अ ब्यूटीफुल डे इन द नेबरहूड- मुलाखतकाराची मुलाखत

Submitted by ए ए वाघमारे on 30 September, 2020 - 06:29

प्रसिद्ध अमेरिकी नियतकालिक ई-स्क्वायरच्या १९९८ सालच्या एका अंकात आलेल्या ‘Can You Say … Hero?’ या मुखपृष्ठकथेवर आधारलेला गेल्या वर्षी आलेला हा चित्रपट. सत्य घटनांवर आधारित. फ्रेड रॉजर्स या अमेरिकी टीव्ही सेलिब्रेटीभोवती केन्द्रित.

फ्रेड रॉजर्स हे एक अनोखं व्यक्तिमत्त्व अमेरिकी मनोरंजन क्षेत्रात होऊन गेलं. त्याचा लहान मुलांसाठीचा “Mr. Roger’s Neighbourhood” नावाचा कार्यक्रम जवळपास चाळीस वर्षं तिकडच्या बालचित्रवाणीवर चालला. हा एक विक्रमच आहे. कठपुतळ्यांचा खेळ, गाणी, गोष्टी आणि त्यातून आयुष्यातल्या छोट्यामोठ्या गोष्टींबद्दल लहानग्यांना तयार करणं, आजूबाजूच्या परिसरातील- रोजच्या जगण्यातील गोष्टींची तोंडओळख करून देणं असं या लोकप्रिय कार्यक्रमाचं स्वरूप होतं.

याच फ्रेड रॉजर्सची छोटेखानी मुलाखत घेण्याची जबाबदारी लॉईड वोगलवर येते. लॉइड वोगल हा खरं तर इ-स्व्कायरमध्ये काम करणारा एक शोधपत्रकार आहे. त्यामुळे तो हे ‘किरकोळ’ काम करण्यास साहजिकच अनुत्सुक असतो. अखेर मारून मुटकून तयार झालेला लॉईड ही मुलाखत कशी घेतो, मुलाखतीत कोण कोणाला कसले प्रश्न विचारतो याचीच ही गोष्ट. पण हा रूढार्थाने चरित्रपट नाही. फ्रेड रॉजर्सचा जीवनप्रवास वगैरे यात रंगवला नाही. कारण त्याची गरजही नाही. कारण भारतीय म्हणून आपल्याला जरी त्याच्याबद्दल फारशी माहिती नसली तरी चित्रपटाच्या सर्वसाधारण अमेरिकी प्रेक्षकाला ही वल्ली कोण आहे हे माहीत असतं, इतका त्याचा अमेरिकी जनमानसावर प्रभाव होता. हे दाखवण्यासाठी चित्रपटात काही प्रसंग खास टाकलेले आहेत. असो.

साध्या भाषेत सांगायचं तर ही फ्रेड रॉजर्स (टॉम हँक्स), लॉइड वोगल (मॅथ्यू ऱ्हाईस), त्याचा बाप जेरी वोगल (ख्रिस कूपर) आणि लॉईडचा तान्हा मुलगा गॅविन यांची कहाणी आहे. लॉईड आणि जेरी यांचे संबंध अतिशय ताणलेले आहेत, ज्याची कौटुंबिक कारणं भूतकाळात दडलेली आहेत. पण त्यामुळे लॉइडचा स्वभाव सतत किरकिरा झालेला आहे. तर दुसरीकडे फ्रेडला मुलाखतीदरम्यान या तणावाचा अंदाज येतो. आणि तो जसा इतर लहान मुलांशी वागतो तसाच एका वडीलकीच्या भावनेने त्याची मुलाखत घ्यायला आलेल्या लॉईडचे प्रश्न सोडवायचं बघतो असं सर्वसाधारण कथानक आहे. वाचकांचा रसभंग होऊ नये म्हणून मी येथे तपशीलवार कथानक सांगायचं टाळलं आहे.

अभिनयाच्या बाबतीत टॉम हँक्स या गृहस्थाबद्दल बोलावं तेव्हढं कमीच आहे. हँक्सच्या चेहऱ्यावर नेहमीच असणारा एक शांत भाव, फ्रेड रॉजर्सच्या एखाद्या धर्मोपदेशकासारख्या व्यक्तिमत्त्वाशी अतिशय मेळ साधणारा आहे. हे एक पर्फेक्ट कास्टिंग आहे. परंतु त्याहूनही अधिक गुंतागुंतीची व्यक्तिरेखा ही लॉइड वोगलची आहे. ती साकारण्यात मॅथ्यू ऱ्हाईसने केवळ मुद्राभिनयावर बाजी मारून नेली आहे. ख्रिस कूपर नेहमीप्रमाणेच उत्तम.

नातेसंबंध हा कथाकारांचा एक आवडीचा विषय कायमच राहिलेला आहे. आपण भारतीय आणि त्यातल्या त्यात मराठी प्रेक्षक तर सासू-सुनांच्या नात्यातील ताणेबाणे पाहून कंटाळलेले लोक आहोत. पुरुषांमधल्या नातेसंबंधांबद्दल आपले कथाकार, चित्रपटकर्ते फारसे बोलत नाहीत. अपवाद एखादाच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ किंवा ‘मुळशी पॅटर्न’. पण त्यातही नातेसंबंध हा प्रधान विषय नाही. पुरुषांनी हळवं असता कामा नये, त्यांनी चारचौघात रडू नये हे आमचे संस्कार. वाचायला थोडं क्लिशे वाटेल पण या पार्श्वभूमीवर एका महिला दिग्दर्शकानं पुरुषकेंद्री विषयावरचा असला संवेदनशील चित्रपट काढावा हे कौतुक करण्यासारखं आहे. समस्या, गुंतागुंत आणि उकल वा समाधान या तीनही पातळीवर या चित्रपटात पुरुष पात्रांचा मुख्य सहभाग आहे.

अभिनय तर या चित्रपटात महत्त्वाचा आहेच पण हा चित्रपट सर्वस्वी लेखक- दिग्दर्शकाचा आहे. दिग्दर्शिका मेरिली हेलर हिचा हा तिसरा चित्रपट. विषयात प्रवेश कसा करावा, फ्लॅशबॅक आणि चालू काळ यांची अप्रतिम सरमिसळ याचे उदाहरण म्हणूनही ही पटकथा अभ्यासण्यासारखी आहे. रॉजर्सच्या कार्यक्रमातील आभासी परिसराचा, कठपुतळ्यांचा अतिशय खुबीने वापर; गोष्ट पुढे नेण्यासाठी रॉजर्सच्या या आभासी जगातून वास्तव जगात आणि परत होणारा कथावस्तूचा सहज प्रवास यासाठी पटकथाकारांसोबतच दिग्दर्शिकेचंही तेवढंच श्रेय आहे. कारण हे सगळं नजरेला बांधून ठेवणारं राखण्यात तिने यश मिळवलं आहे. टीव्हीच्या ४:३ अस्पेक्ट रेशोमधून चित्रपटाच्या १६:९ रेशोमध्ये होणारी रुपांतरे यांच्या माध्यमातून प्रसंगांना सेपरेट करण्याची कलात्मक आयडिया वापरलेली आहे.

साधेच पण प्रभावी संवाद हे चित्रपटाचं आणखी एक बलस्थान. उदाहरणार्थ जेरी वोगल मृत्युशय्येवर असताना ‘वाट’ बघत बसलेल्या निराश परिजनांना रॉजर्स म्हणतो

To die is human, and anything human is mentionable. Anything mentionable is manageable.

फकाराचा वापर न करताही प्रेक्षकांना बांधून ठेवता येतं हे दुर्मिळ होत चाललेलं कसब अद्याप शिल्लक आहे हे लेखकांनी दाखवलं आहे. रॉजर्सची बालगीतंही चित्रपटाच्या बांधणीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. अमेरिकेतली कुटुंबव्यवस्था, विभक्त शहरी कुटुंबाच्या दैनंदिन समस्या असे इतर अनेक कंगोरे कथेला आहेत.

लॉइड आणि जेरी यांच्यातला तणाव वाढवत नेताना आणि त्यातले उतार चढाव दाखवताना त्यात आक्रस्ताळेपणा न येऊ देण्याची काळजी घेतल्यामुळे काहींना चित्रपट रटाळ व संथ वाटण्याची शक्यता आहे. पण तो एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असावा. रॉजर्सच्या व्यक्तिमत्त्वातील एकंदरीत असलेल्या संतत्वाच्या तत्वासोबत पटकथेचा वेग आणि चित्रपटाचा रिदम हे दोन्ही सुसंगत आहेत.

अमेरिका श्रेष्ठ आहे असं म्हणतात याचं एक कारण म्हणजे त्यांनी आपलं सांस्कृतिक संचित जपून ठेवलं आहे. फ्रेड रॉजर्स ज्या स्टुडिओत काम करत असे तो पिटर्सबर्गमधल्या स्टुडिओचं आता संग्रहालय करण्यात आलंय. ‘अ ब्युटीफूल डे’ सारखे चित्रपट काढून त्याची लेगसी जिवंत ठेवण्यात आली आहे. मग विचार येतो की फ्रेड रॉजर्ससारखं लहान मुलांसाठी खपलेलं साने गुरुजींसारखं नाव आपल्याकडेही आहे. त्यांच्यासाठी आपण काय केलं तर त्यांच्या गोष्टींना या किती टक्क्यांच्या गोष्टी असं ‘टक्केवारी’च्या हिशेबात मोजलं. तसं पाहिलं तर त्यांच्या नाटयपूर्ण जीवनावर असा उत्कृष्ट चित्रपट होऊ शकतो पण तो कधी होईल देव जाणे. इतर वेळेला आपले आयकॉन कसे दारुडे होते हे पूर्ण लांबीचे दोन दोन चित्रपट काढून दाखवण्यात आम्हाला रस. असो.

वास्तव आयुष्यातही माणसं सर्वसाधारणपणे चित्रपटातल्या पात्रांसारखीच वागत असतात. समजदार माणसंसुद्धा एखाद्या घटनेचा आयुष्यभर डूख धरून बसतात, एखाद्याबद्दल कधीतरी बनलेलं आपलं मत कुरवाळत बसतात. जखमेलाही स्वतःहून भरण्याची इच्छा असली तरी माणसं स्वतःच खपल्या काढून ‘बाऊ बाऊ‘ करत ओरडत बसतात. परंतु समजदार माणसं कधीतरी प्रसंगोपात ताबा सुटल्यासारखी वागली तरी कधी ना कधी आत्मचिंतन करू शकतात. चुका सुधारू शकतात. ही संधी त्यांना कायम उपलब्ध असते. फक्त त्यासाठी त्यांना योग दिशा दाखवणारा, नज करणारा एखादा फ्रेड रॉजर्स किंवा श्रीकृष्ण मिळतो का हे ज्याचं त्याचं नशीब!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान परिचय.
माझ्या विशलिस्टीत आहे हा सिनेमा.