मकरंदगड व्हाया कोंडनाळ हातलोट घाट

Submitted by योगेश आहिरराव on 2 April, 2020 - 01:16

मकरंदगड व्हाया कोंडनाळ हातलोट घाट

मुंबई महाबळेश्वर एशियाड. अर्थात फक्त नाव आणि त्यानुसार भाडे सोडलं तर लाल डब्या पेक्षाही बिकट अवस्था असलेल्या एस्टीतून पहाटे साडेपाच वाजता वाडाकुंभरोशी येथे उतरलो. निमित्त होतं निवडक मायबोलीकर केसीबीसी मित्रांचा ट्रेक. हल्ली वर्षातून एखाद दुसरा असा ट्रेक ठरतोच त्या निमित्ताने मुंबई पुणे व नाशिक येथील मित्र मंडळींच्या भेटी होतात हा एकमेव उद्देश. मुंबई स्थित नरेश काका उर्फ गिरी उर्फ मुकादम उर्फ मॅनेजर यांनी पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था एकदम चोख केली होती. पुणेकर आणि नाशिककर यांना महाबळेश्वरहून घेऊन महिंद्रा पिकअप वाड्याला आली तेव्हा सात वाजून गेलेले. गळाभेटी झाल्यावर सारे एकत्र पिकअप मध्ये मांडीला मांडी लावून बसलो. तासभर वळणावळणाचा उलटीचा फिल देणाऱ्या तरीही छान अश्या रस्त्याने शिवकालीन कोयना नदीवरील पूल, दुदोशी फाटा पुढे चतुर्बेट मार्गे थेट घोणसपुर.
मॅनेजर नरेश काका यांनी आगाऊ वर्दी दिली असल्याने जंगम काकांनी सर्वांची चहा पोह्यांची सोय केलेली तसेच खालच्या हातलोट गावातून ‘चंद्रकांत मोरे’ यांना सोबत घेऊन, आजचा मुक्काम ठरलेल्या कोकणातील बिरमणी गावातही रात्रीच्या जेवण व रहाण्याची व्यवस्था एकदम फिक्स.
२०१५ साली सहपरिवार मकरंदगडावर येणं झालं होतं. तसेच गडाबद्दल भरपूर माहिती अनेक पुस्तकात व इंटरनेट वर उपलब्ध आहे. महाबळेश्वर भागात जावळीच्या निबीड अरण्यात प्रतापगडाच्या दक्षिणेला असलेला प्राचीन किल्ला. शिवभक्त जंगम लिंगायत यांची सात शिवालय
चकदेव- चौकेश्वर
पर्वत- जोम मल्लिकार्जून
घोणसपूर - भैरी मल्लिकार्जून
तळदेव- तळेश्वर
धारेश्वर- धारदेव
गाळदेव- गाळेश्वर
रायरेश्वर- रायरेश्वर
अगदी रायरेश्वर पासून जावळीच्या या घोणसपुर चकदेव भागातील हि सात शिवालय कुठे कार्तिकी तर कुठे महाशिवरात्री तर कुठे श्रावण मासात उत्सव साजरे केले जातात.
IMG_20200108_081615.jpg
घोणसपुरातील भैरी मल्लिकार्जुन देवळाच्या बाजूने प्रशस्त अशी मळलेली वाट. ढासळलेल्या बुरुजात कधीकाळी अस्तित्वात असलेल्या दरवाजातून वर जात, मुख्य वाटेवरून एक वाट उजवीकडे आडवी जाते.
IMG_20200108_081943.jpg
त्या वाटेने आधी कड्यात खोदलेले पाण्याचे खांबटाके पाहून सरळ उभी चढाई करत माथ्यावरील श्री मल्लिकार्जुन महादेवाच्या लहानशा मंदिराजवळ आलो.
IMG_20191228_102333.jpg
मंदिरा मागे पश्चिमेला याच मकरंदगडाचा दुसरा भाग जो मधू नावाने ओळखला जातो. तिथं आता जाणं सहजी शक्य होत नाही. या दिवसांत वाढलेलं गवत लहान काटेरी झुडपे, अतिशय अरुंद घसारा युक्त वाट, दोन्ही बाजूला तीव्र उतार तसेच लहान मोठे कातळ टप्पे.
IMG_20200108_082103.jpg
वाट अशी नाहीच त्यामुळे कुणी माहितगार अनुभवी व योग्य सुरक्षा साहित्या शिवाय जाण्याचे साहस करू नये. गडावरून उत्तरेला प्रतापगड, ईशान्येला मेटतळे, पूर्वेला महाबळेश्वर भाग, पश्चिमेला महिपतगड तर दक्षिणेला दाभे, झाडणी मागे जोम मल्लिकार्जुन पर्वत व त्यामागे उठावलेला चौकेश्वर चकदेव, खराब आणि धूसर वातावरणामुळे या पैकी काहीही दिसलं नाही. या आधी साडेचार वर्षांपूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा सारं काही स्वच्छ हवेत व्यवस्थित पाहिलं होतं. गडमाथा मोठा नाहीच मुळी पण आजूबाजूचा प्रदेश व या भागातील कोंडनाळ आणि हातलोट या पुरातन वाटांवर लक्ष देण्यासाठी उपयुक्त. गड उतरून पुन्हा मंदिरापाशी आलो तेव्हा पावणेअकरा वाजलेले.
सॅक पुन्हा पाठीवर घेत गडाला वळसा घालून कोंडनाळेच्या दिशेने चालू पडलो. वाटेतल्या धनगरपाड्या पर्यंत जख्ख मळलेली पायवाट नंतर अरुंद होत गडाला उजवीकडे ठेवत अर्ध्या तासाची आडवी चाल संपवून तीव्र उतरण असलेला किरकोळ स्क्री वाला लहानसा टप्पा उतरत नाळेच्या मुखाशी आलो.
वेळ साडेअकरा.
IMG_20200108_082103.jpg
मागच्या वेळी गडावर आलो होतो तेव्हा मी आणि नारायण अंकल इथवर येऊन गेलो होतो, तेव्हा जाणवलेले नाळेचं रौद्र रूप त्या मागे उभे ठाकलेले काळे भिन्न कातळकडे, आताही अगदी तसेच वाटत होते. महिपतगड पहावा तो मकरंदगडहून तर कोंडनाळेची खोली पहावी ती महिपतवरून.
अगदीच निमुळत आणि खोलवर उतरलेल्या या नाळेत एन्ट्री मारावी तरी कशी ?
IMG_20191228_113134.jpg
कारण सुरुवातीच्या त्या अती अरुंद निमुळत्या भागात झाडी झुडूप सोडली तर काहीच दिसत नव्हतं. मोरे मामा आणि आम्ही दोघं तिघांनी उतराई सुरु केली. पाय ठेवायला कशीतरी जागा मिळवत स्वतःला झाडीत झोकून उतरायला सुरुवात.
अत्यंत तीव्र उतरण असलेल्या सुरुवातीच्या या भागात काटेरी झाडी त्रास देण्यासाठी कमी होती की काय त्यात जोडीला पायाखालची सरकणारी दगडांची रास एकदम रॅपिड घसरण. एका दगडावर पाय ठेवावा तर तो निसटून पुढच्या दोन दगडांना घेऊन खाली मग पुढच्याला आवाज देऊन सावध करावं लागे. बाय वन गेट टू फ्री असा मामला. घडल्या प्रकरणात दोघे तिघे कट टू कट वाचले. त्यामुळे जिथे दगड सरकत आहेत तिथं शक्य होईल तेवढं स्वतःहून पाय अडवून किंवा वेळ आली तर बसून जेवढं थोपवता येईल तितकं केलं. कसाबसा कड्याचा होल्ड तर काही ठिकाणी थोडी फार कारवी हाच काय आधार. हाफ टि शर्ट आणि हाफ चड्डी घातलेल्या भिडूना इथे चांगलाच प्रसाद मिळाला त्यात मच्छर बाईट फ्री. इथे मात्र मोरे मामा आणि घोणसपुरातील जंगम काका यांनी सांगितलेले शब्द आठवू लागले. मुळातच येथील गावकरी अगदी क्वचित वापर करणाऱ्या या नाळेत दर वेळी पावसानंतर पडझड होऊन ती आणखीनच अवघड होऊन बसते.
IMG_20191228_124850.jpg
सुरुवातीचा हा अडचणीचा मोठा टप्पा पार करत सारे खाली येई पर्यंत एक तास सहज गेला. आता काटेरी झाडी झुडप नाही पण उतार मात्र तीव्र. काही अंतर जाताच नाळ डावीकडे वळली इथून पुढे आता कुठलेही वळण नाही सरळ नाळेतून शेवट पर्यंत चाल. मोठ मोठ्या दगड धोंड्यातून स्वतःला सावरत उतरायचं. मोठी सॅक पाठीवर घेऊन, कधी हातावर तर कधी बुड टेकवत उतराई चालूच. काही मंडळी पुढे निघून गेली तर काही मध्ये तर आम्ही तिघे चौघे नरेश काका सोबत सर्वात मागे एकदम निवांत. नाळेत या दिवसात पाणी असतं तशी जागा पाहून जेवण करू, पण कसलं काय जवळपास अडीच तास झाले तरी पाण्याचा पत्ता नाही. दोन वाजत आले एके ठिकाणी जेवणासाठी थांबलो, भाजी चपाती, ठेपले, पराठे, गुळ पोळी, मच्छी फ्राय, बॉईल अंडी शेवटी स्वीट डिश श्रीखंड. पोटभर जेवण झाल्यावर थोडी ताणून द्यावी असे वाटत होते पण जिथे बसायला जागा धड नाही तिथे पाठ टेकायची बात दूरच. जेवणानंतर चाल खूपच जड जाऊ लागली, नाळ आता जरी रुंदावली असली तरी उतार खूपच मोठा आणि तीव्र.
IMG_20191228_145623.jpg
रस्ता आणि एस्टीच्या कृपेने आदल्या दिवशी झालेलं जागरण त्या मुळे डोळे हि जड होऊ लागले. वरच्या भागात थोडा तरी वारा जाणवत होता इथे मात्र झाडाचं पान हलायला तयार नाही. एकदम भकास वातावरण. कसंबसं स्वतः ला ढकलत पंधरा वीस मिनिटे गेल्यावर पहातो तर मधला ग्रुप जेवण करून आराम करत होता. मोरे मामा त्यांच्या थोडं पुढे बसले होते. ते म्हणाले, मॅनेजर आले का ? त्यांना म्हणालो, तुम्ही व्हा पुढं आम्ही येतो आरामात.
IMG_20191228_140216.jpg
मोठ्या धोंड्यातून उतरत उतरत पायाची नळी मांडी गुडघ्याच्या वाट्या, फुल्ल वाट लागली पण नाळ काही संपत नव्हती. अगदी असाच अनुभव मागे डोणी दार उतरताना आला होता. काही अंतर जाताच वाटेत पाणवठे दिसू लागले, बाटलीत भरून घेत तोंडावर मारून फ्रेश झालो. उतरतोय चालतोय पण नाळ काही संपेना. पुढे गेलेला ग्रुप, मागे राहिलेल्या मंडळींना आवाज देत चालत लोटत सहा वाजता हातलोट घाटाच्या फाट्यावर आलो. अंदाजे आठशे मीटरच्या खडतर कोंडनाळेला सुरुवात केल्यापासून अगदी इथवर खाली येई पर्यंत पूर्ण वाट ही नाळेतूनच कुठेही आजू बाजूने अशी वाट नाहीच. माझ्या तरी मते ही दिर्घ नाळ चढाई करणं अधिक सोयीचं. असो... आमच्या आधी इथवर आलेली मंडळी पुढे निघाली, आम्ही थोडा विसावा घेत अगदी निवांत. आता मुख्य ओढ्याला उजवीकडे ठेवत सपाटी वरून चाल.
Mandir.jpg
वाटेत लागणारे भैरीचे देऊळ उजवीकडे ठेवत सातच्या सुमारास बिरमणीत ठरलेल्या जागी ढेबे आजींच्या घरी दाखल झालो. हात पाय मोकळे करायला धावपटू सायकलपटू मित्रांनी स्ट्रेचिंग सेशन घेतलं त्याचा मात्र खूपच फायदा झाला. एकदम रिलॅक्स. फ्रेश झाल्यावर गप्पा, एकमेकांचे इतर भटकंतीचे अनुभव. तोवर एकट्या ढेबे आजींनी सर्वांचा स्वयंपाक तयार केला, त्यांना मदत करायला पवन आणि दोघे तिघे जाऊ म्हणतात तर आजींनी नकार दिला. फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी भात आणि तांदळाच्या भाकऱ्या. फार वेळ न घेता एवढ्या लोकांचा चवदार स्वयंपाक करणाऱ्या आजी खरंच ग्रेट तेही पाठीच दुखणं असताना अर्थात ही गोष्ट आम्हाला नंतर कळली. ट्रेक नंतर मुंबईला घरी आल्यावर नरेश काकाने आजीला एक बेल्ट बिरमणीत पाठवून दिला. जेवणानंतर काही अमानवीय किस्से चर्चिले गेले पण झोप अनावर झाल्यामुळे फारसा भाग नाही घेता आला. सकाळी निवांत उठू म्हटलं तरी सहाच्या आत जाग आली. सर्व आवराआवरी चहा नाश्ता घेऊन, आजींचा निरोप घेत आठच्या सुमारास हातलोट घाटासाठी निघालो.
IMG_20191229_080334.jpg
बहुतेक ट्रेकला घाटावर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी उतराई असते पण यावेळी उलट चढाई करणार होतो. कालच्या तुलनेत आजची सकाळ मला तरी जास्त प्रसन्न वाटत होती, कदाचित झोप थकवा वातावरण याचा परिणाम असावा.
IMG_20191229_083217.jpg
भैरी मंदिराच्या पुढे जाताच दूरवर हातलोट घाटाची खिंड नजरेत आली. पाऊण तासात काल जिथे होतो त्याच कोंडनाळ व हातलोट घाटाच्या जंक्शनवर आलो.
IMG_20191229_083939.jpg
कोंडनाळेच्या तुलनेत हातलोट घाट खूपच सोपा अजूनही व्यवस्थित वापरात असलेला. रुंद प्रशस्त वाट झाडी भरल्या रानातून चढू लागली. अगदी बांधीव रचाई केलेली मळलेली वाट.
IMG_20191229_085025.jpg
इथही बऱ्याच जागी वन खात्याने चर खोदून काही ठिकाणी दगडी बांध घातलेले. जमिनीची धूप थांबवून पाणी अडवा पाणी जिरवा..असो. कोंडनाळेचा मुख्य ओढा उजवीकडे ठेवत त्याला समांतर असलेल्या धारे आडून वाट वर जाऊ लागली पुढे दिशेनुसार दोन्ही वाटा त्रिकोणाच्या दोन भुजा सारख्या परस्पर विरोधी बाजूने जातात. वाटेतले मोठे अर्थात कोरडे ओढे पार करत दाट रानातून एकदम आस्ते कदम चढाई. कुठेही अंगावर येणं धाप लागणे असा प्रकार नाही. वाटेत काही ठिकाणी बाणाच्या खुणा जोडीला प्लास्टिक आणि कागदी कचरा होताच, वापर असल्याने हे होणारच. इथेही काही जण झटपट पुढे गेले तर काही आमच्या सारखे निवांत. सकाळच्या वेळेत हवेत चांगला गारवा जोडीला विविध पक्ष्यांची किलबिल एकदम अनुकूल वातावरण. ट्रेक धावणं सायकल या विषयांवर चर्चा, एक दुसऱ्याचे अनुभव सांगत ऐकत थोडं थांबत तर कुठे टेकत पावणेअकराच्या सुमारास घाटाच्या मध्याहून थोडं अधिक उंचीवर वाटेच्या अलीकडे असलेल्या पाण्याच्या टाक्या जवळ आलो.
IMG_20191229_105316.jpg
सहजासहजी लक्षात न येणारं हे पाण्याचं टाक मूळ वाटे पासून डावीकडे थोड खाली उतरत दहा पंधरा पावलांवर आहे. ठळक अशी कोणतीही खूण सांगता येणं अवघड आहे कुणी माहितगार सोबत असले तरच सापडू शकते. मोरे मामा सोबत असल्यानं आम्हाला पाहता आलं. टाकं जरी भरलेलं होतं तरी पाणी पिण्यायोग्य नाही. टाकं पाहून पुढे निघालो अंदाज लावला खिंड जवळ आली असेल म्हणून जरा जास्तच रिलॅक्स झालो पण कसले काय अजूनही वळण वळण घेत वाट जातेच आहे. बरेच अंतर गेल्यावर मात्र चढ जाणवू लागला तेव्हा कळलं खिंड समीप आली. शेवटची झाडीभरली चढाई संपवत खिंडीच्या माथ्यावर आलो, आधी गेलेले ईंद्रा व रोमा दोघं निवांत वाट पाहत बसलेले.
IMG_20191229_120545.jpg
याच ठिकाणी घाटाची प्राचीन साक्ष पटवून देणारे आणखी एक पाण्याचं टाकं आणि बाजूच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या.
IMG_20191229_122011.jpg
खरंच अगदी पूर्वापार वापरात असलेली घाटावरील हातलोट ते कोकणात बिरमणी कळमणी या भागाशी जोडणारी एक सुंदर घाटवाट खात्यात जमा झाली. दुसरी एक गोष्ट म्हणजे पूर्ण वाट झाडीतून असल्याने भर उन्हाळयातही करता येणारी तर श्रावण सरत्या पावसात विविध रानफुल पाहत अजूनच मजा घेता येईल यात वादच नाही. आता बिरमणीहून हातलोट गाडी रस्ता होऊ पाहतोय, इथल्या दुर्गम वडगाव कळमणी कांदोशी भागातील लोकांचे हातलोट मार्गे महाबळेश्वर अंतर कमी होईल. अर्ध्या तासाची विश्रांती घेत हातलोट गावाची पायवाट धरली. वाटेतला झाडी भरला ओढा पार करत लहानसा चढ चढून मुख्य वाटेवर आलो. डावीकडे वाट कुठल्या तरी वाडीत गेलेली तिथे न वळता उजवी मारत हातलोटच्या दिशेने. मधूमकरंदगडाला उजवीकडे ठेवत तासाभराची चाल थेट गावात.
IMG_20191229_131214.jpg
गाव एकदम सुंदर, घरही स्वच्छ मोठी ऐसपैस अगदी कोकणी वाटावी अशीच. इथल्या लोकांची कोकणात खेड पर्यंत सोयरिक आहेच तर बरीच मंडळी पुण्या मुंबईत कामानिमित्त स्थायिक झालेली. अशाच एका घरच्या अंगणात पाणी वगैरे घेऊन गप्पा मारत असताना बाजूचा म्हातारा सांगू लागला, “अहो शहरात मरायला टेकलेलो डाक्टर म्हणे तुम्ही काय आता जास्त जगत नाही इथं येऊन दहा वर्ष झाली अजूनही ठिकठाक आहे”.
Ghar.jpg
खरंच शुध्द हवा पाणी आरोग्यावर खूपच चांगला परिणाम करतं. अगदी असच वाक्य मला पारगड वरील ‘रघुवीर शेलार’ यांनी सुनावलं होत. थोड्या फार अंतराने सर्व मंडळी आली. गावातील ओढ्यात अंघोळ मग चहा पाणी फ्रेश झाल्यावर दोन वाजेच्या सुमारास त्याच महिंद्रा पिकअपने निघालो. पुन्हा तोच वळणा वळणाचा रस्ता नशीब कुणाला उलटी झाली नाही. आम्ही मुंबईकर वाडाकुंभरोशीला उतरलो. एक चांगल्या दमदार ट्रेकची सांगता करून पुणेकर आणि नाशिककर मित्रांना निरोप दिला. मित्र मंडळी पिकअपने पुढे महाबळेश्वर गेली. आम्ही मात्र चार वाजताची मुंबई गाडी येईल म्हणून झटपट काहीतरी खाल्लं. त्यात गाडी पाचगणी डेपोची रिझर्व्हेशन महाबळेश्वरहून आणि आम्ही बसणार वाडाकुंभरोशीला पण हे मास्तरला थोडी माहित असणार ? मग मॅनेजरची फोनाफोनी.. ट्रॅफिक मुळे चारची गाडी सव्वासहा वाजता आली तोवर केलेला टाईमपास नंतर गाडीत मास्तर आणि बाई माणसाचं भांडण. “गाडी मंबई पर्यंत फुल्ल आहे, नो श्टेंडींग”. टिंग..टिंग.. हे सारं लिहायचं झाले तर एक वेगळाच विषय होईल.

सहभागी भिडू :

मुंबई:
नरेश काका (गिरीविहार )
ईंद्रा
रोमा
नवीन
सतीश
शैलैश
निकेश
अस्मादिक

नाशिक :
हेम
सुदर्शन कुलथे
योगेश जोशी

पुणे :
अनिरुद्ध
सिद
पवन
विराग
गजानन
डॉ. हेळंबे
संजय

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2020/01/makarandgad-kondnal-hatlot.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसानी असा छान लेख दिलात आणि लाडक्या सह्याद्रीचे दर्शन घडवलेत..
फोटो पाहूनच एकदम लहान व्हायला होतं ! चित्त रमून जातं .
धन्यवाद!

सरस.
महाबळेश्वरकडे अजून ( ट्रेकिंग) फिरलो नाही. खूप छान दिसतय वन.