केळीच्या पानातील ग्रिल्ड पापलेट (व्हिडिओ सोबत)

Submitted by डीडी on 22 November, 2020 - 02:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
  • पापलेट (आम्ही इथे काळा पापलेट घेतलाय साधारण ७५० ग्राम होता. माशाच्या आकारानुसार नग ठरवावेत)
  • हळद - २ टीस्पून
  • जाडं मीठ - १ टीस्पून
  • साधं मीठ - चवीनुसार
  • केळीचं पान - १  
  • मोहरी तेल - १ टीस्पून
  • थोडं नेहमीचं वापरातलं तेल

वाटणाकरिता  
---------------

  • आलं - १ इंच
  • लसूण - ४/५ पाकळ्या
  • हिरवी मिरची - १ ते २ (तिखट खाण्याच्या आवडीनुसार कमी जास्त करावी)
  • पुदिना - ८ ते १० पानं
  • कोथंबीर - अर्धा कप
  • काळी मिरी - अर्धा टीस्पून
  • अर्ध्या लिंबाचा रस
क्रमवार पाककृती: 

दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असले म्हणून हि खास चमचमीत पापलेट रेसिपी

  • साफ केलेल्या पापलेटला, जाड मीठ आणि १ टीस्पून हळद लावून चोळावे आणि १५ मिनिटं ठेवून द्यावे.
  • आम्ही काळा पापलेट घेतलाय. त्याला खवले थोडे जास्त असतात. जाडं मीठ चोळल्यामुळे जर काही खवलं राहिली असतील तर निघायला मदत होईल आणि मासा धुण्याआधी हळद लावल्याने त्याचा हिंवसपणा कमी होईल. जर सिल्वर पापलेट असेल, तर याची गरज पडणार नाही.
  • मासा स्वच्छ धुवून घ्यावा आणि प्रत्येक १ इंचावर चीर द्यावी.
  • चवीनुसार मीठ आणि १ टीस्पून हळद लावावी.
  • आलं, लसूण, पुदिना, कोथंबीर, मिरची, मिरी आणि लिंबाचा रस बारीक वाटून घ्यावं.
  • वाटण माश्याला लावून घ्यावे आणि माशाच्या चिरांमध्ये नीट भरून घ्यावं.
  • केळीचं पान तव्यावर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावे.
  • आता पानात वाटण लावलेला मासा गुंडाळून घ्यावा आणि सर्व बाजू टूथपिक लावून बंद कराव्यात किंवा दोऱ्याने बांधाव्यात.
  • मासा निदान अर्धा तास मॅरीनेट होऊ द्यावा.
  • ग्रीलपॅनला थोडा तेल लावून त्यावर मासा १५ ते २० मिनिटं माध्यम आचेवर भाजून घ्यावा. केळीच्या पानाच्या किती लेयर आहेत यावर हा वेळ कमी जास्त होऊ शकतो.
  • दुसरी बाजूही यानुसार भाजून घ्यावी.
  • मासा पानातून काढून एका ताटात घ्यावा. एका वाटीत जळता निखारा घेऊन त्यावर मोहरी तेल सोडून धूर करावा. वरून झाकण ठवून २ ते ३ मिनिटं बंद करावे. अप्रतिम स्मोकी फ्लेवर येतो.
  • आवडत असल्यास पापलेटला थोडं बटर लावावं. वरून लिंबू पिळून सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी!
हे पापलेट नव्हे,तर हलवा/ सरंगा आहे.

देवकी, मी माझ्या विडिओ मधल्या captions मध्ये आधीच म्हटलंय कि याला सरंगा/हलवा असेही म्हणतात. मी कोकणातील असल्याने मला हे बाळकडू आधीच मिळालं होतं. पण कदाचित तुम्हाला माहित नसावं म्हणून सांगतो, मी आता जिथे रहातो तिथे याला black pomfret म्हणतात. आणि ब्लॅक, सिल्व्हर आणि गोल्डन असे bifurcation करतात. थोडक्यात, आपण जे म्हणतो तेच सगळीकडे म्हणतात असं नाही. Wink
तुम्हाला vdo आवडला, खूप आभार Happy

केळीचे पान डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाजून बघा नेक्स्ट टाईम. तडकत नाही मग ते.
पान भाजण्याचा मूळ उद्देश ते मऊ पडावे व न फाटता मच्छी गुंडाळता यावी हा आहे. तो साध्य झालेला दिसला नाही.

दुसरं म्हणजे हे प्रकरण ग्रिल ऐवजी 'पात्रानी मच्छी' च्या जास्त जवळ गेलेलं वाटतंय.

माझ्या विडिओ मधल्या captions मध्ये>>>>> त्या पाहिल्या नाहीत.लेखातील फोटो पाहिला आणि व्हिडिओतील पहिली २ मिनिटे मासा नक्की तोच आहे हे पाहिले.लेख माबोवर टाकला असल्याने, मुंबईत त्या माशाला हलवा/सरंगा म्हणतात,हे सांगणे जरूरीचे वाटले इतकेच.

गोल्डन पापलेटबद्दल ,अमेरिकेतील कझनकडून ऐकले आहे.आपल्या पापलेट्ची चव नाही ग त्याला म्हणून उसासे सोडते.

व्हिडिओ खूप छान केलाय.
कोळशाचा धूर :डोळ्यांत बदाम: आम्ही वांग्याच्या भरतालाही अशी धुरी देतो कधीकधी. स्वाद फार मस्त येतो.

पापलेट माझा आवडता राजमासा... मग ते black असो किंवा white... कोकणी लोकांना पापलेट नाही आवडलं तरच नवल. Lol
साऊथ‌ ला गेलेले तेव्हा असाच एक केळीच्या पानावर बनवलेल्या माश्यांचा प्रकार ट्राय केला होता.... मला फारसं आवडलं नाही. मी करी, तिखल वगैरे बनवते,
पण तुम्ही बनलेल्या पद्धतीने केळीच्या पानावरच पापलेट नक्कीच करुन बघेन.

छान आहे रेसिपी,
पण हा हलवा आहे.
मला स्वत:ला हलव्यापेक्षा पॉपलेट आवडते, एकदा करुन नक्की बघेन

>>>पापलेट माझा आवडता राजमासा... मग ते black असो किंवा white... कोकणी लोकांना पापलेट नाही आवडलं तरच नवल. Lol>>> सिद्धी धन्यवाद तुम्हाला. माझा पर्सपक्टिव्ह परत मूळपदावर आणल्याबद्दल. मध्यंतरी कोणीतरी पापलेटबद्दल हिणकस शेरा मारला होता की पापलेट्ला काय चव असते होय? आम्ही तर अगदीच अन्य मासा मिळाला नाही तर पापलेट खातो वगैरे. मला धक्काच बसला होता कारण तोवर मी पापलेटला वन ऑफ द सर्वोच्च मासे, समजत होते, मग म्हटलं आपलंच काहीतरी चुकलं असेल, पट्टीचे खाणारे, पापलेट खातही नसतील. पण तुम्ही कोकणातल्या आहात आणि तुम्हीही आवर्जुन सांगीतलेत की पापलेट कोकणात राजमान्य आहे. आता तो शेरा परत एकदा तपासून बघेन Happy तुमचे आभार Happy

मला धक्काच बसला होता कारण तोवर मी पापलेटला वन ऑफ द सर्वोच्च मासे, समजत होते,..........सामो, बरोबरच आहे ते.पापलेट राजस मासा आहे.

@सामो-
माझ्या पापलेटला हिणकस शेरा मारला - Angry
कोण ते? नाव सांग फक्त ( तलवारी, भाले हातात घेऊन)
Wink Wink

Pomfret-
IMG_20201124_203035.jpg

Halwa- black pomfret
IMG_20201124_202930.jpg

Papaletch a jara shrimant भाऊ.तो म्हणे जास्त टेस्टी असतो असे दर्दी म्हणतात.मला मात्र हा वरचाच जास्त आवडतो.
उद्या मासेवल्याने आणलेच कापा तर फोटो टाकेन.

कापरी पापलेट म्हणजे पापलेटच, पण साधारण पापलेट पेक्षा बराच मोठा आकार आणि अधीक टेस्टी, किंमतही जास्त असते...
आमच्याकडे पापलेटचा बाप म्हणतात त्याला... Lol
@देवकी ताई & vb-
images (21).jpeg

सिद्धी, आम्ही जास्त मासे खाऊ नाही त्यामुळे गल्लत झाली. वर जो कापा म्हणून फोटू आहे त्याला आम्ही हलवा म्हणतो, अन ब्लॅक पॉपलेट दिला आहे तो वेगळा आहे.

देवकी ताई, हो, यापेक्षा वर जो पांढरा पापलेट आहे तो जास्त चविष्ट असतो, फक्त नग मोठे असायला हवे म्हणजे मजा येते छोटे छोटे ओके ओके लागतात.
माझे असे निरीक्षण आहे की बरेच लोक छोटे वाले पॉपलेत आणतात अन मग नाव ठेवतात, मस्त भरलेला मोठ्ठा मासा बनवून खाल्ला की वेगळीच चव येते

देवकी, मीरा, फारएण्ड, टवणे सर, सनव, प्राजक्ता, ललिता-प्रीति , VB, अभि_नव.. खूप धन्यवाद तुम्हाला विडिओ/पाकृ आवडली. Happy

सनव, कोळसा स्मोक नाही केलं तर खूप फरक पडेल का?>> छान स्मोकी फ्लेवर येतो. आमची आजी पूर्वी हे चुलीत भाजायची.. ते करणं आम्हाला शक्य नसल्याने हे workaround Happy

आ.रा.रा. शूटच्या दिवशी फाटक का असेना पण पान मिळालं हेच आमचं नशीब होतं. असो. अजून सुधारणा असतील तर नक्की सांगा. Lol

Pages