गोलकीपर

Submitted by बिपिनसांगळे on 27 February, 2021 - 11:10

गोलकीपर
( बालकथा - मोठा गट )
---------------------------------------------------------------------------------------------
“ यश , तुझ्या सरांचा फोन आहे,” बाबा म्हणाले.
आणि यश दचकलाच. हो ना. सरांचा फोन म्हणजे आश्चर्य, भीति, गंमत सारंच. तेही रात्रीच्या वेळी .
पाय चोळत यश बेडवर बसला होता . टीव्हीवर फुटबॉलची एक मॅच पहात. तो उठून बाबांकडे गेला.
“ अहो सर - पण सर, “ बाबा व्याकुळतेने बोलत होते. यशला काही कळत नव्हतं.
“ एक मिनीट, “ बाबा सरांना म्हणाले आणि त्यांनी यशला विचारलं, “ सर विचारताहेत, फायनल खेळू शकशील का ? “
दुसऱ्या सेकंदाला यश ‘ हो ‘ म्हणाला.
किडकिडीत यश त्यांच्या शाळेच्या फूटबॉल टीमचा गोलकीपर होता. एकदम भारी. तो असला की पोरं निर्धास्त.
अन् - आंतरशालेय स्पर्धा चालू होत्या. पण सेमी फायनलच्या आधीच, यश प्रॅक्टिस करताना पडला होता. त्याचा पाय दुखावला होता. डॉक्टरांनी आठवडाभर खेळायची मनाई केली होती.
यशच्या ऐवजी आर्यन गोलकीपर झाला होता. खरंतर आर्यन फॉरवर्ड होता. प्रतिस्पर्ध्याच्या गोलपोस्टजवळ खेळणारा खेळाडू . पण काय करणार ? तरी यशची शाळा सेमी फायनल जिंकली. फायनल दोन दिवसांनी होती .... आणि - आर्यनला डेंग्यू झाला.
आता यशच्या शाळेकडे चांगला गोलकीपरच नव्हता. कोणालातरी असंच उभं करावं लागणार होतं. म्हणून यशच्या सरांनी नाईलाजाने बाबांना फोन केला होता.
सर म्हणाले, “ तोच आमचा खरा गोलकीपर आहे. त्याचा पाय तर आता बरा आहे ना.”
बाबा किचनकडे पळाले. आईचा सल्ला घ्यायला. आईला यशची स्थिती माहिती होती. तो खेळू शकला असता. त्यामुळे आईने ‘ हो ‘ म्हणल्यावर बाबांना गप्प बसावंच लागलं होतं. फूटबॉलमध्ये ‘ रेड कार्ड ‘ मिळून शिक्षा झालेल्या खेळाडूसारखं.
आता प्रश्न एकच होता ! .... पूर्ण आठवडा यश मैदानावर गेला नव्हता. खेळला नव्हता. प्रॅक्टिस शून्य ! अशा वेळी - तो फायनलला कसा उतरू शकणार होता ?
दुसऱ्या दिवशी सकाळी यश फूटबॉलच्या मैदानावर पोचला. थंडीचे असले तरी प्रसन्न दिवस होते. मैदानावर वारं होतं. त्यामुळे जास्त गार वाटत होतं . गवताचा वास येत होता. तो वास यशला आवडायचा. तो वास आल्यावर त्याच्या अंगात खेळण्याची पुरी सुरसुरी यायची.
यशच्या अंगातली जर्सी गडद निळ्या रंगाची होती. त्याला खूप आवडायचा तो रंग. समोर पोपटी जर्सीतला चैतन्य उभा होता. तो विवेकानंद शाळेचा ‘फॉरवर्ड ‘ होता. स्ट्राईक करणारा खेळाडू. चैतन्य जणू हुकमाचा एक्का होता. तो जणू चैतन्याने सळसळत होता. तो त्याच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी यशकडे बघत होता.त्याची नजर कायम रोखल्यासारखी वाटे - भेदक !
आताही तो असाच बघत होता - कधी एकदा तुला चकवतो आणि गोल करतो, असं. अन् - त्याला कळलं होतं की .... यश फिट नाहीये.
यशचं टिळक हायस्कूल आणि विवेकानंद शाळा यांची नेहमीच ‘ टफ फाईट ‘ असायची. यशची पाठ पाटील सरांनी थोपटली. त्यांच्या डोळ्यात काळजी होती आणि विश्वासही.
मैदान मुलांनी नुसतं फुलून गेलं होतं . रंगीबेरंगी कपड्यांची जत्राच जणू. आरडाओरडा ,शिट्ट्या अन आरोळ्या !
खेळाला सुरवात झाली. थोडासा पाय दुखतोय, हेसुद्धा यश विसरून गेला. मुलांचा एकच गलका चालला होता. प्रत्येकजण आपापल्या शाळेला चिअरअप् करत होता. चैतन्य संधीची वाटच पहात होता. आणि त्याला ती मिळाली - पेनल्टी किक्. त्याने गोल करण्यासाठी सुरेख किक मारली ; पण हाय ! तो बॉल यशच्या हातात होता. नो गोल !
फर्स्ट हाफ झाला. पंचेचाळीस मिनीटं. पण - एकही गोल झालेला नव्हता. भोपळा फुटत नव्हता. कारण ? - दोन्ही गोलकीपर. दुसरं काय ?
ब्रेक संपला. अटीतटीची चुरस सुरु झाली. पुढची पंचेचाळीस मिनीटं आणि गोल ? - शून्य ! मुलंच नुसती गोल - गोल पळत होती. आर्यन तर खेळायला नव्हताच. पण सिद्धांत आणि हर्षवर्धनचा स्ट्राईक कमी पडत होता. तिकडे विवेकानंद शाळेच्या चैतन्य आणि बिलालचंही तेच.
समोरच्या टीमचा फॉर्म चांगला होता. पण यश सगळे गोल अडवत होता .- आश्चर्यकारकरित्या . मॅच बरोबरीत सुटली होती.
टाय !
मग जास्तीचा वेळ देण्यात आला. सिद्धांत आता खूप टेन्शनमध्ये खेळत होता. त्याने बिलालला ढकललं. रेफरींनी सिद्धांतला यलो कार्ड दाखवलं. अख्खं टिळक हायस्कूल टेन्शनमध्ये. जास्तीच्या वेळात फक्त एवढंच घडलं होतं - आता ?
पेनल्टी शूट - आऊट !
प्रत्येक टीमला पाच पेनल्टी किक मारण्याची संधी. दोन्ही टीमला आलटून पालटून. पण थेट संधी. आता खेळ फक्त नेटमध्ये येणारा बॉल आणि गोलकीपर यांचाच. चुरस फक्त त्यांचीच !...
विवेकानंदचा गोलकीपर तनिष पण तोडीस तोड होता. पहिली संधी टिळक हायस्कूलची होती. दोन्ही टीमच्या पहिल्या तीनही पेनल्टी वाया गेल्या. मात्र चौथ्या पेनल्टीला सिद्धांतने गोल केला. पहिला गोल ! टिळक हायस्कूलच्या पोरांनी एकाच गलका केला .
मग आला बिलाल. त्याने जोरदार , सरळ बॉल मारला. खूप वेगाने. तो बॉल यशने अडवला- पण नेमका दुखऱ्या पायाने. गोल वाचला पण पाय दुखावला .
टिळक हायस्कूलच्या हर्षवर्धनची पाचवी किक वाया गेली .
आता विवेकानंद शाळेची पाळी होती. पूर्ण भिस्त यशवरच होती. - आणि त्याचा पाय ? - आणि त्याची प्रॅक्टिस ? इतका वेळचा त्याचा आत्मविश्वास, त्याचा खेळ जणू गायब झाला. पण क्षणभरच. मग तो सावरला. तो काहीतरी आठवत होता. - काय असावं ते ?...
आता शेवट- चैतन्य !... आणि त्याचा गोल झाला तर बरोबरी आणि नाही झाला तर ? - जिंकण्याची संधी.
चैतन्य हुशार खेळाडू होता. त्याने टिपलं होतं, यशचा पाय दुखावलाय. त्याने बॉल हवेत उंच उडून जाळ्यात पडेल अशी किक मारली. यशला तशी उडी मारून गोल अडवणं अवघड जाईलशी !
सगळ्यांचे श्वास रोखले गेले. झालं- संपलं सारं ! पण - पण यशने तो अवघड गोल वाचवला. त्याच्या दुखऱ्या पायांनी ‘ लय मोठी ‘ उडी मारली होती. हवेतच बॉल हातात धरून तो जमिनीवर पडला. लोळता झाला.
यशच्या सगळ्या मित्रांनी एकाच जल्लोष केला. मैदान दणाणून टाकलं . सरांच्या डोळ्यांत तर पाणीच आलं. ते पाठ थोपटायचीही विसरले. पण ते काम त्याच वेळी सुटलेल्या वाऱ्याने केलं . त्या वाऱ्याने मैदानावरची अशोकाची झाड सळसळली. जणू तीही टाळ्या वाजवत होती.
यश तर हिरोच झाला होता . मुलांनी त्याला उचललं .
रात्री - आजी यशच्या पायाला तेल चोळून देत होती. त्यावेळी बाबांनी विचारलं - “ अरे राजा ,तू हे जमवलंस कसं ? आठवडाभर प्रॅक्टिस न करता ? “
मग यश बोलता झाला - “ मला प्रॅक्टिस नव्हती. म्हणून टेन्शन आलं होतं . मग मी काल लवकर झोपलो. आठवतंय ? डोक्यावर पांघरूण घेतलं. त्या ब्लँकेटच्या आत जणू माझं फुटबॉलचं मैदान होतं . मग मी मनाने हजार वेळा- हो हजार वेळा, बॉल अडवायचा सराव केला. एकही गोल माझ्या नजरेतून, पकडीतून सुटत नव्हता. डावा-उजवा, आडवा- तिडवा, वरून- खालून. तीच माझी प्रॅक्टिस होती. माझ्या डोळ्यांसमोर मी स्वतःच खेळत होतो. माझ्या मनातच जणू फायनल सुरु होती...”
“ पण बाबा रे, परीक्षेची प्रॅक्टिस अशी ब्लँकेटच्या आत करू नकोस हं ! “ यशची मोठी बहीण शर्वरी गंमतीने म्हणाली. त्यावर सगळे खो-खो हसले.
त्यावर यश फुरंगटून , डोक्यावर ब्लॅंकेट घेऊन , झोपण्याचं नाटक करत पडून राहिला .
---------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त कथा..!!
माझा मुलगा एरव्ही फुटबॉलबद्दल बरचं सांगत असतो; पण मला काही एवढं कळत नाही त्यात. पण ही कथा मात्र मन लावून वाचली. तुमची ही फुटबॉलवरची कथा त्याला नक्की वाचायला देते. त्याला नक्की आवडेल.

रुपाली
मलाही फुटबॉल मधलं फारच थोडं कळतं ....
पण माझ्याही मुलाला फुटबॉल फारच आवडतो
त्याच्या बोलण्यातून , माहितीतून आणि कल्पना यामधून ही गोष्ट लिहीली आहे .
गोष्ट वाचक कशी स्वीकारतील माहिती नव्हतं , पण आवडली आहे असं वाटतंय , याचा आनंद आहे .
आपल्या मुलाला कथा कशी वाटली ?
तो काय वयाचा आहे ?
कळावे

बिपिनजी, तुमची कथा छानच आहे. माझा मुलगा अकरा वर्षाचा आहे. त्याला खेळाची खूप आवड आहे. विशेषतः फुटबॉलची जास्त आहे. त्याला मी कथा वाचून दाखवली कारण मराठी विषय यावर्षी त्याला नवीन आहे. मराठी वाचता येतं पण काही शब्द कळायला कठीण जातं. मग मी सुद्धा माझा त्रास वाचवायला त्याला कथा वाचून दाखवली.
कथेचा विषय त्याच्या आवडीचा असल्याने कथा आवडलीच. ज्यादिवशी तुम्ही कथा पोस्ट केलीत त्याच दिवशी योगायोगाने त्यांच्या शाळेची टीम फुटबॉल टूर्नामेंट जिंकली होती आणि त्याला सहा गोल केले म्हणून बक्षिससुद्धा मिळालं. ह्या कारणाने तुमची कथा त्याला प्रचंड रिलेट झाली आणि मलासुद्धा..!!
मुलाच्या शाळेचे सर मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून खूप मेहनत घेतात. मोबाईल आणि टिव्हीच्या काळात मुलं मैदानी खेळाकडे आकर्षिली जात आहेत आणि त्याचं सारं श्रेय शाळेतल्या शिक्षकांना जाते.

रूपाली ,
खूप आनंद आहे !

काय योगायोग आहे अन -

ज्यादिवशी तुम्ही कथा पोस्ट केलीत त्याच दिवशी योगायोगाने त्यांच्या शाळेची टीम फुटबॉल टूर्नामेंट जिंकली होती आणि त्याला सहा गोल केले म्हणून बक्षिससुद्धा मिळालं. ह्या कारणाने तुमची कथा त्याला प्रचंड रिलेट झाली आणि मलासुद्धा..!!

सहा गोल ? - व्वा! लै ग्रेट !
त्याचं कौतुक आहे अन अभिनंदन सांगा त्याला माझ्याकडून .

शिक्षकांचंही कौतुक आहे

पुन्हा एकदा धन्यवाद .

धन्यवाद बिपिनजी..!
तुमच्या शुभेच्छा मी मुलापर्यंत नक्की पोहचवते.
अश्याच छान कथा लिहित रहा..
तुम्हांला पुढील लेखनास शुभेच्छा.!!