पाण्याची टाकी

Submitted by सांज on 30 November, 2020 - 01:28

सकाळी सकाळी देसायांच्या ओसरीवर चहाची बैठक रंगली होती. अण्णा फुरका मारत चहा पित होते. तर विजू सुपाऱ्या फोडत होता. पायरीवर बसून यमी, एकाच कानाने ऐकू येणाऱ्या माईला, तिच्या डाव्या कानांत तोंड खुपसून, साऱ्या घराला ऐकू जाईल अशा सुरांत वर्तमानपत्र वाचून दाखवत होती,
‘...आणि वाजपेयींनी पोखरणमध्ये यशस्वी अणू चाचणी घेतली’
माई त्या बदल्यात तिला अण्णांपासून लपून दर आठवड्याला एक कॅडबरी घेऊन द्यायची, त्यामुळे हे काम यमी भलतंच मन लावून करत असे.
तिला जरासं थांबवत माईने बापूला विचारलं,
‘ही अणू चाचणी म्हणजे काय रे बापू?’
बापूला नुकतीचं इंजिनियरिंगला ॲडमिशन मिळाली होती. त्यामुळे तो स्वत:ला आणि घरचे त्याला आईनस्टाइन समजायचे.
मग बापू भलताचं आव आणत म्हणाला,
‘माई, तो फारचं अवघड विषय आहे बरंका. त्याचं कसं असतं..’
‘अवघड अाहे होय.. राहूदे मग! यमे जरा ते भविष्याचं पान उघड की.. असेल कोणीतरी अणू आणि घेतली असेल तिची चाचणी.आपल्याला काय करायचंय.’
माईने बापूच्या ज्ञान पाजळण्याच्या उत्साहातली सारी हवाचं काढून घेतली!
या सगळ्यात बराचं वेळ सम्या तिथे घुटमळत होता. काय बोलू आणि कसं बोलू चालू होतं त्याचं. ते लक्षात येऊन नारायणराव त्याला म्हणाले,
‘काय रे सम्या..’
तितक्यात सुमती ताई माजघरातून ओरडल्या,
‘अहो! समीर म्हणा.. लग्न झालंय आता त्याचं!’
जरासं नरमून मग नारायणराव पुढे म्हणाले,
‘हम्म् समीरराव! कुठे अडलंय घोडं? बोला काय बोलायचंय!’
‘ते थोडंसं अण्णांशी बोलायचं होतं.. अण्णा, ते त्याचं असं झालं.. ते मी म्हणत होतो.. की.. ‘
समीर पुन्हा अडखळला.
मग शेवटी रमा, त्याची बायको, पुढे होत म्हणाली,
‘अण्णा, मी बोलू का थोडंसं?’
‘बोला की सुनबाई!’ अण्णा चहाचा कप बाजूला ठेवत उत्तरले.
एक दीर्घ श्वास घेऊन रमा म्हणाली,
‘आपण घरावर पाण्याची टाकी बसवुया का? म्हणजे मी आणि समीर पाहू टाकीचं आणि पाईपलाईनचं सारं.. तुम्ही फक्त परवानगी द्या.’
रमाने सरळ विषयालाचं हात घातला.
समीरसकट सगळे तिच्याकडे आ-वासुन पहात राहिले. चांगला करता सवरता झालेला असला तरी समीर अण्णांपुढे बोलायला अजून कचरायचा. हा विषय पण जरा नाजुकचं होता. वाड-वडिलांनी बांधलेलं हे आपलं घर कसं स्वातंत्र्य चळवळीचा भाग होतं, ते कसं वास्तूशास्त्राला धरुन आहे या सगळ्याचा अण्णांना प्रचंड अभिमान होता. त्यात जरासुद्धा बदल करणं म्हणजे देसायांच्या अस्मितेला हात लावण्यासारखं वाटायचं त्यांना. त्आणि समस्त आधुनिक सोयी-सुविधा म्हणजे केवळ भौतिक चोचले आहेत यावर तर त्यांचा ठाम म्हणजे ठामच विश्वास होता. त्यामुळे पाण्याच्या टाकीचा विषय काढून रमेने अतिशय सेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रवेश केलेला होता.
बराचं वेळ पसरलेली शांतता भंगत रमा पुढे म्हणाली,
‘म्हणजे बघा नं, जिथल्या तिथे नळं येतील. विहिरीतून, हौदातून पाणी उपसत बसावं लागणार नाही. बायकांची आणि पुरुषांचीसुद्धा किती कामं सोपी होतील शिवाय वेळसुद्धा वाचेल!’
अण्णांनी बराचं विचार केला आणि मग नातसुनेचा सडेतोडपणा आवडून की काय कोण जाणे पण अनपेक्षितरित्या ते म्हणाले,
‘ठीक आहे! करा काय हवं ते. पण घराची मोड-तोड न करता. हे घर म्हणजे काही साधं-सुधं नाही! प्रत्यक्षात स्वातंत्र्य चळवळीची खलबतं पाहिलेली आहेत या भिंतींनी...’
आणि अण्णा एक लक्ष वेळा घोटलेला तोचं किस्सा परत सांगणार हे लक्षात येऊन एकेकाने तिथून काढता पाय घ्यायला सुरुवात केली.

सम्याचं लग्न होऊन एक महिना होत आला होता. लग्नघराची कळा उतरुन रोजच्या जगण्याचे रंग घरावर उमटू लागले. जवळपास सारे पै पाहूणे लाडू-चिवडा घेऊन आपापल्या गावी परतले होते. मुळात घरातली माणसंच एवढी होती की देसायांना खरंतर आणखी पाहूण्यांची गरजच भासू नये. पण अघळ-पघळ सतराशे साठ नातेवाईकांचा गोतावळा जमवून गप्पा-गोष्टी करणे.. पोट फूटेस्तोवर रग्गड पाहूणचार करणे.. हे देसायांच्या गुणसुत्रांमध्ये भिनलेले गुण होते. मग पाहूणेही पाहूणे म्हणून न राहता घरातल्यासारखे वावरायला लागत. काल शेवटी राहिलेल्या नमू आत्यांना सांगलीला रवाना करुन सम्या घरी परतल्यावर रमेने जरा सुटकेचा नि:श्वास टाकला. ती एकतर नवीन लग्न होऊन घरी आलेली, त्यात घरात ही एवढी माणसं.. बावरुनचं गेली होती बिचारी. घरात कुठेही जा, सगळीकडे गप्पांचे फड.. स्वयंपाकघरच काय न्हाणीघरात सुद्धा! एकमेकींच्या आहेराच्या साड्या पाहणं.. अमक्याची सुमी किती बदललीय गं, लहाणपणी नुसती शेंबडी दिसायची.. किंवा तुम्हाला सांगतो जावई बापू कचेरीत साहेब फक्त मलाचं मानतो ( तो खरंतर हिंग लाऊनही विचारत नसतो ).. बाकी लग्न मात्र चांगलं झालं बरंका नारायणराव!.. आणि यावर माजघरातून हलक्या आवाजात कुजबुज, होणार नाहीतर काय! देसायांसारखी समजुतदार माणसं मिळायला नशीब लागतं हो!.. हे असे सगळे प्रकार घरभर चालू! त्यात वहिनी वहिनी किंवा काकू, मामी करत रमेच्या मागे पुढे घरातल्या लहानग्यांचा सदैव गराडा.. आम्ही कसे हुशार आणि गुणी हे त्या नव्या नवरीला पटवून देण्यासाठी त्यांची सारखी धडपड! पण या साऱ्या गोंधळात ज्या एका गोष्टीचा तिला चांगलाच धक्का बसला ती म्हणजे, जग एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभं असताना, देसायांच्या या जाज्वल्य घरात मात्र पाण्याचा साधा एक नळ सुद्धा नव्हता! पाणी विहिरीतून हौदात आणि हौदातून बादलीत असा द्राविडी प्राणायाम करत साऱ्यांना आन्हिकं आणि इतर कामे उरकावी लागत. स्वयंपाकघराची तर तऱ्हाचं न्यारी. विहिरीतून सोवळ्यात भरलेलं पाणी पूजेसाठी नि नैवेद्य बनवण्यासाठी आणि धूतवस्त्रात भरलेलं पाणी पिण्यासाठी आणि वरच्या स्वयंपाकासाठी अशी वर्गवारी होती. बरं यात बायकांनी काम करताना हात कुठे धुवावेत वगैरे प्रश्न गौणचं समजले गेलेले. बऱ्याचं वेळा वापरलेल्या कपड्याला हात पुसणे, किंवा तिथलंच थोडंसं पाणी घेऊन तिथेचं एखाद्या भांड्यात हात धुवून काम भागवणे किंवा मग हाताला पाण्याचा ‘थेंब’ लावून तो शुचिर्भूत करणे वगैरे सिस्टीमवर तिथलं कामकाज अव्याहत चालू होतं. आणि रमाला अजुन आश्चर्य याचं वाटलं की कोणालाचं त्याने काहीही फरक पडत नव्हता! पण मग तिने ठरवलं याचा पिच्छा आपण पुरवायचाच! ......

अण्णांच्या अनपेक्षित होकारानंतर पूर्ण घराला आता ‘येऊ घातलेली पाण्याची टाकी’ हा आयता विषय चघळायला मिळाला. यमीच्या लाऊड स्पिकरमधुन माईच्या डाव्या कानामार्फत टाकीचा विषय मेंदूपर्यंत पोचला, आणि,
‘शिव! शिव! शिव! आता वापरायचं पाणी ही स्वयंपाकघरात आणणार? परमेश्वरा, हाच दिवस पहायला ठेवलंस का रे मला.. शिवाशिव सगळी. बोलाव बाबा आता लवकर!’
असं म्हणून त्यांनी डोळ्याला पदर लावला. मगाशी याच माई भविष्य पाहत होत्या बरंका कुतूहलाने. बापू माईला म्हणाला,
‘माई अगं शिवाशिवीचं नसतं ते. आता पाणी मोटारीने विहिरीतून डायरेक्ट वर टाकीत जाणार आणि टाकीतून नळाने घरात!’
‘अॅं...??’ करत माईनं डावा कान पुढे केला.
बापूने जाऊदे म्हणत तिथून तळ हलवला.
आतल्या खोलीत आत्याबाई सुमती ताईंच्या कानात कुजबुजत होत्या,
‘सुमती, कानामागून येऊन तिखट तर नाही नं होणार ही रमा? पाहिलंस कशी बिनधास्त बोलत होती.. आपली नाही हो अशी अण्णासमोर बोलायची हिम्मत होत अजुन!’
‘वन्सं अहो, कामाचंच बोलत होती की पण ती!’ सुमती ताईंनी सावध पवित्रा घेतला.
‘ते ठीके गं, पण सांभाळून रहा हो तू!’ आत्याबाईंनी उगाचं पुडी सोडली.
इकडे माजघरात मधल्या काकूंनी मात्र रमेचं भरभरुन कौतुक केलं!

यथावकाश कामाला सुरुवात झाली आणि टाकीच्या आगमनाचा दिवस ठरला! इकडे माईंना वेगळ्याचं गोष्टीची धास्ती लागली होती. घरावर पाण्याची टाकी ठेवल्याने घर पडतं असं केणीतरी आपलं उगाचं त्यांच्या डाव्या कानात सोडलं आणि माई घाबरुन गेल्या. मग मोठ्या प्रयत्नांनी त्याची समजूत काढावी लागली पण पूजा केल्याशिवाय टाकी वर बसवायची नाही या अटीवर त्या तयार झाल्या. आणि शेवटी तो दिवस उगवला! टाकी दारात आली. घरातल्या बायकांनी तिला ओवाळलं आणि मगच तिचा गृहप्रवेश झाला. आणि मग शेवटी माईच्या आग्रहाखातर टाकीची यथासांग प्राणप्रतिष्ठापना देखील झाली!
मुलांनी जल्लोष केला.. अंगणातल्या नळाला कान लाऊन पाण्याला आवाहन करायला मुलं सज्ज झाली. नळ सुरु केल्यावर नांदी केल्या सारखा आधी हवेचा सुर्र आवाज आला..
आणि मग नळातलं पाणी आणि घरातल्यांची मनं दोन्ही वाहते झाले!!

- सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान

रमा असतेच गुणी!
गोड कथा
Submitted by किल्ली on 30 November, 2020 - 13:25>>>>> हे अगदी खरं Happy
गोष्ट छान आहे, फक्त जरा भरकन संपली असं वाटतंय.

स्वाती, थॅंक यू!
धनुडी, खूप पूर्वी लिहलेली कथा आहे. आता वाचताना मलाही असंच वाटलं.. Happy