फटाके आणि आपले बालपण - आठवणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 November, 2020 - 17:11

कुठेतरी वाचलेले, आपल्या आयुष्याचा एक कालखंड आपल्या ईतक्या आवडीचा असतो की तो आपल्याला पुन्हा एकदा जगावासा वाटतो.
माझ्यासाठी तो माझ्या दक्षिण मुंबईतल्या चाळ संस्कृतीत गेलेल्या बालपणाचा होता.

पैसे फार नव्हते तेव्हा. पैश्याने सारे सुखेही विकत घेता येत नाहीत म्हणा. पण आहे त्या पैश्यात मोजके फटाके विकत घेता यायचे. आणि ते मात्र अफाट सुख द्यायचे.

सध्या फटाके म्हटले की पहिला प्रदूषण आठवते मग त्यातून मिळणारा आनंद. यात तथ्य आहेच. पण तुर्तास या धाग्यावर ती चर्चा बाजूला ठेऊन आपापल्या बालपणीच्या आठवणी जागवूया Happy

नेमके किती वयाचा होतो आठवत नाही. पण आमच्याकडे मुलगा एकदा ठराविक वयाचा झाला की त्याने मोठाले बॉम्ब न लावता चक्र पाऊस फूलबाजे वगैरे लावले की त्याला बचकांडा समजले जायचे. यावरून एकदा मी घरात भोकाड पसरून फार मोठा तमाशा घातल्याचे आठवतेय. कारण आईने सारे चक्र पाऊसच आणले होते. बिचारीने मोठ्या कौतुकाने आणले होते, आणि मी मात्र…. असो, पण त्यानंतर मात्र दरवर्षी फटाके माझ्या आवडीचेच आणले गेले.

अर्थात मोजकेच असायचे, कारण बजेट फिक्स होते. ज्यांना मुंबईची माहिती असेल त्यांना मोहम्मद अली रोड आणि फटाक्यांचे नातेही माहीत असेलच. आमच्यापासून ते फार लांब नव्हते. मित्रांसोबत तिथेच जाऊन मग फटाके घेणे व्हायचे.

लवंगी माळांचे मी जास्त पुडके घ्यायचो. काही माळा वाजवल्यावर एकेक लवंगी सुट्टी करून हातात धरून पेटवणे आणि हवेत फेकणे हा आवडीचा खेळ. ताजमहालची वा तशीच मिळणारी एक टारझन का काहीश्या जंगली नावाच्या मोठ्या फटाक्यांची माळ तर एकत्र वाजवायला जीवावरच यायची. कारण लिमिटेड बजेट. त्यामुळे ती नेहमी सुटीच वाजवली जायची. हळूहळू मोठा झालो तसे मग चॅलेंज घेत बाँब हातात पेटवून फेकायलाही शिकलो. लक्ष्मी बार, चिमणी बार, रश्शी बॉम्ब, खोका बॉम्ब, डबल बार वगैरे प्रत्येकाचे एकेक पाकिट किमान घेणे कंपलसरी असे. सारेच हवेत फोडायचे प्रयोग करून झालेत. एकदा मात्र फेकायला अंमळ उशीर झाला आणि डोळ्यांपासून एक दिड फूट अंतरावर फुटला. बिग बँग! त्या प्रखर प्रकाशामुळे काही काळासाठी जणू आंधळाच झालो. त्यानंतर मात्र डोळे उघडले ते उघडले. पुन्हा कधी हा प्रकार केला नाही. ना कोणाला करायला उकसावले.

ईकडे एक नमूद करू ईच्छितो की हे हातात बॉम्ब पेटवून फेकणे हे ईतके सोपे नव्हते. कारण फटाक्यांच्या वातीला जिथे पेटवतो तिथले कागदाचे आवरण आणि त्याखालील दारू काढणे अपेक्षित असते, ज्याला वात काढणे म्हणतात. ज्याच्यामुळे ती वात सर्रसर पेटत नाही आणि किती वेगाने पटणार आहे याचा अंदाज घ्यायला पुरेसा वेळ देते. आमच्याईथे वात काढून फटाके उडवणार्‍याचीही बचकांडे म्हणून खिल्ली उडवली जायची. त्यामुळे लवंग्या तर कित्येक हातात फुटल्या जायच्या. पण त्याने हाताला चटका बसण्यापलीकडे फार काही व्हायचे नाही. बॉम्ब बाबत अशी डेअरींग दाखवली आणि…. असो वेगळेच कल्चर होते ते Happy

तर थोडे मोठे झाले की रॉकेट फोडायचेही एक वय येते. पण मी कधी ते स्वतःच्या पैश्यात विकत घेतले नाही. तेव्हा फटाक्यांच्या फिक्सड बजेटमध्ये परवडायचे नाही. आणि तसेही ते उडवताना सारे पोरे एकत्रच गच्चीवर जायचो, मग कोणीही का उडवेना, मजा तर सगळ्यांनाच सारखी असे म्हणून समाधान मानायचो. आणि कधी एखादा लहान पोरगा यायचा, ज्याला त्याच्या आईबापांने रॉकेट घेऊन तर दिले असायचे पण त्याला लावायची अक्कल नसायची. मग तो यायचा आणि म्हणायचा, चल ऋन्मेषदादा रॉकेट लाऊया. की मग त्या बाटलीत ठेवलेल्या रॉकेटची वात पेटवायचाही आनंद मिळायचा.

जे रॉकेटचे तेच त्या टेलिफोन फटाक्याचे. तो सुद्धा मी कधी स्वत: घेतला नाही. तेच त्या आकाश कंदिलबाबत. दुसर्‍यांचेच एंजॉय केले. नाही म्हणायला प्राण्याचे स्टिकर लावलेल्या जमिनीवर चालणार्‍या सुरसुर्‍या मिळायच्या. मी त्यांचे दारूचे नळकांडे काढून ते काडीला दोर्‍याने बांधून रॉकेट म्हणून उडवायचो. पण ते साले कुठेही जायचे.

मग ती एक नागाची गोळी असायची. ती लोकं का घ्यायचे मला खरेच कळायचे नाही. नुसता धूर आणि राख आणि काळा काळा तो नाग.. पण असो ज्याचा त्याचा आनंद. मला कधी त्या कलर पेन्सिलमध्येही आनंद आला नाही. वा नुसते फुलबाजे मी कधी एंजॉय केले नाही. आवड आपली आपली.

फटाके फोडणे हा काही दोन तीन तासांचा खेळ नव्हता, दिवसभर ब्रेक ब्रेक घेत चालूच राहायचे. अश्यात मग स्टॉक संपल्यावर करायचे काय? तर कचरा जमा करून जाळणे. फटाक्यांचाच कचरा, थोडीफार त्याला चिकटलेली दारू, तसेच फुसक्या फटाक्यांना खोलून जमा केलेली दारू, सारे एकत्र करत जाळायची. सगळ्या कचर्‍याने मस्त पेट घेतला की त्यात एक मोठा बॉम्ब टाकायचा की तो सगळा जळता कचरा मस्त हवेत उधळला गेला पाहिजे, फार सुंदर चित्र दिसायचे ते, दुर्दैवाने कॅप्चर करायला आजच्यासारखे स्मार्टफोन नव्हते. अन्यथा स्लो मोशनमध्ये मस्त दिसले असते.

जसा बॉम्ब लाऊन जळता कचरा उडवायचो तसेच मग खोके, डब्बे, करट्या, वाट्या, त्यात पीठ पावडर वगैरे भरून विविध उडवाउडवीचे प्रयोग करून बॉम्ब फोडले जायचे. चक्र पाऊस एकमेकांना चिकटवून किंवा पाऊस आडवा करून पेटवायचे प्रयोग व्हायचे.

पण जेवढी मजा बॉम्ब फोडायला यायची तेवढी मजा सुरसुरी करायलाही यायची. सोपे असायचे. लवंगी वा ताजमहालचा एखादा सुटा फटाका घेऊन मधोमध जवळपास तुटेपर्यंत दुमडायचा. आणि नेहमीसारखी वात पेटवून फोडायचा. पण तो आवाज करत न फुटता सुरसुर आवाज करत जळायचा. आग लावायला कधी माचिस नसली आणि अगरबत्तीच असली तर याची त्याची पणती शोधण्याऐवजी अशी सुरसुरी कामात यायची.

तेव्हा आमच्याकडे नरकचतुर्दशीची पहिली सकाळ फटाक्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची समजली जायची. सर्वात पहिले अभ्यंगस्नान करून सर्वात मोठ्या आवाजाचा फटाका फोडून पुर्ण बिल्डींग कोण जागवतो त्याला पोरांमध्ये मान मिळायचा. जी मजा पहाटेच्या फटाक्यांच्या आवाजामध्ये होती ती रात्रीच्या आवाजामध्ये नसायची. जसे गणपतीला सकाळी मंगलगाणी लागलीत तसा फिल त्या पहाटेच्या आतिषबाजीत यायचा. आणि तो आवाज ऐकताच सकाळी कधी लवकर न उठणारा मी त्या दिवशी मात्र ताडताड करत उठायचो आणि तयारी करून फटाके फोडायला पळायचो.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र आम्ही शून्य फटाके फोडायचो. कारण तेव्हा आमच्याईथले दुकानदार संध्याकाळी लक्ष्मीची पूजा आटोपली की एकमेकांशी स्पर्धा करत अक्षरशा पैश्याचा माज दाखवल्यागत फटाके फोडायचे. आम्ही तेव्हा शांतपणे गच्चीवर बसून त्यांच्या फटाक्यांचा आनंद लुटायचो. ते सारे दुकानदार गुज्जू असल्याने आम्ही मराठी पोरे ठरवायचो की आपण यांना भाऊबीजेला दाखवायची आपली ताकद ईतके फटाके फोडायचे की बस्स रे बस्स, यांना मुंबई कोणाची आहे हे दाखवून द्यायचे Happy
आणि म्हणून मग त्या दिवशीच्या वाटणीचे फटाके देखील भाऊबीजेला राखून ठेवले जायचे Happy

भाऊबीजेच्या दिवशीही एक छोटासा वाटा काढून ठेवला जायचा. तुळशीच्या लग्नाला वाजवायला. त्या दिवशीही आमच्याकडे फार धमाल वातावरण असायचे. पण त्यावर तेव्हा वेगळाच धागा काढूया Happy

तर हि झाली प्रस्तावना, या फटाक्यांशी निगडीत अनेक किस्से आहेत. प्रतिसादात आठवेल तसे मूडनुसार लिहीत जाईन. एकदा जळत्या फुलबाज्यावर पाय पडून तळपायाला पुर्ण लांबलचक फोड आलेला, ज्यात पुर्ण दिवाळीची सुट्टी एका पायावर गेलेली. अश्या दुखद आठवणीही आहेत. म्हणून त्या आधी एक कॉफी ब्रेक फार गरजेचा आहे Happy

-----

अरे हो, असे हे फटाके मी साधारण नववीत वाजवणे सोडून दिले होते. तेव्हाही प्रदूषणाची बोंब काही जणांनी ठोकली होती. मला ते पटले आणि मी अचानक सन्यास घ्यावा तसे फटाके वाजवायचे सोडून दिले. असे करणारा आमच्याईथून मी पहिलाच होतो. मला सर्वांनी वेड्यातही काढले होते. मला आठवतेय, मी नववीत होतो. एकदा भाऊबीजेला आपापल्या घराची भाऊबीज उरकून सारी पोरं खाली मैदानात फटाके फोडायला जात होती. मलाही चल म्हणाले, मी नकार दिला, तसे चिडली, तू बस बायल्यासारखे घरात म्हणून माझ्यावर ओरडून गेली. आणि एकेकाळी फटाक्यांसाठी रडणार्‍या आपल्या पोराला मध्येच काय हे खूळ सुचले म्हणून माझ्या आईवडिलांनाही टेंशन आले. आणि तेच मला म्हणू लागले, अरे जा की पोरांसोबत फटाके फोडायला Proud

असो, सध्या लेकीची फटाक्यांची हौसमौज पुर्ण करतो. दुसर्‍याच वर्षी ती फुलबाज्या हातात पकडायला लागली. तिसर्‍या वर्षी चक्रपाऊस हवे झाले. तसे ते माझ्या मार्गदर्शनाखाली पुरवले. यंदा कोरोनाचे कारण देत अजून आणले नाहीत. एक टिकल्यांची बंदूक तेवढी वाजवतेय. जी मी कधीच माझ्या लहानपणात वाजवली नाही कारण मला त्यात शून्य मजा यायची. उद्याही लेकीला फटाक्यांची तीव्र आठवण झाली नाही तर चांगलेच आहे. एक दिवाळी फटाकेमुक्त होण्यास आमच्यातर्फे अल्पसा हातभार लागेल. पुढच्या वर्षीचे पुढच्या वर्षी बघू. सध्याची परिस्थिती पाहता फटाकेमुक्त दिवाळीसाठी आठवी नववीपर्यंत वाट नाही बघू शकत Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉकेट च्या आधी छोट्या गोल डबी सारखी दिसणारी विमाने असायची. त्याची वात पेटवली की तांबडया ठिणग्या आणि झुररर आवाज करत गोल गोल फिरत ते उंच जायचे. रॉकेट आल्यानंतर ही विमाने मिळेनाशी झाली.

रॉकेट मूळे अपघात पण व्हायचे. दिवाळीसाठी सुट्टीवर गेल्यामुळे अनेक घरांत कोणी नसायचे. अशा एखाद्या घराची खिडकी चुकून उघडी राहिली असेल तर त्यातून रॉकेट किंवा अन्य फटाका आत जायच्या घटना घडायच्या. सुदैवाने अनर्थ झाल्याची घटना घडली नाही.

असेच एकदा आमच्या ग्रुप मधल्या एकाने बाटलीत रॉकेट ठेवून ते पेटवले. दुर्दैवाने ते थोडे तिरके झाले होते. ते उडाले ते थेट एका घराच्या दारातून आत गेले. तिथे आत जेवणाची पंगत बसली होती. ताटे वाढून तयार होती. सर्वजण यजमानांनी "सुरू करा" म्हणायची वाट पाहत होते. आता थोड्याच वेळात जेवायला सुरवात होणार होती, तेवढ्यात सर्वांच्या तोंडासमोरून ताटांवरून हे रॉकेट आडवे उडत गेले. सगळी पंगत ताटांवरून उठून पळाली Happy

चांगल्या आठवणी आहेत ऋन्मेष..

अतुलदा रॉकेटचा किस्सा मजेशीर Happy

माझ्या बालपणीच्या आणि फटाक्यांच्या काहीच आठवणी नाहीत.. कधीच आवडले नाही फटाके उडवायला..
मागच्या वर्षीपर्यंत मुलगा घाबरायचा यावर्षी मात्र दुसर्यांचे बघून फटाक्यांचा हट्ट केला पण पुढच्या महिन्यात त्याचा वाढदिवस आहे मग एक डिल केली, फटाके हवे कि सायकल.. मुलगा म्हणाला सायकल. Happy आम्ही विनाफटाके मजेत दिवाळी साजरी केली.

<<<रॉकेट च्या आधी छोट्या गोल डबी सारखी दिसणारी विमाने असायची. त्याची वात पेटवली की तांबडया ठिणग्या आणि झुररर आवाज करत गोल गोल फिरत ते उंच जायचे. रॉकेट आल्यानंतर ही विमाने मिळेनाशी झाली.>>>

ती चमनचिडी..

छोट्या गोल डबी सारखी दिसणारी विमाने
>>>>>
कधी पाहिली ऐकली नाही ही.. कोणत्या सालात होती?

रॉकेटने लफडे मात्र फार व्हायचे. त्यामुळे आमच्याकडे गच्चीवरच जायचे. आजूबाजूला आमच्यापेक्षा ऊंच बिल्डींग नव्हती तेव्हा. त्यामुळे कधी घरात घुसणे प्रकार झाले नाहीत.

३१ डिसेंबरला मात्र रस्त्यावर सांताक्लॉज जाळतात तेव्हा एकाने रस्त्यावरच लावली होती दिवाळीतले उरलेले रीकेट. शेजारच्या वाडीत घुसले. आधीच आमच्यातील नाते ईण्डिया पाकिस्तानचे. आली तिकडची पोरं उतरली ईकडची पोरं आणि अभुतपूर्व असा राडा झाला.

२ जानेवारीला जेव्हा आम्ही शाळेत गेलो तेव्हा स्कूलबसमध्ये दोन्हीकडची लहान पोरे. आम्ही आपापसात मित्र. आमच्याकडच्या पोरांनी तुमच्याकडच्या पोरांना अस्सा धुतला वगैरे एकमेकांना सांगू लागलो.

काय हे !

ईतका कमी प्रतिसाद का?

आजच्या प्रदूषणाला जबाबदार धरतील म्हणून लोकं ईथे लिहायला घाबरत आहेत का?

मी देखील लवंगी हातात फोडायचो...
दिवाळी सकाळी आमचा एक प्रोग्रॅम असायचा की कॉलॉनीत फिरून न फुटलेले फटाके जमा करण्याचा.. नंतर त्यातली दारू एका कागदावर काढून दारूचा डोंगर रचला जायचा.. मग त्या कागदाला आग लावली की ते सगळे भस्सकण जळून जात असे...

मी पण आठवीपर्यंत फटाके उडवले आहेत, नंतर बंदच केले. एक तर जास्त पैसे नव्हते त्यामुळे मनाजोगते / आवडते फटाके उडवता यायचेच नाहीत आणि खूप पैशांचे भारीतले फटाके आणले तरी शेवटी धूरच निघणार हे ही कळले. पण फटाक्यांचे जे काही बजेट असेल तितक्या पैशांची पुस्तके / दिवाळी अंक मात्र घ्यायला सुरुवात केली.

लवंगी तर सगळेच हातात फोडायचे मी तर पानपट्टी आणि लक्ष्मी हातात फोडायचो. लक्ष्मी एकदा चुकून हातात फुटला आणि मग त्याची भिती गेली.
सुतळी मात्र हवेतच उडवायचो; हातात फोडायची हिंमत नाही झाली कधी.

मला त्यावेळी आवाजी फटाकेच आवडायचे.
धूर जवळपास येतच नसल्याने प्रदुषण न करणारे वाटायचे. आवाजी प्रदुषण माहीतच नव्हते.
स्वतः लावून धावतपळत मागे येताना स्वतःला मनमुराद बघायला न मिळताच संपून जाणारे भुईचक्र भुईनळा वगैरे प्रकार दुसर्‍याचेच बघायला जास्त आवडायचे.

लवंगी किंवा त्यापेक्षा मोठे फटाके हातात फोडताना, फुटण्या आधी जेव्हा वात पूर्ण जळून बारुदने मुकतात पेट घेतला असतो तेव्हा फटाक्यावरची बोटांची पकड अगदीच सैल करायची आणि अंगठा थोडा मागे आणायचा. त्याने फटका फुटतो तेव्हा बोटं आपसूक सहजपणे दूर होतात आणि झटक्याची तीव्रता तुलनेत नगण्य जाणवते.

फटाक्यावरती पणती उपडी ठेऊन तो फोडून पणतीच्या ठिकऱ्या उडवण्याचे प्रकार केले आहेत पण ते धोकादायक आहेत ठिकऱ्या डोळ्यात जाऊ शकतात, रपकन कुठे लागू शकते हे लक्षात आले आणि स्वतःहुनच बंद केले.

स्टीलची वाटी फटाक्यांवर उपडी ठेऊन ती वर उडवायची हा अजून एक प्रकार.

आमच्या घराखाली एक ऑफिस होते. ते समोर ड्रम उपडे ठेवून त्यावर पणत्या लावत. पूजा आटोपुन ते लोक निघून गेले तेव्हा एकदा ड्रम च्या आत बॉम्ब ठेवला वात बाहेर आणि वाट चेपली जाऊ नये म्हणुन ड्रमच्या कडे खाली एक खापर ठेवली.
बॉम्ब फुटला आणि सोबत ड्रम दणाणला त्याचा प्रचंड ढुम्म आवाज. काय झालं म्हणुन आजूबाजूचे सगळे लोक घराबाहेर. मग पोरांनी सांगितलंच मी काय केलं ते. मग आईचा सणकुन मार खावा लागला.

मीठु छाप बॉम्ब हातात धरुज पेटवून मग हवेत फेकताना एकदा हातात फुटला सुदैवाने हातातून थोडा निसटला होता तेव्हा फुटला त्यामुळे हात भाजला नाही पण बोटं सुजली होती.

वर च्रप्स यांनी लिहिलेला, न फुटलेल्या फटाक्यांची बारुद काढुन जाळणे हे प्रकारही केले आहेत.

आमच्याकडे काहीजण भुईचक्र कोपरात (परातीत) लावायचे. छान फिरते आणि दिसते त्यात, आणि इकडे तिकडे पळण्याचा धोकाही नाही.

आमच्या उपद्रवी प्रतापांंमुळे रॉकेट, विमान वगैरे गोष्टी बाबांनी कधीच घेऊन दिल्या नाहीत, ते एक चांगलेच झाले.

शाळकरी वयात असताना सकाळी सर्वात आधी कोण फटाका फोडतो या स्पर्धेतून "टाइम बॉम्ब" चा प्रयोग केल्याचे आठवते. शिलाई मशीन चा पांढरा धागा पेटवून फुंकला आणि त्याची फक्त ठिणगी शिल्लक ठेवली की तो अत्यंत हळू जळतोय असे लक्षात आल्यावर, योग्य त्या लांबीचा धागा घेऊन तो फटाक्याच्या वातीला जोडून एक दीड तासाने फटाका फुटण्याचा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे दिवाळीच्या आदल्या दिवशी भला लांबलचक धागा घेऊन पहाटे चार साडेचार वाजता फुटेल असा प्लॅन केला खरा. पण रात्री मध्येच तो धागा (ठिणगी) विझल्याने प्रयोग अयशस्वी झाला. सात वाजता उठलो तेंव्हा कळले पहिला फटाका आपला वाजलाच नाही Happy

आठवी नववी नंतर फटाक्यांचे फारसे आकर्षण राहिले नाही. याउलट उत्तरोत्तर ते त्रासदायक आहेत असेच वाटत गेले.

>> छोट्या गोल डबी सारखी दिसणारी विमाने
>>>>>
>> कधी पाहिली ऐकली नाही ही.. कोणत्या सालात होती?

नव्वद च्या आसपास असेल. वेगवेगळ्या भागात वेगळ्या नावानी ओळखत असावेत. वरती निरु यांनी एक नाव दिले आहे. नंतर प्राण्यांच्या स्टिकरचे जे फटाके आले त्यातून सुद्धा तसाच आवाज व ठिणग्या येत. बहुतेक दारू तीच असावे फक्त इथे ती उडत नव्हती इतकंच.

मजेशीर किस्से आहेत सगळ्यांचे...

मी एक वर्षाची असतानाची घटना...
दिवाळीत, वडील बिल्डिंग च्या खाली मैदानात उभे होते.. काही मुलं फटाके उडवत होती एक फटाका उडून वडिलांच्या डाव्या डोळ्यात गेला.. इजा झाली.. त्यानंतर त्या डोळ्याने त्यांना कमी दिसते अजूनही..
मी तर अजूनही घाबरून दुर पळते फटाक्यांपासून. Happy

मजेशीर किस्से आहेत सगळ्यांचे...

मी एक वर्षाची असतानाची घटना...
दिवाळीत, वडील बिल्डिंग च्या खाली मैदानात उभे होते.. काही मुलं फटाके उडवत होती एक फटाका उडून वडिलांच्या डाव्या डोळ्यात गेला.. इजा झाली.. त्यानंतर त्या डोळ्याने त्यांना कमी दिसते अजूनही..
मी तर आताही घाबरून दुर पळते फटाक्यांपासून. Happy

>> त्यानंतर त्या डोळ्याने त्यांना कमी दिसते अजूनही..

ओह Sad फटाक्यांमुळे अपघात होत असत. घरात साठवलेल्या फटाक्यांना आग लागून झालेला एक अपघात ऐकला होता. अशा घटनांमूळेच हळूहळू फटाके नावडू लागले.

सर्वात बेक्कार प्रकार म्हणजे फक्त वात जळून नुसताच पडून राहिलेला फटाका. >> अगदी
आणि ते सगळे गोळा करून एका कागदात गुंडाळून तो कागद पेटवायचा. नव्वद च्या दशकात मध्यमवर्गीयांचे बजेट फिक्स त्यात आणलेले फटाके भावंडांनी वाटणी करून घ्यायचे . मी आठवीपर्यंत उडवले फटाके. आठवीत असताना तुझं आधी की माझं आधी उडतय या नादात पाऊस फुटला ,तो नेमका पेटवत असताना त्यामुळं हाताचा अंगठा आणि शेजारचं बोट चांगलंच भाजलं. त्यात आम्ही रहात होतो कॉलनीत ज्या धरणांजवळ असायच्या, गाव/ शहर 25 किमीवर. एकही डॉ नाही. तेव्हा रात्रभर हात टेबलफॅन समोर ठेवलेला. आग आग प्रचंड होत होती. कांदा फोडून धरणे, बरनॉल लावून काही उपयोग नव्ह्ता झाला. दुसऱ्या दिवशी सकाळची एसटी पकडून शहरात गेलेलो . मला अजूनही आठवतंय. दुसरा हात , दोन्ही पाय इतरांनी धरलेले आणि डॉ हाताचं ड्रेसिंग करत होते. मी प्रचंड ओरडत होते. पुढे महिनाभर त्या हाताने काही करता येत नव्हतं. उजवाच हात नेमका. ती जी भीती बसली ती पुन्हा कधी फटाका घेतला नाही.

७० च्या दशका तले लिहीले तर चालेल का?

आम्ही डेक्कन वर राहायचो. तेव्हा कर्वे रोड सुरू होतो तो भाग आत्ता इतका मोठा नव्हता. आमची बिल्डिंग पुढे माती व त्यापुढे फुट पाथ तो ही चांगला वाइड. तर दिवाळीत पहिल्या दिवशी थंडीत कुड्कुडत आंघोळ करून अगदी पहाट फुट त असताना त्या फुट पाथ वर यायचे व फटाके वाजवायचे. काय ती थंडी आणि इतके धुके की समोरचे इंटर्नॅशनल बुक स्टोअर पण दिसायचे नाही. खरेच गुलाबी थंडी असायची. माझी पार्टी फुलबाजी वाली. आनी शेजारचा मित्र मदन जोशी व त्याची बहीण आवाजी फटाके वाजवायचे.

अजून एक म्हणजे फटाके वाजवायला दिवाळीच्या आधी दहा दिवस सुरुवात. जिन्यात बसून टुर टुर पिस्तुलीने टिकल्या वाजवणे. बत्त्याने एक एक टिकली फोडणे. व तो वास. नाहीतर टिकली ची डब्बी आग पेटवून त्यात टाकणे. असे विस्फो टक कारभार.

एक नागीण म्हणून काळ्या गोळ्या यायच्या त्या एका पायरीवर लावल्या की तो साप दुसृया खालच्या पायरीवर यायचा.

मेन आयटम फुलबाज्या, अगदी छोटे ते मिडीअम असे भुईनळे, चक्रे, पेन्सील व वायर असे दोन उपप्रकार. फार धुरकट. पेन्सिल फेवरिट माझी. बाबांबरोबर जाउन फटाके घेउन यायचे शिवाजीनगर मार्केट मधून व एका निळ्या सुटकेसीत नीट भरून ठेवायचे व जपून वापरायचे.
दुरंगी काडेपेट्या प्र्त्येकी एक डझन. ह्यां ची फुले बनवून एकदम पेटवायची. मग काडेपेटीचा फॉस्परस पण जाळायचा.

घरी दारी भरपूर पणत्या, आई खाली स्टोव्ह वर चकल्या काय काय तळत बसलेली ह्या सर्वांतून ट्विंकल नायलॉन नावाच्या मटेरिअलचा ड्रेस ( ज्वलाग्राही मटेरिल) घालून हातात फुलबाजी घेउन पळायचे. आता विचार करूनच भीती वाट्ते पण तेव्हा कोणी काहीही म्हटले नाही.

शिवाजी नगर फटाका मार्केट्ला आगलागली हा माझ्यासाठी एकदम डूम्स डे इवेंट होता.

घरात फटाके मुळीच साठवू नयेत. तुळशीच्या लग्नाला संपवून टाकावेत. तसेही वर्षभर जुने फटाके फुसके जाण्याचीही शक्यता जास्त असते.

अपघातावरून आठवले. दरवर्षी
मामाकडे भाऊबीजेला जायचो दिवाळीत. मामा जवळच राहत असल्याने असेही उठसूठ बरेचदा जायचो. त्यामुळे तिथेही बरेच मित्र झालेले. तिथलीही पोरे फार अतरंगी होती. पण एकदा मस्करीची कुस्करी झाली. खरे तर याला मस्करी म्हणनेही क्रौर्य ठरेल. झाले असे की तेथील मुलांना एक नवीनच किडा सुचला होता. एकजण फटाके फोडायला जात असेल तर गपचूप त्याच्या हातातील फटाक्यालाच पेटवून द्यायचे. जेणेकरून तो घाबरून घाईघाईत टाकून देईल. किंवा लवंगी माळ असेल तर हातातच फुटायला सुरुवात होईल.

यात एक येड्या मुलाने काय करावे. दुसरया मुलाने त्याच्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलेली माळ पेटवली. तडतड तड छातीजवळच पेटली. पुर्ण संपेपर्यंत तो स्वत: किंवा ईतर कोणीही ती काढणे अशक्यच होते. पुर्ण छाती जळाली. पोराला ॲडमिट करावे लागले. प्राण शाबूत राहिले हेच समाधान Sad

मी फटाके सोडण्याला हा किस्साही बरेच अंशी कारणीभूत होता. नुसते प्रदूषणाचे पटले म्हणून सोडले असे नक्कीच झाले नसावे.

जोगेश्वरीच्या बोळात, देवांच्या वाड्यात काका राहात. तिथे भरपूर मुले मुली होत्या. तिथे नरक चतुर्दशी ला पहिला फटाका कोण उडवणार अश्या चुरशीच्या स्पर्धा चालत. रात्री किंवा पहाटे साडे तीन लाच पहिले ढुम्म होई. मध्ये अंगण व बाजूने वा डा असल्याने आवाज चांगलाच घुमे.

माझी अकरावीतली मैत्रीण उमा एक कोल्हापुरची तिने सांगितलेली आठवण. असेच भरपूर ब भाउ बहिणी जमेलेले . सर्व मुलांनी ठरवून सर्व दारू( फटाक्याची) एका पाइपात भरून तो पाइप वाड्याच्या अंगणात पुरला व पेटवला. जे काय स्फोट झालाय. आजोबांनी प्रत्येक पोराला बुकलले. अगदी घरच हलले ना महाराजा. हे मला फार डेअरिन्ग वाटलेले. आमच्या इथे आवाजी फटाके भोहोरी व इतर दुकान दार वाजवीत.

पुण्याची मेन आठवण म्हणजे फटाके बघण्याची आहे. दिवाळी आली हे कळायचे म्हणजे नदी पलिकडे जे तीन रोड आहेत मधला लक्ष्मी रोड त्याच्या अलिकड चा एक व पलीकडचा एक. तिथे कोणी लक्ष्मी बाँब लावला की खास बढाक्क असा आवाज यायचा. तर बाण सोडले की ते हवेत वर वर वरवर जाउन हलकेच पष्ट असा आवाज करून फुटत. आज पण हे आवाज असेच येतात. ऐका एकदा. तर लक्ष्मी पूजनाला घरची पूजा झाली की स्टुलावर चढून पुला वरून पुढे बघत बसायचे दोन तास फुकटात आतिष बाजी. ( राइट साइडला थोड्या अंतरावर नदी किनारी चिता पेटलेल्या असत रात्री त्यांचाही ऑरेंज उजेड असे. त्यामुळे त्यांचे काय व ह्यांचे काय असे प्रश्न फार लहान पणी पडत गेले.)

आमच्याकडे काहीजण भुईचक्र कोपरात (परातीत) लावायचे. छान फिरते आणि दिसते त्यात, आणि इकडे तिकडे पळण्याचा धोकाही नाही.
>>>>

हे कालच माझ्या बायकोनेही सांगितले मला. आमच्याकडे कधी पाहिला नव्हता हा प्रकार. कदाचित लोकांना परात खर्च करायची नसावी. पण ते चक्र फिरत फिरत कुठेही जाण्यातच मजा आहे. कारण मग त्या ठिणग्यांवर पाय उडवत नाचायचे असते ना.. तेच पावसाबाबतही.. जसा पाऊस पेटतो आणि त्याचा आवाज वाढत जातो तसे त्याच सोबत चढत्या आवाजात एsssss असे ओरडण्यात मजा यायची.
हल्ली लोकं पावसाचे स्लो मोशन विडिओ काढून आनंद मिळवतात Happy

आम्ही लहान असताना माझ्या वडिलांच्या डाव्या हातात भुईनळा फुटला होता. महिनाभर सुट्टी घेऊन घरी होते. त्यामुळे फटाके फोडायचे आकर्षण त्यांचा त्रास पाहूनच संपले. गच्चीत जाऊन रॉकेट बघायचो. त्यावेळी पुण्यात 3मजल्यांपेक्षा जास्त उंच इमारती नव्हत्या.

आमच्या वरच्या वर्गातल्या एका मुलाच्या हातात फटाका फुटल्याने मनगटापासून हात काढावा लागला. या घटनेमुळे त्याला आमच्या यत्तेत यायला लागलं.

वाड्यातल्या खूप छान आठवणी आहेत फटाक्यांच्या. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहिला फटाका कोणत्या वाड्यातून फुटेल ह्याची जणू स्पर्धाच असे. मस्त थंडी असे, बम्ब पेटवला जाई (ह्यासाठी एक आठवडा आधीच वखारीतून ढलप्या आणत असू) , अभयनगस्नानाच्या वेळी वडील फटाके लावत. माझ् आजोळ बोहरी आळीमध्ये शुक्रवार पेठेत. त्यामुळे आईने व्यापाऱ्यांची दिवाळी बघितली होती लहानपणापासून त्यामुळे तिला पण फटाक्यांची तेवढीच आवड होती अन आहे. मोती साबण, ठिपक्यांच्या मोठया रांगोळ्या घातलेला चौक आणि मागचं अंगण. फटाक्यांची वाटणी होत असे आम्हा दोघा बहीण भावात आणि ती प्लास्टिक पिशवी एकदम जपून ठेवत असे. चार दिवस ते फटाके पुरवून पुरवून वाजवायचे. आणि भाऊबीजेला बहिणीचे फटाके पण ढापुन उडवायचे. सुतळी बॉम्ब हा सर्वोच्च आवाजी फटाका, लक्ष्मी बॉम्ब पण आवडायचा. लवंगीच पाकीट एकदम लावायला मजा यायची. मोठे लवंगी पण वाजवायला भारी वाटायचं. पानपट्टी हातात धरून फोडायची. आपटबार पण आवडायचे. सगळ्यात बेक्कर नागगोळी कारण त्याचा खूप घाण धूर होई आणि चौकातल्या फरशीवर तो काळा डाग तसाच राही. एक अनार मिळे।गोल आकाराचा , त्यातून पाऊस पडे आणि नन्तर आतला फटाका फुटे. भुईचक्र आम्ही पण एका जुन्या तव्यात लावू. भाऊबीजचा दुसरा दिवस न फुटलेले फटाके गोळा करण्यात जाइ मग त्यातली दारू काढून ती पेटवायची एक मिनिट डोळे दिपून जात आणि एकदम अंधारी येई Happy ह्याचा परमोच क्षण म्हणजे सुटी संपत आली की किल्ल्यामध्ये एखाद दुसरा जपून ठेवलेला सुतळी बॉम्ब लावणे Happy अजून एक म्हणजे चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरात देव दिवाळी फार मोठ्या प्रमाणात होई आणि तिथली त्या दिवशीची आतषबाजी बघण्यासारखी असे.

आमच्या वरच्या वर्गातल्या एका मुलाच्या हातात फटाका फुटल्याने
>>>>>

हे काल माझ्या डोळ्यासमोर झाले.
एक मुलगा वडिलांबरोबर फटाके फोडत होता. ८-१० वर्षांचा असावा. सोबत महिलावर्ग कौतुकाने बघत होता. मुलगा एकीक्डे फटाका लावतानाच त्याचे वडील बाजूला फटाके लावत होते. एवढी घाई करायची काय गरज होती समजत नाही. मुर्खपणा नुसता. तर वडीलांचा फटाका लागल्याबरोबर ते पळाले. घाबरून मुलगाही फटाका न लावताच उचलून पळाला. पण ॲक्चुअली त्याच्या लक्षात नव्हते आले. त्याच्या हातातला फटाका लागलेला. काहीतरी कुरकुरे वगैरे नावाचा फटाका असावा. हातातच तडतड वाजायला सुरुवात झाली. स्लो स्टार्ट झाल्याने त्याला चटकन फेकायला वेळ मिळाला आणि काही ईजा झाली नाही. ते पाहून सोबतच्या त्याच्या घरच्या बायका हसायला लागल्या. असा कसा रे येडा तू. पेटवलेला फटाका घेऊन पळालास... दुर्दैवाने त्यांना यात फक्त विनोदी बाजू दिसली. त्यामुळे हे कसे झाले आणि काय केल्यास टाळता येईल याचा शून्य विचार झाला Sad

एक अनार मिळे।गोल आकाराचा , त्यातून पाऊस पडे आणि नन्तर आतला फटाका फ>> अगदी अगदी. काल तोच डोळ्यासमोर आला. मला पिटके अनार मिळत तो पाउस प्लस फ टाका म्हणजे काही तरी अंतर्गत विश्वास घात वाटे. हे अनार, पेन्सिल वगैरे वरचे चांदीचे रंगीत कागद पण मला भारी आवडत. तेही ह्याच वेळी बघायला मिळत. आणि भल्या मोठ्या तडतड्या फुलबाज्या तर कधीच आणल्या नाहीत त्या अगदी बॉलिवूड धमाका नट्यांची चित्रे असलेल्या असत. हे मिळाले नाहीत म्हणून आक र्षण होते.

फास्टर फेणेच्या एका पुस्तकात बेडुक डुक डुक असे एक रॉकेट होते.

एकदाच मला फटाका रॉकेट व त्यातुन बाहेर पडणारी पॅराशूट व त्याला जोडलेली प्लास्टिकची बाहुले असे आणले होते. ते मी बरेच मिरवून मग दुसृयाच कोणी तरी मोठ्याने फोडले. मी ते पॅराशु ट व बाहुली मात्र ठेवली होती. व्हॉट फन्न.

आम्हाला कधी रॉकेट आणता नाही आले कारण वाड्यात मोठा चाफा होता आणि बाहेर सगळीकडे चिंचेची मोठी झाडं त्यामुळे हे असले उंच जाऊन वाजणारे फटाके नक्कीच त्यात अडकले असते. आम्ही पण टिकल्या लहान असताना सांडशीने फोडत असू .. नंतर हातानेच फरशीवर वाजवायची, गुल असेल तो भाग फरशीवर घासायचा की टिकली वाजायची Happy तुडतूडी ने हमखास चटके बसत. Happy

पिस्तुलीत टिकल्यांचा एक रोल भरला की पहिल्या चार फाट फाट फाट फाट मग किच किच किच नुसतेच पिस्तूल मग जरा हलवून रोल नीट केला की फाट फाट परत. एकदम काउगर्ल स्टाइल वाटायचे.

Pages