प्रेम करावं अर्जुनासारखं

Submitted by रूपाली विशे - पाटील on 18 November, 2020 - 08:54

अकरावीत असताना कुसुमाग्रजांची 'प्रेम करावं भिल्लासारखं ' ही कविता अभ्यासत असताना कविता अगदी मनात रुतून बसली. ' प्रेम करावं भिल्लासारखं' कुसुमाग्रजांची ही कविता माझी खूप आवडती कविता आहे. आजच्या काळाचा संदर्भ घेत मी माझ्या शब्दांत कविता करण्याचा प्रयत्न करून पाहिला अन् कागदावर मांडला शब्दांचा खेळ!!

प्रेम करावं अर्जुनासारखं !!

पूरे झाले रोमिओ- ज्युलिएट
पूरे झाले हिर अन् रांझा
पूरे झाले ते गुलाबाचे गुच्छ
पूरे झाले चॉकलेट अन् पिझ्झा...!!

तेंडूलकरसारखा तळपत रहा
तुझ्या प्रेमाच्या धावपट्टीवर
आहे सारा संसार तुझ्या जादूच्या झप्पीत
सांग तिला तिच्या नजरेस देऊन नजर...!!

इंग्राजळलेले शब्द आणिक
प्रेमाच्या चारोळ्या करतील काय?
बाभळीच्या काटेरी वनात
लाल गुलाब खरचं उगवेल काय?

वॉटस्अप अन् फेसबुकच्या
दुनियेत राहशील तू हिंडत
सखी तुझ्यासाठी झुरत बसणार नाय
नंतर तुला वाङनिश्चयाची अंगठी
दाखवल्याशिवाय राहिल काय?

म्हणून सांगते सश्यासारखं झोपू नकोस
कासव साधेल आपली वेळ
प्रेम नाही नुसत्या पोकळ शब्दांचा खेळ...!!

प्रेम म्हणजे हृदयातील धगधगती आग
खरं प्रेम जर करत असशील तर शब्दाला जाग...!!

प्रेम करावं अर्जुनासारखं
मासोळीच्या नेत्रावर रोखलेलं
नेत्रभेद करण्याआधी द्रौपदीपर्यत पोहचलेलं..!!

आंतरजालाच्या जाळ्यात फसू नकोस
उगाच होडीच्या शिडासारखा फडफडू नकोस
येऊ दे वादळ सगळं तुझ्या हृदयात दाटलेलं...!!

प्रेम करावं अर्जुनासारखं
मासोळीच्या नेत्रावर रोखलेलं...!!

रुपाली विशे- पाटील

Group content visibility: 
Use group defaults

लोमिओ ज्युलिएत का अपमान
नाही शहेगा व्हेरोनास्तान

- कॉमी (मॉंटेग्यू ग्यान्गचा धडाडीचा कार्यकर्ता.)

कविता आवडली.

छान लिहलिये कविता तुम्ही.

अवांतर: आम्हाला पण होती ही कविता अकरावीला. "अभ्यासक्रमात आहे म्हणुन शिकवतोय. कोणाला कवितेत लिहल्याप्रमाणे वागावसं वाटलं तर गाठ माझ्याशी आहे." असा दम सरांनी कविता शिकवण्याआधीच भरला होता.

अज्ञातवासी, मृणाली, सामो, कॉमी, वीरूजी, अस्मिता...
धन्यवाद कविता आवडल्याबद्दल..

@ वीरू - तुमचे सर कविता शिकवित असतानाच मुलांना दम भरतायेत असं चित्र कल्पून खूप हसले मी..
हि कविता सर आम्हांला शिकवित असताना आम्ही विदयार्थी फार लाजलो होतों.. आम्ही मुली जरा जास्तच!! शाळेतून कॉलेजला गेल्या- गेल्या प्रेमावरची कविता शिकणे म्हणजे गालावर लाजेचा मुलामा चढणं स्वाभाविक होत.

मस्तच!
प्रेम करावं अर्जुनासारखं
मासोळीच्या नेत्रावर रोखलेलं
नेत्रभेद करण्याआधी द्रौपदीपर्यत पोहचलेलं..!!
=> हे सगळ्यात जास्त आवडलं

तृप्ती - धन्यवाद!! मलासुद्धा तेच कडवं जास्त आवडते.

हरचंदजी - धन्यवाद.. आणि sorry कशासाठी? तुम्हाला कविता वाचताना तसं वाटलं ते तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं.. त्यात मला काही वाईट नाही वाटलं. ( ह्या वेळेला मी तुमचं नाव नीट टाइप केलयं बरं)

सुंदर कविता आहे,
अर्जुनाचा उल्लेख सुंदर,
मध्येच तेंडूलकर, मध्येच अर्जुन,
शेवटच्या कडव्यात वादळ,
मध्ये तिचा झालेला वाङनिश्चय,

संदर्भ थोडे विस्कळीत वाटतात.

परिचय विरहित टीका आहे, त्यामुळे वाईट वाटल्यास माफी असावी, भावना दुखावण्याचा हेतू नाही.

इंग्राजळलेले शब्द आणिक
प्रेमाच्या चारोळ्या करतील काय?
बाभळीच्या काटेरी वनात
लाल गुलाब खरचं उगवेल काय?

वाह! कविता मस्तच जमली आहे.
एकेक कडवे सुरेख

हरचंदजी, किल्ली, सिद्धी , खग्या - मनापासून धन्यवाद तुमचे..

मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
<< कुसुमाग्रजांचे मुळ कवितेतील ही कडवी...

महान कवी कुसुमाग्रजांची कवितेतून प्रेरणा घेऊन आजच्या काळातला आणि इतिहासातला संदर्भ देऊन मी कविता केली. खरतरं माझी हि कविता म्हणजे काजव्याने सूर्याला प्रकाश दाखविण्यासारखं आहे. पण मनातील सुप्त इच्छा मला शांत बसू देत नव्हती म्हणून हा शब्दांचा खेळ कागदावर मांडला.

@ खग्या -
तुमच्या प्रतिसादाने माझ्या भावना काही दुखावणार नाहीत
आणि त्याबद्दल तुम्हांला माफी मागण्याची काहीच आवश्यकता नाही. तुमच्या प्रतिसादाला मी टिका मानतच नाही. माझ्या लेखनात मला सुधारणा घडवायची असेल तर मला अश्या प्रतिसादांची हि आवश्यकता आहे. पुढच्या लेखनाच्यावेळी तुमचा प्रतिसाद मी नक्कीच ध्यानात ठेवीन.

( अॅडमीन महोदय, कुसुमाग्रजांच्या कवितेतील कडवी इथे प्रतिसादात टाकणे मायबोलीच्या धोरणात बसत नसेल तर माझा प्रतिसाद उडवला तरी चालेल).

अरे मस्त जमलीय कविता.

प्रेम करावं अर्जुनासारखं
मासोळीच्या नेत्रावर रोखलेलं
नेत्रभेद करण्याआधी द्रौपदीपर्यत पोहचलेलं..!! +100

क्या बात है!

प्रेम करावं अर्जुनासारखं
मासोळीच्या नेत्रावर रोखलेलं
नेत्रभेद करण्याआधी द्रौपदीपर्यत पोहचलेलं..!!
>>>>हे.हे भारीच!

@रूपाली
मलाही कुसुमाग्रजांची ही कविता प्रचंड आवडते.. तुमच्या कवितेचं शिर्षक वाचूनच अंदाज आला होता कि कदाचित विडंबन असू शकते.‌ खग्या म्हणाले तसं थोडीशी विस्कळीत आहे. आजच्या काळातील संदर्भ कवितेत आणखी असायला हवे होते.. पण चलता हैं। हम भी तो सिख ही रहे हैं!
बादवे तुमचं विडंबन आवडलं..☺️

धन्यवाद मन्या!!
तुझा प्रतिसाद पुढच्या लेखनाच्या वेळी नक्कीच लक्षात ठेवेन...

मस्तच जमली आहे कविता !

अर्जुन तेन्डूलकर चा सन्दर्भ प्रतिक्रिया वाचून समजला

तो तसा अभिप्रेत होता का ?

खूप धन्यवाद ..!!
चुन्नाड, प्रभुदेसाई..!!

अर्जुन तेन्डूलकर चा सन्दर्भ प्रतिक्रिया वाचून समजला
तो तसा अभिप्रेत होता का ? >>> नाही.

तेंडूलकरसारखा तळपत रहा
तुझ्या प्रेमाच्या धावपट्टीवर
..>>> सचिन तेंडुलकरचा संदर्भ आहे कवितेत. त्याचं क्रिकेटच्या खेळातलं योगदान आणि खेळातली चिकाटीचा संदर्भ वापरलायं कवितेत..!