ओघळला का पूर असा हा?

Submitted by निशिकांत on 14 February, 2021 - 11:20

आठवणींचा ओघळला का पूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

शतजन्माची दोघांचीही ओळख असुनी
या जन्मीही तुला पाहता मागे वळुनी
तुझा चेहरा लज्जेने का चूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

एक जमाना झाला नव्हता सूर गवसला
मैफिल होती उदासवाणी, दु:खी गजला
नव्या सुराने कुणी बदलला नूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

शुभ्र चांदणे अशात मजला दिसले नाही
स्वप्नांमध्ये काळोखाविन उरले नाही
विरहाने का दाटत आहे ऊर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

तुझा चेहरा मनात माझ्या घोळत होता
दवबिंदुंचा ओलावाही पोळत होता
वसंत झाला मजवरती का क्रूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

विरले आता आठवणींचे अधीर वारे
आज चेतना उरली नाही, बधीर सारे
धुमसत नाही, तरी मनी का धूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा नव्याने काढू म्हटले टूर अशी ही
पुन्हा वादळे उधळू द्या चौखूर अशी ही
हर्पा म्हणतो, मार्ग जरी ठरविलाच नाही
तरी जाऊ द्या जुनी ठिकाणे दूर अशी ही