झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागात तायडी अन चोंबडा मोहीत दोघेही शकू, ओम्या अन रॉकीचा माग काढत हंबरणाथच्या चाळीत (चाळ म्हणजे दुमजली अन २-३ जिने असलेली लांबलचक अशी रहाण्याची इमारत असा माझा समज होता.. पण हंबरणाथ मधली चाळ म्हणजे वेगळाच प्रकार आहे..!) आले. तिथं आल्यावर तायडीने फार असह्य अभिनय करुन चाळीतल्या(!) बोळीत खाटा मांडून झोपलेल्या माणसाला गरीब-श्रीमंतीचा पाठ वाचुन दाखवला त्यावर त्या माणासाने तायडीचा पाणौतारा केला.. नंतर बोळीत वाळत टाकलेल्या साड्यांमधे तायडी गुरफटून गेली. काहीही दाखवत होते काल.. हसू पण येत नव्हतं Uhoh

मग नली तायडीचा वास काढत तिला शोधायला बोळी फिरू लागते अन एका ठिकाणी तायडी तिला सापडते (उंची सेंट लावलेली तायडी शोधण्यात नलीला ५ सेकंदही लागत नाहीत..!). मग दोघींचा जो काही कलगीतुरा सुरू होतो त्याला तोड नाही. घर, घरपण, पैसा, स्टेटस यांवरचे शाब्दिक बाण दोघींना पण घायाळ करतात. नलीच्या घरावरील कर्जाच्या बदल्यात तिने शकूची मैत्री सोडावी असं तायडीने सांगितल्यावर आपल्या दलिंदर नलीने काय केलं असेल असं वाटतं तुम्हाला..? तिने तेच केलं जे साळव्यांच्या दळाभद्रीपणाला साजेसं होतं. तिने तायडीला खडसावून सांगितलं की रस्त्यावर रहायची वेळ आली तरी चालेल.. आभाळचं पांघरून करून फुटपाथवर झोपेन.. हवा खाऊन जगेन.. पण शकूची मैत्री सोडणार नाही. (देव ह्यांना खानविलकरांच्या रुपाने किती मदत करायला बघतोय पण सगळ्या साळव्यांच्या मेंदुला छिद्र..!!)

एकमेकींना घालून पाडून बोलून झाल्यावर नलीच्या मागोमाग तायडी साळव्यांच्या घरात येते अन कसनुसं तोंड करत न बोलताच साळव्यांची इज्जत काढते. मग ओम्याला गाडी पार्किंग साठी तिथुन पिटाळते अन शकूला ती ओम्याला घेऊन इथे काय करते असं विचारत चांगलाच समाचार घेत तिच्या मागोमाग यायला सांगत घराबाहेर पडते. मग दु:खाचे कड येत शकू अन नली एकमेकींना भेटतात.. मग शकू अन स्विटू भेटतात.. नेमकं त्याच वेळी शकू आपल्या हातातला सोन्याचा कंडा स्विटूच्या हातात सरकवते अन तो द्यायला तरी तिला मुंबईला यावंच लागेल असं हंबरत गरीब गायी सारखी तायडीच्या मागोमाग चालू लागते तेंव्हा तायडी उगीच कसाई असल्याचा भास होतो...!!!

काल चला हवा येऊ द्या मध्ये या सिरियलची अगदीच इज्जत काढली। कुशल ला नलू झालेले बघून फार मज्जा आली>> हो ना.. Biggrin

सागर कारंडे तायडी, श्रेया बुगडे शकू, भाऊ कदम स्विटू, निलेश साळावी ओम्या बनुन फार धमाल करत आहेत... ओम्या शिसपेन्सील ने नाकाला टोक करतो ते भयानक विनोदी होतं Rofl

मला वाटतंय तो बुटका कलाकार मोमो असणार.. बघू आज काय होतंय.

ज्या बयेने इतका पाणउतारा केला तिला इथे आलीच आहेस तर घरी येऊन जा , घरी आली आहेस तर चहा पी, असा आग्रह कोण करील?

हे कर्ज प्रकरण झी मराठीच्या सगळ्या आदर्श दळभद्री कुटुंबांत असतं.
विक्रम गोखले, ऐश्वर्या नारकर, राजन भिसेंच्या धर्माधिकारी कुटुंबावर कर्ज होतं. आणि ते परत मागणारी बाई त्यांच्या मते कसायाचा अवतार
काहे दिया परदेस मधल्या गौरीच्या बापाच्या डोक्यावरही कर्ज होतं. बरं कर्ज घेऊन नेमकं करतात काय ते कळतच नाही.

आणि या मालिकेतलं अंबरनाथ मुंबईपासून नक्की किती दूर / जवळ आहे बरं? आलं मनात की चालले एकमेकांकडे. नलू स्वीटूला खानविलकरांकडून परत घेऊन येते तेव्हा नवर्‍याला म्हणते घरी जायला रिक्षा /टॅक्सी बघा. मुंबई हून म्हणजे अगदी मुलुंडहून अंबरनाथ रिक्षा टॅक्सी तसंच कारण असल्याशिवाय कोणी करणार नाही. ट्रेननेच जातील. आणि यांना रिक्षा टॅक्सी परवडणार?

संवाद लेखकाला नक्की कसले पैसे देतात हे लोक?

अगदी अगदी.. साळव्यांची लोकल मधून पण विना तिकिट जायची अवस्था असताना थेट टॅक्सी, रिक्षा बघायला सांगणं म्हणजे पुण्याहुन मुंबईला जायला हेलिकॉप्टर बघा म्हणण्यासारखंच आहे.

काल चला हवा येऊ द्या मध्ये काहीच शिल्लक नाही ठेवलं जेवढं प्रेक्षकांच्या मनात होत तेवढं सगळं
NILESHNE कालच्या स्किट मध्ये दाखवले

मालविका ने मोमो-ओम च्या एंगेजमेण्ट बद्दल ओम पासून लपवून ठेवलं होतं ना
आणि चाळीतल्या घरी आली तेव्हा ही ओम ला गाडीकडे पाठवून मग सगळ्यांना ओरडून सांगितलं की परदेशी सासऱ्याला काय वाटेल ओम दिवसभर अशा चाळीत होता हे कळल्यावर वगैरे...
तर
नलु जेव्हा ओमला इथून पुढे स्वीटू ला बोलू,भेटू नको म्हणते,तेव्हा अगदीं सहज बोलून जाते की तुझं ही मोमो बरोबर लग्न ठरलंय.. ओमला काहीच कसं आश्चर्य वाटत नाही Uhoh

झीचे लेखक सगळ्या पात्रांना खाद्यपदार्थांंचा बिझिनेस देतात , पण त्याबद्दल बेसिक माहितीही करून घेत नाहीत.चपातीची चव बघतात? आधीच्या एका भागात स्वीटु स्पेशल चपाती असं म्हटलं होतं. उकडीच्या मोदकांसाठी खोबरं खरपूस भाजलं. आणि पुरणपोळ्या चटकन होतात. त्या सासूबाई मालिकेत गिरीश ओक सामग्रीत दोन चमचे हळद सांगतात.

खानविलकरांचे भावी सून आणि जावई त्यांच्याच घरी का पडलेले आहेत?

मालविका सॅडिस्ट आहे हे ओम बाळाला अजून कळलेलं नाही? आईला कोंडून ठेवलं. भावी नवर्‍याचा कुत्रा केला.

ते पुपोचं मलाही आश्चर्य वाटलं, पुपो काय मॅगी आहे का लगेच बनवायला. ओमला माहिती नाही का त्याचं लग्न ठरल्याचं, मला तर तो कुतसित हसल्यासारखा वाटला नलू बोलली तेव्हा. कामत किती वेळा प्रेसेंटेशन ऐकतो. अंबरनाथ नक्की किती लांब आहे किंवा खानविलकर बदलापूरला रहात असतील, त्याशिवाय असं ऊठ सुठ जाणं शक्य नाही. स्वीटूला कामत सुद्धा स्वीटूच बोलतो, असं पेट नेम सगळीकडे कोण वापरतं.

ओम छान आहे। पण हवा येऊ द्या मध्ये निलेश ने त्याची पण मस्त खेचली ते पेन्सिल शार्पनर नाक शार्प करताना दाखवले ते पाहून खूप हसू आले

Dj ची लेखन शैली खूपच खुमासदार असते !
मी तर त्यांच्या शैलीचा जबरी फॅन आहे , राजकारणाच्या धाग्यावर तर त्यांची मस्त फटकेबाजी चालू असते , धपा धप चौकार आणि षटकार !
काय त्यांचा तो शब्दसंग्रह , वा !!!!

शेवटी ओम्या अन् स्विटू जास्त दिवस एकमेकांपासून दूर नाही राहिले. एका दिवसातच कामत सरांमुळे दोघांना परत एकत्र यावं लागलं. दलिंदर नलीने कितीही आकांड तांडव केले तरी स्वीटू ने तिच्यासाठी ३०० चापत्यांची ऑर्डर पुन्हा मिळवून दिल्यामुळे अप - डाऊन करायला तिने कशीबशी परवानगी मिळाली.

आता ओम्याने आईला खरं काय ते सांगितल्याने तिची कळी खुलली आहे.. रॉकी पण ओम अन् स्विटू साठी मदतीला आला आहे एकंदर धीम्या मार्गावरील रखडलेली फास्ट लोकल आता पुन्हा फास्ट ट्रॅक वर धावणार अशी चिन्हे आहेत. Bw

कुठल्याही आईला आपल्या मुलीला सासरी गेल्यावर त्रास होऊ नये असंच वाटणार त्यामुळे नलू विरोध करत असावी. शिवाय गरीब श्रीमंतीच्या दरीत आपल्या मुलीसहित समस्त साळवी कुटुंबियांना हेलकावे खावे लागु नयेत या भितीपोटी हा विरोध होत आहे असं एकंदरीत दिसतं आहे.
------------------------

चहायेद्या मधे नलूची भुमिका करणार्‍या दिप्ती केतकरांच्या वास्तवातील वडीलांनी तिला दोन वेळेला एपिसोड बघुनही ओळखलं नाही असं ती सांगत होती ते काही पटलं नाही. एकतर डिमेंशियाची लक्षणं असावीत नाहीतर दिप्ती केतकर घरीदारी मेकप शिवाय याआधी कधीही वावरल्या नसतील असं वाटतंय.

मिस्टर साळव्यांची भुमिका करणार्‍या कलाकाराबद्दल निलेश साबळेंनी हॄद्य आठवणी सांगितल्या.. साळवे बाबा वास्तवीक जीवनातही असेच परोपकारी आहेत हे बघून त्यांचा अभिमान वाटला.

बाकी सगळं झकास दिसतंय.. एकंदर सिरियल अधे-मधे मिळणारे सिग्नल्स घेत बर्‍यापैकी फास्ट पळू लागली आहे... Bw

आज पुन्हा नलूची भिती वाटली, आज पुन्हा नलूने जेवायला आलेल्या हॉटेलवाल्या काकांकडे मान वाकडी करून पिंजारलेल्या केसांनी बघीतलं.

नलूची भुमिका करणार्‍या दिप्ती केतकरांच्या वास्तवातील वडीलांनी तिला दोन वेळेला एपिसोड बघुनही ओळखलं नाही असं ती सांगत होती ते काही पटलं नाही. >>>> मीही ओळखल नव्हत तिला पहिल्यान्दा बघताना. बादवे, ते मिस्टर साळवी झालेले "जय मल्हार" मधले बानूचे बाबा आहेत का?

ते मिस्टर साळवी झालेले "जय मल्हार" मधले बानूचे बाबा आहेत का?>> अरेच्चा हो की... मला पण तसंच वाटलं तुम्ही लिहिलेलं पाहून.

मालिका बघत नाही पण चला हवा येवु द्या मधले प्रोमो बघुन थोडावेळ चहयेद्या मधला तो भाग बघितला तर त्यात निलेश त्या मालिकेच्या हिरोला रितिक सारखा म्हणत होता आणी स्विटुला सोनाक्षी... बाप रे! काय पण तुलना? त्याला रितिक एकेवेळ ठिक आहे पण ही स्विटूला सोनाक्षी?? काहीही
चला हवा येवु द्यातच इतक पकवत होते तर रोज काय अन्त पाहात असतिल सगळ्याचा.
स्वजो त्या फालतु जोक्स वर खोट खोट हसतो ते महा भयानक इरीटेटिन्ग आहे.

Pages