अहिल्या द्रौपदीचे कूळ माझे

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 September, 2020 - 01:04

नको शोधूस मित्रा मूळ माझे
अहिल्या द्रौपदीचे कूळ माझे

कितीदा घेतली गाडी रुळावर
कितीदा बदलले मी रूळ माझे

नको साधूस ही जवळीक इतकी
तुला बोचायचे बाभूळ माझे

कशाला टांगतो आहेस उलटे ?
अश्याने व्हायचे वाघूळ माझे

नको मिसळूस तू डोळ्यांत डोळे
उगाचच व्हायचे व्याकूळ माझे

गळा मी घोटते आहे स्वतःचा
तुला समजायचे ना खूळ माझे

कशावरही नको फोडूस डोके
मला समजावते टेंगूळ माझे

किती शिजवाल खिचडी, बास आता
पुरवली डाळ मी, तांदूळ माझे !

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users