लेखक होण्यास काय लागते?

Submitted by सुरेशकुलकर्णी on 10 January, 2021 - 08:19

समोर काही लिहायला नसले कि आम्ही बेचैन होतो. मग मागे पहातो. मागे म्हणजे, भूत काळात. तेथे आम्हास,ठळकपणे दिसतात त्या, स्वतःच्या बावळटपणाच्या खुणा! मग, भाया सरसावून आम्ही लिहायला बसतो. जेव्हा जेव्हा मागे वळून पहातो, तेव्हा तेव्हा, तो आजवरच आमचीच, अनंत लिखाणे, भुतासारखी समोर नाचू लागतात. मग त्यातल्यात्यात जुने असलेल्या लिखाणावर, आम्ही पुन्हा लिहतो! लिखाण म्हणजे आमची जिंदगी, आमचा श्वास!

तेव्हा, असेच सवयी प्रमाणे काल, आम्ही सिहावलोकन केले. ('मागे पहाणे' पेक्षा, 'सिहावलोकन' हा भारदस्त शब्द, म्हणून येथे टाकला. लिखाणात का होईना हे 'भारदस्तपण' आले पाहिजे. बाकी परमेश्वराने आमचे भारदस्तपण, गुलदस्त्यातच ठेवणे पसंत केले आहे. अस्तु!) चालुघडीच्या करोनावर लिहण्याचा मानस होता. पण यावर आम्हीच, इतके लिहून ठेवले आहे कि, एखाद्या हॉस्पिटलच्या 'अलगाव कक्ष' मध्ये असलेल्या पेशंट पेक्षा, आमचे लेखच ज्यास्त भरतील! तेव्हा, तो विषय आता पुरे!

तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला 'लेखक' होण्याची लहानपणापासूनच मोठी हौस होती. (म्हणजे अजूनही आहेच! तसे आम्ही याबाबतीत, मराठीत चिवट, आणि इंग्रजीत 'नेव्हर गिव्ह अप' मधले.) पण लेखक व्हायला काय लागते? या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता, पन्नाशी कधी उलटून गेली कळलच नाही! म्हणजे, आता लेखक झालो तरी, उदयोन्मुख-तरुण रक्ताचे किंवा नव्या दमाचे, होण्याऐवजी डायरेक्ट 'जेष्ठ लेखक' होणार! हे म्हणजे बारावी आटर्सला फेल विद्यार्थ्याला, पी.यच. डी. दिल्या सारखे. (पण हल्ली, अश्या 'डॉक्टरेट' पण मिळतात म्हणे!)
कुठल्याही प्रश्नाचा मुळापासून अभ्यास करण्याची आमची सवय नडली, आणि 'लेखक' होण्यास काय लागत? या प्रश्नाने चांगलेच रिंगण दाखवले.

'लेखक' व्हायला मुळात लिहता आलं पाहिजे. ते तर आम्हाला, शाळेत तिसरीत असल्या पासूनच येत! फक्त ते ऱ्हस्व दीर्घ उलट पालट होत. आम्ही शाळेत असताना,आमचे मित्र श्याम्याला काही फंडा आहे का विचारले.
"सुरश्या, एक फंडा आहे! पण त्याने तुझे पन्नासटक्के, ऱ्हस्व-दीर्घ सुधारू शकतात!"
"अरे सगळंच चुकल्या पेक्षा, अर्धतरी बरोबर होईल. काय आहे तो फंडा?"
"काही नाही, सगळेच शब्द एक तर ऱ्हस्व लिही, नाहीतर सगळेच दीर्घ लिही!"
आम्ही तसेच केले. पन्नास टक्के मार्क मराठीत अपेक्षित होते. अठ्ठावीस टक्के पडले! पण त्या साली ग्रेस मार्क देऊन आम्हास शाळेने पास केलं होते. श्याम्या हुशार असला, तरी डांबिस आहे. असो. मग आम्ही त्या भानगडीत न पडता, जमेल तस खरडून एका पेपरला, एक गोष्ट, दिली पाठवून! अन आलीकी छापून! मायला, या ऱ्हस्व -दीर्घच्या बागुलबुन लयी पिडलं राव. (पण लिखाण शुद्ध हवं, असं आम्हाला नेहमीच वाटत, पण जमत नाही.)

'लेखक' व्हायला लेखना इतकेच, वाचक गरजेचे असतात, हि मूर्ख संकल्पना आहे, हे आमच्या लक्षात येऊ लागले होते. तसे आम्ही जात्याच हुशार, परंतु थोड्याश्या विलंबाने आमच्या ध्यानात येते, हे बारीक येथे कबुल करणे अगत्याचे आहे. तुम्ही म्हणाल बिना वाचकांचा, लेखक कसे होता येते? पण आम्ही अनेक लेखकांची पहाणी करून, अभ्यास करूनच, या निर्णयापर्यंत पोहंचलो आहोत! 'लेखक' होण्यास, आमच्या काळी 'प्रकाशक' आणि आजच्या काळी 'फेसबुक' गरजेचे आहे! हे तुम्हीही काबुल कराल!

'प्रकाशक' म्हणजे, साहित्य क्षेत्रातील एक, अति महत्वाचा घटक होता! या इलेकट्रोक्स मीडियाच्या आधी त्यांचा बोलबाला आणि दरारा होता! तुम्ही मारे ढिगलभर लिहाल, पण ते छापून पुस्तकाचे 'पुट्टल' वाचकांपर्यत नाहीच पोहचेल तर, त्या लिखाणाचा काय मतलब? नुस्ते खारेमुरेवाल्याचे धन! तेव्हा 'पुस्तक' छापले असेल तरच, तुम्ही लेखक होऊ शकता. मग भलेही वाचक असतो कि नसोत! वाचक, बिचारा काय करणार? तो बिचारा, जे छापून झोळीत पडेल, ते भजून वाचायचा!

छापील पुस्तकाच्या लेखकांचा तोरा तर, विचारता सोय नसायची. इंटेलेच्युअल दिसण्यासाठी डोळ्याला चष्मा, चट्टेरी ढगळा डगला, टक्कल पडलेले असले तरी, रेसिड्युअल केस वाढवायचे! दाढी तर दाढी, अन मिश्या तर मिश्या! कानावर असलेले, काटकोनात वाढलेल्या केसांमुळे, आमचेच एक लेखकराव, डोक्याला पंख फुटल्या सारखे दिसायचे! त्यांचे डोके कायम हवेत तरंगत असल्यास नवल वाटायला नको! या छापील पुस्तकाचे लेखकाना, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सवाष्णीना असतो तसा, साहित्य संमेलनातल्या मंडपात, मान असायचा. मग नवरा(लिखाण) कसाही असो! भल्या भल्याना त्यामुळे छापील पुस्तकाची भुरळ पडायची. ते काही उगीच नाही! आम्हीही त्याला अपवाद नव्हतो.

आम्हाला पण, हि छापील भुरळ पडली. आपलं नाव छापील ठळक अक्षरात! 'लेखक' हे ब्रिदावळी असलेलं नाव! स्वप्नवत वाटत! शेवटी परवा आम्ही एका 'प्रकाशकाला' फोन करण्याचा गर्धभपणा केलाच.
"हॅलो, मला एक पुस्तक प्रकाशित करावयाचं आहे, आणि ते आपण करावे अशी माझी इच्छा आहे."
"आमच्याशी संपर्क साधल्या बद्दल धन्यवाद! कविता, का चारोळी संग्रह?"
"नाही. पाच पंचेवीस कथा आहेत!"
"कथा लिहता? हल्ली कविता-चारोळ्याचे दिवस आहेत! तरी हरकत नाही. बर, एडिटिंग तुम्ही करणार का आम्ही पाहू?"
"असेल तुमच्याकडे तर, तुम्हीच करा. मला ते ऱ्हस्व -दीर्घ जमत नाही."
"ओके. कव्हर आणि मार्केटिंगचं काय?"
"अहो, ते तुमच्याकडेच असत कि? "
"असत असं नाही, पण आहे! करू देत का?"
"हो! हो! करा! पण ते रॉयल्टीच काय?"
"रॉयल्टी ना? ती तुम्हाला मिळतच राहील! पुस्तक जस, जस खपेल (?), तशी, तशी ती तुमच्या खात्यात जमा होत जाईल! त्याची काळजी नको!"
"पण किती?"
"किमतीच्या दहा टक्के!"
"फक्त?"
"हो, हाच ट्रेंड आहे सध्या!"
"बाकी?"
"बाकी आमच्या कडे रहातील! आणि हो कॉपी राईट प्रकाशकास्वाधीन असतात!"
"मग, लेखक म्हणून मला काय?"
"सर, तुमचं नाव ग्लोबलाईज होईल. आमचं नेटवर्क जबरदस्त आहे! भारतात नंबर एक! करायचं का पुस्तक?"
"करा!" म्हटलं काहीतरी पैसे सुटतील म्हणून म्हणालो.
"ठीक. तुमच्या कथांची फाईल आणि पंचाहत्तर हजाराचा रुपयांचा, प्रकाशनाच्या नावे असलेला चेक पाठवून द्या! का ऑन लाईन भरता? म्हणजे लगेच कामाला लागतो. एका एडिशन मध्ये दोनशे पुस्तके असतील सर, लेखकांना आम्ही सात प्रति देतो. तुम्हाला दहा देईन!"
"पंचाहत्तर हजार! हे कशाचे?"
"सर, हे पुस्तक छपाई, एडिटिंग, प्रूफरिडींग, मार्केटिंग या साठी!" डोम्बल हे कसले प्रकाशक?
आम्ही फोन बंद करून टाकला.
पूर्वी 'प्रकाशक' लेखकांना मानधन देत. आणि त्यांचे पुस्तक खपवून नफा कमवत. हल्ली लेखकांना खपवून पैसे कमवायचे दिवस आलेले दिसतात! त्यांच्या अडचणी आम्हास ठाव नाहीत. अस्तु! आम्ही तो छापील संसार सोडून दिला!

आमचे एक लेखकू फ्रेंडू आहेत. चौफेर लेखकू. (पहिला फेर -लोकल वृत्तपत्रे, दुसरा फेर-साप्ताहिके, तिसरफेर-मासिके, आणि चौथा फेर- दिवाळी अंके! चार-दोन छापील पुस्तके त्यांच्या नावावर होती.--पुस्तकावर त्याचे नाव छापलेले होते!) या ज्ञानी विदुषीस आम्ही, आमुची शंका पुसली.
"परम फ्रेनडा, आम्हास लेखक होणे आहे. काय करावे?"
क्षणभर उदास नजरेने त्यांनी आमुचे निरीक्षण केले.
"का, हि अवदसा?"
"मार्ग दाखव!" आम्ही चिवटपण सोडले नाही.
"त्या साठी आधी वाचक हो! वचा, वचा, मिळेल ते वाचत रहावे लागेल!"
"मी मोप वाचतो. काय एक एक भंगार लिहतात? असं वाटत कि, या पेक्षा तू कितीतरी बर लिहतोस!"
आम्हास त्या क्षणी हे ध्यानी आले नव्हते कि, आम्ही त्यांच्या पुच्छावर पाय दिलाय!
"मग झाले तर! असे इतरांची लिखाण हिणकस वाटू लागले कि, समजावे आपल्यात काही तरी गट्स आहेत! लिहण्यास सुरवात कर! बघू काय होतंय!"
त्यांच्या गर्भित सूचनेचे आम्हास, आता आता आकलन होत आहे! त्यांचा मतितार्थ इतकाच होता, कि "xxxx जोर असेल तर, काही तर खरडून दाखव! उगा आमच्या सारख्या लेखकावर जळू नकोस!"( चार फुल्यांचा संदर्भ--दुसरी फुली हि कानासाठी आणि शेवटची वेलांटी साठी आहे!)

तात्पर्य आम्ही अजूनही 'लेखक'होण्याची चिकाटी सोडलेली नाही. जमेल तसे लिहीत राहू, छापील पुस्तकासाठी नाही तर, तुम्हा वाचकांसाठी! आम्हास 'वाचकांचे लेखक' होणे पसन्त असेल, पुस्तकाचे होण्या पेक्षा!
तुम्ही वाचत रहा! आम्ही लिहीत राहू!

सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे. पुन्हा भेटूच. Bye.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपला हा पहिलाच धागा असल्याने बाकी लेखनाबद्दल कल्पना नाही पण हा चांगला जमलाय.
मला स्वतःला चार वाक्ये शुद्ध लिहता येत नाहीत पण थोडे धाडसाने नमूद करू इच्छितो की मराठीत तरी सध्या चांगले लेखन दुर्मिळ झाले आहे आणि जे थोडे ठीकठाक लिहितात ते लेखक कमी लेखकराव जास्त भासतात. छापील असो किंवा इन्टरनेटवरचे असो सगळे साचेबंध लिखाण मिळते वाचायला. हटके किंवा avant garde लेखन मराठीत वाचलेले आठवत नाही बऱ्याच काळापासून. तसे चांगले/वाईट/ठीकठाक लेखन ही वाचकसापेक्ष बाब आहे

हेहे
मस्त लिहिलंय.
आता आपल्याला ऱ्हस्व दीर्घ पण लक्षात ठेवावं लागत नाही.गुगल चा कीबोर्ड टाईप करता करताच चुका सुधारून टाकतो.
लिहिणं खोकला किंवा शिंकेसारखं असतं.एकदा 'आलं' की लिहून मोकळं व्हावं लागतं.बाकी मग समोरच्या रहस्यकथा वाल्याला 100 प्रतिसाद मिळाले की वादग्रस्त लिहिणाऱ्याला 1000 मिळाले ते बघून आपण थांबून चालत नाही Happy मनात लिखाण कोंडून ठेवलं की नसेल तरी बीपी होतं.आपण लिहीत राहायचं.

जमतंय की!!
बाकी शेतातली वांंगी विकणे आणि अक्षरं विकणे एकच प्रॉब्लेम असतो. मार्केटिंग.

पांचट