आपण एक डोनट

Submitted by Barcelona on 28 December, 2020 - 21:52
डोनट

आपण एक डोनट
(उर्फ ओळख मायक्रोबायोटाची)

कधी तुम्हाला कुणी प्रेमाने "बरेली की बर्फी" म्हणाले असेल, तर कधी कुणी रागात “आरं बत्ताशा” अशी हेटाळणी ही केली असेल, किंवा कुणी तुम्हाला कधीच कुठल्याच गोड पदार्थाची उपमा दिली नसेल. मंडळी, हिरमुसले होऊ नका, कुणी उपमा देवो न देवो, जीवशास्त्रज्ञांना विचाराल तर आपण सगळे डोनट सारखे आहोत असे उत्तर येईल. मान पाठीकडे झुकवा की लक्षात येईल आमुखगुदांत पचनसंस्था साधारण मध्यभागी आणि आजूबाजूला आपले शरीराचे इतर अवयव अशी माणसाची रचना आहे. आता पेशीबंधनामुळे (sphincters) मुळे ह्या मधल्या पोकळीचे विविध भागात विभाजन होते जसे लहान आतडे, मोठे आतडे इ. पण एकूणात माणूस म्हणजे जणू मध्यभागी पोकळी असलेला डोनट आहे.

एकटा माणूस ही खऱ्या अर्थाने एकटा कधी नसतो कारण ह्या पचनसंस्थेच्या पोकळीत अनेक सूक्ष्मजीव - बॅक्टरीया, फंगस, अर्केया इ - सुखाने नांदतात. कशासाठी? माणसाला काही फायदा होतो का? ह्याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेने 2007 साली ह्यूमन मायक्रोबायोम प्रॉजेक्ट सुरु केला. त्यामुळे सूक्ष्मजीवांचे विशेषतः जीवाणूंची (बॅक्टरीया) अनेक महत्त्वाची कार्य किंवा फायदे लक्षात आले. जवळ जवळ 10 वर्ष चाललेल्या प्रॉजेक्ट साठी सुमारे 170 मिलियन डॉलर खर्च झाला आणि उपयोगी मायक्रोब्जचा डेटाबेस निर्माण झाला. अजूनही शास्त्रज्ञ ह्यावर काम करत आहेत पण काही ठळक गोष्टी प्रकाशित झाल्या आहेत.

ह्या प्रॉजेक्टमध्ये नाक-कान-घसा, मूत्रमार्ग, त्वचा, योनिमार्ग इ अन्य भागातील जीवाणूंचे ही फायदे अभ्यासले गेले. इथे मात्र आपण फक्त पचनमार्गातील जीवाणू बघू.

संशोधनानुसार मानवी पचनसंस्थेत सुमारे 3.0 × 10000000000000 (13 शून्ये!!) इतके सूक्षमजीव असावेत. एकत्रितपणे त्यांचा उल्लेख मायक्रोबायोटा असा केला जातो. त्यांचेच वजन जवळजवळ दोन ते चार पौंड भरेल. ह्यामध्ये साठ प्रकारच्या प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत. सामान्यपणे प्रौढ व्यक्तींमध्ये सूक्ष्मजीवांचे वैविध्य आढळते तर तान्ही बाळे व मुले यांच्यामध्ये कमी वैविध्य आढळते. बाळांना हे सूक्ष्मजीव आईकडून गर्भावस्थेत व जन्म होताना मिळतात. त्यामुळे ज्या बाळांचा जन्म सिझेरियनने झाला व ज्या बाळांचा जन्म योनिमार्गाद्वारे झाला त्यांच्या पोटातील सूक्ष्मजीवात फरक आढळतो. विशेषतः सिझेरियनने जन्म झालेल्या बाळात Lactobacillus, Bifidobacterium, and Bacteroides सारख्या प्रजाती आढळत नाहीत. हा फरक एक महिन्यापर्यंत टिकतो. त्यामुळे सिझेरियनने जन्मलेल्या बाळांना काही विशिष्ट विषाणूंच्या इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. (अर्थात डॉक्टर/नर्स योग्य ती स्वच्छतेची काळजी नवमातांना शिकवतात त्यामुळे हा धोका कमी होतो).

पुढे बाळांना दूध कोणते दिले जाते - स्तन्य किंवा फॉर्म्युला - ह्यानुसार मायक्रोबायोम बदलतो. स्तनपानावर वाढणाऱ्या बाळात bifidobacteria आणि Lactobacillus अधिक आढळतात तर फॉर्म्युलावर वाढणाऱ्या मुलांमध्ये हे जीवाणू कमी असतात. याचे दूरगामी परिणाम जसे एलर्जी, बाळदमा होऊ शकतात का ह्यावर संशोधन चालू आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार स्तनपानामुळे एलर्जीची शक्यता कमी होते असे दिसून येते. वरचे अन्न सुरू झाल्यावर दोन वर्षाच्या मुला-मुलीचा मायक्रोबायोटा प्रौढ व्यक्ती सारखा भासू लागतो.

आपण जे जेवतो किंवा जसे वागतो त्यानुसार प्रौढ व्यक्तीत ही मायक्रोबायोटा बदलतो. उदा: दात दोन वेळा घासतो की नाही किंवा आठवड्यातून लोणचे कितीवेळा खातो अशा अनेक दैनंदिन निर्णयांमुळे एकाच घरातील दोन व्यक्तींचा मायक्रोबायोटा सारखा असू किंवा नसू शकतो. हे सूक्ष्मजीव आपल्यावर जसे अवलंबून असतात तसेच आपण ही त्यांच्यावर अवलंबून असतो. उदा: ब जीवनसत्व आहारातून काही प्रमाणात मिळते पण याशिवाय मोठ्या आतड्यातील जीवाणू ब जीवनसत्त्व तयार करतात आणि आतड्यात स्रवतात. हे जीवनसत्व शोषले जाते व आपण वापरतो. तिच गोष्ट ड व क जीवनसत्वाला लागू होते. ऊन आहार इ मार्फत ही जीवनसत्त्वे शरीरात आली तरी त्यांचे वितरण, साठवण ह्या मध्ये जीवाणू मोलाचे कार्य करतात.

अगदी सरधोपट विधाने करायची असतील तर सूक्ष्मजीवांचे वैविध्य जितके जास्त तितके ते आरोग्याकडे नेणारे. हे वैविध्य टिकवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात (उदा: जनुके. hsa miRNA-515-5P असल्यास विशिष्ट प्रकारचे जीवाणू Fusobacterium अधिक वाढतात). आपल्या ताब्यातील दोन घटकांकडे शास्त्रज्ञांनी विशेष लक्ष दिले आहे - काय जेवतो व कसं जेवतो. उदा: आहारात पूर्ण धान्ये व फायबर असणे हे वैविध्यासाठी फायद्याचे आहे. या उलट मैदा किंवा साखरेचे पदार्थ यामुळे कमी वैविध्य आढळते. वैविध्य नसण्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात जसे वजन वाढणे किंवा मधुमेह होणे. तसेच मधुमेह इ आजार झाले असता पुन्हा जीववैविध्य स्थापन करण्यासाठी उपचार केले जातात. हे वैविध्य टिकवण्याच्या अट्टाहासापायी हल्ली प्रोबायोटीक्स, प्रीबायोटिक्स इ पदार्थांची चलती आहे. मात्र अमेरिकेत आता यू.एस.फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनीस्ट्रेशन (USFDA) ह्या संस्थेने प्री/प्रोबायोटीक्सचे औषधांसारखे नियमन करावे अशी मागणी वाढत आहे.

आपण कसं जेवतो ह्यावरही जैववैविध्य अवलंबून असते. शांतपणे जेवल्यास व्हेगस नर्व्ह मार्फत सर्व पेशींना योग्य ते संदेश मिळतात, पचन व्यवस्थित होते व योग्य वेळी स्रवणाऱ्या स्रावांमुळे जैववैविध्य टिकून राहते. हा दुमार्गी रस्ता आहे म्हणजे आपण जसं त्यांच रक्षण करतो तसेच तेही आपल्या मनाला लाभदायक आहेत. स्मरणशक्ती, एकाग्रता इ गोष्टी मायक्रोबायोमवर अंशतः अवलंबून असाव्यात. उदा: अल्झायमर्स सारख्या आजारात Ruminococcus and Butyricicoccus ह्या जीवाणूंचे प्रमाण कमी झालेले आढळते. उंदीरावरती केलेल्या प्रोबायोटिक्स प्रयोगात नैराश्याची व आतुरतेची (depression and anxiety) लक्षणे कमी झालेली आढळले आहे व याला कारण जिवाणूची आतड्यातील उपस्थिती आहे. माणसांवरती अशा पद्धतीचे प्रयोग होणे गरजेचे आहे. थोडक्यात, उपमा म्हणून डोनट सारखे असलो तरी आपण किती गोड हे आपल्या शरीरावरच नाही तर मधल्या पोकळीवर म्हणजे मायक्रोबायोमवरही अवलंबून आहे.

खरंतर मायक्रोबायोम या विषयाचा आवाका फार मोठा आहे - लेखमाला होईल इतका. मात्र विस्तार भयास्तव इथे फक्त काही सहज किंवा ढोबळ मुद्दे लिहीले आहेत. इथले कुठलेही विधान वैद्यकिय सल्ला नाही. वाचून आहारात काय बदल करता येईल अशी उत्सुकता निर्माण झाल्यास आपल्या डॉक्टर किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे योग्य. मंडळी, हे नवीन वर्ष तुम्हाला व तुमच्या मायक्रोबायोमला सुखाचं आणि भरभराटीचे ठरू दे हीच सदिच्छा!

संदर्भ -
https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK154091/
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6313131/
https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK154093/
https://www.frontiersin.org/articles/10.3389/fped.2019.00047/full#:~:tex...(22%2C%2064).
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6855943/
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6699480/#:~:text=There%20ar...)%20
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5980218/
https://pixabay.com/photos/donuts-pastries-kringel-cake-candy-4633039/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सी, फार छान आढावा घेतला आहेस! ज्या प्रमाणात आपल्या पोटातले सुक्ष्मजीव आपल्या शरीरात आरोग्याचे स्थैर्य राखण्यासाठी मदत करतात ते पाहता आपली पचनसंस्था ही दुसरा मेंदू आहे अशी एक थिअरी मांडतात त्यात तथ्य आहे असे वाटते.
सध्याच्या sanitizers ने भरलेल्या वातावरणात आपण कोरोना नष्ट करण्याच्या नादात आपले मित्र सुक्ष्मजीव तर नष्ट करत नाही ना हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. जे उंदीर प्रयोगांसाठी म्हणून जंतू विरहित (germ-free) वाढवले जातात त्यांची प्रतिकारशक्ती दुर्बळ असते. तेव्हा कोरोना आहे म्हणून अति उपाय करणे घातक आहे.

उपयुक्त लेख आवडला..

आपल्या विष्ठेतील जंतूंपासून काही औषधे करण्याचे संशोधन चालू आहे.

खूप छान आणि सोप्या शब्दात लिहिलं आहे.

रच्याकने,
उपमा म्हणून डोनट सारखे असलो तरी ..>> उपमा म्हणून डोनट? उद्या पोहे म्हणून मफीन्स द्याल! (दिवे घ्या)

खुप छान माहितीपूर्ण लेख. सोप्या भाषेत लिहिल्यामुळे पूर्ण वाचला आणि समजला. इंटरेस्टिंग माहिती आहे.

छान

गर्भावस्थेतील डोनट अवस्था , त्यात 3 लेयर तयार होतात , त्यापासून सर्व अवयव तयार होतात , मधली पोकळी पचनसंस्था बनते

रोजचा गट फ्लोरा व्यवस्थित रहावा म्हणून ताक भात , दही भात एकदा खाणे

सर्वांना धन्यवाद!
@ब्लॅक कॅट चित्राबद्दल फारच धन्यवाद. त्याने वाचाकांना डोनट उपमा का याची पटकन कल्पना येते. हो, दही-भात किंवा ताक-भात खाणे याने मायक्रोबायोम चांगला राहतो. पण हल्ली डबा इ मुळे मागचा भात (दहीभात) असे शक्य नसते म्हणून प्रोबायोटीक्सवाल्यांचे फावते.
@हरचंदपालव - Happy हो, "माणसाचा मफीन" असा पुढचा धागा काढेन Wink
@जि आणि कुमार सर - नुकतीच दोन-चार चांगली रिसर्च आर्टीक्ल्स ह्या विषयांवर वाचलेली आहेत. लिहू का नको विचारात होते. टाकते सविस्तर पोस्ट.

माझा अंदाज

दुधाचे दही ताक होते , तेंव्हा त्यातील शर्करा ऑलरेडी सर्व जिवाणूंनि वापरून सम्पवलेली असते, आता पुढे त्या कॉलनी जिवन्त ठेवायच्या असतील तर काहीतरी starch , sugar चा सोर्स लागेल , शिवाय भाताचे कण जिवाणू 'उगवायला' एक माध्यम म्हणून काम करतील , तांदळाच्या कणाकणात जिवाणू अडकून जास्त सरफेस एरियात कल्चर वाढेल ,

नुसते दही , ताक वापरण्यापेक्षा थोडा वेळ भातात कालवून ठेवले तर जिवाणूंची कवालिटी व क्वांटीटी वाढेल.

लॅबोरेटरीत जिवाणू वाढवतात तेंव्हा त्यांनाही काही ना काही असे सॉलिड , सेमिसॉलिड माध्यम द्यावे लागते , ते पोषणही देते व कॉलनी वाढायला सरफेसही देते

जि म्हणाल्याप्रमाणे सॅनिटायझरचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. त्यात नुसते जीवाणू मरत नाहीत तर जे उरतात ते अधिक 'रेझिस्टंट' होतात. चांगल्या, प्रभावी अँटीबायोटीक्सला दाद देईनासे होतात. आता प्रश्न येतो 'अनावश्यक' कशाला म्हणावे - माणसाला स्पर्श केल्यास (उदा: हँडशेक) सॅनिटायझर वापरलेच पाहिजे पण एकदा पुसलेल्या आपल्याच ऑफीसच्या डेस्कला हात लागला तर सॅनिटायझर गरजेचे नाही असे थोडे तारतम्य ठेवले पाहिजे. हात धुणे हे अधिक श्रेयस्कर आहे कारण विषाणू मरतात व जीवाणू रेझिस्टंट होण्याची भीती कमी असते.

कोलायटीस ह्या आजारासाठी विष्ठेचे प्रत्यारोपण हे आधुनिक (!!) तंत्र विकसित होत आहे. मुखाद्वारे प्रोबायोटीक्स इ देवूनही अनेक लोकांच्या आतड्यात ह्या बॅक्टेरियाचे पुनर्वसन होत नाही. तेव्हा त्यांचे जोडीदार वा अन्य तसेच जेवण घेणारी सुदृढ व्यक्तीची विष्ठा आतड्यात सोडतात. आजाराची लक्षणे कमी होतात. वजनवाढीसाठी ही ह्या प्रत्यारोपणाचा प्रयोग करण्यात आला आहे. ह्याला 'आधुनिक' म्हणावे का? खरं तर नाही. ४थ्या शतकात चीनमध्ये अशा पद्धतीचे उपचार करत होते. आज वापरतो तशी स्वच्छ पद्धती नसली तरी मूळ तत्त्व तेच आहे.

सहज जाता जाता - भारतात बाजारच्या पाणीपुरीच्या पाण्यात कुठे जीवाणू असतात असे ही प्राथमिक संशोधन झालेले आहे. त्यात चांगले कमी आणि अनेक घातक जीवाणू आढळले आहेत- Escherichia coli, Enterobacter, Klebsiella, Citrobacter, Salmonella and Shigella याचे प्रमाण जास्त असते. सबब चांगल्या स्वच्छ जागी पाणीपुरी खा!! (अमेरिकेत पाणीपुरी सरकार दरबारी लोकप्रिय नसल्याने अशा संशोधनाला अनुदान मिळत नाही. हॅरिस आल्यावर परिस्थिती बदलेल अशी आशा करू).

सुरेख लेख , नवीन माहितीबद्दल धन्यवाद.
E coli ने UTI हा बेकार प्रकार होतो. मगं Anti व प्रो बायोटिक्स घ्यावे लागतात.
Salmonella Recall आल्याने लेटस फेकून दिले आहे.
आपल्या दह्यात इथल्या योगर्टपेक्षा जास्त bacteria असतात का , संमिश्र मतं ऐकून आहे.
ओळखीत एका Autism असणाऱ्या मुलाच्या बाबाच्या मते काही मुलांमध्ये अत्यंत अशक्त गट असल्याने दिलेले immunization gut मधून पुढे न गेल्याने AUTISM होतो. हाही एक प्रवाद आहे म्हणे. त्यावेळेस निरोगी गट असणे फार महत्त्वाचे आहे अगदी पटले. (अवांतर आहे का , कळवणे )

हॅरिस आल्यावर परिस्थिती बदलेल अशी आशा करू.>>>
पिटिशन बनवावे काय , पाणीपुरीसाठी काय पण...डोनटशेप पाणीपुरी कल्पनेत येतेय. माझ्याकडे Donut is the center of the universe टि आहे... खरंच निघाले , who knew !! Wink

Readers digest चे लेख मी नियमितपणे वाचते. त्यात जिज्ञासाने लिहिल्याप्रमाणे सांगितले होते. Antibacterial hand soap चा वापर करण्याने प्रतिकारशक्ती कमी होते. कारण हेच सखे जिवाणू (friendly bacteria) मरतात. साधे साबण चांगले असते व पुरेसे होते यासाठी. कित्येक वर्षांनी कोविडमुळे आता पुन्हा Antibacterial soap अगदी भांडे घासायला सुद्धा सुरु केले. ज्या गोष्टी पटत नाहीत त्याही घाबरून कराव्या लागताहेत.
वरचे फोटो आधी washer dryer जोडी वाटली. मगं नीट पाहिले... छान आहेत , डोनट पर्फेक्ट उपमा. Black cat यांचे प्रतिसाद आवडले.
लेखमाला आली तर वाचायला आवडेल. असं वेगळे लिखाण खरंच आवडेल. Happy

Pages