कोणीही पकऊ शकतं

Submitted by म्हाळसा on 14 February, 2021 - 02:43

मी आणि कोलंबस.. आमच्यात की नाही भरपूर साम्य.. आता विचारा कसं ते? तर, जसा तो वेड लागल्यासारखा नवनवीन प्रदेश शोधायचा तसच मी देखिल कायम नवनवीन पदार्थ शोधत असते.. फरक इतकाच कि त्याच्या डोक्यात खूळ भरत होतं आणी माझ्या पोटात..
अशा या पोटातल्या खूळामुळे, माझ्या पिटाऱ्यात भन्नाट चवींच्या इतक्या निरनिराळ्या रेसिपीज येऊन बसल्या आहेत कि काय सांगू.. आज जी रेसिपि सांगणार आहे ती ही अशीच एक भन्नाट चवीची.. आता “भन्नाट” शब्द वाचून काहीजण धाग्याच्या तळाशी स्क्रोल करून आधी तळटीप वाचून घेतील.. बट फिकर नॅाट..ह्सावेळेस खरच एका अप्रतिम चवीचा आविष्कार इथे शेअर करणार आहे..

Ratatouille(रॅटाटूई).. एक फ्रेंच डिश..
रॅटाटूई चित्रपट बघितलेला असा क्वचितच कोणी असेल की जो ही डिश खाण्याचा मोह आवरू शकेल.. आणि धाग्याच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे ही डिश इतकी सोप्पी आहे की कोणीही पकऊ शकतं..
ह्या डिशबद्दल थोडक्यात सांगायचं तर गरम तेलात कांदा, शिमला मिरची, टोमॅटो व मसाले घालून बनवलेला तिखट चटपटीत सॅास, त्यावर चायनिज वांग, झुकीनी, स्कॅाश यांसारख्या लांबलचक आकाराच्या रंगीबेरंगी भाज्यांच्या चक्त्यांची सॅासवरची केलेली मांडणी आणि त्यानंतर बराच वेळ oven मधे खरपूस बेक होऊन तयार झालेली ही रेसिपी ..
एऱ्हवी मला न आवडणाऱ्या भाज्या इतक्या सुंदर दिसू शकतात ह्याची प्रचिती ही डीश बनवताना येते..खरं तर रॅटाटूई चित्रपट बघितल्यापासून म्हणजे तब्बल ८ वर्षे ह्या रेसिपीवर माझा डोळा होता पण मुहूर्त सापडत नव्हता .. लेकीन आखिर उपरवालेने ..सॅारी सॅारी ..नीचेवालीने मेरी सुन ली.. आणि शेवटी ती संधी माझ्याजवळ चढून आलीच..

गेल्या वर्षीची गोष्ट..
माझ्या खालच्या घरात राहणारी निखत नावाची एक शेजारीण आणि एक खूप चांगली मैत्रिणही.. व्यवसायाने शेफ.. हिला जितकी जेवण बनवायची आवड तितकीच किंवा त्याहूनही अधिक सामाजकार्याची.. दरवर्षी वॅलेन्टाईन्स डे ला ती तीच्या दहा-बारा मित्र-मैत्रिणींची मदत घेऊन रालेतल्या “Ronald McDonald House of Durham and Wake” नावाच्या संस्थेत जवळजवळ दीडशे एक गरजू लोकांसाठी जेवण बनवायची.. पण गेल्यावर्षी नेमकी मदतनीसांची संख्या कमी होती म्हणून तीने मला या कार्यात सहभागी होण्यास सांगितले.. मी त्यापूर्वी कधीही श्रमदान केले नव्हते.. ही पहिलीच वेळ..त्यात व्हॅलेंटाईन्स डे चा काही खास प्लॅनही नव्हता म्हणून १४ ला दुपारी निखतने सांगितलेल्या वेळेत संस्थेच्या किचनमधे पोहोचले..काम तसं सोप्पं नव्हतं.. भाजीपाल्यासकट जे जे साहित्य लागणार होते ते निखतने आधीच आणून ठेवलेले होतं.. एक मेन शेफ आणी दुसरा स्युशेफ अशा प्रकारे दोघा दोघांच्या जोड्या बनवल्या गेल्या.. हातात ४ तास होते आणि त्या ४ तासात १५० लोकांसाठी सूप ते डेझर्ट असे जवळजवळ ७-८ प्रकार बनवायचे होते.. बरं, नुसते बनवायचेच नाही तर व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल डिनर असल्याने थिम ध्यानात ठेवत छान प्रकारे प्लेटींग करून, ५-६ डिनर टेबल सजवून सगळं व्यवस्थित अरेंजही करायचं होतं.. तर, सुरूवात चीठ्ठ्या काढण्यापासून झाली .. मी काढलेल्या चीठ्ठीत “रॅटाटूई” होतं हे आता वेगळं सांगायची गरज नाही.. रॅटाटूईची डिटेल रेसिपी माझ्या समोर होती, मसाल्यांनी समृद्ध अशी पॅन्ट्री होती आणी मुख्य म्हणजे रॅटाटूईसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या कापून देण्यासाठी हाताखाली लोकं होती..स्वयंपाक करण्यासाठी एखाद्याला ह्याहून अधिक काय हवं असतं..
सगळे कामाला लागले आणि हसत खेळत साडेतीन तासातच जेवण तयारही झालं, सगळ्यांनी मिळून टेबल लावले, प्रत्येक टेबलावर फुलांचे गुच्छ आणि चॅाकलेट्स ठेवले गेले आणि किचनच्या भल्या मोठ्या आयलंडवर जेवण मांडले.. पाचएक मिनिटातच एकएक करून जेवणासाठी लहान मुलं आणि त्यांचे पालक यायला सुरूवात झाली.. ह्या क्षणापर्यंत नक्की आपण कोणासाठी जेवण बनवतोय ह्याची मला अगदीच पुसटशी कल्पना होती आणि निखतच्या बिझी स्केड्यूलमुळे संस्थेच्या कामाची पूर्ण माहिती करून घेता आलेली नव्हती..
तर, हि संस्था गंभीर आजाराशी झगडणाऱ्या लहान मुलांना व त्यांच्या पालकांना, ट्रिटमेंट दरम्यान सोईस्कररित्या एकत्र राहता यावं ह्यासाठी मदत करते. अशा ट्रिटमेंटसाठी कित्येक महिने लागतात..त्यामुळे त्यांच्या राहण्याची, जेवणाची व इतर अत्यावश्यक गरजा पुरवण्याची जबाबदारी ही संस्था उचलते..

वैद्यकिय उपचारांसाठी आपल्या कुटूंबापासून महिनोंमहिने दूर रहाणाऱ्या ह्या चिमुकल्या मुलांना व त्यांच्या पालकांना त्यांच्या आवडीचे आणि तेही आपल्या हातचे जेवण जेवताना बघून आम्हा सगळ्यांना झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे..
ह्यावर्षी मात्र कोविड परिस्थितीमुळे श्रमदान रद्द करून फक्त देणगी रूपातच सगळ्यांनी मदत केली.. पण पुढच्या वर्षी नक्कीच पुन्हा संस्थेत जाऊन तिथल्या चिमुकल्यांसाठी जेवण बनवण्याचा योग येईलच आणि त्याच बरोबर माझ्या रेसिपिच्या पिटाऱ्यात अजून एका भन्नाट रेसिपिची भर पडेल..

असो, आता पटापट रॅटाटूईच्या रेसिपीकडे वळूयात..
साहित्य -
४ टोमॅटो, २ चायनीज वांगी, २ स्क्वाश, २ झूकीनी

सॅाससाठी लागणारे साहित्य -
२ चमचे ॲालिव ॲाईल, १ मोठा बारीक चिरलेला सफेद कांदा, १ बारीक चिरलेली लाल शिमला मिरची, ४ लसूण पाकळ्या, २ चमचे मिरची पावडर, १ मोठा चमचा मिक्स्ड हर्ब्स, १ चमचा काळी मिरी पावडर, दिड चमचा मीठ, दीड ते दोन कप क्रश्ड टोमॅटो, १ चमचा साखर, २ चमचे बाल्सामिक विनगर, ८-१० बेझलची पाने, अर्धा कप क्रिम , अर्धा कप किसलेलं पार्मझान चीज

कृती-
सर्वप्रथम एका धारदार सूरीची व्यवस्था करून फोटोत दाखवल्याप्रमाणे भाज्यांच्या चक्त्या पाडून घ्यायच्या..हे चक्त्या पाडायचं काम माझा नवरा छान करतो..

त्यानंतर एका मोठ्या भांड्यात सॅाससाठी तेल गरम करून कांदा, चिरलेला लसूण, शिमला मिरची घालून दहा मिनिटे परतून घ्यायचं..त्यात मीठ मसाले टाकायचे आणि क्रश्ड टोमॅटो घालून परत एकदा परतून घ्यायचं.. नंतर साखर, बाल्सामिक विनगर ॲड करून मंद आचेवर १० मिनिटे सॅास शिजत ठेवायचा..सॅास व्यवस्थित शिजल्यावर चिरलेली बेझलची पाने व क्रिम घालून गॅस बंद करायचा. सॅास तयार. आता बेकिंग पॅनमधे सॅास पसरवायचा व त्यावर भाज्यांच्या चक्त्या फोटोत दाखवल्याप्रमाणे पसरवायच्या. एका वाटीत ॲालिव ॲाईल, मीठ, बेझल घालून ड्रेसिंग बनवायचं आणि भाज्यांच्या चक्त्यांवर ब्रशने फिरवायचं.. बेकिंग पॅन ॲल्युमिनिअम फॅाइलने बंद करायचा आणि अवनमधे ३७५f टेंपरेचरला ४५-५० मि. बेक करायचं..नंतर फॅाइल काढून चीज भूरभूरायचं , १० मि. बेक करायचं आणि ५ मिं. ब्रॅाइल. रॅटाटूई तयार.. मला हे पास्त्यासोबत खायला आवडतं..नक्की ट्राय करा..

9522E8E4-9DA2-43CC-A8E6-560CFF52ACC2.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्व छान. लेख ,माहिती आणि पाककृती.
बेझलबद्दल उत्सुकता आहे. त्या पानांचं काय करतात? फक्त सजावट का खाण्यासाठी? यास ओव्याच्या पानांसारखा वास येतो का?

मस्त लिहिले आहे. संस्थेला व निखतला आणि तुलाही या कार्यासाठी शुभेच्छा. Happy

म्हाळसे, निखतच्या (म्हणजे मला जी निखत वाटते आहे तीच असेल तर) हातचे केक्सपण खाल्ले असतीलच तू. आपल्या एरीयात रसमालाई केक पहिल्यांदा तिनं इंट्रोड्यूस केला.

@Srd -त्या पानांचं काय करतात? फक्त सजावट का खाण्यासाठी? यास ओव्याच्या पानांसारखा वास येतो का? >> ओव्याच्या पानाचा वास कधी घेतला नाहीए पण बेझल चा वापर फ्रेंच व इटॅलियन पाकृमधे केला जातो..
@सीमंतिनी - थोडं रॅटाटूई चित्रपटाबद्दलही लिहायचं होतं.. पण लिहीताना मुली फार त्रास देत होत्या त्यामुळे जरा थोडक्यातच लिहीलं गेलं.
@अंजली - निखतच्या (म्हणजे मला जी निखत वाटते आहे तीच असेल तर) हातचे केक्सपण खाल्ले असतीलच तू. आपल्या एरीयात रसमालाई केक पहिल्यांदा तिनं इंट्रोड्यूस केला.>>> हो हो..तीच निखत .. मी गोड खात नाही ..पण घरी तीच्या हातचेच केक्स आवडतात.. आणि हो, सध्या तीचा मोतीचूर केक ट्रेंडींग आहे

छान लिहिलंय, लेख आणि पाकृ पण. संस्थेचं आणि तुम्ही दोघी मैत्रिणींनी आणि तुमच्या चमूने केलेलं काम ही कौतुकास्पद.

तुमची लेखनशैली सुंदर आहे. हाही पाकृवजा लेख आवडला. संस्था खूप चांगले काम करत आहे. >>> +१

पण मराठीत पकवणे चा अर्थ वेगळाच होतो त्यामुळे मथळ्याने जरा गंडवले होते.

छान लिहिलंय, लेख आणि पाकृ पण. संस्थेचं आणि तुम्ही दोघी मैत्रिणींनी आणि तुमच्या चमूने केलेलं काम ही कौतुकास्पद.>> +१.

रच्याकने, डीपी पाहून बोकलतची आठवण आली Lol

Pages