रस्सा वाढ

Submitted by Rohan_Gawande on 21 November, 2020 - 22:43

दुपारचा १ वाजला होता, १० वाजताचा मुहूर्त असलेल लग्न एकदाच १ वाजता लागलं. अक्षदा टाकून झाल्यावर माझ्यासारखी असंख्य वर्हाडी लग्नमंडपातून पंगतीकडे जायचा मार्ग शोधू लागली. एप्रिल महिना आणि अपेक्षेप्रमाणे सूर्य सरळ माथ्यावर आग ओकत होता, मंडपातले कूलर फक्त नावापुरते होते, त्यासमोरही, वऱ्हाडातली लहान कार्टी नाचत असल्याने हवेचा अंशही माझ्यापर्यंत येत नव्हता. माथ्यावर आलेला घाम पुसत मी गर्दीतून मार्ग काढत निघालो, मंडपात दोन्ही बाजूने टाकलेल्या समांतर गाद्यांवर अजूनही म्हातारे सोयरिकीच्या गोष्टी हाणत बसले होते. मी त्या गाद्याच्या मधील सरळ रेषेने चालत सुटलो, अनेक घामेजलेले खांदे आणि पानाचा दर्प असलेल्या अडथळ्यांना पार करत मी मंडपाच्या बाहेर पडलो. पण बाहेर येऊन ही गर्दी अनेक दिशांनी जातांना दिसली- त्यामुळे पंगत नेमकी कुठे आहे हे कळायला मार्ग नव्हता. बाहेरही सूर्य त्याच काम चोख बजावत होता, चुलीवर भाकरी शेकतान्ना यावा तो अनुभव मला चुलीशीवाय येत होता. मी दूरवर एक नजर फिरवली- रखरखत्या उन्हात निंभाची आणि पिंपळाची काही झाड डौलाने उभी होती, बाभळीची काही खुरटं त्यांना आनंदानी साथ देत होती, त्याच्या आडोश्याला तितक्याच आनंदाने काही वर्हाडी चुना अन तंबाखू मळत बसली होती, त्यांच्या नजरा मला ‘हा आपल्या गावचा दिसत नाही’ अशा खुणावत होत्या. शेजारच्या मंदिरात अजून एक लग्न सुरु असल्याच जाणवल, पण पंगती कुठे आहेत याच्या ठाव लागत नव्हता. शेवटी निंबाखाली उभ्या एक म्हाताऱ्याला, मी इशारा करत विचारलं.
“हे तायडेच्या लग्नाची पंगत कुठं बसली हाय?”
त्याने तोंडातलं पान न थुंकता मंदिराच्या मागच्या बाजूने इशारा केला.
मी झपाझप पाय टाकून मंदिराकडे चालत सुटलो, मित्राचं लग्न असल तरी त्याच्या गावात माझ्या काही ओळखी नव्हत्या, लग्न लागताना मित्राच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायच्या नादात मी विनाकारण त्या गर्दीच्या चक्रवयूहात अडकलो, मंगलाष्टक संपत असतांना तरी मी सटकून बाहेर यायला हवा होतं -असे अनेक विचार मनात माशीसारखे घोंगावत होते. अपेक्षेप्रमाणे आधीच जेवणाच्या मंडपाच्या बाहेर बरीच गर्र्दी जमली होती. मुलाकडचे असलो तरी वय कमी असल्याने मला पहिल्या पंगतीत बसायला मिळणार नाही हे लगेच जाणवल, पहिल्यांदाच आयुष्यात वय कमी असल्याचं दुःख झालं आणि कारणही तसंच होतं- ते म्हणजे पोटातली “कातिल भूक”.
मी निंबाच्या झाडाखाली टाकलेल्या चटईवर पाय मोकळे केले, तिथून पंगतीचा मंडप दिसेल याची खात्री केली. आता वेळ काढायचा म्हणून शेजारी बसलेल्या बाबांसोबत गप्पा सुरु केल्या. गावात कुणासोबतही संभाषण सुरु करायचा गुरुमंत्र माझ्या कडे होता, तोच मी वापरला आणि संभाषण सुरु केलं:
“काय म्हणते पीक पानी बाबा?”
“काय सांगावं राजा…. ”
संभाषण सुरु झालं होतं पण ते सुरु असतांना सुद्धा माझा एक डोळा पंगतीच्या तयारीवर होता. हळू हळू वातावरणात खमंग वांग्याच्या भाजीचा सुगंध दरवळू लागला, त्या सुगंधातूनच त्या भाजीची तिखट चव जिभेवर आणि लाल तर्री डोळ्यासमोर आली. आता पर्यंत पोटातील कावळ्यांची जागा गिधाडांनी घेतली होती. इतक्यात आतून एका भल्या मोठ्या परातीत गरम पोळ्यांचा पहिला फेर आला. आचाऱ्यानी त्या गरम पोळ्या आपल्या लांब सडक सऱ्याट्यानी उभ्या कापल्या. पोळ्या वाढायला तयार झाल्या होत्या. एखाद्या थिएटर मध्ये हिरोची एन्ट्री व्हावी तशी एकेका पदार्थाची स्वयंपाकघरातून समोर प्रांगणात एन्ट्री होऊ लागली. मोठ्या गंजात वाफाळलेला भात, बादलीतून थोडं बाहेर ओसंडणार सुंदर पिवळं वरण, त्याच्या पाठोपाठ फिक्कट पिवळ्या कांतीची पातळ कढी, तेलात नुकतेच तडतडलेले भजे आणि पापड, गरम पाकातली ताजी लाल पिवळी बुंदी आणि ज्याची मी आतुरतेने वाट बघत होतो ती वांग्याची लाल भडक तर्रीची भाजी.
जेवणाच्या मंडपात जशी लांब लचक चटया टाकायला सुरवात झाली तशी जागा जिंकायला एकच झुंबड उडाली. काही बाबांनी एसटी ची जागा धरायच्या अनुभवाचा फायदा इथेही उचलला आणि रुमाल टाकून ठेवले. या सगळ्यात माझा अनुभव फारच तोडका असल्याने मला कुठल्या चटईच टोक सुद्धा लाभल नाही आणि पहिली पंगत फक्त डोळ्यांनी पाहण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही.
सगळी मंडळी स्थिरस्थावर झाल्यानंतर मीठ आणि निंबू नी सुरवात झाली, आणि त्या नंतर एके एक गडी पदार्थ आणू लागला. पत्रावळीवर पडणारा एक एक पदार्थ सगळी मंडळी नीट लावू लागली, मीठ निंबू एका कोपऱ्यात, पोळी भाजी सोबत, भाताला आळा घालून त्यात वरण ओतल गेलं आणि तुपासाठी एक मोठ्ठा पुकारा झाला.
“अरे पिंट्या तूप नाही वाढल का भातावर”
आणि मग तुपाची धार प्रत्येक ताटावर सोडण्यात आली.
“माय बोट वर आहे तोपर्यंत धार सोडाची ” अश्या अनेक सूचना सुरु झाल्या
“आबे किती बुंदी वाढली डायबेटीस आहे मले, जीव घेत माया” असा मायाळू स्वर कुठून तरी उमटला आणि मला कळलं की पंगत रंगली आहे. पोळीचा पहिला, दुसरा, तिसरा फेर झाला.
“पोळी-पोळी-पोळी-भात-भात-भात वाढू का काका?” अशी विचारणा आता सुरु झाली. डोक्यावर तिखट रस्स्याने येणाऱ्या घामाची तमा ना बाळगता वर्हाडी सपाटून भाजीवर ताव मारत होते. पोळीचा आग्रह संपल्यावर आता भात आणि भजे यांच लग्न लागलं होतं. भाताचे २ फेर आणि तुपाच्या असंख्य धारीनंतर जेव्हा बुंदीचा आग्रह सुरु झाला तेव्हा मला वाटलं कि आता लवकरच ही पंगत संपेल. हळू हळू एक एक जण जेवण आटपून देवाचं नाव घेत उठू लागला, काही काटक म्हातारी, वयाचा विचार ना करता, अजूनही भजे भातावर ताव मारत होती. आणि पाहता पाहता पहिली पंगत संपलेली होती. नवीन चटया टाकायला पोर धावू लागली आणि माझ्यासारखीच टपून बसलेली बाकी मंडळी, हळू हळू सावज पाहून बिबट्या डाव टाकतो तश्या हालचाली करू लागली.
मी या वेळी कुठलीही चूक करणार नव्हतो, मंडपाच्या कोपर्यातली जागा मी आधीच शोधून ठेवली होती, गर्दी मधून मार्ग काढत मी पुढे जात होतो, कोपर्यातली जागा अजून दूर होती, गावातल्या चपळ हालचालींपुढे माझी पावलं तशी मागं पडत होती, चटईवरच्या जागा पटापट जातांना मला दिसत होत्या आणि मी काहीच करू शकत नव्हतो, इतक्यात अचानक मित्राच्या काकांनी माझा हात धरला आणि आणि मंडपाच्या मागच्या बाजूने फाटलेल्या जागेतून मला आत पाठवलं. १० विच्या परीक्षेत पहिला आल्यासारखा मात ताठ करून मी मंडपात एक नजर फिरवली, मंडपात अजूनही लगबग सुरु होती, मी माझी स्वप्नातली जागा जिंकली होती. काही तासांच्या उत्कंठेनंतर, अशा प्रकारे, मी पत्रावळीसमोर बसलो, पहिला फेर सुरु झाला आणि वांग्याची भाजी पत्रावळीवर पडताच, मी मोठ्या दिमाखात आवाज दिला-
“अरे बाल्या, अजून रस्सा वाढ!!!”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी, अजुन पुढे लिहायचं की

अशा गावरान कथा टाकत चला, शंकर पाटील आणि द म मिरासदारी नंतर जाम पोकळी निर्माण झाली आहे

मस्तच...
काही तुलना वेगळ्या वाटल्या.

अशा गावरान कथा टाकत चला, शंकर पाटील आणि द म मिरासदारी नंतर जाम पोकळी निर्माण झाली आहे>>>>> येस्स! अजून येऊ द्या अश्या कथा. खूप छान वर्णन, अगदी डोळ्यासमोर गाव आला नी वातावरण पण.

मस्तच लिहिले आहे..
अगदी पंगतीला जाऊन आल्यासारखे वाटलं..जेवणाचे वर्णन पण भारीच..

छान लिहिले आहे. अगदी सचित्र आहे.
लग्नाचा मांडव, जेवणावळ, वांग्याचा तेल वाहणारा लग्नातल्या जेवणावळीतला रस्सा - सगळे डोळ्यासमोर आले.

वाह साहेब मजा आणलीत.. मला वांगे आवडत नसूनही पाणी काढलेत तोंडातून.. काय ते वर्णन.. आहाहा

मस्तच लिहिले आहे..
अगदी पंगतीला जाऊन आल्यासारखे वाटलं..जेवणाचे वर्णन पण भारीच..>>>++१११

मस्त लिहलंय. गावाकडच्या एप्रिल-मे च्या रणरणत्या उन्हात भर दुपारी लागणाऱ्या लग्नांची आठवण झाली.

भारी

Lol..... मजा आली वाचायला. मी खेड्यातील एकही लग्न अटेंड केलेलं नाही, त्यामुळे मला वाचायला गंमत वाटली.
पण काकांकडुन ऐकलेल्या खेड्यातील लग्नाच्या वर्णनात एवढे पदार्थ नव्हतेच. त्यांनी सांगितलं होतं की भात, वांग्याच्या भाजीचा तिखटजाळ रस्सा आणि बरोबर जिलेबी किंवा बुंदी एवढाच मेन्यु होता. पण बाकी सगळा गोंधळ, बसायला जागा नसणे वगैरे सेम कथेत लिहिल्यासारखंच होतं. आम्हाला हे वर्णन एवढं अचाट वाटलेलं की प्रत्येक वेळेस काकांनी ती आठवण काढली तरी आम्ही तेवढ्याच कुतूहलाने ऐकली.

लिखाणाची शैली आणि वेगळाच ग्रामीण विषय आवडला.

Lol..... मजा आली वाचायला. मी खेड्यातील एकही लग्न अटेंड केलेलं नाही, त्यामुळे मला वाचायला गंमत वाटली.
पण काकांकडुन ऐकलेल्या खेड्यातील लग्नाच्या वर्णनात एवढे पदार्थ नव्हतेच. त्यांनी सांगितलं होतं की भात, वांग्याच्या भाजीचा तिखटजाळ रस्सा आणि बरोबर जिलेबी किंवा बुंदी एवढाच मेन्यु होता. पण बाकी सगळा गोंधळ, बसायला जागा नसणे वगैरे सेम कथेत लिहिल्यासारखंच होतं. आम्हाला हे वर्णन एवढं अचाट वाटलेलं की प्रत्येक वेळेस काकांनी ती आठवण काढली तरी आम्ही तेवढ्याच कुतूहलाने ऐकली.

लिखाणाची शैली आणि वेगळाच ग्रामीण विषय आवडला.

वर्णन आवडलं.
आमच्या ऑफिसमधे मुरबाड तालुक्यातली मुले शिपाई म्हणून कामाला असतात. १८ व्या वर्षी कामाला लागतात आणि २१/२२ व्या वर्षी लग्न करतात. त्यामुळे अशा बऱ्याच लग्नांना हजेरी लागली आहे.
पदार्थ खूप कमी असतात पण बाकी सर्व घटनाक्रम अगदी उन्हाळ्यासकट तंतोतंत बरोब्बर..

Pages