भास मनाला मोहरल्याचा

Submitted by निशिकांत on 5 March, 2021 - 10:51

मृगजळ आले आव घेउनी जल असल्याचा
क्षणेक झाला भास मनाला मोहरल्याचा

तुझी आठवण सखे तुझ्याहुन किती चांगली !
तू गेल्यावर मनात असते तिची सावली
ती देते आनंद मनी तू वावरल्याचा
क्षणेक झाला भास मनाला मोहरल्याचा

तहानलेल्या कैक कपारी हृदयामधल्या
आभासी चाहूल ऐकुनी जरा बहरल्या
वसंतासही प्रत्यय आला शहारल्याचा
क्षणेक झाला भास मनाला मोहरल्याचा

"तू नही तो और कही" का सोपे असते ?
पहिल्या प्रेमाच्या गुंत्यातुन सुटका नसते
"मनात कोणी मिठीत कोणी" काच गळ्याचा
क्षणेक झाला भास मनाला मोहरल्याचा

पीळ नसोनी रेशिमगाठी घट्ट घट्ट का?
ना सुटल्या तर, तोडायाचा उगा हट्ट  का?
तू गेल्याने कुंभ मिळाला वैफल्याचा
क्षणेक झाला भास मनाला मोहरल्याचा

क्षण जे होते सुखावणारे तेच काचती
आठवणींची नग्न होउनी भुते नाचती
त्रास केवढा! पाश गळ्याला करकचण्याचा
क्षणेक झाला भास मनाला मोहरल्याचा

अंधाराशी नाते आता जुळले आहे
तुझ्या सावलीचे सावटही टळले आहे
शाप मला दे देवा आता स्मृतिभ्रंशाचा
क्षणेक झाला भास मनाला मोहरल्याचा

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता आहे. संगीत बद्ध ही क रता येइल व्हिडीओ करता येइल आता नियमित वाचत जाईन तुमच्या कविता.