राज तिलक

Submitted by पायस on 14 September, 2020 - 02:20

कोहली कुलोत्पन्न दोघेच फेमस. एक विराट, दुसरा राजकुमार. राजकुमार उर्फ राज कोहली आज आपल्याला नागीन आणि दोन जानी दुश्मन्स मुळे माहित असला तरी त्याचे शिखर वर्ष १९८४ आहे. या वर्षी त्याने एक नव्हे तर दोन डोक्याला ताप चित्रपट बनवले. पहिला जीने नहीं दूंगा, ज्यात रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंगशी आपली ओळख करून दिली आहे. आणि दुसरा राज तिलक ज्यातून कमल हसनला सारिका आणि प्रेक्षकांना आ वासण्याची शक्ती मिळाली.

दोन्ही सिनेमे इंदर राज आनंद-राज कोहली याच लेखक-दिग्दर्शक द्वयीच्या देणग्या आहेत आणि साधारण सारखेच आहेत. जीने नहीं दूंगाचा प्लॉट तुलनेने सरधोपट असला तरी त्यातली अ‍ॅक्टिंग कहर आहे. तर राज तिलकमधली अ‍ॅक्टिंग तुलनेने बरी असली तरी त्याच्या प्लॉटमध्ये जगभरातली कॉम्प्लिकेशन्स आहेत. अखेर राज तिलकमध्ये जानी राजकुमार म्हणजे आपला राकु आहे म्हटल्यावर त्याच्या गुर्‍हाळातील रसग्रहणाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त होते. तरी यातून पिचून बाहेर पडलेल्या रसामृताला पचवण्याचा प्रयत्न करूयात.

१) हे तर अथांग असे गहिरे पाणी

१.१) बहुधर्मिय पुत्रकामेष्टी

सिनेमाच्या सुरुवातीला कुठल्यातरी देवीच्या मंदिरात पूजा होताना दिसते. तसेच एका दर्ग्याबाहेर वाळवंटात एकट्यानेच राकु दुआ मागताना दिसतो. दोन्ही विधिंचा हेतु एकच आहे - पूजा करत असलेल्या महाराजांना मुलगा व्हावा, म्हणजे राज्याला युवराज मिळावा. यातून राकु हा अव्वल दर्जाचा स्वामीभक्त आहे हे ठसवले आहे. सुरुवातीलाच भटजी पंचा आणि लाल रंगाचे धोतर, घोळक्यातील बायका चणिया चोळीत आणि स्वतः महाराज युरोपीय वेषात दाखवून आपण धरम वीर, अमर शक्ती, सिंघासन इ. सिनेमांच्या युगातील कथा बघत असल्याचे स्पष्ट होते. महाराजांची तलवार फॉईल (फेन्सिंगची तलवार) असल्यामुळे सिनेमातील हिरो लोक निपुण तलवारबाज असल्याचे स्पष्ट होते. हा महाराज मला काही ओळखू आलेला नाही. यात इतके लोक आहेत की सगळे बरोबर ओळखले आहेत असे छातीठोकपणे मीही सांगू शकत नाही.

असा बहुधर्मीय जुगाड लावल्यानंतर महाराजांना मुलगा झाला नाही तरच नवल! त्यानुसार नोकर शेर सिंग मंदिरात येऊन सांगतो की महाराणींना मुलगा झालेला आहे. या आनंदात महाराज त्याला मोत्यांचा हार काढून देतात (गळ्यातून, हवेतून नव्हे. महाराज महाराज आहेत जादूगर नाही). याने राजीव आनंद फार मोठ्ठा राजा असल्याचे कळते. तो महामंत्री भवानी सिंगसाठी निरोप देतो की गोरगरीबांसाठी खजिना खुला करावा. अशा उधळमांडक्या राजाचा महामंत्री सहसा प्रॅक्टिकल, हुशार, आणि महत्त्वाकांक्षी असतो. हिंदी सिनेमांमध्ये अशा गुणी व्यक्तीस व्हिलन असे म्हणतात.

१.२) व्हिलन आणि इतर पात्र परिचय

या सिनेमाचा व्हिलन आहे अजित. अजित म्हणजे महामंत्री भवानी सिंग अर्थातच राजसिंहासनावर बसण्याची अपेक्षा बाळगून आहे. त्याचा साथीदार आहे मदन पुरी. आश्चर्यजनकरित्या नाव रणजित असूनही ही भूमिका मदन पुरीला दिलेली आहे. हे दोघे बहुतांश सिनेमात जोधपुरी सूट घातलेले दाखवले आहेत. युवराजाचा जन्म अर्थातच यांच्यासाठी वाईट बातमी आहे. पण अजित हुशार व्हिलन आहे. त्याला याची पुरेपुर जाणीव आहे की आपल्या मार्गातला खरा अडथळा आहे समद खान (राकु). अजितच्या म्हणण्यानुसार राकु इतका वफादार आहे की त्याच्या धमन्यांतून रक्त नव्हे तर महाराजांचे मीठ वाहते आहे. मीठ ८०१ सेल्सियस तापमानाला वितळते. एवढा हॉट पुरुष हिंदी सिनेमात दुसरा कोणी नसावा.

तिकडे महाराज लगेचच राजकुमार मोठा झाला की त्याला विलायतेला शिकण्यासाठी पाठवण्याचा, भारतीय पालकांना साजेसा निर्णय घेतात. कचकड्याच्या बाहुलीचे ते बाळ तलवार का धनी आणि कला का प्रेमी असेल हा निर्णयही ते घेऊन टाकतात. आता आनंद साजरा करण्याची वेळ झालेली आहे. त्यानुसार अजित, मदन पुरी आणि रझा मुराद दरबारात हजर आहेत. इतरही किरकोळ सेवक-सेविका आहेत. बाळाच्या सुरक्षेची शून्य चिंता असल्याने महाराज त्याला खुशाल हातात घेऊन मिरवत आहेत. पण राकु कुठे दिसत नसल्याने महाराजांच्या जीवाला घोर लागतो. रझा मुराद जलाल खान नावाने सिनेमात राकुचा धाकटा भाऊ आहे. याने कधी नव्हे ती त्याला न साजेशी हिरो-साईडची भूमिका केली आहे. हे दर्शवण्याकरता याला एकट्याला स्वच्छ धुतलेला ड्रेस दिला आहे. तो म्हणतो की तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून राकु अजमेरला ख्वाजा गरीब नवाजच्या दर्ग्याला गेला आहे. आता युवराज झालेला असल्याने दर्ग्यात बसण्याचे कारण संपले आहे. मग राकु हा क्यू घेऊन दरबारात प्रकटतो.

राकु या राज्याचा सेनापती देखील आहे. तसेच राज्यातला सर्वश्रेष्ठ तलवारबाजही आहे. हे बघता राकुला युवराजाचा गुरु म्हणून नेमणे स्वाभाविक आहे. पण मग दोन प्रश्न उद्भवतात - १) मग युवराजाला विलायतेला जाण्याची काय आवश्यकता आहे?, २) युवराजाला आत्ताच्या आत्ता, ताबडतोब राकुच्या हातात देण्याची गरज आहे का? ते आत्ता ज्या खोलीत आहेत तिथे स्नायपिंग करणारे धनुर्धारी लपवणे अतिशय ट्रिव्हिअल काम आहे. एक बाण आणि एवढ्या मेहनतीने झालेला युवराज खलास! पण सिनेमा अजून सुरु पण झाला नसल्याने तसे होत नाही. मग राकु पीळ उर्दू भाषण मारतो ज्याचे सार 'ओके' असे आहे. इथे बॅकग्राऊंडला अजित आणि मदन पुरी "हे दळण अजून किती वेळ चालणार आहे" चेहर्‍याने एकमेकांकडे बघताना दिसू शकतात. या सीनमध्ये राकुचा वेष गदळ आहे. त्याची मिशी उजव्या बाजूने निघून आली आहे. तिरंगात जो मिशीसोबत खेळ खेळला आहे त्याची सुरुवात इथे दिसते. त्याच्या दाढीचा रंग मिशीशी मॅच होत नाही. दाढी जॉ-लाईन रेफरन्सने चिकटवायची ती अट्टाहासाने जबड्याखाली चिकटवली आहे. दर्ग्याची चादर उपरण्यासारखी घेतली आहे. कंबरेला फॉईल (तलवार) तशीच बिन म्यानेची लटकत आहे. ही त्याच्या साईझची सुद्धा नाही. कारण ती त्याच्या बुटापर्यंत येते आहे. तो ज्या प्रकारे चालत येतो ते बघता समद खानचा डावा पाय कायमचा जायबंदी झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे त्याच्या डाव्या हाताला ती रँडम पुरचुंडी कसली आहे? तिचे त्या सीनमध्ये काय काम आहे?

महाराज आपल्या बिनडोकपणाचा आणखी एक पुरावा म्हणून अजितला आदेश देतात की या महिन्यात राज्यात जेवढी म्हणून मुले जन्माला आली आहेत त्या सर्वांना इथे बोलावून घ्या. त्यांचे नामकरण आम्ही करू. तीन मिनिटांच्या आत व्हिलन जिंकावा म्हणून मी यापूर्वी कधी प्रार्थना केल्याचे स्मरत नाही. मग महाराणी आणि सोबत सुलोचना येते. महाराणीची इच्छा असते की हा निर्णय सर्वात आधी तिच्या मानलेल्या भावाला, अर्जुन सिंगला कळावा. कट टू अर्जुन सिंग. अर्जुन सिंगची भूमिका प्राणने केली आहे. अप्रतिम टायमिंग असल्याने प्राणलाही याच महिन्यात मुलगा झाला आहे. बायको दुर्गाच्या भूमिकेत उर्मिला भट (महानमधल्या नाटकात काम करणार्‍या अमिताभचा सांभाळ करणारी आई) आहे. हिला आपल्याला मुलगा झाला यापेक्षा महाराणीला युवराज झाला याचाच आनंद जास्त आहे. राकुला रझा मुराद दिला तसा प्राणच्या हाताखाली पण कोणीतरी पाहिजे. मग त्याला संग्राम सिंग म्हणून कोणी दिला आहे. परंपरेनुसार प्राणने युवराजासाठी काहीतरी भेट पाठवणे अपेक्षित असते. मग तो संग्राम सिंग हस्ते एक हार पुढे पाठवून देतो. संग्राम सिंग वायुवेगाने राजवाडा गाठतो, हार राकुच्या मांडीतल्या राजकुमाराच्या गळ्यात घालतो आणि प्राणच्या मुलासाठी रिटर्न गिफ्ट घेऊन प्राणकडे परतायला बघतो. आणि नेमकी इथेच माशी शिंकते.

१.३) कधीकधी नशीब व्हिलनच्या बाजूने असते

अजित ठरवतो की ही संधी चांगली आहे, आज उठाव करूया. त्याच्या बाजूला मदन पुरी, जगदीश राज (हिंदी सिनेमांचा घाऊक पोलिस इन्स्पेक्टर) आणि जगदीश राजच्या गँगमधली माणसे आहेत. तो संग्राम सिंगला चाकू फेकून मारतो आणि लढाईला तोंड फुटते. शूटिंगच्या वेळी महाराजांच्या साईडच्या एक्स्ट्रांची संख्या मोजण्यात काहीतरी गडबड झाली असावी. कारण बहुतांश जणांना लाल रंगांचा युनिफॉर्म आहे पण काही तुरळक जणांना निळ्या रंगाचा युनिफॉर्म दिला आहे. अजितला आपले संख्याबळ मर्यादित असल्याची जाणीव आहे. त्यामुळे तो नगारा वाजवून सावध करणार्‍या सैनिकाला बाण मारून ठार करतो. व्हिलनचा नेम चक्क सलग दोनदा बरोबर लागला आहे - एक्स्ट्रीम रॅरिटी! बहुतांश सैनिक अजूनही बेसावध असले तरी राकु आणि रझा मुरादला घोटाळा असल्याची जाणीव होते आणि तेही लढाईत उतरतात.

रझा मुराद माणिक इराणीला खणाखणीत गुंतवतो. बाकी लोक फालतु असल्याने राकुला त्यांच्याकडे लक्ष द्यायचे काहीच कारण नाही. तो समयसूचकता दाखवून नगारा वाजवून धोक्याची सूचना देऊ लागतो. अजित बाण चालवून राकुलाही ठार करण्याचा प्रयत्न करतो. पण राकु या सिनेमात ब्रिगेडिअर सूर्यदेवसिंगच्या रोलसाठी प्रॅक्टिस करत असल्याने त्याचे रिफ्लेक्सेस दैवी आहेत. तो गुणगुणारा डास झटकावा तसा अजितचा बाण एका हाताने झटकून टाकतो. तसे बघावे तर अजितने हाराकिरी केली आहे. महाराज शांतपणे झोपून राहिला तरी राकु आणि रझा मुराद सहज या लोकांना हाताळताना दिसत आहेत. प्राण कधीही येऊ शकतो त्यामुळे अजितची साईड अगदीच कमकुवत आहे. पण अजितने आपला महाराज काय दर्जाचा बुद्धू आहे हे अचूक ताडले आहे. त्यानुसार महाराज तलवार घेऊन मैदानात उतरतो.

फॉईलचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर करून खणाखणी चालू असताना संग्राम सिंग प्राणच्या डेर्‍यात जाऊन उठावाचा संदेश प्राणला देतो आणि मरतो. प्राण लगेच राजवाड्याकडे धाव घेतो. तिकडे राकुचा नगारा वाजवून झालेला असल्याने तो रझा मुरादच्या मदतीला जातो. राकुच्या हस्ते माणिक इराणीचा बॉलिवूड रेकॉर्ड टाईममध्ये मृत्यु होतो (सहा मिनिटांत). हे सर्व एवढ्या वेगाने घडत असले आणि मागे दाणदाण मुझिक लावले असले तरी लढाईची कोरिओग्राफी अति विलंबित लयीत आहे. हे म्हणजे बडा ख्यालाला साथ म्हणून एखादे परण वाजवण्यासारखे आहे. राकु मग रझा मुरादला जाऊन सांगतो की बाकी सगळे मेले तरी चालतील, युवराज वाचला पाहिजे. तू त्याला घेऊन नजमा (पक्षी समद खानची बायको) कडे जा. रजा मुराद म्हणतो ओके. इथून खरा घोळ सुरू होतो. प्रत्यक्षात हे लोक ऑलमोस्ट जिंकत आले आहेत. पुढच्याच शॉटमध्ये प्राण आपल्या सैनिकांसोबत पोहोचतो आणि अजितचा प्लॅन पूर्णपणे फसतो. त्यामुळे रझा मुरादला काहीही करायची गरज नाही आहे. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.

१.४) अ‍ॅडॅप्टेबल व्हिलन

तरी अजितचा प्लॅन फसत असताना तिकडे रझा मुराद महाराणीला गाठतो. तो म्हणतो युवराज माझ्या हवाली कर. त्याच्या दरडावणीच्या सुरामुळे महाराणी अर्थातच साशंक होते. शांत शब्दांत तिला समजावून तिच्यासकट युवराजाला बाहेर काढणे हे दोन मिनिटांचे काम आहे. पण रझा मुरादला हिरो साईडचा अनुभव नसल्याने तो जबरदस्तीने युवराज हिसकावून घेतो. डोन्ट वरी, महाराणीही कमी बिनडोक नाही. रझा मुराद युवराजाला घेऊन पळ काढतो तर त्याच्या मागे चार बंडखोर येतात. ते रझा मुरादला महाराणीसमोर बाणाने मारतात. तरीही महाराणी रझा मुरादच गद्दार असल्याचा निष्कर्ष काढते. तसेच रझा मुरादला जे बाण लागतात ते वर्महोलचा प्रवास करून येतात. अन्यथा त्या अँगलने त्याला बाण लागणे अशक्य आहे. एनीवे, तिकडे अजित निरुपाय म्हणून खांबामागे लपून महाराजांच्या मर्मावर बाण मारतो. याच्या निम्मी जरी अ‍ॅक्युरसी इतर व्हिलन्सने दाखवली असती तर बॉलिवूडच्या हिरोंचे अवघड होते. जगदीश राज काम संपवावे म्हणून चाकू भोसकायला जातो आणि प्राण त्याला आपल्या ताब्यात घेतो. राकु व प्राण त्याच्याकडून या षडयंत्रामागे कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आपले बिंग फुटते आहे बघून अजित धावत पळत येतो आणि तलवार भोसकून जगदीश राजला ठार करतो. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही

अर्थातच राकु चिडतो (आणि त्याला संशयही येतो). अजित यावर "राजपूत जब अपने आका का खून देखता हैं तो तुम्हारे तरह सवाल नही करता. बल्कि खून का बदला खून से लेता हैं" असा बचाव पुढे करतो. प्राण राजपूत असल्याने हा बचाव त्याला पटतो. राकु हुशार असल्याने त्याला हा बचाव पटत नाही. राकु राजपूत नसल्याने त्याला प्राण भाव देणार नाही हे स्पष्ट असले तरी तो बापडा प्रयत्न करतो. हे सर्व संवाद अतिशय काव्यात्मक आहेत. उदा.
"अभी अभी यहां एक लाश गिरी हैं जिसे तुम्हारी आंखे नही देख सकती अर्जुन सिंग."
"लाश? किसकी?"
"असलियत की!"
प्राण महाराजांच्या तब्येतीची चौकशी करायला निघून जातो तर राकु नजमाला गाठतो. नजमाची भूमिका केली आहे योगिता बालीने. नजमा त्याला सांगते की रझा मुराद काही इकडे आलेला नाही. मग हा मनुष्य गेला तरी कुठे च्यामायला? हा शॉक कमी म्हणून की काय, तिकडे महाराज मरायला टेकतात. पटकन गचकून राजवैद्याला मोकळे करावे तर त्यांना युवराजाचे मुखदर्शन घेण्याची इच्छा होते. आता युवराज कुठून आणायचा? अशावेळी अजित आणि मदन पुरी कमालीची अ‍ॅडॅप्टेबिलिटी दाखवत फसलेला प्लॅन मार्गावर आणतात. मदन पुरी कुठून तरी एका बाळाचे शव पैदा करून हाच युवराज असल्याचे महाराणीला सांगतो. अजून एक छिन्नविछिन्न शव रझा मुरादचे म्हणून खपवले जाते. आता महाराजाचा आत्मा शांत कसा करावा? यावर महाराणी इतका वेळ झाले ते काहीच नाही असा कहर उपाय काढते. प्राणने आपला मुलगा महाराणीला युवराज म्हणून द्यावा जेणेकरून महाराजांना हा धक्का सहन करावा लागणार नाही. प्राणही परस्पर होकार देऊन आपला मुलगा आणायला जातो. त्याची बायको त्याला विचारते की किमान मला हे तरी सांग की आपला मुलगा कोणाच्या घरात देत आहेस. प्राण म्हणतो मी हे सांगू शकत नाही. कोणी विचारले तर सांग की आपला मुलगा मेला. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.

१.५) अबूबाबाच्या वरचढ कॅच आणि वफादार नोकराच्या वरचढ वफादार मालक

अजित तयारीतच असतो. तो म्हणतो की वहिनी बेशुद्ध झाल्यात तू त्यांना सांभाळ, मी तुझा मुलगा महाराणींना देऊन येतो. प्राणच्या तंबूतून तो जातो थेट मदन पुरीकडे. मदन पुरी अजितचा मुलगा घेऊन तयार आहे. आपण नाही तर युवराज रुपाने आपला मुलगा सिंहासनावर बसवण्याची बार्गेन त्याने मान्य केली आहे. आता प्राणच्या मुलाचे काय करावे? अजित म्हणतो की माझ्या मुलाला नजर लागू नये म्हणून याचा बळी देऊ. मग मदन पुरी प्राणच्या मुलाला, अजितच्या मुलावरून ओवाळून फेकून देतो. मिसटाईम्ड शॉटला बाऊंड्रीवरचा फिल्डर जसा धावत पुढे येऊन कॅच करतो तशी सुलोचना विंगेतून अचानक येऊन प्राणच्या मुलाचा कॅच घेते. अबूबाबाचा कॅच यापुढे काहीच नाही कारण संजीव कुमारला बसल्या जागी कॅच आहे, सुलोचनाला आपले बूड हलवून योग्य जागी पोहोचण्याचे अ‍ॅडिशनल चॅलेंज आहे. सुलोचना अजितची बायको असल्याचे कळते. ती म्हणते की आपला मुलगा मी युवराज म्हणून दिला, त्या बदल्यात प्राणचा मुलगा मला द्या. अजित तिची विनंती मान्य करतो.
आता एकच काम उरले आहे, राकुचा बंदोबस्त! मदन पुरी त्याला अटक करायला जातो. राकुसारखा अजिबात न दिसणारा स्टंट डबल मदन पुरीच्या काही सैनिकांना मारतो पण लवकरच राकुला अटक करण्यात मदनला यश येते. तिकडे आपला मुलगा युवराज म्हणून महाराजांना खपवण्यात अजितला यश आले आहे. महाराजही "मी युवराज पाहिला, आता मी काही मरत नाही" मोडमध्ये. थोडक्यात हा जगेल अशी चिन्हे आहेत. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.

राकुला गद्दार म्हणून महाराजांसमोर आणले जाते. राकु गद्दारी करेल ही कल्पनाच असह्य असल्याने महाराज ऑक्सिजनवर जातात. त्यात महाराणी महाराजासमोरच याची उलटतपासणी सुरु करते. खुशाल जाऊन ती महाराजांना म्हणते की राकुच आपल्या मुलाच्या मृत्युस जबाबदार आहे. आत्ता थोड्याच वेळापूर्वी त्याला अजितचा मुलगा युवराज म्हणून खपवला असल्याचे ती विसरते. पण महाराज हे विसरलेले नाहीत. त्यांना तिथल्या तिथे हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि ते जागीच गतप्राण होतात. राकुला गद्दारीचा आरोप आणि फाशीची शिक्षा मान्य होण्याचा प्रश्नच नाही. मग तो काहीतरी बरळून आपल्या बेड्या सहजगत्या तोडतो आणि पसार होतो.

एवढा अगडबंब सेटअप ज्याच्यामुळे झाला तो रझा मुराद कुणा खानाबदोश म्हणजे बंजारा टोळीला सापडतो. या बंजारा टोळीचा प्रमुख आहे ओमप्रकाश. रझा मुराद युवराजाला ओमप्रकाशच्या हवाली करून मरतो. इथून पुढे दोन मिनिटे आपल्याला अतिशय गचाळ एडिटिंग बघायला मिळते. राकु निर्धार करतो की जोवर तो आपल्या माथी लागलेला कलंक दूर करत नाही तोवर तो राज्यात परतणार नाही. या निर्धाराचे डायलॉग तो कुठल्याशा चितेसमोर उभे राहून बडबडतो आहे. ही कोणाची चिता? महाराज किंवा रझा मुरादची तर असू शकत नाही. बहुधा राकु म्हणतो त्या असलियतची चिता असावी. मग राकु व योगिता बाली नेसत्या वस्त्रांनिशी घर सोडतात. अजमेरच्या दर्ग्यात हजेरी लावून ते थेट वाळवंट गाठतात. त्यांच्या हालअपेष्टांचे प्रतीक म्हणून वाळवंटात योगिताचे पाय काटे आणि फोडांनी भरलेले, रक्ताळलेले दाखवले आहेत. राकु दु:खी होतो पण यात त्या दोघांचीच चूक आहे. अनवाणी वाळवंटातून चालायला कोणी सांगितलं होतं? वाळवंटात कुठे तडमडतात कोणास ठाऊक पण त्यांना एक गुहा सापडते जिथे राकु आपले बस्तान बसवतो. गुहा राज्याच्या सीमेवर कुठेशी असावी.

टाईम स्किप!

२) पोस्ट टाईम स्किप

२.१) बावीस मिनिटे गाण्याची वाट पाहायला लावणारा दिग्दर्शक

मध्ये बरीच वर्षे निघून जातात. राकु आणि योगिताचे केस थोडेसे पांढरे झाले आहेत. बाकी दोघेही टकाटक दिसत आहेत. राकुने तलवार शिकवण्याचे क्लासेस उघडले आहेत. युवराज न सापडल्याने अजूनही राकुवर गद्दारीच ठपका आहे. हे दु:ख सोडले तर बाकी त्यांच्या अ‍ॅरेंजमेंटमध्ये नाव ठेवायला जागा नाही. .
तिकडे राजवाड्यात चक्क बिबळ्या घुसला आहे. या बिबळ्याला पकडून एक नरपुंगव त्याच्यासोबत मस्ती करतो आहे. हा नरपुंगव म्हणजे तोतया युवराज अर्थात अजितचा मुलगा. बिनडोक महाराणी अर्थात राजमातेने याचे नाव समशेर सिंग ठेवले आहे. ही भूमिका केली राज किरणने. पोस्ट टाईम स्किप प्राणने राकुची जागा घेतल्याचे स्पष्ट होते. अजित आणि मदन पुरी अजूनही जोधपुरी सुटातच आहेत. राज किरण आपल्या आईसोबत आदराने वागतो पण नोकरवर्गाच्या पाया पडायला त्याची ना आहे. राजमाता आणि प्राणच्या मते तो प्राणचा मुलगा असल्याने तो थोडे व्यथित होतात पण प्राणला आपल्या (?) मुलामध्ये राजपूतांचे गुण आले आहेत असे वाटून तो खुश होतो. प्रत्यक्षात खुश फक्त अजित आहे कारण राजघराण्याला साजेशी गुर्मी त्याच्या रक्ताने दाखवायला सुरु केली आहे. राज किरण आता राज्याभिषेक करण्या इतपत मोठा झालेला असल्याने त्याचे लग्न राजमातेने राजगढच्या राजकुमारी मधुमतीशी ठरवले आहे.

मधुमती दाखवली आहे रीना रॉय. राज किरणला भेटायला म्हणून ती आपला लवाजमा सोबत घेऊन निघाली आहे. ऑफ कोर्स रीना रॉय राज किरणची हिरोईन असणे शक्य नाही. मग हिचा हिरो कोण? लगेच ओ ओ ओ सुरु होते. रीनाची मैत्रीण सांगते की इथून जवळच एक बंजार्‍याचा डेरा आहे. मधुमती गाणे ऐकू आले की जाऊन नाचलेच पाहिजे या तत्वाचे पालन करत असल्याने ती तडक बंजारा वस्ती गाठते. अखेर सिनेमात पहिले गाणे सुरु होते.

२.२) डेंजरस इश्क

संगीत दिले आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आवाज आहे सुरेश वाडकर आणि आशा भोसलेंचा. गाणे आहे अजूबा अजूबा अजूबा, हुस्न तेरा हैं एक अजूबा. सुरुवातीला याहियातूबा असे म्हणत कमल हसन आणि सारिका नाचताना दिसतात. कमल हसनच खरा युवराज आहे हे कोणीही सांगू शकतं. नृत्यकुशल अभिनेता असल्याने खेमट्याच्या बीट्सना मॅच होणार्‍या स्टेप्स देता आल्या आहेत. खंजिरी वाजवण्यासाठी हाथाने थाप द्यावी लागते हा गैरसमज दूर करण्यात आला आहे. मुळात खंजिरी दोन्ही हातांनी धरून हिरविणीच्या पार्श्वभागावर आघात करून वाजवायचे वाद्य आहे. कमलभाऊंनी हे अतिशय मन लावून दाखवले आहे. रीना रॉयच्या अंगावरचे मोत्यांचे दागिने बघून ओमप्रकाश ही कोणी राजकन्या असल्याचे ओळखतो. पण कपड्यांची गुलाबीची भयाण शेड बघून कमल हसन ही इथे नाचायलाच आली आहे हे ताडतो. लगेच तिला जरा बरे कपडे घालायला दिले जातात आणि कमल सारिकाला सोडून तिला पकडतो. शूटिंग आऊटडोअर असल्याचा पुरावाही इथे बघता येतो. नाचताना या लोकांनी प्रचंड धुरळा उडवला आहे.

अचानक घाणेरडा जंप कट बसतो आणि कमल हसनला रीना रॉय स्वप्नात दिसत असल्याचे स्पष्ट होते. प्रत्यक्षात तो सारिका सोबतच नाचत आहे. मग उर्वरित वेळ कोलांट्या उड्या आणि इतर कसरत नृत्ये होतात. ओव्हरऑल गाणे बरे आहे आणि डान्सही सहणेबल आहे. आता या गाण्यातून काहीतरी निष्पन्न तर झाले पाहिजे. मग सारिकाला अचानक ध्यानात येते की कमल रीनावर लाईन मारतो आहे. रीनासोबत अ‍ॅक्चुअल डान्स स्टेप्स सुरु झाल्यावर तर तिचा तिळपापड होतो. मग एक चाईल्ड आर्टिस्ट तिला नाग आणून देतो. हा चाईल्ड आर्टिस्ट म्हणजेच दिग्दर्शकाचा सुपुत्र अरमान कोहली होय. ही तो नाग रीना रॉयवर सोडते. नागही बिचारा जाऊन रीनाला चावतो. गतकाळात क्राईम पेट्रोलच्या अभावामुळे असे कितीक गुन्हे घडले असतील याची गणतीच नाही.

२.३) द्रोणाचार्य राकु

कमल हसनचे नाव ओमप्रकाशने सूरज ठेवले आहे. तो रीनाला एका तंबूत घेऊन जातो आणि तपासतो. नाग चावल्याची जखम दिसताच तो यावरचा रामबाण उपाय - विष चोखून थुंकणे - करतो. इथे याचे जाळीदार जाकीट जवळून बघता येते. बाहेर अरमान कोहली, सारिकाचा भाऊ, खंजर घेऊन आला आहे. याला आवरा अरे कोणीतरी! विष चोखल्याने कमल हसनही अंडर रिस्क आहे. त्याला काही झाले तर सारिका लगेच खंजर मारून रीनाला ठार करण्याची घोषणा करते. आपण एका राजघराण्यातील व्यक्तीवर जीवघेणे हल्ले करतो आहोत. त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस असतात. हे मूल्यशिक्षण सारिका व अरमानला मिळालेले दिसत नाही. पण कमल हसनचे मूल्यशिक्षण झालेले आहे. त्यामुळे फ्रेंच किसचा मोह आवरता घेऊन तो रीनाच्या तळहाताचे चुंबन घेतो. याने रीना शुद्धीवर येते.

विषय फार वाढू नये म्हणून रीना आणि तिची मैत्रीण काढता पाय घेतात. सारिका कमल हसनला "परत लाईन मारलीस तर याद राख. ती भवानी आहे आणि मी आहे" अशी वास्तववादी धमकी देते. ओमप्रकाश उगाच काहीतरी बोलून विषय बदलतो. त्यात तिकडे राकु येतो. कमल हसन राकुच्या क्लासचा विद्यार्थी आहे. ओमप्रकाशचे नाव सरदार झुबेरी असल्याचे स्पष्ट होते. राकु आपल्या क्लासमार्फत बदला घेण्यालायक शिष्य तयार करतो आहे. कमल हसनही त्यापैकीच एक आहे. थोडक्यात राकु द्रोणाचार्य आहे. पण अजूनही कमल हसन युवराज असल्याचे रहस्य रहस्यच आहे.

या द्रोणाचार्यांचा अजून एक शिष्य आहे सुनील दत्त. एकाच वेळी गुहेतील सर्व शिष्यांचा सामना करून, राकुच्या हातून तलवार हिसकावण्याचे कसब दाखवून तो प्रेक्षकाला पटवून देतो की आपण एक महान योद्धे आहोत. राज कुमार सुनील दत्तपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठा आहे पण मेकअपने पराकाष्ठा करून काळे केस असलेला सुनील दत्त राकुपेक्षा म्हातारा दिसेल याची खात्री घेतली आहे. त्याहूनही आश्चर्यजनकरित्या समद खानच्या क्लासमध्ये महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. सुनील दत्तचे नाव आहे जयसिंग. जयसिंगची तालीम आज पूर्ण झाल्याचे राकु सांगतो. इतकी वर्षे राकुने हा कोणाचा मुलगा आहे हे विचारलेले नसते. अखेर सुनील स्वतःच सांगतो की मी प्रतापगढचे महामंत्री भवानी सिंग यांचा मुलगा आहे. हा स्वतःला अजितचा मुलगा समजतो आहे. म्हणजे हा सुलोचनाने कॅच घेतलेला प्राणचा मुलगा आहे. आपण अजितच्या मुलाला शिकवल्याचे कळताच राकु क्रुद्ध होतो. पण दुष्टचक्र संपवायचे नसल्याने तो सुनील दत्तला आपल्या चिडण्याचे कारण सांगत नाही. त्या ऐवजी तो भविष्यात गुरुदक्षिणेचे वचन घेऊन सुनीलला जायला सांगतो. सुनील राजपूत असल्याने तो वचन पाळणार हे वेगळे सांगणे न लगे. जाता जाता योगिता बाली त्याला दर्ग्यातून आणलेला रुमाल बांधते आणि राकुला टोमणा हाणते. नवरा-बायकोत आपले काय काम म्हणून सूज्ञ सुनील काढता पाय घेतो.

२.४) सेटअप कंप्लीट आणि समरी

आता एकच मेजर जोडी राहिली आहे आणि मग स्टार लोक संपले. तशी सुनील दत्तलाही एक हिरवीण आहे पण ती नंतर. जंगलातून घोडागाडी जाताना दिसते. या घोडागाडीत बसली आहे हेमा मालिनी. हेमा मालिनी सिनेमात आहे म्हटल्यावर तिचा हिरो धरम पाजी असणार ही सेफ बेट आहे. हेमा मालिनीचा ड्रायव्हर गणवेशावरून प्रतापगढचा असल्याचे ओळखता येते. थोडक्यात ही देखील प्रतापगढची आहे. ही मंदिरात पूजा करून परत येते आहे. रस्त्यात एक झाड पडल्याने गाडी थांबवावी लागते. या सैनिकांच्याकडून काही ते झाड हलत नाही. सुदैवाने तिकडून धरम पाजी पांढर्‍या रंगाचा लेदरचा सदरा घालून चालले आहेत. आधी ते थोडे उचकतात पण गाडीत हेमाला बघून विरघळतात. मग एकटेच त्या झाडाला उचलून बाजूला फेकून देतात.

हेमाला पाजी कोण आहेत हे माहित नसल्याने ती इनाम म्हणून त्यांना एक सोन्याची मोहोर देते. पण पाजीदेखील राजपूत आहेत. त्यामुळे ते स्त्रियांची मदत करणे हा आपला धर्म मानतात. म्हणून इनाम स्वीकारणे त्यांच्या शान के खिलाफ असते. मग ते मोहोर हेमाला परत करतात आणि तिला वाटेला लावतात. अचानक तिथे प्राण प्रकटतो. धर्मेंद्र प्राणचा मुलगा आहे म्हणजे टेक्निकली सुनील दत्तचा भाऊ. हा मुद्दा नंतर क्लिअर होईल. प्राण येऊन सांगतो की ही अजितची मुलगी आहे. अजितने मध्यंतरीच्या काळात आपल्या मुलीला राजकुमारीचा दर्जा मिळवण्यात यश मिळवलेले दिसते. अर्थात पाजींची राजपूतगिरी टेक्स प्रिसिडन्स. हेमासुद्धा पाजींवर इंप्रेस होते आणि थॅंक्स म्हणून जाते. पाजींचे नाव आहे जोरावर. पाजींनाही हेमा पसंद आहे. प्राणलाही काही हरकत नाही. त्यामुळे ही जोडी जुळली. प्राणला आणखी एक मुलगा शाम सिंग दाखवला आहे. त्याचा मुद्दा आणि इतर काँप्लिकेशन्स आपण प्रतिसादांत अभ्यासू. अल्पविराम घेण्यापूर्वी या सर्व नात्यांची एक समरी

महाराज + महाराणी - एक मुलगा = कमल हसन. सध्या ओमप्रकाशचा मुलगा म्हणून वावरतो. याने राकुकडून युद्धकलेचे शिक्षण घेतले आहे. हा खरा युवराज असल्याचे सध्या कोणालाच ठाऊक नाही.
राकु + योगिता बाली - राकु राजसेवेत अहोरात्र गुंतला असल्याने मूलबाळ नाही
प्राण + उर्मिला भट - तीन मुलगे = सुनील दत्त, धर्मेंद्र, शाम सिंग. शाम सिंगचा नट बिनमहत्त्वाचा असल्याने तो डेफिनिटली धाकला. बहुधा सुनील दत्त थोरला पण नीट स्पष्ट केलेले नाही. सुनील दत्त सध्या अजितचा मुलगा म्हणून वावरतो. याने राकुकडून युद्धकलेचे शिक्षण घेतले आहे. सुनील दत्तचे सत्य केवळ अजित, मदन पुरी आणि सुलोचना यांना ठाऊक आहे.
भाऊबंद : याखेरीज राकुला एक भाऊ - रझा मुराद. याने युवराज ओमप्रकाशच्या हवाली करून अंग टाकले. तसेच प्राण हा महाराणींचा मानलेला भाऊ.
अजित + सुलोचना - एक मुलगा, एक मुलगी = राज किरण आणि हेमा मालिनी. राज किरण थोरला. राज किरण सध्या युवराज म्हणून वावरतो. प्राण व राजमातेनुसार राज किरण प्राणचा मुलगा आहे पण प्रत्यक्षात तो अजितचा मुलगा आहे. हे सत्य केवळ अजित, मदन पुरी आणि सुलोचना यांना ठाऊक आहे.

जोड्या
कमल हसन + रीना रॉय + सारिका - प्रेम त्रिकोण. सारिकाला कमल आवडतो. कमलला रीना आवडते. रीनाला अजूनतरी या डाऊनमार्केट लोकांबद्दल काहीच वाटत नाही.
धरम + हेमा - ट्रिव्हिअल जोडी.
सुनील + ? - मुख्य हिरोंपैकी एक असल्याने यालाही एक हिरवीण आहे हे फिक्स.

ती कोण? एवढी सर्व कॉम्प्लिकेशन्स कशी निस्तरली जातात? आणि मदन पुरीचे नाव रणजीत का आहे या प्रश्नांची उत्तरे अल्पविरामानंतर

......................... मदन पुरीचे नाव रणजीत का आहे हा प्रश्न सोडून, त्याचे उत्तर कोणाकडेच नाही.

(अल्पविराम)

एडिट : करेक्शन -
याखेरीज प्राणला एक भाऊ - रझा मुराद >>> रझा मुराद राकुचा भाऊ आहे
धन्यवाद rmd

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अशा उधळमांडक्या राजाचा महामंत्री सहसा प्रॅक्टिकल, हुशार, आणि महत्त्वाकांक्षी असतो. हिंदी सिनेमांमध्ये अशा गुणी व्यक्तीस व्हिलन असे म्हणतात. >> इथून जी खुसु खुसु हसायला सुरुवात झाली ती काही शेवटपर्यंत थांबली नाही Lol

एवढा हॉट पुरुष हिंदी सिनेमात दुसरा कोणी नसावा. >> हॉट Lol

मग राकु पीळ उर्दू भाषण मारतो ज्याचे सार 'ओके' असे आहे. >> संवादलेखकाचे काम संपवलेत Lol

"लाश? किसकी?"
"असलियत की!" >> Rofl

असा बहुधर्मीय जुगाड लावल्यानंतर महाराजांना मुलगा झाला नाही तरच नवल! >>
हिंदी सिनेमांमध्ये अशा गुणी व्यक्तीस व्हिलन असे म्हणतात. >>> Lol

वा वा आधी फक्त अ‍ॅक्नॉलेजमेण्ट. पुढे वाचतोय.

आता जागा राखून ठेवतो !! फक्त पहिला पार्ट वाचला आहे.

आता "दुसरा राज तिलक ज्यातून कमल हसनला सारिका" या वाक्याचा रेफरन्स मी पिक्चर पाहिल्यापासून शोधतो आहे. तसा पिक्चर रिलीज झाल्यानंतर थोड्या वर्षांनी त्यांचे लग्न झाले आणि पिक्चर मधले सारिकाचे एक से एक कपडे पाहून हिरॉइन ऐवजी साइड हिरॉइन ने हिरो का दील जीत लिया याबद्दल शंका येत नाही Wink

राजकुमारची मिशी - ही एक खुप भारी गोष्ट आहे. कोणाला जर राजकुमारचा या खोट्या मिशी शिवाय फोटो मिळाला तर इथे टाकण्यात यावा.

राजा - हा नक्की कोण अभिनेता आहे ? आम्ही शोधून शोधून दमलो. मग राजकुमार कोहली चा कोणीतरी नातेवाईक असेल असे वाटून गप्प बसलो. Proud

Happy ती समरी खरच आवश्यक होती....इतकी complications कशी काय आहेत स्टोरीत? पुढे सगळे किती निस्तरता निस्तरता पारावार!!
मस्त आहे review! सुचवतं कोण असले सिनेमे तुम्हाला?

करेक्शन -
याखेरीज प्राणला एक भाऊ - रझा मुराद >>> रझा मुराद राकुचा भाऊ आहे Proud

धन्यवाद Happy

करेक्शन - >> गलतीसे मिश्टेक Proud

सुचवतं कोण असले सिनेमे तुम्हाला? >> ढूंढने से तो खुदा भी मिल जाता हैं Happy

टोटल डोके गरगरले कोणाचा मुलगा कोणाकडे वाढत आहे याची संगती लावताना. यापुढे धरमवीर मधले बालक-एक्स्चेंज काहीच नाही.

"सिन्क्रोनाइज्ड अ‍ॅक्टिविटी" त्याकाळात कॉमन असावी. धरमवीर मधे प्रदीप कुमार व जीवन यांची मुले एकाच वेळेस जन्माला येतात. इथे तो महाराज व प्राण.

मग राकु पीळ उर्दू भाषण मारतो ज्याचे सार 'ओके' असे आहे >>> Lol बाबा बर्वे व "अरे पण गच्चीचां काय? हा हे काय बोलतोय?" आठवले.

अरे तो राजा म्हणजे जुन्या ज्युली मधला विक्रम वाटतोय.

आता थोडी ती क्लिप पाहताना या लेखातले बरेचसे वर्णन केवळ पहिल्या ५-७ मिनिटांचे आहे हा साक्षात्कार झाला. अफाट मसाला आहे. एडिटरला मानले पाहिजे. या सगळ्या गोंधळातून निदान अ. आणि अ. इतकी संगती लागेल असे हे तुकडे त्याने बरोबर जोडले आहेत Happy
- "इस महिने पैदा हुए" म्हंटल्यावर मला वाटले निदान कोणीतरी विचारेल की महाराज महिना म्हणजे फाल्गुन धरायचा, की मार्च?
- "पुरखोंसे चली आयी" रीत प्राणला आरामात घरून लवाजमा घेउन निघाल्यावर मधेच प्रवासात आठवते. तयारी वगैरे काही प्रकार नाही.
- व्हेलॉसिटी या संकल्पनेचा शोध तेव्हा लागलेला नसल्याने सर्व स्पीड सारखेच आहेत यात. प्राणचा लवाजमा ज्या दिशेने राजमहल कडे निघालेला असतो त्याच्या बरोब्बर विरूद्ध दिशेने तो संग्राम सिंग जातो. कारण त्याला हवा की रफ्तार से जायची ऑर्डर मिळते. वेगात गेल्याशी कारण. कोणत्या दिशेने ते महत्त्वाचे नाही.
- कॉमन नॉलेज असलेली माहिती केवळ प्रेक्षकांना कळावी म्हणून कलाकार एकमेकांना सांगतात हा नियमही कटाक्षाने पाळलेला आहे. त्यामुळे सर्वांना माहीत असलेल्या व्यक्तींचे उल्लेख केवळ नावाने न होता साग्रसंगीत केले जातात लग्नपत्रिका शैलीत. "जलाल खान तुम अकेले आये हो? तुम्हारा भाई समद खान नही आया?" , "मै चाहती हूँ की ये संदेसा मेरे मूँह बोले भाई अर्जुन सिंग तक" - अशा पद्धतीने संवाद चालतात.
- अजित काही राजाचा वारस वगैरे नाही. मग त्याला राजपुत्र झाल्याने असा काय फरक पडला अजितला राज्य हासिल वगैरे करण्याच्या बाबतीत? युवराज नसता तर महामंत्री राजा होतो असला काही सक्सेशन प्लॅन असतो की काय.
- राकु जेव्हा ते "असलियत की लाश" वाले प्रसिद्ध भाषण करून निघून जातो तेव्हा अजित, प्राण व मदन पुरीचे चेहरे "हा नेहमी असलेच काहीतरी अगम्य उर्दू बरळून जातो. लक्ष देउ नका त्याच्याकडे" असा विचार करत असल्यासारखे दिसतात.

अरे तो राजा म्हणजे जुन्या ज्युली मधला विक्रम वाटतोय >>> अगदी अगदी! आम्हाला पण असंच वाटलं होतं पण त्याचं नाव नाही कुठेच.

ती राजमाता आहे ती मात्र अगदीच नयनताराची बहिण वाटते Proud

'बात यहाँ खत्म हो जाती तो और बात थी' च्या चालीवर काय रे, पायस >> Lol अगदीच

अजित, प्राण व मदन पुरीचे चेहरे "हा नेहमी असलेच काहीतरी अगम्य उर्दू बरळून जातो. लक्ष देउ नका त्याच्याकडे" >> पूर्ण सिनेमात राजकुमारने तोंड उघडलं की विविध वेळांना विविध लोक असेच चेहरे करतात. तुझ्या टिप्पणीशी पूर्ण सहमत, या सिनेमात प्रचंड मसाला कुटून कुटून भरला आहे.

महाराज आणि महाराणी कोण आहेत यावर अधिक अभ्यासाअंती निघालेला निष्कर्ष

महाराज >> हा ज्युलीतला विक्रमच आहे. ज्युलीतल्या विक्रमच्या नावावर याच्या पुढच्याच वर्षी आलेला मुझे कसम हैं जमा आहे, ज्यात तो रामेश्वरीचा हिरो आहे. मुझे कसम हैं मधला रामेश्वरीचा हिरो आणि हा महाराज यांचे चेहरे मलातरी हुबेहूब वाटले. अगदी खोटी मिशी सुद्धा सेमच दिसते आहे.

महाराणी >> ही जमुना नावाची दाक्षिणात्य नटी आहे. सती अनुसूया, सती रेणुका अशा चित्रपटांत हिचा लीड रोल होता. एकंदरीत सती स्पेशालिस्ट. साऊथच्या बर्‍याच जुन्या पौराणिक चित्रपटांत ही बघावयास मिळू शकते.

३) तीन भाऊ

३.१) आय लव्ह यू बोलताना वेळ वाया घालवू नये

तर अल्पविराम घेण्यापूर्वी सांगितल्यानुसार प्राणला अजून एक मुलगा आहे, ज्याचे नाव आहे शाम सिंग. याची भूमिका राजीव आनंदने केली आहे. राजीव आनंद हा राज कोहलीचा स्पेशल नट आहे. बेताबचा अपवाद वगळता हा फक्त कोहलीपटांतच दिसला आहे. इतका बिनमहत्त्वाचा नट ज्याची भूमिका करतो ते पात्र अर्थातच अतिसामान्य असणार हे प्रेक्षक सांगू शकतो. पण याच्या भुवया अशक्य जाड आहेत. एनीवे, शाम सिंग स्ट्रेट अप क्रीपी आहे. इंट्रो शॉटमध्येच तो एका युवतीस स्टॉक करत आहे. ही युवती आहे रंजिता (सत्ते पे सत्तात जिला मारायचा प्लॅन असतो ती). रंजिताचे सिनेमातले नाव आहे सपना. इंट्रो शॉटमध्ये ही घोड्याला खोगीर चढवताना दाखवली आहे. घोड्याला खोगीर चढवणे यावरून तुम्हाला काही डबल मिनींग सुचले असेल तर दिग्दर्शकालाही तेच डबल मिनींग सुचले आहे, खात्री बाळगा. यांचा पहिला डायलॉग पाहा
"तुम्ही घोडे बहुत पसंद हैं ना सपना?"
"हां. मुझे घोडे भी पसंद हैं और मर्द भी पसंद हैं."

शाम सिंग लाजाळू असल्याने तो सपनाला आपली दिल की बात सांगण्यास कचरतो. धीर गोळा करून तो इलू इलू बोलायला जातो तोवर रंजिता आपल्या कामाला निघून गेलेली असते. तिच्या जागी धरम पाजी अवतरून राजीवची थोडी बहुत खेचतात. पाजींना राजीव-रंजिता जोडीमध्ये काही प्रॉब्लेम नसतो. त्यात थोड्याच वेळापूर्वी त्यांना हेमा गोड आवाजात थँक यू म्हणून गेलेली. यामुळे एक्साईटेड पाजी राजीवला एक अतिशय वाह्यात सल्ला देतात - मुलीला घेऊन तडक तिच्या आईकडे जा आणि तिला उघड उघड मागणी घाल. होकार आला तर ठीक नाहीतर तशीच तिला घोड्यावर घालून आण पळवून.

३.२) गुडघी भेजा

तुनळीवर इथे अर्धा मिनिट सिनेमा कापला आहे असा आमचा कयास आहे. फॉर अननोन रिझन्स, रंजिता एका उधळलेल्या घोड्यावर स्वार आहे आणि घोडा वारा पिल्यागत डोंगरांतून धावतो आहे. सुनील दत्तही राकुकडून घरी जाण्यासाठी त्याच रस्त्याने निघाला आहे. संकटात सापडलेल्या स्त्रीचा "बचाओ" असा उद्घोष ऐकून तो तिला वाचवायला जातो. अर्थातच असे वाचवणे नाटकीय होणे गरजेचे असल्याने घोडे बरोब्बर दरीच्या कडेला थांबतात, सुनील दत्त रंजिताला पकडण्यासाठी झेप घेतो आणि ते दोघे एकमेकांच्या बाहुपाशात जमिनीवर गोल गोल लोळतात. अगदी म्हणजे अगदी कडेला जाऊन त्यांचे लोळणे थांबते. रंजिताचा जीव वाचला आणि सुनीलची हिरोईन रंजिता असल्याचे प्रेक्षकापर्यंत पोहोचले. पण दुष्टचक्र इथे संपत नाही.

रंजिताची शुद्ध हरपते. सुनीलला बहुधा फक्त स्विमिंग पूलमध्ये बुडालेल्या बायकांना वाचवायचा अनुभव असल्याने तो तिला माऊथ टू माऊथ ऑक्सिजन द्यायला जातो. नेमका त्याच क्षणाला राजीव आनंद फॉईल घेऊन टपकतो. "आपली आयटम या म्हातार्‍यासोबत इथे काय करते आहे" हा प्रश्न विचारणे भ्याडपणाचे लक्षण असल्याचा त्याचा समज आहे. त्यामुळे तो थेट फॉईलचा समशेरीसारखा वापर करून खणाखणी सुरु करतो. सुनील दत्तही राजपूत असल्याने "ओ दादा, तुमची आयटम दरीत पडणार होती. मी वाचवली तिला" असे काही सांगण्याऐवजी राजीव आनंदच्या तलवारबाजीची प्रशंसा करत लढत बसतो.

सुनीलने राकुचा क्लास केलेला असल्याने राजीवचा त्याच्यासमोर फार काळ टिकाव लागत नाही. मग तिथे धरम पाजी अवतरतात. पाजीही राजपूत असल्याने "हा काय धिंगाणा चालला आहे" असा प्रश्न करण्याऐवजी "मैं तेरा खून पी जाऊंगा" करून सुनीलवर तुटून पडतात. धरम पाजींना कोणीही तलवार चालवायला शिकवलेली नाही याची नोंद घ्यावी. इतर लोक फॉईल कशीही वापरत असले तरी ती एकहाती तलवार असल्याचे भान राखून आहेत. पाजी फॉईल खंडा तलवार असल्याप्रमाणे दोहो हातांनी वेडी वाकडी फिरवतात. सुनीललाही हे लक्षात येते आणि तो हे बोलूनही दाखवतो. हे बेसिकली फोरशॅडोइंग आहे. बघा, सिनेमात तलवार शिकवणारा एकच मास्तर - राकु. जर पाजींना तलवार जमत नाही तर ऑफ कोर्स ते पुढे मागे राकुकडे जाऊन शिकणार.

३.३) मेरे दो दो बाप

अखेर या मठ्ठ पोरांना शांत करायला त्यांचा बाप, प्राण अवतरतो. तो शांतपणे तिघांना काय झालं विचारतो. पण एवढी वेळच येत नाही. रंजिता शुद्धीवर येऊन त्या सर्वांना काय घडले ते सांगते. इथे मुलं हरवणे प्लॉटलाईन स्पेशल "इन्हे अपने भाई समझ कर माफ कर दो" डायलॉग आहे - कारण ते खरेच सुनील दत्तचे भाऊ आहेत. प्राण आणि सुनील दत्तमध्ये केवळ नऊ वर्षांचे अंतर असल्यामुळे प्राण सुनीलचा मोठा भाऊ वाटतो, बाप नाही हा भाग अलाहिदा. सुनील प्राण हा सरदार अर्जुन सिंग असल्याचे ओळखून शालीनतेने परिस्थिती हाताळतो. पुन्हा एकवार कही आपही तो मेरे पिताजी - कहीं तुम ही तो मेरे बेटे प्रकारचे शॉट्स होतात. जाता जाता सुनील रंजिताकडे चोरटा कटाक्ष टाकतो. तिची एक्साईटेड मुद्रा पाहून तो काय समजायचे ते समजतो.

याला काँट्रास्ट हवा म्हणून सुनीलच्या घरातला सीन लावला आहे. सुनील घरी जाऊन मोठ्या आदराने आपली तलवार अजितच्या पायांशी ठेवतो. अजितला सुनील आपला खरा मुलगा नसल्याचे ठाऊक आहे. त्यामुळे तो सुनीलला अपमानित करून त्याची तलवार दूर फेकून देतो. या सिनेमात राजपूतांकडून काही भलत्याच अपेक्षा दाखवल्या आहेत. जसे की हा अजितचा डायलॉग - राजपूतों के जिस्म पर जखम तो होते हैं पर उनकी तलवार कोरी नही होती. म्हणजे सुनीलने राजपूतगिरीच्या नावाखाली उगाच दोन चार लोकांना मारून यायचं का? तो बिचारा हा बावळटपणा पाहून हतबुद्ध होतो आणि नमस्कार करून आईला भेटायला जातो. दारात हेमा मालिनी ओवाळणीचे ताट घेऊन याची वाटच बघत असते. हिचे सिनेमातले नाव रुपा. ती म्हणते कुठे अजितचे बोलणे मनावर घेतोस, पागल आहे आपला बाप. सुनील म्हणतो की मला तर वाटतं की मी त्याचा मुलगा नाहीच. हेमा म्हणते की काहीही, उद्या म्हणशील मी तुझी बहीणच नाही. हेमाच्या कॅरॅक्टरला लॉजिकचा कोर्स करण्याची नितांत आवश्यकता आहे. जर सुनील अजितचा मुलगा नसेल तर ऑटोमॅटिकली हेमा त्याची सख्खी बहीण असू शकत नाही, फार फार तर सावत्र. सो तो ऑलरेडी तू माझी बहीण नाही असे म्हटला आहे. सुनील मग विषय बदलतो.

३.४) डोळ्याने आंधळी आई, स्वामीभक्तीने आंधळे वडील

मग हेमाचे लक्ष याच्या मोडक्या हाताकडे जाते. एवढी मोठी रंजिता याच्या हातावर पडल्याने तो मोडला आहे. मग तो थोडक्यात काय झाले ते सांगतो आणि धरम पाजींची स्तुती करतो. भावाला आपली आवड मान्य असल्याचे लक्षात येऊन हेमा हरखते. कट टू बाग, हेमा धरमला भेटायला आली आहे. या शॉटचा एवढाच उपयोग आहे की नंतर जोरावर की खुद्दारी आणि राज घराणे यांच्यात टकराव होईल हे फोरशॅडो करणे. या तीस सेकंदाच्या शॉटचे डबिंग विशेष चुकले आहे. टायमिंग मिसमॅच आहेच पण आवाजही पूर्णपणे वेगळे आहेत. बहुधा तरी हा सिनेमाची लांबी वाढवायला टाकला असावा.

असो, राजधानीत वेगळेच नाट्य घडत आहे. युवराज (तोतया) राज किरण बर्‍याच वर्षांनी राजधानीत परतला आहे. म्हणजे दिवंगत महाराजांच्या इच्छेला मान देऊन राजमातेने खरंच याला विलायतेला शिक्षणासाठी पाठवले असावे. राजमाता या निमित्ताने विजय मैदानात एक जश्नचे आयोजन करते आणि त्याची दवंडी पिटते. यामागे सेलिब्रेशन आणि मधुमतीसोबत वाड्निश्चय असा दुहेरी हेतु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समारंभात राज्यातील युवकांनी आपापल्या युद्धकौशल्याचे प्रदर्शन करावे (मिलिटरी पोटेन्शिअल स्काऊटिंग) अशी अपेक्षा आहे. ही दवंडी ऐकते उर्मिला भट. ही त्या काळरात्री झालेल्या पुत्रवियोगामुळे आंधळी झाली आहे. हिची अपेक्षा आहे की आपल्या मुलांनी जाऊन युद्धकला दाखवावी आणि त्या बदल्यात काय इनाम मिळेल ते घरी आणून घराण्याची इभ्रत वाढवावी. बट पाजी गॉट अ प्रॉब्लेम.

धरम पाजींच्या कोणा शेतकरी मित्राला किशनगढच्या युवराजाने जिवंत जाळलेले असते. त्यामुळे पाजींचा युवराज प्रजातीच्या लोकांवर राग आहे. प्राण म्हणतो की अरे तो किशनगढचा युवराज, हा प्रतापगढचा. सगळे युवराज काय सारखे नसतात. पाजी म्हणतात नाही, सगळे युवराज जुलमी आणि दारुडेच. प्राण म्हणतो अरे आपले युवराज तसे नाहीत - हा डायलॉग डेंजर आहे, वो विलायत से लौटे जरुर हैं. मगर शराब के नशे में डूबकर नही, बल्कि प्रजा की मोहोब्बत के नशे में चूर होकर. पाजींनी किमान आणखी अशी वाक्ये नकोत म्हणून तरी गप्प बसावे. पण त्यांचं दळण चालूच राहतं. शब्दाने शब्द वाढत जातो आणि प्राणच्या वफादारीवर विषय जातो. वफादारी हा सेन्सेटिव्ह टॉपिक असल्याने प्राण उखडतो आणि पाजींच्या श्रीमुखात भडकवतो. पाजी राग गिळून निघून जातात.

इथे उर्मिला भट दोन सेकंद विसरते की ती आंधळी आहे आणि ते थेट प्राणच्या दिशेने चालत येते. मग तिला अचानक आठवते की अरे आपण आंधळे आहोत आणि ती परत चाचपडायला लागते. हा गूफ अप वगळता ती कहर हुशारी दाखवते. युवराजासाठी आपल्या मुलावर प्राणने हात उगारला म्हणजे कुछ तो गडबड हैं. ती म्हणते की खरं खरं सांगा, युवराज आपला मुलगा आहे ना. प्राणला अजितने केलेली अदला बदली अजूनही ठाऊक नसल्याने तो राज किरणलाच आपला मुलगा समजतो. त्याचाही नाईलाज होतो. तो म्हणतो हो, युवराजच आपला थोरला मुलगा आहे. आईचे हृदय द्रवते, ती म्हणते की मी त्याला बघू तर शकत नाही, किमान त्याची गळाभेट तरी घेता येईल का? आता हे काही अवघड काम नाही. पण प्राण या रहस्याबाबात फारच पॅरानॉईड असल्याने तो म्हणतो हे शक्य नाही आणि परत हा विषय काढलास तर तुझी धडगत नाही. मग तो विजय मैदानात जायला निघतो.

विजय मैदानात काय वाढून ठेवले आहे ते पुढच्या भागात बघूयात.

कमल हसनला सारिका आणि प्रेक्षकांना आ वासण्याची शक्ती मिळाली.>> ह्या वाक्यावर आधी ऑ मग ह्यां मग हेहेहे अशी रिऍक्शन झाली. आता पुढे वाचतो! unintended pun झाला हा

ज ब र द स्त! पुढ्चे भाग पण ओरिजिनल पोस्टीलाच जोडा की. कॉमेंट्समधून शोधायला कठिण जाईल पुढे पुढे. इतका कॉम्प्लेक्स प्लॉट का केला असेल त्यांनाच माहित. मला तर अजूनही कोण कोणाचा कोण आहे हे नीट कळलेलं नाहिये.

४) विजय मैदानातील चकमकी

४.१) फ्रेंच तरुणाई

एकदाचा तो विजय मैदानातला महोत्सव सुरु होतो. राजमाता स्वतःला सेलेब्रिटी समजत असावी. तिने साधीच, बहुधा खादीची, साडी नेसली आहे. कानातल्या कुड्या आणि एक कंठहार वगळता दागिने नाहीत. पण जर या साध्या वेषभूषेचे कारण तिचे वैधव्य असेल तर चेहर्‍यावर किलोभर मेकअप चोपडण्याचे कारण काय? असो, सोबत राज किरण, रीना रॉय, अजित, प्राण, आणि नॉट-रणजीत-रणजित मदन पुरी आहे. राज किरणला फ्रिलच्या कापडापासून बनवलेला पांढरा सदरा आणि धुवट रंगाची विजार दिली आहे. त्यावर तीन-चार इंच रुंद कमरबंद आहे. यालाही राकुच्या फॅशनची दाढी, जिला बाल्बो दाढी असे म्हणतात, दिली आहे. रीना रॉयने झुळझुळीत कापडाचा फ्रॉक घातला आहे. फरशीची नियमित झाडलोट व्हावी म्हणून पाठीवर झूल दिली आहे. हिला कपाळावर दागिना घालायची सवय आहे. केषभूषा पोनीटेल प्रकारात मोडते. प्राणचा वेष वलंदेज (डच) किंवा फ्रेंच अ‍ॅरिस्टोक्रॅट टाईप आहे असे अस्मादिकांना वाटते. पण कापड मात्र सतरंजीचे असावे. आणि अजित व मदन पुरी बिचारे अजूनही तोच जोधपुरी सूट (धुतला तरी आहे का कोणास ठाऊक?) घालून फिरत आहेत. असे गृहीत धरले की हे राज्य गरीब नाही तर हा फॅशन सेन्स राज्यक्रांती नंतरच्या फ्रान्सवर बेतलेला वाटतो. एकंदरीतच हे राज्य नेपोलिअन कालीन फ्रान्ससारखे आहे.

मग कोणीतरी घोषणा करतं की हा तरुणाईचा, शौर्याचा उत्सव आहे. या सिनेमाच्या हिरोंचे सरासरी वय ४४ आहे. अशा तरुणाईमधून तीनजणांची निवड होणार असल्याचे कळते. का? हूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ केअर्स!
निवडप्रक्रिया अशी - मुकाबला होईल. त्यात कोणीही भाग घेऊ शकेल असे दिसते. जर तुम्ही जिंकलात, तर तुमच्यासाठी नेमून दिलेल्या खुर्चीत जाऊन बसायचं. मुकाबला कोणासोबत? या लोकांनी काही खतरनाक योद्धे पकडून आणले आहेत. वन ऑन वन फाईट होईल. जिंकलात, तुमचं नशीब! हरलात, वेल हरलात तर हूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ केअर्स!

४.२) कमल हसन वि. खतरनाक डाकू

पहिला प्रतिद्वंद्वी आहे खतरनाक डाकू लष्कर सिंग. हा बहुतेक तरी महाभारतातला भीम प्रवीण कुमार आहे. डबिंगला पुन्हा कोणातरी वेगळ्याचाच आवाज आहे. बहुतेक तरी राज कोहलीला डबिंगसाठी या लोकांच्या डेट्स मिळाल्या नाहीत. मग याने जो बोले सो मेरा स्टार न्यायाने मिळेल त्याचा आवाज वापरला आहे. याला चॅलेंज देतो कमल हसन. सोबत सारिका आणि अरमान कोहली पण आहेत. कमलचा ड्रेस या सर्व प्रकरणात नॉर्मल दिसतो. अरमान कोहलीला चट्ट्यापट्ट्याचा टीशर्ट दिला आहे. आणि सारिकाने काय घातलंय ते तिचं तिलाच माहित. तुनळीवरच्या कॉपीत ड्रेस फारसा नीट दिसत नाही पण प्राथमिक अंदाज असा आहे की नानाविध रंगाच्या चिंध्या जोडून हा फ्रॉक तयार केला आहे. कमलचा आणखी वेगळाच मुद्दा आहे. त्याला त्या खुर्चीशी काय घेणे देणे नाही. पण लष्कर सिंगचा अ‍ॅटिट्यूड न आवडल्याने तो त्याच्याशी द्वंद्वयुद्ध करायला उत्सुक आहे. याला नि:संशय राकुनेच शिकवलं आहे.

कमल हसन भलेही हरवलेला युवराज असला तरी सिनेमाचा मुख्य हिरो तो नाही. त्यामुळे याची फाईट कॉमिक रिलीफ आहे, उगाच अ‍ॅक्शनची अपेक्षा बाळगू नका. बहुतांश वेळ कमल जिम्नॅस्टिक्सची प्रात्यक्षिके करतो आणि रीना रॉय कौतुकाने त्याच्याकडे बघत राहते. याप्रकारे तो जिंकण्याची सुतराम शक्यता नाही. आता दुर्दैवाने तो मुख्य नसला तरी हिरो तर आहे. त्यामुळे एका पॉईंटला प्रवीण कुमार त्याला गुडघ्यापर्यंत जमिनीत गाडतो आणि राकुची शिकवणी अ‍ॅक्टिव्हेट होते. दोन सेकंदात पारडे फिरते. कोणीतरी एक मासे पकडायचे जाळे तिकडे विसरून गेले आहे. कमल ते लष्कर सिंगवर फेकतो आणि जवळच्याच मूर्तीचा भाला घेऊन त्याला हार मानण्यास भाग पाडतो. कमल हसनच्या कंबरेला एक छोटी कुर्‍हाड आहे. लष्कर सिंग नि:शस्त्रच नव्हे तर उघडाबंब आहे. कमल अधिक चपळ आहे. चपळाईने केलेल्या एकाच वारात ही पॉईंटलेस फाईट संपू शकते. पण असे उत्कृष्ट विचार गुणवान व्यक्तींच्याच डोक्यात येतात हिरोंच्या नाही.

४.३) पाजी वि. बॉब ख्रिस्टो

रीना रॉय इज इंप्रेस्ड! कमल हसन मग जाऊन तिला, राजमातेला आणि इतर प्रभूतींना वंदन करतो. कमल हसन राजमातेचा खरा मुलगा आहे. प्रथम नजरानजर होताच 'तेरा मुझसे हैं पहले का नाता कोई' एक्स्प्रेशन्सची देवाणघेवाण होते. मग कमल जाऊन आपले आसन ग्रहण करतो. आता दुसर्‍या खुर्चीसाठी फाईट सुरु होते. घोड्यावर बसलेल्या बॉब ख्रिस्टोची एंट्री होते. बॉब दिलावर म्हणून कोणीतरी दाखवला आहे. लष्कर सिंग जसा डाकू आहे तसा दिलावर कोण आहे हे स्पष्ट केलेले नाही. हा इतका डेंजर आहे की याला आजवर कोणीही चॅलेंज देण्याची हिंमत केलेली नाही. जर याला कोणीच चॅलेंज दिलेले नाही तर मग हा डेंजर आहे हे कसे कळले? या फॅलसीमुळे प्रेक्षकाला ही फाईट रंगतदार वाटावी म्हणून एडिटरला इतर टेक्निक्स वापराव्या लागतात. बॉब स्क्रीनवर आल्यावर लगेच हेमाचा घाबरल्याचा शॉट आहे. म्हणजे बॉबला हरवण्याची जबाबदारी धरमपाजींवर येणार आहे. पण धर्मेंद्राचा तर या सर्व प्रकाराला विरोध आहे. मग आधी कोणीतरी जाऊन तडमडलं पाहिजे जेणेकरून धर्मेंद्राला त्याला वाचवण्यासाठी तरी बॉबशी फाईट करावी लागेल. सध्या अशी एकच व्यक्ती आहे - राजीव आनंद म्हणजे शाम सिंग.

पण शाम सिंग पडला शामळू. त्याला कोणीतरी चिथावलं पाहिजे. सध्या अशी एकच व्यक्ती आहे - रंजिता. रंजिता म्हणते की काय उर्मट आहे हा बॉब. याला धडा शिकवणार्‍यावर कुणीही मुलगी फिदा होईल. झालं, उतरला शाम सिंग मैदानात. प्राणला आपल्या पोराची कुवत ठाऊक असल्याने त्याचा छद्मी हसतानाचा शॉट. बॉब ख्रिस्टो लान्सर (भाल्याने युद्ध करणारा घोडेस्वार) आहे. त्यानुसार योग्य ते कवच-शिरस्त्राण-ढाल-लान्स दिले जाते आणि लान्सिंग फाईट सुरु. पहिल्या चकमकीतच बॉब शाम सिंगला भुईवर लोळवतो. मग तो फ्लेल (एक प्रकारची काटेरी गदा) घेऊन याला यथेच्छ बडवायला सुरुवात करतो. हेमा चिडते. बावळट असला म्हणून काय झाले, आहे तर माझा भावी दीर. ती विद्युतवेगाने त्यांचा रोमान्स स्पॉट गाठते. धरम पाजी तिथेच असतात. परिस्थिती समजताच पाजी विद्युतवेग-स्क्वेअर्ड वेगाने विजय मैदान गाठतात. मग पाजी बॉब ख्रिस्टोला यथेच्छ बडवतात. मुलगा आज्ञाधारक नसला केपेबल तरी आहे हे बघून प्राणचा आत्मा सुखावतो. अशा रीतिने दुसर्‍या खुर्चीसाठी धरम पाजींची निवड होते.

४.४) कपट

बट पाजी गॉट नो चिल! ते तीच काटेरी गदा नेम धरून भिरकावतात आणि त्यांच्यासाठीची खुर्ची शब्दशः फोडतात. अजित याने भलताच भडकतो. पण अर्जुनसिंगसोबतचे ऋणानुबंध लक्षात घेऊन राजमाता हा उद्दामपणा माफ करतात. मग पाजी बेशुद्ध झालेल्या राजीव आनंदला घेऊन निघून जातात. आता तिसर्‍या खुर्चीवर कोण बसणार? राज किरण फारीन रिटर्न असल्याने त्याला तलवारीतलं जास्त कळतं असा निष्कर्ष काढला जातो आणि फाईट न करताच त्याला तिसरा विजेता घोषित केले जाते. अशी धडधडीत पार्शालिटी राकु-शिष्योत्तम सुनील दत्त सहन करणे शक्य नाही. तो राज किरणला आव्हान देतो. लोकांच्या नजरेत सुनील अजितचा मुलगा असला तरी अजितला माहित आहे की त्याचा खरा मुलगा राज किरण आहे. त्याला काही पसंत पडत नाही पण राजमाता म्हणते की एवीतेवी आपण तीन फाईटचा वेळ सँक्शन केला आहेच तर होऊ देत आणखी एक मुकाबला.

दोघांना घोडे, थर्माकोलच्या तलवारी आणि शिरस्त्राण दिले जाते. इतक्या इंप्रॅक्टिकल डिझाईनच्या तलवारी मी आधी कधीच पाहिलेल्या नाहीत. पण या तलवारी काहीच नाहीत. शिरस्त्राण म्हणून त्यांना चक्क हेल्मेट दिली आहेत!! कहर म्हणजे त्या हेल्मेटवर गोल्डपेंटने डिझाईन काढून दोन्ही बाजूंनी पिसे बांधली आहेत. बरं हे लपवण्याचा जराही प्रयत्न केला नाहीये. क्लोजअपमध्ये धडधडीत हेल्मेट दिसते. त्या काळातल्या प्रेक्षकांनी किमान हा गूफअप तरी नोटिस केला असेल. बट देन, हा सिनेमा सुपरहिट होता सो.....
एनीवे, हे दोघे हेल्मेटधारी फाईट सुरु करतात. नॅचरली, आता रंजिताला फाईटमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आहे. ही संपूर्ण फाईट कपटाने खेळली जाते. राज किरणच्या घोड्याला पुढून अनेक चाकू जोडले आहेत. जेणेकरून प्रतिस्पर्ध्याच्या घोड्याला इजा व्हावी. टू हिज क्रेडिट, राज किरण अगदीच काही कच्च्या गुरुचा चेला दाखवलेला नाही. पण सुनील दत्तला राकुने शिकवले आहे. थोड्याच वेळात त्याचे पारडे वरचढ होते. राज किरणला नि:शस्त्र करण्यातही तो यशस्वी होतो. आता फक्त तलवार मानेवर टेकवून द्वंद्वाचा निकाल लावणे बाकी आहे. तेवढ्यात अजित वरून नेम धरून एक कुंडी खाली फेकतो. ही फाईट मोकळ्या पटांगणात चालू आहे. अजित ज्या गच्चीत उभा राहून उद्योग करतो, त्याच गच्चीत प्राण, राजमाता, रंजिता, कमल, सारिका इ. लोक असणे अपेक्षित आहे. तरीही हे कोणाच्या लक्षात येत नाही. सुनीलची तलवार खाली पडते, राज किरण मौका साधून पटकन आपली तलवार सुनीलच्या छातीवर रोखतो आणि अजित युवराज जिंकले असे घोषित करतो.

सुनील बिचारा हतबुद्ध होतो. हातातोंडाशी आलेला विजयाचा घास आपल्याच बापाने (पक्षी: अजित. प्रत्यक्षात अजित त्याचा बाप नाही. तो राज किरणचा बाप. खरंतर अजितने बापाचे कर्तव्य चोख पार पाडले आहे) हिरावून घेतला म्हणून त्याच्यावर रागावू, अनडिझर्व्हड विनर म्हणून राज किरणवर रागावू कि अशी चीटिंग बघूनही सगळे गप्प राहिले म्हणून त्यांच्यावर रागावू या तिठ्यात तो अडकला आहे. मग तो घरी जाऊन खांबावर आपला हात आपटून मोडून घेतो आहे. पंजाबी ड्रेस घातलेली हेमा मालिनी येऊन त्याचे सांत्वन करू बघते. पण जखमेवर मीठ चोळायला अजित तयारच असतो. हा सीन फक्त अजित निर्दय आहे हे दाखवण्यासाठी घातला आहे. तो येऊन सुनीलवर उखडतो. हेमा मध्ये पडते तर तो तिचे डोके फोडतो. सुनीलला चाबकाने फोडतो. सुलोचना मध्ये पडते तर तिलाही चाबकाने फोडतो. थोडक्यात आपली बायको आणि खर्‍या मुलीशीही तो दुष्टाव्याने वागू शकतो हा मुद्दा आहे. सुनील म्हणतो की आईला (सुलोचना) फोडायचं काम नाही, नाहीतर तुमचे हात कलम करीन. विषाची परीक्षा नको म्हणून असेल किंवा सीन लांबतो आहे म्हणून असेल, अजित तिकडून निघून जातो आणि विजय मैदानातील नाट्यावर पडदा पडतो.

Pages