अज्ञातवासी - भाग १६ - नवीन सुरुवात!

Submitted by अज्ञातवासी on 2 December, 2020 - 20:50

अज्ञातवासी या कादंबरीचे यापुढील सर्व भाग दर शनिवारी प्रकाशित होतील...

भाग - १५
https://www.maayboli.com/node/77353

"मोक्षसाहेब, निर्णय कसा बदलला अचानक?"
"माणूस बदलला, तर निर्णय बदलायला वेळ लागत नाही खानसाहेब."
"म्हणजे?"
"म्हणजे, मीच बदललो, तर माझे निर्णय कसे काय बदलणार नाहीत?"
खान थोडावेळ अस्वस्थ झाला...
"खानसाहेब, पंधरा दिवसांपासून मी एक मूक दर्शक होतो या सगळ्या खेळाचा. तरीही माझ्यावर हल्ला झालाच ना. या खेळात मी ओढला गेलोच ना?
मी कितीही पळालो, तरी हा खेळ माझी पाठ सोडणार नाही. म्हणून हा खेळ मला खेळायचाय... आणि अजूनही मला कळत नाहीये, मी का थांबतोय? मी वेडा झालोय, किंवा अति महत्वाकांक्षी.
किंवा... फक्त मी दादासाहेबांचा मुलगा आहे. म्हणून थांबलोय. प्रश्न खूप आहेत खानसाहेब, उत्तरे शोधावी लागतील."
"मोक्षसाहेब, हा खेळ जीवावरसुद्धा बेतू शकतो."
मोक्ष हसला.
"जे माझ्या जीवावर उठतील, सगळे मोक्षाला पात्र होतील."
खानही यावर मोठ्याने हसला.
"चला. आता मी झोपायला निघतो. उद्यापासून काम सुरू."
"हो. शांत झोपा. हैदर, साहेबांना खोली दाखव."
◆◆◆◆◆
आज वाडा शांत होता. निद्रिस्त अजगरासारखा!
मात्र खुर्ची धगधगत होती, आणि तिच्यावरचा माणूसही.
'मोक्षा, हा वेताळ तुला विचारतोय, तू परत का गेला नाहीस? खरं उत्तर दे, नाहीतर तुझ्या झोपेची शंभर शकले होऊन तुझ्याच अंथरुणात लोळण घेत पडतील.'
'बाबा...बसायला खुर्ची मिळेल?' पाय दुखतोय.
अवश्य!
मागून पिंगळा हसत एक तोडकी मोडकी खुर्ची घेऊन आला...
'तू? पुन्हा???' मोक्ष त्याच्याकडे बघून आश्चर्याने बघत म्हणाला.
'मी चरचरात आहे. मी तुमच्या भासात आहे, आभासात आहे. वास्तवात आहे, कल्पनेत आहे. जागृतीत आहे, स्वप्नात आहे!'
'आणि मोक्षा, तुझ्यात मी आहे, माझ्यात तू आहेस!' दादासाहेब मागून म्हणाले.
मोक्ष खुर्चीवर बसला.
'उत्तर दे मोक्षा...'
'मी तुमच्यासाठी थांबलोय.:
'चूक!' दादासाहेब ओरडले.
'मी खुर्चीसाठी थांबलोय.'
'पुन्हा चूक!'
'बाबा, मला तुमचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शोधून काढायचंय.'
'चुकतोय मोक्षा! नीट विचार कर.'
मोक्ष विचारमग्न झाला.
'वेळ नाहीये मोक्षा. लवकर.'
'मला खुर्चीवर बसायचंय... नाशिकवर राज्य करायचंय...'
'शाबास! चूक उत्तर! पण मला आवडलं...' दादासाहेब जोरात ओरडले.
'बाबा, मला नाही माहीत उत्तर!!!' तो रडवेला झाला.
'शोध, शोध, तुझ्या मनाचा अंधारा कानाकोपरा धुंडाळून काढ, शोध!'
मोक्ष सैरभैर झाला. त्याचं मन लहानपणापासूनच्या आठवणी धुंडाळू लागलं...
कधीही न बघितलेली आई...
गोदावरीत उडी टाकून जीव दिलेली आई...
गोदावरीतच बुडून गेलेला बाप...
त्याचा आयुष्यपट त्याच्या समोर तराळून गेला.
'मला शोधायचंय बाबा... तो ढसाढसा रडू लागला. मला शोधायचंय, का माझ्या आईने आत्महत्या केली. मला शोधायचंय का माझ्या आईचं नाव कुणी घेत नाही. मला शोधायचंय का कुणी मला इतिहास सांगत नाही. मला माझ्या नियतीला जाब विचारायचाय, का मला पोरकं केलं. मला प्रत्येक गोष्टीचा त्या विधात्याला जाब विचाराचाय.'
'शाबास! बरोबर उत्तर. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर शोध, आणि स्वतःलाही! सगळी उत्तरे मिळतील...'
दादासाहेब खदाखदा हसू लागले, व पिंगळा पंख पसरून उडून गेला.
...अचानक त्याला जाग आली.
तो का थांबला, याचं उत्तर त्याला आज मिळालं होतं.
अनेक प्रश्न घेऊन!
◆◆◆◆◆
आठ वाजता खोलीच्या दारावर टकटक झाली.
"चाय या कॉफी साब?"
"कॉफी!" मोक्षने आवाज दिला.
"ठीक आहे. लवकर तयार व्हा. खानसाहेब बोलावतायेत."
"होय."
मोक्ष आळस देतच अंथरुणातून उठला. अंघोळ वगैरे उरकून तो खानासमोर हजर झाला.
"मोक्षसाहेब, बसा. तुम्ही मला सांगितलं, की मला तयार व्हायचंय खुर्चीसाठी. पण ते इतकं सोपं नाही.
जगनअण्णानी जरी दादासाहेबांची निवड केली, तरीही ती मीटिंग बोलावूनच केली. म्हणून पुढची मीटिंग होईल, तेव्हाच खुर्चीचा वारसदार शोधला जाईल.
आता यात तुमचे नातेवाईक महत्वाचे असतीलच, राऊत आहेत, राणे आहेत. दादासाहेबांपुढे त्यांची ताकद कमी होती. पण आता तेही पुढे जायला बघतील."
मोक्ष शांतपणे ऐकत होता.
"पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे, भुतांनी तुम्हाला मान्यता द्यायला हवी. जर भुतं तुमच्या बाजूने असतील, तर कुणीही तुमचं वाकडं करू शकत नाही.
आणि अजून काही गोष्टी हळूहळू सांगेन. पण मोक्षसाहेब, सगळ्यात आधी बंदूक चालवणं शिकून घ्या. बंदूक तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण असते."
"कधी शिकवणार खानसाहेब?"
"मी नाही शिकवणार. यासाठी एक स्पेशल व्यक्ती असेल, आणि फक्त शूटिंग नाही, तर बऱ्याच गोष्टी ती तुम्हाला शिकवेल."
"कोण खानसाहेब?"
"येतच असेल आता खाली, बघा आलीच!!!
मोक्षसाहेब, ही माझी मुलगी...
...झोया!!"

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह .. झोया संग्राम शेलार!
आता ही मोक्षचे काम सोपे करेल की अवघड हे बघण्याची उत्सुकता.
प्रत्येक भाग आधीपेक्षा वेगळा. मस्तच!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

हा पण भाग मस्त.
फक्त पुढच्या भागाची वाट पहात बसणं नको वाटतंय.
येऊ द्या लवकर.

भन्नाट

मस्त