वाघ अँड वाघीण

Submitted by निमिष_सोनार on 18 January, 2021 - 21:39

पुण्यातील "वाघोली" येथे एक वाघ आपल्या घरात निवांतपणे दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान "जगभरातील अभयारण्ये" हे जर्मनीतील एका डॅशिंग सिंहिणीने लिहिलेले प्रवासवर्णन पुस्तक वाचत होता.

बाजूला टेबलावर मोठ्या मग मध्ये "शिकारी" कंपनीचा वाफाळलेला चहा ठेवलेला होता. कपावर वाघ बंदूकधारी शिकाऱ्याला फाडून खात आहे असे चित्र होते.

वाघीण गरमागरम वडा पाव तळत होती. वाघिणीने दोन वाफाळलेले टेस्टी वडे, दोन पाव, सोबत बाजूला लसणाची लाल चटणी आणि दोन गरमागरम तळलेल्या हिरव्या मिरच्या असे पदार्थ एका प्लेटमध्ये आणून वाघाच्या समोर ठेवले.

तेवढ्यात पुस्तकातून डोके वर काढून वाघ म्हणाला, "अगं ऐकलंस का?"

"काय हो आता? उगाच डायलॉगची अदलाबदल कशाला करता? संवादाची सुरवात नेहमी 'अहो ऐकलंत का' अशी व्हायला हवी आणि ती नेहमी पत्नीने करावी हे माहीत असूनही तुम्ही आधी का बोललात?"

"अगं, स्क्रिप्ट लिहिणारा मी थोडाच आहे? वाघ लोक जास्तीत जास्त निवांत बसून शिकारी चहा पिऊ शकतात, पण ते स्क्रिप्ट थोडेच लिहितात?"

"न लिहायला काय झालं? तुम्हाला वाचता येतं ना?"

"अगं, हे काय विचारणं झालं? हे काय मी पुस्तक वाचतोय, दिसतंय ना?"

"दिसतंय हो! पण त्यात तुम्ही फोटोंमध्ये बकरीकडे काय टक लावून बघताय?"

"अगं, एक बकरी नेहेमी माझ्या स्वप्नात येते आणि काय योगायोग की तीच बकरी आज या पुस्तकातील फोटोत दिसते आहे!"

"हो का? मला वाटलं तुम्ही बकरीला 'खाऊ की गिळू' या नजरेने बघता आहात!"

"अगं नाही गं. मी शाकाहारी झालोय माहीत आहे ना? मग तरीही कशाला संशय घेतेस? नाहीतर मी वडा पाव, इडली डोसा, बाजरीची भाकरी, पालकाची हिरवी भाजी, वरण भात असा आहार केला असता का? तुझं उगाच आपलं काहीतरी!"

"बरं झालं बाई! बरं, आता आणखी एक योगायोग झाला आहे!"

वाघाने निवांत चहाचा एक घोट घेतला आणि वाफाळलेल्या वड्याला लाल चटणी लावून त्याचा चटकदार तुकडा तोडला आणि अख्खी मिरची गटकन तोंडात मटकवली आणि मग तो भरल्या तोंडाने म्हणाला,"आता आणखी कोणता योगायोग?"

"त्याचं असं आहे की मी आमच्या मैत्रिणींच्या ग्रुप मधील एका बकरीला घरी बोलावलंय! येतच असेल ती आता!"

"हो का, अरे वा! येऊ दे की! मी काय खाणार थोडंच आहे तिला?", तोंडाला सुटलेले पाणी लपवत वाघ कसनुसा हसत म्हणाला.

"पण मी कुठं म्हणाले की तुम्ही खाणार म्हणून? तुमचा इरादा काही ठीक दिसत नाही हं मला! लक्षात ठेवा, सांगून ठेवते. त्या बकरीला काही केलं ना, तर मी आहे आणि तुम्ही आहेत!", अख्खा वडापाव तोंडात टाकत आणि प्रचंड डरकाळी फोडत वाघीण म्हणाली.

दोघांचे पाळण्यात झोपलेले पिल्लू म्हणाले, "अगं आई हळू. मी यूट्यूब वर अंगाई गीत सर्च करतेय आणि तू आपलं जोरात ओरडते आहेस! हळू जरा!"

डरकाळीमुळे घराचा सिलिंग फॅन हेलकावे खाऊ लागला. घरातील बल्ब होल्डरमधून निघून खाली पडला.

शेजारच्या हत्तीणीच्या घरात हादरे जाणवायला लागले, तिच्या घरातील कप बशा, कशा बशा पडता पडता वाचल्या.

हत्तीण खिडकीतून विचारू लागली, "काय गं, बरी आहेस ना? काय झालं एवढं ओरडायला?"

"काही नाही गं! जरा आमच्या ह्यांना युक्तीच्या चार गोष्टी सांगत होते!"

"बरं बरं, पण जरा हळू सांगत जा गं बाई! बिचारा वाघ आहे तो, हत्ती नाही काही! आमच्या घरात छोटी छोटी हत्तीची पिल्लं झोपलीत! तू अशी ओरडायला लागली की त्यांच्या स्वप्नात सिंहिणी दिसतात त्यांना!"

"बरं, सॉरी आणि तू नको काळजी करुस ह्यांची! बघते मी काय करायचं ते!", असे म्हणून वाघीण पुढे वाघाला म्हणाली, "हे बघा, ती बकरी आणि मी मिळून चहाचे मळे विकत घेतले आहेत. आम्ही चहाचा बिझिनेस सुरू करणार आहोत आणि आमचे ब्रँड नेम असेल वाघीण बकरी चहा!"

वाघाच्या हातातील कप खाली पडला आणि आश्चर्याने वाघ म्हणाला, "हे काहीतरीच काय नाव ठेवलं? तू कर चहाचा बिझिनेस! पण नाव काहीतरी वेगळं ठेव ना!"

"काय ठेऊ?"

"वाघ बकरी चहा असं ठेव नाव!"

"अहो पण आधीच हत्तीण-बोक्या चहा बाजारात आहे, ते म्हणतील आमच्या नावाची स्टाईल कॉपी केली!"

"काही नाही होणार तसं! अंग तुला गम्मत सांगतो बघ! मेट्रो गोल्डविन मेयर नेटवर्क यांच्या लोगो मध्ये सिंह असतो की नाही?"

"त्याचा इथे काय संबंध?"

"आहे, संबंध आहे! त्यांच्या बॅनर खाली विल्यम हाना आणि जोसेफ बार्बारा यांनी कोणते कार्टून काढले?"

"टॉम अँन्ड जेरी!"

"हां! हुशार आहेस की गं! तर MGM मध्ये आधी वाघाचं चित्र असणार होतं पण सिंहाने धमकी दिली आणि रोज तो MGM डरकाळी फोडत असतो आणि आपण वाघ लोकं बसलो इथे अडकीत्त्याने आक्रोड फोडत!"

"अहो पण त्याचा इथे काय संबंध?"

"आहे, संबंध आहे! आता आपण त्यांच्या नाकावर टिच्चून वाघ एन्ड बकरी चहा काढू, जसे 'टॉम अँन्ड जेरी' तसे 'वाघ अँन्ड बकरी'!"

"अहो, गुपचूप वडा पाव खा आणि प्लेट नेऊन ठेवा बेसिन मध्ये! उगाच आमच्या स्त्री शक्तीच्या आड येऊ नका! 'वाघीण आणि बकरी' यात स्त्री शक्ती दिसून येईल! वाघ बकरी नावात ती मजा नाही!"

"अगं, तुला कळत कसं नाही? वाघ बकरी या नावात खरी स्त्री शक्ती दिसून येते!"

"ती कशी?"

"वाघावर बकरी भारी पडते. शिकार करायला आलेल्या वाघाला ब्या ब्या अशी डरकाळी फोडून बकरी पळवून लावते! कशी वाटली आयडिया? चहाच्या पाऊच वर पण तुम्ही असेच चित्र छापा!"

हे ऐकल्यावर वाघीण चिडली आणि कढई मधला वडे तळायचा झारा उचलून तेलाचे हात न धुता वाघाच्या मागे 'हात धुवून' लागली आणि घरातच टॉम एन्ड जेरी चा नवीन एपिसोड सुरू झाला! खिडकीतून MGM सिंह डरकाळी फोडत मजा पाहायला आला.

(वाघ बकरी चहा या नावावरून मला सहज सुचलं. जास्त सिरियसली घेऊन यात अर्थ शोधत बसू नका. फक्त मनोरंजन म्हणून लिहिलं आहे!)

© निमिष सोनार, पुणे
#निमिश्किल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Funny !