©अज्ञातवासी! - भाग २ - प्रवेश

Submitted by अज्ञातवासी on 28 October, 2020 - 00:07

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!

भाग १ -
https://www.maayboli.com/node/77125

सकाळ झाली, सुस्तावलेला वाडा उठला. रात्रभर जागलेली भुते सकाळच्या खेळासाठी सज्ज झाली. खोल्यांची दारे उघडली गेली, खिडक्या उघडल्या गेल्या. काही बंद झाल्या. काही दारेही बंद झालीत.
"आज विल्हेवाट लावून टाकू अप्पा."
दणदणाटी आवाज. वीज कडाडल्यासारखा!
"संग्राम, काय बोलतोय? अंत्यविधी म्हण."
मंजुळ छद्मी आवाज!
"आई, दोघांचा अर्थ एकच. विल्हेवाट तर लावायचीय."
"दहा वाजेपर्यंत वाट बघू. नाही आला, तर तुलाच सगळं करावं लागेल संग्राम. दाखवून दे, तूच सगळं पुढे सांभाळणार."
हा आवाज मात्र शांतपणे काळडोहातून आल्यासारखा.
"अप्पा, मीच सांभाळेल. हे राज्य माझं आहे. तुम्हाला डावलून खुर्ची काकाकडे गेली. आता माझी खुर्ची माझीच राहील. कायम."
अप्पा खिन्न, आणि त्यानंतर चमत्कारिक हसू.
"माझा भाऊ कोण होता, याचा तुला अजूनही अंदाज आलेला नाही. म्हणून तू म्हणतोय, डावलला मला. काल रात्रीपासून तुमच्या पार्ट्या बघतोय मी, आणि घाबरू नको, आख्या नाशकात अशा पार्ट्या रंगल्या असतील.
माझा भाऊ नाग होता, नाग. कालिया नाग...आख्या नाशिकला वेढा घालून बसलेला नाग. जगनअण्णा शेलार जेव्हा खुर्चीवर बसले होते ना, हो, हो, तुझा आजाच... महिन्याभरात दामूकाकाचं प्रेत मिळालं होतं.
...माझ्या भावाने फणा उगारला, पण सावलीसाठी. डसण्यासाठी नाही आणि जर त्याने डसायचा विचार जरी केला असता ना...
...तर ना तू जिवंत असता, ना मी..."
काळीज चिरणारी शांतता...
"अप्पा..."
शांतता भंग.
"तयारी करायला हवी."
खोलीचा दरवाजा उघडला, तिघेही खोलीबाहेर पडले.
----------
स्वयंपाक घर म्हणजे शिजवण्याचं स्थान.
अन्न आणि कारस्थानेदेखील...
"काकू."
"बोल ग फिंद्रे, कालपासून दिसली नाहीस."
"इथेच होते ना काकू, पिंकीबरोबर."
"तुम्ही दोघीजणी एकत्र असल्यावर काय विचारणं... जगबुडी आली तरी तुमचं खिदळणं थांबणार नाही."
"नाही ना काकू, किती काम करतो आम्ही."
"कळतंय, कळतंय. कॉलेजला गेलात आता. जरा तमा बाळगा. घरात काय झालंय. आपण काय करतोय."
"काकू. बस करा ना आता. चहा द्या. आणि खारी आहे का? कालपासून भुकेने पोटात कावळे कोकलतायेत."
"हो, निरंकाल उपाशी तुम्ही. तिकडे कोपऱ्यात थांबा. झाल्यावर बोलावते."
"सत्यभामा, आम्हालाही थोडासा चहा द्या." मंजुळ आवाज आत आला.
"हो ठेवलाय ताई सगळ्यांचा."
"आणि थोडं खाण्यापिण्याचंही बघा. कालपासून माणसं खोळंबलीत..."
"हो तेही बघतेय. पोहे का होईना, पटकन बाहेर पाठवतेच."
"मलाही दे. कालपासून अन्नावरची वासनाच गेलीये."
"हो ना, तुम्हाला तर शेतावरच मटणही घशाखाली उतरल नसेल."
ताई चरकली.
"सत्यभामा, आता आम्हाला वाईटच ठरवायच झाल, तर ठरव. पण काल दिवसभर पोरांच्या जीवात जीव नव्हता. घरात हे असं, तरी सगळं त्यांनी आवरलं. आता रात्री शेतावर राहायला जायचं म्हटलं, तर गुलाबला मटनाशिवाय काही बनवता येत नाही. मग काय खाणार पोरं?"
"ताई, मी कुठे काय म्हणते? मी फक्त विचारलं ना? आणि मटनाबरोबर दारुही गुलाबनेच बनवली असेल. काय करणार, पोरं थकलीच होती ना!"
ताई एकदम गप्प.
"पोरींनो, आधी काकांना, अप्पांना आणि संग्रामला चहा नेऊन द्या बरं. जागृतीताईलाही उठवा. पटकन जा."
पोरी निमूटपणे चहा घेऊन बाहेर...
"ताई, लाज वाटायला हवी होती. कालचा धिंगाणा वाड्याभर पसरलाय. घरातून अजून प्रेत गेलं नाही, आणि तिकडे खून पडला. कधीतरी वेळ काळ याचं भान ठेवा म्हणावं."
ताई गप्पच.
"चहा घ्या."
ताईने चहाचा कप घेतला, आणि निमूटपणे बाहेर पडली.
हातातला चहा आता जरा जास्तच उकळायला लागला होता!!
---------
म्हातारेकोतारे बाहेर जमलेले. कुणी सकाळचा पेपर वाचतय, तर कुणी मोबाईलवर अपडेट देतंय. बहुतेक मात्र चर्चांमध्ये मग्न!
"मला सांगा हणमंतराव, शोभतं का हे वागणं? आता एक दिवस झाला, बॉडी राहील का नीट."
"तुलाबी डोकं नाही गड्या. घरच्यांना हौस आली का, एवढ्या मोठ्या माणसाची बॉडी सांभाळून ठेवण्याची. आसल काही कारण. या मोठ्या लोकांचे खेळ तुझा माझ्या डोक्याच्या फार वर."
"म्हणजे नामदेवराव?" एक अतिउत्साही शंकेखोर.
"आता, एवढं कमावलं, तर काही आसल बाहेरचा प्रकार. म्हणून येळ काढताय."
"हा, हा, मीबी ऐकलं होतं, आपल्या दादांची बायको, हडळ हुती म्हणे. गंगेत उडी मारून जीव दिला म्हणे तिनं..."
"...आणि दादाबी गंगेत बुडून गेले. गड्याहो, लागतीये का संगती?"
...शंकेखोर मन समाधानी...
-------------
"अप्पा, साडेनऊ झालेत. काय करायचं."
तयारीला लागा. मी बाहेरच्यांना सांगतो.
संग्राम समाधानी. फोनची फिरवाफिरवी सुरू.
अप्पा बाहेर आला. अप्पाला पाहून कंटाळलेली मंडळी आता काहीतरी नवीन ऐकायला मिळणार, म्हणून उत्साहाने पुढे सरसावली.
अप्पांच्या डोळ्यात हुकमी पाणी.
"दादाची इच्छा होती, पोराच्या हातून सगळं व्हावं. पण नाही जमणार. शेवटी पोरगं साता समुद्रापलीकडे. काल सकाळी पाच वाजता घटना झाली, सहा वाजता त्याला फोनही करून झाला. पण अंतर मोठं, कापता न येण्यासारखं. दादाची आता हेळसांड बघवत नाही. "
डोळ्यातलं पाणी वाढलेलं...
"म्हणून आता सर्व वडीलधाऱ्या मंडळींनीच मार्ग दाखवा."
हात जोडले गेले. हे बघून बऱ्याच म्हाताऱ्यांचा अहं सुखावला.
"एवढ्या मोठ्या माणसाची हेळसांड नको अप्पा. लवकर तयारी करा." एका होतकरू म्हाताऱ्याचे उद्गार, आणि त्याला बरच अनुमोदन.
तयारी सुरू झाली.
पुन्हा तीच स्थिती, तीच रडारड. तेच सगळं.
खुर्चीसमोरचा निश्चल देह, आता उचलण्याची वाट बघत होता.
संग्रामचं घड्याळाकडे लक्ष.
"हं बस करा आता, उचला रे, बोला..." शेवटी संग्राम न राहवून उद्गारला.
"थांबा... प्लिज थांबा..."
लांबूनच आवाज आला.
समोरून एक उंच, धिप्पाड आकृती पुढे आली.
लंगडत...
कोरडे डोळे घेऊन. पाणी आटलेले..
"बाबा..." तो पूर्णपणे सुन्न होऊन प्रेताच्या समोर आला.
...आणि न राहवून तो मटकन खुर्चीवर बसला.
...खुर्चीवर!!!

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा..

छान जमतेय. पुभाप्र.

सहीच आहे हा ही भाग..
उत्सुकता, पुढे काय होणार?? प्रश्ने,नक्की काय सुरू आहे??
सगळ्या शंका पुढे होतीलच क्लीअर.. म्हणून येऊ द्या पुढचा भाग पण लवकर. Happy

@ तेजो - धन्यवाद
@kingofnet - धन्यवाद
@आनंदा - धन्यवाद
@कल्याणी - धन्यवाद
@वाचिका - धन्यवाद
@रुपाली - धन्यवाद
@मृणाली - धन्यवाद
@चशमिश - धन्यवाद
@ आसा - धन्यवाद
@cuty - धन्यवाद

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद! नवीन भाग टाकला आहे.