पुन्हा एकदा महिला दिन...

Submitted by नानबा on 8 March, 2021 - 04:22

ती आपली भाकरी स्वतः कमवेल. (ते करत नसतानाही ती त्या भाकरीच्या किमतीहून अधिक कष्ट घरात घेत असते ह्याची जाणीव तिला असेल.)
ती साडी नेसेल, दागिने घालेल वा तिला त्यांचा तिटकारा वाटेल.
ती लग्न करेल, पण तिला मुलं नको असतील किंवा
कदाचित तिला लग्न नको असेल - पण मुले हवी असतील - तो तिचा निसर्गदत्त अधिकार आहे असेही तिला वाटत असेल.
ती सणांसाठी पाळी पुढे ढकलणे नाकारेल..
तिला देवाधर्माची खूप आवड असेल किंवा कदाचित तिचा देवावर विश्वास नसेलही...
कदाचित तिला ड्रायविंग येत नसेल किंवा ती कदाचित तुमच्यापेक्षा अधिक सफाईने गाडी चालवत असेल.
स्टॉपलॉसचे गणित कदाचित तिला अधिक उत्तम समजलेले असेल...
तिला कदाचित घरकामाची तितकीच आवड असेल जितकी तुम्हाला.. किंवा नसेलही!
तुम्हा सर्वांकरता रोज सकाळ दुपार संध्याकाळ रांधणे, त्याकरताची सर्व उस्तवार करणे हे तिचेच काम आहे - असे तिला वाटेलच असे नाही.. ज्यांना पोटाला लागते त्या सर्वांचा ह्यात सहभाग असावा असे तिचे प्रामाणिक मत असेल.
ह्यामागचे सत्य जाणून घेऊन तिची चेष्टा उडवू नका..

तिला आपला नवरा आपला गुलाम नाही हे जसे कळते, तसेच आपणही त्याचा गुलाम नाही हे देखील कळले असेल.

ह्याचा अर्थ ती बेजवाबदार आहे असा घेऊ नका.
तिचे प्रेम नाही, ती तुसडी आहे असेही नाही.
शर्ट पँट घातल्याने, नोकरी करण्याने पुरुषांची बरोबरी होते का? नाही ना? मग तिला पुरुषांची बरोबरी करायची नाहिये.
तिला समाजात गोंधळ माजवायचा नाहिये.
बाई म्हणून असलेली गृहीतके नाकारणे ह्याला कृपया गुन्हा समजू नका.

लक्षात घ्या तिला फक्त मोकळा श्वास घ्यायचाय!
तीही एक माणूस आहे.
तिला तुम्ही हवे आहात... साथीदार म्हणून हवे आहात..
ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करेल.
प्रेमाच्या आणि आदराच्या लायक असतील तर तुमच्या नातेवाईकांना ती आपले नातेवाईक मानेल.
तुम्हीही तसेच केलेत तर किती उत्तम होईल!

हे देखील समजून घ्या, की तिचीही काही स्वप्न आहेत, स्वतः च्या आवडी निवडी आहेत.
स्वतःहून घेतलेली जवाबदारी ती उत्तम पार पाडेलच. पण तुम्ही लादलेली जवाबदारी तिला आपली वाटेलच अशी अपेक्षा ठेवू नका.
"ती चुकणारच नाही" असे मी म्हणत नाही. कुठल्याही "माणसाकडून" घडू शकतात अशा चुका तीच्याकडूनही होऊ शकतातच!
कदाचित एखादी "ती" खरेच वाईट, खरेच क्रूर असेलही, काही विघातक करत असेलही - त्याकरता स्त्री म्हणून सूट देऊ नका.
पण स्त्री म्हणून तुम्ही लादलेल्या गोष्टी नाकारल्या म्हणून तीला चेटकीणही ठरवून नका.
केवळ शारिरीक फरकामुळे - तुमच्या कल्पनेतल्या साच्यात तिला बसवू नका.. तिचा घाट तिचा तिला शोधूदेत!
त्याकरता तिच्या हक्काची मोकळीक तिला द्या, इतकेच.

महिलादिनाचा पोळा होऊ नये इतकीच अपेक्षा!

~ शिरीष
------------------------------------------

अनेक गृहीतकांना झुगारून स्वतःच्या स्वप्नांकरता झटणार्‍या , घुंगट झुगारून शेतकरी आंदोलनात सहभागी होणार्‍या, रायफली चालवणार्‍या, कुस्ती खेळणार्‍या, इतर खेळ, साहित्य, शिक्षण, गुंतवणूक ,कला, गणित,भाषा, इतिहास, शास्त्र, युद्ध - आणि इतर अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्‍या सगळ्या महिलांना, रोजच्या आयुष्यात झगडावं लागलं तर ते झगडून आपलं स्वातंत्र्य मिळवणार्‍या - घरातल्या घरातच मिनि क्रांती घडवणार्या सगळ्या बायकांना , स्वतःची मत असणार्‍या बायकांना, कदाचित ह्यातलं काहीही न करताही आपलं स्वत्व शोधणा र्‍या वा ते गवसलेल्या बायकांना आणि बाई म्हणजे आपल्या इतकीच माणूसच आहे , तिला स्वतः च्या आवडी आहेत, स्वतःचे प्रेफरन्सेस आहेत आणि त्याही जन्माने आपल्या इतक्याच स्वतंत्र आहेत हे कळलेल्या पुरुषांनाही स्त्रीदिनाच्या शुभेच्छा!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय.. माणूस म्हणून मानाने जगता यावे एवढीच अपेक्षा आहे खरंतर पण आजूबाजूला पाहिले तर वाटते की we still have a long way to go. थोडं गोंधळायला होतं या एका दिवशी मिळणाऱ्या कोडकौतुकाने.

खरं आहे. महिला दिनाचा पोळा आधीच झालेला आहे. अजूनही नोकरी करणाऱ्या महिला या दिवशी साडी नेसून ऑफिसमध्ये जाणे, मैत्रिणीबरोबर हॉटेलमध्ये लंच आणि दिलंच तर बॉसकडून concession घेऊन घरी लवकर येणे धन्यता मानतात. एकतर त्यांना स्वतःला नक्की काय हवंय हेच माहीत नाही किंवा त्या मागून मागून थकल्या असाव्यात.
आणि घरी असणाऱ्या महिलेला या दिवसाच काहीच वेगळेपण जाणवत नसत, जास्तीतजास्त जवळच्या महिलांना कॉल करून आणि इतरांना व्हाट्सअप वरून शुभेच्छा दिल्या की त्यांचा महिला दिन संपतो.
आई बायको मामी मावशी व्हायच्या आधी मी माणूस म्हणून जन्म घेतलाय असा विचार करणे हे जोपर्यंत महिलांनाच बंडखोर विचार वाटतात तोपर्यंत असेच महिला दिन साजरा करावे लागणार. जेंव्हा स्त्रीच समाजातील स्थान महत्वाचं आहे हे महिला दिन साजरा करून दवंडी पिटुन सांगावं लागणार नाही तो खरा महिला दिन असेल.

>>प्रेमाच्या आणि आदराच्या लायक असतील तर तुमच्या नातेवाईकांना ती आपले नातेवाईक मानेल. तुम्हीही तसेच केलेत तर किती उत्तम होईल!
>>पण तुम्ही लादलेली जवाबदारी तिला आपली वाटेलच अशी अपेक्षा ठेवू नका.

अगदी अगदी.

>>>>>>>>>हे देखील समजून घ्या, की तिचीही काही स्वप्न आहेत, स्वतः च्या आवडी निवडी आहेत.
सुंदर आहे.

महिला दिनाचा पोळा आधीच झालेला आहे >> hmm.. hmm
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आणि वाचकांचे मनापासून आभार!

खरतर हा चावून चोथा झालेला विषय आहे. पण माझ्या आजूबाजूला
मध्यम व य ई न स्त्रियांमध्ये या विषयावर जे जोरदार रिग्रेशन झालेले दिसते ते फार भयावह वाटते त्यामुळे राहवलं नाही.

जोवर बदल घडत नाही तोवर चावून चोथा झाला तरी विषय चघळावाच लागतो. लिहीलंस ते चांगलं केलं. 'रिग्रेशन' घडले असे का वाटले हे थोडेफार लिहीले तर बरे पडले असते. (विशेषतः करोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर.)

खरे तर बदल झाल्यावरही असे विषय चघळावे लागतात. नखे रविवारी कापली तरी सोमवार पासून वाढायला सुरुवत होते.

>>>>>खरे तर बदल झाल्यावरही असे विषय चघळावे लागतात.
करेक्ट! चोथा बिथा काही नाही. आजही तितकीच गरज आहे.

लेख आवडला. महिला दिनाच्या शुभेच्छा.

<< खरंय.. माणूस म्हणून मानाने जगता यावे एवढीच अपेक्षा आहे खरंतर पण आजूबाजूला पाहिले तर वाटते की we still have a long way to go. थोडं गोंधळायला होतं या एका दिवशी मिळणाऱ्या कोडकौतुकाने. >>
----- सहमत.

फेसबुकवर इथल्याच एका माजी सदस्यांची हि उपरोधिक पोस्ट:

जेंव्हा ते सांगत असतात की 'स्त्रीने चूल आणि मूल यावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे' तेंव्हा ते एक मुलामा दिलेलं विधान असतं.
प्रत्यक्षात त्यांना सांगायचं असतं की, 'बाईने ताट आणि खाट इतकंच विश्व मानावं.'
पण हिंमत होत नसते थेट सांगण्याची... #womensday_fact

खूप विचार करायला लावला या पोस्टने. वाचल्यावर हे आपल्या सुशिक्षित समाजात घडत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आंधळे आहात. नवऱ्याने बहाल केलेल्या चाकोरीबद्ध स्वातंत्र्यातुन वेळ काढून नवर्याच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परवानगीने गेट टुगेदर, एखादे ड्रिंक, कधीतरी पार्टी वगैरे करण्यापुरते स्त्रीस्वातंत्र्य भोगणाऱ्या उच्चमध्यमवर्गातील बायकांना सुद्धा हेच ताट आणि खाट सुटत नाही.

चांगल्या शिकल्या सावरल्या घरातल्या अगदी डॉक्टर इंजिनिअर वगैरे झालेल्या मुलीसुद्धा ताट आणि खाट हेच आपलं विश्व मानतात तेव्हा किंवा येते. ते तसं असूच नये असं मी म्हणत नाही, पण न लढताही हे जोखड मर्जीने वाहून नेण्यात, आमच्यावर हे लादलं नाही, आम्ही स्वत:हुन असं आयुष्य जगतोय अशी स्वतःचीच समजूत घालून जगणं जास्त वाईट!

छान लिहिलं आहे.
विकु +१.
आम्ही तर स्त्रियांना आमच्यापेक्षा श्रेष्ठच मानतो वगैरे पोकळ संवाद कालही पहाण्यात आले. आणि महिलादिना निमित्त महिलाच तर घरात बॉस आहे पुरुष दीन आहे वाले टिपिकल विनोद? सुद्धा.

थोडे अवांतर - इथे बऱ्याचदा एकमेकांवर डूआयडी आहे वगैरे शेरे मारले जातात तर मला असा वाटते की खऱ्या नाव-गावासकट जे लिहितात ते सोडले तर आपण सर्व डुआयडीच आहोत. फक्त बाब्याने बाईचा आणि बाईने बाब्याचा आयडी धारण करू नये ही माफक अपेक्षा. महिलादिनाच्या निमित्ताने हे कालच रात्री टायपायचे होते पण झोपून गेलो तसाच म्हणून आज Proud

नवऱ्याने बहाल केलेल्या चाकोरीबद्ध स्वातंत्र्यातुन वेळ काढून नवर्याच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परवानगीने गेट टुगेदर, एखादे ड्रिंक, कधीतरी पार्टी वगैरे करण्यापुरते स्त्रीस्वातंत्र्य भोगणाऱ्या उच्चमध्यमवर्गातील बायकांना सुद्धा हेच ताट आणि खाट सुटत नाही. >> प्रत्यक्ष or अप्रत्यक्ष परवानगी म्हणजे?? Doesn't that fall into being answerable to each other? Genuine question..

हो आणि काल आणखी एका गोष्टीचा वीट आला. गार्गी मैत्रेयी कात्यायनी वगैरे तेच तेच उल्लेख आणि आम्ही किती महान होतो ह्याचा अभिमान. वेदांना आता कमीत कमी साडेतीन हजार वर्षे होऊन गेली. (हा कमीत कमी काळ आहे. एरवी वेदकाळ कितीही मागे खेचू शकलो आहोत आपण. अगदी एक लाख वर्षांपर्यंतसुध्दा! Lol ) मध्ये काहीच घडले नाही? सगळे जैसे थे होते?

खरे तर बदल झाल्यावरही असे विषय चघळावे लागतात. नखे रविवारी कापली तरी सोमवार पासून वाढायला सुरुवात होते.
>>> खरंय

https://www.fastcompany.com/90612162/burger-king-incites-rage-for-tweeti...

मध्ये काहीच घडले नाही? सगळे जैसे थे होते?>>>> अगदी अगदी झाले.तसेच आपले पूर्वज कित्ती कित्ती हुशार होते.सग्गळे सग्गळे त्यांना माहित होते.याचाही वीट आलाय.

खरे तर बदल झाल्यावरही असे विषय चघळावे लागतात. नखे रविवारी कापली तरी सोमवार पासून वाढायला सुरुवात होते. >> ह्म्म. खरय! आणि जिज्ञासा म्हटल्याप्रमाणे - आपल्याला खूप अंतर जायचय!

https://www.fastcompany.com/90612162/burger-king-incites-rage-for-tweeti... >> कहर आहे!

ते तसं असूच नये असं मी म्हणत नाही, पण न लढताही हे जोखड मर्जीने वाहून नेण्यात, आमच्यावर हे लादलं नाही, आम्ही स्वत:हुन असं आयुष्य जगतोय अशी स्वतःचीच समजूत घालून जगणं जास्त वाईट! >> अगदी अगदी.. कंडिशनिंग आणि खर्‍या इच्छा ह्यातला फरक कळायला हवा!

आम्ही तर स्त्रियांना आमच्यापेक्षा श्रेष्ठच मानतो वगैरे पोकळ संवाद कालही पहाण्यात आले. आणि महिलादिना निमित्त महिलाच तर घरात बॉस आहे पुरुष दीन आहे वाले टिपिकल विनोद? सुद्धा. >> हे सेम लोक बायकांवरचे बंडल फारसे विनोदी नसलेले बायकांवरचे, लग्नावरचे, पुरुषांच्य बिचारेपणा वरचे जोक्स मारत असतात.

जोवर बदल घडत नाही तोवर चावून चोथा झाला तरी विषय चघळावाच लागतो. लिहीलंस ते चांगलं केलं. 'रिग्रेशन' घडले असे का वाटले हे थोडेफार लिहीले तर बरे पडले असते. (विशेषतः करोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर.) >> नाही करोना नाही, हे आधीपासूनच आहे..

करेक्ट! चोथा बिथा काही नाही. आजही तितकीच गरज आहे. >> खरे य.. क्लिशे ह्या अर्थाने म्हणाले..

सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे मनापासून आभार!

प्रत्यक्ष or अप्रत्यक्ष परवानगी म्हणजे?? Doesn't that fall into being answerable to each other? Genuine question.. >> मला इंग्रजी फारसे कळत नाही, उत्तर प्रश्न तोडून देतो:

प्रत्यक्ष or अप्रत्यक्ष परवानगी म्हणजे?? >> म्हणजे "माझ्या नवऱ्याने मला अमुक तमुक करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे"; "आमच्या घरी चालतं" etc etc ..

मला जे करायचे आहे ते मी करू शकतो, त्यासाठी मीच accountable + रिस्पॉन्सिबल आहे, आणि कुणालाही answerable नाही>> खरे स्वातंत्र्य..

being answerable to each other? Genuine question..>> हे माझ्या पाहण्यात तरी one way च चालतं. पुरुषांनी स्त्रीला प्रश्न करणे, स्त्रीने त्याला समाधानकारक उत्तर देणे.

पुरुष फारफारतर आपण काय करून आलो आहोत हे एखाद्या वेळी सांगतात, तेही डोक्यावरून पाणी गेलं तर! जेव्हा पुरुष ज्या अधिकारवाणीने वागतात त्याच प्रकारे स्त्री पुरुषाला प्रश्न करू शकेल तेव्हाच ते being answerable to each other म्हणता येईल.

पुरुष फारफारतर आपण काय करून आलो आहोत हे एखाद्या वेळी सांगतात, तेही डोक्यावरून पाणी गेलं तर! जेव्हा पुरुष ज्या अधिकारवाणीने वागतात त्याच प्रकारे स्त्री पुरुषाला प्रश्न करू शकेल तेव्हाच ते being answerable to each other म्हणता येईल.>> अगदी बरोबर, नुसते प्रश्न विचारून पण नाही ,त्याचं उत्तर genuine आणि योग्य टोन मध्ये द्यायला हवं.

ऑफिस मधील HR Newsletter साठी महिला दिना साठी writeup हवा होता. मी न रहावुन खालील रिप्लाय पाठवला. newletter मध्ये पब्लिश करणार नाही याची खात्री होतीच. सरप्रायसिंगली मी पाठविलेला मजकूर HR Newsletter मध्ये पब्लिश झाला Happy
नानबा ने लिहिलेले आवडले म्हणून पोस्ट करावेसे वाटले
-------------------------------------------------------------------------
Too wierd it might seem, but I tried questioning the artificial techo-god, Google the savior, the meaning of a woman. Having surfed most of the searched pages, to my surprise I could find only one answer "Woman is a female human being".

Such an unornamented answer, was indeed appaling to my mind, which expected answers like "Woman an epitome of strength" ; "Woman the goddess of Love and care " ; Woman the homemaker, the caretaker and all the adjectives that have been bestowed upon us women since ages.

‎I do not refute the fact that these adjectives for us woman are indeed true. What sets me pondering is the reason for adorning these adjectives. Is it appreciation towards her, is it gratitude for her or is it just a way to put onus of these responsibilities in disguise, solely on her.

‎In our society values of strength and tolerance are ingrained in every woman of tomorrow. To what extent is this inculcation attributed for her seemless survival. Or does it somewhere subtly presume that at every step in life someone else will test her strength and demand a tolerance always from her.

Yes, we women are gracious. But do not make us goddesses. Cause when you make us one, you are upset to go empty handed. Let us remain as human beings. We just need each day as an ordinary being, and not once a year woman's day.
-------------------------------------------------------------------------

Pages