फटाके आणि आपले बालपण - आठवणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 November, 2020 - 17:11

कुठेतरी वाचलेले, आपल्या आयुष्याचा एक कालखंड आपल्या ईतक्या आवडीचा असतो की तो आपल्याला पुन्हा एकदा जगावासा वाटतो.
माझ्यासाठी तो माझ्या दक्षिण मुंबईतल्या चाळ संस्कृतीत गेलेल्या बालपणाचा होता.

पैसे फार नव्हते तेव्हा. पैश्याने सारे सुखेही विकत घेता येत नाहीत म्हणा. पण आहे त्या पैश्यात मोजके फटाके विकत घेता यायचे. आणि ते मात्र अफाट सुख द्यायचे.

सध्या फटाके म्हटले की पहिला प्रदूषण आठवते मग त्यातून मिळणारा आनंद. यात तथ्य आहेच. पण तुर्तास या धाग्यावर ती चर्चा बाजूला ठेऊन आपापल्या बालपणीच्या आठवणी जागवूया Happy

नेमके किती वयाचा होतो आठवत नाही. पण आमच्याकडे मुलगा एकदा ठराविक वयाचा झाला की त्याने मोठाले बॉम्ब न लावता चक्र पाऊस फूलबाजे वगैरे लावले की त्याला बचकांडा समजले जायचे. यावरून एकदा मी घरात भोकाड पसरून फार मोठा तमाशा घातल्याचे आठवतेय. कारण आईने सारे चक्र पाऊसच आणले होते. बिचारीने मोठ्या कौतुकाने आणले होते, आणि मी मात्र…. असो, पण त्यानंतर मात्र दरवर्षी फटाके माझ्या आवडीचेच आणले गेले.

अर्थात मोजकेच असायचे, कारण बजेट फिक्स होते. ज्यांना मुंबईची माहिती असेल त्यांना मोहम्मद अली रोड आणि फटाक्यांचे नातेही माहीत असेलच. आमच्यापासून ते फार लांब नव्हते. मित्रांसोबत तिथेच जाऊन मग फटाके घेणे व्हायचे.

लवंगी माळांचे मी जास्त पुडके घ्यायचो. काही माळा वाजवल्यावर एकेक लवंगी सुट्टी करून हातात धरून पेटवणे आणि हवेत फेकणे हा आवडीचा खेळ. ताजमहालची वा तशीच मिळणारी एक टारझन का काहीश्या जंगली नावाच्या मोठ्या फटाक्यांची माळ तर एकत्र वाजवायला जीवावरच यायची. कारण लिमिटेड बजेट. त्यामुळे ती नेहमी सुटीच वाजवली जायची. हळूहळू मोठा झालो तसे मग चॅलेंज घेत बाँब हातात पेटवून फेकायलाही शिकलो. लक्ष्मी बार, चिमणी बार, रश्शी बॉम्ब, खोका बॉम्ब, डबल बार वगैरे प्रत्येकाचे एकेक पाकिट किमान घेणे कंपलसरी असे. सारेच हवेत फोडायचे प्रयोग करून झालेत. एकदा मात्र फेकायला अंमळ उशीर झाला आणि डोळ्यांपासून एक दिड फूट अंतरावर फुटला. बिग बँग! त्या प्रखर प्रकाशामुळे काही काळासाठी जणू आंधळाच झालो. त्यानंतर मात्र डोळे उघडले ते उघडले. पुन्हा कधी हा प्रकार केला नाही. ना कोणाला करायला उकसावले.

ईकडे एक नमूद करू ईच्छितो की हे हातात बॉम्ब पेटवून फेकणे हे ईतके सोपे नव्हते. कारण फटाक्यांच्या वातीला जिथे पेटवतो तिथले कागदाचे आवरण आणि त्याखालील दारू काढणे अपेक्षित असते, ज्याला वात काढणे म्हणतात. ज्याच्यामुळे ती वात सर्रसर पेटत नाही आणि किती वेगाने पटणार आहे याचा अंदाज घ्यायला पुरेसा वेळ देते. आमच्याईथे वात काढून फटाके उडवणार्‍याचीही बचकांडे म्हणून खिल्ली उडवली जायची. त्यामुळे लवंग्या तर कित्येक हातात फुटल्या जायच्या. पण त्याने हाताला चटका बसण्यापलीकडे फार काही व्हायचे नाही. बॉम्ब बाबत अशी डेअरींग दाखवली आणि…. असो वेगळेच कल्चर होते ते Happy

तर थोडे मोठे झाले की रॉकेट फोडायचेही एक वय येते. पण मी कधी ते स्वतःच्या पैश्यात विकत घेतले नाही. तेव्हा फटाक्यांच्या फिक्सड बजेटमध्ये परवडायचे नाही. आणि तसेही ते उडवताना सारे पोरे एकत्रच गच्चीवर जायचो, मग कोणीही का उडवेना, मजा तर सगळ्यांनाच सारखी असे म्हणून समाधान मानायचो. आणि कधी एखादा लहान पोरगा यायचा, ज्याला त्याच्या आईबापांने रॉकेट घेऊन तर दिले असायचे पण त्याला लावायची अक्कल नसायची. मग तो यायचा आणि म्हणायचा, चल ऋन्मेषदादा रॉकेट लाऊया. की मग त्या बाटलीत ठेवलेल्या रॉकेटची वात पेटवायचाही आनंद मिळायचा.

जे रॉकेटचे तेच त्या टेलिफोन फटाक्याचे. तो सुद्धा मी कधी स्वत: घेतला नाही. तेच त्या आकाश कंदिलबाबत. दुसर्‍यांचेच एंजॉय केले. नाही म्हणायला प्राण्याचे स्टिकर लावलेल्या जमिनीवर चालणार्‍या सुरसुर्‍या मिळायच्या. मी त्यांचे दारूचे नळकांडे काढून ते काडीला दोर्‍याने बांधून रॉकेट म्हणून उडवायचो. पण ते साले कुठेही जायचे.

मग ती एक नागाची गोळी असायची. ती लोकं का घ्यायचे मला खरेच कळायचे नाही. नुसता धूर आणि राख आणि काळा काळा तो नाग.. पण असो ज्याचा त्याचा आनंद. मला कधी त्या कलर पेन्सिलमध्येही आनंद आला नाही. वा नुसते फुलबाजे मी कधी एंजॉय केले नाही. आवड आपली आपली.

फटाके फोडणे हा काही दोन तीन तासांचा खेळ नव्हता, दिवसभर ब्रेक ब्रेक घेत चालूच राहायचे. अश्यात मग स्टॉक संपल्यावर करायचे काय? तर कचरा जमा करून जाळणे. फटाक्यांचाच कचरा, थोडीफार त्याला चिकटलेली दारू, तसेच फुसक्या फटाक्यांना खोलून जमा केलेली दारू, सारे एकत्र करत जाळायची. सगळ्या कचर्‍याने मस्त पेट घेतला की त्यात एक मोठा बॉम्ब टाकायचा की तो सगळा जळता कचरा मस्त हवेत उधळला गेला पाहिजे, फार सुंदर चित्र दिसायचे ते, दुर्दैवाने कॅप्चर करायला आजच्यासारखे स्मार्टफोन नव्हते. अन्यथा स्लो मोशनमध्ये मस्त दिसले असते.

जसा बॉम्ब लाऊन जळता कचरा उडवायचो तसेच मग खोके, डब्बे, करट्या, वाट्या, त्यात पीठ पावडर वगैरे भरून विविध उडवाउडवीचे प्रयोग करून बॉम्ब फोडले जायचे. चक्र पाऊस एकमेकांना चिकटवून किंवा पाऊस आडवा करून पेटवायचे प्रयोग व्हायचे.

पण जेवढी मजा बॉम्ब फोडायला यायची तेवढी मजा सुरसुरी करायलाही यायची. सोपे असायचे. लवंगी वा ताजमहालचा एखादा सुटा फटाका घेऊन मधोमध जवळपास तुटेपर्यंत दुमडायचा. आणि नेहमीसारखी वात पेटवून फोडायचा. पण तो आवाज करत न फुटता सुरसुर आवाज करत जळायचा. आग लावायला कधी माचिस नसली आणि अगरबत्तीच असली तर याची त्याची पणती शोधण्याऐवजी अशी सुरसुरी कामात यायची.

तेव्हा आमच्याकडे नरकचतुर्दशीची पहिली सकाळ फटाक्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची समजली जायची. सर्वात पहिले अभ्यंगस्नान करून सर्वात मोठ्या आवाजाचा फटाका फोडून पुर्ण बिल्डींग कोण जागवतो त्याला पोरांमध्ये मान मिळायचा. जी मजा पहाटेच्या फटाक्यांच्या आवाजामध्ये होती ती रात्रीच्या आवाजामध्ये नसायची. जसे गणपतीला सकाळी मंगलगाणी लागलीत तसा फिल त्या पहाटेच्या आतिषबाजीत यायचा. आणि तो आवाज ऐकताच सकाळी कधी लवकर न उठणारा मी त्या दिवशी मात्र ताडताड करत उठायचो आणि तयारी करून फटाके फोडायला पळायचो.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र आम्ही शून्य फटाके फोडायचो. कारण तेव्हा आमच्याईथले दुकानदार संध्याकाळी लक्ष्मीची पूजा आटोपली की एकमेकांशी स्पर्धा करत अक्षरशा पैश्याचा माज दाखवल्यागत फटाके फोडायचे. आम्ही तेव्हा शांतपणे गच्चीवर बसून त्यांच्या फटाक्यांचा आनंद लुटायचो. ते सारे दुकानदार गुज्जू असल्याने आम्ही मराठी पोरे ठरवायचो की आपण यांना भाऊबीजेला दाखवायची आपली ताकद ईतके फटाके फोडायचे की बस्स रे बस्स, यांना मुंबई कोणाची आहे हे दाखवून द्यायचे Happy
आणि म्हणून मग त्या दिवशीच्या वाटणीचे फटाके देखील भाऊबीजेला राखून ठेवले जायचे Happy

भाऊबीजेच्या दिवशीही एक छोटासा वाटा काढून ठेवला जायचा. तुळशीच्या लग्नाला वाजवायला. त्या दिवशीही आमच्याकडे फार धमाल वातावरण असायचे. पण त्यावर तेव्हा वेगळाच धागा काढूया Happy

तर हि झाली प्रस्तावना, या फटाक्यांशी निगडीत अनेक किस्से आहेत. प्रतिसादात आठवेल तसे मूडनुसार लिहीत जाईन. एकदा जळत्या फुलबाज्यावर पाय पडून तळपायाला पुर्ण लांबलचक फोड आलेला, ज्यात पुर्ण दिवाळीची सुट्टी एका पायावर गेलेली. अश्या दुखद आठवणीही आहेत. म्हणून त्या आधी एक कॉफी ब्रेक फार गरजेचा आहे Happy

-----

अरे हो, असे हे फटाके मी साधारण नववीत वाजवणे सोडून दिले होते. तेव्हाही प्रदूषणाची बोंब काही जणांनी ठोकली होती. मला ते पटले आणि मी अचानक सन्यास घ्यावा तसे फटाके वाजवायचे सोडून दिले. असे करणारा आमच्याईथून मी पहिलाच होतो. मला सर्वांनी वेड्यातही काढले होते. मला आठवतेय, मी नववीत होतो. एकदा भाऊबीजेला आपापल्या घराची भाऊबीज उरकून सारी पोरं खाली मैदानात फटाके फोडायला जात होती. मलाही चल म्हणाले, मी नकार दिला, तसे चिडली, तू बस बायल्यासारखे घरात म्हणून माझ्यावर ओरडून गेली. आणि एकेकाळी फटाक्यांसाठी रडणार्‍या आपल्या पोराला मध्येच काय हे खूळ सुचले म्हणून माझ्या आईवडिलांनाही टेंशन आले. आणि तेच मला म्हणू लागले, अरे जा की पोरांसोबत फटाके फोडायला Proud

असो, सध्या लेकीची फटाक्यांची हौसमौज पुर्ण करतो. दुसर्‍याच वर्षी ती फुलबाज्या हातात पकडायला लागली. तिसर्‍या वर्षी चक्रपाऊस हवे झाले. तसे ते माझ्या मार्गदर्शनाखाली पुरवले. यंदा कोरोनाचे कारण देत अजून आणले नाहीत. एक टिकल्यांची बंदूक तेवढी वाजवतेय. जी मी कधीच माझ्या लहानपणात वाजवली नाही कारण मला त्यात शून्य मजा यायची. उद्याही लेकीला फटाक्यांची तीव्र आठवण झाली नाही तर चांगलेच आहे. एक दिवाळी फटाकेमुक्त होण्यास आमच्यातर्फे अल्पसा हातभार लागेल. पुढच्या वर्षीचे पुढच्या वर्षी बघू. सध्याची परिस्थिती पाहता फटाकेमुक्त दिवाळीसाठी आठवी नववीपर्यंत वाट नाही बघू शकत Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी सर्वात आधी कोण फटाका फोडतो या स्पर्धेतून "टाइम बॉम्ब" चा प्रयोग केल्याचे आठवते.
>>>>>

दोरी पेटवून टाईम बॉम्बचा प्रयोग आमच्याईथेही केलेला.
पण हेतू दुष्ट होता Happy

चाळ म्हटली की पोरांच्या डोक्यात जाणारे एखाद दुसरे काका आलेच. अश्याच एका काकांना त्रास देत धडा शिकवायचा होता.

चाळीची रचना अशी होती की प्रत्येकाच्या घरासमोरून जाणारी मोठाली कॉमन गॅलरी असायची. प्रत्येक जण आपला पाण्याचा ड्रम बाहेर ठेवायचा. त्यावर पाणी उपसायला मग आणि बादली असायची. तीच बादली टाईमबॉम्ब लाऊन रात्रीचे फोडायचे ठरवले.

रात्री सगळे झोपल्यावर असेच दोरी पेटवून त्याला वात बांधून टाईमबॉम्ब बनवला. आणि वरच्या मजल्यावरूनच दोरीला बांधून त्यांच्या बादलीत सोडला. मग पोरे झोपायला गेली. मी त्या कृत्यात सामील नव्हतो कारण त्यांच्या दोन पोरी होत्या ज्या माझ्याशी छान बोलायच्या त्यामुळे थेट पंगा घ्ययचा नव्हता.

दुसरया दिवशी सकाळी उठलो तेव्हा पाहिले की बॉम्बने आपले काम केले होते. मध्यरात्री कधीतरी फुटला होता. सोबत प्लास्टीक बादली देखील फुटली होती. झोपमोडही नक्कीच झाली असणार.

दुपारी जेव्हा शाळेच्या माळ्यावर पोरं हाउजी खेळायला जमली तेव्हा त्यांनी तिथे येत थेट कोणाचे नाव न घेता दणादण शिव्या द्यायला सुरुवात केली. पोरंही निगरगट्ट. कोणी दाद दिली नाही. आपण त्या गावचेच नाही दाखवून हाऊजी खेळत राहिली. त्यांनाही मनातली भडास काढायचे समाधान मिळाल्यावर ते गेले आणि ते प्रकरण संपले

नंतर हातानेच फरशीवर वाजवायची, गुल असेल तो भाग फरशीवर घासायचा की टिकली वाजायची
>>>
+७८६
हा एक प्रकार मजेशीर असायचा.
वाकायला नको म्हणून आम्ही जमिनीऐवजी भिंतीवर घासायचो. किंवा घरातले फर्निचर वगैरे. थोडासा खडबुडीत भाग, थोडेसे घर्षण पुरायचे..

फटाके हा प्रकार मला कधीच आवडला नाही, अगदी एकही फटाका उडवला नाही आयुष्यात.
का माहित नाही पण मला आवाज, धूर, वास हा कधीच आवडला नाही अगदी समजायला लागलेल्या वयापासून... आणि भिती सुद्धा असल्याने फटाके नावडीचा प्रकार आहे.

ह्याउलट माझ्या बाबांना आवड... माझ्या नावाने फटाके आणत आणि स्वतः उडवत. माझी भिती घालवायचा त्यांनी प्रयत्न केला एक दोनदा.. मग सोडून दिला. शेवटी मला आवड्तच नाही आणि मी गोंधळ घालते म्हणून बाबांनी सुद्धा बंदच केले.

बिल्डिंगमध्ये, ३ वाजता जो बॉम्ब फोडायचा तो राजा...

अरे हो, दातात टिकल्या फोडायचे प्रयोग कोणी केलेत का.. फार शिव्या खाल्यात यावरून...

तसेच टिकल्या एकावर एक रचायच्या आणि हातोडा मारून फोडायच्या... बॉम्ब फोडल्याचा फिल घ्यायचा Happy

नट बोल्ट आणि मध्ये दोन रुंद वॉशर्स. दोन वॉशर्स मध्ये गोलाकार भरपूर टिकल्या एकावर एक रचून नट आवळायचा आणि तो नट बोल्ट सेट जोरात आपटायचा. टिकल्यांचा बॉम्ब.

मध्यंतरी आपटबार किंवा लसण्या म्हणून एक प्रकार आला होता. हाताने आपटला की धाब्बकण आवाज येऊन फुटायचा. नन्तर त्यावर बंदी आली असे ऐकले.

लहानपणी फटाक्यांची खूप भीती वाटायची आणि तरीही मित्र मैत्रिणी उडवतात म्हणून मी पण उडवायचे
दिवाळीच्या प्रत्येक ड्रेस ला एका ठिकाणी तरी जळालेली नक्षी असायची

आम्ही फटाके उडवायचो ते मेन रोड वर, लक्ष्मीपूजन ला देखील बस, रिक्षा, गाड्या असायच्या .. तरी पण सगळे तिथेच फटाके उडवायचे
फटका पेटवताना हात थरथरायचा कारण अर्ध लक्ष शेजारी जो फटका लावतोय त्याचा आपल्या आधी लागला तर पळायच्या तयारीत असायचे.. त्यात माझा फटाका नाही लागायचा आणि मित्र मैत्रिणी लागला लागला म्हणून ओरडायचे, मग मी तशीच पळून यायचे, अशा बऱ्याच चकरा मारल्या की एकदा चा लागायचा. त्यामुळे कमी फटाके बराच वेळ पुरायचे Lol

नाग गोळ्या डेंजर प्रकार होता. लवंगी फटाका पिरगळून त्याची सुरसुरी आम्ही पण करायचो..

तो नट बोल्ट सेट जोरात आपटायचा. टिकल्यांचा बॉम्ब.
>>>>

या धर्तीवर एक बॅडमिंटनच्या फूलासारखा एक आयटम मिळायचा. निमुळत्या टोकाला असलेल्या पकडीत टिकल्या भरायच्या आणि हवेत उडवायचे. खाली येताना वजनदार भाग खाली येऊन आदळायचा आणि टिकल्या फुटायच्या.

आपटीबारला बंदी असे मलाही त्या दिवशी एक दुकानदार बोलला होता. अर्थात तो लायटींग विकणारा दुकनदार होता.
पण मुलीने नंतर ते एका मित्राकडे पाहिले मग तिच्या अजोबांनी कुठूनतरी शोधून अणून दिले. पण त्याला ती पॉपअप बोलत होती.

फटाके हा प्रकार मला कधीच आवडला नाही, अगदी एकही फटाका उडवला नाही आयुष्यात.
का माहित नाही पण मला आवाज, धूर, वास हा कधीच आवडला नाही अगदी समजायला लागलेल्या वयापासून... आणि भिती सुद्धा असल्याने फटाके नावडीचा प्रकार आहे.

ह्याउलट माझ्या बाबांना आवड... माझ्या नावाने फटाके आणत आणि स्वतः उडवत. माझी भिती घालवायचा त्यांनी प्रयत्न केला एक दोनदा.. मग सोडून दिला. शेवटी मला आवड्तच नाही आणि मी गोंधळ घालते म्हणून बाबांनी सुद्धा बंदच केले.

+111
Same here

आमच्या सोसायटीत एक म्हाताऱ्या आजी होत्या.. फार पिरपीर करायच्या.. एका रात्री मीडियम साईझ फटाक्यांची माळ पेटवून त्यांच्या गॅलरीत टाकली होती आम्ही पोरा पोरींनी मिळून...
आसुरी आनंद झाला होता...

Lahan mulehi itaki krur asoo shakatat!
Ass khisa, manjar, lokanna tras denyache prakar vacuum vatale!
Akkal alyapasun ekahi faTaka fodala nahiye.

२ दिवसापूर्वी , भाजपा मंत्रीबाईन्ची ६-८ वर्शाची नात फटाक्यामुळे भाजून गेली . ती बातमी आठवली .

Pages