मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ९

Submitted by Theurbannomad on 8 February, 2021 - 11:22

मोर्डेकाय जेव्हा पाचव्या मजल्यावरच्या त्या गुप्त दालनात आला, तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या शंकेनुसार खरोखर त्याचा देश आण्विक अस्त्रांची निर्मिती करण्यात गुंतलेला होता. त्याच्या अनुभवी डोळ्यांनी त्याउप्परही अनेक गोष्टी ओळखल्या....त्या दालनाचा विस्तार इतका मोठा होता की त्याला हे कळून चुकलं, की इथे फक्त देशाच्या बचावला पुरेशीच नव्हे, तर इतर देशांवर हल्ला करण्यासाठी पुरतील इतक्या ताकदीच्या आणि संख्येच्या अस्त्रांची निर्मिती होत होती. बाहेरच्या जगाला इस्राएल ' मध्यपूर्वेत आपण कधीही पहिला अण्वस्त्रधारी देश होणार नाही...जर इतर कोणत्या देशाने अण्वस्त्रांची निर्मिती केलीच, तर आणि फक्त तरच आपण अण्वस्त्राने सुसज्जित होण्याच्या दृष्टीने पावलं उचलू...' अशी तोंडदेखली आश्वासनं देत होता. हे सगळं मोर्डेकायला पचवणं अवघड होतं. इस्राएलच्या दुर्दैवाने त्यांचा हा गडी कट्टर झिओनिस्ट नव्हता....शिवाय वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास केल्यामुळे त्याला आपल्या देशाच्या युद्धखोर विचारसरणीचा चांगला अंदाज आलेला होता. अरबांकडून आपल्याला धोका आहे या एका सबबीचा बागुलबुवा उभा करून आपला देश अण्वस्त्रसज्ज होण्याच्या दिशेने वेगाने पावलं टाकतो आहे हे त्याने ताडलं.
त्याच्या नोकरीवरही गदा आलेली होतीच...दोन-अडीच महिन्यात त्याची या प्रकल्पाच्या कामातून बाहेर रवानगी होणार होती.या कामातला त्याचा कार्यभाग संपलेला होता. त्याने या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला - त्याच्या हातात जितके दिवस उरले होते, ते ' सत्कारणी ' लावण्याचा....त्याने आपल्या बॅगेच्या पट्ट्यात एक ३५ mm कॅमेरा बसवला. हा कॅमेरा चांगलाच शक्तिशाली होता. दररोजप्रमाणे तो बसमधून उतरून प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आला...समोरच्या सुरक्षा अधिकाऱ्याने त्याला हटकलं असतं , तर त्याचं बिंग फुटलं असतं, पण मागच्या अनेक महिन्यांपासून रोज या प्रकल्पाचा एक कर्मचारी म्हणून येणाऱ्या परिचयाच्या माणसाला हटकायची त्या सुरक्षा अधिकाऱ्याला गरज वाटली नाही. आता मोर्डेकाय, त्याचा कॅमेरा आणि त्याच्या मनातली या सगळ्या प्रकल्पाची जमतील तितकी छायाचित्रं काढण्याची योजना इस्राएलच्या अण्वस्त्रप्रकल्पाच्या आत शिरली होती !
त्याने जमेल तशी जमतील त्या त्या भागाची छायाचित्रं घ्यायला सुरुवात केली. पहिल्या चार मजल्यांवर तर त्याला मुक्त संचार होता...त्यामुळे तिथे त्याला हे काम करायला काहीही अडचण गेली नाही. जेव्हा जेव्हा त्याचे सहकारी जेवणासाठी जायचे, तेव्हा तेव्हा तो आपला कार्यभाग उरकून घ्यायचा. त्या इमारतीच्या छतावर जाऊन त्याने आजूबाजूच्या परिसराचीही छायाचित्रं घेतली. हे सगळं झाल्यावर पाळी होती सगळ्यात जोखमीच्या कामाची - त्याला प्रतिबंधित असलेल्या जमिनीखालच्या पाचव्या आणि त्याखालच्या मजल्यांवर जाऊन तिथली छायाचित्रं घेण्याचा. आधीप्रमाणे याही वेळी त्याने सुरक्षा कर्मचारी जेवणाच्या सुट्टीसाठी जायची त्याने वाट बघितली आणि कपाटातून किल्ल्या घेऊन त्याने ' गाभाऱ्यात ' प्रवेश केला.
त्याने या भागात फिरून जवळ जवळ तीस-चाळीस छायाचित्रं घेतली. या छायाचित्रांमध्ये नियंत्रण कक्ष, प्रयोगशाळा, प्लुटोनियम तयार करण्याचं दालन, त्यातली उपकरणं , अण्वस्त्रांच्या प्रारूपांचे नकाशे, प्लुटोनियम साठवून ठेवण्याच्या गोल कुप्या या सगळ्या महत्वाच्या भागांचा त्या छायाचित्रांमध्ये समावेश होता. आधीच्या छायाचित्रांमध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेलं ' गोल्डा बाल्कनी ' म्हणून प्रसिद्ध असलेलं एक प्रचंड दालन, उपकरणांच्या जागा अशा सगळ्या महत्वाच्या भागांची छायाचित्रं होती. या सगळ्यांवर कडी म्हणजे हायड्रोजन बॉम्बच्या प्रारूपाचं भलं मोठं ' मॉडेल ' त्याच्या छायाचित्रांमध्ये बंदिस्त झालेलं होतं.
हे धाडस करताना जर तो पकडला गेला असता, तर त्याची रवानगी एक तर तुरुंगात झाली असती किंवा यमसदनी...पण त्याचं आधीचं ' रेकॉर्ड ' इतकं साफ होतं की त्याच्यावर कोणालाही कसलीही शंका येणं अशक्य होतं. हा सगळं प्रकार केल्यावर त्याने आपल्या ' फोटोफिल्म्स ' बॅगेतल्या बाटल्यांमध्ये व्यवस्थित लपवल्या.हे सगळं घडवून आणल्यावर त्याने आपल्या पुढच्या आयुष्याची आखणी केली. इस्राएलमधून बाहेर पडून एखाद्या वेगळ्या देशात स्थायिक व्हायचं त्याने मनावर घेतलं. आपली गडी, घर आणि बाकी किडूकमिडूक गोष्टी विकून त्याने आपली पुंजी गोळा केली आणि तो युरोपच्या दिशेने निघाला. या सफरीची सुरुवात त्याने मुद्दाम विमानाने करण्यापेक्षा जहाजमार्गाने केली.कारण इतकंच ,की समुद्रमार्गासाठी बंदरावर होतं असलेल्या तपासणीमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता असते, ज्याचा फायदा घेऊन त्या फिल्म्स सामानातून गुपचूप बाहेर नेणं तुलनेने सहजसाध्य होतं.
इस्राएल हा जरी आपला देश असला तरी आता आपल्या मायभूमीत पाय ठेवणं शक्य नाही, हे त्याला पक्कं ठाऊक होतं. त्याचप्रमाणे आपला देश बाहेरच्या जगाशी अतिशय दुटप्पी धोरण ठेवून वागतो आहे याचा त्याला पुरेपूर साक्षात्कार झालेला होता. देशप्रेमापेक्षा युद्धज्वराने भारलेल्या तरुण पिढीला प्रबोधन करून योग्य त्या मार्गावर आणण्याचं कामं जरी त्याच्या आवाक्याबाहेरचं असलं, तरी कमीत कमीत आपल्या देशाचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचा प्रयत्न कारण तरी त्याला नक्कीच शक्य होतं. अथेन्सला निघालेल्या एका फेरीमध्ये बसून तो पुढे काय करायचं याचाच विचार करत होता. फेरीने हैफा बंदर सोडलं आणि अथेन्सच्या पिरेउस बंदराकडे प्रयाण केलं. ज्या हैफा बंदरावर इस्राएलने यलोकेक यशस्वीपणे उतरवून आपला अणुप्रकल्प जोमाने सुरु केला होता, त्याच हैफा बंदरातून त्यांच्या प्रकल्पाची इथंभूत माहिती देशाबाहेर जात होती, हा अजून एक काव्यात्मक न्याय !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Theurbannomad, लेखमाला अतिशय रोचक आहे आणि त्यामुळे वाचायलाही खूप इंटरेस्ट येत आहे.

लेखमाला आवडली..
आणी पटापट पुढचे भाग येत असल्यामुळे वाचायला मजा येत आहे.