"शल्य"!!
__________________________________________
" छोटेसे बहीण भाऊ ...उद्याला मोठाले होऊ!
उद्याच्या जगाला.. उद्याच्या युगाला... नविन आकार देऊ!
छोटेसे बहीण भाऊ...!!" तपस्या आज शाळेत शिकविलेली कविता आपल्या दादाबरोबर गोड आवाजात म्हणत होती.
"ए दादा ! मला पण ती पारंबी दे ना.!. मला पण झोका घ्यायचा आहे".
" नको सोनु .. तु पडशील.. मग आई मला ओरडेल. !"
" दे ना... दे ना रे दादा!"
" चल सोनु .. आपण तळ्याजवळ जाऊया!"
" हा... चल ... दादा!"
" दादा.. ती कमळाची फुले किती छान दिसतात ना तळ्यात!! मला देशील का आणून?"
"हो सोनु ! तू इथेच थांब काठावरच ...मी आणतो जाऊन!"
" सांभाळून जा दादा ! ए.. दादा पुढे नको जाऊ ... दादा ss काय झालं दादा ss ? बाहेर ये ...पाणी खोल असेल दादा ss बाहेर ये ..!!." दहा वर्षाची तपस्या घाबरून जोर- जोरात ओरडत होती.
" दादा . ss .दादा ss...माझा दादा..!!." जोर-जोराने ओरडत तपस्या झोपेतून जागी झाली. शेजारी झोपलेला तेजस तिच्या ओरडण्याने धडपडून उठला.
" काय झालं.. तपस्या? स्वप्न पाहिलसं का ? एवढी घाबरली आहेस तू?"
घामाने डबडबलेली तपस्या रडतच तेजसच्या मिठीत शिरली . तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटत तेजस म्हणाला, " मी आहे ना ? तू का घाबरतेस? झोप शांत!!"
" तेजस, मी नाही विसरू शकत दादाला.. तो रोज स्वप्नात येतो माझ्या !" तपस्या हुंदके देऊ लागली.
" हो तपस्या, मला माहित आहे.. पण तपस्या जे तुझ्या आयुष्यात घडून गेले आहे त्याचा एवढा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. !! बरं .. आता शांत झोप बघू ..सकाळी ऑफिसला जायचं आहे ना?
" हं....."
--------------------- XXX ------------------
तपस्या आणि तेजस एक विवाहित जोडपं. लग्नाला साधारण एक वर्ष झालेलं. दोघेही उच्चशिक्षित, चांगल्या पगाराच्या नोकरीवर असणारे मध्यमवर्गीय कुंटूंबातले तरुण - तरुणी. कुणाच्याही अध्यात- मध्यात नसणारे तेजस व तपस्या आपल्या सहजीवनाचा आनंद पुरेपूर उपभोगत होते . पण गेल्या काही दिवसापासून तेजसला तपस्यामध्ये फरक जाणवत होता. तिच्या वागण्या - बोलण्यात सुसंगती नव्हती. हसऱ्या चेहर्याची तपस्या कुठे तरी हरवल्यासारखी राहू लागली होती. लहान-सहान गोष्टींवरून चिडचिड करत होती. कधी खूप निरर्थक बडबड करत होती आणि मग बोलता - बोलता अचानक गप्प बसत होती. तेजसला हे सारं जाणवतं होते पण रोजची धावपळ, ऑफिसमधील कामाचा ताण, शारीरिक आणि मानसिक थकवा यामुळे हे सारे घडतं असावं अशी समजूत त्याने त्याच्या मनाची घातली. पण एके रात्री मात्र त्याला तपस्याच्या विचित्र वागण्याने धक्का बसला. त्यादिवशी मध्यरात्री सुवासिक गंधाने तेजसची झोप चाळवली. तो अर्धवट झोपेतून उठला.. बघतो तर काय , बाजूला तपस्या नव्हती. त्याने मोबाईलमध्ये पाहिलं तर रात्रीचे अडीच वाजले होते . एवढ्या रात्री तपस्या कुठे गेली असावी म्हणून तो उठून घरात पाहू लागला. त्याने बाथरूममध्ये पाहिले पण ती बाथरूममध्येही नव्हती. मग तो हॉलमध्ये आला आणि समोरचे दृश्य पाहून जागच्या जागी थबकला. पांढरी शुभ्र साडी नेसून, केस मोकळे सोडून तपस्या पाठमोरी बसली होती. तिच्यासमोर चौरंगावर देवीचा फोटो होता. फोटोसमोर पूजेचे साहित्य मांडलेले होते. एका हातात निरांजन घेऊन तपस्या देवीच्या फोटोला ओवाळत असंबद्ध बडबडत होती. तेजस अवाक् होऊन हे सारं पाहत होता. झटक्यात तपस्या मागे वळली. तिला तेजसची चाहूल लागली होती. त्याला तिथे पाहून तिच्या डोळ्यात अंगार पेटला. तपस्याच्या चेहर्यावर अनोळखी भाव दाटून आले. तिने पूर्ण कपाळाला कुंकू फासले होते. तिचा चेहरा भयाण दिसत होता. तिला त्या अवस्थेत पाहून तेजस हादरला.
" का आलास इथे? "
" तपस्या !! तू .. तू.. हे काय करते आहेस? " तो घाबरून म्हणाला.
" चालता हो इथून... आत्ताच्या आत्ता! माझ्यासमोर देवी प्रकट होणार आहे आत्ता ...इथे .. माझी देवी मला दर्शन देणार होती आज.. पण .. पण.. तू भंग केलीस माझी पूजा... आता सर्वनाश होईल... सर्वनाश होईल आता!" तपस्या विचित्र आवाजात ओरडू लागली.
"काय बोलतेयं तपस्या? भानावर ये... तपस्या!" तिच्या जवळ जात तेजस म्हणाला .
"हात लावू नकोस मला ...माझ्या जवळ येऊ नकोस..!! काल देवी माझ्या कानात म्हणाली होती... मी उद्या तुला दर्शन देईन.. तुझ्यासमोर प्रकट होईन... तू .. तू..का आलास इथे? सोडणार नाही मी तुला?" बाजूला पडलेला चाकू उचलून त्वेषाने ती तेजसवर धावून गेली. तिचा हात पकडुन तिच्या हातातला चाकू फेकून देत तेजसने तिच्या गालावर रागाने थप्पड मारली. त्या थपडेने तपस्या सोफ्यावर कोलमडली. तिचा चेहरा भयानक दिसत होता. तिची अशी अवस्था पाहून तेजस मुळापासून हादरला. थकलेल्या तपस्याला थोड्याच वेळात सोफ्यावर झोप लागली. पण ...तेजस? त्याला कशी झोप येणार ? त्याची मती गुंग झाली होती. हे काय नवीन प्रकरण आहे ? फार दिवसांपासून त्याला तपस्यामधला फरक जाणवत होता. पण आज हे जे काही घडले ते खूप विचित्रच म्हणावे लागेल. !! त्याला ह्या असल्या विचारांमध्ये कधी झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी खिडकीतून चेहऱ्यावर उन्हाची तिरीप आल्याने तो झोपेतून उठला . सोफ्यावर तपस्या नव्हती आणि हॉलमध्ये रात्री त्याने जे दृश्य पाहिलं होतं त्याचा कुठे मागमूसही नव्हता. हॉल झाडून पुसून लख्ख केलेला होता.
" अरे, तेजस तू हॉलमध्ये कसा आलास ? मी सोफ्यावर झोपले कधी ? टि. व्ही. बघता - बघता झोपले की काय आपण दोघे इथेच? आणि तू काय पसारा केला होतास हॉलमध्ये ?" तपस्या हसत- हसत तेजसला विचारत होती.
"मी? मी काय केलं होतं हॉलमध्ये? तपस्या तू रात्री हॉलमध्ये पूजा करत होतीस ना?"
" मी...? कधी? " तपस्या आश्चर्याने तेजसकडे पाहू लागली.
" तुला खरचं आठवतं नाही तपस्या?"
. " मला काहीही आठवत नाही.. !! तू उठ आता आणि स्वतःचं आवर.. !"
तेजस चकित झाला. हे असं कसं होऊ शकते? की ...मी रात्री स्वप्न पाहिलं आणि स्वप्नात येऊन इथे झोपलो !!
नाही.. नाही ... ते स्वप्न असू शकत नाही. तपस्याला खरचं रात्रीचा प्रसंग आठवत नाहीये की ती ढोंग करतेयं ? पुन्हा त्याच्या डोक्यात विचारांचा भुंगा कीस पाडू लागला.
--------------------- XXX ------------------
" मी उद्यापासून सुट्टी टाकली आहे ऑफिसमध्ये!" संध्याकाळी तेजसने घरात पाऊल टाकता क्षणीच तपस्याने त्याला सांगितले.
"का बरं ? काही खास कारण ? " तेजस आश्चर्याने म्हणाला.
" नाही जायचं मला ऑफिसला ! सगळे एकजात दुश्मन बसले आहेत माझे तिथे... सगळे जळतात माझ्यावर... मी हुशार आहे... सुंदर आहे .. आता माझं प्रमोशन होईल म्हणून सगळ्यांना पोटदुखी झाली आहे.. माझ्या देवीने मला सांगितलयं कानात येऊन .. मी जर तिथे गेले तर मला गच्चीवरून ढकलून देणार आहेत सगळे..!!." अचानक रागाने उठून तपस्या मोठ्या आवाजात ओरडू लागली.
" तू . तू.. पहिल्यांदा शांत हो ..तपस्या! काय प्रॉब्लेम झालाय मला सांगशील का? "
" नाही करायची नोकरी मला.. बाहेर सगळे माझ्या वाईटावर टपून बसले आहेत. तू बाहेर जाऊ नकोस ...तेजस ..तो रिक्शावाला आहे ना आपल्या बिल्डींगसमोर रिक्षा लावतो तो... तो ... ना तलवार घेऊन येणार आहे तुला मारायला... तू . तू.. नको जाऊ बाहेर... आणि ती.. ती ... पूजा आहे ना माझ्या ऑफीसमध्ये .. माहीत आहे ना तुला..? .खूप दुष्ट आहे ती !! संपूर्ण ऑफिसमध्ये तिने माझी बदनामी केली आहे. मी ऑफिस मध्ये पाय टाकला की सगळे माझ्याकडे पाहून हसतात, एकमेकांकडे पाहून खूप कुजबुजतात.. नाही जायचं मला कुठे... मी घरीच राहणार आता .. बाहेर लोक टपले आहेत मला मारायला...!!"
" शांत हो... तपस्या!! तुझा काहीतरी गैरसमज झालायं!!" तेजस समजावणीच्या सुरात म्हणाला.
" गैरसमज ... ? तुला समजत नाहीये तेजस मी .. मी.. काय म्हणतेयं ते.. ती पूजा आहे ना .. ती आज मला ट्रेन मधून ढकलून मारणार होती.. हा.. असाच प्लॅन होता तिचा... पण... पण माझ्या देवीने वाचवलं मला तिच्यापासून... काय समजते ती स्वतःला? माझी देवी आहे माझ्यासोबत... कोणाच्या बापाची हिंमत आहे मला मारायची...!!" तपस्या विक्षिप्तपणे जोर-जोराने हसू लागली. तिला तसे हसताना पाहून तेजस भयंकर घाबरला. तिच्या चेहऱ्यावर अनोळखी भाव दिसू लागले. तिला जोरजोराने हलवत तेजस ओरडू लागला, " तपस्या ... तपस्या ..भानावर ये तपस्या ... काय करतेस तू? वेडी झाली आहेस का? वेडी? ...
वेडी ....? काय ? तपस्या खरचं वेडी झाली आहे का? नाही... नाही ... माझी शांत , सोज्वळ, शहाणी तपस्या वेडी कशी होईल? पण मग तिच्या डोळ्यात दिसते ती झाक तुला वेडेपणाची नाही वाटतं का ? तिचे भावनाशून्य डोळे... कुठेतरी हरवलेली नजर.. त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला.
--------------------- XXX ------------------
" आई... !! तू इथे थोड्या दिवसांसाठी माझ्याकडे येशील का? " फोनवर तेजसने सुलोचनाबाईंना विचारले.
" काय झालं तेजस? काही प्रॉब्लेम झालायं का? " सुलोचनाबाईंनी तेजसला प्रतिप्रश्न केला.
" हा.. म्हणजे तपस्याला थोडं बरं वाटतं नाहीये!"
सुलोचनाबाईंचा चेहरा उजळला.
" काही गोड बातमी आहे का तेजस?" लेकाच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेल्याने ती माऊली नातवाच्या बाळलीला पाहण्यास आसुसलेली होती.
"नाही.. नाही .. आई तसं काही नाहीये. तू इथे आलीस ना की तुला सगळं सांगतो मी!" घाई-घाईने तेजसने फोन ठेवला.
काय बरं झालं असावं तिथे! सुलोचनाबाईंच्या जीवाची घालमेल वाढली. त्या तेजसकडे जाण्याच्या तयारीला लागल्या.
"ये .. आई !!" दरवाजा उघडत आईची बॅग हातात घेत तेजस म्हणाला.
" अरे.. तपस्या कुठे आहे ?"
" ती जरा झोपली आहे. रात्रभर झोप लागत नाही तिला.. आता थोड्या वेळापूर्वी झोपलीयं ती!"
सुलोचनाबाईंनी घरभर नजर फिरवली. घरात पूर्वीसारखं प्रसन्न वाटत नव्हतं. पंख्यावर धुळीचे थर साचले होते. त्या उठून स्वयंपाक घरात गेल्या. तिथेही त्यांना अव्यवस्थितपणा दिसून आला. एक स्त्री घरात असूनही घराला अवकळा आल्यासारखं घर दिसत होतं. एरव्ही टाप-टीप आणि स्वच्छतेची आवड असणारी तपस्या एवढी अजागळ कशी झाली? एवढं सुंदर घर ..लाखो रुपये कर्ज काढून घ्यायचं आणि त्याची अशी दुर्दशा करून ठेवायची! मनातल्या मनात त्या म्हणाल्या. त्यांनी स्वतःच चहाच आधण ठेवलं. फ्रीजमधून दूध काढतानाही त्यांना जाणवलं की, फार दिवसांपासून फ्रीज स्वच्छ केला गेला नाहीये. फ्रीजमध्ये बऱ्याच वस्तू विनाकारण कोंबलेल्या आहेत. चहा घेऊन त्या हॉलमधे बसल्या. एवढा वेळ होऊनही तपस्या उठली नव्हती.
" तू सांगितलं नव्हतं का तिला.. मी येणार आहे ते?"
" हो .. आई ! सांगितलं होतं पण आजकाल तिचं वागणं खूप बदलले आहे!".
नंतर तेजसने मागच्या काही दिवसांत काय काय घडलं ह्याची माहिती आपल्या आईला दिली. तेजसचं सगळं ऐकून त्यांना पण धक्का बसला. पण बाई धीराच्या होत्या. नामांकित शाळेतून मुख्याधिपिका म्हणून निवृत्त झालेल्या. बराच भला- बुरा अनुभव गाठीशी बाळगून होत्या बाई...
" ये.. तपस्या!! कशी आहेस? बस इथे!" तपस्याला पाहून तिला सुलोचनाबाईंनी आपल्याजवळ बोलाविले.
" बरी आहे!" आपल्याच तंद्रीत तपस्या उत्तरली.
खोल गेलेले डोळे... त्याखाली काळी वर्तुळे... चेहऱ्याची अगदी रया गेल्यासारखी !! एवढी सुंदर मुलगी आणि तिची ही अवस्था पाहून सुलोचनाबाईंच्या काळजात चर्र झालं.
" आई तुम्ही कधी आलात? "
" हे बघ आत्ताच आले !"
"चहा ठेवते !" तपस्या उठत म्हणाली.
" नको ...आमचा झाला चहा घेऊन! तुझ्यासाठी पण केलायं चहा.. तू पण घे चहा.. बस इथे !" सुलोचनाबाई प्रेमळपणे म्हणाल्या.
तपस्या त्या दोघांसोबत बसली खरी हॉलमध्ये .. पण तिथे ती फक्त शरीराने होती ....आणि मनाने? ...मनाने ती फिरत होती एका आभासी दुनियेत... एका भ्रामक जगात... असं जग जे फक्त तिचे होते. ....वास्तवापेक्षा खुप वेगळे... ती एकटीच हुंदडत होती त्या जगात ... तिच्या भ्रामक कल्पनेच्या जगात ....हिरवीगार डोलणारी शेतं... त्यातून खळखळ वाहणारे ओढे .. गुंजन करणारे पक्षी... हिरव्यागार बांधावरुन शीळ घालत चालणारा तिचा दादा आणि त्याच्या मागे धावणारी चिमुरडी तपस्या !!
"आई गं!"
" काय झालं सोनू ? पडलीस का ? "
" हो.. " रडत रडत तपस्या म्हणाली.
" सोनू ..तुला लागलयं बघ..! रक्त येतेयं बोटातून . थांब मी रुमालाने बांधतो!"
" हळू बांध दादा.. दुखतयं मला!"
" आता बरं वाटेल बघ तुला! चल आपण तळ्याकडे जाऊ!"
" चल दादा .. ती कमळाची फुले किती छान दिसतात ना? मला देशील आणून?"
" तू इथेच थांब सोनू... तळ्याच्या काठावर.. पाण्यात नको येऊस.. मी आणतो कमळ!".
"दादा ss दादा ss पुढे नको जाऊस .. खोल पाणी आहे दादा ss दादा ss मागे फिर ...दादा ss !"जोरात हंबरडा फोडून तपस्या रडू लागली . तिला असं ओरडताना आणि रडताना पाहून तेजस आणि सुलोचनाबाई दोघेही दचकले. तिला शांत करत तेजस तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. तपस्याची अशी अवस्था पाहून सुलोचनाबाई विचारात पडल्या. त्यांनी आल्या-आल्या घराची जबाबदारी पूर्णपणे आपल्या शिरावर घेतली. पहिल्यांदा त्यांनी पूर्ण घर स्वच्छ केले. संध्याकाळचे जेवण बनवले. रात्री सगळे जेवण करत असताना त्यांचे पूर्ण लक्ष तपस्याकडे होते. तिची हरवलेली नजर, त्या नजरेत असणारे अनोळखी भाव हे पाहून काही तरी विपरीत घडतयं हे मात्र त्यांच्या जाणकार नजरेने हेरलं. जेवण झाल्यावर त्यांनी सगळ आवरलं. तेजस काही कामाचे पेपर हाताळीत हॉलमध्ये बसला होता. सुलोचनाबाई सोफ्यावर बसून हातात वर्तमानपत्र घेऊन चाळत होत्या.
"का... ? का आली आहेस इथे? माझा.. आपल्या लेकाचा संसार मोडायला आली आहेस ना? आमचा संसार मोडून जाणार आहेस का? चालती हो... आत्ताच्या आत्ता इथून चालती हो..! " हातात स्वयंपाक घरातला चाकू घेऊन तपस्या सुलोचनाबाईंच्या अंगावर धावून आली. किंचाळत आपल्या अंगावर धावत येणाऱ्या तपस्याला पाहून सुलोचनाबाई घाबरल्या. तेजस एका झटक्यात उठला. तिच्या हातातला चाकू बाजूला फेकून देत त्याने तपस्याला सोफ्यावर ढकलले.
" तुम्ही दोघांनी प्लॅन केला आहे मला मारण्याचा!! तुला डिव्होर्स पाहिजे ना माझ्याकडून? ते.. ते..पेपर कसले आहेत ? डिव्होर्सचे पेपर आहेत ना ते? दे इकडे ते पेपर!"
"------"
" माझी देवी तुम्हांला सोडणार नाही.. ती .. देवी बोलते माझ्याशी... मला कानात येऊन सांगते की तुम्ही... तुम्ही सगळे माझ्या वाईटावर टपले आहेत. तुम्ही सगळे कट करतायेत माझ्याविरुद्ध.. मला ठार मारण्यासाठी म्हणून तू आईला इथे बोलावले आहे ना तेजस?" तपस्याच्या डोळ्यांतील बाहुल्या गरगर फिरू लागल्या. त्या एक जागी स्थिर होत नव्हत्या.
" भानावर ये... तपस्या... भानावर ये ! अगं .. ते गाडीच्या इन्शुरन्स चे पेपर आहेत. का वागतेसं गं अशी?" तेजस रडवेला झाला होता. सुलोचनाबाई ह्या प्रसंगाने हादरून गेल्या पण त्या हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांच्या जाणकार नजरेने हेरले होते की, तपस्याला मानसिक आजार झडलायं. तिला ह्या आजारातून बाहेर काढण्यासाठी मनोविकारतज्ञाची मदत घेणे अत्यावश्यक आहे.
तेजसला असं रडवेलं झालेले पाहून त्यांचे अंत :करण दुखावले. आपलं हसत-खेळत लेकरू एका अनामिक दडपणाखाली आहे हे पाहून त्यांच्यातल्या आईचं काळीज भरून आलं.
"तेजस ! बाळा शांत हो ! तपस्याला आता एका चांगल्या मनोविकारतज्ञाची गरज आहे आणि सोबत आपल्या मानसिक आधाराचीसुद्धा! तू उद्याच एखाद्या चांगल्या मनोविकारतज्ञाची भेट घे. आपल्याला तिच्यावर लवकरात लवकर उपचार करायला पाहिजेत!" तेजसला सांगत मनाशी काहीतरी ठरवत सुलोचनाबाई उठल्या.
------------------- XXX ------------------
" मावशी, कधी आलात तुम्ही ? " भांडी घासायला येणाऱ्या सुरेखाने सुलोचनाबाईंना विचारलं.
" काल आले!"
" ताईची तब्येत बरी नाहीये का? फार दिवसांपासून ताईचं वागणं जरा वेगळंच वाटते!"
" हं!"
" मावशी, तुम्हाला सांगते, मला ना हे काहीतरी वेगळचं प्रकरण वाटतेयं.. मला वाटते तपस्याताईंना बाहेरची बाधा झाली असावी. आमच्या वस्तीत ना एक भगत आहे तो उतरवतो अंगातली बाहेरची बाधा! तुम्ही येणार असाल ताईंना घेऊन तर मी सांगते भगताला!"
" तुला किती पगार देते तपस्या? "
" का हो मावशी ? का बरं तुम्ही विचारत आहात? ताई मला लादी पुसण्याचे आणि भांडी घासण्याचे महिन्याला दोन हजार रुपये देते!"
मनाशी काहीतरी ठरवत सुलोचनाबाई आत गेल्या. पर्समधून तीन हजार रुपये काढून सुरेखाच्या हातात देत म्हणाल्या, " हे घे .. ३००० रुपये आणि उद्यापासून कामाला नको येऊस. मी करेन ही सगळी कामं. मला स्वतःच्या हातचेचं काम आवडते. तू आवर लवकर आणि निघ!".
" मावशी , माझं ऐकून तर घ्या.. मी जबरदस्ती नाही करत तुमच्यावर येण्यासाठी!".
" मला तुझं काही ऐकण्यात रस नाही. उगाच फालतू अंधश्रद्धेच्या गोष्टी माझ्या घरात मला चालणार नाहीत. अख्खं आयुष्य गेलं माझं विद्यार्थ्यांना ... अंधश्रद्धेविरुद्ध लढा द्यायला शिकविताना... आणि तू मला भूत , भगताच्या गोष्टी सांगतेस?" सुलोचनाबाई भडकल्या होत्या.
" मी.. मी आपलं उगाच सुचवलं ...!"
" हे बघ.. तुला पैसे दिलेत, तुझा हिशोब चुकता झालायं. मला आता यावर जास्त चर्चा नको !".
सुरेखा घरातून चरफडतच निघून गेली. आधीच तपस्याची मानसिक स्थिती ठीक नाही आणि ही अडाणी बाई जर तिच्या डोक्यात नस्त्या अंधश्रद्धेच्या गोष्टी भरवू लागली तर लेकाचा संसार डोळ्यांसमोर उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही हे त्या सुशिक्षित आणि शहाण्या बाईच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही.
------------------- XXX ------------------
नामांकीत मनोविकारतज्ञ डॉ. म्हात्रे यांची केबिन. आत मध्ये खुर्च्यांवर डॉक्टर म्हात्रे, तेजस, सुलोचनाबाई आणि तपस्या बसले होते.
" हा ...तर बोला !"
"डॉक्टर मला काहीही झालेलं नाही!" तपस्या रागारागाने बोलू लागली.
"हो मला माहित आहे, तुम्ही पूर्ण बऱ्या आहात. अति ताण आणि अति- विचाराने तुम्हांला रात्री झोप येत नाही ना म्हणून तुमचे पती तुम्हाला इथे घेऊन आलेत. बाकी काही समस्या नाही !" डॉ. म्हात्रे तपस्याला समजावू लागले.
" नाही डॉक्टर तुम्ही खोटं बोलतायेतं. ह्या दोघांनी मला फसवून इथे आणलं आहे. हा तेजस आहे ना त्याचं अफेअर आहे पूजासोबत!".
" बरं...कोण पूजा ?" डॉक्टर म्हणाले.
" पूजा.. तुम्ही पूजाला ओळखतं नाही ?" विक्षिप्तपणे हसत तपस्या डॉ. म्हात्रेंकडे बघू लागली.
" ती पूजा .. जी माझ्या ऑफिसमध्ये आहे .. चोंबडी आहे एक नंबरची...!! तेजसला ना लग्न करायचं आहे तिच्या सोबत...म्हणून तेजस मला वेडं ठरवतोयं. मी.. मी... वेडी नाहीये.. डॉक्टर... पण तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवते, माझी देवी सोडणार नाही तुम्हांला.. देवी आहे माझ्यापाठीशी.. ती बोलते माझ्याशी... !! " तपस्याच्या डोळ्यातील बाहुल्या गर-गर फिरू लागल्या. तिच्या चेहऱ्यावरचे भाव झटकन बदलू लागले. तिच्या डोक्यात थंड वार भरल्यासारखं झालं. तेजस कावराबावरा होऊन सुलोचनाबाई आणि डॉ. म्हात्रेंकडे पाहू लागला. डॉ. म्हात्रेंनी त्यांना खूणेनेच शांत राहण्यास सांगितले.
" हा ...बरं तपस्या!! तुला देवीने अजून काय सांगितले आहे?" पेपरवर काहीतरी लिहित डॉक्टर म्हणाले.
" डॉक्टर.. माझी देवी रोज मला दर्शन देते. माझ्या कानात येऊन कुजबुजते... माझ्याशी बोलते देवी... तिने सांगितले आहे की तेजस मला सोडून पूजासोबत लग्न करणार आहे!". तपस्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले.
"डॉक्टर..."
" बोल.. तपस्या!"
" तुम्हाला सांगते डॉक्टर... मी ना ... मी लहानपणी खूप खोडकर होते. खूप खेळायचे माझ्या दादासोबत. हिरवीगार डोलणारी शेतं, खळखळ करत वाहणारे पाणी , मी ना ... मी त्या बांधावरून धावतेयं डॉक्टर... डॉक्टर...!"
" बोल.. तपस्या.. मी ऐकतोय!"
" तिथे ना एक तळं आहे. मी.. मी.. तळ्याच्या काठावर उभी आहे डॉक्टर... दादा ...दादा आहे ना माझा तो कमळाचे फुल तोडायला गेलायं .. मी.. मी.. त्याला सांगतेयं.. नको.. नको जाऊ पुढे.. दादा... पाणी खोल आहे... पण तो ना... माझं ऐकतच नाही... दादा पुढे पुढे जातोय ...माझा दादा... डॉक्टर... दादा... पाण्यात बुडाला हो ... माझ्यासमोर... मी.. मी... अपराधी आहे त्याची.. माझ्यामुळे तो बुडाला तळ्यात... मी त्याला कमळ आणायला सांगितलं नसतं तर तो आम्हांला सर्वांना सोडून गेला नसता... मी ..मी गुन्हेगार आहे त्याची... त्याच्या मृत्युला मी जबाबदार आहे.... डॉक्टर! " तपस्या केबिनमध्ये जोर-जोराने रडू लागली.
"शांत हो तपस्या... हे बघ जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतात. जे घडलं त्याला तू जबाबदार नाहीस. पहिल्यांदा तर तू स्वतःला ह्या घटनेबाबत अपराधी समजू नकोस . तुझ्या दादासोबत जे घडलं तो फक्त एक अपघात होता. तुला त्या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर यायला लागेल. त्यासाठी तुला माझ्याकडे यावं लागेल. मॅडम, तुम्ही जरा बाहेर जाऊन बसा आणि मि. तेजस ..तुम्ही थांबा इथे!" डॉ. म्हात्रेच्या सुचनेनुसार सुलोचनाबाई तपस्याला घेऊन केबिनबाहेर गेल्या.
" मि. तेजस , तुम्हांला सांगताना खरतरं एक माणूस म्हणून वाईट वाटते पण एक मनोविकारतज्ञ या नात्याने तुम्हांला तपस्याच्या आजाराची कल्पना देणं हे माझं कर्तव्य आहे. तपस्या स्क्रिझोफेनिया ह्या मानसिक आजाराची शिकार झाली आहे. हा एक मेंदूचा आजार आहे. मेंदूतील डोपामिन या रसायनांची मात्रा असंतुलित झाली की व्यक्ती ह्या आजाराला बळी पडते. रोजच्या आयुष्यात माणूस कसा वागतो हे त्याच्या मानसिक तसेच भावनिक आणि वैचारिक पातळीच्या सुसंगतीवर अवलंबून असते. पण ह्या आजारात ह्या महत्त्वाच्या गोष्टींमध्येच दोष निर्माण होतो आणि मग हा विकार झालेली व्यक्ती एका भ्रामक, आभासी जगात जगू लागते. त्याचे वागणे , बोलणे सुसंगत नसते. त्या व्यक्तीची मानसिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत जाते. वर - वर जरी ती व्यक्त्ती आपल्याला ठिक दिसत असली तरीही त्यांचे वागणे सामान्य व्यक्तीच्या तुलनेत विसंगत असते. त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटतो. ते हिंसक बनतात. त्यांचे स्वतःचे एक आभासी जग असते आणि त्या जगात जे घडते तेच खरं असते असं ती व्यक्ती मानू लागते. त्यांना आपल्या कानात कुणीतरी कुजबुजतयं, आपल्याविरुद्ध कुणीतरी कट रचतयं, आपल्याला मृत व्यक्ती दिसत आहेत ते आपल्याला बोलावत आहेत असे आणि अनेक विचित्र भास त्यांना होऊ लागतात. ह्या मानसिक विकारास बळी पडलेली व्यक्ती खूप संशयी बनते. रोजच्या आयुष्यातले ताणतणाव, भूतकाळात घडून गेलेल्या दुःखद घटना , मानसिक दुःख, पश्चाताप ह्या सार्या गोष्टींचा प्रभाव त्या व्यक्तीच्या मनावर म्हणजेच मेंदूवर पडत असतो आणि मग त्यांच्या वागण्या-बोलण्यात असा असमतोलपणा येऊ लागतो. अनुवंशिकता हे सुद्धा कारण हा आजार होण्यास कारणीभूत आहे."
" पण डॉक्टर ...माझी तपस्या बरी होईल ना ह्या मानसिक आजारातून?" तेजस केविलवाणा झाला होता.
" हो... मि. तेजस... तुम्ही काळजी नका करू! तपस्याला योग्य औषधोपचार, समुपदेशन आणि तुम्हां सर्वांचे प्रेम , विश्वास आणि आधाराची गरज आहे. मी तुम्हाला काही औषधे लिहून देतो तुम्ही ती आठवणीने तिला द्यायची आहेत. आपण सर्वांनी मिळून तिला ह्या मानसिक आजारातून बाहेर पडण्यास मदत करायला हवी. . त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया.. आपले प्रयत्न तिला ह्यातून बाहेर पडण्यास नक्कीच यश देतील... एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो !" डॉ. म्हात्रेंच्या सकारात्मक बोलण्याने तेजसला हायसं वाटलं .
डॉक्टरांची भेट घेऊन घरी येताना गाडीत तपस्या शांतच होती.
" ही गोळी घे तपस्या !.." तिच्यासमोर गोळी आणि पाण्याचा ग्लास ठेवत तेजस म्हणाला.
" मला काय झाले आहे? मला ...मला वेड लागले आहे का तेजस...? सांग ना मी वेडी झाली आहे का ?" तपस्याच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले.
"तेजस... बोल ना .. डाँक्टरनी काय सांगितलं तुला?"
" तपस्या ...तुला काहीही झालेलं नाहीये! अति- विचार आणि अति- ताणाने तुला झोप येत नाही ना म्हणून डॉक्टरांनी तुला ह्या गोळ्या दिल्या आहेत , त्या घे आणि शांत झोप. तुला आरामाची गरज आहे. तुला ह्यातून बरं व्हायचंयं ना?" तिच्या डोक्यावर थोपटत तेजस म्हणाला.
" बरं आता तुझ्या सुंदर चेहऱ्यावर एक गोड हास्य येऊ दे बरं ...! बरं.. झोप आता तू!"
_______________ XXX_______________
"जावईबापू , तुम्ही थोडे दिवस इथे या रहायला.. तपस्याला घेऊन ...तिला बरं वाटेल इथे!" रंजनाबाई तेजसला फोनवर म्हणत होत्या.
"ठीक आहे आई... आम्ही परवा निघतो !"
तेजसने ऑफीसमध्ये सुट्टी टाकली. नाखुशीनेच तपस्या घरातून बाहेर येण्यास, माहेरी जाण्यास तयार झाली. संपूर्ण प्रवासामध्ये तपस्या शांत होती. दारात गाडी थांबली. तपस्या आणि तेजस गाडीतून उतरल्याबरोबर आजीने मीठ आणि मोहरीने दोघांची दृष्ट काढली.
" बाय गं माझी ! किती वाळली माझी पोर...!!" आजीने डोळ्यांना पदर लावला. आपल्या हसऱ्या लेकीची अशी अवस्था पाहून तपस्याचे आई-बाबा, आजी खूप हळवे झाले.
" त्यांना जरा आराम करू द्या.. उद्या आपण बोलु!" बाबा सगळ्यांना म्हणाले.
दुसऱ्या दिवशी तपस्या आपल्याच तंद्रीत खिडकीत बसली होती.
"तेजस.. आपण तळ्यावर जाऊया का ?"
" कुठल्या तळ्यावर... तपस्या?"
" आमच्या शेताजवळ आहे ना त्या तळ्यावर..!"
" ठीक आहे ! मी बाबांना विचारतो!"
" नको .. ते नाही जाऊ देणार आपल्याला तिथे !! पण मला जायचे आहे तळ्यावर!! मला घेऊन चल.. तेजस!!"
" ठीक आहे ..पण मग आई बाबांना काय सांगणार तपस्या?"
"_______"
"शांत का आहेस? बोल काही ? काय सांगणार आपण त्यांना?"
"________"
" ठीक आहे... चल तुला बरं वाटणार असेल तर जाऊया आपण तळ्यावर!".
जरा शेतावर चक्कर घालून येतो असं सांगून दोघे घरातून निघाले. शेतातून, बांधावरून चालत दोघेही शांतच होते. तेजसने तपस्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. ते दोघे तळ्याजवळ आले.
'तळं... निळ्याशार पाण्याने तुडूंब भरलेलं.. सुंदर कमळांनी सजलेलं... तेथील वातावरणात... आसमंतात गार हवा भरलेली...!!
" छोटेसे बहीण-भाऊ उद्याला मोठाले होऊ... उद्याच्या जगाला ...उद्याच्या युगाला नविन आकार देऊ"!!!
तपस्याच्या कानात कवितेचे स्वर गुंजू लागले. अचानक बेसावध असलेल्या तेजसच्या हाताला झटका देत त्याचा हात सोडत तपस्या तळ्याच्या काठाने वाऱ्याच्या वेगाने धावत निघाली. ती वडाच्या झाडाजवळ पोहोचली. वडाच्या पारंब्या जोर- जोराने हलवू लागली. तिच्या डोक्यात थंड वारं भरलं. तिच्या कानात कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला. तिचे हात-पाय थंड पडल्यासारखे झाले. ती एकटक तळ्याकडे पाहू लागली. तेजस तिच्यामागे धावला.
" सोनु!" तिच्या कानात तिचा दादा कुजबुजला.
"दादा ss दादा ...मी आले तुला भेटायला.. दादा, कुठे आहेस तू ?"
"सोनू बघ ..मी इथे आहे.. तुझ्यासमोर!"
" दादा ss माझा दादा!"
" सोनू, तुला कमळ पाहिजे ना ? ये माझ्याजवळ ..हे घे कमळ!"
" मी आले थांब दादा .. मला सोडून नको जाऊ दादा ...दादा..!!." तपस्या वाऱ्याच्या वेगाने तळ्याच्या पाण्यात धावत सुटली. भयंकर घाबरून तेजस तिच्यामागे धावत गेला. अर्ध्या पाण्यातून कसंबसं तपस्याला खेचून काढत , सांभाळत , ठेचाळत .. तेजस तिला घरी घेऊन आला.
_______________ XXX_______________
घरातलं वातावरण गंभीर झालं होतं. तेजसने तपस्याला गोळी देऊन आतल्या खोलीत झोपवलं.
" हिचा आजोबा गोविंदराव पाटील, गावचा सरपंच होता, पंधरा वर्षे !! अख्या पंचक्रोशीत संतमाणूस म्हणून नावाजला जायचा. बाप पण तसाच! अडल्या- नडल्यांना मदत करणारा, कधी कोणाचं वाईट नाही केलं. शेती-वाडी स्वकष्टाने उभी केली. पण कुणा दुष्टाची नजर लागली माझ्या लेकाच्या संसाराला .. देव जाणे! एक लेकरू गिळलं त्या तळ्याने आणि आता हे लेकरू धरलयं पाप्याने!! एवढा सुंदर सुखी संसार ...एवढा गुणी जावई मिळाला आणि पोरीची ही दुर्दशा... काय करावं माणसाने?.. कुणाच्या तोंडाकडे पाहून जगावं? " असं म्हणत आजी ओक्साबोक्शी रडू लागली . तपस्याच्या आईंचाही अश्रृंचा बांध फुटला तर तपस्याचे बाबा हतबुद्ध होऊन दोघींकडे पाहू लागले.... हताशपणे...!
" आई , आजी तुम्ही रडू नका. आपल्याला असं हात-पाय गाळून चालणार नाही. आपण रडत बसलो तर तपस्याला कोण आधार देणार ? आपल्या प्रेमाची आणि आधाराची गरज आहे तिला. ती आपल्या प्रयत्नांनी नक्की बरी होईल. मला विश्वास आहे!"
" बाबा, तुमच्या घरात कुणाला अश्यारितीचा मानसिक आजार नव्हता ना? कारण अनुवंशिकतेनेही होतो हा आजार.. !! म्हणजे तुमच्या पाहण्यात आहे का?"
" नाही .. तेजस ! मी तरी ह्या आजाराला माझ्या घरात कुणाला बळी पडलेलं नाही पाहिलं!"
" ठीक आहे!"
______________ XXX_______________
तेजस एक समंजस, प्रेमळ तसाच उच्चविद्याविभूषित तरुण असल्यामुळे त्याला तपस्याच्या मानसिक आजाराची कल्पना आली. तसेच तिचा मानसिक आजार कुठल्या पातळीवर आहे हे त्याला समजलं. त्याने इंटरनेटवरून तसेच स्किझोफ्रेनिया ह्या मानसिक आजारावरील नामांकित मनोविकारतज्ञांची खूप पुस्तके वाचली. आपल्या डोळ्यादेखत झालेला आपल्या भावाचा अपघाती मृत्यू आणि त्याच्या मृत्यूचा, त्या दुःखद घटनेचा तपस्याच्या बालमनावर आघात झाला होता. आपण आपल्या भावाच्या मृत्यूला जबाबदार आहोत ही अपराधीपणाची भावना तिच्या मनात वर्षानुवर्षे भिजत होती आणि त्याचे शल्य तिच्या मनाला टोचत होते आणि ह्या साऱ्या गोष्टीचा ताण सहन न झाल्याने ती स्किझोफ्रेनिया हया मानसिक आजाराला बळी पडली होती. आता आपल्याला तिला ह्या आजाराच्या विळख्यातून बाहेर काढायलाचं हवं.. असा निर्धार तेजसने केला आणि त्यामध्ये त्याची साथ सुलोचनाबाईंनी म्हणजेच त्याच्या आईने दिली. त्यांनी तपस्याला डॉ. म्हात्रेंकडे नियमित नेऊन तिच्यावर उपचार केले. डॉक्टर म्हात्रें हे एक नामांकित मनोविकारतज्ञ होते. रुग्णाला मानसिक आजारातून, नैराश्याच्या खोल डोहातून बाहेर काढण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी तपस्याचे योग्यरित्या समुपदेशन केले. औषध उपचार, डॉ. म्हात्रे यांचे समुपदेशन आणि घरातल्या प्रेमळ माणसांचा मानसिक आधार , त्यांची माया आणि देवाची कृपा ह्या साऱ्या गोष्टींमुळे हळूहळू तपस्या स्किझोफ्रेनिया हया मानसिक आजारातून बाहेर पडू लागली. पूर्वीची गोड, हसरी तपस्या आपल्या मायेच्या माणसात परत येऊ लागली. .. त्यांच्यात रमू लागली.
______________ XXX__________
" तुम्ही दोघे आता आई-बाबा बनणार आहात!" स्त्री- रोगतज्ञ वीणा शानभाग यांनी रिपोर्ट वरून नजर फिरवत तेजस आणि तपस्याला गोड बातमी दिली. ही बातमी ऐकून दोघांचाही आनंद गगनात मावेना.
" चल मग... आज पार्टी ...हॉटेल निवारा! फक्त तू आणि मी .. कँडल लाइट डिनर!" तेजस प्रेमाने तपस्याचा हात हातात घेत म्हणाला.
" हो ... मस्त ..!!. आज की शाम तेरे नाम!" लाडीकपणे तपस्या तेजसचा हात हळूवार दाबत म्हणाली.
____________ XXX__________
" तुला देवाने माझ्या पोटी घातलंयं दादा!!! माझ्या जीवनात पुन्हा एकदा आनंद घेऊन आलास तू.... तुला खूप प्रेम देईन बाळा ... खूप मोठा हो राजा!" मनातल्या मनात म्हणत इवलाश्या पार्थचा गोड पापा घेत त्याला पाळण्यात घालत ... तपस्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिच्या भावना समजून घेत ... तिच्या खांद्यावर थोपटत तेजस शांतपणे माय- लेकांकडे पाहत होता. आपल्या आयुष्यात आलेला नवीन जीव , आपला प्रेमळ , जीव लावणारा पती, आपले आधारस्तंभ असलेले मायाळू आई -बाबा, आजी , समजूतदार सासू-सासरे त्यांचे प्रेम पाहून तपस्या हरखून गेली. तिच्या आयुष्यात एक नवीन पहाट उगवली... सोनेरी किरणांची ....सोनेरी स्वप्नांची....!!
समाप्त!!
धन्यवाद!
रुपाली विशे- पाटील...
_____________ XXX_______________
(आपल्या जीवनात शारीरिक आरोग्य जेवढे महत्त्वाचे आहे किंबहुना त्यापेक्षाही जास्त मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. एखादया वर-वर ठिक दिसणाऱ्या व्यक्तीच्या मनात , मेंदूत विचारांचे काय वादळ घोंघावते आहे ते आपल्याला सहज जाणवत नाही. त्यांच्या वागण्या - बोलण्यातले असंतुलन, विसंगती आपल्याला कधीतरी जाणवते पण मानसिक आरोग्य हा विषयच दुर्लक्षित असल्याने आणि त्या विषयाचा आपण एवढा विचार करत नसल्याने त्या व्यक्तीचं वागणे हे एक घोंघावते वादळ आहे आणि त्या वादळात मानसिक रुग्णासोबत घरातल्या इतर व्यक्ती सुद्धा झोडपल्या जाणार आहेत हे सहज ध्यानात येत नाही. स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णाला योग्य औषध-उपचार, तज्ञांचे समुपदेशन आणि आपल्या माणसांचे प्रेम, मानसिक आधाराची नितांत गरज असते. मी ह्या विषयातील तज्ञ नाही परंतु वाचनात आलेले स्किझोफ्रेनिया ह्या मानसिक आजारावरील लेख, पुस्तके, आंतरजालावर शोधलेली माहिती तसेच ओळखीत एक - दोन रुग्ण हया मानसिक आजाराला बळी पडताना पाहीलं आहे. रुग्णासोबत घरातील इतर व्यक्तींना ह्या आजाराला तोंड देताना पाहीलं आहे. त्यांच्या वेदना समजून घेण्याचा आपल्या परीने अल्पसा प्रयत्न केला आहे. मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करण्याचं कारण समाजात आपली बदनामी होऊ नये हे असावं असं मला वाटते).
( वरील कथा ही एका स्किझोफ्रेनिया ह्या मानसिक आजाराची शिकार झालेल्या तरुणीची आहे. कथा पूर्णतः काल्पनिक असून जर नाव आणि कथेत नमूद केलेल्या घटनेत साध्यर्म आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजण्यात यावा. तसेच सदर कथा हि मानसिक आजाराबाबत जागृकता निर्माण व्हावी ह्या स्वच्छ हेतूने लिहिली असून सदर कथेद्वारे कुठलाही चुकीचा संदेश देण्याचा लेखिकेचा उद्देश नाही).
वा ,सुंदर कथा. माणसाचे मन
वा ,सुंदर कथा. माणसाचे मन खरचं अथांग असतं. काय काय साठले असते त्याच्यात काही पत्ता लागत नाही.
जबरदस्त!!
जबरदस्त!!
सुंदर लिहिले आहे..एक खूप
सुंदर लिहिले आहे..एक खूप जबरदस्त भयकथा होऊ शकली असती विथ अ ट्विस्ट इंडिंग..
हा शेवट देखील चांगला आहे...
सुंदर सकारात्मक शेवट.
सुंदर सकारात्मक शेवट. महत्वाच्या विषयावर लिहिले तुम्ही.
अभिनंदन.
छान कथा लिहिली आहे रूपाली...
छान कथा लिहिली आहे रूपाली...
आवडली..
रूपाली आता तुझं नाव दिसलं की
रूपाली आता तुझं नाव दिसलं की कथा वाचतेच, इतकं छान लिहीतेस...
रुपाली , तुम्ही खरंच छान
रुपाली , तुम्ही खरंच छान लिहिता. च्रप्स म्हणतात तसे या एकाच कथेचे version 2, वेगळा शेवट करून लिहून पहा. छान लिहाल तुम्ही.
छान कथा, लेखन शैलीही छान आहे.
छान कथा, लेखन शैलीही छान आहे.
ज्या उद्देशाने लिहिली आहे (मनोरुग्णतज्ञांकडे जाण्यास कमीपणा न समजणे / न घाबरणे याबद्दल जागरूकता) तो बघता केलेला शेवट योग्य वाटला.
@ मोहिनी - धन्यवाद.. अगदी खरं
@ मोहिनी - धन्यवाद.. अगदी खरं आहे तुझे म्हणणं..
@ अज्ञातवासी - धन्यवाद.. तुमच्या लेखनातून बरचं शिकायला मिळते.
@ च्रप्स - धन्यवाद.. कथा लिहिताना मलाही असचं वाटलं होतं की ही एखादी गुढकथाच लिहावी .. पण मग विचार केला की कथेचा जो मूळ उद्देश आहे तो भरकटू नये. पण मी जमलं तर प्रयत्न करणार आहे एखादी भयकथा लिहिण्याचा..!!
@ वीरुजी - धन्यवाद... तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी आणि शुभेच्छांसाठी..
@ मृणाली - धन्यवाद .. तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी.
@ लावण्या - धन्यवाद .. तुझा प्रतिसाद वाचून दडपण आलं गं .. ( मस्करी करते हं)..
@ गौरी - धन्यवाद.. हो तुम्ही सुचविल्याप्रमाणे मी नक्की प्रयत्न करेन कथा लिहिण्याचा...
@ मानवजी - धन्यवाद ... कथेचा मूळ उद्देश समजून घेतल्याबद्दल आणि तुम्ही स्किझोफ्रेनिया हया मानसिक आजाराबद्दल उपयुक्त माहिती दिली आहे प्रतिसादात..
मानसिक आरोग्याबद्दल
मानसिक आरोग्याबद्दल सकारात्मक कथा आवडली. तुमची लेखनशैलीही छान आहे.
धन्यवाद स्वातीताई, कथा आणि
धन्यवाद स्वातीताई, कथा आणि लेखनशैली आवडल्याबद्दल...
ज्या उद्देशाने लिहिली आहे
ज्या उद्देशाने लिहिली आहे (मनोरुग्णतज्ञांकडे जाण्यास कमीपणा न समजणे / न घाबरणे याबद्दल जागरूकता) तो बघता केलेला शेवट योग्य वाटला. >>>> +1000.
फक्त एकच मत माझ्यातर्फे , कथेतलं पहिलं प्रकरण (chapter) नसतं तर गूढकथा झाली असती.
मानसिक आरोग्याबद्दल सकारात्मक
मानसिक आरोग्याबद्दल सकारात्मक कथा आवडली. तुझी लेखनशैलीही छान आहे.
@स्वस्ति - धन्यवाद.. तुमच्या
@स्वस्ति - धन्यवाद.. तुमच्या प्रतिसादासाठी...!!
@ अस्मिता - धन्यवाद तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी!!
वाह!! सकारात्मक गोष्ट आवडली.
वाह!! सकारात्मक गोष्ट आवडली.
वाह!! सकारात्मक गोष्ट आवडली.
वाह!! सकारात्मक गोष्ट आवडली.
धन्यवाद सामो!! तुझा नेहमीचा
धन्यवाद सामो!! तुझा नेहमीचा प्रोत्साहनपर प्रतिसाद नेहमीच हुरूप वाढवतो.
कथा चांगली लिहलीय.
कथा चांगली लिहलीय.
वाचताना भुलभुलैया सिनेमा आठवला. पण त्यात नायिकेला Dissociative Identity Disorder असते.
सिझोफ्रेनिया/मानसिक आजारांबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्या आजारांसहित रुग्ण-कुटुंबीय सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात असा शेवट करणे -- वगैरे कथेमागचे सगळे उद्देश चांगले आहेत.
पण Hidden Valley Road हे पुस्तक वाचून मला हे कळले आहे की
• सिझोफ्रेनिया, बायपोलर, तीव्र नैराश्य हे आजार बहुतांश वेळा अनुवंशिक असतात. कॅन्सर, डायबेटीस वगैरेसारखे. ते एक जनरेशन स्कीप करू शकतात, दोन नाही. स्कीप झालेली जनरेशन त्या जीन्सची कॅरीअर असते.
• याची लक्षणं १५ ते २५ वयात दिसायला लागतात. ट्रॉमा, आजूबाजूचे वाईट वातावरण वगैरे ट्रिगर असतात. त्यांच्यामुळे कमी वयात (१०-१५) आजार बळावेल. ट्रिगर नसतील तर उशिरा (२५), कमी तीव्र लक्षणे दिसू लागतील.
• सध्यातरी या तिन्ही आजारांवर 'बरे करणारी' औषधं उपलब्ध नाही.
• जी काही औषधं सध्या दिली जातात ती 'केवळ' त्या व्यक्तीने हायपर होऊन स्वतःला आणि इतरांना इजा करु नये यासाठी आहेत.
• ती सातत्याने घेत राहिल्यास रुग्ण-कुटुंबीय सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील, मुलं जन्माला घालून आनंदाने जगू शकतील वगैरे आशावादी स्वप्न फिक्शनमधे ठीक आहे. That's not possible in real life as of now...
वाचकांपैकी कोणी मानसोपचारतज्ञ, डॉक्टर असेल तर अधिक सांगू शकतील.
मस्त जमली आहे कथा
मस्त जमली आहे कथा
खूप खूप धन्यवाद .. अॅमी!
खूप खूप धन्यवाद .. अॅमी!
खूप छान प्रतिसाद... तुमच्या वाचनात आलेली माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे. माझ्या वाचनात ज्याप्रकारे आलं होतं त्याप्रमाणे स्किझोफ्रेनिया हया मानसिक आजाराचे मुख्य कारण अनुवंशिकता ही आहे आणि ह्या आजाराला बळी पडलेली व्यक्ती पूर्णपणे बरी होत नाही आणि जी औषधे उपलब्ध आहेत ती फक्त रुग्णाला तीव्र लक्षणे जाणवू नये यासाठी आहेत.
माझ्या पाहण्यात आलेल्या ह्या आजाराला बळी पडलेल्या व्यक्तीनंबाबत थोडसं...
जवळच्या व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर हसती- खेळती व्यक्ती अचानक तीव्र नैराश्यात गेली होती आणि स्किझोफ्रेनियाची लक्षणे त्या व्यक्तीला जाणवत होती पण त्या व्यक्तीला होणारे भास, त्याच्या वागण्या-बोलण्यात आलेला असमतोलपणा त्या व्यक्तीच्या कुटूंबियांना जाणवत होता. परंतु ती लक्षणे पाहून आणि मुख्य कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंटूंबियांना मानसिक आजाराबाबत माहिती नसल्याने त्यांनी बाहेरची बाधा असावी या नजरेतूनच त्या व्यक्तीवर उपचार केले पण नंतर त्यांनी मनोविकारतज्ञाची मदत घेतली जेव्हा लक्षणे तीव्र स्वरूपाची जाणवू लागली. योग्य औषध उपचार आणि तज्ञाचे समुपदेशन ह्यामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल कुंटूंबियांना जाणवला. तर पाहण्यात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र वयाच्या पन्नाशी नंतर ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर व त्यातून ठिक झाल्यानंतर काही दिवसांनी स्किझोफ्रेनियाची तीव्र लक्षणे जाणवू लागली होती. कदाचित तारुण्यात त्या व्यक्तीमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे त्यांच्या घरातल्या जाणवलीही असतील पण मानसिक आजाराबाबत जनजागृती नसल्याने सदर व्यक्तीचा स्वभावचं असा आहे म्हणून दुर्लक्ष केलं असावं असं मला त्या व्यक्तीच्या कुंटूंबियांच्या बोलण्यातून जाणवलं.
पण एक मात्र खरं आहे सदर आजाराला बळी पडलेल्या व्यक्तींचें कुटुंबीय एका अनामिक दडपणाखाली राहतात आणि हे पाहून वाईट वाटते. खरंतरं त्या व्यक्तीच्या कुटूंबियांचेसुद्धा योग्य समुपदेशन व्हायला हवे कारण रुग्ण जरी पूर्णपणे बरा होऊ शकत नसला तरीही त्याच्यात एक सकारात्मक बदल घडवून आणण्यात तज्ञांचे समुपदेशन, योग्य औषधोपचार आणि तसेच कुंटूंबियांचे मानसिक पाठबळ यांचा मोलाचा वाटा आहे असं मला वाटते.
वाचकांपैकी कोणी मानसोपचारतज्ञ, डॉक्टर असेल तर अधिक सांगू शकतील.>>>+१
कथा आवडल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद कमला!!
नवीन Submitted by ॲमी on 24
नवीन Submitted by ॲमी on 24 November, 2020 - 18:30 >>>
इथल्या तज्ञांकडुन माहिती मिळाल्यास उत्तम.
मी काही तज्ञ नाही, पण जवळून पाहिलेल्या उदाहरणांंवरून:
किती लौकर आणि कितपत नियंत्रण होते हे आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून आहे, आणि उपचार किती काटेकोरपणे घेतले जातात यावरही.
कथेत लिहिलं तेवढ्या सहजी होत नाही नियंत्रण. याला क्युअर नाही पण आजार बऱ्यापैकी नियंत्रणात राहू शकतो.
औषधांंचे दुष्परिणाम बरेच असतात. खुप भूक लागणे, वजन वाढणे, drowsiness, तीव्र बद्धकोष्ठ, अस्वस्थता, मसल्सवर परिणाम. मल्टिपल ड्रग्ज घ्यावे लागतात. औषधांचे दुष्परिणाम सुरवातीला काही महिने, खूप तीव्र असू शकतात.
दुष्परिणामाना कंटाळुन रुग्ण औषध सोडणे अथवा डोस आपल्याच मर्जीने कमी करणे, नियमित न घेणे अशा गोष्टी करतात. डॉक्टरांंवर विश्वास नसतो, कितीही अनुभवी प्रसिद्ध डॉक्टर का असेना. फॉलोअप नियमित होत नाही. बऱ्याच जणांना ( रुग्णाचे सगे सोयरे) डॉक्टर उगाच एवढी औषधं देताहेत, चांगले समुपदेशन , मेडीटेशन केले की बस असे वाटते. औषधांच्या विरोधाची लॉबी सुद्धा आहे, ऑन लाईन ग्रुप्स सुद्धा आहेत, लोक त्याचे सदस्य होतात त्यात सध्याच्या उपचारपद्धती आणि औषधा विरोधात लिहिले असते त्याचाही परिणाम होतो उपचार मध्येच बंद करण्यास. बरेचदा रुग्णाचा आपल्याच माणसावर विश्वास नसतो त्याच्यावरच उलट संशय असतो. कुणाच्या डॉक्टरांंकडुन अवाजवी अपेक्षा असतात, जादु केल्या प्रमाणे रुग्ण बरा होईल अशा आणि तसे न झाल्यास वैफल्य. या आणि अशा अजूनही काही कारणांंमुळे रुग्णावर नीट उपचार होत नाहीत.
रुग्णाला समजून घेऊन विश्वास संपादन करून घेणारी आणि त्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती सोबत असणे याने खूप फायदा होतो. या आजारांंमध्ये अचूक निदान आणि त्यावरून नेमके औषध असा उपचार नसतो. प्रत्येक रुग्णाची नेमकी लक्षणे काय आणि दिलेल्या औषधांना तो कसा प्रतिसाद देतो याचा योग्य फीडबॅक घेऊन औषध गरज असल्यास बदलणे, डोस हळूहळू वाढवत नेणे, अजून एखादे औषध ऍड करणे, एखादे औषध लक्षणांवर परिणामकारक असले तरी भलत्या साईड इफेक्टमुळे बदलावे लागणे इत्यादी प्रकार असतात. यालाच अनेक महिने लागू शकतात. हे खूप पेशन्सचे काम असते.
आपल्याला खरोखरच मानसिक आजार आहे आणि त्यासाठी आपल्याला हे उपचार घेणे आवश्यक आहे हे रुग्णाला नीट वळायलाच अनेक वर्षे लागू शकतात. तो पर्यंत औषधांची धरसोड याने रिलॅप्स होत राहून आजाराची तीव्रता वाढू शकते.
सातत्याने पाठपुरावा करून डॉकटराना योग्य तो फीडबॅक देऊन रुग्णाला व्यवस्थीत उपचार दिल्यास आजार चांगलाच नियंत्रणात येउ शकतो. रुग्ण नोकरी करू शकतो, घरची कामे करू शकतो, आर्थिक व्यवहार सांभाळू शकतो, चार चौघांसारखे जीवन व्यतित करू शकतो.
वाखाणण्या सारखी दोन उदाहरणे : १. केरळहुन बंगलोरला आलेली एक मुलगी, आयटी मध्ये नोकरी. स्किझोफ्रेनिया . नोकरी गेली. काकाने काळजी घेतली, डॉक्टरांकडे नेले NIMHANS मध्ये, उपचार सुरू. दोन वर्षात बऱ्यापैकी प्रगती. प्रचंड वजन वाढलेले. पैशांची चणचण गावी परत जाऊन भरपूर व्यायाम , डाएट वगैरे करून वजनावर थोडे नियंत्रण आणुन परत आली. परत नोकरी मिळवली, जिम नियमित सुरू. भाऊ लहान त्याच्या शिक्षणास पैसे हवे त्यासाठी भरपूर मेहनतीने जिद्दीने काम करत उपचार घेत भावाला शिकवले. आपल्याला हा आजार आहे हे सांगूनच लग्न करणार, नाही झाले तर नाही याची जाणीव. २०१३ नंतर पुढची माहिती नाही. तेव्हा तिला आठ वर्षे उपचार सुरू होऊन झाली.
२. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच स्किझोफ्रेनिया झालेला मुलगा. घरापासून जवळ असलेल्या डॉक्टरकडून उपचार. दीड दोन वर्षे झाली तरी विशेष प्रगती नाही, मग औषध सोडले. तीव्रता वाढत गेली, मग बंगलोरला NIMHANS मध्ये उपचार सुरू. दोन वर्षात बऱ्यापैकी प्रगती. मग लोकल प्रसिद्ध डॉक्टर कडून फॉलोअप सुरू. शिक्षण पूर्ण, एक नोकरी सुरू केली पण झोप आणि वेळेवर उठणे यावर अजिबात नियंत्रण नाही म्हणुन सोडली. पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू केले. प्रचंड वाचन इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व, लिटरेचर, फिलॉसॉफीची आवड. पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. औषधांचा डोस कमी आणि त्यांची झालेली सवय यामुळे झोप बऱ्यापैकी नियंत्रणात. वडील गेले. इकडे तिकडे मिळेल ती नोकरी, मग इंग्रजी लेक्चरर म्हणुन लागला, तिथे चमकला, प्रायव्हेट ट्युशन्स घेतो, लग्न अजून व्हायचे आहे, धाकट्या बहिणीचे लग्न केले. उपचार अजूनही सुरू आहेत, दहा वर्षे झालीत. घर व्यवस्थीत संभाळतोय.
या उलट उदाहरणेही आहेत. पण त्यात रुग्णाने नीट उपचार कधी घेतले नाहीत.
खूप माहितीपूर्ण प्रतिसाद
खूप माहितीपूर्ण प्रतिसाद मानवजी!
प्रतिसाद आवडला.
रुपाली आणि मानव,
रुपाली आणि मानव,
तुम्ही दोघांनीही हे Hidden Valley Road पुस्तक नक्की वाचा असं सुचवते. लेखक Robert Kolker शोधपत्रकार आहे. त्याची आई कौंसलर होती. अतिशय कंपॅशनेटली त्याने पुस्तक लिहलं आहे. शेवट आशावादी आणि सकारात्मक आहे (That doesn't mean सिझोफ्रेनिया रुग्णाचे लग्न झाले/ टिकलं, मुलं झाली!!)
===
>> माझ्या वाचनात ज्याप्रकारे आलं होतं त्याप्रमाणे स्किझोफ्रेनिया हया मानसिक आजाराचे मुख्य कारण अनुवंशिकता ही आहे >> बरोबर. पण कथेतून, म्हात्रे डॉक्टर जे सांगताहेत त्यातून ट्रॉमा हे मुख्य कारण आहे असे सांगितल्यासारखे वाटते.
+
'नाही ..आमच्या मागच्या दोन पिढ्यात तरी मी कोणीही ह्या आजाराला बळी पडलेलं नाही पाहिलं!' हे वाक्य. (पण काल्पनिक कथा असल्याने हे चालून जाईल म्हणा. नायिकेचे वडील जाणूनबुजून खोटं बोलताहेत.)
>> आणि ह्या आजाराला बळी पडलेली व्यक्ती पूर्णपणे बरी होत नाही >> बरोबर. पण परत कथेमधे 'ह्या मानसिक आजारातून तपस्या नक्की बरी होईल , एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो' आणि खाली तळटीपमधेही 'स्किझोफ्रेनिया झालेला रुग्ण ह्या मानसिक आजारातून बरा होऊ शकतो' असे लिहले आहे.
+
'मेंदूतील डोपामिन या रसायनांची मात्रा असंतुलित झाली की व्यक्ती ह्या आजाराला बळी पडते.' हेदेखील माझ्यामते चुकीचे आहे. डोपेमाईन आणि सिझोफ्रेनियाचा संबंध नाही.
>> आणि जी औषधे उपलब्ध आहेत ती फक्त रुग्णाला तीव्र लक्षणे जाणवू नये यासाठी आहेत. >> बरोबर. ती औषधं रुग्णाला केवळ नंब आणि स्लगीश बनवतात. इतर काहीही करत नाहीत.
===
मानव,
माईल्ड सिझोफ्रेनिया असेल
&& तो लवकर डिटेक्ट झाला
&& लगेच+नियमित औषध-समुपदेशन चालू झाले
'तरच' तो नियंत्रणात राहू शकतो आणि व्यक्ती काम, अर्थार्जन, समाजात मिसळणे इ करत राहू शकते.
यापैकी एकही नसेल तर आला दिवस ढकलणे याखेरीज पर्याय नाहीय.
रोचक बाब म्हणजे विज्ञान-औषधे फेल जात असताना, अध्यात्म &/ ७०च्या दशकात अमेरिकेत आलेले हिप्पी कल्चर seems to be helping/ schizophrenics from getting to much wild/damaged/ding.
===
कथेत मला न पटलेले काही मुद्दे म्हणजे
• आईवडलानी आजार लपवून ठेवून मुलीचं लग्न लावून दिलंय.
• लग्नानंतर एक वर्षभर तेजसला बायकोत काहीही लक्षण जाणवली नाहीत.
• त्यानंतरही तो जन्मभराची गाठ समजून बायकोवर इलाज करतोय && मुल जन्माला घालतोय!
हे असले डेडिकेशन, happily ever after काल्पनिक कथेत ठीक आहे.
खर्या आयुष्यात
• तुम्ही किंवा कुटुंबातील कोणी मनोरुग्ण असेल तर आजार लपवून, लग्न-मूल झाल्यावर बरा होईल असला विचार करून लग्न लावून देऊ नका.
• दुर्दैवाने लग्नानंतर जर लक्षात आले की जोडीदार मनोरुग्ण आहे तर ताबडतोब घटस्फोट घ्या. Its valid ground for divorce.
• जन्मोजन्मीच्या गाठी वगैरे करायचे असेल तर रहा मनोरुग्णासोबत. After all you are an adult and can/should make own life decisions. पण अटलिस्ट मुलं तरी जन्माला घालू नका. You absolutely don't have any right to bring Innocent child in this kinda volcanic environment!!
===
अजूनेक मुद्दा म्हणजे
रुग्णाला सिपंथी द्यायला जाऊन रुग्णाच्या (सामान्य आयुष्य जगू इच्छिणाऱ्या) कुटुंबियांवर आपण नकळतपणे सामाजिक दबाव टाकत नाहीय ना हेदेखील पहायला हवे. या अनुवंशिक आजारांमधे रुग्णाचे कुटुंबीयही व्हिक्टीम असतात. उदा कथानायिकेची आई जर कॅरिअर असेल तर तिच्या दोन्ही आजोळी, दोन्ही पालकांच्या पिढीत, तिच्या पिढीत कोणीनाकोणी सिझो होताच. त्याच्या havoc मधे इन/डायरेक्टली ती होरपळलेली असू शकते. आता परत तिनेच मुलीची काळजी घ्यावी वगैरे अपेक्षा त्रयस्थ माणसाने काठावर बसून करू नये. त्याऐवजी स्वतः ते काम करावे किंवा समाजाने/सरकारने या रुग्णांची जबाबदारी घ्यावी.
===
सिझोफ्रेनिया हा इतर मानसिक आजारांपेक्षा जास्त गंभीर आजार आहे. रुग्ण केवळ स्वतःला नाही तर इतरांनाही इजा करू शकतो.
मानसिक आजारांबद्दल जनजागृती करताना कथेतून, प्रतिसादातून आपण सिझोफ्रेनियाला ट्रायवलाईज करत नाहीय ना हेदेखील सर्वांनी एकदा तपासून पहावे अशी सुचवणी करते.
===
परत एकदा सांगते कथा चांगली लिहलीय, कथेमागचा उद्देश चांगला आहे. हृदय योग्य जागी वगैरे....
But that doesn't mean it's spreading RIGHT message among readers.
===
बाकी पुस्तक वाचल्यावर बोलू. टाटा.
एका वेगळ्या विषयावरील उत्कंठा
एका वेगळ्या विषयावरील उत्कंठा वाढविणारे कथालेखन. पूलेशु
धन्यवाद अॅमी..
धन्यवाद अॅमी..
तुम्ही सुचविलेले पुस्तक मी भविष्यात नक्की वाचेन. मी ह्या विषयातील तज्ञ नाही हे मी वर आधीच नमूद केले आहे. वाचनात आलेल्या माहितीनुसार स्किझोफ्रेनिया किंवा इतर मानसिक आजारांवर अजून बरचसे संशोधन होणे बाकी आहे त्यामुळे आपण कुठल्याही पक्क्या निष्कर्षापर्यंत येणं उचित ठरणार नाही. समाजात मुळातच स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार आहे हेच लोकांना माहित नाही. ह्या आजाराची लक्षणे पाहून रुग्ण आणि नातेवाईक बुवाबाजीच्या नादाला लागून कुंटूंबाची वाट लावून घेतात हे पाहण्यात आहे. मुळात कथेचा उद्देश तुम्ही ह्या आजाराकडे दुर्लक्ष न करता तज्ञाची मदत घ्या हाच आहे. कथेतून कुठलाही चुकीचा संदेश देणं हा उद्देश नाही. तांत्रिकदृष्ट्या कथेत काही मुद्दे चुकीचे असतीलही ( मी परत एकदा नमूद करतेयं मी ह्या विषयातील तज्ञ नाही). मी रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबियांना नुस्ती कोरडी सहानुभूती न दाखविता प्रत्यक्ष ( आर्थिक आणि मानसिक) मदत केलेली आहे. पुस्तकातून वाचून माहिती मिळविणे आणि परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे ह्यामध्ये थोडातरी फरक असू शकतो ( हे माझे वैयक्तिक मत आहे). अनुवंशिकता हे १००% टक्के हा आजार होण्यास कारणीभूत आहे हे माझ्या वाचनात आलेले नाही ( ह्या आजारावरील माझं वाचन मर्यादित आहे).
तुमचे मुद्दे प्रॅक्टीकली कितीही योग्य असले तरीही मानसिक आजारी व्यक्तीला आणि त्याच्या कुटूंबियांना मानसिक पाठींब्याची नितांत गरज असते.
दुसरा मुद्दा हा की आईवडीलांनी आजार माहीत असताना लग्न करून देणे चुकीचे नाहीतर गुन्हाच आहे. कुणाचीही फसवणूक करणे योग्य नाहीच पण खरोखरचं रुग्णाला ती लक्षणे लग्नाआधी जाणवतं नसतील तर किंवा नकळतपणे त्याकडे दुर्लक्ष झालं असेल तर? आणि लग्नानंतर जर आजाराची लक्षणे तीव्र जाणवू लागली तर त्यानंतर घटस्फोट घेणं हे कायद्याने जरी योग्य असले तरी मानवतेच्या दृष्टीकोनातून योग्य होणार नाही ( हे ही माझे वैयक्तिक मत आहे. ह्यातून मला हे सुचित करायचे नाही की तुम्ही कुणाची फसवणूक करा.)
डॉक्टर म्हात्रेंनी ग्वाही दिली की तपस्या ह्या आजारातून बरी होईल - अनुभवावरून तरी सांगते डॉक्टर पहिल्या भेटीत तरी रुग्णाला उपचारासोबत मानसिक बळही देतात. सत्य परिस्थिती कितीही कटू असली तरीही रुग्णाचे आणि नातेवाईकांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये ह्याची काळजी ते घेत असावेत. ( कथेत तरी मी त्याच अनुषंगाने लिहिले आहे).
तांत्रिक दृष्ट्या जे मुद्दे तुम्हांला कथेत खटकले आहेत ते मी फक्त वाचनात आलेल्या माहितीनुसार कथेत लिहिले आहेत.त्याबाबतीत प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घेणं उचित ठरेल.
रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो टिपेत असलेल्या वाक्याने जर चुकीचा संदेश जात असेल तर मी ते वाक्य टिपेतून काढून टाकते.
तुम्ही सुचविलेल्या पुस्तकांतून बरीच महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती रुग्णासाठी आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल अशी मला खात्री आहे.
समाज आणि सरकारने हया रुग्णाची काळजी घ्यावी हे जरी योग्य वाटत असले तरीही पहिल्यांदा ह्या आजाराला बळी पडलेल्या रुग्णाच्या कुटूंबियांनी आणि नातेवाईकांनीच त्या रुग्णाला, त्याच्या आजाराला समजून घेऊन त्याला मानसिक आधार द्यायला हवा हे माझं मत आहे. त्यासाठी कुटूंबियांचे समुपदेशन आवश्यक आहे.
कथा अत्यंत स्वच्छ हेतूनेच लिहिली असून त्यामागे कुणाच्याही भावना दुखविण्याच्या किंवा समाजात चुकीचा संदेश देणे हा उद्देश नाही. सुज्ञ वाचक ह्या कथेतून योग्य तोच संदेश घेतील अशी मी आशा बाळगते.
अजून एक , स्किझोफ्रेनिया सारख्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष न करता रुग्णाला आणि त्याच्या कुटूंबियांना फक्त सहानुभूती न देता त्यांना तज्ञाचे समुपदेशन तसेच आर्थिक ( जर रुग्ण गरीब परिस्थितीत असेल तर) आणि मानसिक आधाराची गरज आहे हा एवढा जरी संदेश वरील कथेतून पोहचला तरी माझ्या कथेचा माझा मूळ उद्देश सफल झाला असं मानण्यास हरकत नाही.
मी अजून या विषयावर काही लिहू शकणार नाही कारण मी हया विषयातील तज्ञ नाही हे परत एकदा नमूद करते.
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद..!
किशोरजी धन्यवाद...
किशोरजी धन्यवाद...
तुमच्या प्रतिसादाची खरचं वाट पाहत होते.
वेलकम बॅक ॲमी
वेलकम बॅक ॲमी
पुन्हा एकदा, कथा, कथेच्या दृष्टिकोनातून वाचून, काहीतरी सकारात्मक वाचून, छान वाटलं
मानव, छान प्रतिसाद!
मानव, छान प्रतिसाद!
अॅमी, तुमची कळकळ पोहोचली.
स्किझोफ्रेनिया बाबत अनुवंशिकता हे एकच कारण नाही. गर्भावस्तेतील कुपोषण, काही टॉक्झिन्स आणि वायरसेस यांचा आईला झालेला संसर्ग यामुळे मेंदूच्या वाढीवर झालेला परीणाम, माईंड आल्टरिंग ड्रग्जचा वापर ही देखील कारणे आहेत. उदा. गरोदर स्त्रीला पहिल्या ३-४ महिन्यात फ्लू च्या वायरसचे एक्सपोझर झाले असल्यास बाळाचा स्किझोफ्रेनियाचा धोका तिप्पट होतो. जसे तंत्रज्ञान सुधारत आहे तसे मेंदू आणि चेतासंस्थेचे चित्र उलगड आहे, न्युरोइमेजिंगच्या साहाय्याने रोग्याच्या मेंदूंमधील फरक दिसून येत आहेत.
या आजाराबद्दल, त्याच्या लक्षणांबद्दल जेवढी जागृती होईल तेवढे रोगाचे लवकर निदान होणे आणि तो आटोक्यात रहावा म्हणून उपाय योजना करणे शक्य होईल.
>>>>बरोबर. ती औषधं रुग्णाला
>>>>बरोबर. ती औषधं रुग्णाला केवळ नंब आणि स्लगीश बनवतात. इतर काहीही करत नाहीत.>>> पण अॅमी त्यामुळे हॅल्युसिनेशन्स कसे थांबतील?
>>>>> नायिकेचे वडील जाणूनबुजून खोटं बोलताहेत.>>>> मला वाटतं बळी पडलेल्या केसेस पूर्वी लक्षात येत नसत. काहीतरी बाहेरची बाधा आहे किंवा मग चिघळत जाऊन, आत्महत्या वगैरे होण्याइतक्या थराला जात पण निदान होत नसे.
>>>>Hidden Valley Road पुस्तक नक्की वाचा>>> वाचते.
>>>>>>रोचक बाब म्हणजे विज्ञान-औषधे फेल जात असताना, अध्यात्म &/ ७०च्या दशकात अमेरिकेत आलेले हिप्पी कल्चर seems to be helping/ schizophrenics from getting to much wild/damaged/ding.>>>> हे माहीत नव्हते. सर्व नास्तिकांचे म्हणत नाहीये पण जे 'अंगावर धाउन येणारे नव-विज्ञानवादी आणि नास्तिक' असतात त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष द्यावे. बाकी तुझ्याकडे काही संदर्भ आहे का की अध्यात्म या रोगात मदत करते याचा?
________
>>>>>स्किझोफ्रेनिया बाबत अनुवंशिकता हे एकच कारण नाही. गर्भावस्तेतील कुपोषण, काही......धोका तिप्पट होतो. >>>>> हे माहीत नव्हते.
बरोबर. ती औषधं रुग्णाला केवळ
बरोबर. ती औषधं रुग्णाला केवळ नंब आणि स्लगीश बनवतात. इतर काहीही करत नाहीत.>>>
गैरसमज. नंब, स्लगिश होणे हे साईड इफेक्ट्स आहेत जे सुरुवातीला जास्त प्रमाणात असतात पुढे हळूहळू कमी होत जातात, कुठले ड्रग आणि किती डोस यानुसार थोड्या अधिक प्रमाणात नंतरही रहातात.
औषधांंचे सुपरिणाम: रुग्णाचे डिल्यूजन्स थांबतात / एवढे सौम्य होतात की रुग्णाला हे डिल्यूजन्स आहेत ही insight येते, आणि मग समुपदेशनाने त्यावर दुर्लक्ष करणे शक्य होते. Hallucinations थांबतात. cognition सुधारते, हिंसकपणा, मूड स्वींंग्ज नियंत्रणात येतात. केस टू केस परिणाम, त्यास लागणारा कालावधी कमी जास्त असु शकतील, काही केसेस नसतील नीट रिस्पॉन्ड करत.
माईल्ड सिझोफ्रेनिया असेल>> उदाहरणात दिलेल्या दोन्ही केसेस मध्ये माइल्ड अजिबात म्हणता येणार नाही. वाखाणण्या जोगे या करता म्हटले आहे की आधीचे डील्युजन्स आणि violent episodes पहाता व्यक्ती एवढी सुधारली याचे आश्चर्य वाटले.
लौकर डीटेक्ट झाला का हे सांगणे शक्य नाही बहुतकरून मोठा एपीसोड झाल्याशिवाय रुग्णास मानसोपचारतज्ञाकडे नेले जात नाही. आधी दिसणाऱ्या सिम्पटोम्स वरून आजार जरी कळला नाही तरी व्यक्तीला मानसोपचार हवेत हे कळले तरी रुग्ण येणास तयार होत नाही आणि मग मोठा एपिसोड घडे पर्यन्त ते पुढे ढकलले जाते.
पहिल्या केस मध्ये एकदा कळल्यावर उपचार लगेच सुरू झाले. दुसऱ्या केस मध्ये पहिली दीड दोन वर्षे नीट उपचार झाले नाहीत. पण पुढे काटेकोरपणे झाले.
• तुम्ही किंवा कुटुंबातील कोणी मनोरुग्ण असेल तर आजार लपवून, लग्न-मूल झाल्यावर बरा होईल असला विचार करून लग्न लावून देऊ नका.>>>> सहमत. आणि लग्न करताना जोडीदारास मानसिक आजार आहे (आणि उपचाराने नियंत्रणात आहे) असे कळल्यास भावनेच्या भरात होकार देऊ नका, हा आजार नक्की काय आहे, त्याचे जिवनावर काय परिणाम होऊ शकतात, काय परिस्थितीतून जावे लागेल याची पूर्ण जाणीव असल्याखेरीज.
• दुर्दैवाने लग्नानंतर जर लक्षात आले की जोडीदार मनोरुग्ण आहे तर ताबडतोब घटस्फोट घ्या. Its valid ground for divorce >> हो घटस्फोटास हे valid ground आहे. पण घटस्फोट घ्याच असं का. वर म्हटल्याप्रमाणे रुग्ण कसा हाताळावा लागेल, काय परिस्थीतुन जावे लागेल याचा विचार करून ज्याने त्याने ठरवावे.
रुग्णाला सिपंथी द्यायला जाऊन रुग्णाच्या (सामान्य आयुष्य जगू इच्छिणाऱ्या) कुटुंबियांवर आपण नकळतपणे सामाजिक दबाव टाकत नाहीय ना हेदेखील पहायला हवे. >>> Noted.
तुमच्या पोस्टवरून हे आजार आनुवंशिकच आहेत असे तुम्हास वाटते असे दिसते. त्यावर स्वाती2 यांनी वर लिहिले आहेच.
मी दिलेल्या मुलाचे उदाहरणात आनुवंशिक नाही. मुलीच्या बाबतीत माहीत नाही, असु असेल. अजून दोन जण माहीत आहेत ज्यात आनुवंशिक नाही एक गावच्या मित्राचा भाऊ, त्याचे आई बाबा दोन्ही घराण्याची माहिती आहे आणि एक दूरच्या नात्यात त्यांच्याही कडील माहिती आहे.
Pages