"लक्ष्मी"
" ए, भवाने.! उठ की आता.. तो सूर्य माथ्यावर येईल तरी झोप पूरी होत नाही महाराणीची..!!. रोज तुला जेवायला कोणं तुझा वर ढगात बसलेला बाप घालील का?" मामीच्या कर्कश आवाजाने आणि खसकन् ओढलेल्या फाटक्या गोधडीतून गाढ झोपी गेलेली लक्ष्मी खडबडून जागी झाली. लक्ष्मी अंथरुणातून उठून जागेवर बसली आणि बसल्या- बसल्याच डोळे चोळत इकडे- तिकडे पाहू लागली. तिला तसं बसलेलं पाहून मामीच्या रागाचा पारा अजूनच चढला. लक्ष्मीच्या आई- वडिलांचा शिव्यांनी उद्धार करीत मामीच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू झाला.
" आता सातची गाडी बी जाईल आणि आज जर तू पैसं नाही आणलं तर दारात उभं करणार नाही तुला मी... आत्ताच सांगून ठिवते...!!" मामी भयंकर पिसाटली होती.
लक्ष्मी घाबरून एक - दोन क्षण मामीकडे पाहू लागली.
"आता काय सांगावं ह्या भिकारीडीला ...माझं थोबाड काय बघत बसली हायेस.. . बघत बसायला काय आरसा हाय का त्यो...!!" लक्ष्मीला अंथरुणातून बाहेर खेचत गरागरा डोळे फिरवत मामी मोठ्या-मोठ्या आवाजात बडबडू लागली.
××× ××× ×××
'लक्ष्मी' कित्ती सुंदर नाव !! देवी महालक्ष्मीचं नाव.!! लक्ष्मीची आई डहाणूच्या महालक्ष्मीची भक्त होती. तिने मोठ्या भक्तीभावाने महालक्ष्मी मातेचं नाव आपल्या लेकीला ठेवून लहानग्या लक्ष्मीसाठी खूप सुंदर स्वप्ने पाहिली होती. परंतु सुंदर स्वप्ने पाहणाऱ्या लक्ष्मीच्या आईला दारुड्या बापाने रॉकेल ओतून जाळून मारलं आणि आईसोबतच तिच्या साऱ्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आणि ह्या भल्यामोठ्या जगात चिमुकली लक्ष्मी पोरकी, अनाथ झाली. लक्ष्मीच्या वडीलांनी नशेच्या व्यसनापायी आईची हत्या केली आणि बाप असूनही तो आईच्या हत्येचा गुन्हेगार म्हणून गजाआड गेला. आज एवढ्या वर्षांनीसुद्धा रोज रात्री लक्ष्मीला त्या अप्रिय घटना स्वप्नांत दिसतात आणि मग ती प्रचंड घाबरून झोपेतून जागी होते.
आपल्या आयुष्यातला तो काळा दिवस लक्ष्मीच्या डोळ्यांसमोर आजही तसाच उभा राहतो. जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीत शिकणारी लक्ष्मी त्यादिवशी धावतच घराकडे निघाली होती. शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात बाईंनी मला भाग घ्यायला लावलं आहे, ही आनंदाची बातमी आपल्या आईच्या गळ्यात हात टाकून कधी एकदा सांगते असं तिला झालं होतं. हि बातमी ऐकल्यावर आई खूप आनंदी होईल आणि मला चॉकलेट खायला पैसे देईल असं स्वप्नरंजन लक्ष्मीच्या बालमनात चाललं होतं. स्वप्नात रममाण होतच ती शाळेतून धावत घरी निघाली होती. पण दुरुनच आपल्या झोपडीबाहेर लोकांची गर्दी आणि पोलिसांची गाडी पाहून ती घाबरली. हे सारं चित्र पाहून तिच्या पायांनी अजून वेग घेतला.
" हो साहेब!! नवरा-बायकोच्या भांडणाचा आवाज बाहेर येत होता... पण दोघांच्या भांडणात तिसर्याने कशाला पडावं म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण बाईच्या किंचाळ्यांनी काळजाचा ठोका चुकला ..साहेब!... मी बाहेर आलो , पाहिलं तर... बाई जळत होती आणि हा बेवडा पळून जात होता!".. झोपडपट्टीतला एक धीटसा वाटणारा इसम पोलिसांना माहिती पुरवत होता.
झोपडी बाहेरच्या तुटक्या लाकडी खुर्चीला लक्ष्मीच्या बापाला लोकांनी बांधून ठेवलं होतं. तो प्रमाणाबाहेर दारू ढोसून होता. त्याला कसलीही शुद्ध नव्हती. त्याची मान सारखी डुगडुगत होती. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती आणि त्यासोबत तोंडातून असंबद्ध बडबड सुरु होती.
"काय रे बेवड्या...!! बायकोला तू जाळलसं का?" पोलिसाने लक्ष्मीच्या बापाच्या कानाखाली एक सणसणीत वाजवली. लक्ष्मीचा बाप पोलिसाच्या थपडेने धडपडला आणि जरासा भानावर आला.
" पैसं... पैसं... पायजेल व्हंत मला... दारुसाठी... लईच शिव्या द्यायला लागली मला.. XXX साली ... पेटविली.. मी ... मी... मारलं तिला... लईच शानी बनीत व्हती... आता अक्कल आली असल तिला... मला शिकवित हुती xxx!!
"दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून बायकोला जाळतो काय? उचला रे ह्या बेवड्याला... टाका गाडीत... ह्याची दारू पोलीस चौकीत नेऊन चांगलीच उतरवतो..!" साहेबांनी हवालदारांना आज्ञा सोडली. पोलिसांनी लक्ष्मीच्या बापाला गाडीत टाकलं आणि हृदयाची धडधड वाढविणाऱ्या सायरन वाजवित आलेल्या अॅम्ब्युलन्समधे संपूर्ण शरीराचा कोळसा झालेल्या तिच्या प्रिय आईला...!!
हे सारं भयानक दृश्य पाहून चिमुकली लक्ष्मी पार घाबरून गेली होती. शेजारची सीताक्का अनाथ झालेल्या लक्ष्मीच्या केसांवरून हात फिरवत टिपं गाळत होती. आजूबाजूचे बाया- बापडे लक्ष्मीकडे बघून हळहळत होते. आपल्या आयुष्यात काय घडलंय आणि पुढे काय होईल याची जाणीव लक्ष्मीला होत नव्हती. आता आपली आई मेली आहे आणि आपल्या वडिलांना पोलिसांनी पकडून नेलं आहे आणि आता आपण एकटे पडलो आहोत एवढं मात्र त्या लहानग्या जीवाला समजलं. ह्या भल्यामोठ्या दुनियेत पोरक्या झालेल्या लक्ष्मीला आता कुणी वालीच उरला नव्हता. अनाथ झालेल्या लक्ष्मीला शेजारच्या झोपडीत राहणार्या प्रेमळ सीताक्काने आपल्या पदराचा आधार दिला. पण काही दिवसांनी हा एकमेव प्रेमळ आधारसुद्धा नियतीने क्रूरपणे लक्ष्मीकडून हिरावून घेतला. तर झालं काय ... एके दिवशी लक्ष्मीच्या झोपडीबाहेर एक जोडपं येऊन उभं ठाकलं.
" ए.. बाई .. लक्ष्मी आमची भाची हाय... तू कशाला तिला ओटीत घेऊन बसली आहेस? " येताक्षणी त्यांनी भोळ्या सीताक्काला दमदाटी सुरू केली.
" तुम्ही कुठून आलात? तुम्हाला मी इथं पहिल्यांदाच पाहतेयं!!" सीताक्काने विचारलं.
" माझ्या बहिणीची मुलगी हाय लक्ष्मी... मी तिचा मामा .. आम्ही तिथं वापीला राहतो..!!" जोडप्यातला पुरुष गुर्मीत म्हणाला.
" आम्ही सांभाळू लक्ष्मीला इथं राहून!!" त्याच्या सोबतची स्त्री अधिकारवाणीने सीताक्काला म्हणाली.
सीताक्काने त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. लहान लक्ष्मीची जबाबदारी जर कुणी तिच्या नात्यातली व्यक्ती घेत असेल तर तिला काही हरकत नव्हती. झोपडीच्या लालसेने मध्येच उपटलेल्या उपटसुंभ मामा-मामीने येताक्षणीच झोपडी आणि लक्ष्मीचा ताबा घेतला आणि सुरू झाली लक्ष्मीच्या दुर्दैवाची नवी कहाणी!!
कपटी आणि संधीसाधू मामा - मामीने पहिल्यांदा लक्ष्मीची शाळा बंद केली आणि लहानग्या लक्ष्मीला जवळ असणाऱ्या स्टेशनवर भीक मागायला पिटाळलं. एका लहानश्या टोपलीत देवीचा फोटो ठेवून लक्ष्मी पूर्ण दिवस स्टेशनवर भीक मागू लागली. आठ - नऊ वर्षाची लक्ष्मी दिवसभर भीक म्हणून मिळालेले पैसे जमा करून मामा-मामीच्या हवाली करू लागली. लक्ष्मीच्या भीकेच्या पैश्यांनी मामा-मामीचा उदरनिर्वाह होऊ लागला. त्यांच्यासाठी लक्ष्मी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली होती. लक्ष्मीच्या पैश्यांनी मामा जुगार, दारू पिणे इत्यादी व्यसने करू लागला. त्या दोघांना लक्ष्मीच्या भिकेच्या पैश्यांची हाव सुटली. लहानग्या, निष्पाप लक्ष्मीचं आयुष्य मामा- मामीच्या छळाने करपू लागलं. प्रेमळ सीताक्काला लहानग्या लक्ष्मीचे हाल बघवत नव्हते पण हळहळ व्यक्त करण्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती कारण हातावर पोट असणारी ती झोपडपट्टीतील गरीब माणसं... आपल्या पोटाची भूक कशी भागवावी ह्या विवंचनेत जगणारी.... लक्ष्मीला कशी आणि किती मदत करणार?
परंतु लक्ष्मीच्या नशीबाचा क्रूर खेळ एवढ्यावरच थांबला नव्हता. नियतीच्या दुर्दैवी फेऱ्यात अडकलेल्या लक्ष्मीला नियतीने अजून एक जबरदस्त तडाखा दिला. एके दिवशी साध्या तापाचं निमित्त झालं आणि लक्ष्मीचे हात- पाय वाकडे झाले. मामा- मामीने दवा-पाणी काहीच केलं नाही. लक्ष्मीला त्या परिस्थितीत पाहून सीताक्काने तिच्या कुवतीप्रमाणे मदत केली. तिची ही दयनीय अवस्था पाहिल्यावर दया येऊन कुणा एका सद्गृहस्थांनी तिची माहिती एका समाजसेवकाला दिली. त्यांनी लक्ष्मीला महिला आधार केंद्रात दाखल केलं. काही दिवसांनी तब्येतीत जरा फरक पडल्यावर लक्ष्मी आधारकेंद्रातून आपल्या झोपडीत परतली आणि पुन्हा एकदा लालची मामा - मामीने जबरदस्तीने तिला लोकांपुढे भिकेसाठी हात पसरायला भाग पाडलं.
xxx xxx xxx
" ए...काय गं! तूच माझी पर्स चोरलीस ना? तूच बसली होतीसं इथे माझ्या जवळ... लवकर खरं सांग नाहीतर पोलिसांना बोलाविन मी!!" रेल्वे स्टेशनवरील ती स्त्री लक्ष्मीला खडसावून विचारत होती. त्या स्त्रीचे मोठ्या पर्समधील पैश्यांचे पाकीट हरवलं होतं. त्या बाईंनी पर्समध्ये शोधल्यावरही पाकीट न सापडल्याने त्यांनी बाजूला असलेल्या लक्ष्मीवर चोरीचा आळ घेतला होता. त्या बाई लक्ष्मीला चोर ठरवित होत्या.
" नाही ओ ताई!! मी नाही चोरलं तुमचं पैशाचं पाकीट!!" रडत - रडत लक्ष्मी आपली बाजू मांडत होती.दोघींच्या आवाजामुळे स्टेशनवरील आजूबाजूची लोकं त्या दोघींभवती जमा होऊ लागली.
"ही भिकारीण होती माझ्या बाजूला... हिनेच चोरलयं माझं पाकीट !!" ती स्त्री तावा-तावाने बोलत होती.
" खरचं..!! मी नाही हो ..चोरलं तुमचं पाकीट... महालक्ष्मीची शपथ!! माझ्या आईची बी शपथ घेते!! खोटं नाय बोलत मी!! " लक्ष्मी रडत - रडत , गळ्याला चिमटा घेत आपला बचाव करीत होती.
" तुम्ही एकदा पर्समध्ये नीट शोधा ना...!!" बाजूच्या बाईने पाकीट हरवलेल्या बाईंना सांगितलं. त्या बाईंनी सर्वांसमोर पूर्ण पर्स शोधली पण त्यांना पैशाचं पाकीट काही सापडलं नाही.
" तुमच्या जवळ हि कापडी पिशवी आहे ना... त्यात पण बघा ना एकदा!!" दुसऱ्या एका बाईंनी सुचवलं. बाईंनी कापडी पिशवीत हात घातला आणि काय आश्चर्य म्हणावं!! पैश्याचं लहान पाकीट बाईंच्या हातात आलं. हरवलेलं पाकीट सापडलेलं पाहून बाई ओशाळल्या.
" हल्ली फार विसरायला होतं हो... तिकीट काढताना पैसे दिले आणि पर्समध्ये हे पाकीट टाकायचं सोडून घाई - घाईत ह्या पिशवीत कोंबलं"! कसंनुसं हसत बाई म्हणाल्या.
" काय एकेक वेंधळट बायका असतात!"
" उगाच गरीबावर चोरीचा आळ घ्यायचा!" .
जमलेल्या घोळक्यातून कुणीतरी कुजबुजलं.
' मुकी बिचारी कुणीही हाका ' अगदी तसचं घडलं लक्ष्मीच्या बाबतीत. विमनस्क अवस्थेत, भकास चेहऱ्याने लक्ष्मी बराच वेळ स्टेशनवरच्या बाकावर बसून राहिली .आज तिला भीक मागायचे पण लक्षात राहिले नाही. पण... पण ... भीक तर मागावीच लागणार ! दिवसाला शंभर रुपये भीक नाही मिळाली तर घरी जेवायला मिळणार नाही. जेवण? हं .. जेवण तरी काय? .. एक जळकी भाकर आणि पाणचट , शिळी डाळ!! रात्री उपाशी झोपताना मामीच्या हातचा पोटभरून मार मात्र खायला मिळेल ह्या विचारानेच तिच्या अंगावर शहारा आला.
' नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा' " आई गं... काय विचार करून ठेवलसं गं.. माझं नाव तू? लक्ष्मी...!! काय नावाने ओळखतात लोक मला .. 'भिकारीण लक्ष्मी ' !! लक्ष्मी मातेचा अपमान होतो गं ...आई माझ्यामुळे... आई तू कुठे आहेस गं... ये ना गं.. परत... आई!!" लक्ष्मीचं मन आक्रंदन करत होतं... रडत होतं. लक्ष्मी बसल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु आज तिच्या अंगात जराही त्राण उरलं नव्हतं. काय करावं ह्या विचाराने लक्ष्मी तिथेच पडून राहिली. तिच्या डोळ्यांना अश्रृधारा लागल्या होत्या.
×××× ××××
" ओ.. ताई ...दहा रुपये द्याल का गरिबाला... मदत कराल का ताई...?".
"हं .. हे घे दहा रुपये !.. तुला बरं वाटत नाहीये का ?."
" हो.. ताई.. डोकं दुखतयं माझं आणि ताप आल्यासारखं पण वाटतयं"!!.
" मग तू आता घरी जा ना... इथे का थांबली आहेस?."
" मी सरकारी दवाखान्यात जाते सरळ इथून.. रिक्षाला दहा रुपये लागतात ना.. म्हणून तुमच्याजवळ मागितले मी "!
" ठीक आहे ... हे अजून वीस रुपये ठेव आणि दवाखान्यातून घरी जाताना रिक्षाने जा आणि दहा रुपयांचा वडापाव खा .. जा लवकर!" घाई-घाईने पैसे लक्ष्मीच्या हातात देत ताई ट्रेन पकडायला निघून गेली. मनोमन त्या ताईला आशीर्वाद देत लक्ष्मी जिन्याकडे चालू लागली.
XXX XXX XXX
" ए ... मामा नको रे ते पैसे घेऊ...संध्याकाळी मामीला पैसे दिले नाही तर जीव घेईल ती माझा.. सोड रे ती पिशवी!". लक्ष्मी काकुळतीला येऊन सांगत होती पण तो गर्दुल्यासारखा दिसणारा इसम तिच्या हातातील भीक मिळालेल्या पैश्यांची पिशवी खेचत होता.
" बऱ्या बोलानं दे ती पिशवी नाही तर मीच घेईन तुझा जीव"!!.
" नको .. नको घेऊ रे...आई गं..!!"
लक्ष्मीला एक जोरदार हिसका देऊन, तिला खाली पाडून तिचा पक्का जुगारी आणि दारुड्या मामा तिचे पैसे लुटण्यात यशस्वी झाला आणि प्लॅटफॉर्मवरून, रेल्वे पटरीवरून माकडासारख्या उड्या मारत पलीकडच्या झोपडपट्टीत फरार झाला.
आपल्या नशिबाला दोष देत रडतच लक्ष्मी जागेवर बसली. आईला बापाने मारलं आणि बाप तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच परलोकी गेला आणि मी ... मी ...कसलाही गुन्हा न करता ही शिक्षा भोगतेयं... जीवंतपणी नरक यातना माझ्या नशिबी आल्या आहेत.. काय पाप घडलं होतं देवा माझ्या हातून.. ज्याची हि शिक्षा तू मला देतोय!!. ती बसून राहिली... सुन्नपणे... येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांकडे एकटक बघत... विचार करत....!!
" उठ...लक्ष्मी उठ... तुला उठायलाच हवं...तुला भीक मागावीच लागेल ... त्या मामीच्या हातचा मार खाण्यापेक्षा हे लाजिरवाणं काम जरी असलं तरी भीक मागणं परवडलं...!!" अभागी लक्ष्मीमधील एक असाहाय्य भिकारीण जागी झाली.
लक्ष्मी उठली ..निघाली... आपल्या अधू असलेल्या पायांनी ...लंगडत . ..लोकांपुढे हात पसरायला... भीक मागायला... !!!
समाप्त!!
धन्यवाद!!
रूपाली विशे- पाटील
(कथा जरी काल्पनिक आणि कारुण्यमय असली तरीही समाजातल्या काही दुर्बल घटकांचं असाहाय्य जगणं ...त्यांच्या व्यथा जेव्हा आपल्या नजरेस पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी त्या घर करून राहतात आणि आपल्याला त्यावर विचार करायला भाग पाडतात... तर अशाच एका अभागी लक्ष्मीची व्यथा.. तिचं असाहाय्य जगणं... कथेद्वारे मांडण्याचा हा माझा प्रयत्न)
वाईट वाटलं वाचून!
वाईट वाटलं वाचून!
उत्तम चित्र उभं केलं आहे तुम्ही!
करुण कहाणी.. शब्दांत छान
करुण कहाणी.. शब्दांत छान मांडली आहे.
कथा वाचुन मन सुन्न झाले.
कथा वाचुन मन सुन्न झाले.
वावे, मृणाली, वीरुजी !!
वावे, मृणाली, वीरुजी !!
तुमच्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हांला...
शेवट पर्यंत अपेक्षा होती की
शेवट पर्यंत अपेक्षा होती की काही तरी चांगले घडेल. पण दुर्देवाने जास्तीत जास्त लक्ष्मीच्या आयुष्यात तुमच्या कथेप्रमाणे घडत असणार.
प्रतिसादासाठी धन्यवाद अमितजी.
प्रतिसादासाठी धन्यवाद अमितजी...
दुर्देवाने जास्तीत जास्त लक्ष्मीच्या आयुष्यात तुमच्या कथेप्रमाणे घडत असणार.>> हो, अचूक अंदाज लावलात तुम्ही...
वास्तव अगदी छान मांडलंय
वास्तव अगदी छान मांडलंय कथेतून.
सुन्न करणारी कथा. छान लिहीलेय
सुन्न करणारी कथा. छान लिहीलेय.
हे वास्तव आहे. प्रत्येक
हे वास्तव आहे. प्रत्येक मोठ्या सिग्नलवर, प्रत्येक मोठ्या चौकात अशा अनेक लक्ष्मी उभ्या असतात.
छान असं म्हणवत नाही, पण वास्तवदर्शी लिहिलंय.
प्रतिसादासाठी धन्यवाद वर्णिता
प्रतिसादासाठी धन्यवाद वर्णिता, मोहिनी, अज्ञातवासी...
लक्ष्मीची कथा वाचतानाअमिता
लक्ष्मीची कथा वाचतानाअमिता नायडू यांचे प्लॅटफॉर्म नंबर झीरो पुस्तक आठवले. झटपट संपविली कथा तुम्ही. छान लिहिले आहे. वाचनात गुंग असतानाच समाप्त दिसले. पुढील मोठ्या कथेच्या प्रतीक्षेत.
छान लिहीलयं !
छान लिहीलयं !
धन्यवाद किशोरजी , अमिता
धन्यवाद किशोरजी , अमिता नायडूचं पुस्तक वाचायला नक्की आवडेल मला. मी यापुढील कथा मोठ्या लिहिण्याचा प्रयत्न पण नक्कीच करेन! तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!
धन्यवाद अस्मिता!!
नूतन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना!!
रुपाली, लक्ष्मी अक्षरशः
रुपाली, लक्ष्मी अक्षरशः डोळ्यासमोर उभी राहिली.....
धन्यवाद लावण्या!!
धन्यवाद लावण्या!!
चांगलं लिहिलं आहे
चांगलं लिहिलं आहे
शेवट मला सुखांत हवा होता.पण खऱ्या गोष्टीचे शेवट सुखांत होतीलच असं नसतं.
प्रभावी वर्णन.
धन्यवाद अनु..
धन्यवाद अनु..
छान प्रतिसाद.. मला हि वाटतं होतं की कथेचा शेवट गोड करावा पण मला जे वास्तव होतं.. जे मी पाहिलं होतं ...कथेत तेच मांडावसं वाटलं.
शेवटची पान फाटलेलं पुस्तक
शेवटची पान फाटलेलं पुस्तक असतं तशी ही माणसं.. पुढे काय आपल्याला कळतचं नाही..
धन्यवाद, नंबर १ वाचक
धन्यवाद, नंबर १ वाचक
शेवटची पान फाटलेलं पुस्तक असतं तशी ही माणसं.. पुढे काय आपल्याला कळतचं नाही..>> अगदी खरं!!
वाईट वाटले कथा वाचून
वाईट वाटले कथा वाचून
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सुखदा!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सुखदा!!
तुमच्या लिखाणाची क्वालिटी
तुमच्या लिखाणाची क्वालिटी दिवसेंदिवस खूप दर्जेदार होत आहे... सुंदर लिहिले आहे... पुलेशु
खूप धन्यवाद च्रप्स.. तुमच्या
खूप धन्यवाद च्रप्स.. तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसाद आणि शुभेच्छांसाठी!!