दीपस्तंभ विझला

Submitted by निशिकांत on 7 February, 2021 - 10:44

दीपस्तंभ विझला---इलाही जमादार--( वीक एंड लिखाण )
माझा नेहमीचा अनुभव आहे की व्हाट्सअ‍ॅपवर बर्‍याच बातम्या अशाच येत असतात आणि अनेक समूहावर फिरत पण असतात. आणि नंतर कळते की ती खोटी आणि बिनबुडाची बातमी आहे. दिलीपकुमारला तर व्हाट्सअ‍ॅप सदस्यांनी इतक्या वेळेला नानावटी हॉस्पिटलला गंभीर अवस्थेत दाखल केलय की त्याचा हिशोबच नाही. अशीच परवा परवा एक बातमी व्हाट्सअ‍ॅपवर येवून थडकली. ख्यातनाम गझलकार इलाही जमादार यांच्या दु:खद निधनाची ती बातमी होती. मी जिवाच्या आकांताने वाट बघत होतो तीन चार दिवस की कोणी तरी या बातमीचे खंडन करावे. माझे एवढे चांगले नशीब नव्हते आणि दैवाने सर्व गझलप्रेमीवर घाला घातला होत. शेवटी आज त्यांच्याबद्दल चार शब्द लिहावयास बसलो.
इलाहींची आणि माझी वैयक्तिक ओळख होती. मी त्यांच्या येरवाडास्थित घरी आठ दहा वेळेस तरी गेलो असेन. मी माझे गझलेचे शिक्षण औरंगाबाद येथे प्रसिध्द शायार डॉ इकबाल मिन्ने यांच्याकडे घेतले आहे, मी पुण्याला कायम स्वरूपी स्थलांतरीत झाल्यानंतर मिन्ने सरांनी स्वतः होऊन इलाहींना फोन करून माझ्या बद्दल सांगितले. मला इलाहींचा फोन आला आणि म्हणाले की तुम्ही तुमच्या गझला घेऊन मला भेटा. आणि आमचे भेटणे सुरू झाले. मी माझ्या गझलांचे बाड घेऊन जात असे. ते डोळे झाकून लक्ष देवून माझ्या गझला ऐकत असत. गझल पूर्ण वाचून झाली की म्हणत असत की "जरा पांचवा शेर फिरसे पढो"आणि नेमकी त्यात कांहीतरी चूक असायचीच. मग ते मला मार्गदर्शन करत असत. मी माझी झोळी खूप भरून घेतली त्यांच्या सहवासात. मी आज हे म्हणू शकतो की इकबाल मिन्ने सरांनी मला गझल शिकवली तर इलाहीजीनी माझ्या गझलेवर अमूल्य असे संस्कार केले.
मी भेटीच्या शेवटी त्यांना त्यांच्या गझला ऐकवायचा हट्ट धरत असे. त्या गझला ऐकणे हा एक स्वर्गीय अनुभव होता. त्यांची खयालांची दौलत आणि मौलिक शब्द भांडार अदभूत होते. त्यांची प्रसिध्द गझल "चुकले का हो" ही  त्यांनी मला ऐकवली आणि मी त्या गझलेच्या प्रेमातच पडलो. मी तीच रदीफ वापरून गझल लिहायची परवानगी मागितली. या दिलदार माणसाने लगेच हो म्हणत सांगितले की कोण्त्याही शब्दावर (रदीफवर) कुठल्याही शायराची मक्तेदारी नसते. पण मलाच प्रशस्त वाटेना म्हणून मी त्याच तोंडवळ्याची दुसरी रदीफ "चिडता का हो?" वापरून गझल लिहिली जी त्यांना खूप आवडली. मी त्यांचे जवळ जवळ ८ गझलसंग्रह विकत घेतले जी माझी बहुमुल्य दौलत आहे.
माझ्या शेवटच्या दोन तीन भेटीत त्यांनी सांगितले की त्यांनी आता दोहे लिहिण्यास सुरू केली आहे. कांही दोहे त्यांनी मला ऐकवलेही! एकसे बढके एक असे होते ते दोहे.
हे गृहस्थ वागायला एकदम साधे आणि अजात शत्रू होते. या गोष्टीला जवळ जवळ आठ वर्षे झाली असतील. मी घरी एक खाजगी मुशायरा ठेवला होता. भीत भीत खडा टाकून पाहण्यासाठी मी त्यांना येता का? असे विचारले आणि हा हिमालया एवढा माणूस आढेवेढे न घेता आला पण. हा खाजगी मुशायरा जवळ जवळ तीन तास चालला/रंगला. हा माझ्या आयुषयातला अविस्मरणीय क्षण आहे.
गझलेच्या क्षेत्रात गटबाजी, हेवेदावे फार मोठ्या प्रमाणात आहेत. इलाहीजी खर्‍या अर्थाने गटनिरिपेक्ष होते.
अशा एका विभूतीच्या निधनामुळे सहाजीकच मी घायाळ झालोय एका अर्थाने. मी ज्यांच्या मार्गदर्शनाने या क्षेत्रात चंचूप्रवेश केला तो दीपस्तंभच आज विझल्यागत वाटतय मला. अल्लाह त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो.
या लिखाणाचा शेवट मी इलाहीजींच्याच एक गझलेने करतोय. ही गझल गझलनवाज भिमराव पांचाळे आपल्या प्रत्येक मैफिलीत अवर्जून गातात. ही आनंदकंद वृत्तातील गझल त्यांनी कलावती रागात गायलेली आहे. भीमराव एकदा मला म्हणाले होते की गायकाचे काम आपली गायकी दाखवायचे कमी आणि शायराचे शब्द श्रोत्यांच्या मनापार्यंत पोंचवणे हे जास्त असते. खाली पांचाळेजींनी गायलेल्या शेराचे शब्द देतो जेणे करून गझल ऐकण्याचा आनंद द्विगुणित होईल.

सुरुवातीचे अ‍ॅड्लिब--
वाचलेली, ऐकलेली माणसे, गेली कुठे
पुस्तकांतून पाहिलेली माणसे, गेली कुठे

रोज अत्याचार होतो, आरश्यावरती आता
आरश्याला भावलेली माणसे, गेली कुठे

गायलेली गझल--
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यांत वेदनेचा माझ्या झरा असावा

जख्मा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या, हा पिंजरा असावा

 ही गझल भिमरावजींच्या आवाजात ऐकण्यासाठी क्लिक करा https://www.youtube.com/watch?v=Jf4aowGHsEM

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले लिखाण!
इलाही जमादार यांच्याबद्दल जास्त माहीत नाही अजून वाचायला आवडेल.