पुस्तक परिचय - मादाम क्युरी

Submitted by प्राचीन on 4 January, 2021 - 02:45

पुस्तक परिचय - मादाम क्युरी.
मूळ लेखिका - ईव्ह क्युरी
इंग्रजी अनुवाद - व्हिन्सेंट शीऍन
मराठी अनुवाद - अश्विनी भिडे - देशपांडे.
ग्रंथाली प्रकाशन.

एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना अतिशय आवडली म्हणून पुस्तक वाचावेसे वाटले, असा योग माझ्या बाबतीत पहिल्यांदा ह्या चरित्रपर पुस्तकामुळे आला.
शालेय जीवनात मेरी क्युरी आणि पेरी क्युरी अशा दोन शास्त्रज्ञांचं नाव माहीत झालं होतं. आणि विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी काय केलं ह्यापेक्षाही मला त्यांच्या नावांचा यमकामुळे होणारा मजेशीर उच्चार अधिक आवडत असे व त्यामुळे ते लक्षात राहिले. आताही' विदुषी अश्विनी भिडे - देशपांडे यांनी अनुवादित केलेलं' म्हणून पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. बाकी एरव्ही चरित्रपर पुस्तकं वाचताना भौतिकशास्त्र नि रसायनशास्त्र यांच्या प्रांतात पाऊल टाकलं नसतं.
त्यामुळे आधी प्रस्तावनेची प्रस्तावना करते. " वैज्ञानिक संकल्पनांचा बडिवार तिच्या लेखनात कुठेच आढळत नाही ; या कामात घरातल्यांना जसा मी भरपूर त्रास दिला तसं त्यांनीही मला भरपूर सतावलं. या 'परस्परसामंजस्यातून' जसा मला लाभ झाला, तसाच त्यांनाही झाला असेल,.. "; असे सहजसुंदर लिहून अश्विनीताईंनी माझी हे पुस्तक वाचण्याची इच्छा अधिक प्रबळ केली. अनुवाद वाचताना कुठेही कृत्रिमपणा किंवा जडबंबाळ वाक्यरचना आढळत नाही. मूळ लेखिकेचे, आईबद्दलचे अलवार भाव, प्रेम आणि आदर तितक्याच उत्कटतेने अनुवादात उतरले आहेत.
आता मूळ पुस्तकाची ओळख करून द्यायची आहे. मादाम क्युरी म्हणजेच मारी.. मारी व पिएर् अशी खरी नावे आहेत, हे मला पुस्तक वाचल्यावर कळलं. म्हणजे इथूनच बऱ्याच नवीन गोष्टी कळण्याची सुरुवात झाली खरंतर. वॉर्सा हे नावही 'वॉर्सा ते हिरोशिमा' पुस्तकाचे नाव म्हणून फक्त माहीत होतं. परंतु ह्या चरित्रामध्ये या शहराचं इतकं सतत अस्तित्व दिसतं, त्यामुळे वॉर्सा ही जणु एखादी व्यक्तिरेखा असल्यासारखं वाटतं. पोलंडमधील अध्यापकाच्या घरात जन्माला आलेली ही रूपसंपन्न मान्या(मारी), तिचं शुद्ध चारित्र्य, उत्तुंग बुद्धिमत्ता, कौटुंबिक जबाबदारीची जाणीवपूर्वक जपणूक व निभावणूक, अखंड ज्ञानलालसा, पुढे पिएर् सह विज्ञान व वैयक्तिक जीवनात केलेला सहप्रवास, अशा सर्व गोष्टी ईव्हने अतिशय संवेदनशीलतेने शब्दांत व्यक्त केल्या आहेत.
फ्रान्सच्या सोबोर्न विद्यापीठात डॉक्टरेटची पदवी मिळवलेली मारी ही पहिलीच विद्यार्थिनी. ;जगभरातून भौतिकशास्त्र ह्या विषयात पदवी मिळवणारी पहिली स्त्री; नोबेल पारितोषिक विजेती पहिली स्त्री ;दोन वेळा नोबेल मिळवणारी पहिली व्यक्ती आणि एक पेक्षा जास्त वेळा नोबेल पारितोषिक मिळवणारी बहुतेक (कारण अद्ययावत माहिती मी शोधलेली नाही) पहिली व एकमेव स्त्री, अशा अनेक 'पहिल्या' वहिल्या यशावर नाव कोरणारी मारी क्युरी आपल्याला थक्क करून टाकते. अनुवादिकेने आधीच काळाचे संदर्भ दिल्यामुळे, मारीच्या बालपणाच्या व शालेय आठवणी वाचताना तिच्या कुटुंबांच्या वेगळेपणाचं कौतुक वाटत राहतं. मारी मोठ्या बहिणीची उच्च शिक्षणासाठी तळमळ जाणून, तिला परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देते, त्याकरता स्वतः लहान वयात गव्हर्नेस ची नोकरी करते, मधल्या कष्टमय जीवनचक्रात आपली ज्ञानपिपासा जागी ठेवण्यासाठी झटते, पुढे ईप्सित साध्य करताना स्त्री म्हणून डावललं जाऊनही न त्रासता ध्येयाचा पाठपुरावा करते, पिएर् ला सर्वतोपरी साथ देत तरीही आपला अवकाश जपते, मारीची अशी अनेक गुणवैशिष्ट्ये मारीच्या लेकीने आपल्याला माहीत करून दिली आहेत. मारीचे बालपण वेगळ्या वातावरणात गेले याचं एक उदाहरण म्हणजे दर शनिवारी दुपारी वडील व ही चारही मुलं चहापान करताना साहित्यचर्चा करीत. एकत्रितपणे आस्वाद घेतलेल्या या कविता, देशभक्तीपर वाङ्मय यांनी मुलांमधील संवेदना प्रगल्भ बनवली असावी असे वाटते.
नंतर गव्हर्नेस म्हणून काम करत असताना, मारीने काही अनुभव लिहिले आहेत. त्यांपैकी एक मजेशीर अनुभव - "तीन वर्षे वयाच्या स्तास ला कुणीतरी सांगितलं की देव सगळीकडे आहे. त्यावर तो चेहरा वाकडा करून विचारत सुटला की देव मला धरून ठेवेल का? तो मला चावेल का?.."
यादरम्यान पोलंडमधील सामाजिक व राजकीय वातावरणातील ताणही आपल्या लक्षात येतात. विशेषतः फ्रान्स मध्ये शिकण्यासाठी मारी जाते, तेव्हा तेथील स्वातंत्र्य बघून चकित व आनंदित होते. तिच्या एका प्राध्यापकांचं शिकवणं वर्णन करताना ती म्हणते, " गणित शिकवताना त्यांची विवरणं इतकी सुस्पष्ट असत की विषयातले अडथळे दूर होऊन सारं जग त्यांच्या पायांपाशी लोटल्यासारखं भासे." प्रचंड प्रमाणात विज्ञानाच्या प्रेमात असणारी ही मुलगी पुढे म्हणते, "विज्ञान कधी कोणाला कोरडं कसं वाटू शकेल?"
अभ्यासाचा ध्यास घेतला असल्यामुळे ती आपल्या पाककौशल्य नसण्याबद्दल म्हणते," भौतिकशास्त्राची काही पानं वाचण्यात किंवा प्रयोगशाळेत एखादा प्रयोग करण्यात जर एखादी सकाळ व्यतीत करता येत असेल तर सूप बनवण्याची रहस्यं उलगडत मी ती वाया का घालवायची? " मला हे फार म्हणजे फारच आवडलं. ह्याचा लवकरच विषय व प्रसंगानुरूप उपयोग करण्याचे मनसुबे आहेत. Wink Wink
अशा विलक्षण मुलीला जोडीदार म्हणून पिएर् अगदी अनुरूप ठरला,हे अनेक प्रसंगांतून जाणवतं. त्याच्या अंतरंगात वैज्ञानिकासह एक उत्तम लेखकही नांदत होता ह्याचा एक नमुना-" आपण आपल्या आयुष्याचं स्वप्न बनवायला हवं अन् स्वप्नाचं वास्तव .."
म्हणुनच की काय, पोलंडला परतण्याचा विचार करणाऱ्या मारीचा अनुनय करताना हे महाशय शब्दांची फसवी योजना करतात, " विज्ञानाची कास सोडून देण्याचा तुला काहीही अधिकार नाही"
जमिनीवर फरशी नसलेल्या, गळक्या छताच्या टपरीमध्ये काम करीत, पैसे अपुरे असताना, ह्या जोडीने रेडियम चा शोध लावला. यावरून फ्रान्स सारख्या देशात वैज्ञानिकांना काय सहन करावे लागले होते ह्याची कल्पना आली आणि मग त्यावेळी पारतंत्र्यात असलेल्या आपल्या भारतात विज्ञानाच्या दृष्टीने काम करताना , मूठभर का होईना, एतद्देशीय लोकांना काय वागणूक मिळत असेल, असा विचार मनात आला.
मारीच्या प्रसिद्धीपराङ्मुख वृत्तीचा पडताळा कितीतरी वेळा येतो. पापाराझ्झी प्रमाणे तिच्या मागावर राहून खाजगी आयुष्यात डोकावू पाहणाऱ्या पत्रकारांना मारीने जे उत्तर दिले ते वाचल्यावर ती वैज्ञानिक होतीच, पण तत्त्वनिष्ठ होती, हे लक्षात येतं. "विज्ञानाच्या क्षेत्रात, आपण वस्तूंमध्ये रस घ्यायला हवा, व्यक्तींमध्ये नव्हे." व्वा..
मादाम क्युरींच्या आयरीन या मोठ्या मुलीलाही नोबेल पारितोषिक मिळालेले तिने पाहिले. मादाम क्युरी च्या तेजस्वी परंपरेला साजेसे व्यक्तिमव धाकट्या ईव्हलाही लाभलेले होते.
मादाम क्युरींच्या लेकीने लिहिलेल्या या चरित्रात आईबद्दलचं प्रेम दिसलं तरी त्याचा अतिरेक जाणवत नाही. कारण तिच्याच शब्दांत - "या तिच्या जीवनकहाणीत माझ्या पदरची किंचितही वेलबुट्टीची किंवा नक्षीची भर मी घातली, तर तो गुन्हाच ठरेल."
अशा पारदर्शक स्वभावाच्या मुलीनं लिहिलेलं हे चरित्र वाचनीय वाटेल, हे नक्की.

थोडक्यात माहिती - बेक्वेरल यांनी शोधून काढलेल्या उत्स्फूर्त किरणोत्साराच्या अभ्यासाकरता, मादाम क्युरी यांना पतीसोबत १९०३ सालचे नोबेल पारितोषिक मिळालेले होते. ह्या पारितोषिकाचे अर्धे मानकरी बेक्वेरल हेही होते. १९११ मध्ये त्यांना किरणोत्सारातील त्यांच्या कामाकरता, केमिस्ट्रीमधील नोबेल पारितोषिक मिळालेले होते. अमेरिकेतील स्त्रियांचे वतीने, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हार्डिंग यांनी त्यांना १९२१ मध्ये त्यांच्या विज्ञानसेवेकरता १ ग्रॅम रेडियम भेट दिले होते. त्यांच्या कामाच्या गौरवार्थ किरणोत्साराच्या एककास त्यांचे नाव दिले गेले. १ ग्रॅम रेडियमपासून दर सेकंदास प्राप्त होणार्‍या किरणोत्सारास “१ क्युरी” असे संबोधले जाऊ लागले. (संदर्भ : हेच पुस्तक).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं.
प्रस्तावनेची प्रस्तावनाही आवडली Happy

सुरेख परिचय. मारी क्युरींबद्दल नेहमीच कुतूहल वाटतं . त्यांचे भौतिकशास्त्रातील आणि रसायणशास्त्रातील नोबल, त्यांचे संशोधन , त्यांचा किरणोत्सर्गाने झालेला अंत , त्यांच झपाटलेपण सगळचं अद्भुत , आगळंवेगळं . खरंच थोर व्यक्ती .

सांज, मृणाली, साद व अस्मिता, मन्या
आभारी आहे.
मारी क्युरी खरंच विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. म्हणजे होतं.