राज तिलक

Submitted by पायस on 14 September, 2020 - 02:20

कोहली कुलोत्पन्न दोघेच फेमस. एक विराट, दुसरा राजकुमार. राजकुमार उर्फ राज कोहली आज आपल्याला नागीन आणि दोन जानी दुश्मन्स मुळे माहित असला तरी त्याचे शिखर वर्ष १९८४ आहे. या वर्षी त्याने एक नव्हे तर दोन डोक्याला ताप चित्रपट बनवले. पहिला जीने नहीं दूंगा, ज्यात रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंगशी आपली ओळख करून दिली आहे. आणि दुसरा राज तिलक ज्यातून कमल हसनला सारिका आणि प्रेक्षकांना आ वासण्याची शक्ती मिळाली.

दोन्ही सिनेमे इंदर राज आनंद-राज कोहली याच लेखक-दिग्दर्शक द्वयीच्या देणग्या आहेत आणि साधारण सारखेच आहेत. जीने नहीं दूंगाचा प्लॉट तुलनेने सरधोपट असला तरी त्यातली अ‍ॅक्टिंग कहर आहे. तर राज तिलकमधली अ‍ॅक्टिंग तुलनेने बरी असली तरी त्याच्या प्लॉटमध्ये जगभरातली कॉम्प्लिकेशन्स आहेत. अखेर राज तिलकमध्ये जानी राजकुमार म्हणजे आपला राकु आहे म्हटल्यावर त्याच्या गुर्‍हाळातील रसग्रहणाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त होते. तरी यातून पिचून बाहेर पडलेल्या रसामृताला पचवण्याचा प्रयत्न करूयात.

१) हे तर अथांग असे गहिरे पाणी

१.१) बहुधर्मिय पुत्रकामेष्टी

सिनेमाच्या सुरुवातीला कुठल्यातरी देवीच्या मंदिरात पूजा होताना दिसते. तसेच एका दर्ग्याबाहेर वाळवंटात एकट्यानेच राकु दुआ मागताना दिसतो. दोन्ही विधिंचा हेतु एकच आहे - पूजा करत असलेल्या महाराजांना मुलगा व्हावा, म्हणजे राज्याला युवराज मिळावा. यातून राकु हा अव्वल दर्जाचा स्वामीभक्त आहे हे ठसवले आहे. सुरुवातीलाच भटजी पंचा आणि लाल रंगाचे धोतर, घोळक्यातील बायका चणिया चोळीत आणि स्वतः महाराज युरोपीय वेषात दाखवून आपण धरम वीर, अमर शक्ती, सिंघासन इ. सिनेमांच्या युगातील कथा बघत असल्याचे स्पष्ट होते. महाराजांची तलवार फॉईल (फेन्सिंगची तलवार) असल्यामुळे सिनेमातील हिरो लोक निपुण तलवारबाज असल्याचे स्पष्ट होते. हा महाराज मला काही ओळखू आलेला नाही. यात इतके लोक आहेत की सगळे बरोबर ओळखले आहेत असे छातीठोकपणे मीही सांगू शकत नाही.

असा बहुधर्मीय जुगाड लावल्यानंतर महाराजांना मुलगा झाला नाही तरच नवल! त्यानुसार नोकर शेर सिंग मंदिरात येऊन सांगतो की महाराणींना मुलगा झालेला आहे. या आनंदात महाराज त्याला मोत्यांचा हार काढून देतात (गळ्यातून, हवेतून नव्हे. महाराज महाराज आहेत जादूगर नाही). याने राजीव आनंद फार मोठ्ठा राजा असल्याचे कळते. तो महामंत्री भवानी सिंगसाठी निरोप देतो की गोरगरीबांसाठी खजिना खुला करावा. अशा उधळमांडक्या राजाचा महामंत्री सहसा प्रॅक्टिकल, हुशार, आणि महत्त्वाकांक्षी असतो. हिंदी सिनेमांमध्ये अशा गुणी व्यक्तीस व्हिलन असे म्हणतात.

१.२) व्हिलन आणि इतर पात्र परिचय

या सिनेमाचा व्हिलन आहे अजित. अजित म्हणजे महामंत्री भवानी सिंग अर्थातच राजसिंहासनावर बसण्याची अपेक्षा बाळगून आहे. त्याचा साथीदार आहे मदन पुरी. आश्चर्यजनकरित्या नाव रणजित असूनही ही भूमिका मदन पुरीला दिलेली आहे. हे दोघे बहुतांश सिनेमात जोधपुरी सूट घातलेले दाखवले आहेत. युवराजाचा जन्म अर्थातच यांच्यासाठी वाईट बातमी आहे. पण अजित हुशार व्हिलन आहे. त्याला याची पुरेपुर जाणीव आहे की आपल्या मार्गातला खरा अडथळा आहे समद खान (राकु). अजितच्या म्हणण्यानुसार राकु इतका वफादार आहे की त्याच्या धमन्यांतून रक्त नव्हे तर महाराजांचे मीठ वाहते आहे. मीठ ८०१ सेल्सियस तापमानाला वितळते. एवढा हॉट पुरुष हिंदी सिनेमात दुसरा कोणी नसावा.

तिकडे महाराज लगेचच राजकुमार मोठा झाला की त्याला विलायतेला शिकण्यासाठी पाठवण्याचा, भारतीय पालकांना साजेसा निर्णय घेतात. कचकड्याच्या बाहुलीचे ते बाळ तलवार का धनी आणि कला का प्रेमी असेल हा निर्णयही ते घेऊन टाकतात. आता आनंद साजरा करण्याची वेळ झालेली आहे. त्यानुसार अजित, मदन पुरी आणि रझा मुराद दरबारात हजर आहेत. इतरही किरकोळ सेवक-सेविका आहेत. बाळाच्या सुरक्षेची शून्य चिंता असल्याने महाराज त्याला खुशाल हातात घेऊन मिरवत आहेत. पण राकु कुठे दिसत नसल्याने महाराजांच्या जीवाला घोर लागतो. रझा मुराद जलाल खान नावाने सिनेमात राकुचा धाकटा भाऊ आहे. याने कधी नव्हे ती त्याला न साजेशी हिरो-साईडची भूमिका केली आहे. हे दर्शवण्याकरता याला एकट्याला स्वच्छ धुतलेला ड्रेस दिला आहे. तो म्हणतो की तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून राकु अजमेरला ख्वाजा गरीब नवाजच्या दर्ग्याला गेला आहे. आता युवराज झालेला असल्याने दर्ग्यात बसण्याचे कारण संपले आहे. मग राकु हा क्यू घेऊन दरबारात प्रकटतो.

राकु या राज्याचा सेनापती देखील आहे. तसेच राज्यातला सर्वश्रेष्ठ तलवारबाजही आहे. हे बघता राकुला युवराजाचा गुरु म्हणून नेमणे स्वाभाविक आहे. पण मग दोन प्रश्न उद्भवतात - १) मग युवराजाला विलायतेला जाण्याची काय आवश्यकता आहे?, २) युवराजाला आत्ताच्या आत्ता, ताबडतोब राकुच्या हातात देण्याची गरज आहे का? ते आत्ता ज्या खोलीत आहेत तिथे स्नायपिंग करणारे धनुर्धारी लपवणे अतिशय ट्रिव्हिअल काम आहे. एक बाण आणि एवढ्या मेहनतीने झालेला युवराज खलास! पण सिनेमा अजून सुरु पण झाला नसल्याने तसे होत नाही. मग राकु पीळ उर्दू भाषण मारतो ज्याचे सार 'ओके' असे आहे. इथे बॅकग्राऊंडला अजित आणि मदन पुरी "हे दळण अजून किती वेळ चालणार आहे" चेहर्‍याने एकमेकांकडे बघताना दिसू शकतात. या सीनमध्ये राकुचा वेष गदळ आहे. त्याची मिशी उजव्या बाजूने निघून आली आहे. तिरंगात जो मिशीसोबत खेळ खेळला आहे त्याची सुरुवात इथे दिसते. त्याच्या दाढीचा रंग मिशीशी मॅच होत नाही. दाढी जॉ-लाईन रेफरन्सने चिकटवायची ती अट्टाहासाने जबड्याखाली चिकटवली आहे. दर्ग्याची चादर उपरण्यासारखी घेतली आहे. कंबरेला फॉईल (तलवार) तशीच बिन म्यानेची लटकत आहे. ही त्याच्या साईझची सुद्धा नाही. कारण ती त्याच्या बुटापर्यंत येते आहे. तो ज्या प्रकारे चालत येतो ते बघता समद खानचा डावा पाय कायमचा जायबंदी झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे त्याच्या डाव्या हाताला ती रँडम पुरचुंडी कसली आहे? तिचे त्या सीनमध्ये काय काम आहे?

महाराज आपल्या बिनडोकपणाचा आणखी एक पुरावा म्हणून अजितला आदेश देतात की या महिन्यात राज्यात जेवढी म्हणून मुले जन्माला आली आहेत त्या सर्वांना इथे बोलावून घ्या. त्यांचे नामकरण आम्ही करू. तीन मिनिटांच्या आत व्हिलन जिंकावा म्हणून मी यापूर्वी कधी प्रार्थना केल्याचे स्मरत नाही. मग महाराणी आणि सोबत सुलोचना येते. महाराणीची इच्छा असते की हा निर्णय सर्वात आधी तिच्या मानलेल्या भावाला, अर्जुन सिंगला कळावा. कट टू अर्जुन सिंग. अर्जुन सिंगची भूमिका प्राणने केली आहे. अप्रतिम टायमिंग असल्याने प्राणलाही याच महिन्यात मुलगा झाला आहे. बायको दुर्गाच्या भूमिकेत उर्मिला भट (महानमधल्या नाटकात काम करणार्‍या अमिताभचा सांभाळ करणारी आई) आहे. हिला आपल्याला मुलगा झाला यापेक्षा महाराणीला युवराज झाला याचाच आनंद जास्त आहे. राकुला रझा मुराद दिला तसा प्राणच्या हाताखाली पण कोणीतरी पाहिजे. मग त्याला संग्राम सिंग म्हणून कोणी दिला आहे. परंपरेनुसार प्राणने युवराजासाठी काहीतरी भेट पाठवणे अपेक्षित असते. मग तो संग्राम सिंग हस्ते एक हार पुढे पाठवून देतो. संग्राम सिंग वायुवेगाने राजवाडा गाठतो, हार राकुच्या मांडीतल्या राजकुमाराच्या गळ्यात घालतो आणि प्राणच्या मुलासाठी रिटर्न गिफ्ट घेऊन प्राणकडे परतायला बघतो. आणि नेमकी इथेच माशी शिंकते.

१.३) कधीकधी नशीब व्हिलनच्या बाजूने असते

अजित ठरवतो की ही संधी चांगली आहे, आज उठाव करूया. त्याच्या बाजूला मदन पुरी, जगदीश राज (हिंदी सिनेमांचा घाऊक पोलिस इन्स्पेक्टर) आणि जगदीश राजच्या गँगमधली माणसे आहेत. तो संग्राम सिंगला चाकू फेकून मारतो आणि लढाईला तोंड फुटते. शूटिंगच्या वेळी महाराजांच्या साईडच्या एक्स्ट्रांची संख्या मोजण्यात काहीतरी गडबड झाली असावी. कारण बहुतांश जणांना लाल रंगांचा युनिफॉर्म आहे पण काही तुरळक जणांना निळ्या रंगाचा युनिफॉर्म दिला आहे. अजितला आपले संख्याबळ मर्यादित असल्याची जाणीव आहे. त्यामुळे तो नगारा वाजवून सावध करणार्‍या सैनिकाला बाण मारून ठार करतो. व्हिलनचा नेम चक्क सलग दोनदा बरोबर लागला आहे - एक्स्ट्रीम रॅरिटी! बहुतांश सैनिक अजूनही बेसावध असले तरी राकु आणि रझा मुरादला घोटाळा असल्याची जाणीव होते आणि तेही लढाईत उतरतात.

रझा मुराद माणिक इराणीला खणाखणीत गुंतवतो. बाकी लोक फालतु असल्याने राकुला त्यांच्याकडे लक्ष द्यायचे काहीच कारण नाही. तो समयसूचकता दाखवून नगारा वाजवून धोक्याची सूचना देऊ लागतो. अजित बाण चालवून राकुलाही ठार करण्याचा प्रयत्न करतो. पण राकु या सिनेमात ब्रिगेडिअर सूर्यदेवसिंगच्या रोलसाठी प्रॅक्टिस करत असल्याने त्याचे रिफ्लेक्सेस दैवी आहेत. तो गुणगुणारा डास झटकावा तसा अजितचा बाण एका हाताने झटकून टाकतो. तसे बघावे तर अजितने हाराकिरी केली आहे. महाराज शांतपणे झोपून राहिला तरी राकु आणि रझा मुराद सहज या लोकांना हाताळताना दिसत आहेत. प्राण कधीही येऊ शकतो त्यामुळे अजितची साईड अगदीच कमकुवत आहे. पण अजितने आपला महाराज काय दर्जाचा बुद्धू आहे हे अचूक ताडले आहे. त्यानुसार महाराज तलवार घेऊन मैदानात उतरतो.

फॉईलचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर करून खणाखणी चालू असताना संग्राम सिंग प्राणच्या डेर्‍यात जाऊन उठावाचा संदेश प्राणला देतो आणि मरतो. प्राण लगेच राजवाड्याकडे धाव घेतो. तिकडे राकुचा नगारा वाजवून झालेला असल्याने तो रझा मुरादच्या मदतीला जातो. राकुच्या हस्ते माणिक इराणीचा बॉलिवूड रेकॉर्ड टाईममध्ये मृत्यु होतो (सहा मिनिटांत). हे सर्व एवढ्या वेगाने घडत असले आणि मागे दाणदाण मुझिक लावले असले तरी लढाईची कोरिओग्राफी अति विलंबित लयीत आहे. हे म्हणजे बडा ख्यालाला साथ म्हणून एखादे परण वाजवण्यासारखे आहे. राकु मग रझा मुरादला जाऊन सांगतो की बाकी सगळे मेले तरी चालतील, युवराज वाचला पाहिजे. तू त्याला घेऊन नजमा (पक्षी समद खानची बायको) कडे जा. रजा मुराद म्हणतो ओके. इथून खरा घोळ सुरू होतो. प्रत्यक्षात हे लोक ऑलमोस्ट जिंकत आले आहेत. पुढच्याच शॉटमध्ये प्राण आपल्या सैनिकांसोबत पोहोचतो आणि अजितचा प्लॅन पूर्णपणे फसतो. त्यामुळे रझा मुरादला काहीही करायची गरज नाही आहे. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.

१.४) अ‍ॅडॅप्टेबल व्हिलन

तरी अजितचा प्लॅन फसत असताना तिकडे रझा मुराद महाराणीला गाठतो. तो म्हणतो युवराज माझ्या हवाली कर. त्याच्या दरडावणीच्या सुरामुळे महाराणी अर्थातच साशंक होते. शांत शब्दांत तिला समजावून तिच्यासकट युवराजाला बाहेर काढणे हे दोन मिनिटांचे काम आहे. पण रझा मुरादला हिरो साईडचा अनुभव नसल्याने तो जबरदस्तीने युवराज हिसकावून घेतो. डोन्ट वरी, महाराणीही कमी बिनडोक नाही. रझा मुराद युवराजाला घेऊन पळ काढतो तर त्याच्या मागे चार बंडखोर येतात. ते रझा मुरादला महाराणीसमोर बाणाने मारतात. तरीही महाराणी रझा मुरादच गद्दार असल्याचा निष्कर्ष काढते. तसेच रझा मुरादला जे बाण लागतात ते वर्महोलचा प्रवास करून येतात. अन्यथा त्या अँगलने त्याला बाण लागणे अशक्य आहे. एनीवे, तिकडे अजित निरुपाय म्हणून खांबामागे लपून महाराजांच्या मर्मावर बाण मारतो. याच्या निम्मी जरी अ‍ॅक्युरसी इतर व्हिलन्सने दाखवली असती तर बॉलिवूडच्या हिरोंचे अवघड होते. जगदीश राज काम संपवावे म्हणून चाकू भोसकायला जातो आणि प्राण त्याला आपल्या ताब्यात घेतो. राकु व प्राण त्याच्याकडून या षडयंत्रामागे कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आपले बिंग फुटते आहे बघून अजित धावत पळत येतो आणि तलवार भोसकून जगदीश राजला ठार करतो. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही

अर्थातच राकु चिडतो (आणि त्याला संशयही येतो). अजित यावर "राजपूत जब अपने आका का खून देखता हैं तो तुम्हारे तरह सवाल नही करता. बल्कि खून का बदला खून से लेता हैं" असा बचाव पुढे करतो. प्राण राजपूत असल्याने हा बचाव त्याला पटतो. राकु हुशार असल्याने त्याला हा बचाव पटत नाही. राकु राजपूत नसल्याने त्याला प्राण भाव देणार नाही हे स्पष्ट असले तरी तो बापडा प्रयत्न करतो. हे सर्व संवाद अतिशय काव्यात्मक आहेत. उदा.
"अभी अभी यहां एक लाश गिरी हैं जिसे तुम्हारी आंखे नही देख सकती अर्जुन सिंग."
"लाश? किसकी?"
"असलियत की!"
प्राण महाराजांच्या तब्येतीची चौकशी करायला निघून जातो तर राकु नजमाला गाठतो. नजमाची भूमिका केली आहे योगिता बालीने. नजमा त्याला सांगते की रझा मुराद काही इकडे आलेला नाही. मग हा मनुष्य गेला तरी कुठे च्यामायला? हा शॉक कमी म्हणून की काय, तिकडे महाराज मरायला टेकतात. पटकन गचकून राजवैद्याला मोकळे करावे तर त्यांना युवराजाचे मुखदर्शन घेण्याची इच्छा होते. आता युवराज कुठून आणायचा? अशावेळी अजित आणि मदन पुरी कमालीची अ‍ॅडॅप्टेबिलिटी दाखवत फसलेला प्लॅन मार्गावर आणतात. मदन पुरी कुठून तरी एका बाळाचे शव पैदा करून हाच युवराज असल्याचे महाराणीला सांगतो. अजून एक छिन्नविछिन्न शव रझा मुरादचे म्हणून खपवले जाते. आता महाराजाचा आत्मा शांत कसा करावा? यावर महाराणी इतका वेळ झाले ते काहीच नाही असा कहर उपाय काढते. प्राणने आपला मुलगा महाराणीला युवराज म्हणून द्यावा जेणेकरून महाराजांना हा धक्का सहन करावा लागणार नाही. प्राणही परस्पर होकार देऊन आपला मुलगा आणायला जातो. त्याची बायको त्याला विचारते की किमान मला हे तरी सांग की आपला मुलगा कोणाच्या घरात देत आहेस. प्राण म्हणतो मी हे सांगू शकत नाही. कोणी विचारले तर सांग की आपला मुलगा मेला. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.

१.५) अबूबाबाच्या वरचढ कॅच आणि वफादार नोकराच्या वरचढ वफादार मालक

अजित तयारीतच असतो. तो म्हणतो की वहिनी बेशुद्ध झाल्यात तू त्यांना सांभाळ, मी तुझा मुलगा महाराणींना देऊन येतो. प्राणच्या तंबूतून तो जातो थेट मदन पुरीकडे. मदन पुरी अजितचा मुलगा घेऊन तयार आहे. आपण नाही तर युवराज रुपाने आपला मुलगा सिंहासनावर बसवण्याची बार्गेन त्याने मान्य केली आहे. आता प्राणच्या मुलाचे काय करावे? अजित म्हणतो की माझ्या मुलाला नजर लागू नये म्हणून याचा बळी देऊ. मग मदन पुरी प्राणच्या मुलाला, अजितच्या मुलावरून ओवाळून फेकून देतो. मिसटाईम्ड शॉटला बाऊंड्रीवरचा फिल्डर जसा धावत पुढे येऊन कॅच करतो तशी सुलोचना विंगेतून अचानक येऊन प्राणच्या मुलाचा कॅच घेते. अबूबाबाचा कॅच यापुढे काहीच नाही कारण संजीव कुमारला बसल्या जागी कॅच आहे, सुलोचनाला आपले बूड हलवून योग्य जागी पोहोचण्याचे अ‍ॅडिशनल चॅलेंज आहे. सुलोचना अजितची बायको असल्याचे कळते. ती म्हणते की आपला मुलगा मी युवराज म्हणून दिला, त्या बदल्यात प्राणचा मुलगा मला द्या. अजित तिची विनंती मान्य करतो.
आता एकच काम उरले आहे, राकुचा बंदोबस्त! मदन पुरी त्याला अटक करायला जातो. राकुसारखा अजिबात न दिसणारा स्टंट डबल मदन पुरीच्या काही सैनिकांना मारतो पण लवकरच राकुला अटक करण्यात मदनला यश येते. तिकडे आपला मुलगा युवराज म्हणून महाराजांना खपवण्यात अजितला यश आले आहे. महाराजही "मी युवराज पाहिला, आता मी काही मरत नाही" मोडमध्ये. थोडक्यात हा जगेल अशी चिन्हे आहेत. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.

राकुला गद्दार म्हणून महाराजांसमोर आणले जाते. राकु गद्दारी करेल ही कल्पनाच असह्य असल्याने महाराज ऑक्सिजनवर जातात. त्यात महाराणी महाराजासमोरच याची उलटतपासणी सुरु करते. खुशाल जाऊन ती महाराजांना म्हणते की राकुच आपल्या मुलाच्या मृत्युस जबाबदार आहे. आत्ता थोड्याच वेळापूर्वी त्याला अजितचा मुलगा युवराज म्हणून खपवला असल्याचे ती विसरते. पण महाराज हे विसरलेले नाहीत. त्यांना तिथल्या तिथे हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि ते जागीच गतप्राण होतात. राकुला गद्दारीचा आरोप आणि फाशीची शिक्षा मान्य होण्याचा प्रश्नच नाही. मग तो काहीतरी बरळून आपल्या बेड्या सहजगत्या तोडतो आणि पसार होतो.

एवढा अगडबंब सेटअप ज्याच्यामुळे झाला तो रझा मुराद कुणा खानाबदोश म्हणजे बंजारा टोळीला सापडतो. या बंजारा टोळीचा प्रमुख आहे ओमप्रकाश. रझा मुराद युवराजाला ओमप्रकाशच्या हवाली करून मरतो. इथून पुढे दोन मिनिटे आपल्याला अतिशय गचाळ एडिटिंग बघायला मिळते. राकु निर्धार करतो की जोवर तो आपल्या माथी लागलेला कलंक दूर करत नाही तोवर तो राज्यात परतणार नाही. या निर्धाराचे डायलॉग तो कुठल्याशा चितेसमोर उभे राहून बडबडतो आहे. ही कोणाची चिता? महाराज किंवा रझा मुरादची तर असू शकत नाही. बहुधा राकु म्हणतो त्या असलियतची चिता असावी. मग राकु व योगिता बाली नेसत्या वस्त्रांनिशी घर सोडतात. अजमेरच्या दर्ग्यात हजेरी लावून ते थेट वाळवंट गाठतात. त्यांच्या हालअपेष्टांचे प्रतीक म्हणून वाळवंटात योगिताचे पाय काटे आणि फोडांनी भरलेले, रक्ताळलेले दाखवले आहेत. राकु दु:खी होतो पण यात त्या दोघांचीच चूक आहे. अनवाणी वाळवंटातून चालायला कोणी सांगितलं होतं? वाळवंटात कुठे तडमडतात कोणास ठाऊक पण त्यांना एक गुहा सापडते जिथे राकु आपले बस्तान बसवतो. गुहा राज्याच्या सीमेवर कुठेशी असावी.

टाईम स्किप!

२) पोस्ट टाईम स्किप

२.१) बावीस मिनिटे गाण्याची वाट पाहायला लावणारा दिग्दर्शक

मध्ये बरीच वर्षे निघून जातात. राकु आणि योगिताचे केस थोडेसे पांढरे झाले आहेत. बाकी दोघेही टकाटक दिसत आहेत. राकुने तलवार शिकवण्याचे क्लासेस उघडले आहेत. युवराज न सापडल्याने अजूनही राकुवर गद्दारीच ठपका आहे. हे दु:ख सोडले तर बाकी त्यांच्या अ‍ॅरेंजमेंटमध्ये नाव ठेवायला जागा नाही. .
तिकडे राजवाड्यात चक्क बिबळ्या घुसला आहे. या बिबळ्याला पकडून एक नरपुंगव त्याच्यासोबत मस्ती करतो आहे. हा नरपुंगव म्हणजे तोतया युवराज अर्थात अजितचा मुलगा. बिनडोक महाराणी अर्थात राजमातेने याचे नाव समशेर सिंग ठेवले आहे. ही भूमिका केली राज किरणने. पोस्ट टाईम स्किप प्राणने राकुची जागा घेतल्याचे स्पष्ट होते. अजित आणि मदन पुरी अजूनही जोधपुरी सुटातच आहेत. राज किरण आपल्या आईसोबत आदराने वागतो पण नोकरवर्गाच्या पाया पडायला त्याची ना आहे. राजमाता आणि प्राणच्या मते तो प्राणचा मुलगा असल्याने तो थोडे व्यथित होतात पण प्राणला आपल्या (?) मुलामध्ये राजपूतांचे गुण आले आहेत असे वाटून तो खुश होतो. प्रत्यक्षात खुश फक्त अजित आहे कारण राजघराण्याला साजेशी गुर्मी त्याच्या रक्ताने दाखवायला सुरु केली आहे. राज किरण आता राज्याभिषेक करण्या इतपत मोठा झालेला असल्याने त्याचे लग्न राजमातेने राजगढच्या राजकुमारी मधुमतीशी ठरवले आहे.

मधुमती दाखवली आहे रीना रॉय. राज किरणला भेटायला म्हणून ती आपला लवाजमा सोबत घेऊन निघाली आहे. ऑफ कोर्स रीना रॉय राज किरणची हिरोईन असणे शक्य नाही. मग हिचा हिरो कोण? लगेच ओ ओ ओ सुरु होते. रीनाची मैत्रीण सांगते की इथून जवळच एक बंजार्‍याचा डेरा आहे. मधुमती गाणे ऐकू आले की जाऊन नाचलेच पाहिजे या तत्वाचे पालन करत असल्याने ती तडक बंजारा वस्ती गाठते. अखेर सिनेमात पहिले गाणे सुरु होते.

२.२) डेंजरस इश्क

संगीत दिले आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आवाज आहे सुरेश वाडकर आणि आशा भोसलेंचा. गाणे आहे अजूबा अजूबा अजूबा, हुस्न तेरा हैं एक अजूबा. सुरुवातीला याहियातूबा असे म्हणत कमल हसन आणि सारिका नाचताना दिसतात. कमल हसनच खरा युवराज आहे हे कोणीही सांगू शकतं. नृत्यकुशल अभिनेता असल्याने खेमट्याच्या बीट्सना मॅच होणार्‍या स्टेप्स देता आल्या आहेत. खंजिरी वाजवण्यासाठी हाथाने थाप द्यावी लागते हा गैरसमज दूर करण्यात आला आहे. मुळात खंजिरी दोन्ही हातांनी धरून हिरविणीच्या पार्श्वभागावर आघात करून वाजवायचे वाद्य आहे. कमलभाऊंनी हे अतिशय मन लावून दाखवले आहे. रीना रॉयच्या अंगावरचे मोत्यांचे दागिने बघून ओमप्रकाश ही कोणी राजकन्या असल्याचे ओळखतो. पण कपड्यांची गुलाबीची भयाण शेड बघून कमल हसन ही इथे नाचायलाच आली आहे हे ताडतो. लगेच तिला जरा बरे कपडे घालायला दिले जातात आणि कमल सारिकाला सोडून तिला पकडतो. शूटिंग आऊटडोअर असल्याचा पुरावाही इथे बघता येतो. नाचताना या लोकांनी प्रचंड धुरळा उडवला आहे.

अचानक घाणेरडा जंप कट बसतो आणि कमल हसनला रीना रॉय स्वप्नात दिसत असल्याचे स्पष्ट होते. प्रत्यक्षात तो सारिका सोबतच नाचत आहे. मग उर्वरित वेळ कोलांट्या उड्या आणि इतर कसरत नृत्ये होतात. ओव्हरऑल गाणे बरे आहे आणि डान्सही सहणेबल आहे. आता या गाण्यातून काहीतरी निष्पन्न तर झाले पाहिजे. मग सारिकाला अचानक ध्यानात येते की कमल रीनावर लाईन मारतो आहे. रीनासोबत अ‍ॅक्चुअल डान्स स्टेप्स सुरु झाल्यावर तर तिचा तिळपापड होतो. मग एक चाईल्ड आर्टिस्ट तिला नाग आणून देतो. हा चाईल्ड आर्टिस्ट म्हणजेच दिग्दर्शकाचा सुपुत्र अरमान कोहली होय. ही तो नाग रीना रॉयवर सोडते. नागही बिचारा जाऊन रीनाला चावतो. गतकाळात क्राईम पेट्रोलच्या अभावामुळे असे कितीक गुन्हे घडले असतील याची गणतीच नाही.

२.३) द्रोणाचार्य राकु

कमल हसनचे नाव ओमप्रकाशने सूरज ठेवले आहे. तो रीनाला एका तंबूत घेऊन जातो आणि तपासतो. नाग चावल्याची जखम दिसताच तो यावरचा रामबाण उपाय - विष चोखून थुंकणे - करतो. इथे याचे जाळीदार जाकीट जवळून बघता येते. बाहेर अरमान कोहली, सारिकाचा भाऊ, खंजर घेऊन आला आहे. याला आवरा अरे कोणीतरी! विष चोखल्याने कमल हसनही अंडर रिस्क आहे. त्याला काही झाले तर सारिका लगेच खंजर मारून रीनाला ठार करण्याची घोषणा करते. आपण एका राजघराण्यातील व्यक्तीवर जीवघेणे हल्ले करतो आहोत. त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस असतात. हे मूल्यशिक्षण सारिका व अरमानला मिळालेले दिसत नाही. पण कमल हसनचे मूल्यशिक्षण झालेले आहे. त्यामुळे फ्रेंच किसचा मोह आवरता घेऊन तो रीनाच्या तळहाताचे चुंबन घेतो. याने रीना शुद्धीवर येते.

विषय फार वाढू नये म्हणून रीना आणि तिची मैत्रीण काढता पाय घेतात. सारिका कमल हसनला "परत लाईन मारलीस तर याद राख. ती भवानी आहे आणि मी आहे" अशी वास्तववादी धमकी देते. ओमप्रकाश उगाच काहीतरी बोलून विषय बदलतो. त्यात तिकडे राकु येतो. कमल हसन राकुच्या क्लासचा विद्यार्थी आहे. ओमप्रकाशचे नाव सरदार झुबेरी असल्याचे स्पष्ट होते. राकु आपल्या क्लासमार्फत बदला घेण्यालायक शिष्य तयार करतो आहे. कमल हसनही त्यापैकीच एक आहे. थोडक्यात राकु द्रोणाचार्य आहे. पण अजूनही कमल हसन युवराज असल्याचे रहस्य रहस्यच आहे.

या द्रोणाचार्यांचा अजून एक शिष्य आहे सुनील दत्त. एकाच वेळी गुहेतील सर्व शिष्यांचा सामना करून, राकुच्या हातून तलवार हिसकावण्याचे कसब दाखवून तो प्रेक्षकाला पटवून देतो की आपण एक महान योद्धे आहोत. राज कुमार सुनील दत्तपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठा आहे पण मेकअपने पराकाष्ठा करून काळे केस असलेला सुनील दत्त राकुपेक्षा म्हातारा दिसेल याची खात्री घेतली आहे. त्याहूनही आश्चर्यजनकरित्या समद खानच्या क्लासमध्ये महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. सुनील दत्तचे नाव आहे जयसिंग. जयसिंगची तालीम आज पूर्ण झाल्याचे राकु सांगतो. इतकी वर्षे राकुने हा कोणाचा मुलगा आहे हे विचारलेले नसते. अखेर सुनील स्वतःच सांगतो की मी प्रतापगढचे महामंत्री भवानी सिंग यांचा मुलगा आहे. हा स्वतःला अजितचा मुलगा समजतो आहे. म्हणजे हा सुलोचनाने कॅच घेतलेला प्राणचा मुलगा आहे. आपण अजितच्या मुलाला शिकवल्याचे कळताच राकु क्रुद्ध होतो. पण दुष्टचक्र संपवायचे नसल्याने तो सुनील दत्तला आपल्या चिडण्याचे कारण सांगत नाही. त्या ऐवजी तो भविष्यात गुरुदक्षिणेचे वचन घेऊन सुनीलला जायला सांगतो. सुनील राजपूत असल्याने तो वचन पाळणार हे वेगळे सांगणे न लगे. जाता जाता योगिता बाली त्याला दर्ग्यातून आणलेला रुमाल बांधते आणि राकुला टोमणा हाणते. नवरा-बायकोत आपले काय काम म्हणून सूज्ञ सुनील काढता पाय घेतो.

२.४) सेटअप कंप्लीट आणि समरी

आता एकच मेजर जोडी राहिली आहे आणि मग स्टार लोक संपले. तशी सुनील दत्तलाही एक हिरवीण आहे पण ती नंतर. जंगलातून घोडागाडी जाताना दिसते. या घोडागाडीत बसली आहे हेमा मालिनी. हेमा मालिनी सिनेमात आहे म्हटल्यावर तिचा हिरो धरम पाजी असणार ही सेफ बेट आहे. हेमा मालिनीचा ड्रायव्हर गणवेशावरून प्रतापगढचा असल्याचे ओळखता येते. थोडक्यात ही देखील प्रतापगढची आहे. ही मंदिरात पूजा करून परत येते आहे. रस्त्यात एक झाड पडल्याने गाडी थांबवावी लागते. या सैनिकांच्याकडून काही ते झाड हलत नाही. सुदैवाने तिकडून धरम पाजी पांढर्‍या रंगाचा लेदरचा सदरा घालून चालले आहेत. आधी ते थोडे उचकतात पण गाडीत हेमाला बघून विरघळतात. मग एकटेच त्या झाडाला उचलून बाजूला फेकून देतात.

हेमाला पाजी कोण आहेत हे माहित नसल्याने ती इनाम म्हणून त्यांना एक सोन्याची मोहोर देते. पण पाजीदेखील राजपूत आहेत. त्यामुळे ते स्त्रियांची मदत करणे हा आपला धर्म मानतात. म्हणून इनाम स्वीकारणे त्यांच्या शान के खिलाफ असते. मग ते मोहोर हेमाला परत करतात आणि तिला वाटेला लावतात. अचानक तिथे प्राण प्रकटतो. धर्मेंद्र प्राणचा मुलगा आहे म्हणजे टेक्निकली सुनील दत्तचा भाऊ. हा मुद्दा नंतर क्लिअर होईल. प्राण येऊन सांगतो की ही अजितची मुलगी आहे. अजितने मध्यंतरीच्या काळात आपल्या मुलीला राजकुमारीचा दर्जा मिळवण्यात यश मिळवलेले दिसते. अर्थात पाजींची राजपूतगिरी टेक्स प्रिसिडन्स. हेमासुद्धा पाजींवर इंप्रेस होते आणि थॅंक्स म्हणून जाते. पाजींचे नाव आहे जोरावर. पाजींनाही हेमा पसंद आहे. प्राणलाही काही हरकत नाही. त्यामुळे ही जोडी जुळली. प्राणला आणखी एक मुलगा शाम सिंग दाखवला आहे. त्याचा मुद्दा आणि इतर काँप्लिकेशन्स आपण प्रतिसादांत अभ्यासू. अल्पविराम घेण्यापूर्वी या सर्व नात्यांची एक समरी

महाराज + महाराणी - एक मुलगा = कमल हसन. सध्या ओमप्रकाशचा मुलगा म्हणून वावरतो. याने राकुकडून युद्धकलेचे शिक्षण घेतले आहे. हा खरा युवराज असल्याचे सध्या कोणालाच ठाऊक नाही.
राकु + योगिता बाली - राकु राजसेवेत अहोरात्र गुंतला असल्याने मूलबाळ नाही
प्राण + उर्मिला भट - तीन मुलगे = सुनील दत्त, धर्मेंद्र, शाम सिंग. शाम सिंगचा नट बिनमहत्त्वाचा असल्याने तो डेफिनिटली धाकला. बहुधा सुनील दत्त थोरला पण नीट स्पष्ट केलेले नाही. सुनील दत्त सध्या अजितचा मुलगा म्हणून वावरतो. याने राकुकडून युद्धकलेचे शिक्षण घेतले आहे. सुनील दत्तचे सत्य केवळ अजित, मदन पुरी आणि सुलोचना यांना ठाऊक आहे.
भाऊबंद : याखेरीज राकुला एक भाऊ - रझा मुराद. याने युवराज ओमप्रकाशच्या हवाली करून अंग टाकले. तसेच प्राण हा महाराणींचा मानलेला भाऊ.
अजित + सुलोचना - एक मुलगा, एक मुलगी = राज किरण आणि हेमा मालिनी. राज किरण थोरला. राज किरण सध्या युवराज म्हणून वावरतो. प्राण व राजमातेनुसार राज किरण प्राणचा मुलगा आहे पण प्रत्यक्षात तो अजितचा मुलगा आहे. हे सत्य केवळ अजित, मदन पुरी आणि सुलोचना यांना ठाऊक आहे.

जोड्या
कमल हसन + रीना रॉय + सारिका - प्रेम त्रिकोण. सारिकाला कमल आवडतो. कमलला रीना आवडते. रीनाला अजूनतरी या डाऊनमार्केट लोकांबद्दल काहीच वाटत नाही.
धरम + हेमा - ट्रिव्हिअल जोडी.
सुनील + ? - मुख्य हिरोंपैकी एक असल्याने यालाही एक हिरवीण आहे हे फिक्स.

ती कोण? एवढी सर्व कॉम्प्लिकेशन्स कशी निस्तरली जातात? आणि मदन पुरीचे नाव रणजीत का आहे या प्रश्नांची उत्तरे अल्पविरामानंतर

......................... मदन पुरीचे नाव रणजीत का आहे हा प्रश्न सोडून, त्याचे उत्तर कोणाकडेच नाही.

(अल्पविराम)

एडिट : करेक्शन -
याखेरीज प्राणला एक भाऊ - रझा मुराद >>> रझा मुराद राकुचा भाऊ आहे
धन्यवाद rmd

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

नवीन प्रतिसादांचे आभार Happy

एडिटर च्या तरी कसे लक्षात राहील? >> याच्या एडिटरविषयक माझ्या मनात सहानुभूतियुक्त आदर आहे. मध्ये मध्ये गचाळ संकलन आहे पण या रद्दीमधून बर्‍यापैकी सुसंगत प्रिंट तयार करणे येर्‍यागबाळ्याचे काम नोहे. तू नागीन मैं सपेरा किंवा बिजली और बादल सारखे सिनेमे पाहिल्याखेरीज राज तिलकचे एडिटिंग किती हाय क्वालिटी आहे हे लक्षात येऊ शकत नाही.

थोडक्यात पायस व्हिलन ग्रुपमधे आहे >> Happy या सिनेमापुरता! याच्या उलट उदाहरण सिंघासन किंवा डाकू हसीना मधले व्हिलन/विरोधक आहेत.

म्हणजे तुझा १० चा रेश्यो दिसतोय >> हो हो. दहा मिनिटापेक्षा जास्त मटेरिअल माझ्या कॅश मेमरीत बसत नाही.

गोबेल्स तंत्र >> जहर है के प्यार है तेरा चुम्मा >> Biggrin सगळाच प्रतिसाद भारी आहे पण हे ठेवणीतले पंच अगदी!

आशालताच कबिल्यातली नाही वाटते >> नाही ना ती कबिल्याची! माझ्या मते ही राज तिलकमधली सर्वात मोठी गडबड आहे. माझी पक्की समजूत आहे की ही गडबड क्लिअर करणारे अर्ध्या तासाचे मटेरिअल राज कोहलीने शूट केले असणार. पण शेवटी एडिटिंग टीम काकुळतीला येऊन म्हणाली असेल की 'तीन तासांच्या तिकिटाच्या पैशात साडे तीन तासांचा सिनेमा दाखवला तर आपलेच नुकसान आहे. किमान हे मिडल क्लास लॉजिक तरी अ‍ॅक्सेप्ट करून आमच्यावर दया करा.' आणि एकदाची त्यांची सुटका झाली असेल.

१२) क्लायमॅक्सची पूर्व तयारी

१२.१) भिल्ल नृत्य

देवतेस कौल लावायचा म्हणजे गाणे झाले पाहिजे. तसेही प्रत्येक हिरोईनच्या काँट्रॅक्टमधला 'एक गाणे आशाजींच्या आवाजात मिळेल' हा क्लॉज हेमा मालिनीच्या बाबतीत पूर्ण झालेला नाही. त्यामुळे अभी नही तो कभी नही. देवतेच्या मूर्तीचा शॉट. देवकुमारचा देव ठेंगु राक्षस वाटतो. देवकुमारप्रमाणेच मूर्तीचे पोट सुटलेले आहे. पाय धडाच्या मानाने खूपच छोटे दाखवले आहेत. काही भिल्ल (सर्व पुरुष) अ‍ॅब्डोमिनल रिजनमध्ये मूर्ती खाजवत आहेत. याचा अर्थ प्रेक्षकाने काय लावावा? अस्तु. देवतेसमोर एका कुंडीत निखारे भरून ठेवले आहेत. देवकुमार येऊन काहीतरी फेकतो आणि जाळ होतो. अशी फडतूस शायनिंग मारल्याबद्दल लाज वाटायची राहिली बाजूला, उलट तो खदाखदा हसतो. काही भिल्ल कन्यका एका ओळीत उड्या मारत येतात आणि गाणे सुरु होते.

सुरुवातीस बरेच हुला हुला रे होते. आणिकही काही अनाकलनीय शब्द मलिक वर्मा या गीतकाराने भरले आहेत. भिल्ल लेबलखाली या गाण्यात प्रचंड प्रमाणात नॉनसेन्सगिरी केली आहे त्यात वर्माजींनी आपला वाटा उचलला आहे. बहुधा तरी रेफरन्ससाठी टारझन कादंबर्‍यामधल्या ओपार नगरीच्या वर्णनांचा आधार घेतला आहे. धर्मेंद्राला घाबरवायचे म्हणून भिल्ल उगाच नाचता नाचता त्याच्यावर भाले उगारत राहतात. पाजी अतिशय संयमाने हा प्रकार सहन करत आहेत. यांच्या कौल लावण्याच्या प्रोसेस मध्ये आरोपीच्या वकिलाने भिल्लिणीचा वेष धारण करून कंबर हलवणे अपेक्षित आहे. त्यानुसार हेमा मालिनी भिल्लिण बनून येते. केसांचा अंबाडा बांधून त्यात मोरपिसे खोवलेली हीच तिची भिल्लिण असण्याची खूण, बाकी ड्रेस नॉर्मलच आहे. ही फारच श्रीमंत भिल्लिण आहे कारण हिच्या अंगावर बरेच सोन्याचे दागिने आहेत. एवढं सोनं तर अजित-सुलोचनानेही चढवले नाही. जोरावरचा अवतार बघता लग्नानंतरही लंकेची पार्वती राहण्याचेच चान्सेस अधिक! त्यामुळे खुशीत येऊन बाई नाचायला लागतात आणि आशा भोसले गाऊ लागतात. गाण्याचे बोल आहेत - देवता रे, देवता रे, आज मेरा प्यार तुझको पुकारे.

या गाण्यात डच अँगलचा विपुल प्रमाणात वापर आहे. यामागे काहीही कारण नाही, सिनेमॅटोग्राफर आपला कॅमेरा तिरका आहे हे विसरला असावा. गाण्यातला मुद्दा असा की हेमा म्हणते आहे - हे देवा.... जे काय तुझं नाव असेल...... तुझाच एक आसरा आहे. माझ्या प्रेमाला (पक्षी: पाजी) मरू देऊ नकोस. गाणे तसे ओके आहे. हेमा मालिनी चांगली नाचली आहे. तिच्या नृत्याला भिल्लनृत्य म्हणायचे का नाही हा वेगळा मुद्दा आहे. राजपूत कन्येस भरतनाट्यम् कसे येते हा अजूनच वेगळा मुद्दा आहे. पण जे काय आहे ते दिसायला बरे आहे. एक्स्ट्रा डान्सर उर्फ भिल्ल कन्यकांनीही फारसा वाह्यातपणा केलेला नाही. यातल्या भिल्लांच्या ढोलाचे डिझाईन काहीतरी चुकलेले आहे. दिसायला तो डमरू सारखा दिसतो आहे. एक शक्यता अशी की ज्वेल थिफ सारखा ट्रायबल ड्रम वापरायचा असावा. पण तसे असेल तर त्याचे एक पाने दुसर्‍यापेक्षा मोठे हवे नाहीतर नुसताच बद्द बद्द आवाज येईल. त्यामुळे या लोकांचे ढोल वाजलेच नाही पाहिजेत. तरीही बॅकग्राऊंडला कल्याणजी-आनंदजींनी चक्क ढोलक वाजवला आहे!!

१२.२) रिग्ड सेटअप

एनीवे, दुसर्‍या कडव्यात हेमा जीव देण्याची धमकी देते. याने देवता पार्शलिटी करेल असा संशय येऊन देव कुमार वमन केल्याच्या थाटात हुला हुला रे किंचाळतो. प्रत्यक्षात हे करायची काही आवश्यकता नाही. हा सर्व सेटअप रिग्ड आहे. देवकुमारच्या देवतेची मूर्ती क्लिअरली पोकळ आहे. तिच्या तोंडात निखारे भरले असणार. पायाशी ठेवलेल्या कुंडीतल्या निखार्‍यांच्या उष्णतेने हवा विरळ होऊन वरच्या दिशेने वाहू लागेल. तिच्यासोबत ठिणग्या वर गेल्या की निखारे पेट घेऊन मूर्तीच्या तोंडातून जाळ बाहेर पडेल. मग देवकुमार पाजींचा बळी द्यायला मोकळा. हेमाचा डान्स हा बोनस! तसेच काहीसे होते आणि मूर्तीच्या तोंडून जाळ निघतो. देवकुमार भाल्याने पाजींना मारणार असला तरी मध्ये निर्णय बदलून त्याने धनुर्धारी वापरायचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाण मारले जातात. पण अचानक सुनील दत्त तिकडे टपकतो. डफली सदृश काहीतरी फेकून तो पाजींचे प्राण वाचवतो.

देवकुमार म्हणतो हा कोण उपटसुंभ? पाजीसुद्धा 'हा कधीपासून माझी बाजू घेऊ लागला' असे संशयाने बघत आहेत. तो म्हणतो की पाजींसोबत सुनीललाही ठार करा. मग तिकडे रंजिता आणि आशालता येतात. या सिनेमात कोणालाही एक सहज सोपे वाक्य बोलता येत नाही. मुद्दा असा असतो की आशालता पळून गेल्यावर देवकुमारने तिच्या नवर्‍याला शोधून ठार केले. आता तसेच त्याने आपल्या भाचीच्या होणार्‍या नवर्‍यालाही (पक्षी: सुनील) मारू नये. दोन सहजसाध्या वाक्यांमध्ये सांगण्याची गोष्ट आशालता आणि रंजिता काहीतरी अगम्य हिंदीमध्ये सांगतात. जसे की ही तुझी भाची आहे = ये तुम्हारी उस बहन की बेटी हैं जिसकी जिंदगी को तुमने पहले वीरान और फिर शमशान बना दिया. याच्या कबिल्याशी प्राणचे भांडण झाले-नाही झाले, प्राणची त्या काळी काय रिअ‍ॅक्शन होती वगैरे मुद्दे आपण बाजूला ठेवू नाहीतर क्लायमॅक्स इतका जवळ आला आहे तो आणखीनच दूर जाईल.

१२.३) व्हिलनचा नाईलाज

लोक पाय पकडतात, आशालता जाऊन देवकुमारची लुंगी धरते. कबिल्यासमोर शेम शेम होऊ नये पण भावही कायम रहावा म्हणून देवकुमार मोठ्या ऐटीत म्हणतो की देवता के चरणों का खूनसे अभिषेक होगा मतलब जरूर होगा. नशीब हे ऐकताक्षणी बाण सोडण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे पुढचा सीन होतो - देवकुमार जातो, आणि स्वत:चे बोट कापून रक्ताभिषेक करतो. हा सुवर्णमध्य साधला गेल्याने हिरो लोकांचा जीव भांड्यात पडतो. पाजी म्हणतात की सुन्या तू माझा जीव का वाचवला रे? सुनील म्हणतो की अरे तुझा मोठा भाऊ मेला होता बघ. तो मेला नव्हता काय, तो मीच होतो. मीच तुझा मोठा भाऊ आहे. हे सर्व त्या काळात नॉर्मल असल्याने पाजी लगेच सुनीलला दादा म्हणून अ‍ॅक्सेप्ट करतात. हेमाही आपला इतक्या वर्षांचा मानलेला दादाच थोरला दीर निघाल्याने, आणि एकतरी दीर सेन्सिबल निघाल्याने, आनंदते. प्रेक्षकांना एज ऑफ द सीटवर ठेवायचे असल्याने देवकुमारचा एक भयाण क्लोजअप सीनची सांगता करतो.

राज किरण हुशार व्हिलन असल्याने तो जोवर काही चूक करत नाही तोवर हिरो लोक जिंकणे असंभव आहे. शेवटी दिग्दर्शकाला मध्यस्थी करावीच लागते. नाईलाजाने राज किरण एक सोडून दोन चुका करतो. प्राण पकडला गेल्यानंतर त्याने प्राणच्या तळावर नजर ठेवलेली दिसत नाही. त्यामुळे सुनील-धर्मेंद्र भेट आणि त्यांना देवकुमारची मिळालेली कुमक या धोकादायक बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्या ऐवजी त्याने ओमप्रकाशचा सामान्य कबिला आणि त्याहूनही अतिसामान्य अशी कमल-रीना जोडी या फडतूस टार्गेट्सच्या मागे राजन हक्सरला लावले आहे. रिसोर्स मॅनेजमेंट चुकल्याने मॅनेजमेंट एक्सपर्ट काला नाग साहेबांना पराभूत व्हावे लागले होते. तर राज किरण त्याला अपवाद कसा असेल? त्याची अपेक्षा आहे की ओमप्रकाशच्या लोकांनी कमलला त्याच्या हवाली करावे. ओमप्रकाशचे लोक राज किरणने सारिकासोबत केलेल्या उद्योगांमुळे (आणि इतर पडद्यामागच्या अत्याचारांमुळे) सहकार्य करण्यास तयार नाहीत. इथे राज तिलक पार पडेपर्यंत टॅक्टिकल माघार घेण्यातच भलाई आहे हे त्याला उमजत नाही. मग तो तिसरी चूक करतो.

१२.४) फार मोठ्ठा रहस्य उलगडा

राज किरण राजन हक्सरला आदेश देतो की जाऊन ओमप्रकाशचा कबिला जाळून टाक. अजित म्हणतो की हे बिल राजमातेच्या नावावर फाड, राज किरणचे नाव मध्ये येता कामा नये. दोघेही प्रथमच पूर्णपणे बेअक्कल वागलेले आहेत. हा कबिला जाळायचा म्हणजे शक्तीचा अपव्यय. राकु, सुनील, पाजी असे अधिक मातब्बर शत्रू खुलेआम फिरत असताना यःकश्चित कमल हासनवर आपले सैन्यबळ कोण वाया घालवतं? आणि ओमप्रकाशचे लोक आंधळेपणाने राजमाता जबाबदार कसे काय अ‍ॅक्सेप्ट करतील? राजमातेला जाब विचारायला राजवाड्यात घुसणार नाहीत? एनीवे, के सेरा सेरा. ओमप्रकाशचा तळ जाळून उद्ध्वस्त केला जातो. हे सर्व घडताना राकु आपल्या गुहेत रझा मुरादची सुश्रुषा करतो आहे. अर्थातच ओमप्रकाश खवळतो.

ओमप्रकाश म्हणतो की त्या येडपट राजमातेच्या हुकुमावरून आमची अख्खी वस्ती जाळली आणि तू काय टाईमपास करत बसला होतास? राकु म्हणतो की नाही रे, हा सर्व त्या राज किरण व अजितचा खेळ आहे. ओमप्रकाश म्हणतो त्याने काय फरक पडतो? नुकसान झालं हे सत्य तर बदलत नाही. हा गोंधळ कमी म्हणून रझा मुराद सरपटत सरपटत येतो. त्याने ओमप्रकाशचा आवाज ओळखला आहे. अल्लाहच्या कृपेने रझा मुराद अचानक बोलू लागतो. तो म्हणतो की युवराज (खरा) ओमप्रकाशकडे आहे. एवढे बोलून तो मरतो. यावेळेस हा नक्की मेला म्हणून योगिताचा किंचाळी शॉट. इतका वेळ दिग्दर्शक इंप्रोव्हाईज करत होता. आता राकु इंप्रोव्हाईज करतो. मुसलमान म्हणतात तो करीमा राकुने कुठेतरी ऐकला असावा. त्याचे राकु 'वाईम ना इल्ला हे, वाईम ना इले हे, राजे हूं' असे काहीतरी विचित्र व्हर्जन बरळून रझा मुरादचे डोळे मिटतो. (टिचकी मारून ऐका. राकु स्टँडर्डनेही फारच वरच्या दर्जाची डायलॉग डिलीव्हरी आहे).

१२.५) कथानक गुंडाळतानाची धावपळ

आता घटना वेगाने घडणार आहेत. ओमप्रकाश राकुला सांगतो की कमलच युवराज आहे. कबिल्यातील लुटीत प्राणने युवराजासाठी पाठवलेला हार सापडतो. त्यावरून अजित-मदन पुरी-राज किरणलाही कमल युवराज असल्याचे कळते. टॅक्टिकली अजूनही त्यांनी राकु व सुनीलवर फोकस केला पाहिजे. पण कमलचे महत्त्व वाढून ते सर्व शक्ती एकवटून कमलच्या मागे लागतात. राज किरण या हाराचा वापर करून राजमातेला ब्लॅकमेल करतो. म्हणतो की दोन दिवसांत माझा राज तिलक झाला पाहिजे नाहीतर कमल खलास!

तिकडे कबिल्यात अरमान कोहली तडफडतो आहे. याचे नाव बुलबुल असल्याचे सव्वा दोन तासांनी कळते. तसेच हा लहानपणापासूनच वाईट अ‍ॅक्टिंग करतो हेही कळते. तो कमलला सांगतो की तू रीनाला पळवून आणलं त्याचा बदला म्हणून राजमातेने वस्तीला आग लावली. एवढे बोलून तो मरतो. कमल तडक राजमातेची बेडरूम गाठतो. तिला दाखवण्यासाठी तो मुठीत वस्तीची राख घेऊन आला आहे. राजमातेने पण पटकन 'मी नाही, माझ्या नावाने राज किरण व अजितने उद्योग केलेत' सांगून कन्फ्युजन क्लिअर करावे, तर नाही. 'तुम्हारे मूंह से निकला जहर भी मीठा लग रहा हैं' वगैरे काहीतरी बडबड करते. कमल घुश्शात असल्याने त्याचा तिच्या 'तू माझा मुलगा आहेस' क्लेमवर विश्वास बसत नाही. बरीच बडबड होते ज्याचा सारांश - कमल म्हणतो मी तुला मारणार. राजमाता म्हणते ओके. मग तिकडे राकु अवतरतो.

राकु म्हणतो की बिल खूप वाढलंय, आता आवरतं घेऊयात. तू युवराज आहेस, ही तुझी आई आहे. हे खरे आहे कारण मी इतकी वर्षे वणवण भटकलो. त्यामुळे मीच शहाणा सगळे माझं ऐका. कमल थोडा विचार करतो. मग म्हणतो की ठीक आहे पण माझी खून की प्यास बुझलीच पाहिजे. मग त्याचा चाकू मारतानाचा शॉट.

ऑफ कोर्स राजमाता मेलेली नाही. यामागे राकुशिष्य कमलची हिरो लोकांना न शोभणारी काहीतरी चतुर योजना आहे. ती योजना आणि सिनेमाचा रोमहर्षक क्लायमॅक्स असा शेवटचा भाग लवकरच!

आशालता जाऊन देवकुमारची लुंगी धरते. >> अरे किती जोरात ह्सू आले...ते पण ऑफिसमधे! अक्षरशः स्टोल कोंबला तोंडात Lol

भारी झालाय हा भाग पण Happy

राकु म्हणतो की बिल खूप वाढलंय, आता आवरतं घेऊयात. तू युवराज आहेस, ही तुझी आई आहे. हे खरे आहे कारण मी इतकी वर्षे वणवण भटकलो. त्यामुळे मीच शहाणा सगळे माझं ऐका>> Rofl

wfh नाहि? >> नाही हो. अकाउंटसला कुठले वर्क फ्रॉम होम !!

एवढे बोलून तो मरतो. यावेळेस हा नक्की मेला म्हणून योगिताचा किंचाळी शॉट.
>>
राज्याभिशेकाच्यावेळी पुन्हा जिवंत होउन येत नाही ना!

>> 'वाईम ना इल्ला हे, वाईम ना इले हे

हे तर चक्क तमिळ वाटते आहे.

१००

अरे तो कमल हासन काय पकवतोय! अरे समजले तू जॅकी चॅनचा बाप आहेस. हा सरळ कोठे जातच नाही. कायम सर्कशीत ट्रॅपीझ करत असल्यासारखाच उड्या मारत फिरतो. परत प्रत्येक उडीला एक इफेक्ट करता ट्यूsssव करून मागे शिट्टी.

धरम व बॉब क्रिस्टो ची पुढे अनेक वर्षे सुरू असलेली पुरानी दुश्मनी इथून सुरू झालेली दिसते.

तो शाम सिंग म्हणजे आधी जितेंद्र करता लिहीलेला रोल असावा, कारण अशा चित्रपटात त्याचा विचार झाला नसणे अशक्य आहे. जीतू च्या तारखा मिळाल्या नसतील. त्यामुळे एक त्याच्यासारखाच दिसणारा घेतला व मधेच <स्पॉइलर> त्याचा रोल संपवला

भावाच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारी असताना केवळ धरम तलवारबाजी शिकताना दाखवता यावा म्हणून ती फाइट तेथे थांबवली आहे. ते सुद्धा राजकिरण त्याला सांगतो आधी तलवार शिकून ये आणि हा पण तेथून निघून जातो. तेथून जाउन धरम राकुकडे तलवारबाजी एक दोन दिवसांत शिकलेला दिसतोय. ते पूर्वी २४ तासांत इंग्लिश बोलायला शिकवणारे क्लासेस होते तसला प्रकार दिसतोय राकु चा तलवार क्लास म्हणजे. कारण राजवाड्यात राजकिरण परत गेल्यावर लगेच सुनील दत्तला धरम ला पकडायच्या कामगिरी वर पाठ्वले जाते, आणि तो व धरम समोरासमोर येतात तोपर्यंत धरम अट्टल तलवारबाज झालेला दिसतो.

इतकी भरताड झाली आहे की १०-१५ मिनीटांनंतर कोणी सीन मधे आले की "अरे हा/ही पण आहे नाही का यात" असे होते Happy मी मधली १५-२० मिनीटे सारिका चे कॅरेक्टर रंजिताचे समजून पाहिला पिक्चर.

हे तर चक्क तमिळ वाटते आहे >> राकु ज्या स्टाईलने बोलतो ते ऐकून मला तर परग्रहावरची भाषा वाटली होती.

तो शाम सिंग म्हणजे आधी जितेंद्र करता लिहीलेला रोल असावा, कारण अशा चित्रपटात त्याचा विचार झाला नसणे अशक्य आहे. >> फेफने दिलेल्या ट्रिव्हिआनुसार म्हणे आधी कमल हासनच्या जागी जितेंद्र असणार होता. शाम सिंगचा नट मात्र राज कोहलीचा खास नट आहे. त्याचा साधारण असाच रोल 'बदले की आग' या भरताड कोहलीपटात आहे.

Lol काय अभ्यास!
राजकुमार ते काहीतरी उर्दू प्रार्थना म्हटल्यासारखं म्हणतो ना? असा कसा होता हा.....? सदा तिरपी मान ठेवून आढ्यतेने बोलणारा, अहंमन्य..विचित्र हिरो होता..
तरी सिनेमे मिळायचे बुआ त्याला....
छानच विवेचन........
शेवटाची वाट पहात आहे..

जवळपास तीन तासांच्या खडतर प्रवासानंतर राज तिलकच्या क्लायमॅक्सपर्यंत आपण पोहोचलो आहोत. या स्केलचा भरताड प्रवास बहुधा फक्त राजपूत आणि बदले की आग या दोन चित्रपटांत बघायला मिळतो. कन्सेप्च्युअली तू नागीन मैं सपेरा आणि बिजली और बादल समजण्यास अधिक क्लिष्ट आहेत पण ते अतिशय स्मॉल स्केल आहेत व त्यांचा जॉनर पूर्णतया वेगळा आहे. पण आगामी आकर्षणांचा विचार नंतर करू, आधी राज तिलक संपवू.

१३) क्लायमॅक्स

१३.१) लाकडाची मोळी तोडण्याच्या फंदात पडू नये. मोळीतले एक एक लाकूड सेपरेटली तोडावे

राज किरणला एकजण येऊन सांगतो की राकु आणि कमल, दोघेही आत्ता राजमातेच्या खोलीत आहेत. ही संधी साधणे किती महत्त्वाचे आहे हे राज किरणला ठाऊक आहे. तो धावत धावत राजमातेचा शयनकक्ष गाठतो. तिथे तीन दासी मान खाली घालून उभ्या आहेत. बेडपाशीच एक शव पडलेले आहे. ते सोडून बेडच्या मागे कोणी आहे का, पडद्यामागे कोणी लपले आहे का हे चेक केले जाते. मग शव तपासणी होते. एक पांढर्‍या साडीतली बाई मरून पडली आहे. केवळ यावरून हे शव राजमातेचेच आहे हा निष्कर्ष काढला जातो. राज किरण - आय एक्सपेक्टेड बेटर फ्रॉम यू! दोन्ही साईडला दोन अशा चार दासी खोलीच्या दाराशी हव्यात. तिथे तीनच आहेत. ऑफ कोर्स त्यापैकी एकीला मारून तिला राजमाता म्हणून झोपवले आहे. शवाचा चेहरा विद्रुप करण्याची गरज कमलला का भासावी? ओळख पटू नये म्हणून. हीच ट्रिक कित्येक वर्षांपूर्वी अजित-मदन पुरीने वापरली होती. याला राज किरणसारखा व्हिलन कसा बळी पडू शकतो? तसेच, ट्रिकसाठी का होईना, निर्दोष दासीच्या मृत्युला राकुने हरकत घेतली नाही? आणि आपला मुलगा इतक्या निर्दयपणे आपल्याच एका निर्दोष दासीचा खून करतो आहे यावर राजमातेने काही आक्षेप का घेतला नसावा? हिरो लोकांच्या डोक्यातही थोडीबहुत अक्कल आहे हे दाखवण्याचे इतरही मार्ग असू शकतात. हा प्लॅन दाखवण्याची, तेही विद्रुप चेहर्‍याचे डिटेल चित्रीकरण, आवश्यकता नव्हती. एनीवे, हिरो लोकांनी मोरॅलिटीला बासनात गुंडाळले म्हणजे आता निकराची परिस्थिती आहे. जेव्हा असे घडते तेव्हा व्हिलनचा पराभव निश्चित होतो कारण हिरो लोक येनकेनप्रकारेण जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते द्योतक आहे. जोवर जिंकण्याची लालसा हिरोच्या मनात निर्माण होत नाही तोवर तो कधीच जिंकत नाही कारण व्हिलन बहुतांश वेळा हिरोपेक्षा हुशार असतो. किमान कमलच्या मनात ती लालसा दिसते आहे. त्यामुळे तो जिंकणार आहे.

आता राज किरण पॅनिक मोडमध्ये गेला आहे. तो चुकांवर चुका करतो आहे. राजमातेच्या खुनाचे खापर तो प्राणवर फोडतो. कशाला? हा खून कमलने केला आहे असे सांगून ओमप्रकाशच्या कबिल्यावर पुन्हा आक्रमण करता येणार नाही का? आतातर राकुही तिथेच आहे आणि कमल खरा युवराज आहे असे डबल इन्सेंटिव्ह आहे. सुनील-धर्मेंद्र जरी विरोधक असले तरी त्यांच्या कबिल्यास ते प्रथम प्राधान्य देतील. त्यांना अजून कमल युवराज आहे हे ठाऊक नाही. ते बघता प्राण ही बार्गेनिंग चिप वापरून त्यांच्याशी तह करता येऊ शकतो. मग आधी कमल-राकुस ठार करावे. मग प्राणची डेडबॉडी पाठवून सुनील-धर्मेंद्रला पॅनिक मोडमध्ये टाकावे आणि प्राणचा अंतिम संस्कार चालू असताना गुपचूप हल्ला करून त्या दोघांनाही ठार करावे. अजूनही सर्व सेना राज किरणच्या बाजूने आहे बघता हा प्लॅन यशस्वी होण्याचे चान्सेस खूप आहेत. पण (१२.३) मधील करारानुसार राज किरण आणखी एक चूक करून राजमातेच्या खुनाचे बिल प्राणच्या नावे फाडतो आणि सुनील-धरमलाही आपल्या अंगावर घेतो.

१३.२) मुहुर्त उजाडला

प्राणला फाशी द्यायचे ठरते. लगोलग सुनील व धरम पाजी सपोर्टर्स गोळा करू लागतात. सुनील प्राणच्या हाताखालच्या सैनिकांना आपल्या बाजूने लढण्यास तयार करतो तर पाजी देवकुमारच्या भिल्ल सेनेचे मन वळवतात. इथे देवकुमार प्राणचा मित्र असा उल्लेख करतो. मग याचा आशालताने प्राणच्या कबिल्यातील युवकासोबत पळून जाण्यास काय आक्षेप होता? देव जाणे! असो, इतका वेळ राज तिलक, राज तिलक म्हणून ज्याची हाईप केली होती त्या सोहळ्याचा दिवस एकदाचा उजाडतो. पुन्हा एकदा विजय मैदानात गर्दी जमते. राज किरणला स्वच्छ, धुतलेला, इस्त्री केलेला पांढराशुभ्र जोधपुरी सूट दिला आहे. अजित व मदन पुरी अजूनही त्याच जुन्या, काहीशा विटलेल्या जोधपुरी सुटांत आहेत. राज तिलकचे महत्त्व सांगणारा एक डेंजरस डायलॉग आता येतो - राज तिलक के बिना राज सिंहासन उस दुल्हन की तरह होता हैं, जो ब्याह की वेदी पर आ के बैठ तो गई हैं; मगर उस की मांग में अभी सिंदूर नही भरा गया हो.

इतका वेळ गायब असलेली प्रजा आता हजारोंच्या संख्येने उपस्थित आहे. मैदानाच्या मध्यभागी एका खांबास प्राणला बांधले आहे. किल्ल्याच्या तटावर सुनील व पाजी उपस्थित आहेत. प्रजाजन राज किरण एकदाचा राजा बनणार ऐकून टाळ्यांचा कडकडाट करतात. राज किरण म्हणतो की मी राज तिलक तर करणार पण तिलक चंदनाचा नाही तर प्राणच्या रक्ताचा असेल. इथे पुन्हा एक दिग्दर्शकीय टच - एका जाडगेल्या भटजी छाप व्यक्तीस चंदन उगाळत उभे केले आहे. चंदन उगाळणार्‍याला सज्जात का उभे करतील? त्याने उगाळलेले चंदन करंड्यात घेऊन एखादी दासी उभी नाही का राहणार? हे सर्व बघून सुनील व पाजी देखील आ वासतात. प्राण मात्र अविचल आहे. राज किरण म्हणतो की तो बघ भला मोठा क्रॉसबो! यातून बाण सुटेल आणि तुझ्या पोटात रुतेल! प्राण तरीही अविचल! तो म्हणतो की हे बघ, तसं तू काम चांगलं केलं आहे पण सिनेमात सर्वात चांगली अ‍ॅक्टिंग तरीही मीच केली आहे. ही फॅक्ट बदलू शकत नाही त्यामुळे काय वाट्टेल ते कर. राज किरण म्हणतो की मीही व्हिलन आहे. तुला असं सहजा सहजी नाही मारणार. आधी तुला एक वाह्यात डान्स दाखवेन मग तुला मारीन.

१३.३) गाण्यामार्फत नॉनसेन्सचा एक अखेरचा मोठ्ठा डोस

ब्रास बँड वाजू लागतो आणि चार घोडेस्वार येतात. ____ आले याचे हिंदी भाषांतर ____ आ गये होईल. गाण्याचे बोल आ गये आ गये असल्याने सुरुवातीपासूनच कोणीतरी आणणे आवश्यक होते म्हणून ते घोडेस्वार आणले आहेत. मग पांढरे घोडे बांधलेल्या रथातून हेमा येते. काळे घोडे बांधलेल्या रथातून रंजिता येते. पांढरे घोडे बांधलेल्या रथातून रीना येते. सोबत क्लिअरली बंजारा दिसणार्‍या बायका आहेत. हे बिनकंत्राटी आहेत असे दिसते कारण तेच गाण्यातून "एक नही दो नही, नही तीन चार. बिन बुलाए चले आए कई हजार" असे सांगतात. बॉलिवूड व्हिलन फार पूर्वीपासून कलेचे आश्रयदाते राहिले आहेत. त्यामुळे या प्रकारावर आक्षेप घेतला जात नाही. कमलही एका घोड्यावर बसून येतो. याने डोईस रुमाल बांधला आहे आणि नकली दाढी लावली आहे. त्यामुळे त्याला कोणी ओळखण्याचा प्रश्नच नाही. सुनील व पाजींना हा प्लॅन ठाऊक असलाच पाहिजे कारण रंजिता व हेमा गाण्यात दिसत आहेत. पण त्यांची कमलची भेट कधी झाली हे काही दाखवलेले नाही. रीना व हेमाला कोणी का ओळखत नाही हेही एक रहस्यच आहे.

गाण्यास आवाज दिले आहेत किशोर कुमार, अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक व साधना सरगम यांनी. या लोकांनी आपल्या परीने गाणे सुश्राव्य केले आहे. पण पडद्यावर इतका नॉनसेन्स चालू आहे की त्यांच्या आवाजाची मजा घेणे दुरापास्त आहे. ट्रॅक्टरच्या चाकाच्या मापाच्या डफल्या बडवल्या जात आहेत पण गाण्यात डफली वाजताना ऐकू तरी येत नाही. काहीजणांच्या हातात ढोलकसदृश काहीतरी वाद्य आहे. पण ते ढोलक वाजवत नाही. त्या ऐवजी ढोलक झेंडा असल्यासारखे ते नुसतेच हलवत आहेत. काहीजणांच्या खांद्यावर तरुणी उभ्या करून त्यांना उठाबशा काढायला लावल्या आहेत. एवढा स्टंट बॅकग्राऊंडला आऊट ऑफ फोकस ठेवला आहे. रीना व रंजिता कितीही सुंदर दिसल्या आणि त्यांनी कितीही कंबरा हलवल्या तरी असे स्टंट वाया घालवण्यामागे कसलेही लॉजिक असू शकत नाही.

कपडे बदलतात आणि ढोलक वाले ढोलक वाजवण्याचा अभिनय सुरु करतात. मध्येच प्राणचा 'मारायचं तर मारून टाका रे एकदाचं' शॉट! एकट्या हेमाला आपली ओळख लपवण्याचे भान असल्याने ती पदर ओढून नाचते. तिच्या सोफिस्टिकेटेड डान्स मूव्ह्जला विरुद्ध संगती म्हणून लगेच रीना ओळख लपवण्याचा यत्किंचितही प्रयत्न न करता बॉलिवूड डान्स करते. बॅकग्राऊंडला एरोबिक्स किंवा भांगडा स्टेप्स करणारे बंजारे आहेत. सोबत कोलांटी उड्या मारणारा कमल आहे. कमल व रंजिताची नृत्य शैली नक्की काय आहे हे त्यांचं त्यांनाही उमगलेले नसावे. हेही कमी म्हणून त्यापुढच्या कडव्यात सनई वाजू लागते. मग आपल्या मनोरंजनासाठी काही एक्सट्रा मेहनत घ्यायला सुरु करतात. उदा. रीनाचा कंबर हलवतानाचा साईडव्ह्यू शॉट. तिच्या पाठीमागे आणि आपल्या डाव्या बाजूस निळ्या ड्रेसमधल्या दहा डान्सर्स. कॅमेर्‍यात रीनाने बघणे अपेक्षित तर या डान्सर्सनी फ्रेमच्या उजवीकडे बघणे अपेक्षित. नऊजणी रिटेक्स झाल्याने दमलेल्या. फक्त एक हसर्‍या चेहर्‍याने रीनाच्या दसपट उत्साहाने कॅमेर्‍यात बघून नाचते आहे. मग दिग्दर्शक ओरडतो की तू सुद्धा उजवीकडेच बघायचे आहे. लगेच तिची मान खाली जाते.

गाण्याच्या बोलांकडे लक्ष देण्यात फारसा अर्थ नाही आणि फायदा तर मुळीच नाही. गायकवृंद कितीही मातब्बर असला तरी चाल फारशी लक्षवेधी नाही की बोल अर्थवाही नाहीत. सारांश असा की कडव्यागणिक हे लोक 'आम्ही राज किरणला थांबवायला आणि प्राणला वाचवायला आलो आहोत' हे स्पष्ट करत जातात. उदाहरणादाखल ही ओळ बघा - वो अजूबा कैसा होगा, लोग करेंगे तौबा तौबा, नकली का जब असली रुप दिखाएंगे, अरे पर्दा उठते झूठ का हम छा जाएंगे. हा असा प्रकार चालू असताना मध्ये मध्ये सुनील-पाजी प्रजेमध्ये हिंडतानाचे शॉट. तिकडे नाचणारे लोक झुक झुक गाडी स्टेप करत आहेत. आगीच्या रिंगणातून उड्याही मारल्या जातात. हेमा क्लासिकलच्या स्टेप्सही करून घेते. कितीही अविश्वसनीय वाटत असले तरी हे सर्व एकाच गाण्यात घडते. गाणे संपता संपता एकदाची हेमा अजितच्या दृष्टीस पडते आणि गाणे संपते.

१३.४) वार पलटवार

इतका वेळ न दिसलेल्या बॉब ख्रिस्टोस अजित खुणावतो. तो मैदानात उडी घेऊन पहिली कमलची दाढी खेचतो. क्रॉसबोवर डाकू लष्करसिंग आहे. राज किरण आदेश देताच तो बाण सोडतो. पण पाजी उडी घेऊन तो बाण हवेतल्या हवेत झेलण्याचा अतुलनीय पराक्रम गाजवतात. सुनील अजितला तलवारीच्या धारेवर धरतो. मदन पुरी पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करतो पण पाजींनी सावध करताच सुनील मदन पुरीला यमसदनी धाडतो. गोंधळ वाढण्याआधीच राज किरण लष्कर सिंगकरवी तीनही हिरोईन्सना बंदी बनवतो. हिरो लोक ते बघून हत्यार टाकतात. अजित व राज किरण घाईघाईने विधि उरकू बघतात पण अजितने सुरुवातीस नमूद केलेला सर्वात मोठा अडथळा अजून उगवलेला नाही. तो अडथळा अर्थातच आहे राकु!

सुनील-पाजी पायी आले. हिरोईन्स रथातून आल्या. कमल घोड्यावरून आला. राकु टांग्यातून येतो. त्याने टांग्यात घालून राजमातेला आणले आहे. गेल्या पंधरा मिनिटात राज किरणने केलेल्या सर्व चुकांचे माप एकत्र पदरात घातले जाते. राजमाता एखाद्या राजकीय नेत्याच्या थाटात सर्व प्रजेला सांगते की राज किरण अजितचा मुलगा आहे. गद्दार फक्त अजित आहे बाकी सगळे चांगले आहेत. एका सेकंदात प्रजेचे मतपरिवर्तन होते आणि हाय हाय सुरु होते. राज किरण राजमाता विशिष्ट चौथर्‍यावरील चबुतर्‍यावर उभी आहे हे बघतो. यांत्रिक अडसर दूर करताच चौथरा उघडतो आणि राजमाता त्या चबुतर्‍यावर अडकते. चौथर्‍याखाली खंदकात स्ट्रॉबेरी सिरप भरले आहे. बॉलिवूडमध्ये अशा सिरपमध्ये बुडबुडे आल्यास ते अ‍ॅसिड असते. राज किरण पुन्हा एकदा बेसावधपणे हाहाकारी हास्य करतो. पण सुनीलने अजून हार मानलेली नाही. तो उडी मारून लष्कर सिंगच्या कैदेतून हिरोईन्सना सोडवतो आणि अखेरची खडाजंगी सुरु होते.

१३.५) फायनल फाईट

कधी नव्हे ते कॉस्च्युम डिझाईनरमुळे केऑटिक फाईटमध्ये काय घडते आहे ते सहज सांगता येते. सुनील बॉब ख्रिस्टोला सहज लोळवतो. रीना काही सैनिकांना लोळवते. दोन बंजारे मिळून एका सैनिकाला हरवतात. कमल दोघा तिघांना भोसकतो. हे सर्व प्रत्येकाला दिलेल्या युनिक कॉस्ट्युम व दोन्ही साईडच्या लोकांची युनिक स्टाईल यामुळे शक्य होते. कॉस्ट्युम डिझाईनरला पैकीच्या पैकी गुण! पण या चिल्लर फाईट्स झाल्या. मुख्य लढतींकडे वळू.

राकु थेट अजितला गाठतो. अजित किमान फेन्सिंग करण्याचा अभिनय तरी करतो. राकुचे फेन्सिंग आळशीपणाचा कळस आहे. सुनील राज किरणशी लढतो आहे. तो त्याला मारणार एवढ्यात पाजी टपकतात. यांनी अजूनही शर्ट धुतला नसणार. त्यासाठी राज किरण त्यांच्या हस्ते मेला पाहिजे. भले तो त्यांचा होऊ घातलेला मेव्हणा (हेमाचा खरा भाऊ) का असेना? इकडे प्राणचेही हात शिवशिवत आहेत. तो स्वतःच स्वतःला सोडवून फायटिंग करू लागतो. कोणीतरी राजमातेलाही वाचवले पाहिजे. मग कमल रीनाच्या मदतीने एक दोरीचा पूल तयार करतो. त्यावर सर्कसमधला रोप वॉक अ‍ॅक्ट आणि सामान्य भाषेत डोंबार्‍याचा खेळ सुरु होतो. हे फारच सहज होते आहे असे वाटल्याने दिग्दर्शक फाईट लांबवायचे ठरवतो.

पाजी राज किरणला मारणार एवढ्यात हेमामधली बहीण जागी होते. ती मध्ये तडमडते. तिकडे लष्कर सिंग कमलचा डोंबार्‍याचा खेळ गाठतो आणि चाकूने दोरी कापू लागतो. पण प्रसंगावधान दाखवत सुनील दोरी खेचून धरतो. राकुचा सर्वोत्तम शिष्य असल्याचा पुरावा देत तो कमलची मदत तर करतोच पण प्राणला पाठीमागून मारण्यासाठी जात असलेल्या बॉब ख्रिस्टोचाही तलवार फेकून वध करतो. याची परतफेड म्हणून प्राण लष्कर सिंगला मारून सुनीलचे प्राण वाचवतो. कमल-राजमाता व सुनील-प्राण असे बिछडलेले पालक-पाल्य एकमेकांची गळाभेट घेतात.

मग पुन्हा बरीच फाईट होते. कॉस्ट्युम डिझाईनरच्या कृपेने एवढेच सांगू शकतो की कोणीही आपल्याच साईडच्या लोकांना मारत नाही आहे. लोक वाटेल तसे टेलिपोर्ट मात्र होत आहेत. जसे हेमा एका क्षणी राज किरण जवळ होती ती दुसर्‍याच क्षणी मैदानाच्या मध्यभागी जाते. पाजी-राज किरण कधी तळ मजल्यावर, कधी पहिल्या मजल्यावर, कधी दुसर्‍या मजल्यावर असे मन मानेल तिकडे लढतात. एनीवे, आता फक्त अजित व राज किरण राहिले. अजित राकुशी जिंकण्याची कल्पनाच हास्यास्पद आहे. जाता जाता शेवटचे अगम्य उर्दू बरळून राकु अजितला स्ट्रॉबेरी सिरप रुपी अ‍ॅसिडमध्ये ढकलून मारतो.

आता राहिला राज किरण. सॉरी आता अक्षरशः राहिला फक्त राज किरण. बाकी सगळे मेल्यामुळे समस्त हिरो लोक मैदानातून सज्जात चाललेली पाजी वि. राज किरण फाईट बघत आहेत. पाजींनाही रक्ताने भिजलेल्या, न धुतलेल्या शर्टाचा आता कंटाळा आला आहे. ते राज किरणला टॉवर वरून ढकलून देतात. त्याला कोणतीही संधी मिळू नये, आणि हेमा परत मध्ये तडमडू नये, म्हणून ते लगोलग उडी घेऊन तलवार त्याच्या आरपार करतात. हेमा तरी रडत रडत उगवतेच. राज किरण व्हिलन असला तरी हेमा-पाजी जोडीची भाऊ या नात्याने चिंता आहे. त्यामुळे तो उगाच 'मेरी मौत का जिम्मेदार जोरावर नही, मैं खुद हूं' अशी मखलाशी करून मरतो.

एवढे फुटेज खाल्ल्यानंतर संदेश देण्याइतपतही वेळ उरलेला नाही. त्यामुळे याच फ्रेमवर सिनेमा संपतो. असे गृहीत धरता येऊ शकते की कमल रीनाशी लग्न करून राजा बनतो. राकु व प्राणची जागा सुनील व धरम पाजी घेतात. त्यांचीही लग्ने रंजिता व हेमाशी होतात. राज किरणला मारून आपली प्रतिज्ञा पूर्ण केल्याने धरम पाजींनी एकदाचा तो कळकट, न धुतलेला, शाम सिंगच्या रक्ताने माखलेला शर्ट फेकून दिला असेल अशी आशा करूयात. राकुला योगिताकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा म्हणून त्याला सक्तीने निवृत्त केले जाते तर प्राण स्वेच्छानिवृत्ती घेतो. राज किरणच्या साईडचे सर्वच्या सर्वजण, म्हणजे या राज्याची सर्व सेना मारल्यानंतर या राज्यावर होणार्‍या अविरत आक्रमणांना हे लोक तोंड कसे देतील हा रंजक प्रश्न अनुत्तरित आहे. दिग्दर्शकाने कोणताच संदेश द्यायचे कष्ट घेतले नसल्याने या रसग्रहणातही कसलाच संदेश नाही. संदेश हवाच असेल तर - दहा बारा तासांचे मटेरिअल तीन तासांत कोंबू नये. प्रेक्षकाची अतुलनीय दमछाक होते.

(समाप्त)

संदेश हवाच असेल तर - दहा बारा तासांचे मटेरिअल तीन तासांत कोंबू नये. प्रेक्षकाची अतुलनीय दमछाक होते. >>> Lol

रिव्यू मधून संदेश ही कल्पना अफलातून आहे.

साधारण अर्ध्या चित्रपटापर्यंत सीन्स पाहिले तर प्राण चे कोणत्याही जागी कोणत्याही नाट्यमय प्रसंगात अचानक तेथे पोहोचायचे कसब वादातीत आहे. पायस - हे कसब बहुधा तेव्हाचे अनेक चित्रपट transcend करते हे आपण इतर चित्रपटांतून पाहिले आहे. पहिल्या सीन मधे घरातून राजवाड्यात यायला त्याला एक मोठा प्रवास करून यावे लागते असे दाखवले आहे. पुढे बहुधा काळ किंवा अंतर आकुंचन पावत असल्याने तो कोठेही अचानक प्रकट होतो.

तो पहिला सीनही विनोदी आहे. प्राण वगैरे आरामात निघालेले असतात राजवाड्याकडे. पण मधेच प्राणला आठवते की आपला तोहफा आधी पोहोचला पाहिजे. मग तो एका सरदाराला हवा की रफ्तार से पुढे जायला सांगतो. तर तो सरदार हा कारवाँ चाललेला असतो त्याच्या उलट दिशेने जोरात जातो. म्हणजे सीएसटीकडे जाणारी स्लो लोकल अप डायरेक्शन मधे आणि तिकडेच जाणारी फास्ट लोकल डाउन डायरेक्शन मधे!

>हणजे सीएसटीकडे जाणारी स्लो लोकल अप डायरेक्शन मधे आणि तिकडेच जाणारी फास्ट लोकल डाउन डायरेक्शन मधे!
आपण नाही का मुलुंड वरून एक स्टेशन मागे ठाण्याला जाऊन फास्ट लोकल पकडतो ?

तर प्राण चे कोणत्याही जागी कोणत्याही नाट्यमय प्रसंगात अचानक तेथे पोहोचायचे कसब वादातीत आहे.

जागिर चा रेवि वाचा

बॉलिवूड व्हिलन फार पूर्वीपासून कलेचे आश्रयदाते राहिले आहेत. त्यामुळे या प्रकारावर आक्षेप घेतला जात नाही.>>
Ashakya ahet sagalech punches. Lol

बॉलिवूड व्हिलन फार पूर्वीपासून कलेचे आश्रयदाते राहिले आहेत. त्यामुळे या प्रकारावर आक्षेप घेतला जात नाही. >>> Lol

बाय द वे, पायसच्या अशा रिव्यूज मधे अनेकदा इतर रिव्यूज चे "इनसाइड जोक" सारखे संदर्भ असतात. ज्यांना ते इतर रिव्यूज लक्षात आहेत त्यांना धमाल येते ते वाचताना. मला वाटते या वरच्या वाक्याचा संदर्भ श्रद्धाच्या कातिलो़ के कातिल वरच्या लेखाच्या शेवटी जो उल्लेख आहे त्याच्याशी असावा Happy

सर्व वाचकांना धन्यवाद! नवीन प्रतिक्रियांचे आभार! Happy

रिव्यू मधून संदेश ही कल्पना अफलातून आहे. >> Lol वेबसीरिजच्या जमान्यात केवळ चांगली कथा असून भागत नाही. काहीतरी संदेश द्यावाच लागतो. मग रिव्यूंनी तरी मागे का राहावे?

प्राणचे कसब >> +१ प्राण तळमळतो, प्राण एकवटतो, तसेच प्राण कोठेही प्रकटतो.

आपण नाही का मुलुंड वरून एक स्टेशन मागे ठाण्याला जाऊन फास्ट लोकल पकडतो ? >> विकु Lol

इनसाइड जोक >> सही पकडे हैं! हा श्रद्धाच्या लेखाचाच संदर्भ आहे. तो लेख (आणि कातिलों के कातिल) धमाल आहे.

राज किरण म्हणतो की मीही व्हिलन आहे. तुला असं सहजा सहजी नाही मारणार. आधी तुला एक वाह्यात डान्स दाखवेन मग तुला मारीन.
>> Happy

पायस... असे वाटत आहे की तुम्ही राजकुमार कोहोलींची बी टीम चे भाग आहात. त्यांचे हे असले चित्रपट लोकांनी पहावे म्हणून निगेटीव्ह पब्लिसिटी करून आम्हाला बघायला भाग पाडत आहात. हे म्हणजे गुंडा मुव्ही बघायला व पुरेपुर हसायला जसे लोकं जात होते तसा प्रकार झाला.

खूप मस्त आणि मजेदार लिखाण. तुमच्या ह्या लेखामुळे चित्रपट पाहवला गेला. शेवटचे गाणे कोठे पाहिले तुम्ही? युट्युबच्या कॉपी मध्ये नाही आहे.

त्या अरमान कोहलीच्या म्र्त्युच्या प्रसंगाने डोळ्यात खरोखर पाणी आले (हसून हसून). आधी मरायला टेकलेला दाखवला आहे. कमल हसनला बघितल्यावर एकदम जोश अंगात येऊन तुझ्यामुळे हे सर्व झाले असे सांगतो. हे सांगताना बसून हातवारे पण करतो. आणि अचानक बसलेल्या अवस्थेत मागे पडून मरतो. ज्या तडफेने तो बोलत असतो त्यावरून तो मरेल असे वाटत नाही. कदाचित ज्योत विझताना जशी मोठी होऊन विझते तसे काहीतरी दिग्दर्शकाला दाखवायचे आहे असे वाटले.

तसेच त्या भिल्ल टोळीने पकडल्यावर हेमामालिनीला त्यांच्या समोर नाचायची हौस का असते हे कळत नाही. शोले मध्ये निदान गब्बरने तिला नाचवायच्या आधी निगोशिएट तरी केले असते की "जब तक तेरे पैर चलेंगे तब तक इसकी जान रहेगी". इथे तो देवकुमार भिल्ल तसे काही निगोशिएट करताना दाखवलेला नाही. काही झाले तरी पाजींना तो मारणारच असतो मग हेमामालिनीला त्याचे काही न वाटता कशाला नाचून यांचे मनोरंजन करतेय हा प्रश्न पडला.

शेवटचे गाणे कोठे पाहिले तुम्ही? >> युट्युबवरच मिळेल तुम्हाला. 'आ गये आ गये राज तिलक' असा सर्च द्या. याच्या गाण्यांचे सर्वाधिकार शेमारूकडे आहेत असे दिसते. त्यांच्या चॅनेलवर आहेत राज तिलकच्या गाण्यांचे व्हिडिओ.

राज किरण म्हणतो की मीही व्हिलन आहे. तुला असं सहजा सहजी नाही मारणार. आधी तुला एक वाह्यात डान्स दाखवेन मग तुला मारीन.>>>>>
ओ किसिको मार ने से पेहले वाह्यात डान्स दिखाना जरुरी है क्या??? (हहपुवा)

Pages