झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावत्र प्रकरण असावं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे.>> तसं दाखवलं असतं तर ते पटण्यासारखंपण होतं. पण परवा शकूबाई म्हणाल्या:" तुला जन्म दिला आहे मी तायडे." त्यामुळे सावत्र नाहीये.

हिरविणीच्या अभिनयाची बोंब आहे. साळवींच्या रडगाण्याचा कंटाळा आला आता.

लेखकाने लगेहाथ शकूबाईंनी तायडीला तिच्या खर्‍या आईच्या तावडीतून वाचवून (तायडी इतकी खवीस आहे म्हटल्यावर तिची खरी आई किती पोचलेली असेल हे मालिका बघणार्‍याला स्वप्नात देखील पटेल..!) मानसिकरित्या म्हणजे यशोदामाते सारखा सांभाळ करून जन्म वगैरे दिला असेल असं काहिसं दाखवलं पाहिजे. Biggrin

कदाचित शकुच्या बाळंतपणावेळी नर्सने खर्‍या मुली ऐवजी चुकून दुसरीचीच मुलगी मालविका म्हणुन ठेवली असेल अन तिला शकुने न ओळखता सांभाळले असेल. किंवा कावळीच्या घरट्यात कोकिळेने अंडी घालून पिल्लु जन्माला घातलं असंही दाखवलं तरी ते पटेल.. पण मालविका ही शकुची मुलगी असेल असं आजिबात म्हणाजे आजिबात वाटत नै..!

साळवींच्या रडगाण्याचा कंटाळा आला आता.>> सकाळी सकाळी ३०० चपात्या लाटून तव्यावर कशाबशा उलट्यापालट्या करून दारात आलेल्या गिर्हाईकाच्या हातात आदळल्या की घरात टी.व्ही. नसणार्‍या साळव्यांना दिवसभर रडण्या-भेकण्याशिवाय चांगला उद्योग असु शकतो का..??? तरी बरं त्या माठ काकुला दम्याचा विसर पडलाय..! (अंबरनाथची हवा अचानक शुद्ध-बिद्ध झाली की काय..???)

स्वीटु ने एक हिसडा मारला असता तर पडला असता तो सुशील.. >>>>>> अगदी अगदी. पण ओम डॅशिन्ग वाटला ह्या सीनमध्ये. आणखी एक सीन होता तो क्लबमधला 'डोण्ट वरी मी आहे ईथे' वाला तो सीन चान्गला झाला.

बाकी आदिती सारंगधर ने ओम ला गुंडाळण्यासाठी केलेला अभिनय सुंदर. >>>>>>>> अगदी अगदी. पण मला एक कळत नाही ही भावाबाबतीत एवढी अटॅच्ड, इमोशनल असून आईशी 'मागच्या जन्मीची शत्रू' असल्यासारखी का वागते?

रॉकीचा गुण्डाचा अभिनयही चान्गला झाला होता.

पण वयाने मोठ्या असलेल्या तायडीच्या आधीच ओम्याचं लग्न लावायचा प्रकार काही खपत नाही. >>>>>>>> गेला तो जमाना आता.

आज एका चॅनेल वर टाईमपास सिनेमा चा थोडा भाग पाहिला, त्यात स्वीटू , हिरॉईन ( कुपोषित , बारकुड्या दिसणार्‍या) ची मैत्रीण होती. दोन मिनिटाच्या वर पाहू शकले नाही

हो.. हो.. त्यात आहे ही स्विटू. फुलपाखरू छान किती दिसते गाण्यात त्या कुपोषित, बारकुड्या हिरवीणीच्या सोबतीने नाचताना दिसते.

स्वीटू आणि अक्षया नाईक ( सुन्दरा मनामध्ये भरलीची हिरवीण) छान डान्सर्स आहेत. अक्षयाचा युटयुबवर चॅनेल आहे.

स्वीटू सिरियलच्या टायटल सॉन्गमध्ये आणि ' पिया तोसे' गाण्यावरसुद्दा मस्त नाचलीये.

रॉकीचं हिंदी/मराठी बोलणं किती अदबशीर आहे, छान गोड वाटतं ऐकायला >>>>>++++++१११११११११

गरीब आहेत आणी लाचार लोचट आहेत. सुट्टे पैसे पण घेऊन गेलीच घरी. परत तिथेच रहाणार खाणार असेलच. इतकं कोणी सहन करत नसतं. सारासार विचारबुद्धी गहाण टाकलेय

हो ना. इतकं कोणी ऐकून घेत नाही. साळवी त्या दुकानात जातात ऑर्डर घेऊन आणि तिथे तो निखिल का कोण तो त्या पिशवीत झुरळं टाकतो, काहिच्या काही सीन होता तो. साळवीच्या चेहऱ्यावरची लाचारी तर बघवत नाही. तिथे ऑफिसमध्ये ओम आणि ती जोजो का मोमो एकच केबिन वापरणार. स्वीटूने ओमसर आणि मालविका मॅम म्हणायचं. स्वीटूच्या चेहऱ्यावर पण वडिलांना लाजवेल अशी लाचारी. कपडे तर भारी भारी घालते स्वीटू.

स्वीटू चा पगार झाला का? मला बघवेना ते आई फोन करते आणि विचारते ते. तो काकाचा पोरगा सर्व रिजेक्टेड माल बारक्या पिशव्यात भरून बार मध्ये चकणा म्हणून विकून येइल बहुतेक.

झी वाल्यांची ऑफिस ची कल्पना नक्की काय आहे! मोमो सर्व सामान घेउन का येते ऑफिसात. मेक अप किट आय मॅक असल्याच्या उत्साहात उघडलेले होते.

ते हिशेब करायची नक्की पद्धत काय आहे? दोन शुन्य शुन्य असे का बोल ते काकू

काकू माठ असते त्यामुळे ती तसं दोन शुन्य शुन्य म्हणात असेल. काकुने १०० रुपयांचा हिशेब चुकवलाय तर किती त्रास करुन घेतेय जिवाला... आधिच दम्यामुळे उसउसत जगतेय त्यात एवढं मनाला लाऊन घेतलं. जमत नै तर कशाला घेणं देणं बघायचं ना... गप आपलं भांडी घासत बसायचं तर निघाली हजारांची बिलं काढायला.

चिल्लरचा सिन प्रीकॅप मधे पाहिला.. आजच्या भागात साळव्यांच्या घरी पाऊस पडणार म्हणायचा Uhoh

मालविकेचं लग्न झाल्याशिवाय साळव्यांना बरकत येणं मुश्किल आहे रे बाबा..!! मालविका एकदा सासरी गेली कि मग आणि मगच स्विटुला फुल पगार मिळेल असं वाटतंय.

नायतर काय
आई मैत्रिणी ची मुलगी म्हणून घरी रहायला ठेवून घेते अन पोरगी 7000 rs रहायचे आणि 1200 rs मिनरल वाँटर चे कापून घेते

@अमा-- पूर्ण 100 rs इतका पगार मिळाला स्वीटू ला, अन पाकीट भरलेले वाटावे म्हणून चिल्लर भरुन दिली शंभर rs ची

नशीब ओम्या अंबरनाथला वेळेत पोचला अन साळव्यांची फेफे वाचवली. त्या महामाठ सुद्रुढ चिन्याला पोलिसांनी का पकडले अन त्याच्या कडून उरलेला चकणा का काढुन घेतला हे काही कळाले नाही (मधेच लाईट गेली म्हणुन..!)

नलीला पुन्हा एक्दा भिकेचे डोहाळे लागणार आहेत हे कालच्या प्रीकॅप मधे दिसले. आज १ तासांचा महाएपिसोड आहे म्हणे यांचा.

ती स्वीटू ओम्यावर का सारखी खेकसत असते? एवढा तोरा पगार घेताना त्या मालविकाला दाखवयचा ना?

ओम्याकडुन पैसे घेते. देणी भागवते. आणि मग त्याला झापते. एवढा स्वाभीमान आहे तर बाणेदारपणे पैसे घ्यायला नकार दे ना.

आणि तिच्या मठ्ठ घरच्यांचा पण विश्वास बसतो की मुलगी पगाराच पाकीट हापिसात विसरून आली?

तिच्या मठ्ठ घरच्यांचा पण विश्वास बसतो की मुलगी पगाराच पाकीट हापिसात विसरून आली?>> दळभद्री अन महामाठ साळव्यांना पगाराच्या पाकिटातल्या नोटा छपाईसाठी वेळ लागला असं कारण दिलं असतं तरिही पट्लं असतं..!

कुठे ऐकता हे भाग..?

अमेरिकन मुलगा हातचा गेला गेला नाही.. हातची मुलगी जाता जाता राहिली याचा साक्षातकार साळाव्यांना झाला असं दाखवलं.

हे मी वीकेंडला कॅच अप करेन. सध्या रोज अर्धा तास अरु अन्या संजना इशा यश हे ते बघणयत जातो सकाळी चहा टोस्ट. बरोबर. ओम्या क्यु ट आहे.

खानविलकर आणि साळवी कोणत्या काळात आहेत.
ऑनलाइन चा जमाना असतात असा कॅश मध्ये पगार कोण देत आजकाल . छोट्यातले छोटे ऑफिसेस सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देताना बँक ट्रान्स्फर करतात. खानविलकर तर मोठ्ठा बिझनेस वाले ना. तिकडे फायनान्स वगैरे काही डिपार्टमेंट आहे की नाही.. का तो मोहित च ऑल इन वन माणूस आहे ?
काहीहीही दाखवतात .
लिमिटेड एडिशन तीन लाखाचं घड्याळ ??? बाबारे..
एवढा बावळटपणा असून पण ही सीरिअल ओम साठी अधून मधून पळवत बघते मी. Cute अँड handsome आहे तो Happy

बाकीच्या स्टाफचा पगार बँक ट्रान्सफरनेच झाला. त्यांना एसेमेस आलेले दाखवले. स्वीटुला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची होती म्हणून कॅश.

श्रीमंत मालविका कायम त्याच दोन-तीन ड्रेस्स मधे दिसते ! शुभांगी गोखले कुठल्याही भुमिकेत तोच अभिनय करतात. सोशिक, समजुतदार, प्रतिप्रश्न न करणारी व्यक्तिरेखा. तेच हावभाव आणि हतबलता.

म्हेवणे.. म्हेवणे.. म्हेवण्यांचे पाहुणे... आडनावं पाहून अन् नातीगोती, जात पात बघून क्रीम ओरपयला येणाऱ्यांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार आपण. असो.

आज मालविका तिच्या आईला मिसेस खानविलकर का म्हणते त्यामागचं फुटकळ कारण कळलं.

स्विटूला एका क्लायंट समोर प्रेझेंटेशन द्यायचं असतं म्हणून ती आशीर्वाद घ्यायला घरी हंबरणाथ ला फोन करते. ही आनंदी बातमी बाबा साळव्यांना फोन लाऊडस्पिकर वर करायला लावून घरच्यांचा आशीर्वाद मागते. दळभद्री चापतीवाले साळवी तिला आशीर्वाद देणार म्हटल्यावर तिचं प्रेझेंटेशन कसं झालं असेल हे सांगण् वेळ वाया घालवण्यासारखंच आहे म्हणा Proud

एवढा श्रीमंत मुलगा पटवायचाय म्हणून एवढा अपमान सहन करतेय स्वीटू असा मेसेज जातोय ह्यातून. कारण गरीब मुलगी असा अपमान, चोरीचा आळ सहन करून तिथेच दात काढत थालीपीठं थापत रहाणार नाही. स्वाभिमान विकुन खाल्ला वाटतं साळव्यांनी साखर तांदुळ संपले असतील तेव्हा.

कामत रागावून गेलेला असतो ना, तो परत कसा येतो. ते रिसॉर्ट कोणाचं असतं. स्वीटू त्याला कशी पटवून देते. ब्रेकनंतर उशिरा लावल्यामुळे मध्ये मध्ये मीस झालं.

Pages