा फोन येतो.. अन त्याला बेड टी सोबत आलेल्या पेपर वर मोमो सोबत फोटो दिसतो. दिवस्भर त्याची चिडचिड होते अन त्याचा फटका ऑफिसमधल्या कर्मचार्‍यांनासुद्धा बसतो. शेवटी रॉकी येऊन ओम्याला समजावतो अन ऑफिसमधे अडकलेल्या कर्मचार्‍यांची त्या दिवसापुरती तरी सुटका करतो.

<<<तायडी ओम्याच्या नकळत त्याचे ठिगळं लावलेला ड्रेस घातलेल्या मोमो सोबत फोटोशुट करवून घेते(निर्मात्यांना मानलं पाहिजे... एकही वाढीव कॅरेक्टर न घेता फोटोशूट उरकल
>> <असे नाहीये, त्याला माहित होते की ताईने त्याचे अन मोमोचे लग्न ठरवले म्हणून फोटोशूट होतोय

एबीपी माझा वर व्हेलन्टाईन डे स्पेशल मध्ये हे दोघे आणि सागर कारण्डे- श्वेता शिन्दे ( डॉक्टर डॉन) आले होते. त्यात शाल्वने तो २० वर्षाचा आहे अस सान्गितल आणि अन्विता १८ वर्षाची आहे म्हणे! खखोदेजा.

असेल असेल म्हणा ते त्या वयांचे............ पण दिसताना मात्र ओम्या २५-२६ चा अन स्विटू २४ ची आहे म्हणे (बाबा साळव्यांनी काल सांगितलं)

ओम स्विटू चं भारी गूळपीठ जमू लागलंय आता.. स्विटूचं लग्न जमावं म्हणुन नलूच्या ओळखीतल्या वहिनीला स्विटूचे फोटो पण दिलेत. वहिनीने नलूला सांगितले आहे की स्विटूला १६ की १७ शनिवार उपास करायला म्हणजे मग योग्य स्थळ मिळून लवकर लग्न जमेल. आज पहिला शनिवार झाला. Bw

ओमला आणि स्विटूला भेटता यावं म्हणुन रॉकी प्रयत्न करत असतो पण काही योग जुळत नसतो. १७ शनिवार करायला सांगितले हे स्विटूकडून मोमोला समजते अन बहुतेक तिच्याकडून ओमला. मग ओम पण शनिवार करायचं ठरवतो अन ऑफिस मधून घरी जात असताना तो एका फळविक्याला बघतो जो ७० रुपये किलोने सफरचंदे विकत असतो ते बघून ओम्याला एक शक्कल सुचते. तो फळविक्याचा अवतार घेऊन २० रुपये किलोने सफरचंद विकत नलूच्या घरी येतो. भाव ऐकुन नलु लगेच बाहेर येऊन ओम्याकडून सफरचंदं घेऊ लागते (ओमला ती ओळखू शकत नाही.. अर्थात साळवी असल्यामुळे..!!) अन स्विटूलाही बोलावते. तिला बघून ओम्या तिला नलूच्या नकळात गोड जबरदस्तीने सफरचंद खायला लावतो (भारी जमलाय सीन.. Bw इश्श..!).

असा गोड गुलाबी सीन संपल्यावर माठ काका-काकूचा सीन..! बाबा साळवी हॉलमधे झोपलेले असतात अन ती माठ काकू खिडकीच्या खाली काहीतरी उसवलेलं शिवत बसलेली असते. माठ काका येरझर्‍या घालत असतो ते तिला खपत नाही. खिडकीच्या बाजुला बसुनही माठपणामुळे तिला असं वाटत असतं की काकाच्या येरझर्‍या घालण्याने तिच्या शिवणकामात उजेड पडेनासा झालाय (बाई गं आधी थोडा बुद्धीचा उजेड पण पाड..!!). मग नेहमीप्रमाणे कशासाठीही इश्श इश्श करून महामाठ काकूचा सीन संपतो. माठ काका नेहमीप्रमाणे माठपणाचा प्रचंड प्रकाश पाडत बाबा साळव्यांचा नाईट ड्युटीचा ड्रेस हा हॉस्पिटल मधे घालण्याचा ड्रेस आहे असं समजून बाबा साळव्याला मदत म्हणून तो ड्रेस घेऊन हॉस्पिटल मधे जातो (असल्या माठ माणसांना लेखक कोमात का पाठवत नाहीत काय माहीत.. Angry ..!!)

अहो, बघे करेपर्यंत २-३ वर्षं जातातच. साळव्यांनी वेळेत सुरुवात केली आहे पण त्यांना ओम्या सारखा जावई शोधुनही सापडणार नाही.

आता क्काय गंमत होणारै मैतै का.... >>
तुम्ही काहीतरी भारी लिहा बरं इथे ...झी मराठी चे आय डी पण इथे लपुन छपुन वावरत असतात म्हणे.....ते इथुन आयडीया शोधुन पुढच्या एपिसोड मधे दाखवतात.
मागे पण काही जुन्या सिरीअल ला हा अनुभव आला आहे.. Wink
तुम्ही काहीतरी भारी आयड्या द्या. काही चांगलं पहायला मिळेल Happy

अहो, तसं काही लिहियाचं नव्हतं.. फक्त पुढे काय होणार आहे ते प्रोमो मधे दाखवत आहेत हे बघुन गंमत वाटली. Bw
--------------------------------------
शकू ओम्याला अन रॉकीला घेऊन कुठल्याशा गुरुजींकडे जाताना दाखवली आहे. ती शकूला गाडीतुनच फोन करते अन ओम्याची पत्रीका बघायला गुरुजींकडे जाते असं नलूला सांगते शिवाय स्विटूची पत्रिका घेऊन लगेच निघ अन गुरुजींकडे पोच असं सांगते. ते ऐकून बावचळलेली नलू नेहमीप्रमाणे ओठाला बोटं लाऊन काळजीत पडल्यासारखी पेटंट अ‍ॅक्टिंग करत गुर्जींकडे पोचते. तिथं गेल्यावर गुर्जी ओम्या अन स्विटूची पत्रिका बघतात अन एक्मेकांसाठी फारच पूरक पत्रिका आहेत असं सांगतात. आता या दोघांचं लग्न लागणं किती सहाजिक होईल असं वाटून शिरेल संपते की काय असं आपणाला वाटतं (हे तर पहिले -४-५ भागांपासूनच वाटतंय.. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे आजच्या भागात उद्याच्या भागाची बिजं रोपण्यात शिरेल वाले यशस्वी होत आहेत असंच दिसतंय..!). बघु.. आता दळभद्री नली कुठलं कारण देऊन गुर्जीला तोंडघशी पाडते ते..!! Proud

साळवी अगदी लाचारच दिसायला पाहिजेत का. तो गेट पटकन न उघडण्याचा सीन किती वेळा झालाय आणि प्रत्येकवेळी तेव्हडीच लाचारी. सगळीच माणसं अशी उद्धट असतात का जी गेट नाही पटकन उघडलं म्हणून ओरडतात आणि नोकरीवरून काढायची धमकी देतात. साळवी पण काही कमी नाहीत. कितीही अपमान झाला तरी त्याच चुका परत करणार, तीच नोकरी करणार आणि आहे त्या परिस्थितीत आनंद मानणार. अजून एक प्रोमो बघितला ज्यात झोपाळ्यावर बसून स्वीटू ओमला सांगत असते की मला इथे अगदी आपलेपणा वाटतो Uhoh तायडी जो घसा फोडून येता जाता अपमान करत असते तो सगळा वायाच जातो म्हणायचा.

हो ना.. अगदी अगदी.
साळव्यांसारखं स्थळ खानविलकरांना अन खानविलकरांसारखं स्थळ साळव्यांना मिळणं दुरापास्त आहे.. दोन्हिकडचे एकमेकांसाठीच जन्माला आलेत की काय असं वाटत रहातं. ओम्या-स्विटूचं लग्न झालं की लगेहात रॉकी-मोमोचं अन तायडा-मोहितचं लग्न लावायला हवं.. म्हण्जे नलू-शकू तीर्थयात्रेला जायला मोकळ्या.. म्हणजे बाबा साळवी अन बाबा खानविलकर दोघे मिळून दिवाणखाण्यात रंगीत सरबत अन चकणा खाताना गप्पा मारत बसलेले दिसतील.

Pages